Skip to content

तेरे सूर और मेरे गीत-लता मंगेशकर 

संगीताच्या मध्यमा प्रथम  वर्षाला असताना ख्याल गायकीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या वर्षातले, घोटून घेतलेले आलाप, सरगम गाणे सोपे. आता रागविस्तार करायला  तयार आलापी नव्हती. स्वतःच्याच मनाने राग फुलवणे हे  वाटते तेवढे सोपे नाही. राग यमनचा बडा ख्याल होता “कह सखी कह सखी कैसे की करिये”  सुरुवातीची आलापी जमली. नंतर जेव्हा राग फुलवताना, सुरावटीची पुनरावृत्ती होऊ लागली तेव्हा आम्ही एक आयडिया केली. जेवढी म्हणून राग यमन मध्ये हिंदी सिनेमातील गीते होती, ती आलापीत गायला लागलो. यातली बरीच गीते लताबाईंची. बीती ना बिताई रैना, रसिक बलमा, जा रे बदरा बैरी जा, दिल ए बेताब तो आणि अनेक गीते राग यमन वर बेतली आहेत. नंतर जेव्हा लक्षात आले तेव्हा ओरडा मिळाला पण त्यात दम नव्हता . मध्यमा पूर्ण पर्यंत संगीत शिकण्यात लताबाईंचा अदृश्य हात, अहं, हात नाही, गळा आमच्या पाठी होता. बाईंचे हे ऋण केवळ आमच्यावर नाही तर संगीतावर प्रेम करणाऱ्या सर्वावर आहे. त्यांच्या संगीताने शास्त्रोक्त संगीत घराघरात पोचले. रागांची ओळख झाली. कठीण असलेल्या सुरावटी गात्या गळ्यातून ऐकू येऊ लागल्या . तानसेन नाही तरी कानसेन निर्माण झाले . ही पोस्ट त्यांच्या शास्त्रोक्त संगीतावर आधारलेल्या गीतांची . 

 भूप , भूपाली
—————
भूप हा शिकण्यात आलेला सुरुवातीचा राग . “भूप रूप गंभीर शांत  रस ” असे या रंगाचे वर्णन केले जाते . प्रेम , विरह , भक्ती या रसांचे प्रदर्शन भूप घडवतो .सहेला रे ही किशोरी ताईंची  प्रसिद्ध चीज भूप या रागात बांधली आहे .. यात लागणारे सर्व सूर शद्ध . कदाचित त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना ही शुद्ध, कोणत्याही स्वरूपात पूजनीय, सात्विक .

१) दिल हूम हूम करे , घबराये
(सिनेमा-रुदाली, संगीतकार-भूपेन हजारिका, गीतकार-गुलझार) 

श्रीमंत कुटुंबात जेव्हा मृत्यू होतो तेव्हा रडण्यासाठी पैसे देऊन स्त्रिया बोलवल्या  जातात. अशा स्त्रियांना “रुदाली” म्हणतात पण या सिनेमाच्या नायिकेच्या जीवनात दुःखाची साखळीच विणली गेली आहे. ह्या न संपणाऱ्या साखळीचा परिणाम एवढा खोल आहे की कोणत्याही प्रसंगात तिच्या डोळ्यात अश्रूचा टिपूस सुद्धा येत नाही . 
“दिल हूम हूम करे” हे गीत म्हणजे तिची  भीती, तिची व्यथा. अशी स्त्री जिला खोटी आशा  दाखवून  वापरले  गेले आहे. तिची कोणाशीही बांधिलकी नाही कारण कोणी ती ठेवलीच नाही. सर्वानीच तिला नाकारले आहे. नायिकेचा नवरा मृत्यू पावल्याचा जो प्रसंग आहे तेव्हा पार्श्वभूमीला हे गीत वाजते. आभाळ भरून आले आहे. तिचा मुलगा आक्रोश करत आहे पण शनीचरीचे डोळे  कोरडे ठाक आहेत . ह्या सर्व भावना खरेतर मोडून टाकणाऱ्या पण तिच्यापर्यंत त्या पोचत नाहीत. तिला  स्पर्श करत  नाहीत. भूप रागातील ही सुरावट संयत पण व्याकुळ करणारी . 

दिल हूम हूम करे , घबराये
घन धाम धाम करे, डर जाए 
एक बूंद कभी पानी की मोरी अंखियो से बरसाए

माझे हृदय एका अनामिक वेदनेने धडधडतय, घाबरलय. डोळ्यातून वाहून गेले तर ते ओझे तरी हलके होईल . पण दुर्दैव, माझ्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबही येत नाही. 
हा राग गोड. वरील गीत जे विरह रसाचे  प्रतिबिंब आहे ते व्याकुळ करते पण त्याची स्वरावली मनाला भावते. स्पर्शून जाते ती त्यातील मधुरतेने.

२) ज्योती कलश छलके
( सिनेमा-भाबी की चुडियाँ, संगीतकार-सुधीर फडके, गीतकार- पंडित नरेंद्र शर्मा)

या  गीताला माझ्या आईचा आवाजही आहे आणि चेहराही.  शनिवार,रविवार मी आईकडे असायचे. गिरगावच्या चाळीत सर्वात वरच्या मजल्यावर आमची एक खोली होती. त्यावर कौलारू छप्पर. ऊन येण्यासाठी दोन, तीन कौले काढून काच लावली होती. पहाटेचा पहिला किरण त्या काचेतून चेहऱ्यावर पडायचा. जेमतेम १०*८ ची ती खोली उजळून निघायची.  आईचा आवाज गाढ झोपेतून जाग आणायचा.
या गीताच्या सुरुवातीला आलाप आहे. आई नोटेशन गायची. सुरांची ओळख खूप लवकर झाली.
ज्योती कलश छल के च्या सुरुवातीच्या आलापीच्या  ऐवजी नेहेमी सा’ ग’ रे’ सर ग’ रे’ सा ध प … हीच सरगम झंकारते.
 
“ज्योती कलश छलके
हुये गुलाबी, लाल सुनहरे, रंगदल बादल के”
उषा ने आँचल फैलाया
फैली सुख की शीतला छाया
नीचे आँचल के
हे चित्रगीत आहे. येणारी पहाट सुखाची बरसात करणार आहे. ही पहाट आशादायी आहे. लालभडक सूर्याचा गोळा हळूहळू  केशरी रंगात परिवर्तित  होतो आणि काही क्षणानंतर त्याच्या सहस्त्र  बाहू साऱ्या आसमंतात पसरतात. पूर्ण आभाळ, घर, अंगण, बाग पिवळ्या धम्मक प्रकाशात उजळून येते.
माझ्या खोलीच्या समोर एक सामायिक बाल्कनी होती. सकाळच्या प्रहरी बायकांची लगबग लवकर सुरु व्हायची.
सकाळी उठून पहिल्या सूर्यकिरणासमोर  नतमस्तक होणे, आपल्या खोलीसमोरची जागा झाडून घेणे, दारासमोर पिटुकली का होईना तांदळाच्या पीठाने रांगोळी काढणे, डालड्याच्या डब्यात हौसेने लावलेल्या रोपांना पाणी देणे आणि मग चुलीवर चहाचे आधण ठेवणे, ही दृश्य कॉमन. तो दर्प नाकात जायचा. दर्पच, कारण मला चहा आवडायचा नाही तेव्हा. डब्याची तयारी सुरु व्हायची आणि  तो पूर्ण मजला गंधित व्हायचा. आमचे घर तळमजल्याला होते. ही खोली फक्त झोपायला. दोनच दिवस मी आईकडे असल्याने पांघरुणात स्वतःला गुरफटून घेतले तरी आई न ओरडता,  हे गीत गुणगुणायची. तिच्या आवाजाने अजून गुंगी यायची. मग डोळे चोळत, तिचा हात धरून अर्धवट मिटलेल्या पापण्यांनी मी चाळीचा  लाकडी जिना उतरायचे.
भूप रंगाची जी शांत, स्थिर  प्रकृती आहे ती यात दिसते. एक सहज स्वीकार. मग ते दुःख असो किंवा सुख. ते न बोलता स्विकारणे यात मनाची ताकद लागते. ती या रागात आहे.
चारुकेशी
—————- 
समर्पण आणि पूजा  या दोन भावनांचे दर्शन हा राग घडवतो .प्रेमातली आणि भक्तीतली उत्कटता या मधील सुरावटीत आहे. नवल नाही की संयत पण उत्कट प्रणयाची अनुभूती देणारी गीते यात बांधली आहेत . 

 ३)बैयां ना धरो ओ बलमा
(सिनेमा-दस्तक, संगीतकार-मदनमोहन, गीतकार -मजरुह सुलतानपुरी)

हे गीतच लडिवाळ आहे. थोडी लज्जा, अपार प्रेम, लटकी तक्रार आणि  मुक्त शृंगार यांनी परिपूर्ण.  ठुमरीच्या थाटावर हे बेतले आहे . प्रेमिकांची छेडछाड , त्याची धिटाई आणि त्याला केलेला वरवरचा विरोध आणि नंतरचे समर्पण ह्या  शृंगारातील सर्व पायऱ्या इथे आहेत. 
मोहें छोडो हाये सजना 
दिया सीस उठाये सजना 
रहा मोहें निहार 

रात्रीचा समय जरी असेल तरी दिवे जळत आहेत. तू केलेल्या झटापटीत माझी ओढणीही सरकली आहे . या झटापटीत  कंगनाची किणकिण सुद्धा  साऱ्या जगाला आपले गुपित उघडे करीत आहे आणि त्यात तुझे माझ्याकडे रोखून पाहणे ! निदान ते  दिवे तरी शांत होऊ दे . तोपर्यंत तरी माझा हात सोड . One of the erotic songs of Indian films.
बागेश्री
———
४) राधा ना बोले ना बोले ना बोले रे
(सिनेमा-आझाद, संगीतकार- सी रामचंद्र, गीतकार-राजेंद्र कृष्ण)

हा सिनेमा तद्दन व्यावसायिक, मीनाकुमारीची भूमिका एका अल्लड मुलीची.  तिच्या प्रतिमेशी विसंगत. वेगळीच खेळकर , हसरी मीना इथे पाहता येते. एक नर्तिका म्हणून जरी ती प्रसिद्ध नसली तरी मुळातच डौलदार असल्याने अतिशय आकर्षक दिसते , नाचते .. 

याद करो जमुना किनारे, साँवरिया
ओढ़ी थी राधा की काहे गगरिया
इस कारन ना तुम संग बोले रे
राधा ना बोले, ना बोले रे

यमुनेच्या काठावर पाणी भरायला जाणाऱ्या गोपींची खोडी काढणे हा कृष्णाचा छंद . आणि राधा तर त्याची आवडती गोपी . जिच्यावर प्रेम तिलाच सतावणार न ! पण आज त्या गुन्ह्याला माफी देण्याचा काही इरादा नाही . एक तर वाट अडवाली , त्यामुळे आधीच घरी परतायला झालेला उशीर आणि त्यात भरलेली   घागर सुद्धा फोडली मग कसे माफ करणार … त्याला त्रास देण्याचा उपाय माहित आहे तिला . बोलायचे नाहीच .. बोलणे तर राहूदेच , चेहेरा सुद्धा दाखवायची तयारी नाही तिची . 

रूठी हुई यूँ ना मानेगी छलिया
चरणों में राधा के, रख दो मुरलिया 
बागेश्रीचा जो शृंगारिक पण खेळकर बाज आहे तो या गीतात पुरेपूर उतरला आहे. 

मालगुंजी
———–
एस डी  बर्मन आणि लता मंगेशकर जवळ जवळ सहा वर्षे काही गैरसमजामुळे एकमेकांशी बोलत नव्हते .त्या काळात  दादांची मुख्य गायिका होती आशा  भोसले . लता बाई आणि एस डी मध्ये एक महत्वाचे साम्य आहे. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा परिणाम त्यांनी आपल्या संगीतावर होऊ दिला नाही. बरेच जण याला निष्ठुरता म्हणतील .. Professional ruthlessness .  मी त्याला संगीताशी बांधिलकी मानते.  यांची ओळख आहे त्यांची कला आणि कलाकाराला जर आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी आपल्या कलेशी बेईमानी करता कामा  नये . बाकी कशाबद्दल ही मतभेद होऊ शकतील पण लता बाईच्या, एस डी च्या  सुरांशी नाही . हे मोठेपण त्या दोघांनी सुद्धा ओळखले होते . वाद असूनही  जेव्हा आर डी बर्मननी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा एस डी बर्मन ने त्यांना पाठवले ते लता बाईंकडेच  . गान सरस्वतीचा आशीर्वाद आरडीने  सार्थ  करून  दाखवला तो पहिल्याच गाण्यात .  ते गीत होते छोटे नबाब या सिनेमातले

५) घर आजा घिर आई , बदरा सावरिया” 
(सिनेमा, छोटे नबाब, संगीतकार- आर डी बर्मन, गीतकार -शैलेंद्र )

 वेस्टर्न धूनचा बादशहा ही ओळख होण्यापूर्वीची ही धून . रागदारी संगीतावर आधारित. आर डी च्या आगमनाची दखल चित्रपट सृष्टीने तर घेतलीच पण एस डी आणि लता मधील संगीत प्रवास परत सुरळीत चालू झाला . मुजऱ्याचे गीत आहे हे पण तरीही  बाजारूपणा या गीतात नाही. लताच्या आवाजातही नाही . खरेतर तेव्हा व्हॅम्प किंवा खलनायिकेचा आवाज आशा बाईचा असताना या गीतासाठी लताचा आवाज वापरणे हा मास्टर स्ट्रोक होता. गाणे जरी कोठ्यावरील असले तर मनस्थिती आहे ती नायकाच्या पत्नीची .ओठ त्या कलावंतिणीचे आणि कैफियत त्याच्या पत्नीची . . 

सुना सुना घर मोहें डसनेको आये रे , खिडकी पे बैठे बैठे सारी रैन जागे रे
नायकाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली त्याची पत्नी . तो कुठे गेला आहे याची तिला खबर नाही . तो येणार या आशेवर तगून  राहिलेली ती .  रात्र तर त्या वाट पाहण्यातच संपून गेली आहे . त्यात हा पाऊस, ढगांचा कडकडाट, विजेचा कल्लोळ तिचा थरकाप उडवतो आहे .  

पहिल्या गीताचा नवखेपणा यात नाही . आणि राग सुद्धा परिचित नाही . नेहेमीचा यमन, पहाडी किंवा भैरवी न घेता मालगुंजी रागात या गाण्याची रचना केली आहे . मालगुंजी रंगाचे बागेश्रीशी साम्य आहे फक्त आरोहात शुद्ध गंधार वापरला जातो. विरहाची आर्तता आणि मिलनाची उत्सुकता दोन्ही या सुरावटीतून व्यक्त होतात.
सलील चौधरी यांचे ना जिया लगे ना हे गीत सुद्धा या रागावर आधारित आहे. 

गौड सारंग 
———–
पावसाळा, हा मौसमच प्रेमाचा,  शृंगाराचा . गौड सारंग चे स्वर सरळ रेषेत प्रवास करत नाहीत. ह्यातील सूर नागमोडी वळणे घेत प्रवास  करतात. एकमेकांशी  संवाद साधतात. हा राग बोलतो, चिडवतो, खुशामत करतो. थोडासा खेळकर आणि खोडकरही. 

६) ना दीर दीम तन दे रे ना
( सिनेमा-परदेसी, संगीतकार– अनिल विश्वास, गीतकार)

. हा तराणा आहे . 

ना जा ना जा बलम , बलम मेरे ना , ही विनवणी जरी असेल तरी त्यात व्याकुळता नाही तर अधीरता आहे . हे रिझवणे आहे , खुणावणे आहे .

‘मेरे कजरे की धार पिया तेरे लिये 
मेरा सोला सिंगार पिया तेरे लिये 
बाजे मन  का सितार … 
गीतांच्या निमित्ताने वेगवेगळे सिनेमा पाहत आहे.  इंडो रशियन चित्रपट आहे . रशियन नायक आणि भारतीय नारी यांच्या प्रेमावर  आधारित .

७ )जनसंमोहिनी 
———————–

हा राग विरहाचा. This raaga invokes the feeling of separation, remorse and nostalgia . 

रविशंकर यांनी संगीत दिलेले एक गीत आहे
हाये रे वो दिन
(सिनेमा-अनुराधा, संगीतकार-रविशंकर, गीतकार-शैलेंद्र) 


समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत की लग्न,  संसार आणि प्रेमासाठी ज्यांनी आपल्या स्वप्नांचा बळी दिला. लग्नाआधी त्या यशस्वी होत्या. प्रगतीची शिखरे त्यांनाही खुणावत होती पण लग्नानंतर स्वतःहून आनंदाने  ते सारे मागे ठेवून त्या संसारात रमल्या. नव्याची नवलाई संपल्यावर जे काही मागे पडले ते त्यांना आठवत राहिले, खुपत राहिले. काय देऊन काय मिळवले हा हिशोब करायला लागल्यावर लक्षात आले की बाकी शून्य आहे .

या सिनेमाची नायिका आहे  एक गायिका “अनुराधा”  . .ती  एका समाजसेवक, नैतिक अधिष्ठान मानणाऱ्या  डॉक्टरच्या, निर्मलच्या  प्रेमात पडते आणि आपल्या सुखासीन, आयुष्याचा त्याग करून त्याच्याबरोबर खेड्यात जाते . वर्षे लोटतात . संगीत तर कधीच मागे पडते . चाकोरीतील आयुष्य जगताना भूतकाळातील एक दुवा तिच्या आयुष्यात येतो. दीपक , जो तिचा मित्र तर असतोच पण तिच्या संगीताचा चाहता सुद्धा . विस्मरणात गेलेल्या तिच्या प्रेमाशी , संगीताशी तो तिची परत गाठ घालून देतो .

हाये रे वो दिन क्यों न आये, जा जा के ऋतु लौट आये 
सुनी मेरी बिना , संगीत बिना 
सपनों की माला मुरझाये
संसार का कला ?  हा मूळ पेच . याचे उत्तर कठीण आहे . कलाकाराचे आयुष्य कलेशी बांधलेले असते .सुरांच्या सहवासात जो रमतो त्याचे आयुष्य  बेसूर होणे म्हणजे आत्म्यापासून शरीर विलग होणे . लताजींचे आयुष्यही संगीताशी बांधले  गेले आहे . हे गीत आणि दुसरे कोण जाणू शकतो!

राग तोडी / खमाज
———————–
८) रैना बीती  जाये —
( सिनेमा-अमरप्रेम, संगीतकार-आर डी बर्मन, गीतकार–आनंद बक्षी ) 

दारूच्या नशेत  झिंगलेला तो लडखळणारे पाय सावरत परत चालला असतानाच जवळच्याच कोठ्यावरून सारंगीचे आर्त सूर त्याच्या कानावर येतात. दुर्लक्ष करून घोडागाडीत चढतानाच सारंगीची जागा तोडी रागात बांधलेला आलाप घेतो. आता मात्र तो स्वतःला थांबवू शकत नाही. त्या सुरांच्या दिशेने त्याची पावले कोठ्याच्या पायऱ्या चढू लागतात . आलापाची जागा आता संतूर  घेते आणि नंतर गिटारबरोबर  तालाचा मेळ जमतो.  सिनेमाचं कशाला; प्रत्यक्ष आयुष्यातसुद्धा या  सुरावटीला  चुकवून जाता येणार नाही एवढे ताकदीचे गीत आर डी ने  दिले आहे. 
“रैना बीती जाये ” ही विरहिणी आहे. राधेची तक्रार आहे.  वाट पाहून तिचे  डोळे तर थकले आहेत पण झोपेने मात्र कधीच दडी मारली आहे .
इथे “निंदिया न आये “ही अस्ताईची दुसरी ओळ बासुरीच्या स्वराने अलगद पहिल्या ओळीबरोबर जोडली जाते  .पहिल्या ओळीत कोमल रिषभ , धैवत आणि कोमल गंधार तर दुसऱ्या ओळीत मात्र शुद्ध रिषभ आणि गंधारचा उपयोग करूनही दोन्ही ओळी एकमेकांत  मिसळून गेल्या आहेत . अगदी सहज .
गाण्याच्या अंतऱ्याला  ठुमरीच्या अंगाने नेताना राग खमाजचा उपयोग केला गेला आहे .

शाम को भुला , शाम का वादा
संग दिये के जागी राधा
रात्र उलटून गेली तर कृष्णाच्या  पावलांचे तिला दर्शन झालेले नाही . संध्याकाळी येण्याचे वचन  तिला देऊन सुद्धा तो  तिच्याकडे पोचला नाही .या गीतात काय नाही !थोडी काळजी ,  विरहाचे दुःख आणि  कोणा सवतीचा मत्सर सुद्धा . आणि हे साऱ्या भावभावनांचे दर्शन  घडवणारे, राग तोडी आणि खमाज चे सार्थ सूर. 

यमन
———
गंधर्व महाविद्यालयात प्रथम वर्षाचा , प्रथम राग भूप असला तरीही शिकलेला पहिला ख्याल यमन या रागाचा होता. अनेक ठिकाणी यमन रागापासून संगीताची ओळख करून देतात.  त्याची बांधणी सोपी आहे असे म्हणतात पण हा गैरसमज आहे. त्याचे सोंदर्य जाणून घ्यायचे असेल तर एका ताकदीच्या गायकाने फुलवलेला यमन ऐकावा.
सहजता ही सरावाने येते. सहज म्हणजे सोपे नाही.
यमन रागाचा रस,  शांत  रस आहे. भूप रागाचाही पण या दोघांत . एक फरक आहे, भूप या रागाचा शांत रस हा योगिक आहे. भूप ऐकताना, एका ध्यानमग्न ऋषींचे चित्र उभे राहते. हा राग चिंतनशील, पण यमन चा शांत रस हा शांत , भक्ती , शृंगार आणि यातून मिळणाऱ्या आनंदाचे रूप आहे. ह्यात  योगीची तटस्थता नाही. संसारात आणि मित्रपरिवारात  रमलेल्या,  सुखी, तृप्त गृहस्थाचे रूप म्हणजे यमन.
”जिया ले गयो जी मोरा सावरिया “ ऐका. त्यात शृंगार आहे, उत्स्फूर्तता आहे…आनंदाला उधाण आल्यावर जो स्वरांचा हर्षोत्सव होईल तो या गीतात आहे. हे गीत “ बिंदू “ या अभिनेत्रीवर चित्रित आहे पण यमन रंगाचे स्वरूप दाखवताना मला गीत आठवते ते “ लौ लगाती, गीत गाती”  मीनाच्या अभिनयात एका सांसारिक गृहिणीची अदब , संस्कार आणि एक आश्वासकता आहे.

९) “लौ लगाती गीत गाती”–
( सिनेमा-भाबी के चुडियाँ, संगीतकार — सुधीर फडके, गीतकार -नरेंद्र शर्मा) 

कुमकुम प्रसाद है,प्रभु धन्यवाद है
हर घर में हर सुहागन, मंगल रहे मनाती

माझा संसार, माझा पती मला तू दिलेला प्रसाद आहेस.  हे प्रभू, प्रत्येक स्त्री ला सौभाग्याचे दान दे.
मला खूप आवडते हे गीत. एक तृप्त, समाधानी, कृतज्ञ गीत.

१० ) प्रेमाचा प्रवास करताना अनेक पायऱ्या ओलांडाव्या लागतात. सुरुवातीची संभ्रम, अनिश्चितता “ कुछ दिल  ने कहा “ या गीतात  आहे. त्या नंतर संपलेल्या शंका कुशंका , मिळालेली उत्तरे “ जबसे बलम घर आये “ या गीतात मिळतात; मग फैली हुई है चा जल्लोष आहे, नंतर “ दिल का खिलौना हाय टूट गया” चा विरह अटळ.  खूप  कमी जोडपी यातून स्वतःचा मार्ग शोधतात आणि एकत्र वाटचाल करतात. बिहाग राग ही समजूतदार तृप्तता आपल्या स्वरावलीतून दर्शवतो.

बिहाग
———–
तेरे सूर और मेरे गीत
(सिनेमा-गुंज उठी शहनाई, संगीतकार-वसंत देसाई -गीतकार-भरत व्यास)

धड़कन में तू है समाया हुआ, खयालों में तू ही तू छाया हुआ
दुनिया के मेले में लाखों मिले, मगर तू ही तू दिल को भाया हुआ
मैं तेरी जोगन तू मेरा मीत, दोनों मिल कर बनेगी प्रीत
मगर तू ही तू दिल को भाया हुआ .
हे अनेक वेळा उशिरा लक्षात येते. अगदी मनपटलावरून पुसून टाकले तरी कधीतरी , कुठलीतरी आठवण ताबा घेते.
तो/ ती असती तर हे बोलली असती , इथे अडवले असते,
त्याहीपेक्षा हवी होती…इथे, आत्ता …..
तीव्र भावनांच्या कल्लोळातून जात असताना, जेव्हा एखादाच  हात आपल्या हातात असावा असे वाटते, ती व्यक्ती तुमची असते.

मुझको अगर भूल जाओगे तुम, मुझसे अगर दूर जाओगे तुम
मेरी मुहब्बत में तासीर है, तो खींच के मेरे पास आओगे तुम,
देखो हमारी होगी जीत

जेव्हा एखाद्याचे असणे तुम्हाला तीव्रतेने हवेहवेसे वाटते, सुखात, दुःखात, अगदी स्वतःच्या खूप वेगळया जगात असतानाही,  तेव्हा त्या कंपनांचा प्रभाव दुसरीकडे होत असतो. त्याचा पडसाद तुम्हाला दिसत नाही पण जाणवतो.
मैलावरील शांततेत सुद्धा न गायले गेलेले सूर स्पष्ट ऐकू येतात आणि पुढची सुरावट आपोआप मनात उतरते. बिहागची तृप्तता मला या प्रकारची वाटते . जेव्हा मिळणे महत्वाचे नसते, ते जाणणे पुरेसे असते.

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.




7 thoughts on “तेरे सूर और मेरे गीत-लता मंगेशकर ”

  1. उदय शेवडे

    राग आणि गाणी या दोहोंची उत्तम निवड. अप्रतिम लेख.
    गाण्याची पहिली परीक्षा दिली पास झालो, आपल्या लेखाच्या निमित्ताने दे शिकण्याचे दिवस आणि राग आठवले….पुढे गाणं हा आपला प्रांत नाही हे लक्षात आल्यावर दुसरी परीक्षा दिली नाही.

    1. प्रिया,

      मागे वाचला होता .
      एडिटेड परत वाचताना तितकाच आनंद मिळाला.
      लता ❤️❤️❤️❤️
      तिच्यासाठी खास जागा आहे आपल्या प्रत्येकाच्या हृदयात.

  2. एका दैवीस्पर्शाची अद्भुत स्वरयात्रा 👌🏽❤❤❤❤
    कमाल कमाल लिहिलंय👌
    हा स्वर अबाधित आहे.

  3. Apratim lekhan priya tai!!!!! niwadlele gane aaply chokhandal panachi sakshya nishchitach detat yat shanka nahich!!!!!!!!!!

  4. कमाल आहे तुझ्या अभ्यासाची. एकदा पूर्ण वाचला लेख, पण समाधान झाले नाही म्हणून परत वाचला. खूप सुंदर लिखाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *