Skip to content

संसार का कारकीर्द .. बदलत्या स्त्रीची दुविधा:

भाग २ 
अनुराधा , अभिमान ते तुम्हारी सुलु. 

लेखिका अरुणा  ढेरे यांनी  लिहिलेली, सोमनाथाच्या मंदिरात नर्तकी असणाऱ्या चोला हिची कहाणी खूप आगळी आहे. ही कथा निदान दोन एक हजार वर्ष जुनी. चोला ही देवदासी. ती देवदासी का झाली याचा उल्लेख कुठेही नाही. त्या काळात देवदासींना भोगवस्तू समजले जात नव्हते असा तो काळ. चोला नृत्य करायची. नाचणे आणि गाणे हा देवदासींचा व्यवसाय होता. त्यांच्या कामाचा तो एक महत्वाचा भाग होता. चोला मात्र हाडाची नर्तिका होती. नृत्य तिचे जीवन होते. स्वतःला शोधण्याची , जाणण्याची , व्यक्त करण्याची तिला मिळालेली वाट होती ती. गुजराथचा राजा भीमदेव तिच्या प्रेमात पडला. केवळ तिच्या सुंदरतेच्या  प्रेमात नाही तर तिच्या नृत्यानेही भारावून गेला. तिथून सुरु झाली एक विलक्षण प्रेमकथा.
देवदासीला लग्न न करता स्वतःच्या सेवेसाठी घेऊन जाणे शक्य असतानाही, राजाने चोला समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. एक देवदासी राणी झाली. तिचं मन जाणणाऱ्या, सांभाळणाऱ्या दिलदार, रसिक, कर्तबगार पुरुषाची पत्नी झाली. त्यांच्या संसारवेलीवर एक फुलही आले.
ही कहाणी सफल झाली का ? व्हायला हवी होती पण तसे झाले नाही.
सोमनाथाचे मंदिर तिला खुणावू लागले. पैंजणाची छमछम तिला अस्वस्थ करू लागली. जी कला तिचे सर्वस्व होती ती दूर  गेल्याने तिला जीवन अशक्य झाले. राजाने तिला समजावयाचा खूप प्रयत्न केला पण जेव्हा त्याला तिची तडफड जाणवली तेव्हा मात्र त्याने सन्मानाने तिला सोमनाथाला परत पाठवले. चोला पुन्हा देवाच्या सेवेत रममाण झाली. प्रथमदर्शी हा वेडेपणा वाटेल. राणीपदावरील स्त्रीला कसले हे देवदासी होण्याचे डोहाळे म्हणून तिची कणव  येईल. आज मागे वळून पाहताना तिची दुविधा निश्चितच समजते, जाणवते , मनाला कुरतडते.

“तुम्ही लग्न का केले नाही “  प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांना हा प्रश्न विचारला होता. लग्न न करणे याहीपेक्षा लग्न न केल्याने तिच्या आयुष्यातली अपूर्णता तिला जाणवते का इथे प्रश्नाचा मुख्य रोख असावा. 

टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हंटले आहे ,
“ I don’t miss being married. घटना घडण्यात देवाचा हातभार असतो. जे घडते ते देवाच्या इच्छेने घडते. जे काही घडते किंवा जे घडले नाही असे वाटते , तेदेखील चांगल्यासाठी होते. लग्न किंवा मुले स्त्रीच्या आयुष्याला पूर्णत्व देतात असे मला वाटत नाही . तिच्या आयुष्याचा तो एक भाग असतो . महत्वाचे असते ते पूर्णत्वाची भावना स्वतःच्या अस्तित्वात जाणवणे आणि आपले अस्तित्व कशात आहे हे स्वतःला माहित असणे. बाईंचे अस्तित्व त्यांच्या संगीतात होते. त्यांच्यासाठी ते आयुष्य होते.

लग्नानंतर मुलगी जेव्हा कुणाचीतरी पत्नी होते तेव्हा तिचे आडनावच  बदलत नाही तर तिची ओळख पुसली जाते. संसार रथाची दोन चाके जरी म्हंटले तरी नवऱ्याचे चाक फिरते राहण्यासाठी अनेकवेळा तिला तिची गती थांबवावी लागते. तिच्या आवडी निवडी अनेकवेळा बदलल्या जातात. संसार हे तिचे कार्यक्षेत्र बनते.
अनेकवेळा प्रेमापोटी अनेक स्त्रिया हा निर्णय सहज घेतात. संसारासाठी स्वतःला समर्पित करतात. त्यांची हुशारी, बुद्धिमत्ता, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा याला तिलांजली देतात. अनेकवेळा नवरा आपल्या कार्यक्षेत्रात पुढे जातो, घराकडे दुर्लक्ष होते, मुलांना पंख फुटतात नी अशावेळी आपले सर्व सोडून दिल्याने एकाकी पडलेल्या त्या स्त्रीचे काय होत असेल !

स्वातंत्र्य मिळाल्यांनतर नवीन जन्मलेल्या राष्ट्रापुढे राष्ट्र उभारणीचे एक महत्वाचे आव्हान  होते. कुटूंब संस्था हे समाजाचे सर्वात लहान एकक आहे. कुटूंब संस्थेचे दोन महत्वाचे घटक असतात. स्त्री आणि पुरुष. पुरुषाने बाह्य जगात कर्तृत्व गाजवण्याची संधी शोधायला सुरुवात केली तर घर सांभाळण्याची , एकत्र ठेवण्याची जबाबदारी साहजिकच त्याच्या पत्नीच्या अंगावर आली. समाजाचे हे प्रतिबिंब चित्रपटात सुद्धा पाहायला मिळते.
स्त्रीचा आत्मसन्मान आणि सुख तिच्या संसारात आहे हे मनावर बिंबवण्यात महत्वाचा वाटा असलेल्या हिंदी सिनेमाने “अनुराधा “ या सिनेमात अतिशय वेगळ्या विषयाला हात घातला.

सिनेमाची सुरुवात फार कल्पक आहे. श्रेयनामावली झळकताना पार्श्वसंगीत म्हणून लता बाईंच्या आवाजात रेकॉर्ड केलेले गीत वाजते. रेडिओवर हे गीत सादर होत आहे . गाणारी गायिका आहे “अनुराधा.”
ही अनुराधाची कथा आहे. 
भैरवी रंगातली ही शास्त्रोक्त संगीतावर आधारित चीज आहे. गाताना गायिकेची तयारी जाणवून देणारे हे संगीत.
नायिकेचा चेहेरा दिसत नाही पण ती तयारीची उदयोन्मुख गायिका आहे हे प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
सिनेमाची सुरुवातच भैरवीने का केली असावी ; ही अस्ताची सुरुवात असेल का या प्रश्नाचे उत्तर पुढे उलगडत जाते.

एका श्रीमंत उद्योगपतींची देखणी मुलगी, ( अनुराधा रॉय –लीला नायडू )जी उत्तम गायिका आहे  ती डॉ निर्मल चौधरींच्या ( बलराज सहानी ) प्रेमात पडते. दोघांच्या आर्थिक तफावतीतील फरक हे लग्नाला विरोध असण्याचे कारण आहेच , त्याहीपेक्षा एक वेगळी भीती या विरोधामागे आहे.
निर्मलने गोरगरिबांची सेवा करण्याचा वसा घेतला आहे. त्यासाठी खेड्यात जाण्याची त्याची जिद्द आहे. खेड्यात आपल्या मुलीच्या संगीताची आबाळ होईल ही शंका वडिलांना सतावत आहे. ती रास्तही आहे. अनुराधाने परदेशातून परतलेल्या आपल्या मित्राच्या मुलाशी, दीपकशी ,  लग्न करून आपली कारकीर्द जोपासावी असा प्रस्ताव ते अनुराधापुढे ठेवतात पण प्रेमात पडलेली अनुराधा हा प्रस्ताव धुडकावते आणि निर्मलशी लग्न करून खेडेगावात स्थायिक होते.
प्रेम ही भावना जादूभरी . एकदा का तिच्या कचाट्यात माणूस आला की बाकीचे जग अदृश्य होत जाते.
वर्तमान हेच भविष्य असणार आहे या कल्पनेत प्रेमी नादावतात. त्यांना काळाचा , इतकंच काय तर स्वतःच्या स्वप्नाचा सुद्धा
विसर पडतो. दोन मने एकाच नजरेतून पुढच्या वाटेकडे डोळे लावून बसतात.

डॉ निर्मल रोग्यांच्या शुश्रुषेत मग्न. त्याच्या कामाच्या वेळा अनिश्चित. अनुराधाची मैत्री होईल असे या गावात कुणी नाही. तिला एक मुलगी होते. तिला वाढवणे नी घरकाम यात अनुराधाचा दिवस सुरु होऊन मावळतो. गाणे बाजूला पडते.
एक उदयोन्मुख गायिका हळूहळू गुणगुणणे सुद्धा विसरून जाते.

चित्रपटातील दोन प्रसंग फार सूचक आहेत.
एका प्रसंगात, निर्मल अतिशय उशिरा घरी येतो . त्याची आवडती साडी नेसून अनुराधा सामोरी येते. त्याचे मात्र तिच्याकडे लक्ष नाही. त्याच्या डोक्यात आपल्या रुग्णांचे विषय आहेत.
खट्ट होऊन अनुराधा खिडकी उघडून दूरस्थ चंद्राकडे पाहते. त्यांच्या प्रेमाचा तो साक्षीदार आता दोघांत पडलेल्या दरीकडे मात्र तटस्थपणे पाहत असतो . उघड्या खिडकीतून कुठूनतरी सुरेल लकेर येते.
“तुझे ते संगीत आधी बंद कर पाहू.  मला डिस्टर्ब करते आहे ते .” निर्मलचे तेवढेच बेसूर शब्द तिच्या कानावर पडतात.
एकेकाळी याच संगीताची त्याला मोहिनी पडून तर ती दोघे एकत्र आलेली असतात.
आता त्याची प्रॅक्टिस तिचीही असते , त्याच्या सेवाकार्यात तिचॆही हातभार असतो पण तिचे संगीत मात्र तिच्यापुरते उरते , इतकच नाही तर ते त्याला नकोसे होऊ लागते.
तिची मुलगी जेव्हा तिला गाणे गायचा आग्रह करते तेव्हा अनुराधाला गाताही  येत नाही .
अनेकदा प्रेम तुमचा स्वतःचाच बळी घेते , जेव्हा याची जाणीव होते तेव्हा खूप उशीर होतो. कलाकाराच्या आयुष्यात कलेचे स्थान फार महत्वाचे असते. त्याच्या आयुष्याला ते अर्थ देते. जेव्हा तेच हिरावले जाते तेव्हा माणूस स्वतःपासून सुद्धा तुटत जातो. आई , पत्नी का गायिका ह्यात अनेकदा पिढ्यापिढ्या असलेले संस्कार, समाजाच्या अपेक्षा ह्यात अनेकदा नाते राहते , माणूस नात्याला  सांभाळण्याच्या कसरतीत  स्वतःला हरवून बसतो.

हेतूशुन्य निरस जीवन जगात असतानाच , अनुराधाच्या आयुष्यात परत दीपकचा प्रवेश होतो. दीपक आपल्या मैत्रिणीबरोबर प्रवास करत असताना, अनुराधाच्या गावाजवळ त्याच्या मोटारीला अपघात होतो. मैत्रिणीचे ऑपरेशन करणे भाग असते. दीपकला निर्मल स्वतःच्या घरी घेऊन येतो. अनुराधातील बदल खटकण्यासारखा असतोच पण तिच्या संगीतावर मनापासून प्रेम करणाऱ्या दीपकला खटकते ते तिचे संगीतापासून दूर  जाणे.

रुत मतवाली आ के चली जाये
मन में ही मेरे मन की रही जाये
खिलने को तरसे नन्ही नन्ही कलियाँ
पिया जाने न
हाय

लता बाईंनी त्या हाये मध्ये नायिकेची वेदना एवढ्या समर्थपणे व्यक्त केली आहे ! आपल्याला आयुष्यातून संगीत वजा करावे लागले तर काय होईल याची जाणीव त्यांना नक्की झाली असावी .
अनुराधा हा सिनेमा जेवढा लीला नायडू चा आहे  त्याही पेक्षा कणभर जास्त लता बाईंचा आहे असे मला वाटते.

बरीचशी माणसे निरुद्देश जगतात. त्यांची आवड म्हणा किंवा जीवन जगण्याचा समजूतदार दृष्टिकोन म्हणा, जसे आयुष्य येईल ते ते फुलवत जातात. कलासक्त माणसे किंवा कोणतेही ध्येय उराशी बाळगून जगणारी माणसे , ज्यांचा प्राणच त्यात अडकला असतो . त्याच्याशिवाय जगणे हे खऱ्या अर्थाने जगणे नसते.
आपण काय गमावत आहोत याची जाणीव करून दिलेली  अनुराधा घर सोडण्याचा निर्णय घेते.हा निर्णय निर्मलला सांगितल्यानंतर पहिला बसतो तो धक्का. स्वमग्न , भले त्याचा हेतू ही रुग्णसेवा असेल , त्याने अनुराधाचे त्याच्यात विरघळणे एवढे गृहीत धरले आहे की ती त्याला सोडण्याचा विचार करेल हे त्याच्या ध्यानी मनी सुद्धा येत नाही . त्याला ही कल्पनाच सहन होत नाही .
असे म्हंटले जाते , “ Behind every great and successful man , there is a woman’ . यशस्वी पुरुषांच्या यशात त्यांच्या आयुष्यातील स्त्रियांचे मोठे योगदान असते. त्यांचे अदृश्य हात मात्र अनेकवेळा दिसत नाही .अनेकवेळा घरातील स्त्रिया न बोलता , न तक्रार करता , साऱ्या जबाबदाऱ्या पेलतात. कारकीर्द घडवण्यासाठी पुरुष घराबाहेर पडतो , आपला वेळ आपल्या स्वप्नांना देतो , ती स्वप्ने साकारण्यात अशा अनेक स्त्रिया आपल्या स्वप्नांचे बलिदान करतात.
पुरुषाला तो आपला हक्क वाटतो .

या सिनेमात कुणी खलनायक नाही. अनुराधाचा मित्र ही नाही. त्याच्या येण्याने तिच्या निर्णयाला एक दिशा जरी मिळते तरीही तिचे त्याच्यावर प्रेम नाही. हा झगडा आहे कला आणि संसार यातला.
चित्रपटाचा शेवट कौटुंबिक समाजाला आवडणारा असला तरीही स्त्री नी तिचे करिअर हा फार महत्वाचा विषय इथे चर्चेला आला. गाण्याच्या प्रेमासाठी ती परत करिअरकडे वळायचे  ठरवते पण नवऱ्याचे प्रेम तिला जाऊ देत नाही . शेवट पारंपरिक असला तरीही  स्त्रीला आपण पत्नी, आई  याच बरोबर एक  कलाकार आहोत याची जाणीव होणे हे मला आवडले.

शेवट जरी योग्य असला तरी शेवटचे दृश्य मात्र खटकणारे आहे. पहाट होते . मोटार सुरु होण्याचा आवाज येतो . अनुराधा सोडून गेली या कल्पनेने व्याकुळ होऊन निर्मल खाली धावत येतो पण अनुराधा घरासमोरील अंगण झाडताना त्याला दिसते.
एकमेकांच्या मिठीत विसावताना सिनेमा संपतो .
तानपुऱ्यावर अनुराधा आणि तिच्या संगीतात हरवलेला निर्मल असे दृश्य योग्य ठरले नसते का ? हा प्रश्न कदाचित हृषीकेश मुखर्जी यांना पडला असेल पण त्याचे उत्तर स्त्रियांच्या करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन दाखवतो.
“ जर मी असे केले असते तर निर्मल आरोपी ठरला असता. जे मला नको होते . “
एक करिअर न फुलता सुकून गेली हा बहुतेक त्यांच्या नजरेतून गुन्हा नसावा.

हृषीकेश मुखर्जी यांनी कितीही सफाई देवो , हा शेवट त्यांनाही कुठेतरी खटकला असावा . १९६० नंतर , १३ वर्षांनी “दुर्लक्षित कलावंत पत्नी” या विषयावर त्यांनी अजून एक सिनेमा काढला .
सिनेमा होता “ अभिमान “



पती-पत्नी जेव्हा एकाच क्षेत्रात असतात, तेव्हा पुढे जाणारा पुरुष असेल तर त्याचे यश साऱ्या घराला सुखावते. अगदी त्याच्या
पत्नीसाठी सुद्धा तो अभिमानाचा विषय असतो, पण कलेला नी यशाला नियम नसतात.
अभिमान ही एका सुरेल जोडप्याची कथा आहे. प्रसिद्ध गायक सुबीर एका साध्या पण सुरेल आवाजाच्या मुलीच्या प्रेमात पडतो, तिच्याशी लग्न करतो आणि आपल्या पत्नीला सुद्धा गाण्यासाठी उत्तेजन देतो. व्यावहारिक नजरेतून हा निर्णय फायदेशीर आहे हे त्याने जाणले आहे.
एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात येत नाही. उमा, त्याच्याहून प्रतिभाशाली आहे.
मला पाहिजे तेवढेच, तितकेच , तू यशस्वी व्हायचे , ज्यायोगे तुझी कला चालू ठेवण्याचे मी श्रेय तर घेईन आणि त्या अनुषंगाने मिळणारे फायदे सुद्धा मिळावें असा काहीसा हेतू असेल तरी नियती नी प्रतिभा तुमच्या फायद्यासाठी काम करत नाहीत.  यशाकडे जाणाऱ्या वाटेवर उमा सुबीरला सुद्धा मागे टाकते. त्याच्याहून जास्त अवॉर्ड्स , जास्त कामे आणि त्या बरोबर जास्त पैसे.

तिची वाढलेली लोकप्रियता आणि किंमत सुबीरला सहन होत नाही. पुरुषी अहंकार ते मान्य करत नाही. तो नैराश्येच्या गर्तेत सापडतो. उमा आपली करिअर सोडण्याची तयारी दाखवते पण त्याच्यातील नवरा तेही मान्य करत नाही. त्याचा अहंकार संसाराला मारक ठरतो. उमा उन्मळून पडते.
अशिक्षित आणि असंस्कृत लोकांचे एक बरे असते . मनात असेल ते बोलून टाकतात. बायकोला मारहाण करतात. सभ्य आणि सुशिक्षित गटात मोडल्या जाणाऱ्या पुरुषांना ते सांगता येत नाही . तोंडावर चढवलेला मुखवटा तर उतरवायचा नाही आणि सभ्यतेचे सोंग पेलवत सुद्धा नाही अशा गर्तेत सुबीर सापडतो. कर्तृत्वाने पुरुष बनता येत नाही ..(.इथे पुरुष म्हणजे घरातील कर्ता आणि दुर्दैवाने त्याची व्याख्या आपण जास्त यशस्वी , जास्त  कमावणारा अशी केली आहे)  म्हणून आपल्या जुन्या मैत्रिणीकडे  ( चित्रा -बिंदू ) जाऊन ठेच लागलेल्या अहंकाराला कुरवाळतो. तिच्या यशाला थांबवणे शक्य नाही , तिला थांबवणे त्याच्या इगोला परवडत नाही म्हणून मनाला लागेल असे बोलतो .

