Skip to content

हिंदी सिनेमासृष्टीतील कलावंतीण.

शहरातील “ती ” वस्ती नक्की कुठे आहे हे मला सतरा, अठरा वर्षापर्यंत माहीत  नव्हते. स्वतःच्याच बायकोला गजरा आणणे म्हणजे रसिकतेची परिसीमा असे समजणारी आमची पांढरपेशी वस्ती; तिथे हातात गजरा बांधून घेणारा कुठे मिळणार! काही वस्तू हव्या होत्या म्हणून मी आणि माझी  मैत्रीण लोहार चाळीत जात होतो. पण आमची बस तिथपर्यंत जाणारी नव्हती. बस -ड्राइवरने एका जागी उतरवले.
“पुढच्या गल्लीतून सरळ जा.भरपूर दुकाने आहेत.”

दुपारची वेळ. रस्ता सामसूम. रस्त्याच्या दोहो बाजूला  एक मजली चाळी होत्या. रंग उडालेल्या, जुनाट. काही मोडकळीला आलेल्या. सर्वांच्या खिडक्या हिरव्या रंगाच्या. त्या सर्व बंदच होत्या.  माझी मैत्रीण एकदम चकित होऊन  म्हणाली , “अय्या नंबर आहेत बघ घरावर ,पोस्टमनला शोधायला नको “. काळजात लक्क झाले. मी तिचा हात घट्ट पकडला आणि धावत सुटले. गल्लीच्या बाहेर आल्यावरच श्वास घेतला.
फोरास रोडची ती पहिली भेट होती माझी .
या गल्लीचे प्रत्यक्ष दर्शन हे अंगावर काटा आणणारे. काहीबाही ऐकल्याने भयावहच. नंतर अनेक कादंबर्यांतून, सिनेमातून या वस्तीची ओळख झाली. आतापर्यंत जी स्त्री पाहीली  होती ती आई होती, आजी होती. मुलगी, बहीण, मैत्रीण, पुतणी, भाची अशा अनेक नात्यांनी ती माहीत  होती. ही मात्र कोणाशीच कोणत्याच नात्यांनी बांधली गेली नव्हती. ती फक्त मादी होती. शरीरसुख देणारी मादी.   पुरुषाचे मन आणि तन रिझवणारी मादी .

संस्कृतीत स्त्रीला मानाचे स्थान दिले आहे. माता, जननी म्हणून तिचा गौरव केला आहे. हिंदू संस्कृतीत देवीच्या स्वरूपात तिला  पुजले गेले आहे. मग  नात्याने न बांधली गेलेली “ती” कशासाठी आणली गेली हा खरंच विचार करण्याचा विषय आहे .
खरेतर विवाहसंस्थेचा हेतूही  राजरोस शरीरसुख मिळवणे हा होता  पण यातील स्त्रीचा सहभाग हा जीवन निर्मितीसाठी होता. मातृत्व हे स्त्रीचे बलस्थान पण आपल्या स्वार्थासाठी पुरुषाने स्त्रीची ओळख “आई” या नात्यापुरतीच सीमित ठेवली. तिचे सर्व अस्तित्व  चार भिंतीत कोंडून ठेवले. सुरक्षिततेच्या नावाखाली तिच्या हालचालीवर  बंधने घातली. तीही प्रणयिनीच होती पण पत्नी आणि माता  या दुहेरी भूमिका निभावताना तिच्यातील अभिसारिका  मागे पडली आणि हळूहळू संपून गेली.
स्त्रियांनी सुद्धा ही परिस्थिती स्विकारली.
समर्पणाची वृत्ती स्त्रीच्या अंगात असतेच म्हणून  विवाहाच्या बंधनातून तिने  मुक्त होण्याचा  फारसा प्रयत्नही केला नाही. एकप्रकारे  हा पुरुषांसाठीसुद्धा तोटाच होता. पुत्रप्राप्ती करता संभोग हे नवरा बायको या नात्याचे प्रयोजन राहिल्यामुळे सखीचा शोध  घेण्याची गरज वाटू लागली. अशी स्त्री, जी केवळ देह सुखावत नाही तर मन फुलवते.
या गरजेतून ही “दुसरी स्त्री” उदयाला आली .….
एक घरातील -वंश विस्तारासाठी,  एक बाहेरील – रिझवण्यासाठी .  .

कुलीन स्त्रिया या पावित्र्य जपण्याच्या नावाखाली घरात कोंडल्या गेल्या,  तिथे सर्वच प्रकारे  सुरुवातीला या दुसऱ्या  स्त्रीची भरभराट होत गेली . गायन, नृत्य, काव्य, संभाषण, लेखन, राजकारण या सर्व विषयात त्यांची प्रगती झाली . स्वर्गातील अप्सरा, त्याचेच भ्रष्ट रूप म्हणजे पृथ्वीवरील देवदासी, गणिका, कलावंतिणी, कंचनी आणि आता बार गर्ल्स असा  हा  दुसऱ्या  स्त्रीचा प्रवास म्हणजे समाजातील बदलाचे प्रतिबिंब. समाजाच्या या  बदललेल्या विचारसरणीचे प्रतिबिंब हिंदी सिनेमातसुद्धा पाहायला मिळते. चित्रपटाची नायिका पवित्र, सोज्वळ असावी अशी समाजाची मागणी असेल तरीही ती भूमिका एकसुरी वाटते. अनेकवेळा खरा रंग भरते ती तवायफ.
स्त्रीच्या कामुकतेचे दर्शन घडवायला  “तवायफ” ही व्यक्तिरेखा सोयीस्कर पडत असावी पण तो तिचा  फक्त एक चेहेरा .
नृत्यात पारंगत असलेया अभिनेत्रीसाठी हा रोल म्हणजे पर्वणीच . त्यातही तवायफही स्त्रीच.
चांगले  आणि वाईट या मधली ही भूमिका अभिनयाचा कस लागणारी वाटली  तर त्यात नवल नाही .
केवळ अभिनयच नाही तर संगीत आणि नृत्य दिग्दर्शकाच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या या भूमिका होत्या . देवदासमधली चंद्रलेखा, उमरावजानमधली उमराव, पाकीजातील साहेबजान, खिलौनामधील चांद, मुझे जिने दो मधली चमेली, मुकद्दर का सिकंदर मधील जोहरा, शराफतमधली चांदनी, तिसरी कसम मधली हिराबाई अशा अनेक व्यक्तिरेखा  चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अजरामर झाल्या. 

असा समज आहे की या व्यवसायातील मुली इथे फसवून आणल्या जातात पण कोठ्याचीसुद्धा एक परंपरा आहे. त्याला अनेक वर्षाचा इतिहास आहे. मुघल सम्राटांच्या दरबारात मनोरंजनासाठी पर्शियाहून नृत्यांगना आणल्या गेल्या. पर्शिअन आणि भारतीय  नृत्याच्या संकरातून एका नवीन शैलीचा उदय झाला ती म्हणजे ” कथ्थक “
पुढे  मुघल साम्राज्य अस्तंगत झाल्यावर दिल्लीनंतर लखनौ येथे या कलेला आश्रय मिळाला. वाजीद आली शाह, लखनौचा शेवटचा नवाब याने तर नृत्य आणि संगीताची अकादमी स्थापिली. येथे शिकणाऱ्या मुली या फक्त वारांगना नव्हत्या. त्यांना समाजात मानाचे स्थान होते .पत्नी होणे त्यांच्या नशिबी नसेलही परंतु कोणीही यावे आणि तुडवावे अशी त्यांची प्रतिमा नाही .  कोठ्यावर गाणे ऐकायला जाणे हासुद्धा त्या काळात एक प्रतिष्टेचा भाग होता. कोठा संस्कृतीच्या वैभवाचा हा काळ होता . तो देवदास, साहब, बीबी और गुलाम, उमराव जान, पाकीजा या चित्रपटात दिसतो. 

काही स्त्रियांचा जन्मच कोठ्यावर होतो. संस्कार त्या वस्तीचेच होतात. आपल्या या पेशाचा अनेकांना अभिमानसुद्धा असतो.
हिंदी सिनेमाने अशा वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या दुसऱ्या स्त्रीला पडद्यावर आणले. त्या काहींचा हा आढावा.

चंद्रमुखी -देवदास ( वैजयंती माला)
——————– ———————-

कोठ्यावरील नर्तिकेला सहानुभूती मिळवून देणारा पहिला चित्रपट होता ” देवदास ” देवदासची चंद्रमुखी देवदासच्या प्रेमात आहे. तिने  प्रेमाचा खरा अर्थही जाणला आहे. त्यामुळे पारोचा, देवदासाच्या प्रेयसीचा तिला मत्सर वाटत नाही.
देवदासाच्या  सुखासाठी काहीही करायची तिची तयारी आहे. चंद्रमुखीचे प्रेम भक्तिरसपूर्ण आहे. जेव्हा देवदास कोठ्याला भेट देतो, तेव्हा चंद्रमुखीच्या नृत्याचा किंवा सौन्दर्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्या वातावरणाचा त्याला तिरस्कार वाटतो. 
चंद्रमुखीसाठी  हे नवीन आहे. कोठ्याला भेट देणाऱ्या तिच्या आशिक गिऱ्हाईकांहून हा वेगळा पुरुष आहे त्याची जाणीव तिला होते. त्याचे पारोवरील अटळ प्रेम. तिला त्याच्याकडे खेचून नेते .
चंद्रमुखीचे  सुरवातीला मुजऱ्याचे गीत आहे  “अब आगे ‘तेरी मर्जी “
बिरजू महाराजांनी यात नृत्यदिग्दर्शन केले आहे .

सीने में मोहब्बत  जजबात का तूफाँ है
जीने की भी  हसरत है , मरने का भी अरमाँ है
हो  मेरे सैयां , हो मेरे बालमा बेदर्दी
अब आगे ‘तेरी मर्जी

गाण्याचा ताल, सूर, शब्द, नृत्याच्या  अदा या पुरुषाला आकर्षून घेण्यासाठी खेळलेल्या खेळी  पण देवदासच्या प्रेमात पडल्यावर मात्र चंद्रमुखीचे परिवर्तन होते. भौतिक सुखांचा त्याग करून तिच्या व्यवसायालाही त्यागून, ती तिच्या देवदासासाठी जोगिंण होते. केवळ चंद्रलेखाच्या श्रद्धेने आणि विश्वासाने या एकतर्फी प्रेमाला प्रतिष्ठा मिळाली आहे. प्रेमात समर्पित झाल्यावर, तिच्या  भूमिकेत झालेला फरक गीतातही दिसतो.

हे दुसरे गीत पहा,
तुझे और की तमन्ना, मुझे ‘तेरी आरजू है
तेरे दिल में गम ही गम है, मेरे दिल में तू ही तू है
जो दिलों को चैन दे दे , वो दवा कहाँ से लाऊँ
जिसे तू कबूल करले 

पार्वतीच्या प्रेमातून देवदास कधीच सावरू शकणार नाही याची खात्री असूनही चंद्रलेखा काहीही अपेक्षा न ठेवता मदतीचा हात पुढे करते. निरपेक्ष तर आहेच पण तिच्या प्रेमाची तीव्रता सुद्धा विलक्षण आहे. देवदासासाठी साऱ्या जगाला तोंड देण्याची तिची तयारी आहे .

साहब, बीबी और गुलाम ( नर्तकी )– मिनू मुमताज
———————————————————-


साहब, बीबी और गुलाम या चित्रपटातील” साकीया आज तुझे नींद नाही आयेगी ” गाणाऱ्या मिनू मुमताजची भूमिका चंद्रमुखीच्या तुलनेत लहान. त्याचा आवाका सुद्धा छोटा.  तरीही छोट्या बहूचा संसार सुरु होण्याआधीच या वादळाने उध्वस्त होतो. देवदास आणि  साहब ,बीबी और गुलाम या चित्रपटांना बंगालची पार्श्वभूमी आहे.
येथील जमीनदार, त्यांची पिढीजात संपत्ती आणि सत्ता, त्यातून आलेली निष्क्रियता, व्यसने आणि संस्कृतीचा, पर्यायाने कलेचा अटळ असलेला नाश याचे दर्शन इथे होते. यातील मुख्य भूमिका आहे ती छोट्या बहूची . तिच्या पतीला, जमीनदाराच्या धाकट्या मुलाला बाहेरचा नाद आहे . रात्र झाली की त्याची पावले कोठ्याकडे वळतात. त्याच्या रात्री जागवल्या जातात त्या कोठ्यात आणि  घरी त्याची पत्नी त्याच्या आठवणीत आणि प्रतीक्षेत रात्र जागवते .
साक़िया आज मुझे नींद नहीं आयेगी  ,सुना है तेरी महफ़िल में रत जगा है
आँखो आँखो में यूं ही रात गुजर जायेगी,  सुना है तेरी महफ़िल में रत जगा है

गीत कोठ्यावरील मुजऱ्याचे पण त्यालाही अशी करूण  किनार आहे .
अनेक वेळा तवायफ ही प्रेमाच्या त्रिकोणाचा तिसरा कोन म्हणून येते पण ती नायिका म्हणून आलेले आणि गाजलेले काही चित्रपट म्हणजे अनारकली, मुघल ए आझम,  उमरावजान आणि पाकीजा.

अनारकली -( अनारकली )–बिना रॉय
——————————————-

अनारकली, ही एक राजपुत्र जो भावी सम्राट आहे आणि एक नर्तिका यांची प्रेमकहाणी. इतिहासात त्याला आधार नाही पण प्रेमिकांच्या विश्वात या शोकांतिकेला सर्वोच्च स्थान मिळाले . त्यात हातभार होता तो ” ये जिंदगी उसीके है ” या गीताचा .

ये बहार ये समा , कह रहा है प्यार कर
किसीकी आरजू में अपने दिल को बेकरार कर
जिंदगी है बेवफा , लूट प्यार का मजा

सलीमला राज्यापेक्षासुद्धा प्रेम मोलाचे तर अनारकलीला आपले सामाजिक स्थान खूप खाली आहे ते मान्य असूनही प्रेमापुढे कशाचीच पर्वा नाही . प्रेमात पडण्याचा हा काळ म्हणजे डोळ्यावर जाणून बुजून पट्टी बांधण्याचा काळ . हृदयालासुद्धा जीभ असते हे मान्य करण्याचा काळ. त्यात फुलून आलेल्या वसंत ऋतूनेसुद्धा झोकून देण्याची साद घातली आहे .
कोणावरतरी सर्वस्व उधळून देण्याची ही प्रबळ इच्छाच सारासार बुद्धीचे काहीही  ऐकत नाही. त्यात जीवन क्षणभंगुर आहे याची जाणीव दोन वेगळ्या परिस्थितीत वाढलेल्या प्रेमिकांना आहेच. मग जे काही क्षण पदरात पडलेले आहेत ते सर्वांगाने जगण्याचे आवाहन का करू नये !
प्रेमात पडणे हा इथल्या जगात गुन्हा असेलही पण वरच्या दरबारात मात्र आपले प्रेम यशस्वी होईल याची खात्री देताना अनारकली म्हणते ,

जो दिल यहाँ न मिल सके, मिलेंगे उस जहान में
खिलेंगे हसरतों के फूल, जा के आसमान में
ये ज़िन्दगी चली गई जो प्यार में तो क्या हुआ
ये ज़िन्दगी उसी की है…

प्रेमाचे इतके यथार्थ वर्णन करणारे आणि कोणते दुसरे गीत आहे !

मुघल ए आझम -( अनारकली )–मधुबाला
———————————————–


अनारकलीच्या नर्तिकेच्या भूमिकेने नर्तिकेलाही प्रतिष्ठा मिळवून  दिली. याच विषयावर आलेला आणि अत्यंत गाजलेला दुसरा चित्रपट होता “मुघल ए आझम ” अनारकलीची भूमिका मिळालेली अभिनेत्री होती  सौन्दर्यवती ” मधुबाला “सम्राट अकबर याचा वारस , शाहजादा सलीम एका सामान्य कंचनीच्या, अनारकलीच्या प्रेमात पडतो आणि मुघल सल्तनत हादरून जाते .या असामान्य लावण्यवतीला मिळवण्यासाठी सलीम प्रत्यक्ष आपल्या वडिलांशी, शहेनशहांशी युद्ध पुकारतो . मुलगा झुकत नाही तर अनारकलीला  बादशहा  तुरुंगात ठेवतो . तरीही सत्तेपुढे हार न मानता ती खुद्द सम्राट अकबरालाच भर दरबारात आव्हान देते .
जब प्यार किया तो डरना क्या
प्यार किया कोई चोरी नही की
छुप छुप आहें भरना क्या

प्रेम करण्यासाठी आणि निभावण्यासाठी लागते ते धैर्य. प्रेम करणे काही गुन्हा नाही. हृदयाची चोरी ही ईश्वराच्या दरबारात गुन्हा समजली जात नाही. जी गोष्ट दोन हृदयांना जवळ आणते ती खुले आम कबूल करायला मला भीती वाटत नाही .
” प्यार किया तो डरना क्या ”  हे प्रेमिकांचे ब्रीदवाक्य बनले .
हे गीत जेव्हा कळसाला पोचते, तेव्हा शीश महालातील हजारो आरशांत अनारकलीची प्रतिबिंबे दिसतात. पाशवी सत्तेपेक्षाही प्रेमाची ताकद अफाट आहे, हा संदेश या गीताने दिला .

तवायफ़ला अमर केले ते अजून एका चित्रपटाने. तो चित्रपट होता मीना कुमारीचा ” पाकीजा  “
पाकीजा (साहेबजान)- मीना कुमारी
——————————————

” आपके पांव बहोत हसीन है. इन्हे जमीनपर मत उतारईयेगा. मैले हो जायेंगे ” हा डायलॉग साहेबजानला ” पाकीजा ” म्हणून  ओळख देतो खरा; पण हे पाय, गुलाबी महालातील गालिच्यावर थिरकून आधीच डागाळलेले असतात.  त्याची इतिश्री काचांच्या तुकड्यावर नाचून रक्तबंबाळ होण्यात होणार असते. 
पाकिजाची कथा आहे नर्गिस आणि तिची मुलगी साहेबजानची. दोघांच्याही नशिबात कोठ्याची बदनामी आहे. नर्गिसच्या प्रियकराचे कुटुंब तिला स्विकारत नाही. सर्वांकडून नाकारली गेलेली ती कबरीस्तानाचा आश्रय घेते. मुलीला जन्म देऊन ती मरते आणि मुलगी आपल्या वडिलांकडे जाण्याऐवजी मावशीकडे पोचते. तवायफ म्हणून प्रसिद्ध होते . पाकिजासाठी जो सेट वापरला आहे त्यात कोठ्यांचा माहौल हुबेहूब उभा केला आहे. पार्श्वसंगीतात तबल्याचे बोल आहेत, कथ्थक नृत्याचा ठेका आहे. आजूबाजूच्या कोठ्यातून जे सूर येतात त्यात ठुमरीची तान आहे, गझलची  नजाकत आहे. नाही आहे ती प्रतिष्ठा. 
” चलते चलते यूँही कोई मिल गया था ”  हे फक्त मुजरा गीत नाही. ही एक सुगंधी आठवण आहे, जी अक्षरांच्या स्वरूपात तिने जपून ठेवली आहे. 

रेल्वेच्या प्रवासात भेटलेला एक प्रवासी साहेबजानच्या उघड्या, गोऱ्यापान, नाजूक पावलांना पाहून घायाळ होतो. गाडीतून उतरताना तिच्यासाठी एक चिठ्ठी ठेवून जातो .
“आपके पांव बहोत हसीन है. इन्हे जमीनपर मत उतारईयेगा..मैले हो जायेंगे “
दौलतजाद्यापेक्षा हा नजराणा अनोखा. न पाहताच त्या प्रवाश्याशी एक नाते जुळून येते .

जो कही गयी न मुझसे, वो जमाना कह रहा है
के फसाना बन गयी है , मेरी बात टलते टलते

माझ्या मनातील विचार कसे व्यक्त करावे हेच मला समजत नाही आहे. ते सत्य आहे का आभास ! पण समाजाने त्याची कथा बनवली आहे. एका घटनेची कथा. ज्या पावलांवर जेव्हा कौतुकाची उधळण केली गेली त्या पावलात तेव्हा घुंगरू नव्हते .  त्या देखण्या पावलांचे सत्य तो प्रवाशी पचवू शकेल का ?
या सर्व स्त्रिया पेशाने तवायफ आहेत, नृत्यांगना आहेत पण मनाने दिलदार, संवेदनशील आहेत. प्रेमासाठी आपले सर्वस्व उधळून टाकणाऱ्या या  नायिकांत अजून एक नाव आहे.  ते आहे उमरावजान. रेखा ही भूमिका अक्षरशः जगली आहे.
उमराव जान – (अमिरन)-रेखा
———————————–

अमिरन ते उमराव जान हा एका खानदानी  घरात जन्माला येऊनही कोठ्यात पोचलेल्या  मुलीचा प्रवास.
न कळत्या वयात पळवून आणलेली आमिरन कोठ्यावर वाढते आणि कोठ्याचीच होते. उमरावची शायरी, गायकी आणि सौंदर्य लखनौ शहराला घायाळ करते. 

इस शहर में तुम जैसे, दिवाने हजारो है
इन आंखो की मस्ती के मस्ताने हजारो है !

पण दुसऱ्यांना  घायाळ करता करता सुलतानच्या नजरेने तीच घायाळ होते. प्रेमाची जीवघेणी ओळख आणि त्यातून नशिबी  येणारा वनवास  तिला चुकत नाही. आयुष्याची परवड आणि नंतर नियतीने आधीच्या आयुष्याशी परत  एकदा घालून दिलेली गाठ उमरावला जखमी करून जाते. जीवनाच्या एका वळणावर नशीब तिला तिच्या मातृभूमीला  घेऊन येते . मुजरा करण्यासाठी  येत असताना इथे गेलेले बालपण तिला खुणावू लागते. तिची माणसे अजूनही इथेच असतात पण ती मात्र तिची राहिली नसतात. स्वतःच्याच गावात परकी ठरलेली ती सवाल करते,

ये क्या जगह है दोस्तों, ये कौन सा दयार है
हद-ए-निगाह तक जहाँ, गुबार ही गुबार है
स्वतःचीच आई, भाऊ परके झाल्यावर ,परक्यांना, अनोळखी लोकांना ” दोस्तो ” म्हणणे हे सत्य दुःखदायकच.
आपल्याच लोकांना  परके करणारे असे हे कोणते जग आहे हा प्रश्न पडला आहे तिला .
तमाम उम्र का हिसाब ,मांगती है जिंदगी
ये मेरा दिल कहे तो क्या , के खुद से शर्मसार है

मी घालवलेल्या आयुष्याचा काय हिशोब सांगणार यांना , माझ्या आयुष्याची मलाच लाज वाटत आहे .

संगीत, नृत्य, काव्य यांच्या  साधनेसाठी एक जन्म अपुरा पडेल पण त्या सर्वातच  पारंगत असलेल्या बायका सर्वसामान्य आयुष्य जगू शकत नाही हे त्यांचे दुर्दैव. समाजाची वेगळी गरज भागवण्यासाठी त्यांच्या स्वप्नाची चिता त्यांनाच रचावी लागते . अशा किती रात्री जगण्याची स्वप्नेच बघत आणि तीळतीळ मरत मरत घालवत असतील या स्त्रिया .
स्वतःच्या  पेशाचा अभिमान असलेली पण नंतर प्रेमाने पूर्ण बदलून गेलेली नायिका म्हणजे मुझे जीने दो या चित्रपटातील  चमेली.

मुझे जिने दो- (चमेली) वहिदा रहमान
————————————————–

रूढार्थाने जी सोज्वळ नायिका असते ती नायकावर  अवलंबून असते, नायकाच्या  पुरुषत्वाचा कस लागतो तो तिचे संरक्षण करण्यात, जपण्यात तर तवायफ, स्वताच्या आकांक्षा , अपेक्षा त्याला मोकळेपणाने सांगून त्याच्या पुरुषत्वाला चेतावते .
आपल्याकडे तवायफ रंगवतानासुद्धा नायिका अस्पर्शित असावी असा आग्रह असतो किंवा तिला गरज म्हणून शरीर मनाविरुद्ध विकावे लागते असे दाखवले जाते. योनिशुचिता, शरीर विक्रेत्यांनासुद्धा सिनेमा चालण्यासाठी लागू करावी लागणे  असा विरोधाभास आपल्या मानसिकतेत आहे .हा व्यवसाय गुणदोषांसकट स्विकारुन चमेलीने तो निभावला आहे, तरीही ती नायिका मानवी आहे, गुणी आहे, हवीहवीशी आहे अशा भूमिका कमी. सिनेमातील चमेलीजान ही व्यावसायिक आहे . लोकांना भुलवणारी आहे .

रात भी है कुछ भीगी भीगी , चाँद भी है कुछ मध्यम मध्यम
तुम आओ तो , आँखे खोले , सोयी हुई पायल की छम छम

केवढी गोड  तक्रार !
तुझी वाट पाहून रात्रसुद्धा आळसावलेली आहे. विरहाने डोळे शिणले आहेत. चंद्र अस्ताला जात आहे पण जर तू येशील तर माझ्या सैलावलेल्या पावलांनासुद्धा तुझी चाहूल लागेल. पैंजणाचा खूप सुंदर उपयोग केला आहे या गीतात. 

होश में थोडी बेहोशी है , बेहोशी में होश है कम कम
तुझको पाने की कोशिश मॆ , दोनो जहांसे खोये गये हम .

सुनीलदत्तच्या डोळ्यातील रासवटपणा, अधाशी वासना आणि वहिदाच्या डोळ्यातील उत्तेजित करणारी मादकता.  तिचे डोळे बोलतात! भावनांचा गोफ गुंफतात आणि बघणारा हरवून जातो. शालीनता, सलज्जता इथे नाही.
आहे ते देहाचे आवाहन, प्रणयाचे उन्मुक्त आमंत्रण.  हीच मादकता आणि धिटाई “मुकद्दर का सिकंदर ” मधील रेखाच्या ” सलाम -ए – इश्क मेरी जां , जरा कबूल कर लो, तुम हम से प्यार करने की जरा सी भूल कर लो, मेरा दिल बैचैन है हमसफर के लिये ”  या गाण्यातसुद्धा जाणवते. 

इथे जन्म घेतलेल्या, मुरलेल्या, सरावलेल्या स्त्रियांनासुद्धा पत्नी, आई, प्रेयसी व्हावेसे वाटते तर फसवून आणलेल्या स्त्रियांचे काय होत असेल? या फसवणुकीत पदरात आलेली वंचना त्यांना समाजाचा तिरस्कार करायला शिकवत असणार ! अनेक वेळा परिस्थितीपोटी स्त्रीला बाजारात उभे राहावे लागते तरीही अशावेळी तिचे आपलेसुद्धा परके होतात.
ममता – (पन्ना बाई )- सुचित्रा सेन
——————————-


रहते थे कभी जिनके दिल में, हम जान से भी प्यारो कि तरह
बैठे है उन्ही के कूंचे में हम, आज गुनहगारो की तरह

एक काळ असाही होता की तू मला तुझ्या हृदयात पूजले होतेस आणि आज माझी जागा तुझ्या घरात  तर सोडाच, मनातही नाही. अगदी रस्त्यावर एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे उभे केले आहेस तू मला. निदान माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याआधी विचारायचे तरी की  या अवस्थेला कोण जबाबदार आहे ?

दावा था जिन्हें हमदर्दी का खुद आ  के न पूछा हाल कभी
महफिल में बुलाया है हमपे हसने को सितमगारोंकी तरह

कितीही प्रेम असूदे, दुखावले गेल्याचा  पुरुषी अहंकार, हरवले गेल्याचा संताप, इतकेच काय तर स्वताचा दुबळेपणाची  चीड,  या सर्वाचा  परिणाम शेवटी स्त्रीलाच भोगावा लागतो , बलात्कारसुद्धा जेव्हा होतो  तेव्हा आपल्या स्त्रीला न वाचवता आल्याची खंतही  पुरुष तिलाच घराबाहेर काढून भरून काढतो . वांझोटा संताप आणि त्यातून होणारी स्वताच्या  नपुसंकपणाची जाणीव ते कुस्करलेले सौंदर्य पाहून होत असावी काय ! काय प्रतिक्रिया होत असेल तिची काय या दुटप्पीवृत्ती विषयी ?

हा ममता या सिनेमातील  बैठकीचा मुजरा.
गझल किंवा ठुमरीच्या अंगाने जाणारा, तसाच एक सुंदर मुजरा ” अदालत”मध्ये आहे.

अदालत- (निर्मला) -नर्गिस
————————————-

” उनको ये शिकायत है के हम कुछ नही कहते “
एकेकाळी गुप्ततेने विवाहबद्ध झालेले दोघे, त्यातून राहिलेला  गर्भ  पण त्याला समाजाची मान्यता नसल्याने तिच्या माथी आलेली अवहेलना. आता दोघांच्या परिस्थितीत बरेच अंतर पडलेलं आहे.  विवाहवेदीवरून कोठ्यावर पोचलेली ती आणि तो प्रतिष्टीत  वर्गात  गणला जाणारा . 
त्यात तिच्या मुलाचे भवितव्य तिने गप्प राहण्यात आहे हे ठाऊक आहे तिला

” अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहते .”ही सवय आता अंगवळणी पडलेली . असहनीय या शबदांच्या  पलीकडे  जाते हे प्रेम आणि वेदना .

होंठों को सी चुके तो ज़माने ने ये कहा
चुप सी क्यों लगी है अजी कुछ तो बोलिये…
त्यांची कैफ़िअत ऐकायला कोणी तयार नसतच आणि तरीही प्रश्न असतो  की त्या बोलत का नाहीत!
या व्यवसायात कोणी मनापासून येत नाहीच. बहुधा समाजाच्या वाईट चेहेऱ्याचे दर्शन झालेल्या बायका इथे येतात .

शरीफो का जमाने में अजी बस हाल वो देखा की शराफत छोड दी  मैने
मोहब्बत करने  वालोंका यहां अंजाम वो देखा की मोहब्बत छोड दी मैने….

जगात सुसंकृत म्हणवल्या जाणाऱ्या लोकांची खरी संस्कृती दिसली तर ” शराफत ” या शब्दाचीसुद्धा लाज वाटते. समाजाचा हा काळा चेहेरा जवळून पाहणाऱ्या या स्त्रिया कडवट झाल्या असतील तर नवल नाही …

” मोहब्बत बेचती हू  मै,  शराफत बेचती हू मैं  “असे म्हणत असतीलही त्या पण जगात विकावू नाही असे काय आहे ? बुद्धी, नियत, चारित्र्य ,प्रामाणिकपणा, आता सगळेच बिकावू सगळेच ठरले आहेत फक्त योग्य किंमत मिळायला हवी.
जेव्हा साधना या सिनेमात  वैजयंतीमाला ” यहां सब चीज बिकती है , कहोजी तुम क्या क्या खरीदोगे ? ” हा प्रश्न विचारते तेव्हा खरच उत्तर असते ?
एकूणच जगाचा अनुभव घेवून नजर एवढी सरावलेली असते की त्यांना कोणी फसवू शकत नाही. निबरपणा अंगात मुरवून घेतलेला असतो. प्रेमाच्या नावाखाली लचके तोडलेले असतात म्हणून हा धोक्याचा इशारा “खिलौना” मध्ये चाँदने दिलेला आहे.

खिलौना -(चाँद)-मुमताज
———————————
 

वफ़ा का वास्ता  दे कर, मोहब्बत आज रोती हैं
ना ऐसे खेल इस दिल से, ये नाज़ूक चीज़ होती हैं
ज़रा सी ठेस लग जाये तो शीशा चूर हो जाये
सनम तू बेवफा के नाम से मशहूर  हो जाये ….

अर्थात उडदामाजी काळे गोरे …
जशा फसवल्या गेलेल्या बायका कोठ्यावर असतात तशाच फसवणाऱ्यासुद्धा असतात. घरे उधवस्त करणाऱ्यासुद्धा जेव्हा भेटतात तेव्हा मुजऱ्याचे गीत एका पुरुषाच्या गळयातून  जन्म घेते .

तराने जानती है , फसाने जानती है , कही दिल तोडने  के बहाने जानती है
कही पे सोज है तू , कही  पे साज है तू , जिसे समझा न कोई वोही एक राज है तू
कभी तू रुठ बैठी , कभी तू मुस्कुराई , किसीसे की मोहब्बत किसीसे बेवफाई
वादा तेरा वादा ,
वादेपे तेरे मारा गया, बंदा मै  सिधा  साधा

मुजऱ्याची अशी असंख्य रूपे हिंदी सिनेमातून दिसली, भावली, लोकप्रिय झाली. मुजरा हा उत्तर हिंदुस्तानी संगीत आणि कथ्थक या दोन कलांचा  संगम होता. त्या कलांचे  जाणकार लोक या कलावंताचे आश्रयदाते होते. विसाव्या शतकात इंग्रजांनी संस्थाने खालसा केली. याच सुमारास  इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाला आणि ख्रिस्ती धर्माच्या नैतिक- अनैतिक कल्पनाची बांडगुळे आपल्यावर लादली गेली. खजुराहोच्या शिल्पांना अनैतिक, कामुक ठरवले गेले आणि नृत्यांगना  वेश्या ठरल्या. 

१८९२ मध्ये ” कलावंतिणींच्या विरोधात चळवळ सुरु झाली. नृत्य आणि संगीत या कलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. राजाश्रय गेला. जो रसिक वर्ग उजळ माथ्याने कोठ्याकडे जात होता तो हळू हळू कमी होऊ लागला.
या स्त्रिया आपल्या उदारनिर्वाहासाठी शरीर विक्रयाला वळल्या आणि बदनाम झाल्या .

एकेकाळी कोठ्यावर फक्त गाणे ऐकायलासुद्धा घरंदाज लोक जात असत नंतर ते प्रमाण कमी झाले, काही  जात असतीलही पण ते रात्रीच्या अंधारात.
कोठा व्यवसाय अस्ताला गेला पण विरोधाभास असा की कला जिवंत राहिली . कथ्थक या नृत्य प्रकारास बिरजू महाराज , गोपीकृष्ण , सितारादेवी  , उदय शंकर या प्रभूतीने जागतिक पातळीवर नेले . रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या नाटकातून संगीत आणि नृत्य या कलांना नवीन रूप दिले. मध्यमवर्गीय, सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांनी तिला आपलेसे केले. आज त्यातूनच आजचे नामांकित गझल गायक, ठुमरी गायक, नर्तक  जन्माला आले.
कलावंतिणी मात्र संपल्या .

त्यांची आठवण  फक्त अशा तुरळक चित्रपटातून, कादंबर्यातून आणि त्यांनी मागे ठेवलेल्या गझल, ठुमरी आणि कथ्थक या कलांमधूनआज राहिली आहे पण हेच चळवळीचे  उद्धिष्ट होते का ?
त्यांचे  उद्धिष्ट होते  ते स्त्रीयांना प्रतिष्ठा देणे,  त्यांना सन्मानाने जगण्याची  संधी देणे. ते साध्य झाले नाही. जाणकारांनी पाठ फिरवली आणि जाणकार नसलेया नवश्रीमंत लोकांनी जेव्हा या स्त्रियांना आश्रय दिला, तेव्हा या कलेला बाजारूपणा आला , आता तर या नर्तिकांचे रुपांतर “आयटेम गर्ल , बार गर्ल ” मध्ये झाले आहे .
अभिजात नृत्य नाही,  काव्य नाही, संगीत नाही, अर्थातच प्रतिष्ठासुद्धा  नाही. 
स्त्रियांचा बाजार मात्र सुरूच राहिला आहे …. 

20 thoughts on “हिंदी सिनेमासृष्टीतील कलावंतीण.”

  1. प्रिया,

    एकापेक्षा एक सुंदर चित्रपट,त्यातल्या व्यक्तिरेखा,त्या प्रसिद्ध अभिनेत्री..
    ती अप्रतिम गाणी..

    हा लेख कमाल झालाआहे.

    सगळेच लेख खरं तर १ no. असतात.

  2. व्वाह व्वाह, अगदी सुरेख जमून आलाय लेख!
    पुन्हा सर्व सिनेमांची उजळणी झाली…भारीच!
    सलमा आगा आणि रती अग्निहोत्री यांचे सिनेमे सुद्धा आठवलेत.

  3. खूपच सुंदर लेख ।मी यातले रात भी है कुछ भिगी भिगी ,छान तयार केले आहे ।गायचे आहे कुठे तरी ।पण फार कमी लोकांना माहिती असेल म्हणून अजून योग नाही आलाय ।तसा ग्रुप भेटल्यावर नक्की गायचा विचार आहे ।

    1. Yogini,
      अगं गा
      जुन्या लोकांना माहिती आहेच पण लताच्या नवीन चाहत्यांना सुद्धा . क्लासिक इट इज

  4. अप्रतिम जमून आलेला लेख . रसिक नजरेने, चोखंदळ वृत्तीने,नेमकेपणाने, इतिहास,वर्तमान यांच्याशी सुसंगत.कला दासी होते,बटिक होते समाजाच्या नजरेतून उतरते .सुसंस्कारित,मध्यमवर्ग मात्र कलासक्त ,रसिक जाणिव ठेवून संवेदनापूर्ण वृत्तीने कदर करत असतो .त्याचाच प्रत्यय यातील नितांत सुंदर गाण्यातून, प्रसंगातून,नायिकांचं समाजातील स्थान सारखं असेल तरी त्यांची परिस्थिती,व्यक्तिमत्व वेगळं दिसतं,संगीतातून त्या वेदनेतून व्यक्त होत,ही किमया अर्थात लेखिकेच्या प्रतिभेची ..

    1. वाह फार सुंदर अभ्यासू प्रतिक्रिया आहे ही ..मध्यमवर्गीयांनी कोणत्याही कारणांनी असेल पण विवाह संस्थेचे पावित्र्य जपले
      Thank you Pradnya.

  5. उदय वसंत शेवडे

    कलावंतीण (तवाय्यफ) यापेक्षा अभिसरिका, गणिका हे शब्द किती सोज्ज्वळ वाटतात ना ?

    अतिशय सुरेख आढावा आपण घेतला. निवड तर एकसे एक छान आहेत तरीही जोहरा (मुकासि) उल्लेख हवा होता, विस्तार भयास्तव कदाचित राहिला असेल असो.

    मला वाटतं विवाह संस्थेचा हेतू मान्यताप्राप्त प्रजोत्पादनाचा असावा. मन आणि देह सुखविणे याचा समतोल असेल तर सखीची गरज भासणार नाही, वास्तवात तसे होत नाही. आक्रमण काळात स्त्री च्या अस्तित्वावर सर्वथाने घाला आल्याने बंधने आली. आक्रमण काळ संपला तरी त्या बंधनातून स्त्री ला मुक्ती मिळाली नाही हे दुर्दैव.

    उपरोक्त सर्व चित्रपटात शरीर रिझवणे यापेक्षा मन सांभाळणे, जपणे हा हेतू असल्याने त्या भूमिका अमर झाल्या सहानुभूती मिळाली.

    1. मान्यताप्राप्त प्रजोत्पादनाच्या कक्षेत स्त्रीची संमती गृहीत धरली गेली जेव्हा पुरुष सत्ताक सत्तेने जोर धरला. मग स्त्रीचे महत्व पलंगापुरते राहिले ..कालिदास आणि त्यांच्या प्रेमकथा वाचल्या आणि नंतर च्या राजे राजवाड्यांचे विवाह की हा फरक जाणवतो ..यात कुठेतरी दुसऱ्या स्त्रीचा प्रवेश झाला असावा Uday Shevde.

  6. खूप सुंदर लिहिले आहे. सिनेमा आणि हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय याची छान सांगड घातली आहे.

  7. संवेदनशीलता जर बावनकशी शुद्ध असली तर ती वारांगना, तवायफ यांना देखील तितक्याच आदराने पाहु शकते याचा प्रत्यय तुमच्या लेखणात येतो. हे असे लिखाण धाडसपुर्ण असते, प्रामाणिक असते. ते समाजाला वाचकाला त्याच्या मूल्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करते. You are gem!

  8. नमस्कार. नेहमी प्रमाणेच एकदम उत्तम. कथ्थक नृत्य शैली वर आधारित अनेक चित्रपट गीते आहेत.( मात्र ही ९९% नृत्ये म्हणजे कथ्थक ची भ्रष्ट नक्कल आहेत – आणि त्यात बिरजू महाराजांनी दिग्दर्शित नृत्ये पण आलीत. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे). आपण निवडलेली सर्वच गीते लोकप्रिय आहेतच.( दुर्दैवाने नंतर कथ्थक नृत्ये मुजरा नृत्ये झालीत.). धन्यवाद

    1. मान्य जयंत अत्रे सर
      .सिनेसृष्टीने अनेक गोष्टीची भेसळ केली ..त्यात हे एक

  9. anand mamidpalliwar

    Hum hai mata a kucha bajar ki tarah !!! uthti har nigah kharidar ki tarah!!!
    apratim lekh utkrusht vivechan!!!!! ganychi niwad pan atynt chokhandalpane keleli!!!!!!!!

  10. अप्रतिम लेख. उत्कृष्ठ विश्लेषण. समाजाच्या मानसिकतेचा विचार करायला लावणारा लेख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *