भाग ६
सून मेरे बंधू रे –सुजाता
पवित्रता आणि निरागसता यांचा सोहळा म्हणजे बिमल रॉय दिग्दर्शित सिनेमा “सुजाता”
अस्पृश्यता हा विषय आताच्या काळात अप्रस्तुत वाटत असेल, १९५९ पासून आपण बरेच दूर आलो असलो तरी आता जातीच्या अस्मिता अगदीच टोकदार झालेल्या आहेत आणि यात सर्वच जाती सामील असल्याने आताही “सुजाता” तितकाच मनाला भिडतो.
अस्पृश्य मुलगी आणि तिला सांभाळणाऱ्या कुटूंबाने तिचा खऱ्या अर्थाने मुलगी म्हणून केलेला स्विकार हा विषय असला तरी सुजाता ही एक हळुवार प्रेमकथा आहे. दोन माणसांत फुलत गेलेले प्रेम. त्याचा स्वीकार होतो का नाही हा प्रश्नच निरर्थक आहे इथे.
ब्राह्मण कुटुंबातील उच्च शिक्षित मुलगा, अधीर आणि अनाथ हरिजन मुलगी, सुजाता, यांच्यात प्रेम होते. तिचे बोलके डोळे, गोड़ आवाज, तजेलदार सावळा रंग आणि रेखीव रूप ,पहिल्याच नजरेत त्याला घायाळ करते.
आपण या कुटुंबातील असूनही , आपण या कुटुंबाचे नाही याची जाणीव आहे तिला पण कुणाला विचारणार! जन्मल्यापासून हीच माणसे तिची पोषणकर्ता आहेत. भले हक्क नसू दे पण अन्न , वस्त्र, निवारा तिला इथेच तर मिळाला आहे!
मुलीसारखी आहे ती ..मात्र आपण मुलगी नाही हे त्यांच्या वागणुकीतून तिला जाणवते आहे.
वडिलांना माया आहे पण समाजाचे बंधन सुद्धा आहेत, आईला प्रेम आहे पण तिच्या मनात रुजलेल्या काही अंध श्रद्धा आहेत, परंपरेचे जोखड आहे. याला अपवाद आहे ती तिची बहीण, रमा. लोक काय म्हणतील हे दडपण तिच्या मनावर नाही. सुजाता आपली सख्खी बहीण नाही याची जाणीव असावी पण ते तिच्या वागणुकीतून दिसत नाही.
या सर्वात सुजाता कृतज्ञतेने दबून गेलेली आहे.
त्यामुळे हा स्वप्नीचा राजकुमार आपल्या समोर जरी उभा राहिला तरी आपला हात आपण पुढे करायचा नाही याचे सुजाताला भान आहे.
अधीरच्या सुजाताप्रती असलेल्या आकर्षणाची जाणीव त्याच्या आत्याला आहे. रमाच्या नृत्याच्या कार्यक्रमाला ती अधीरला घेऊन जाते पण या कार्यक्रमाला सुजाताला निमंत्रण नसते.
आपले एकटेपण ती कसे सोसते याची अधीरला कल्पना आहे.. तो गावाबाहेरील नदीच्या काठी सुजाताला भेटायला जातो.
रात्रीची वेळ. सारा परिसर निर्मनुष्य आहे. सुजाताच्या सोबतीला आहे ते दगडात कोरलेले गांधीजींचे शिल्प. हरिजनांच्या उन्नतीसाठी काम करूनही त्यांना मुख्य प्रवाहात आणणे शक्य झाले नाही याचे शल्य त्या शिल्पालाही वाटत असावे.
“तुला चंडालिकाची गोष्ट माहित नाही ? तर तू नाटकाला का आली नाहीस? अधीर विचारतो. “
त्याचा प्रश्न टाळून सुजाता त्याला गोष्ट सांगायचा आग्रह करते.
चंडालिका ही चांडाळ कुटूंबातील मुलगी. त्यांच्या अंगाचा स्पर्श सुद्धा नाकारणारा वर्ग असतो. बुद्धाचा शिष्य आनंद, तिला पाणी देण्याची विनंती केल्यावर ती नाकारते.” माझ्या हाताचे पाणी तुम्हाला कसे चालेल? “ सर्वच जीव समान आहेत, देवाची लेकरे, त्यात भेदभाव कशाला हे सांगून तो तिच्या ओंजळीतून पाणी पितो .
“ हे तर मागच्या काळात झाले ..आता तर बदलले आहे सर्व “ सुजाता म्हणते.
किती विरोधाभास हा ! नवीन युग पण आपण तर मागे जातोय याचे शल्य तिच्या डोळ्यात आहे.
“ नाही , आताही एका महात्म्याने हे कार्य हाती घेतले आहे की “
सुजाताच्या मनावरचे मळभ निघून जाते. अवघे अंग फुलून येते, डोळे हसतात.
प्रेम …प्रेम तर ती स्वतःवर करायला लागते.
अधिरवरील प्रेम व्यक्त करायचे धाडस हे प्रेमच तर देते.
“ सुजाता, तुम मुझे इतनी अच्छी क्यों लगती हो ?’
अचानक आलेले अधीरचा प्रश्न. जे उत्तर त्याला माहिती आहे ते तिच्याच तोंडून त्याला वदवायचे आहे.
“तुलाही मी एवढाच आवडतो का ?”
आता मात्र तिची नजर झुकते. गालावर गुलाब फुलून येतात. उत्तर , ते कसे देणार ! त्याने जाणून नको का घ्यायला.
एवढ्यात नदीच्या पात्रातून जात असलेल्या नावेतून आलेले गाण्याचे सूर अलगत तरंगत येतात.
सुन मेरे साथी रे
सुन मेरे बंधू रे, सून मेरे मितवा
त्याला अपेक्षित उत्तर मिळते. आता तो खरंच अधीर होतो.
“ मला हल्ली एक स्वप्न पडते. तुझ्या केसात चाफ्याचे फुल आहे, भाळावर बिंदी आणि चंदेरी साडी नेसलेली तुझी सुंदर मूर्ती माझ्या जवळ उभी आहे . याचा अर्थ काय असेल सुजाता ?”
लग्नाची मागणी घालण्याची ही पद्धत किती सुंदर आहे ना !
उगाच नाही सुजाता म्हणत, “ याचा अर्थ आहे की तू सुंदर आहे “
पवित्र मनापेक्षा सुंदर अजून काय असू शकते !
नावाड्याचे शब्द सुजाताच्या मनाची भाषा उलगडून दाखवतात
होता तू पीपल, मैं होती अमर लता तेरी
तेरे गले माला बन के, पड़ी मुसकाती रे
सुन मेरे साथी रे
सुन मेरे बंधू रे, सून मेरे मितवा
Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

आताच्या काळाच्या तुलनेत हे सगळे कल्पनारम्य वाटावे. पण होते तसे. अस्पृश्यता निवारण करण्यासाठी जेवढा प्रिंट मिडिया सर्वतोपरी प्रयत्न करत होता तेवढेच सशक्त माध्यम हे सिनेमा होते आणि आहे. एका सुंदर प्रेमकथेला फुलवत सामाजिक भान सुद्धा तितकेच सजगपणे सांभाळल्याचे या सिनेमातून अधोरेखित होते.
हे गाणे बघताना नुतन वरून लक्ष हटतच नाही. कमालीची सुंदर, सहज भासलीय या गाण्यात. हा सीन खरोखरच दोघांनी अक्षरशः जिवंत केला आहे. दोघे कलाकार हयात नाहीत पण कलाकृती ने अजरामर झाले आहेत.
👌🏽👌🏽❤❤❤❤
Thank you Kamini .
बिमल रॉय च्या सर्वच सिनेमात नूतन ने अप्रतिम काम केले आहे ..खरेतर सर्वच नायिकांनी
त्यांचे सिनेमा केवळ सामाजिक नाहीत तर रोमॅंटिक सुद्धा
ते प्रेम सुद्धा दैवी म्हणता येईल
प्रिया,
खूप सुंदर सिनेमा.
नूतन ,सुनिल दत्त शोभले आहेत.
ब्लॅक अँड व्हाईट चा जमाना.
तरल,साधी कथा,साधी माणसं असायची.
गाणी सुंदर.
आता अशा तरल कथांवर चित्रपट बनतील?
शक्यच नाही.
हे सगळं तुझ्या लिखाणातून अधोरेखित होतं.
💐❤️💐❤️
आता असे आवडणारे प्रेक्षक तरी कुठे आहेत ! लोकांची अभिरुची बदलली आहे ग
Thank you Dear Vidula.