He makes her feel guilty and unwanted for her well deserved success.
आधी संगीत, मग संसार गमावलेली उमा दगड बनते. तिला परत माणसात आणते ते संगीत.
तिच्यातली पत्नी नाही, आई नाही पण एक “कलाकार”, नवऱ्याच्या  कलेला आणि पर्यायाने स्वतःलाही निराशेच्या गर्तेतून बाहेर काढते.
सिनेमाच्या शेवटी दोघेही एकत्र गातात.
त्याचा हेतू तिला माणसात आणणे हा असतो पण त्याहीपेक्षा महत्वाचे असते ते सुबीरचे गाणे परत सुरु होणे. एकप्रकारे ही  त्याच्याच कारकिर्दीला दिलेली मदत असते.

अनुराधाची नायिका “अनुराधा”  नी अभिमानची “उमा” यात काही साम्यस्थळे आहेत. दोन्ही अत्यंत गुणवान आहेत. संगीतात निपुण. शास्त्रोक्त संगीताच्या विद्यार्थिनी आहेत. अनुराधाचे वडील संगीतप्रेमी आहेत, तिच्या कारकिर्दीला त्यांचा पाठिंबा आहे तर उमाने संगीताचे शिक्षण आपल्या गायक वडिलांकडून घेतले आहे.

यशस्वी होण्यासाठी फक्त गुणवत्ता महत्वाची नसते. पाठिंबा , शिक्षण आणि त्याही पेक्षा महत्वाकांक्षा . शिडीवर जाण्याचा मार्ग निमुळता होत जातो. अनेकवेळा बरेच काही गमावून , बऱ्याच जणांच्या डोक्यावर पाय देऊन ,प्रसंगी अनेक आवडत्या गोष्टीचा त्याग करून तुम्हाला आपले उद्धिष्ट गाठावे लागते .You have to be focused to be successful .या दोघीही महत्वाकांक्षी नाहीत. त्यांच्या आयुष्यात जे घडते , किंवा जे घडत नाही , याला कारण त्यांचा सुखी असण्याचा केंद्रबिंदू त्यांच्या आयुष्यातील पुरुष आणि “त्याचे सुख”  आहे. संगीत नाही .

एक योगायोग .
अनुराधाचे संगीत पंडित रविशंकर यांचे होते. संगीत गाजले , चित्रपट पडला. दुर्दैव असे की गाण्याचे यश लता मंगेशकर यांच्या नावावर जमा झाले.. कुठेतरी दुखावलेल्या रवी शंकर यांनी  सिनेमाची वाट सोडून दिली. लता बरोबर गाणे सुद्धा टाळले. दुसरा योगायोग असा की अभिमानची कथा रविशंकर आणि त्यांची पत्नी अन्नपूर्णा ह्यांच्या जीवनावर आहे असे म्हंटले जाते. अन्नपूर्णा देवींनी आपले जीवन एकाकी घालवले आणि  विद्यादानामध्ये आयुष्य व्यतीत केले. व्यावसायिक संगीतात त्या का उतरल्या नाहीत ह्याचे उत्तर त्यांनी कधीही दिले नाही. सिनेमा हा तीन तासाचा असतो, तो संपतो. तीन तपाहून जास्त आयुष्य जगताना त्यांच्या मनात काय येत असेल!
अनुराधा पाहताना माझ्या मनात आले, आता निर्मल परत ती चूक करणार नाही . “त्याच्यासाठी , त्याच्या संसारासाठी” तो आपल्या पत्नीसाठी वेळ काढेल .तिच्या साडीचे, सुंदरतेचे, स्वयंपाकाचे , कधीतरी गाण्याचे सुद्धा कौतुक करेल. अनुराधा त्याच्यात आनंदाने समाधानी राहील .
अभिमानाची उमा तर परत व्यावसायिक गाण्याची चूक करणारच नाही .. त्याची केवढीतरी मोठी शिक्षा त्या दोघांनी भोगली आहे .. ती आपल्या संसारात रमेल .. त्यांच्या संसारवेलीवर फुले येतीलच ..त्यांच्यासाठी अंगाई गाईल ..क्वचित आपल्या नवऱ्यासाठी , त्याच्या कारकिर्दीसाठी एखादे गीत गाईल.. यशस्वी होण्यासाठी फक्त प्रतिभा, मेहेनत, संधी पुरेशी नसते. त्यासाठी स्वतःवर प्रेम असावे लागते. प्रचंड महत्वाकांक्षी माणसे स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करतात,  तेव्हाच स्वप्ने त्यांना प्रसन्न होतात. तीसुद्धा अपेक्षा करतातच की,  निरपेक्ष असे या जगात काहीही नसते.

गेली कित्येक पिढ्या समाजाची ही धारणा आहे की लग्न हे सगळ्या समस्यांचा शेवट आहे. “And they happily lived after” सिनेमाच्या शेवटी जेव्हा The end ही अक्षरे उमटतात तेव्हा त्याच्या पुढे सगळे आलबेल आहे असा सूर असतो.
मनाचे नाही तर शरीराचे मिलन हे दोन जीवांच्या प्रवासाचे पहिले स्टेशन असते आणि त्या नंतर चा प्रवास हा बऱ्याच प्रयत्नांनी मनाच्या मिलनाकडे जाणारा असतो ह्या कडे दुर्लक्ष केले जाते.
असे म्हणतात, रक्ताचे नाते हे सगळ्यात मजबूत नाते असते आणि त्याच्याशी बरोबरी करणारे दुसरे नाते असते ते पती आणि पत्नीचे नाते आणि ते  विश्वास आणि एकमेकांना  समजून घेण्याच्या क्षमतेवर टिकते.
अर्थात माघार घेणे आणि पतीच्या आयुष्यात स्वतःला फिट करणे ह्याला  समजूतदारपणा म्हणतात आणि तो पत्नीकडून अपेक्षित असतो.
अनुराधा आणि अभिमान ह्यांनी हा पायंडा जरी मोडला तरी त्याचा शेवट मात्र याच अपेक्षित वळणावर येऊन संपला ह्याला  दिग्दर्शकाचा कमकुवतपणा किंवा आर्थिक यशावर डोळा ठेवून केलेली तडजोड म्हणता येईल . तरीही मी म्हणेन,  स्त्रियांची क्षमता, घरातून बाहेर येऊन गाजवलेले कर्तृत्व ह्याची नोंद या चित्रपटाने घेतली.

ऐंशीच्या दशकात स्त्रियांच्या समस्येवर अनेक चित्रपट आले. अर्थ, अस्तित्व, आखिर कौन, मासूम ह्या चित्रपटातील नायिकांनी ,स्वप्नाळू जगातून बाहेर येऊन खंबीर भूमिका घेतलेल्या आपण पहिल्या आहेत पण त्याचे कारण त्यांची महत्वाकांक्षा, त्यांची स्व साठी काही करायची तयारी असे म्हणता येत नाही. नवऱ्याच्या बाहेरख्याली स्वभावामुळे  नाईलाजाने उचलले गेलेले हे पाऊल होते. घर आणि प्रियकर हा केंद्रबिंदू न ठेवता, करिअर करण्याची महत्वाकांक्षा असलेली स्त्री हिंदी पडद्यावर क्वचित आली आणि आली तरी ते पात्र खलनायिका म्हणून रंगवले गेले( उदा . अकेले हम, अकेले तुम )
नव्वदच्या दशकात जग बदलले.
कुटूंबाचा आकार छोटा झाला. मध्यम वर्गीय कुटुंबात सुद्धा मुलाबरोबरच, मुलीच्या शिक्षणाला महत्व दिले जाऊ लागले. शिक्षणाच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्या आणि मुलींनी सर्व क्षेत्रात भरारी घ्यायला सुरुवात केली. उच्च शिक्षित मुली मोठ्या पदावर काम करू लागल्या. पगार वाढले, जबाबदारी वाढली, कामाचे तास वाढले , महत्वाकांक्षा वाढल्या. ह्याची नोंद सिनेमा सृष्टीने सुद्धा घेतली.
आई, प्रेयसी एवढ्या परिघात फिरणारी स्त्री पात्रे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून चित्रित होऊ लागली. स्वतंत्र व्यक्तिमत्वाला ठोस आणि  वैविध्यपूर्ण करिअरची जोड मिळाली.
लक्ष्य या सिनेमांतील रोमी (पत्रकार), वेक अप सिद मधली आयेशा (लेखक), पिकू मधील पिकू (आर्किटेक्ट), तुम्हारी सुलू मधील सुलू (रेडिओ जॉकी) अशा अनेक भूमिकांनी स्त्री पात्रांना त्यांची योग्य ओळख दिली. ही सर्व पात्रे महत्वाकांक्षी आहेत, आपल्या करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी मेहेनत करत आहेत, आयुष्यातील पुरुषांप्रमाणेच त्यांचे आपल्या व्यवसायावर प्रेम आहे.  संसार आणि  कारकीर्द या  दोन्ही गोष्टी त्यांनी स्वतंत्र ठेवल्या आहेत.
अनुराधा हा सिनेमा आजच्या काळात प्रदर्शित करावा लागला तर तो कसा असेल ! ह्यातली पुरुष पात्रे कशी वागतील! स्त्रीचे यशस्वी होणे , तिचे त्यांच्याशिवाय असलेले स्वतंत्र विश्व त्यांना मान्य होईल का ? पत्नीने मिळवलेल्या  यशात त्यांचा काही हातभार असेल का ह्या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर “ तुम्हारी सुलु “ हा सिनेमा देतो.

अभिमान आणि अनुराधा ह्या सिनेमांसारखा “ तुम्हारी सुलु “ हा तेवढा  दर्जेदार सिनेमा नाही. बदलत्या समाजमनाला जाणून घेण्याचा, प्रसंगी त्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा मात्र हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
सिनेमाची सर्व पात्रे सामान्य स्तरातील आहेत. आपल्या स्तराची त्यांना कल्पना आहे, स्वतः मधील उणिवा सुद्धा त्यांना माहिती आहेत. त्यावर मात करून पुढे जाण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे.
आपल्या आजूबाजूला दिसणारी माणसे आहेत ही. धडपड करून पुढे जाण्याचा प्रयत्न करणारी पण सर्वसामान्य आयुष्य असणारी माणसे. समाजाचा विकास तर अशाच लोकांमुळे होत असतो. हा सिनेमा म्हणूनच सर्व समावेशक आहे.

कनिष्ठ मध्यम वर्गीय घरातील एका सामान्य गृहिणीची , सुलोचनाची, ही कथा. तिचे छोटेसे कुटुंब आहे. नोकरी करणारा नवरा आणि चांगल्या शाळेत शिकणारा मुलगा. पगार कमी असेल पण मुलाला चांगले ते द्यावे ह्यासाठी त्या दोघांची धडपड करण्याची तयारी आहे. विरार मध्ये त्यांचे छोटेसे घर आहे.
तिच्या बहिणी बँकेत नोकरी करतात. त्यांची सांपत्तिक स्थिती हिच्याहून चांगली आहे. ते दाखवण्याची संधी त्या सोडत नाहीत. ती बारावीला नापास झाली , तेही दोनदा हे सुद्धा त्या सतत सांगतात . अर्थात त्या दुष्ट नाहीत. तिच्या मदतीला धावून येतात पण कनिष्ठ असणाऱ्या माणसाला नकळत का होईना त्याची जागा दाखवून देणे ही मानवी प्रवृत्ती आहे. त्या अपवाद नाहीत.
सुलोचना उर्फ सुलुला त्यांचा राग नाही पण तिलाही काहीतरी बनायचे आहे. सगळ्याच काही हुशार नसतात पण म्हणून काय झाले!
या समाजात माझी स्वतंत्र ओळख असावी ही आकांक्षा असतेच. सुलु ती लपवत नाही.
टॅक्सी चालवणे , डबे पोचवणे अशा अनेक कल्पना तिच्या मनात येतात.
अर्थात त्या साठी कुटुंबाकडे दुर्लक्ष करायची तिची इच्छा नाही पण तिच्या आयुष्यात त्यांच्या एवढेच तिच्या महत्वाकांक्षेला स्थान आहे.
एका स्पर्धेत तिला बक्षीस मिळते. ते घेण्यासाठी ती रेडिओ स्टेशनवर जाते. तिथेच रेडिओ जॉकीच्या पदासाठी मुलाखत देते आणि तिची निवड सुद्धा होते. खरेतर ह्याचा तिला काहीही अनुभव नसतो.  साडी नेसणारी,  मध्यमवयीन काकू ची प्रतिमा असूनही तिची निवड होते कारण तिच्याठायी असलेला आत्मविश्वास. लहानपणापासून तिची चेष्ठाच होत असल्याने अहंकाराचा मागमूस सुद्धा तिच्या व्यक्तिमत्वात नसतो . हाही फायदाच.
ती आवडीने हे काम शिकून घेते. कुणालाही शंका विचारण्यात किंवा त्यांच्या सूचना ऐकण्यात तिला कमीपणा वाटत नाही. आपला आवाज सेक्सी आहे याची जाणीव सुद्धा तिला इथे होते आणि त्याचा योग्य वापर करून ती या कार्यक्रमाला सामोरी जाते.
हा रात्रीचा कार्यक्रम आणि तोही लाईव्ह. त्यात थकल्या भागल्या लोकांना थोडा आनंद मिळावा हे या कामाचे स्वरूप . अनोळखी व्यक्तीशी बोलायचे , थोडी मस्करी , थोडा जिव्हाळा ..
हा पहिलाच प्रोग्राम  एवढा यशस्वी होतो की रेडिओ स्टेशनवर २०० कॉल्स येतात.
सुलुचे हे विशेष असते की ती कुठल्याच माणसाबद्दल पूर्व ग्रह ठेवत नाही. केवळ स्त्री म्हणून तिची मस्करी करणारे जे कॉल असतात त्यांना ती न रागावता, न गोंधळता, न घाबरता, पण ठामपणे हाताळते आणि जे खरंच भावनिक असतात त्यांच्याशी संवेदनशील राहून संवाद साधते.

सुलूचे वेगळेपण ह्यात आहे की ती स्वतःला विजेता समजते. मग ते रेडिओ आयोजित स्पर्धेत प्रेशर कुकर जिंकणे असो की चमचा लिंबू परीक्षेत , लिंबू न सांडता दुसरे येणे असो. आयुष्य ही स्पर्धा आहे आणि जिंकणे न जिंकणे सोडा पण त्यात भाग घ्यायला हवाच अशी तिची जिद्द आहे. बहिणींच्या यशाच्या तुलनेत आपण मागे पडलो याचा मत्सर नाही पण खंत आहे आणि कुठेतरी आपण आपले नाव कमावले पाहिजे ही जाणीव आहे.
ही सुलूची लढाई असेल तरी यात तिचा नवरा तिच्या बरोबरीने उभा आहे. त्याच्या छोट्याश्या घराच्या पाटीवर सुद्धा दोघांचे नाव आहे. “ Mr and Mrs Ashok “
तिच्या अनेक व्यवसाय करण्याच्या कल्पनांना तो दाद देतो. खरेतर त्या यशस्वी होतीलच याची त्याला खात्री नाही आणि अनुभव सुद्धा फार चांगला नाही तरी तिची हेटाळणी मात्र तो करत नाही, उलट त्यात स्वतःच्या कल्पनांची भर घालतो. तो एका तयार कपड्यांच्या कारखान्यात काम करतो. इथे असणारे सर्व कर्मचारी वयस्क आहेत. त्यांना हाताळणे अतिशय दमछाक करणारे आहे. त्याचा बॉस सुद्धा उर्मट आहे. पुरुष अनेकदा कामाचा राग घरी काढतात. किशोर मात्र तसा नाही. दमलेल्या बायकोचे तो पाय चेपून देतो, ती चिडली की तिची समजूत काढतो , कधीतरी वैतागतो आणि लगेच सॉरी म्हणतो.
अनपेक्षितरित्या यश मिळवलेल्या बायकोचा त्याला अभिमान आहे पण थोडासा असुरक्षित सुद्धा होतो . बायकोच्या काळजीने, पहिल्या दिवशी तिच्या ऑफिसला जातो. तिला ऑफिसमध्ये नेण्यासाठी आणि परत आणण्यासाठी गाडी आहे हे समजल्यावर निश्चिंत होतो . .
भले काही प्रसंगी त्याला राग येत असेल , क्वचित नको ते शब्द बाहेर पडत असतीलही पण बायकोच्या यशाचा त्याला अभिमान आहे. प्रसंगी घरची जबाबदारी घेण्याची तयारी आहे,  दोघांनी मिळून या संसाराचा गाडा चालवायचा आहे त्याची जाणीव आहे  आणि तिच्या कामाबद्दल कृतज्ञता सुद्धा आहे .
सिनेमा आणि त्यातील पात्रांचा फोकस कुटूंबावर असला तरी या कुटुंबातील सर्वच माणसांना एकमेकांच्या प्रगतीची आस्था आहे हे फार विशेष आहे.
कथानकात अनेक पात्रे येतात. सुलूच्या इमारतीत पहाटे घरी  येणाऱ्या एअर होस्टेस आहेत, तिच्या दोन्ही बहिणी बँकेत मोठ्या पदावर कार्यरत आहेत, तिच्या रेडिओ स्टेशनची मुख्य,  घरी पोचवणारी  टॅक्सी ड्रायव्हर, इतकेच काय तर तिच्या घराजवळील जिम ची मालकीण ही सर्व स्त्री पात्रे आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिच्या यशात त्यांचा सहभाग आहे.
१९६० मध्ये प्रदर्शित झालेला “अनुराधा” ते २०१७ मधील “तुम्हारी सुलु” हा प्रवास खरंच अत्यंत आनंददायी आहे.
to be continued .


4 thoughts on “संसार का कारकीर्द .. बदलत्या स्त्रीची दुविधा:”

  1. प्रिया,
    💐💐💐
    अनुराधा,अभिमान आणि तुम्हारी सुलू

    किती अप्रतिम निवड..
    तिन्ही आवडलेले चित्रपट.
    एक वेगळा च आयाम दिलास..
    आज अनुराधा, अभिमान असेच दाखवले असते का?
    नक्की च वेगळा शेवट बघावासा वाटला.

    1. Thank you Vidula .
      हो , निदान अनुराधाचा शेवट
      अभिमान सिनेमात अमिताभ ने जया चा स्वतंत्र शो ठेवणे

  2. भावना ओतून लिहिलंयस प्रिया. एखाद्या कलासक्त स्त्रीचं मन पूर्ण जाणून घेत प्रत्येक शब्द लिहिलायस. महत्वाकांक्षा नसणं हा अडसर असतोच हे नक्की खरं. तुम्हारी सुलू मध्ये तिला करेक्ट ती महत्वाकांक्षा असते. मैं करेगी हा आत्मविश्वास असतो आणि अर्थात काळ पुढचा त्यामुळे नवराही समजूतदार असतो.
    अनुराधाचा शेवट ती अंगण झाडताना दाखवणं हीच वस्तुस्थिती. ती गातेय आणि तो रमलाय हे आपलं स्वप्न. तिचं समर्पण म्हणूया किंवा मन मारणं म्हणूया त्या कृतीत पूर्ण होतं. नाहीतर ते प्रचारकी झालं असतं.
    आवडला लेख.

    1. Thank you Shalmali.
      अशा अनेक स्त्रिया पहिल्या आहेत. बँकेत मोठ्या हुद्यावर काम करणाऱ्या , आणि घरात घाबरून असणाऱ्या, कलेचे दार कायमचे बंद करणाऱ्या , प्रमोशन नाकारणाऱ्या
      वरती हसतमुख असणाऱ्या या स्त्रियांच्या मनात काय दडलेले असते हे त्या जाणे.
      आता संसार टिकण्यासाठी तरी पुरुष बॅकफूटवर जातोय ते ही बरोबर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *