पालकत्वाची जबाबदारी रक्ताच्या नात्यानेच येते असा एक समज आहे. दत्तक मुल हा नाईलाजाने स्विकारलेला पर्याय आहे असाही एक समज आहे. खरेतर दत्तक मुल ही मानसिकता आहे. वात्सल्याला सीमा नसते.
जन्मदात्या आईच्या पोटात बाळाची आणि आईची नाळ जोडलेली असते. जन्मानंतर नाळ तोडली तरी त्यांचे नाते अखंड राहते.
दत्तक घेणे हे एकदा स्त्री -पुरुषानी मनाशी ठरवले की ही नाळ मनात जोडली जाते आणि मग मात्र उरते ते निखळ ममत्व. ही अदृश्य नाळ कापली जात नाही. ह्या नाळेबरोबरच, विश्वासाचे नातेही जोडले जाते. हा जोड निरपेक्ष प्रेमाने, आपुलकीने काळजीने किती घट्ट बांधला जातोय यावरच पुढचं नाते सुखाचे होऊ शकतं.
मणी रत्नम यांचा “कन्नथील मुथामित्ताल” (Kannathil muthamittal) हा तामिळ सिनेमा, हा अनवट बंध उलगडून दाखवतो.
कन्नथील मुथामित्ताल म्हणजे गालावर प्रेमाने केलेला ओठांचा स्पर्श.
सिनेमा सुरु होतो श्रीलंकेतील मानकुलम नावाच्या छोट्या गावात. शामा आणि दिलीपन या दोन व्यक्ती लग्नाच्या बंधनात अडकतात. दिलीपन हा तामिळ उग्रवादी गटाचा कार्यकर्ता आहे.
शामा भाबडी आहे. आपल्याला आठ मुले हवीत असे दिलीपनला सांगताना लज्जेने फुलून आलेल्या तिच्या चेहेऱ्याकडे गांभीर्याने पाहत दिलीपन सांगतो, “ मला मुले नकोत. जोपर्यंत या प्रदेशात शांती नांदत नाही तोपर्यंत मला बाप होण्याची इच्छा नाही. एकदा का शांती प्रस्थापित झाली की तू मला मूल दे.”
शामा गोंधळते. नवरा नक्की काय बोलतो आहे हे तिला समजत नाही.
गावात सैन्य शिरते. दिलीपन शामाला माहेरी पाठवतो, आणि स्वतः जंगलात शिरतो. ती गरोदर आहे हे लक्षात आल्यावर, शामाचे वडील, शरणागत म्हणून, जलमार्गाने भारतात येण्याचे ठरवतात. सैन्याच्या हल्ल्यात, दिलीपन जखमी झाला आहे हे शामाला समजते पण उशीर झालेला असतो. बोट निघालेली असते.
रामेश्वरमला आल्यावर शामाची प्रसूती होते. एका गोड़ मुलीला जन्म देऊनही शामाच्या वात्सल्याला काही जाग येत नाही. नवजात मुलीच्या हातात असलेले आपले बोट सोडवून, आपला नवरा जिवंत असेल या आशेने आपल्या नवजात मुलीला इथेच ठेवून ती श्रीलंकेला परत जाते.
आई वडिलांना जन्मतः गमावून बसलेली ही मुलगी मात्र सुदैवी असते. एक इंजिनीअर, थिरूचेलवन, हा सगळा प्रसंग पाहत असतो.
त्याला शामाचे आयुष्य माहित नसते. ती का जाते त्याचीही कल्पना नसते पण एक आई, आपल्या छोट्या मुलीला सोडून जाताना पाहून त्याच्यातील सुप्त पितृत्व जागे होते. त्याच्या हृदयाने जाणलेली त्या मुलीची व्यथा तो आपल्या कथेत मांडतो. कथा प्रसिद्ध होते. गाजते, एक लेखक म्हणून तोही प्रसिद्ध होतॊ.
ती छोटीशी बाळ मूर्ती, त्याच्यातल्या पितृत्वाला साद घालते. तिला दत्तक घेण्याचा त्याचा निश्चय पक्का होतो. आता गरज असते, ती त्याला समजून घेणाऱ्या सहचारीची.
ही गरज पूर्ण करते, त्याच्यावर मनोमन प्रेम करणारी इंदिरा. तो लग्नाची मागणी घालतो.
अभिनव मागणी .
“ तू माझ्यासाठी त्या मुलीची आई होशील का ?“
त्या छोट्याश्या मुलीचा मोह आणि थिरूचेलवनवर असलेले प्रेम यामुळे इंदिरा पत्नीबरोबरच आई होण्याची जबाबदारी स्विकारायला होकार देते.
लग्नानंतर ते दोघे, या छोट्या मुलीला, अमुधाला कायदेशीर रित्या दत्तक घेतात.
सिनेमाचा हा फ्लॅशबॅक. मणी रत्नम यांच्या सिनेमात काळाचा लपंडाव अनेकवेळा दिसतो. भूतकाळ, वर्तमान एकमेकांत गुंफणे ही त्यांच्या दिग्दर्शनाची खासियत आहे.
सिनेमाची खरी कथा सुरु होते ती नऊ वर्षांनी.
अमुधा आणि तिचा आपल्या जन्मदात्या आईला शोधण्यासाठी केलेला प्रवास हा या कथेचा जीव.
अमुधा आणि तिच्यानंतर झालेले विनय आणि अखिल, कुटुंब पूर्ण करतात. हसरी, खेळकर, हुशार, चौकस अमुधा सर्वांचीच लाडकी असते. कौतुकात वाढलेली ही मुलगी नऊ वर्षाची होते आणि तिचे वडील, तिला तिच्या जन्माचे सत्य सांगायचे ठरवतात.
स्वतःच्या मुलाला अथवा मुलीला दत्तक घेतलेले आहे हे त्यांना सांगणे पालकांसाठी फार कठीण असते. सत्य परिस्थिती ऐकल्यावर मूल कशी प्रतिक्रिया देईल हे कुणाला माहित नसते.
अचानक हे सत्य समजले तर अनेक वेळा मुले सैरभैर होतात. अचानक को अहं हा प्रश्न उभा राहतो. आई वडिलांबद्दल .वाटणाऱ्या हक्काची जागा कृतज्ञता घेते.
आपण परक्या लोकांच्या घरात राहतोय की काय या विचारामुळे कानकोंडे वाटते. अमुधा याच कोंडीत सापडते.
आपली भावंडे , ज्यांच्यावर ती सहज ताईगिरी गाजवत असते, त्यांना जर हे सत्य समजले तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल! आपण एवढे सावळे का? आई आपल्याला का टाकून गेली असेल? आपले वडील कोण असावेत हे प्रश्न तिला कासावीस करतात.
कोणालाही न सांगता, आपल्या आईचा पत्ता शोधण्यासाठी अमुधा, रामेश्वरमला निघून जाते.
“आई” म्हंटले की प्रेम, माया, आपलेपणा अशा सर्व उबदार भाव भावना मनात जाग्या होतात. या नात्यात कधी औपचारिक, परतफेडीचा किंवा व्यवहारी विचार नसतो. ती सोबत असताना निर्धास्त वाटते. आतापर्यंत ह्याच भावना अमुधाला इंदिराबाबत वाटत असतात पण आता मात्र अचानक उघड्या झालेल्या या रहस्याने तिला असुरक्षित वाटते.
इंदिरा आणि थिरूचेलवनचे मात्र या मुलीवर जीवापाड प्रेम असते.
हे तिला पटवून देण्याचा एकच मार्ग असतो, तिची आणि जन्मदात्या आईची भेट घडवून आणणे.
यात बराच धोका असतो. .
श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती अस्थिर असते. सरकारमध्ये असलेले सिंहलींचे वर्चस्व आणि तमिळींना मिळणारी दुय्यम वागणूक यामुळे येथील तामिळ समुदाय स्वतंत्र तामिळ राष्ट्राची मागणी करतो. त्यातून सुरु होतो तो वांशिक संघर्ष.
नंतरच्या काळात तो अधिक हिंसक आणि क्रुर होतो. अशा वेळेला अमुधाला तिथे घेऊन जाणे, तिच्या आईचा शोध घेणे हे अतिशय कठीण काम असते.
आपल्या दोन मुलांना आजोबांकडे ठेवून हे तिघे श्रीलंकेला प्रयाण करतात. त्यांची मदत करतो, एक सिंहली डॉक्टर, हेरॉल्ड विक्रमसिंघे, जो थिरूचेलवनच्या लिखाणाचा चाहता असतो. अतिशय स्फोटक परिस्थिती, पावला पावलाला असणारा मृत्यूचा सापळा, अतिरेक्यांकडून मारले जाण्याचा धोका या सर्वांवर मात करून, ते अमुधाच्या आईचा शोध लावण्यात यशस्वी होतात.
सशक्त स्त्री भूमिका हे मणी रत्नम यांच्या सिनेमाचे वैशिष्ट आहे.
नंदिता दास हिने अमुधाच्या जन्मदात्रीची भूमिका केली आहे. सुरुवातीला अतिशय अल्लड, निरागस असलेली ही मुलगी नंतर परिस्थितीच्या रेट्याने कठोर होत जाते. एका हळव्या मुलीचे रूपांतर अतिरेक्यात होते. लग्नानंतर आपल्याला निदान आठ तरी मुले हवीत असा लाडिक हट्ट करणारी ती, जन्मजात मुलीला आश्रमात ठेवून जाते. नंतर सुद्धा तिला भेटायचे नाकारते.
“ ती तुझी मुलगी आहे शामा !” तिचा भाऊ विनवतो. “
“ मला एकच नाही तर युद्धामुळे अनाथ झालेली तीनशे मुले आहेत “ असे सांगून ती निग्रहाने मुलीची भेट नाकारते.
जीवघेण्या हल्ल्यातून सुदैवाने वाचल्यावर थिरूचेलवन आणि त्याचे कुटुंब परत फिरायचा निर्णय घेते.
इंद्राला मात्र मनापासून वाटत असते की अमुधाची भेट व्हायला हवी.
आईपणात ती कुठेही कमी पडलेली नसते तरीही आपल्या मुळापर्यंत पोचायची प्रत्येक जीवाची इच्छा असतेच.
त्यासाठी ती धोका पत्करून शामा साठी थांबायचा निर्णय घेते.
मुलीच्या ओढीने असेल किंवा भावाच्या आग्रहाने , शामा अमुधाला भेटायला येते.
आपल्या लहानपणीच्या फोटोंचा अल्बम, लिहिलेली कविता, त्याला मिळालेले बक्षीस …एवढ्या वर्षांत साचलेले काय आणि किती सांगायचे असते एका मुलीला , तिच्या आईला.
आई मात्र स्तब्ध असते. निर्विकार.
आपल्याला नाकारले जात आहे या भावनेने अमुधा, हळूच लांब होते.
ते पाहून मात्र शामाचा बांध फुटतो.
मुलीला छातीशी धरल्यानंतर भरून आलेले डोळे, ती लपवू शकत नाही.
कीर्तना या मुलीने अमुधाची भूमिका रंगवली आहे. हे चित्रण एवढे वास्तववादी आहे, अस्सल आहे की तिची वेदना, तिची असुरक्षितता, भांबावलेपण हे सारे आपण जगतो.
.नवल नाही की त्या वर्षीचा लहान मुलांसाठी असलेला राष्ट्रीय पुरस्कार तिच्या नावावर जमा झाला.
या दोन सशक्त भूमिकांत, दुय्यम असूनही अतिशय महत्वाची भूमिका आहे ती इंदिरा. लहान वयात, दुसऱ्याच्या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय ती घेते. थिरूचेलवन, मुलीसाठी आपल्याशी लग्न करायला तयार झाला आहे हे माहित असूनही, त्या मुलीला आपली मानते. अमुधा आपल्या जन्मदात्रीला भेटली तर कदाचित आपल्यापासून दूर जाईल याची तिला भीती आहे,
अमुधा आपल्या वागण्यातून दाखवून देत असते की तू माझी आई नाहीस.
अर्थात हे नकळत होत असेल तरी तिच्यातील आई दुखावली जाते, अपमानित होते तरीही तरीही स्वतःचा जीव धोक्यात टाकून, ती आई मुलीची भेट घडवून आणते. सिमरन ही भूमिका अक्षरश: जगली आहे.
इंदिराने आपल्याला जन्म दिला नाही हे समजल्यावर दुखावलेली अमुधा तिला विचारते,” मी तुझ्यासारखी आहे असे तू मला का सांगितलंस?”
“ तू माझ्यासारखीच आहेस , नाही का ?”
इंदिरा केवळ अमुधाला सांगत नाही, ती स्वतःची सुद्धा खात्री करून देत असते.
“मला तुम्ही परत पाठवणार ?” आपले समजले जाणारे हे विश्व आपले नाहीच हा धक्का पचवणे त्या नऊ वर्षाच्या मुलींसाठी कठीण असतेच पण “ चल, वेडी कुठली !” असे म्हणून तिला कवटाळणाऱ्या इंदिराची सुद्धा ही परीक्षा असते.
दोघेही आपल्या विचारात असतात. इंदिराचा हात मुलीच्या खांद्यावर विसावलेला असतो. आता काय होणार याची काळजी, तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसते. मुलीला सांगायला तर हवे, दुसरीकडून समजले तर ती अजून तुटेल याची कल्पना आहे तिला आणि तरीही ती आपली राहील का ही भीती .पडद्यावर सिमरन दिसत नाही , दिसते ती आई होऊन उरलेली इंदिरा.
सिमरन एका सर्वसाधारण गृहिणी सारखीच या सिनेमात वावरली आहे. सलवार कमीस किंवा साडी, विस्कटलेले केस, मुलांचा डबा करण्याची धावपळ, मुलीचे केस विंचरणे, मुलाच्या शर्टाची बटणे लावणे आणि हे सर्व सांभाळून दूरदर्शनवर समालोचक म्हणून काम करणे. घरा घरात असणारी पत्नी आणि आई. ती थोडीशी रागीट आहे पण शिस्त लावणे ही सुद्धा तिची जबाबदारी आहेच आणि इतके असूनही मुलांना कल्पना आहे की आपल्यासाठी आपली आई आहे.
तसा हा सिनेमा आई आणि मुलीच्या नात्याचा पण या सिनेमातील वडील (माधवन) आणि मुलीचा बंध सुद्धा अनोखा आहे.
इंजिनीअर असलेला थिरूचेलवन हा, लेखक होतो त्याचे कारण असते ही मुलगी. तिला पाहूनच त्याला आपली पहिली कथा सुचते. केवळ तिला दत्तक घेता यावे म्हणून तो लग्नाला तयार होतो. तिच्या जन्माचे सत्य ही तोच सांगतो. तिला सावरायला वेळ देतो. अमुधा जेव्हा त्यांच्याशी उर्मट वागते तेव्हाही तो तिला समजून घेतो. स्वतःचा जीव धोक्यात घालून तिच्यासाठी श्रीलंकेला जाण्यास तयार होतो. कदाचित हे एक कारण असेल की अमुधा आपल्या खऱ्या वडिलांना भेटण्याचा आग्रह धरत नाही.
तिच्यासाठी थिरूचेलवन हाच तिचा खरा पिता असतो.
कन्नथील मुथामित्ताल ह्या सिनेमाची पार्श्वभूमी दहशतवाद आहे.
दहशतवादाच्या हिंसाचारात गेलेले बळी म्हणजे केवळ मरण पावलेली माणसे नसतात तर सर्वसामान्य लोकांचे सामान्यपणे जगणे हा दहशतवाद नष्ट करतो. अशा परिस्थितीत सुद्धा टिकलेली कुटुंबव्यवस्था, कर्तव्याची जाणीव आणि बाँम्बच्या स्फोटात, गोळ्यांच्या वर्षावात सुद्धा एकमेकांना तारून नेणारे प्रेम आशेचा दीप तेवत ठेवते.
चित्रपटाच्या शेवटी, मुलीचा आग्रह न मानता, शामा आपल्या गोटात परत जाते पण केव्हातरी या देशात शांतता नांदेल आणि तेव्हा मी तुला भेटेन हे तिचे उद्गार, पहाट होईल याची आशा जागवतात.
अमुधाच्या आयुष्यातले वादळ मात्र शांत होते. आईला निरोप देतानाच, अमुधा इंदिराच्या गालावर प्रेमाने ओठ टेकवते. आई मुलीच्या नात्याचा तो पुनर्जन्म असतो.
ऍमेझॉन प्राईम वर हा चित्रपट पाहायला मिळेल.
Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner
.
.

प्रिया
नेहेमी प्रमाणेच अप्रतिम लेख.
तुझ्यामुळे भारतीय भाषा भगिनी भेटतात.त्यातले चित्रपट बघितले जातात.
खूप प्रेम आणि कौतुक.🩷🩷
विदुला, thank you. सिनेमा चुकवू नकोस.आवडेल तुला.
Vidula , Thank you 🙂
छान लिहीलंय.
Thank you Sir.
प्रिया तू इतकं रसप्रद लिहितेस की मी अधाशासारखी दोनदोनदा वाचते तरी पोट भरत नाही.
Sushama, Thank you so much .
तुम्ही अगदी तरलतेने लिहिलेय. लेख आवडला!
Thank you Sameer ji.
प्रिया, खूप सुंदर लिहिले आहेस.
नक्कीच हा चित्रपट पाहीन.
धन्यवाद 🙏🏻
Please do watch Archana , You will really love this .
आई म्हणजे प्रेम आणि दहशतवाद हे तिरस्काराचे, घृणेचे अपत्य…..यांची सांगड घालून केलेला अप्रतिम चित्रपट आणि त्यावरचे आपले सुंदर परीक्षण.
You got the crux of the movie Uday.
Thank you.
अतिशय सुंदर लिहिलंय प्रिया ताई. ग्रेट आहात तुम्ही.
Thank you Amit.
किती तरल भावना व्यक्त केल्यात….
सिनेमा बघण्याची इच्छा होते आहे
Thank you Veena . Please do watch this ..Its on Prime with English subtitles:)