Skip to content

हिंदी सिनेसृष्टीतील स्त्री पात्रांचे आर्थिक सबलीकरण:

भाग १
अमरज्योती, मदर इंडिया आणि नवकेतन च्या नायिका.

भारतीय समाजात कन्या, पत्नी आणि  माता या तीनही स्वरूपात स्त्रीची  पूजा केली जाते खरी पण तिला तिच्या स्वतंत्र अस्तित्वामुळे पुजले जाते की तिला या भूमिकेत जगण्याची संधी मिळवून देणाऱ्या पुरुषामुळे पुजले जाते हा चिंतनाचा विषय आहे.  पित्याच्या नावाशिवाय जन्माला आलेली कन्या, लग्नबंधनाशिवाय पुरुषाजवळ राहणारी स्त्री आणि पित्याचे नाव आपल्या अपत्याला देऊ न शकणारी माता यांच्या भूमिका आणि कर्तव्ये सारखी असताना केवळ पुरुषाच्या नावाची जोड नाही किंवा साथ नाही म्ह्णून तिला अपमानित व्हावे लागते हा इतिहास आहे.  या समाजात स्त्रीचे नक्की स्थान काय आहे, त्याही पेक्षा ते कुणामुळे आहे? हे प्रश्न अतिशय अवघड आणि तरीही बदलत्या समाजरचनेत, त्याहीपेक्षा बदललेल्या मनोवृत्तीसाठी अतिशय महत्वाचे आहेत.
आपल्या संस्कृतीत स्त्रीला नदीची उपमा दिली जाते. नदी जसं आपले अस्तित्व विसरून सागरामध्ये विलीन होते तसे तिने आपल्या पुरुषाला समर्पित असावे ह्या अर्थाने ही उपमा वापरली जाते. नदीला असंख्य झरे, ओहोळ येऊन मिळतात. ती सर्वसमावेशक असते. ज्या भूभागातून ती वाहत जाते ती जमीन संपन्न करते. स्त्रीचा सुद्धा हा स्वभावविशेष आहेच , तो मात्र अनेकवेळा दुर्लक्षित ठेवला जातो. साहित्य आणि  सिनेमा सुद्धा त्याला अपवाद नाहीत.
.सिनेमाला शंभरहून जास्त वर्षे होऊन गेली. मुख्य भूमिका नायक आणि नायिका असे लिहिले जाते पण समाजासारखीच फिल्म इंडस्ट्री सुद्धा नायक प्रधान आहे. भूमिकेची व्याप्ती असो किंवा मानधन, पुरुषांना नेहेमीच झुकते माप या संस्कृतीने दिले आहे. हिंदी सिनेमातील स्त्रियांच्या भूमिका या  समाजाच्या मनातील आदर्श स्त्रीचे प्रतिबिंब आहेत.
स्त्रीचा आत्मसन्मान, तिची इज्जत, तिला मिळणारे प्रेम, आदर या बरोबर तिचे “आर्थिक सबलीकरण” सुद्धा फार महत्वाचे आहे पण यावर फार भाष्य सिनेमाच्या कथांत आलेले नाही.
काही मोजक्याच सिनेमात आपल्या पायावर उभी असणारी स्त्री आहे. तिने तिचे निर्णय घेतले आहेत. त्याचे परिणाम सुद्धा झेलले आहेत.
महिला दिनानिमित्त अशा काही महत्वाच्या पात्रांवर  लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.
स्त्री स्वातंत्र्य म्हंटले की लोकांना एकविसावे शतक आठवते पण १९३६ मध्ये प्रदर्शित झालेला अमरज्योती हा सिनेमा या समजुतीला तडा जाणारा आहे.
अमरज्योती ( १९३६)
सौ
दामिनी -दुर्गा खोटे

सुरुवातीचा सिनेमा पौराणिक, ऐतिहासिक कथांवर आधारभूत होता.यातील स्त्रीपात्रे सुद्धा पूर्वीच्या स्त्रियांप्रमाणे संसारात गुंतलेली होती. अशा काळात “अमरज्योती “ हा सिनेमा प्रदर्शित झाला.
ही कथा एका स्त्री चाच्याची ( A woman pirate) सौदामिनीची. 

सिनेमाची सुरुवात होते एका खवळलेल्या समुद्रातून प्रवास करणाऱ्या बोटीच्या दृश्यांनी. हे साधेसुधे जहाज नाही बरे. हे समुद्री चाच्यांचे जहाज आहे. याची कप्तान एक स्त्री आहे. नावही साजेसे “सौदामिनी “ तिच्याशी प्रामाणिक असणारे तिचे सहकारी आणि एक छोटी मुलगी यांचे या बोटीवर वास्तव्य आहे. सौदामिनीची नजर एका जहाजावर  पडते. ती आपल्या माणसांना हल्ला करण्याचा हुकूम देते. जहाजाला वाचवायचा प्रयत्न सैनिक  करतात पण पकडले जातात. त्याच्या बोलण्यातून सौदामिनीला समजते की ही बोट सुवर्णदीप या राज्याची आहे आणि त्या राज्याची राजकुमारी सुद्धा या जहाजातून प्रवास करत आहे. सौदामिनीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते. या राजकुमाराला पकडून आणण्याचा आदेश ती आपल्या सहकाऱ्यांना देते पण राजकुमारी काही सापडत नाही. चिडून सौदामिनी जहाजाला आग लावण्याचा हुकूम देते.
डोळ्यासमोर मृत्यू दिसत असताना सुद्धा काही सैनिक सौदामिनीला सामील होण्याचे नाकारतात. सौदामिनी त्यांना जहाजावरुन समुद्रात फेकून देते. राजकन्येशी एकनिष्ठ असणाऱ्या तिच्या दासींचा सुद्धा तोच अंत होतो . जहाजावर असणारे गुलाम आपल्या प्राणांची भीक मागतात.
“ तुम्ही, तुमच्या आणि इतरांच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास तयार आहात का “ सौदामिनी विचारते.
“ हो. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही लढू “
सौदामिनी, त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घेते.

जहाजावर असणारी तिची छोटी सहकारी विचारते., “ जर हे सैनिक सुखरूप किनाऱ्याला पोचले आणि त्यांनी सुवर्णदीपच्या राणीला सर्व घटना सांगितली तर काय होईल?”
सौदामिनीच्या चेहेऱ्यावर आता एक गूढ हास्य पसरते.
“ राणीला समजेल की पोटचा गोळा हरवल्याचे दुःख काय असते ते. सूड सुद्धा फार मधुर असतो तो असा “
तिच्या सहकार्याचे, शेखरचे,  मत मात्र वेगळे असते.
“राजकुमारी च्या मृत्यूने, तुझा आनंद कसा परत मिळणार सौदामिनी? घटनेचा सूड हे वैयक्तिक कारण, क्रांतीची सुरुवात असू शकत नाही. त्याचा परीघ छोटा असतो.
सौदामिनी हसते.
“ काही घटनांना मूठमाती दिल्यावरच, क्रांतीचा सूर्य उगवतो. “ शेखर हळवा झाला आहे हे तिला आवडत नाही.
“ तू कितीही बलवान असशील तरी तुझ्यात सुद्धा एक स्त्री दडलेली आहे “ शेखरचे हे मत उडवून लावताना ती म्हणते,
“ आतापर्यंत स्त्रीच्या हळव्या स्वभावाचा फायदा घेऊनच तिला गुलाम बनवले गेले आहे. आता मी , तुझ्याच मुलीच्या साहाय्याने हे बदलून टाकणार आहे.”

कोण असते ही सौदामिनी? असे काय घडले असते तिच्या आयुष्यात की एका निर्दोष मुलीचा खून करताना तिचे काळीज हलत सुद्धा नाही ? मनाला पाझर फुटत नाही?
फार फार पूर्वी सौदामिनी एक सामान्य स्त्री असते. प्रेमळ, हसरी, स्वतःच्या मुलावर जीवापाड प्रेम करणारी आई.  संसाराचे प्रेम असते. एक आदर्श स्त्री म्हणून जगण्याचा प्रयत्न ती सुद्धा करतेच.
आदर्श स्त्री याचा नेमका अर्थ काय ? स्वतःवर अन्याय करून दुसऱ्यांच्या मर्जीने जगणे? स्वतःचे अस्तित्व विसरणे ?
पतीच्या त्रासाला कंटाळून जेव्हा ती विभक्त होण्याचा निर्णय घेते तेव्हा मात्र पितृसत्ताक समाज तिच्या विरुद्ध जातो.
तिच्याकडून तिच्या मुलाला हिसकावून घेतले जाते. सुवर्णदीप राज्याची  शासक, एक राणी , एक स्त्री असूनही हे घडते.
स्त्रीचा सन्मान, जेव्हा स्त्री कडूनच नाकारला जातो, तेव्हा सौदामिनी खवळते.
स्वतःच्या  हक्कांसाठी उभी राहते.
जो मार्ग दिसेल तो पकडते. भले तो समुद्री लुटारूंचा का असेना. ती चाच्यांच्या टोळीचे नेतृत्व करते.
मनातील स्त्रीसुलभ भावनांना दडपून टाकते. सूड हा तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होतो. राजकुमारीचा मृत्यू ही केवळ त्या यज्ञातील एक समिधा असते.
इथे जहाजावरुन सुटलेला एक सैनिक, राजकुमारीच्या मृत्यूची बातमी , राणीच्या कानावर घालतो. संताप आणि दुःखाने वेडीपिशी झालेली राणी सौदामिनीला पकडण्याचा हुकूम देते.

सौदामिनी (दुर्गा खोटे) ,स्वतःवरचा अन्याय, प्रतिकूल  परिस्थितीत सहन करत नाहीच  पण तिचा राग ती समाजाची धारणा बदलण्यास वापरते. स्वातंत्र्य आणि  समानता यासाठी ती लढते.
तिचे दुःख तिच्यापुरते मर्यादित नाही.तिचा संताप म्हणजे केवळ अन्यायाचा बदला नाही. आगीतून निसटलेली राजकन्या, नंदिनी, तिच्या विचारांमुळे भारावून जाऊन तिला सामील होते आणि एका क्रांतीची बीजे रोवली जातात.
सौदामिनीचा आत्मविश्वास,कार्य सिद्ध करण्यासाठी तिने केलेले प्रयत्न, संतापाला कुठेही जागा न देता, डोके थंड ठेवून मिळवलेली सरशी हे खरंच प्रेक्षणीयच नाही तर विचार करायला भाग  पाडणारे आहे.
समुद्री चाचे हा व्यवसाय मानायचा का ?
नैतिक नजरेतून नाहीच पण ह्यात सौदामिनी ही जहाजाची कप्तान आहे. ह्याची “आर्थिक सूत्रे “ तिच्या हातात आहे हे मला फार विशेष वाटते.
खलनायक हा सहसा पुरुष असतो. त्याच्या महिला साथीदार फक्त रिझवण्याचे काम करतात. अमरज्योती वेगळा होता.
संविधान जेव्हा लिहिले गेले , तेव्हा स्त्री आणि पुरुषांच्या समान हक्क आणि अधिकारांना प्राधान्य दिले गेले. नको असलेल्या नात्यापासून विभक्त होण्याचा अधिकार स्त्रीला मिळाला. दत्तक घेण्याचा अधिकार आणि मुलाचा ताबा मिळवण्याचा अधिकार तिला संविधानाने मिळवून दिला.
१९५० नंतर हे साध्य झाले.
अमरज्योती हा १९३६ मधेच प्रदर्शित झालेला सिनेमा आहे हे लक्षात घेतले तर हा सिनेमा, स्त्री स्वातंत्र्याकडे टाकलेले पहिले पाऊल असे म्हणता येईल.
व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय सिनेमा होता. 

जरा मागे जायचे तर अंदाज, आवारा, देवदास, श्री 420, बंदिनी, प्यासा या  सिनेमात सुद्धा सशक्त स्त्री भूमिका  होत्या पण त्या  नायकाची  सहचारिणी म्हणून होत्या.  नायक  पळून  गेला तरी कोणत्याही  परिस्थितीत, कुणालाही शरण न जाता, स्वतःच्या कर्माने स्वतःची “उन्नती” घडवणारी  स्त्री  “मदर इंडिया “ या  सिनेमात नर्गिसने रंगवली.
मदर इंडिया ( १९५७)
राधा –नर्गिस

गावातील सावकार, कागदपत्रांवर एका अशिक्षित, खेडवळ स्त्रीचा अंगठा घेतो. ज्यात लिहिलेले असते, शेतातील उत्पनाचा ३/४ भाग हा घेतलेल्या कर्जाचे, व्याज म्हणून सावकाराला दिला जाईल. त्या अशिक्षित स्त्रीला वाटते की सावकाराचा भाग केवळ १/४ एवढाच असेल.  ह्या गैरसमजाचे फलित एवढेच की , ती खेडवळ बाई, तिचा मुलगा शामू, त्याची बायको राधा हे कर्जाच्या दलदलीत रुतले जातात. पिढयांपिढ्या चालणाऱ्या या कर्जातून त्यांना मुक्ती नसते.
ओसाड जमीन कसताना अपघातात शामूचे हात चिरडले जातात. संसाराचे गाडा आता हाकायचा कसा! मन खचते आणि जबाबदारी न पेलवल्याने शामू परागंदा होतो. संसार आणि तीन मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी राधावर येते.

राधा प्रेमळ पत्नी आहे, मायाळू आई आहे , आज्ञाधारक सून आहे पण हिंदी सिनेमात सहसा न दिसणारी , संसारासाठी केवळ घरातच नाही तर शेतावर  काम करणारी शेतकरीण सुद्धा आहे. घरच्या आणि शेतीच्या कामात तिचा सहभाग आहे. ती केवळ नवऱ्याला भाकर घेऊन जात नाही तर बरोबरीने शेतात खपते. शेतीचे तिला ज्ञान आहे , त्यामुळे त्यामुळे नवरा परागंदा झाल्यावर सुद्धा ती माघार घेत नाही. . सावकाराने बैल नेल्यानंतर सुद्धा नांगर खांद्यावर घेऊन स्वतःचे शेत नांगरणारी राधा,  स्त्री कर्तृत्वाचे आणि आर्थिक सबलीकरणाचे, प्रतीक आहे.

शहरातील नोकरी करून पैसे कमावणारी सुशिक्षित स्त्री आणि  स्वतःचे शेत, स्वतःच्या परिश्रमाने फुलवून पुरुष सत्तेचे वर्चस्व धुडकावून लावणारी अशिक्षित स्त्री ह्या दोहोंतील फरक मदर इंडिया या सिनेमाने नष्ट केला हे या सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. 
दिग्दर्शक मेहबूब ह्यांचा हा सिनेमा एका पुस्तकाला उत्तर होते.
पाश्चात्य जगात भारतीय स्त्रीची प्रतिमा वेगळी आहे. कॅथेरीन मेयो आपल्या मदर इंडिया या पुस्तकात लिहितात, “अशिक्षित पण आणि पदर किंवा परदा यामुळे स्त्रिया पुरुषांवर अवलंबून आहेत. त्यांची परिस्थिती एका जनावराहून वेगळी नाही. त्यांना त्यांचे मत मांडायची ताकद नाही, त्यांची योग्यता नाही , त्या केवळ पुरुषांच्या गुलाम आहेत”
मेहबूब यांनी हे मत आपल्या चित्रपटातून खोडले.

राधा अशिक्षित आहे ..हो आहे. ती डोक्यावर पदर घेते ..ती तिची संस्कृती आहे.
मात्र तिला तिचे मत आहे. जी जमीन ओसाड आहे तिच्यातूनच आपण पीक घेऊन कर्ज फेडू हा आत्मविश्वास ती शामूच्या मनात जागवते. हा तिचा निर्णय आहे. ती आणि नंतर तिची सून, दोघेही शेतात काम करायला सक्षम आहेत. ती तिच्या नवऱ्याची गुलाम नाहीच पण ती सावकार आणि नंतर वाईट मार्गाला लागलेल्या तिच्या स्वतःच्या मुलाला सुद्धा पुरून उरते.
स्वतःचा आणि स्त्रियांचा आत्म सन्मान जपणे यासाठी स्वतःच्या मुलावर गोळी चालवायला सुद्धा ती कचरत नाही. नवर्याच्या पश्चात ती घराचा कर्ता बनतेच आणि शेवटी गावाचा कर्ता म्हणून तिला सन्मान मिळतो . 

राधा गरीब आहे पण सदाचारी आहे, निराधार आहे पण निश्चयी आहे , त्यागमूर्ती आहे पण कणखर आहे. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग  काढताना स्वप्ने पाहण्याएवढी आशावादी आहे. गावातील सावकार, सुखीलालचा  तिच्यावर डोळा आहे. त्याच्याशी संबंध ठेवून स्वतःचं  आयुष्य सुखी करणे तिला सहज शक्य आहे पण तिला तिच्या चारित्र्याचा सार्थ अभिमान आहे. भोगाव्या लागणाऱ्या परिणामांची क्षिती न बाळगता, ती सत्याचा आणि सत्वाचा मार्ग स्विकारते.
सिनेमाच्या शेवटी, राधाचा मुलगा, बिरजू,  सावकाराच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मूल्यांवर अटळ असलेली राधा, मुलाला विरोध करते. तो जेव्हा घोड्यावरून पळून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा जीवही घेते.
शोषितांच्या या कठीण संघर्षात, आपले चारित्र्य  आणि कर्तव्य यावर अढळ राहणाऱ्या एका सामान्य गृहिणीचा” प्रगतीकडे “जाणारा हा प्रवास अत्यंत  प्रेरणादायी आहे.

दुनिया में हम आये हैं तो जीना ही पड़ेगा
जीवन है अगर ज़हर तो पीना ही पड़ेगा
एकदा का या जगात प्रवेश झाला की स्वतःच्या मर्जीने हे जग सोडता येणं अशक्य.  तो पळपुटेपणा आहे. येणाऱ्या अडचणींना तोंड देत जगणं हे राधाच्या आयुष्याचे सार आहे.

काही बॅनर्सने  आपल्या सिनेमात सातत्याने सुशिक्षित, प्रगल्भ आणि करिअर करणारी नायिका दाखवली. केवळ नाचगाणे , पुरुषाला रिझवणे आणि त्याच्यावर अवलंबून राहणे या पलीकडची नायिका होती ती.
देव आनंदच्या नवकेतन बॅनर्सच्या सिनेमातील नायिका अशा स्वतंत्र आहेत.
देव आनंदचे सिनेमा हे सुरुवातीला तरी फक्त त्याच्यासाठी पाहिले गेले. त्याचा करिष्मा तसा होताच. नंतर लक्षात आले की त्याच्या सिनेमाचे विषय, मांडणी फार वेगळी आहे. त्याचा सिनेमा हा शहरी सिनेमा होता. अनेक सिनेमात त्याला कुटुंब नव्हते किंवा असले तरी त्याच्या निर्णयात किंवा आयुष्यात त्यांचा हस्तक्षेप नव्हता. त्याने रंगवलेली पात्रे सुद्धा सुशिक्षित. मूलतः सभ्य तरीही सदोष. करड्या रंगांच्या छटा असणारी म्हणून मानवी.  त्याच्या नायिका सुद्धा केवळ कचकड्याच्या बाहुल्या म्हणून पडद्यावर झळकल्या नाहीत. नायकाचा विवेक जागृत करणे , त्याच्या पडत्या काळात त्याला धीर देणे हे नायिकेकडून अपेक्षित असलेले काम त्यांनी केलेच पण त्यांची पडद्यावरची प्रतिमा याच्याही पलीकडली होती. त्या स्वतःही खंबीर आणि आर्थिक दृष्ट्या  स्वतंत्र होत्या. 
पन्नास, साठीच्या दशकात किती नायिकांनी पडद्यावर करिअर असणाऱ्या स्त्रीची भूमिका केली ? वास्तवात तरी अशा स्त्रियांचे प्रमाण किती असेल ?नवकेतनच्या नायिका सुंदर, चारित्र्यवान तर होत्याच पण सुशिक्षित,  नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या होत्या.

कालापानी (१९५८ )
आशा -मधुबाला

कालापानी मधली  आशा (मधुबाला) ही  पत्रकार आहे. कामात हुशार आहे, विचाराने स्वतंत्र आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची कुवत आहे. नायकाबद्दल वाटणारे प्रेम ती उघड सांगतेच पण  त्याच्या चारित्र्याचा संशय येतो तेव्हा  त्याचे  स्पष्टीकरण ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवते. मुळात ती विचार करते. तिचे स्वतःचे गेस्ट हाऊस आहे जिथे नायक राहतो.
खलनायकाच्या काळ्या कृत्याची माहिती ती आपल्या वर्तमान पत्रात छापून आणते , तेवढी धाडसी ती आहे.
नवकेतनच्या नायिका चित्रपटात प्रत्यक्ष काम करताना दाखवल्या आहेत. ओझरता उल्लेख नाही तर त्यांच्या कामाला पटकथेत महत्व आहे.

बाजी (१९५१)
रजनी -कल्पना कार्तिक

बाजी सिनेमाची नायिका डॉक्टर आहे. गरीब लोकांसाठी तिने दवाखाना सुरु केला आहे. सिनेमाचा नायक सुद्धा याच वस्तीत राहतो. त्याच्या आजारी बहिणीला वाचवल्यामुळे नायक,  नायिकेच्या प्रेमात पडतो.  नायिका धर्मादाय दवाखाना चालवत असली तरी ती स्वतः श्रीमंत कुटूंबातील मुलगी आहे. तिचे वडील मोठे उद्योगपती आहेत. तिच्यावर प्रेम करणारा सह नायक पोलीस ऑफिसर आहे. पूर्ण विचार करून  ती नायकाबरोबर उभी तर राहतेच पण जेव्हा त्याच्यावर खुनाचा आरोप येतो तेव्हाही त्याला वाचवण्यात तिचा वाटा आहे.

“हम दोनो” या सिनेमात देव जेव्हा स्वतःच्या आर्थिक परिस्थितीमुळे या नात्याबद्दल साशंक होतो तेव्हा मीता (साधना)  त्याला सांगते, मी माणसाशी लग्न करतेय,  त्याच्या पगाराशी नाही. प्रसंगी वडिलांशी पंगा घेण्याची तिची तयारी आहे आणि जगाशी सामना करण्याची सुद्धा.
गाईडची रोझी  नर्तिका आहे. करिअरसाठी, नृत्याच्या प्रेमासाठी रोझी (वहिदा रेहमान)नवऱ्याला सोडते. नंतर त्या पेशात यश मिळवते. पैसे मिळवते आणि प्रियकराचा खोटेपणा उघडकीला आल्यावर त्यालाही सोडून जाण्याचा निर्णय घेते. हे करू शकते कारण तिच्याकडे आर्थिक क्षमता आहे.

शिक्षणामुळे आलेली विचार करण्याची क्षमता नी आर्थिक स्वातंत्र्य या दोन गोष्टी इथे ठळक दिसतात. अगदी प्रेम होताना सुद्धा ते पहिल्या नजरेतील नवथर प्रेम नाही. एकमेकांना जाणल्यावर, मैत्री झाल्यावर, त्याचे आदरात रुपान्तर झाल्यावर त्यांची वाटचाल प्रेमाकडे सुरु झाली आहे.
. त्यांना स्वतःचे जग आहे म्हणून नायकाच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची ताकद आहे. प्रसंगी त्याला सोडून स्वतःचे आयुष्य घडवण्याची हिंमतच नाही तर त्यांच्याकडे क्षमता आहे.

नवकेतन बॅनरची नायिका केवळ आई, बहीण नी पत्नी म्हणून मर्यादित राहिली नाही. या सर्वांच्या पलीकडे जाऊन तिने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व जोपासले. त्यांच्यावर संकटे आली, अन्याय झाला , काही फासेही उलटे पडले , निर्णय चुकले तरीही आपल्या नशिबाला दोष न देता, नायकावर जबाबदारी न ढकलता त्यांनी आपला मार्ग शोधला.. आताच्या सिनेमात सुद्धा हे फार दुर्मिळ आहे.
To be continued 

7 thoughts on “हिंदी सिनेसृष्टीतील स्त्री पात्रांचे आर्थिक सबलीकरण:”

  1. प्रिया,
    आर्थिक दृष्टया सबल स्त्रिया.वेगळा विषय.
    दुर्गा खोटे यांचा सिनेमा किती जुना..

    तुझ्यामुळे वेगळा च अँगल कळाला.
    नेहेमीप्रमाणे च उत्तम लेख.❤️❤️

    1. Priya Prabhudesai

      Thanks विदुला. हा सिनेमा नक्की बघ.
      थोडा जुना वाटेल पण प्रिंट चांगली आहे आणि अर्थात दुर्गा खोटे..त्यांनी अप्रतीम काम केलं आहे.

    2. Thanks विदुला. हा सिनेमा नक्की बघ.
      थोडा जुना वाटेल पण प्रिंट चांगली आहे आणि अर्थात दुर्गा खोटे..त्यांनी अप्रतीम काम केलं आहे.

  2. Priya Prabhudesai

    Thanks विदुला. हा सिनेमा नक्की बघ.
    थोडा जुना वाटेल पण प्रिंट चांगली आहे आणि अर्थात दुर्गा खोटे..त्यांनी अप्रतीम काम केलं आहे.

  3. खूप सुंदर लेख. तुझ्या मुळे या वेगळ्या वाटा चोखाळणार्या नायिकांचा वेगळ्या ऍंगलने परिचय झाला.

    1. Yes , Dipti ,
      हो , मला लिहिताना ते जाणवले की काही सिनेमातील पात्रे फार वेगळी आहेत ..हटके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *