Skip to content

Happy Valentine. Best scenes.


भाग ५
“miracles can happen.”अ वॉक टू रिमेम्बर ( A walk to remember)
————————————————————————————–
चांगली, सज्जन, साधी मुलगी आणि उर्मट, असंवेदनशील, काहीसा हट्टी मुलगा. दोघांच्यात नावालाही साम्य नाही. दोघे भेटतात आणि प्रेमाचा दूत क्युपिड आपले काम करतो.  वयात येणाऱ्या मुलांच्या प्रेमाच्या गोष्टी अशाच तर असतात.
“A walk to remember” काही अपवाद नाही.
फक्त दोन मुलांच्या प्रेमापुरती ही कथा संकुचित नाही. This is a coming of age story.
एका वयात येणाऱ्या मुलाचा, पुरुष बनण्याकडे होणारा प्रवास, अपरिपक्वतेपासून प्रगल्भतेकडे होणारा प्रवास म्हणजे
A walk to remember हा सिनेमा.

नॉर्थ कॅरोलिना मध्ये राहण्याऱ्या लोकप्रिय आणि बंडखोर लँडन  कार्टरकडून एक मोठी चूक होते. शाळेच्या मैदानावर दारू प्यायची परवानगी नसताना, तो आणि त्याचे मित्र दारू पिताना पकडले जातात आणि त्याच वेळी, एका मुलाची मस्करी करताना , तो मुलगा जबर जखमी होतो. “. एकतर, तुला शाळेतून काढून टाकले जाईल. तसे नको असेल तर साफसफाई करणाऱ्या सेवक वर्गाला तुला मदत करावी लागेल, अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना शिकवावे लागेल आणि शाळेच्या नाटकात भाग घ्यावा लागेल.” शाळेचे मुख्याध्यापक त्याच्यापुढे दोन पर्याय ठेवतात.

पहिला पर्याय घेऊन,  आयुष्याची माती न करण्याएवढा लँडन शहाणा असतो. मनात नसूनही तो आपली शिक्षा भोगायला सुरुवात करतो . याच वेळी त्याची ओळख  जेमी सलीवन या मुलीशी होते. तिचे वडील येथील छोट्याश्या चर्च मध्ये मिनिस्टर असतात. अत्यंत मध्यमवर्गीय आणि धार्मिक वातावरणात वाढलेली ही आई वेगळी मुलगी खूप साधी असते. लँडनच्या इतर मैत्रिणीहून वेगळी. मोजके कपडे, एकच स्वेटर, चेहेऱ्यावर मेकअपचा गंध नसलेली आणि शाळेच्या पुस्तकांबरोबर बायबल आणणारी ही मुलगी लँडन आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या चेष्टेचा विषय असते.

नाटकातले संवाद लक्षात ठेवण्यासाठी जेमी, लँडनला मदत करते पण एका अटीवर. ती सांगते. “ माझ्या प्रेमात पडू नकोस”. 
लँडन काय प्रेक्षक सुद्धा हसतात. शक्य तरी असते का ते !
प्रेम मात्र  शक्यतेच्या पलीकडचा विचार करते. स्टेजवर वावरणारी जेमी फारच वेगळी दिसते. अतिशय सुंदर, आत्मविश्वासाने परिपूर्ण असली ती आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना जिंकून घेते.
लँडन प्रेमात नुसता पडत नाही तर कोसळतो.
जेमी आता मात्र त्याला टाळते. प्रेमात पडले एवढ्या लवकर थोडीच हार मानतात! आतापर्यंत दिलेल्या त्रासाची भरपाई म्हणून लँडन, तिला सुंदर स्वेटर आणून देतो.
तिच्या गंभीर चेहेऱ्यात  बदल होत नाही पण तो गेल्यावर मात्र तिच्या ओठावर मंद स्मित उमटते.
“ यांच्यापासून लांब रहा , तो चांगला मुलगा नाही “ वडील बजावतात.
“ बाबा , फक्त स्वेटर आहे हा . नका काळजी करू “ ती सांगते खरी पण प्रेम , काळजीला धुडकावून लावते हे तिलाही मनातून पटले आहे.

“माझ्याबरोबर या शनिवारी बाहेर येशील का ?”
“ मला परवानगी मिळणार नाही “ ती सांगते.

प्रेम माणसाला धीट बनवते हे तर माहित आहेच पण प्रेम मिळवण्यासाठी प्रेमी आपला अहंकार सोडायला तयार होतो.
लँडन, जेमीच्या वडिलांकडे जाऊन तिला बाहेर नेण्याची परवानगी मागतो. हा संयम त्यालाही नव्याने उमगला आहे.
असे म्हणतात, प्रेम ही एक भावना आहे. आहेच पण नाते जुळत असताना, जेव्हा तुम्ही ही पायरी ओलांडता तेव्हा शब्दांबरोबर कृतीला महत्व येते.  प्रेमाचा पहिला धडा असतो , जिच्यावर प्रेम आहे तिला समजून घेणे.
A walk to remember मधला हा पहिल्या डेट चा सीन फार सुंदर आहे..

शनिवारची संध्याकाळ. समुद्राजवळचे एक छोटेसे हॉटेल. शहरातील उच्चभ्रू माणसे जमली आहेत. इथे येण्याची लँडनला सवय असेल पण जेमी बरोबरचा तो मात्र वेगळा आहे.
नेहेमी स्वतःला काय हवे याची पक्की जाणीव असणारा तो , आज तिच्यासाठी म्हणून स्वीट टी सहज घेतो. तिच्या सध्या कपड्यांची त्याला तमा नाही आणि त्याचे तिचे मन जपणे एवढे सहज आहे की सुरुवातीचे असलेले  अवघडलेपण आता पळून जाते.

रात्र हलक्या पावलांनी प्रवेश करते. आकाशातल्या ताऱ्यांनी  आणि डेक वर लावलेल्या दिव्यांनी आसमंत उजळून निघतो.
डान्स फ्लोर हौशी जोडप्यांनी थिरकायला लागतो.
“ तू नृत्य करतोस ?” ती विचारते
.” नाही , मला अजिबात येत नाही “

“ कुणीही करू शकते. नक्कीच तू फार वाईट करणार नाहीस . माझ्यासाठी ?”
तिच्या मोठ्या डोळ्यातले मार्दव आणि आर्जव तो टाळू शकत नाही. काहीसा अवघडत एकमेकांच्या कमरेत घातलेला हात , थोडे अंतर ठेवूनच जवळ आलेली शरीरे आणि एकमेकांचा अंदाज घेणारी त्यांची नजर “

तिची एक बकेट लिस्ट असते. तिच्यासारखीच साधी .  एक टॅट्यू , एकाच वेळी दोन ठिकाणी उपस्थित राहण्याची काहीशी निरागस इच्छा , तिला धूमकेतू पाहायचा असतो .. आणि त्यात पहिली असणारी इच्छा , ती कुणालाच सांगणार नसते.
त्यालाही नाही .
“तुझी काय इच्छा आहे ?” ती त्याला विचारते.
“ मला या शहरातून बाहेर पडायचे आहे “ तो आता मात्र गंभीर होतो .

“ या शहरातून बाहेर पडणे ही तुझी समस्या नाही आहे लॅण्डन. तू बाहेर पडून काय करणार आहेस हे तुला ठरवायचे आहे “

प्रेम समजून घेते. प्रेम तुम्हाला उत्तर देते , प्रेम दिशा दाखवते , प्रेम चेहेऱ्यावरचा मुखवटा अलगद दूर करते , प्रेम तुमच्या आतला माणूस बाहेर काढते आणि तो किती सुंदर आहे ह्याचा आरसा दाखवते. प्रेम तुम्हाला सुधारायची संधी देते.
जेमीवर आपले प्रेम का आहे हे लँडनला त्या क्षणी समजून चुकते.

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

4 thoughts on “Happy Valentine. Best scenes.”

  1. प्रिया,
    💐💐❤️❤️
    तुझ्या मुळे नवनवीन प्रादेशिक किंवा इंग्लिश चित्रपट माहिती होतात.
    मी ते बघितले जातात.
    तू खूप छान लिहितेस हे म्हणणं द्विरुक्ती होईल ना!!

  2. Kamini Sunii Amrutkar

    अप्रतिम लिहिलंय👌👌
    प्रेम तुम्हाला समजून घेते, प्रेम तुम्हाला उत्तर देते.
    एकमेकांशी भावनिक जोडले जाणे आणि स्पेस जपत समोरच्या व्यक्तीच्या भावभावना, अनुभव, प्रतिक्रिया साऱ्यांचा आदर करणे हे फार सुरेख आलेय या सिनेमातून.
    👌🏽❤

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *