Skip to content

नोटोरिअस 


दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते आणि अमेरिकेने अणूबॉम्बचा पहिला प्रयोग जपानवर केला होता. हॉलिवूडमधील अनेक सिनेमांना दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती. अमेरिकेची युद्धात उतरायची जी भूमिका होती, त्याला साजेशी ही कथानके होती.  १९४६ मध्ये प्रदर्शित झालेली , हिचकॉक दिग्दर्शित “नोटोरिअस“ ही फिल्म त्यापैकी एक.
बायबल मध्ये एक वचन आहे ” For everyone has sinned; we all fall short of God’s glorious standard.”ख्रिश्चन धर्म सांगतो, ईश्वराची निर्मिती कितीही उच्च दर्जाची असो, देवापेक्षा ती कणभर का होईना, हिणकस असतेच. त्याला मर्यादा असतात. म्हणून या सृष्टीत अपराधीपणाचा  गंड नसलेला माणूस विरळाच. ख्रिश्चन धर्मावर नितांत श्रद्धा असलेल्या हिचकॉकचा यावर विश्वास असल्याने, त्याच्या सायको, द रॉन्ग मॅन, द बर्ड्स या सिनेमात प्रत्येक जण हा गुन्हेगार असतो याचे दर्शन घडतेच.

नोटोरिअस आणि त्या नंतर आलेले व्हर्टिगोत मात्र माणसाच्या अंतर्भूत चांगल्या वृत्तीवर भर दिला आहे. या जगात जरी प्रत्येक जण काहींना काही त्रुटी घेऊन जन्माला आले असले तरीही मूळ चांगल्या आणि वाईट प्रवुत्तीत बराच फरक असतो. आपल्या चुका सुधारण्याची मनापासून इच्छा असेल, तर त्यांना माफी मिळू शकते, त्या सुधारता येऊ शकतात, आणि त्याला कारणीभूत ठरते ते सच्चे प्रेम. प्रत्येक गोष्टीला अनेक कंगोरे असतात. तरीही प्रत्येक वाईट कृत्याला सुद्धा ”प्रेमाची”  शुभ्र बाजू असते आणि त्यामुळेच अनेक कसोटीतून, अनेक असत्यातून सुद्धा खरे उतरलेले प्रेम हेच शेवटी सत्य ठरते .

नोटिरिअस चा संघर्ष आहे, कर्तव्य का प्रेम?
प्रेमावर विश्वास का देशाप्रती कर्तव्य निभावण्यासाठी प्रेमाशी केलेला विश्वासघात?
प्रेमात झपाटणे, वेडावणे ही पुढल्या विनाशाची नांदी का सुंदर प्रवासाची सुरुवात ?

सिनेमाची सुरुवात होते एका कोर्ट सीनने. एका जर्मन अमेरिकन हेराला देशद्रोहाच्या आरोपाखाली २० वर्षे शिक्षा होते. मीडिया आता पुढच्या भक्ष्याच्या शोधात असते आणि या हेराच्या देखण्या, बिनधास्त मुलीहून आणि दुसरे टार्गेट कुठले मिळणार ! केवळ मिडीयाचेच नाही तर अमेरिकन गुप्तचरखात्याचे लक्ष सुद्धा तिच्याकडे वेधले जाते.
ती नक्की कोणत्या बाजूला असेल? तिचा आपल्याला काय उपयोग करून घेता येईल या शक्यता पडताळण्यासाठी एक अमेरिकन एजन्ट तिने दिलेल्या पार्टीत विना निमंत्रण घुसतो.
नायक आणि नायिकेची ही भेट एका वादळी प्रेमाची सुरुवात असते, जिचा शेवट कदाचित त्या प्रेमाच्या अंतात होणे श्रेयस्कर  हे सुरुवातीलाच निश्चित होते.

या कथेतली तीन  महत्वाची पात्रे.
१) ऍलिशिया –(इन्ग्रिड बर्गमन)
२) डेव्हलीन –(कॅरी ग्रांट)
३ )अलेक्स सॅबेस्टियन् (क्लॉड रेन्स)
ऍलिशिया, ही जर्मन अमेरिकन हेराची मुलगी पण तिच्या निष्ठा अमेरिकेबरोबर आहेत. वडिलांचे खरे रूप पाहून ती खचून जाते. आपली बांधिलकी नक्की कुणाबरोबर असावी ? वडील का राष्ट्र ? या संभ्रमात असताना, तिची भेट डेव्हलीन या अमेरिकन एजन्टशी होते. वडिलांना शिक्षा झाल्याने आधीच जगाचे डोळे तिच्यावर रोखले गेले आहेत. गुन्हेगाराच्या मुलीविषयी त्यांना वाटणारी घृणा तिला स्पष्ट जाणवते. ते विसरण्यासाठी दारू, मित्र आणि पार्ट्या यात गुंतवून घेतल्याने ती अजून बदनाम होते.  त्यात वडील तुरुंगात आत्महत्या करतात. आता या जगात तिचे असे कुणीही नाही. आहे ती फक्त नावाला चिकटलेली बदनामी.  अपराधीपणाच्या ओझ्यात दबून गेलेली असताना, तिच्या आयुष्यात डेव्हलीन येतो.
तुझे, तुझ्या देशावर प्रेम आहे हे तिला दाखवून देतो  आणि वडिलांच्या पापाचे प्रायश्चित तू नक्कीच करू शकते हे तिला पटवूनही देतो.

आयुष्यात एकटे पडलेल्या ऍलिशियाला डेव्हलीन आपला तारणहार वाटतो ह्यात काहीही नवल नाही.
तो देखणा आहे, हुशार आहे, काहीसा अबोल असला तरी तिच्या मनात चाललेल्या वादळाची त्याला कल्पना आहे. या परिस्थितीतून तिला बाहेर काढण्याची वाट त्याला माहित आहे. त्याच्या बळकट खांद्यावर आपण डोके ठेवून निश्चिन्त होऊ शकतो याची खात्री ऍलिशियाला आहे. आपल्यावर सोपवलेली कामगिरी मात्र आपल्याला संपवून टाकणारी आहे याचा तिला अंदाज नाही.

तो अंदाज डेव्हलीनला सुद्धा नाही. सुरुवातीला, आपल्यावर सोपवलेल्या कामाचा एक भाग, म्हणून तो ऍलिशियाकडे पाहतो खरा पण नंतर तिचे सौन्दर्य, बेफिकिरीच्या मुखवट्याखाली दडवलेला भाबडेपणा त्याला आकर्षित करतो. जगाच्या खिळलेल्या नजरांपासून दूर,  रिओ शहरामध्येमध्ये  त्यांचे एक स्वतंत्र विश्व निर्माण होत असतानाच, डेव्हलीनला तिच्या कामाचे स्वरूप समजते. आपल्या सौंदर्याने जर्मन हेरांना जाळ्यात पकडण्याची कामगिरी तिच्यावर सोपवली जाते.  स्वतःच्या राष्ट्रासाठी स्वतःचे शरीर पणाला लावण्याचे  बलिदान तिच्याकडून अपेक्षिले जाते. आपण तिच्यात कुठल्या पातळीवर गुंतलेलो आहोत याचा अंदाज, डेव्हलीनला स्वतःलाही नाही पण त्याला तिचे अतिशय आकर्षण आहे हे त्याला लपवता येत नाही.  ती त्याला हवी तर आहे पण तिच्या चारित्र्याबद्दल तो साशंक आहे. ती कुणाची मुलगी आहे हे ही तो विसरू शकत नाही. त्याच्या घट्ट मिठीत, चुंबनांच्या वर्षावाखाली सुखावलेल्या  ऍलिशियालाही हे जाणवते.

“ आपले हे प्रेम प्रकरण विचित्र आहे ना “ ती पुटपुटते. 
“What’s strange about it ?”
तिच्या डोळ्यात डोळे रोखून तो विचारतो खरा पण त्याला माहित आहे.  मान्य करायचे मात्र त्याच्यात धैर्य नाही.
ती मात्र  त्याला सहज सांगून टाकते., “ तुझे माझ्यावर प्रेम नाही.” 

हे प्रेम खरंच जीवघेणे आहे.
स्वतःच्या वडिलांविषयी असलेला त्याचा तिरस्कार माहित असूनही ती त्याच्या प्रेमात पडलेली आहे. 
ती स्वतःच्या  भावनांशी प्रामाणिक आहे , त्याने आपल्या भावनांना ताब्यात ठेवले आहे.
तिचे त्याच्यावर जडलेले प्रेम आणि  त्याचा तिच्या भूतकाळाशी असलेला झगडा ह्या दोन्हीत नक्की काय जिंकणार तिला माहित नाही. 
तिची त्याच्यासाठी बदलण्याची तयारी आहे पण त्याची बेफिकीर आणि प्रसंगी व्यवसायाला साजेशी कपटी वृत्ती, यामुळे या प्रेमप्रकरणाचा अंत काय होणार हे तिला सांगता येत नाही पण त्य्याच्यासाठी आपले पणाला लावायची तिची तयारी आहे. 

या  भावनांच्या  जाळ्यात अजून एक जीव गुरफटला जाणार  आहे.
“अलेक्स सॅबेस्टियन्” जो तिच्या वडिलांचा सहकारी एकेकाळचा सहकारी आहे.
त्याला ऍलिशियाचा मोह पडलेला आहेच. त्याच्याशी लग्न करून, त्याच्या घरात घुसून माहिती काढणे आता सहज शक्य आहे. डेव्हलीनवर मनापासून प्रेम करत असूनही, ऍलिशिया ही कामगिरी स्विकारते कारण तिला वेडी आशा आहे की, निदान आता तरी तो आपल्यावर शंका घेणार नाही.
माणसाचे मन अथांग असते. सहजासहजी खरे खोटे, चांगले वाईट, योग्य अयोग्य ही लेबल्स मनाला लावता येत नाहीत. जगाच्या नियमानुसार आपण वर्गीकरण करतो खरे पण मनाच्या कौल काय असावा याचा निवाडा इथे होऊ शकत नाही.
डेव्हलीन वाईट नाही पण त्याची बांधिलकी आपल्या देशाशी आहे. त्याच्याशी इमान राखण्यासाठी आपल्या प्रेमाचा सौदा करायला तो मागेपुढे पाहत नाही.
सॅबेस्टियन नाझी आहे. हिटलरने केलेल्या पापात त्याचाही वाटा आहेच पण त्याचे ऍलिशियावर खरे प्रेम आहे.

एकावर ऍलिशियाचे प्रेम आहे पण तो तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि ज्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, ज्याने आपले आयुष्यच तिला सुपूर्द केले आहे , त्याला फसवणे तिच्या भाग्यात आहे. नियतीचा विचित्र खेळ आहे हा ! सॅबेस्टियनचे आमंत्रण स्विकारुन ऍलिशिया त्याच्या घरी प्रवेश करते. इथे येणारे लोक प्रतिष्टीत, उच्चवर्गीय. त्यांच्यात  सामावून जाणे तिला सोपे जाते कारण तिची सुंदरता, तिचे आर्जवी वागणे आणि त्याच बरोबर ती आपल्यातलीच एक आहे असा त्यांचा विश्वास. 
सॅबेस्टियनवर त्याचा असर पडला आहे. खरेतर हेच डेव्हलीनच्याही फायद्याचे आहे. किंबहुना त्यानेच ते घडवून आणले आहे. असे असूनही स्वतःची घुसमट, संताप, मत्सर त्याला लपवता येत नाही. याचा रागही कुणावर काढणार!
तो निघतो ऍलिशियावर.
ही आपली दुविधा आहे आणि आपलीच मजबुरी. त्यात तिचा काहीही दोष नाही ते माहित आहे त्याला . स्वतःच्या मनावरचा ताबा, जबाबदारी सगळे काही भिरकावून, तिच्याकडे जाण्याची इच्छा तर आहे पण कर्तव्याच्या धाग्याने तोही जखडला गेला आहे. आता हळवे होणे त्याला शक्य नाही. त्याचा मत्सर, त्याच्या  प्रेमावर विजय मिळवतो .
“प्रत्येक वेळी तू असे जहरी का बोलतोस, ‘Right below the belt every time, why?”ती हताश होऊन विचारते. 
उत्तर म्हणून फक्त त्याचे मौन. 

एवढ्या तोकड्या परिचयावर, सॅबेस्टियनने ऍलिशियाला लग्नाची मागणी घालणे अनपेक्षित असते पण तो तिच्या प्रेमात आहे. डेव्हलीनची तिच्याशी असलेली जवळीक त्याला अस्वस्थ करते. हे लग्न अमेरिकेच्या पथ्यावरच पडणारे आहे. डेव्हलीनला ते नाकारण्याचे काहीही कारण नाही . एकाच कारणावर तो हे थांबवू शकतो पण आपल्या मनाचा पराभव मान्य करण्याची त्याची तयारी नाही . डेव्हलीन याला विरोध करेल अशी कल्पना असलेली ऍलिशिया त्याच्या मूक राहण्याने यात एवढी खचत जाते की स्वतःच्या पायाने  मृत्यूकडे जाण्याचा मार्ग कवटाळण्याशिवाय तिला पर्याय नाही.
प्रेम हे कधीकधी विचित्र तिढा होऊन बसते नाही का !

त्रिकोणाचे अजून एक अंग आहे. अलेक्सची आई, “मिसेस सॅबेस्टियन. तिचे आपल्या मुलावर नियंत्रण आहे. मुलाने लग्न करण्याला तिचा विरोध आहे पण एकदा का जीव जडला की सारासार विचार सुद्धा नष्ट होतो.
आईला प्रथमच झिडकारण्याची चूक सॅबेस्टियनला निश्चितच महाग पडणार आहे.

लग्न झाल्यावर घराच्या किल्ल्या ऍलिशियाच्या ताब्यात येतात पण एक चावी मात्र तिला मिळत नाही. वाईन जिथे ठेवली जाते त्या कपाटाची चावी. ह्या कपाटातच अनेक रहस्ये दडलेली आहेत असा संशय असल्याने, डेव्हलीन ऍलिशियाला एक मोठी पार्टी ठेवण्याची सूचना करतो, जेणेकरून त्याचा घरात प्रवेश होईल.
वाईन सेलार मध्ये प्रवेश करून, बाटली मध्ये युरेनियम  आहे याचा शोध लागणे हा या सिनेमाचा उत्कर्ष बिंदू आहे. श्वास रोखायला लावणारी ही आठ मिनिटे हिचकॉकची माध्यमावर असलेली पकड दाखवतात.

या शॉटची सुरुवात होते पार्टीच्या दृश्याने. पार्टी रंगात आलेली असते. एक एक माणसांवर कॅमेरा फोकस करतो आणि शेवटी ऍलिशियाच्या हातातील किल्लीवर स्थिर होतो. आता कॅमेराच्या हालचाली भरभर होऊ लागतात. एका क्षणाला वरच्या मजल्यावरील पार्टीची दृश्ये तर दुसऱ्या क्षणाला वाईन सेलार मध्ये घडत असणारे नाट्य.
वेळ थोडा आहे याची डेव्हलीनला कल्पना आहे. वाईन बॉटल्स मागे कागदावर सांकेतिक भाषेत काहीतरी लिहिलेले आहे , त्याचा माग घेताना, डेव्हलीनच्या हाताच्या धक्याने एक बाटली खाली पडून फुटते आणि त्यातील युरेनियमचा शोध लागतो.  अचानक सेलार मध्ये सॅबेस्टियन आल्याने दचकलेले ते दोघे  बाहुपाशांत  अडकल्याचे नाटक करतात  त्यांचा खरा हेतू दडला जावा. दाखवण्याचे नाटक करतानाच मनावरचा ताबा जातो. एकमेकांचे आकर्षण एवढया निकट आल्यावर लपवणे सुद्धा शक्य होत नाही. खऱ्या खोट्याची एवढी बेमालूम सरमिसळ झाली आहे इथे.

जेव्हा सेबेस्टीअनला वाईनच्या बाटल्यांची अदलाबदल झाल्याचा संशय येतो तेव्हा आपली पत्नी अमेरिकन हेर असल्याची त्याची खात्री पटते.
त्याची शिक्षा एकच असते, प्राणदंड . तिला उघड मारणे शक्य नसते कारण त्याच्याकडून चुकी झाली हे जर नाझींना समजले असते तर त्याच्याही प्राणाला धोका निर्माण झाला असता. अर्सेनिकच्या स्लो पॉयझनिंगचा तिच्यावर वापर केला जातो.
हे सांगायला ती डेव्हलीन कडे जाते खरी, पण तेव्हाच तिला समजते, त्याने ह्या केस मधून अंग काढून बदली मागून घेतली आहे. आता आयुष्यात जगण्यासारखे काही राहिलेले नसते. पुढे सगळा अंधार आणि मागे वळले तर सर्वनाश.
त्याच्याकडे पाठ फिरवून, आपल्या पायांनी ती मृत्यूकडे चालत जाते.
प्रेम करणे आपल्या हातात असते. प्रतिसादावर आपले काहीही नियंत्रण नसते.
Love hurts and how!

थंड, प्रसंगी उलट्या काळजाचा , स्वतःच्या कर्तव्यासाठी कुणाचाही बळी द्यायला मागे पुढे न पाहणारा नायक स्वतःच्याच भावनांविषयी बेफिकीर असतो  किंवा ओळखूनही बेफिकीर राहतो त्याचे कारण वेगळे आहे. आपण तिच्यात गुंतून गेलो आहे, हे तो जाणून आहे. तिला मनात जागा देणे म्हणजे स्वतःला विसरणे. स्वतःच्या हेतूला विसरणे.
त्याचा न्यूनगंड, किंवा त्याचा अहंकार, खरेतर त्याची असुरक्षितता त्याला  मान्य  करायला देत नाही.

In perfect moments, I want to
Annihilate the guard and surrender
But I cannot be that tender
With heart hard and underneath my skin
So I may never let you in
Oh, isn’t that twisted
My love?
क्रिस्टिना सोटोचे हे गीत बरेच काही सांगून जाते न!

तिची ढासळलेली तब्येत तो नजरेआड करतो खरी पण मनाआड करू शकत नाही. मनातल्या शंकेचे निरसन करण्यासाठी, स्वतःच्या जीवाला धोका होऊ शकतो हे जाणूनही तो सॅबेस्टियनच्या घरी जातो, मृत्युशय्येवरील  ऍलिशिया पाहून मात्र त्याचा बांध ढासळतो.जेव्हा डेव्हलीन तिला न्यायला येतो, तेव्हा  मात्र ती  विचारते …” आता तू का आला आहेस ?”

तो पुटपुटतो …
खरेतर ते स्वतःलाच सांगतो ,  “I had to see you one more time, so I could tell you I love you …”
परिस्थितीने  होरपळलेले दोन जीव, आपल्या मनातील साऱ्या शंका, आशंका बाजूला ठेवून पहिल्यांदा सत्याला सामोरे जात आहेत .

Why couldn’t you tell me before ?
पण तिचा चेहरा मात्र फुलून आलेला आहे. आता तिला जगायचंय. 

तो आता मात्र स्वतःला आवरू शकत नाही . स्वतःची असुरक्षितता पहिल्यांदाच झिडकारून तो कबुली देतो , ” I was a fat-headed guy … full of pain.””

तिच्या पाठची उशी पांढरी शुभ्र आणि त्या प्रकाशात चकाकणारा तिचा चेहरा. तो मात्र सावलीत . पूर्ण सिनेमात ही काळीकुट्ट छाया तो चेहेऱ्यावर घेऊन वावरतो पण आता मात्र त्याला स्वतःचे मन उमजले आहे .पहिल्यांदाच तो निवड करतो, जगण्याची निवड, त्याच्या ऍलिशिय बरोबर आयुष्याची निवड.

तो मान्य करतो, की त्यालाही प्रेमाची गरज आहे. हे समर्पण आहे. तिच्या प्रेमापुढे झुकणे आहे.

गॅसलाईट या सिनेमासाठी इन्ग्रिड बर्गमनला ऑस्कर मिळाले खरे पण नोटोरिअस आणि कॅसाब्लांका या दोन्ही सिनेमाच्या ऑस्कर वर खरेतर तिचा अधिकार आहे .
शेवट अधांतरी आहे.
कदाचित ती दोघे आता सुखाने राहतील ..कदाचित .
हा खूप कठीण रोल होता अगदी इन्ग्रिडच्या शब्दात सांगायचे तर “From saint to whore to saint again “

स्वतःच्या कर्तव्यासाठी कुणाचाही बळी द्यायला मागे पुढे न पाहणारा नायक कॅरी ग्रांटने उत्तम साकारला आहे.And ! he looks dishy ! Absolutely tempting 

हा केवळ रहस्य चित्रपट नाही. प्रेमकथेत हीचकॉक च्या चित्रपटाचा पहिल्या तीनात समावेश होतो. 
खरेतर आर्सेनिकच्या प्रभावातून जिवंत सुटायला हा काही हिंदी सिनेमा नाही तरीही तिचा मृत्यू यात दाखवला नाही.  जेव्हा दोन मने फक्त प्रेमाच्या पायावर एकत्र येतात तेव्हा ती फक्त परस्परांवरील विश्वास आणि प्रेमावरच एकत्र राहू शकतात .

तिचे आयुष्य त्यानी व्यापलेले असते पण त्याची नोकरी, त्याची कर्तव्य आणि तिचा भूतकाळ याची सांगड त्याला घालणे कठीण असते. ती शेवटी जगावी का मरावी असा एक सर्व्हे हीचकॉकच्या साईट वर घेतला होता. त्यावेळी मी लिहिले होते, ऍलिशिया जगली तरी डेव्हलीनचा स्वभाव आणि त्याच्या कामाचं जे स्वरूप आहे, त्यात ऍलिशियाला स्थान असण्याची शक्यता कमी आहे. जर डेव्हलीन तिला सोडून गेला तर जगणे तिच्यासाठी मृतवत होईल. ती तेवढी कणखर नाही. अल्लड आणि अवलंबून राहणे हाच तिचा स्वभाव असल्याने तिच्या जगण्याला अर्थच राहणार नाही . 
“ Alicia must die in the end believing ( not knowing ) that at last she is truly loved “
सुखाने मरणे याहून चांगला शेवट आणि कोणता असणार ! 

मिली या हिंदी सिनेमाचा शेवट आठवतो आहे का ?
मिलीचे जगणे तिच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या शेखरसाठी आवश्यक आहे कारण तिच्याशिवाय त्याला दुसरे जग नकोच आहे.
इथे अलिशिया साठी सुद्धा डेव्हलीन सोडला तर तिच्या जीवनात तसेही जगण्यासारखे काहीही नाही . 
यात एक सीन  त्या काळाचा विचार केला तर फार गाजला. 

नोट —- ३ मिनिटाचा किसिंग सीन आहे यात . २ सेकंदाच्या वरती चुंबन दृश्य ठेवता येणार नाही, असा  हॉलीवूडचा नियम होता तेव्हा. त्यावर मात कशी केली ते पडद्यावर पाहणे श्रेयस्कर. 

Hitchcock had Grant and Ingrid Bergman kiss for two seconds, लीप लॉक , नंतर थोडे  अंतर परत जवळ येणे आणि स्टार्ट . कठीण आहे ना चुंबन घेणे,  जेव्हा प्रत्येक दोन सेकंदानंतर दिग्दर्शक stopwatch चा उपयोग करून दर दोन सेकंदानी थांबायचा आदेश देत असेल.
आणि .महत्वाचे म्हणजे जेव्हा लीपलॉक कॅरी ग्रॅन्ट बरोबर असेल.

हा सिनेमा youtube वर पाहायला मिळेल. 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

8 thoughts on “नोटोरिअस ”

  1. चित्रपट झराझरा डोळ्यासमोरून सरकला. तू म्हणालीयस तसं दुसऱ्या महायुध्दामुळे अनेक प्रेमकथा जन्मल्या, मेल्या, अबॉर्ट झाल्या. प्रेम कुठल्यातरी सीमांवर अवलंबून असणं ही किती भयंकर गोष्ट. तू काय सुरेख उलगडल्यायस सर्व बारीक सुध्दा भावभावना, अगतिकता, छुपे हेतू, सगळंच अतर्क्य. आवडला लेख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *