माया, ममता या शब्दांशी स्त्रीची सांगड घातली जाते. .”स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे ” या शब्दांनी ती घट्ट होते. पुरुषाच्या पायात नात्याची बेडी आहे,कायद्याचा बडगा आहे ..नाहीतर पुरुष हा नर आहे ही जी सारखी नड लावली जाते त्या कल्पनेला छेद देणारी कुसुमाग्रजांची “हे गगना ” ही अतिशय सुंदर कविता आहे.
“हे गगना” ही त्यांची कविता मेघदूतावरून सुचली असावी असे मानण्याइतपत मेघदूताशी या कवितेचे साम्य आहे. इथेही एकाकी प्रियकर आहे, दूर अंतरावर असलेल्या त्याच्या सखीच्या विरहाने व्याकूळ आहे. तीही आपल्या काळजीने चिंतीत असणार त्याची त्याला जाणीव आहे. इथे दूत म्हणून दोघांवरही सावली धरणाऱ्या आकाशाची कवीने निवड केली आहे. याही कवितेत उत्कटता आहे, व्यथित करणाऱ्या प्रेमाच्या स्मृती आहेत, असहाय्यता आहे तरीही ही कविता वेगळी आहे.
हे गगना तू माझ्या गावी, आणि तिच्याही गावी
तुला उदारा,पहिल्यापासून सर्व कहाणी ठावी
सर्व विश्वाला पुरून उरणारे आभाळाचे अस्तित्व.त्याच्यापासून काय लपवता येणार! या प्रेमाचा साक्षीदार असलेल्या आभाळालाच कवी आपला दूत बनवतो. कामासाठी,शिक्षणासाठी,जगण्यासाठी तो दूर आला आहे. आपल्या येण्याचे दिवस ती सुद्धा मोजते आहे याची कल्पना आहे त्याला. घरी या प्रेमाचा कोणाला सुगावाही नसेल. आपल्या विरहाच्या वेदना ती कोणाला सांगणार? कदाचित आकाशाचा शांत नील रंग तिच्या दुखऱ्या मनावर फुंकर घालेल असे कवीला वाटते. विरह हाच पाया असलेल्या या कवितेचा शेवट मात्र वेगळा आहे. दूत म्हणून पाठवलेल्या आकाशाला हा प्रेमी सांगतो,
घन केसांतुनि तिच्या अनंता फिरवीत “वत्सल,” हात
सांग तिला की दूर तिथेही ….
जमू लागली रात
हा निरोप किती शृगांरिक असेल, कामव्याकुळ असेल असे वाटत असतानाच “जमू लागली रात वत्सल ” असे शब्द येतात आणि पूर्ण कविता कारुण्य रसाने भरून जाते. आपल्या प्रेयसी पासून दूर असलेला हा प्रियकर तिची आठवण काढत आहे आणि त्याचे मन वात्सल्याने ओथंबून गेलेले आहे ही कल्पनाच सुंदर आहे.
कथा, कादंबऱ्या, सिनेमा यातील नायकाचे पैलू दाखवताना त्याचे देखणेपण, पुरुषी धिटाई, कामुकता, वीरता अशा गोष्टी विचारात घेतल्या जातात. या गुणांना उठाव देणारे प्रसंग लिहिले जातात. पण रेमंडच्या जाहिरातीतील, मुलीला आपल्या दोन्ही हाताचा आधार देऊन जोजवणारा बाप आठवतो आहे का ? दुसऱ्या कोणत्याही रूपात पुरुष एवढा लोभस आणि देखणा दिसला नाही अजून.
बॉलीवूड मध्ये अशा काही लोभस “बाप” भूमिका आहेत.
1)कुंवारा बाप मधील महेश (मेहमूद) 
कुंवारा बाप मधल्या या बापाला स्वतःच्या आईवडिलांचे प्रेम मिळत नाही. या जगात त्याचे कुणीच नाही आणि ह्या मुलाला सुद्धा त्याचे म्हणावे असे कुणीही नाही.
समाजाला नकोसे असलेले हे “पाप” त्याचे म्हणून त्याच्याकडे सोपवले जाते पण त्याच्या आयुष्याला एक दिशा मिळते.
ह्या मुलाला पोलिओ होतो. त्याच्या उपचारासाठी पैसे जमवण्यासाठी महेश दिवस रात्र रिक्षा चालवतो.
मेरा तो ये जीवन तमाम, मेरे यार भरा दुःख से
पर मुझको जहां में मिला, सुख कौन बड़ा तुझसे ,
तेरे लिए मेरी जान ज़हर हज़ार मैं पी लूँगा
स्वतःचे जीवन उभारणे ही एक गोष्ट. ती मोठी आहेच पण त्याहून मोठे आहे, ते दुसऱ्या जीवाच्या आयुष्याला आकार देणे. त्याचा अंश त्याच्या रक्ताचा,नसेलही पण त्याचे आचार, विचार जगात जिवंत ठेवणारा कोणीही त्याचाच अंश असतो न.
“आ री आजा,निंदिया तू ले चल कहीं” ही एका वडिलांनी गायलेली अंगाई आहे.किशोर कुमारच्या आवाजाने तिला रसिकांच्या मनात अमर केले आहे.
मेहमूदचा मुलगाच पोलिओ पीडित होता. पोलिओच्या लस बाबत जागृती करण्यासाठी मेहमूदने या सिनेमाची निर्मिती केली.
2)ब्रह्मचारी मधील ब्रह्मचारी (शम्मी कपूर)
देखणा, बेदरकार, हट्टी शम्मी इथे वेगळयाच रूपात दिसतो. प्रगल्भ, हळवा,अनाथ मुलांवर जीवापाड प्रेम करणारा. तो स्वतः सुद्धा अनाथ त्यामुळे पोरकेपणाची दुःख जाणून आहे. एका घरात , तो आणि त्याच्यासारखीच अनाथ मुलं यांच्याबरोबर तो राहतो. पैशाची चणचण आहेच. जर भाडे दिले नाही तर काही दिवसांत डोक्यावरील छत्र जाण्याची भीती सुद्धा आहे पण ते कोणाला सांगणार!
निरागस डोळे त्याच्यावरच रोखलेले. त्यांना पडलेल्या प्रश्नाची उत्तरे त्यांना समजेल, पटेल अशा भाषेत सांगायची जबाबदारी पेलणे काही सोप्पे नाही.रफीच्या आवाजाने ती थोडीशी सोपी झाली आहे इतकंच. .
माना आज की रात हैं लंबी, माना दिन था भारी
पर जग बदला, बदलेगी एक दिन तक़दीर हमारी
उस दिन के ख़्वाब सजाओ
मै गाऊ तुम सो जाओ
निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारी ही अंगाई कवी शैलेंद्र असून शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केली आहे.ही दोन्ही अंगाईगीते अनाथ मुलांसाठी गायली गेली आहेत. अंगाईगीतांचे शब्द,सूर, नात्यापेक्षाही, रक्तापेक्षाही चिवट असतात.
मुलांशी जोडला गेलेला हा बंध हा रेशमी.नाजूक तरीही सहज न तूटणारा.
आपल्या मूल्यांवर अटळ असणारा, प्रसंगी समाजाचा विरोध पत्करून जाचक परंपरांना झिडकारून लावणारा आणि स्वतःच्या कर्तव्यासाठी त्याग करणारा बाबा शम्मीने समर्थपणे उभा केला. त्याला या सिनेमासाठी फिल्मफेअर पारितोषिकाने गौरवले गेले.
3)मासूम मधील डी के (नसरुद्दीन शाह)
मासूम ह्या सिनेमात एक सुखवस्तू, सुसंकृत, चौकोनी कुटुंब आहे. नवरा, डी के वास्तुशास्त्रज्ञ.
दोन गुणी मुली, सुशिक्षित, सुसंस्कृत पत्नी इंदू आणि एक कुत्र्याचे गोंडस पिल्लू या घराची चौकट पूर्ण करतात. सुबत्तेच्या सोपानावर असलेल्या या घरात ट्रँक कॉल येतो आणि स्वप्नाचा इमला कोसळायला सुरुवात होते.
भूतकाळात एका बेसावध क्षणी डी के चा पाय घसरतो आणि त्यांची परिणीती असते एक गोंडस मुलगा. आईचा मृत्यू झाल्याने त्याची जबाबदारी डी के वर येते.
आपण न कळत का असेना पत्नीशी प्रतारणा केली याची डी के ला जाणीव आहे. त्याचा पश्चाताप सुद्धा आहे. मुलाबद्दल त्याला प्रेम आहे. तो आपला मुलगा आहे याचा अभिमान सुद्धा आहेच. पत्नीपासून या भावना लपवणे आणि ते करताना आपण आपल्या मुलावर अन्याय करतो आहे याचे अपराधीपण अशा कात्रीत सापडलेला बाप नसरुद्दीन शहा ने जिवंत केला आहे.
आज अगर भर आई है, बूंदे बरस जाएगी
कल क्या पता किनके लिए, आँखें तरस जाएगी
ओ जाने कब गुम हुआ, कहाँ खोया, इक आंसू छुपा के रखा था
मुलाला बोर्डिंग मध्ये पाठवावे लागल्याने त्याची होणारी घालमेल, मुलगा आपल्याला दोषी मानेल याने होणारी मनाची तडफड ही एवढी आतून आली आहे की जेव्हा राहुल म्हणतो. मी तुमच्यावर कसा रागावू ? तुम्ही तर माझे डॅड आहात ना “
तेव्हा बाबामधील पुरुषाला प्रेक्षक सुद्धा माफ करतो .
4)चाची 420 मधील जय प्रकाश पासवान( कमल हसन), दुर्गाप्रसाद भारद्वाज(अमरीश पुरी)
एक असिस्टंट नृत्य दिग्दर्शक एका श्रीमंत उद्योगपतीच्या मुलीच्या प्रेमात पडतो. वडिलांच्या इच्छेविरुद्ध दोघे पळून जाऊन लग्न करतात. एक मुलगी होते. परिस्थितीतील तफावत सहन न झाल्यामुळे मुलगी, आपल्या मुलीला घेऊन वडिलांकडे निघून जाते.
घटस्फोट घेऊन मुलीची कस्टडी मिळवते. वडिलांना मुलीचा विरह सहन होत नाही. मुलीला तर सतत भेटणे शक्य नाही. अशावेळी बाप आपल्या मुलीचा सहवास मिळवण्यासाठी काय करू शकतो ते दाखवणारा सिनेमा म्हणजे चाची ४२०.
वडील खोटे तर बोलतात पण ते खोटे, खरे वाटावे म्हणून चक्क एका मेकअप आर्टिस्ट च्या मदतीने बाई चे वेषांतर करून मुलीला सांभाळणारी नॅनी म्हणून सासऱ्यांच्या घरात प्रवेश करतात. ही व्यवस्था अगदी मनाजोगती होत असतानाच एक अघटित घडते. त्याचे विधुर सासरेच त्याच्या स्त्री रूपाच्या प्रेमात पडतात.
यातला अमरीश पुरीचा रोल सुद्धा एका प्रेमळ बापाचा आहे. लहान वयात पत्नी गेलेली असून ते परत लग्न करत नाहीत. आपली एकुलती एक मुलगी , त्यांची वारस आहे. बाहेर कडक असणारा हा बाबा मुलीच्या बाबतीत हळवा आहे. ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडता येईल एवढा समर्थ आहे.
भले तिच्या निवडीवर त्यांचा विश्वास नसल्याने त्यांनी विरोध केला असेलही पण तिच्यासाठी त्यांच्या घराचे आणि हृदयाचे दरवाजे सुद्धा उघडे आहेत. आताच्या काळात मुलींना स्वातंत्र्य तर देतात पण शहाणपणा नाही. स्वातंत्र्याचे परिमाण झेलण्याची जबाबदारी मुलींचीच असेल तरीही आपण हे शिक्षण द्यायला कमी पडलो ही जबाबदारी घेताना मुलींना आधार देणे , त्यांनी परत जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहावे यासाठी प्रयत्न करणे हे तर पालकांच्या हातात आहे.
असे म्हणतात, जेव्हा मुल जन्माला येते तेव्हा त्याच्याबरोबर बाप जन्माला येतो. आपल्याच रक्त मांसाचा तो छोटासा गोळा पाहून माणूस कुठेतरी हलतो. आपल्यावर अवलंबून असणारा तो जीव पाहून जबाबदारीची जाणीव होते. त्याचे हसणे ओठावर स्मित आणते, त्याच्या रडण्याने कळवळायला होते. निरपेक्ष प्रेमाची कल्पना, सत्यात येणे तो अनुभवतो.
वडील फक्त नाव देत नाहीत तर ते प्रदाता असतात, संरक्षक असतात, गुरु असतात, पथ दर्शक असतात. वडील मुलाचे रोल मॉडेल असतात.
अकेले हम अकेले तुम मधील रोहित (आमिर खान)
अकेले हम अकेले तुम या सिनेमातील नायक नायिका एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. मुलाची जबाबदारी वडिलांनी स्विकारली आहे पण दुर्दैवाने व्यवसायात अपयश आल्याने पैशाची चणचण आहे.
एकाच वेळी संसारात आणि व्यवसायात आलेले अपयश त्यालाही खचवणारे पण सारा अपमान गिळून , मुलासाठी तो परत उभा राहतो. त्याच्या या त्यागाची मुलालाही जाणीव आहे.
या चित्रपटाच्या पहिल्या भागात अमीर खान खूप वेगळा दिसतो. व्यावसायिक गायक बनण्यासाठी प्रयत्न करणारा एक युवक, ज्याच्या डोळ्यात स्वप्ने आहेत. ज्याच्यात आत्मविश्वास आहे. तो रोमँटिक आहे.
नंतर मात्र नियतीच्या आघातांनी आणि काही चुकांनी तो खचत जातो, हताश होतो पण त्याच्यातील बाप मात्र हरत नाही. या सिनेमातले “ओ , आय लव्ह यु डॅडी “ हे लोकप्रिय गीत , पडद्यामागे उदित नारायण आणि आदित्य नारायण .
या खऱ्या खुऱ्या वडील आणि मुलाच्या जोडीने गायले आहे.
जे समाजात दिसते, त्याचेच प्रतिबिंब सिनेमात पडते. जागतिकीकरणाच्या आधी, नव्वदच्या दशका पर्यंत तरी समाज कर्मठ, पुराणमतवादी होता. पितृसत्ताक संस्कृती समाजाची स्वीकृत सामाजिक व्यवस्था होती. कामाची वाटणी निश्चित होती.
प्रपंच चालवणे हे वडिलांचे काम होते तर प्रपंच सांभाळणे हे आईचे. हिंदी सिनेमात स्त्रियांचा पालनकर्ता म्हणून पुरुष दिसतो अगदी कोणत्याही रूपात. हे ओझे टाकल्याने असेल, हिंदी सिनेमातील वडील हे थोडेसे भावनांपासून अलिप्त दाखवले गेले होते. चेहऱ्यावर कठोरता आणि अंतःकरणात मात्र अपार प्रेम असणारे चौधरी बलदेव सिंग हे भारतीय पित्याचे प्रतीक आहे.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील चौधरी बलदेव सिंग
दिलवाले दुल्हनिया आवडायची अनेक कारणे आहेत. हा सिनेमा म्हणजे फक्त हलकी फुलकी प्रेमकथा नाही. हे प्रेम फक्त दोन व्यक्तीतील प्रेम नाही तर ते सर्वव्यापक प्रेम आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच ओळख होते ती परदेशात एक स्टोअर चालवणाऱ्या चौधरी बलदेव सिंगची. भले कपाळावर आठ्या आहेत आणि आवाजात जरब आहे पण त्याच्या हृदयात आपल्या देशाबद्दल प्रेम आहे. एवढी वर्षे बाहेर राहूनही त्याला आपली संस्कृती आणि भाषा याचा अभिमान आहे.
त्याच्या शिस्तीचा थोडाफार जाच मुलींना होत असेल तरीही मुलींचे आपल्या वडिलांवर प्रेम आहे.
वडिलांच्या प्रेमापोटी न बघितलेल्या मुलाशी सिमरन लग्न करायला तयार होते हे आपण बघतो पण मुलीच्या हट्टासाठी, पटत नसताना, मुलीला युरोप ट्रिपला एकटीला पाठवणारा तिचा बाप आहे, आणि त्याचे मुलींवर प्रेम आहे हे मुलगी सुद्धा जाणून आहे. या सिनेमातले दोन्ही वडील हटके आहे. मुलांवर त्यांचे प्रेम आहे पण त्यांना वाढवायच्या पद्धती वेगळ्या आहेत.
राज ची आई गेल्यावर , राजच्या वडिलांनी परत लग्न केलेले नाही. अत्यंत प्रेमाने त्याने आपल्या मुलाला वाढवले आहे. राजच्या आईच्या आठवणी सुद्धा जिवंत आहेत कारण त्याच्या आईवडिलांच्यात सुद्धा प्रेमाचा बंध आहे.
मला या सिनेमाच्या शेवटचा सीन अतिशय आवडतो.
चौधरी बलदेव सिंगचे एवढी वर्षे परदेशात राहूनही भारतावर जीव आहे आणि लंडनच नाही तर येथील माणसे सुद्धा न आवडल्याने, लंडनवासी राजशी लग्न करायला त्याचा विरोध आहे. शेवटच्या क्षणी मात्र तो मुलीवरील प्रेमाने स्वतःचा हेका सोडतो, अहंकार सोडतो आणि त्या ही पेक्षा मुलीवरील हक्क सोडून मुलीला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देतो कारण आपल्या पेक्षाही तिच्यावर प्रेम करणारा दुसरा पुरुष त्याला राज मध्ये दिसतो.
अमरीश पुरी यांच्या भारदस्त आवाजातील “ जा सिमरन जा , जी ले अपनी जिंदगी “ ह्यात तो सापडल्याचा आनंद आहे.
हुंकुमशाही गाजवणारे वडील बॉलीवूडला नवीन नाहीत. मुघल ऐ आझम मधला अकबर ( पृथ्वीराज कपूर) हा पित्याच्या आधी बादशहा आहे. सिंहासनावर अधिकार असणाऱ्या मुलाने आपल्या हृदयाचे ऐकणे त्याला मान्य नाही. प्रसंगी त्याच्या विरुद्ध शस्त्र उचलायला सुद्धा तो कचरत नाही.
समाजाची मान्यता आणि समाजात असणारी आपली प्रतिष्ठा याला महत्व देणारे कर्मठ वडील हा सुद्धा बहुतांश सिनेमात आता आता पर्यंत कथेच्या संघर्षांचा महत्वाचा भाग होता. उदा विवाह मधला अलोकनाथ किंवा कभी ख़ुशी कभी गम मधला अमिताभ. नियम लागू करणारे, कुटुंबासाठी अर्थार्जन करणारे, चारित्र्याला जीवापेक्षाही जपणारे, त्यात मुलाची सुद्धा आहुती देणारे वडील हा अनेक कथेचा कणा होते. पुढे भारत बदलत गेला, स्त्रिया स्वतंत्र झाल्या, अर्थार्जन करू लागल्या, संसाराची आर्थिक जबाबदारी जेव्हा वाटली जाऊ लागली तेव्हा पुरुष मुखवटा टाकून भावनिक होत गेला.
नवीन सिनेमातला बाबा आता बदलला.
संवेदनशीलता, करुणा, भावनाशीलता, समजूतदारपणा ह्याचा प्रत्यय देणारी पात्रे आता सिनेमात पाहायला मिळू लागली.
मुलांच्या आयुष्यात लक्ष देणारी , त्यांच्या इच्छा , आकांक्षा समजून घेऊन त्यांना मदत करणारी, त्यांच्या पाठीशी राहणारी, त्यांच्या मतांचा आदर करणारी ही बाप मंडळी मुलांसाठी रोल मॉडेल्स बनली.
राझी या सिनेमामधील हिदायत खान(रजित कपूर)
काश्मीर मध्ये राहणारा हिदायत खान हा हेर आहे. पाकिस्तान सैन्याच्यासाठी तो त्यांचा हेर म्हणून काम करत असल्याचा विश्वास आहे पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे. पाकिस्तान मध्ये घडणाऱ्या घडामोडी हिंदुस्थानी सैन्याला पुरवण्याचे काम तो कितीतरी वर्षे करत आहे. कर्करोग झाल्याने आपले दिवस कमी राहिले आहेत याची त्याला जाणीव होते आणि त्याच वेळी युद्धाचे पडघम वाजायची सुरुवात झालेली असते. आपले अपुरे काम पुरे करण्यासाठी तो आपल्या मुलीला आपला वारसदार म्हणून निवडतो. मुलीचे लग्न, पाकिस्तान सैन्यातील एका अधिकाऱ्याबरोबर करून मुलीची पाठवणी करतो.
त्याला ती धैर्याने तोंड देते. कठीण निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपल्या पेशाशी आणि देशाशी इमान राखते.
सेहमत प्रशिक्षित हेर नाही. ती अत्यंत अल्लड, मनाने प्रेमळ मुलगी आहे. वडिलांची शेवटची इच्छा म्हणून ती या कामगिरीवर जाते.
या सिनेमात तिच्या लग्नाच्या वेळी गायलेले गीत तिच्या मनाची दुविधा दाखवते.
उंगली पकड के तुने
चलना सिखाया था ना
दहलीज ऊँची है ये , पार करा दे
मुलगी जेव्हा चालायला शिकते, तेव्हा तिचे वडील तिचा हात हातात घेऊन, उंबरठा ओलांडायला शिकवतात. आता तर ती घराचा उंबरठा कायमचा ओलांडून जाणार आहे .. एका नव्या जगात, दुसऱ्या देशात.
.. तो पार करण्यासाठी लागणारे धैर्य मला दे ..
प्रेम का कर्तव्य हा लढा कठीण. ते पेलण्याचे मला सामर्थ्य दे .
वडिलांकडून मुलीकडे जाणारा हा वारसा किती मोठा आहे!
वडील आणि मुलीचे नाते , वडील आणि मुलाच्या नात्याहून वेगळे असते. मुलगा त्यांचा वारस असतो तर मुलगी त्यांची ठेव. हे नाते काही दिवसांचे आहे हे जाणून असल्याने असेल, तो तिला जपतो, तिचे लाड करतो, ती त्याची परी असते ,..पापा की परी कारण ती कुणाचीतरी ठेव असते.
राझी आणि दंगल या सिनेमाने ही मानसिकता बदलली.
मुलगी खऱ्या अर्थाने वारसदार असल्याचे या सिनेमाने सिद्ध केले.
दंगल मधील महावीरसिंग फोगट (आमिर खान)
भले कुस्तीगीर होणे हे त्याचे स्वप्न असेल पण ते तो आपल्या मुलींच्या यशात जगतो. पहेलवान होणे हे प्रतिष्ठेचे आहे, हरियाणात त्याला मानाचे स्थान आहे पण ते मुलांसाठी. मुलीने कुस्ती खेळायची !
छे, मुलींनी घर सजवावे, जेवण बनवावे, मुलांचा सांभाळ करून पतीची मर्जी राखावी , फार फार तर सरकारी नोकरी करावी अशी मानसिकता असलेल्या समाजाचा भाग असणारा महावीरसिंग मुलींना पहेलवान बनवण्याचे स्वप्न बघतो. त्यासाठी समाजात मुरलेल्या पूर्वग्रहांना आव्हान देतो. कौशल्यआणि यश दोन्ही लिंग भेद करत नाहीत हे ठासून सांगतो आणि ज्या शिक्षणावर किंवा कलेवर पिढ्यानपिढ्या मुलांचा अधिकार आहे ते शिक्षण तो आपल्या मुलींना देतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे ट्रेनिंग, उत्तेजन आपल्या मुली जिंकण्यासाठीच जन्मल्या आहेत हा जो त्याचा विश्वास असतो तो मुलीच्या यशाचा महत्वाचा भाग असतो. चिकाटी, लवचिकता आणि प्रचंड कष्ट ह्या गुणांचा वारसा तो आपल्या मुलींना देतो.
मला तुझ्यासारखे वडील हवे होते असे गीताची मैत्रीण गीताला सांगते तेव्हा वडील कसे असावेत हा एक आदर्श महावीरसिंग समाजासमोर ठेवतो.
मला यातला एक सीन अतिशय आवडतो.
गीताकुमारी फोगट २०१० च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत गोल्ड मिळवते. वडिलांना पाहिल्यावर ती धावतच त्यांच्या जवळ जाते आणि ते पदक त्यांच्या हातात देते.
त्यावेळी पडद्यावर शब्द येतात,
“ और फिर ताऊजी ने वो शब्द बोले जिसे सुनने के लिये हम सालोसे तरस गये थे : शाबास “
जिंकलेल्या मेडलपेक्षा सुद्धा हे शब्द मौल्यवान असतात.
Happy Father’s day to you all!
Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

कोवळ्या डोळ्यात सुंदर स्वप्न बघ
बाप आहे तोवरी बिंधास्त जग
बाप गेल्यावर तुला समजेल मग
काय कामाचे इथे हे नातलग
काय एकेक बाप कॅरॅक्टर निवडलंय आणि तितकेच सर्वस्पर्शी लिखाण सुद्धा 👌👌👌❤️🙏
फादर्स डे च्या सर्वांना शुभेच्छा.
🙏🙏🙏
खरे आहे. कळत्या वयात बाप हवाच. जगाशी बिनधास्त भिडता येते
शेर फारच सुंदर कामिनी.
प्रिया,
Father’s day ची गाण्यांची इतकी सुंदर गुंफण पहिल्यांदाच असेल.
गाण्यांची निवड पण 👌👌
नेहेमी च कमाल करतेस.❤️❤️
Vidula , Thank you dear.
एकदम छान अप्रतिम..एकेक बाप जबरदस्त आहेत त्यात मेहमूद,नसिरुद्दिन ,आमिर कल्पने पलीकडले.धन्यवाद प्रियाबाय.
Thank you so much Ravindra baab .
बाप हा बाप असतो. खूप सुंदर लेख 👌🏻👌🏻
Thank you Deepa.