Skip to content

Happy Valentine. Best scenes.

 मै जिया कहाँ ? जीना तो अभी शुरु किया –मिली

गेल्या वर्षी काही अनपेक्षित घटना घडल्या. जीवघेण्या रोगांमुळे काही जीवलग गमावले.
तरणीताठी माणसे अशी अचानक आयुष्यातून जाणे हे कुणासाठीही कठीण. तो दुःखाचा आघात मन सुन्न करतो. अर्थात स्वतःचे आयुष्य काही फार वेळ पॉज मोड मध्ये रहात नाही. माणूस उठतो, कामाला लागतो, प्रयत्नपूर्वक नकारार्थी घटनेला मनाच्या कोपऱ्यात ढकलतो. चालायला सुरुवात करतो.
दुःख काही जात नाही, कोणत्यातरी कोपऱ्यात दबा धरून बसते आणि वाट मिळाली की हिंस्त्र श्वापदासारखी झडप घालतं.
खूप काही सहन केले की कुठल्यातरी एका क्षणाला माणूस कोसळतो. नकोसा  झालेला  मनाचा  एकटेपणा गर्दीत भरून येतोच अस नाही. गर्दी घाबरवते आणि किशोरचा वेदनेने भिजलेला आवाज जगण्याकडे पाठ फिरवताना म्हणतो,

अजब दुख भरी हैं ये, बेबसी बेबसी
बड़ी सूनी सूनी है, जिंदगी ये जिंदगी

जीवन भरभरून जगणारी पण आयुष्याची दोरी आखूड असणारी मिली आणि जीवनाला कंटाळलेला, जगण्या पासून दूर पळणारा शेखर यांची प्रेमकहाणी म्हणजे हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित सिनेमा “ मिली “

जेमतेम सहा- सात वर्षाचा असतानाच, शेखरच्या आयुष्यात वादळ येते. त्याचे वडील, स्वतःच्या पत्नीचा खून करतात. लहानगा शेखर, एक दिवशी शाळेतून  घरी येतो तेव्हा घर पोलिसांनी भरून गेले असते. आई रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेली, वडिलांची मान झुकलेली हे दृश्य त्या लहानग्याच्या मनावर खोल परिणाम करून जाते. वडिलांना फाशी होते आणि हा मुलगा अनाथ होतो.
लहान  मुलांना जे  घडते ते  सर्व समजते असे नाही पण पाहिलेल्या दृश्याचे मनावर ओरखडे मात्र उठतात. जे अघटित घडलेले असते त्याची तीव्रता जाणवते.
जगाच्या टोकेरी नजरा झेलतच शेखर मोठा होतो न केलेल्या अपराधाचे ओझे, स्वतःच्या पाठीवर घेऊन जगतो. लोकांशी  तुटक वागतो. एकटेपणाच्या अंधाराआड स्वतःला लपवतो. त्याला आवाज सहन होत नाही. कुणी जवळ आलेले खपत नाही. प्रेम,  जिव्हाळा, माया या शब्दांशी त्याने फारकत घेतली आहे. स्वतःचे अस्तित्व सुद्धा जेव्हा परके होते तेव्हा कुणाचीही साथ नकोशी वाटते.
अफवा, कंड्या पसरायला वेळ लागत नाही.
शेखरला या साऱ्याची  सवय असतेच. वडिलांच्या संपत्तीबरोबरच, त्यांच्या अपकीर्तीचा सुद्धा तो एकुलता एक वारस असतो.

नैराश्य, विध्वंस आणि एकाकीपणाच्या या वाटेवर त्याला साथ हवी आहे ती दूरवर लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची आणि याच एकांताला गढद करणाऱ्या सुरांची. अशावेळी त्याच्या आयुष्यात मिली येते.
एक साधी सरळ मुलगी, जिला कॅन्सर झाला आहे.
तिला याची कल्पना नाही. आपल्याला अशक्तपणा का आहे हे तिला कुणी समजू देत नाही. ह्या आजारावर औषध मिळेल आणि आपण खडखडीत बरे होऊ याची आशा जागवत मिली दुसऱ्यांच्या आयुष्यात सुद्धा आनंद पेरते.
लोकांपासून दूर राहणारा शेखर तिच्या सहवासात स्वतःला पारखू लागतो. लांब असलेले तारे टेलिस्कोपने  जवळ आणणारा शेखर जीवनात आलेल्या अनपेक्षित चांदणीच्या साथीत रमतो.
कुठेतरी सुखाची चाहूल खुणावते आणि त्यालाही नजर लागते.
मिली आजारी पडते. तिच्या गच्चीतल्या फेऱ्या थांबतात..

प्रेम अमर असते असे म्हणतात. सुख दुःख , आशा निराशा , भावनांच्या असंख्य परीक्षांना तोंड देऊन ते समर्थ उभे राहते;  तेव्हाच फळते. मनात बसलेले कुणी अगदी बरोबर नसले तरी ते रुजते, वाढते, फुलते ..त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची जाणीव पुरेशी असते. 
शेखर तिला फुले पाठवतो..त्याबरोबर एक चिठ्ठी.
प्रत्येक  दिवशी वेगळी फुले, वेगळा कागद , वेगळा मजकूर पण भावना तीच.
सहानुभूती, आपुलकी, विश्वास, जवळीक, मैत्री आता उंबरठा ओलांडण्याचा मार्गावर असते.
एक अनोखे नाते  शब्दाला  लगडून  बहरू  लागते.

शेखर :   जल्दी अच्छी हो  जा –दुष्ट राक्षस
मिली :  मै बुरी  कब थी की अच्छी हो जाऊ ?

तो : अच्छी हो  जा नही तो मै  बिमार हो जाऊँगा
ती :  तुम बिमार पडोगे  तो मै कैसे अच्छी हो जाऊँगी  ?

तो: अच्छी तो तुम हो; लेकिन सितारें  बहुत बदमाशी करते है, निकलते तो जरूर होंगे, लेकिन दिखाई नही देते.शायद मै देखना नही चाहता
ती:  देखो, सितारों का दिल नही दुखाना चाहिये.ऐसा करो, जबतक मै अच्छी नही होती , तुम खूब जी लगाके मेरे लिये  कोई नया सितारा ढूंढ लाना  

तो: मै तुम्हारे लिये क्यूँ ढूंढू ? हर आदमी को अपने हिस्से का सितारा खुद ढूंढना पडता है.मैने तो मेरे हिस्से का सितारा ढूंढ भी लिया हैती
ती ”अच्छा , कैसा है?
तो “ हसमुख है, मुझे तो समझ भी नही आता के अबतक अपने इस सितारे बिना मै जिया कैसे! वैसे भी, मै जिया कहाँ ? जीना तो अभी शुरु किया
ती : अभी तो मुझे उसे देखने के लिये आना पडेगा, नाम क्या रखोगे उसका ?
तो: मिली.

साधारण दोन एक मिनिटांचा हा सिक्वेन्स आहे. दोघेही एका फ्रेम मध्ये नाहीत .ती तिच्या खोलीत; तो वरच्या मजल्यावरील त्याच्या प्रशस्त दिवाणखान्यात. तिच्या चेहेऱ्यावर आजाराची काळी छाया , अंगात बसण्याची सुद्धा ताकद नाही, डोळ्याभोवती काळी वर्तुळे, पण प्रत्येक  चिठठीबरोबर उमलत जाणारा चेहेरा , हसणारे ओठ, चेहेऱ्यावर लज्जा आणि आपण कुणालातरी एवढे आवडतो आहे याचा न लपवता येणारा आनंद …
त्याच्या चेहऱ्यावरच्या आठ्या कुठच्याकुठे हरवल्या आहेत. अगदी न दिसणाऱ्या ताऱ्यासारखाच.
चेहेऱ्यावरची उदासी सुद्धा पळून लावली  आहे तिने ..
सुरुवातीला त्याच्या चेहेऱ्यावरचे हास्य आणि मग प्रेमाची कबुली देताना आलेला मृदू भाव ..
प्रेम , प्रेम म्हणजे असते काय?
ते आहे हे मनाला पटलेली खूण.

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

8 thoughts on “Happy Valentine. Best scenes.”

  1. सर्वांगसुंदर सिनेमा आहे हा 👌🏽👌🏽❤
    इतकी संयत प्रेमकथा, हृषीकेश मुखर्जींचा खास टच असलेली हळुवार कहाणी आहे की बघणारा अनेक वर्षे त्याच्या इम्पॅक्ट मधून बाहेर पडू शकत नाही. फार गोड.
    खूप छान लिहिलंय दी. पुन्हा एकदा शब्दातून तो सीन बघून घेतला इतके सजीव शब्द 👌🏽👌🏽❤

  2. मिली

    एक जगावेगळा सिनेमा….
    तुझ्या नजरेतून आणखी वेगळा.🩷🩷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *