Skip to content

Happy Valentine. Best scenes.

भाग ३ 

देहास आठवे स्पर्श 
तू दिला कोणत्या प्रहरी 
कीं धुके दाटले होते 
या दग्ध पुरातन शहरी……

वाट पाहणे याचा समानार्थी शब्द उर्मिला असावा इतके या न संपणाऱ्या विरहाशी तिचे जवळचे नाते आहे. तसाही रामायणातील प्रत्येक व्यक्तिरेखेच्या कपाळी हा शब्द नियतीने ठळक लिहिला आहे पण त्या मागे एक हेतू आहे,  कर्तव्य आहे. अगदी लक्ष्मण रेषा ओलांडण्याचा पश्चाताप आहे.  उर्मिलाचे वाट पाहणे हे तिला न विचारात घेता तिच्यावर लादलेले आहे. तिच्याप्रती आपले काही कर्तव्य आहे, निदान वनवासात जाण्यासाठी तिची जुजबी  का होईना परवानगी घेणे आवश्यक आहे असाही विचार तिला सोडून जाताना केला गेला नाही न परत तिच्या शय्या गृहात येताना केला गेला आहे.  तेवढेही महत्व त्या व्यक्तिरेखेला वाल्मिकीनी दिले नाही …… 

अशा अनेक स्त्रिया इतिहासात आहेत की ज्यांचे अस्तित्व तर पानावर लिहिले गेले आहे पण त्यांच्या असण्याला तसा अर्थ नाही. त्या असलेले पान फाडून  टाकले तरी फरक पडणार नाही .  त्यांचे मोठेपण की  जे आयुष्य वाट्याला आले ते त्यांनी  धीराने स्वीकारले.  कदाचित या मौनामुळेच त्यांच्या पतींना, प्रियकराना एक वलय मिळाले . एका निश्चयाने प्रेरीत होऊन माणसे घर सोडतात . आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात प्रसंगी आपल्या माणसांकडे दुर्लक्ष करतात.  तेच ध्येय त्यांच्या सहचारीणीचे असेल तर ठीक पण ती  साधी संसारी गृहिणी असेल किंवा तिच्या काही वेगळ्या आकांक्षा असतील तर ! तिच्या इच्छेला काहीच महत्व नाही?
आपल्या इथे कुटुंब आणि त्या प्रति असलेल्या कर्तव्याला प्रचंड महत्व आहे आणि पुरुषांच्या आकांक्षांना झुकते माप दिलेले आहे  पण जिथे स्त्री आणि पुरुष एका फूटपट्टीनेच मोजले जातात त्या पाश्चात्य समाजात मात्र स्त्रीला एवढे गृहीत धरले जात नाही.
” Tie a  ribbon round the old oak tree ” हे गीत  हे अशा एका पुरुषाचे गीत आहे की जो काही कारणास्तव आपल्या कुटुंबापासून, तिच्यापासून दूर आहे. मध्ये अनेक वर्षाचा काळ गेला आहे. एकमेकांची कसलीच माहिती नाही. तो परत येवू शकेल का याची शाश्वती नाही. या काळात तिने जो एकटेपणा सोसला आहे त्याची जाणीव आहे त्याला. स्त्रीच्या सुद्धा काही गरजा असतात. जबाबदारी स्वताच्या खांद्यावर घेताना, निभावताना तिलाही वाटू शकते की हे ओझे शेअर करणारा खांदा मिळाला तर … 
आणि म्हणून तो साशंक आहे . 

I’m coming home I’ve done my time,
Now I’ve got to know what is and isn’t mine,
If you receive my letter tellin’ you I’d soon be free,
Then you’ll know just what to do, if you still want me, if you still want me.
Tie a yellow ribbon `round the ole oak tree,
It’s been three long years, do ya still want me?

युद्धात सैनिक बेपत्ता व्हायचे. त्या काळात तर अनेक वर्ष कसलीच माहिती मिळायची नाही. बायका वाटेला डोळे लावून बसायच्या आणि पुरुष कारागृहातील यातना तेव्हा युद्धात सैनिक बेपत्ता व्हायचे . कसलीच माहिती नाही . बायका वाटेला डोळे लावून बसायच्या आणि पुरुष त्या यातना कुटुंबाच्या आठवणीवर सहन करायचे. जेव्हा परत जायची वेळ यायची  तेव्हा आपले स्वागत होईल, का वाट्याला नकार येईल याचा घोर असायचा जीवाला. अशावेळी बायका केसांना पिवळी रिबीन बांधून त्यांचे स्वागत करायच्या. त्यांच्या बद्दल प्रेम आणि निष्टा व्यक्त करण्याची ती पद्धत होती.  . 
या गीतातील नायक बस मधून अनेक वर्षांनी घरी येतो आहे .
ती आपल्यासाठी थांबली असेलच याची खात्री नाही पण त्यासाठी तो तिला दोषही देत नाही हा नायक बस मधून अनेक वर्षांनी घरी येतो आहे. ती आपल्यासाठी थांबली असेलच याची त्याला खात्री नाही. त्यासाठी तो तिला दोषही देत नाही .
तो म्हणतो, If I don’t see a ribbon ,round the ole oak tree, 
I’ll stay on the bus, forget about us, put the blame on me…. 

माझ्यावर दोष घेऊन मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईन.
या गाण्यावर आधारित “ The yellow handkerchief” हा फार गाजलेला जपानी सिनेमा आहे. १९८५ मध्ये प्रदर्शित  झालेला बालू महेंद्र दिग्दर्शित “ यात्रा” हा सिनेमा या चित्रपटावर आधारित आहे.

१९७५ ते १९७७ च्या आणीबाणीच्या अनेकांना चौकशीविना तुरुंगात डांबण्यात आले. त्यांच्यावर अत्याचार झाले. मारहाण झाली. अशा काळात घडलेली हे काल्पनिक घटना.
सिनेमाची सुरुवात होते लहान मुलांच्या सहलीने. शाळेची सहल आहे. मुलं मस्ती करत आहेत, प्रश्न विचारत आहेत, प्रवास एवढा मोठा आहे की त्यांचा काही वेळ जात नाही. शाळेतले शिक्षक कंटाळून गेले आहेत.
एक छोटासा मुलगा विचारतो, पावसात हत्ती काय बरे करतात ?”
आता हा काय प्रश्न आहे! काय उत्तर देणार !
तेवढ्यात एका छोट्या मुलाच्या बाजूला बसलेला एक प्रवासी सांगतो “भिजतात “
मुलं हसतात, शिक्षक सुटकेचा निश्वास सोडतात. या कशाशी देणेघेणे नसल्यासारखा तो आगंतुक खिडकीबाहेर शून्य नजरेने पाहत बसतो. त्या बसमधील शिक्षकाला कुतूहल वाटते. त्यात तो  पाद्री आहे.
“ तू ख्रिस्ती नसलास तरी हरकत नाही. मनातले दुःख कुणालातरी सांगितल्यावर हलके होते हे माहिती आहे ना तुला”
प्रदीर्घ काळाचे दुःख आता बाहेर यायला सुरुवात होते.
यात्रा हा सिनेमा फ्लॅशबॅक मध्ये उलगडतो.

ह्या प्रवाश्याचे नाव आहे उन्नीकृष्णन. फॉरेस्ट ऑफिसर म्हणून त्याची नेमणूक एका गावात झाली आहे. तो अनाथ आहे. या जगात त्याच्या शाळेतील एक मित्र सोडून त्याला कुणी जवळचा नाही. त्याच्या आईला तो आई मानतो. त्यांनाही पाहून वर्षे लोटली आहेत. या गावात त्याची ओळख एका मुलीशी होते. तुलसी , त्याच्याहून खूप लहान आहे. निष्पाप आहे. वडील व्यसनी असणे हे एक दुःख असले तरी वडिलांचं मुलीवर प्रेम आहे. एका दुकानात काही गरजेच्या वस्तू घेताना तिची बडबड त्याला आकर्षून घेते.
गावातील एका झाडाखाली एका कृष्णाची मूर्ती आहे. दर दिवशी त्याला फुले वाहायला येताना, या दोघांची भेट होते. ओळख होते, ओळखीचे रूपांतर प्रेमात होते आणि उन्नीकृष्णन तिला मागणी घालतो.
“ इथे येणारे ऑफिसर आपले मन भरले की मुलींना सोडून निघून जातात. त्यांच्यापासून लांब राहणे चांगले “ तिचे वडील सावधगिरीचा इशारा देतात पण उन्नीकृष्णन पुढील काही दिवसांत मी लग्न करतो हे वचन देतो. 
त्याच्या बाजूने त्याला कुणीही नातेवाईक नाहीच, आहे तो त्याचा मित्र.

“तू पत्र पाठवून बोलावून घे ना. मला भीती वाटते आहे तू जाताना “
“किती वर्षात भेटलो नाही मी त्याला. त्याला घेऊनच येतो ग , तू काळजी करू नकोस “

असे उत्तर देऊन उन्नीकृष्णन निघतो पण त्याच्या मित्राच्या मृत्यूची बातमी त्याला समजते. त्याच्या आईचे सांत्वन करून परत निघताना पोलीस त्याला पकडतात. कोणत्यातरी अतिरेक्याशी त्याच्या चेहेऱ्याचे साम्य असते. हा आणीबाणीचा काळ, केवळ संशयाने माणसांना अटक होत होती, कोणतीही ट्रायल न होता त्यांना आत डांबले जात होते, अन्वनित छळ केले जात होता. त्यांच्या वतीने ना कुणी वकील होता, ना कोर्ट. काहीही चौकशी न करता, त्याला शिक्षा ठोठावली जाते.
तुलसी वाट बघत असेल याची त्याला कल्पना असते. स्वतःचे भविष्य तर अंधारात असणार हे जाणून तू मला विसरून कुणाशी तरी लग्न कर असे पत्र तो तुळशीला पाठवतो. याच दरम्यान आपल्या सहकाऱ्याला वाचवताना, त्याच्याकडून एका अत्याचारी अधिकाऱ्याचा अपघाताने खून होतो. आता शिक्षेचा काळ दहा वर्षाचा होतो.
मन मोठे लोभी असते. तिने स्वतःचे आयुष्य जगायला परत सुरुवात करावी असे त्याला मनापासून वाटत असते पण तरीही कुठेतरी मनात एक आशेची पणती मिणमिणत असते. शिक्षा संपण्याचा काळ जसा जवळ येतो तेव्हा त्याला वाटते , “ जर ती त्याची वाट पाहत असेल तर !”
एक संधी घ्यायला काय हरकत आहे अशी मनाची समजूत घालून तो तिला परत एक पत्र पाठवतो.
“प्रियतमा तुलसी,
माझ्या शिक्षेचा काळ आता संपेल. एवढ्या वर्षात केवळ तुझ्या आठवणीने मी स्वतःला जिवंत ठेवले आहे. मनात कुठेतरी आशा आहे की  तुझ्याही मनात मी जिवंत असेन. जर तू माझ्यासाठी थांबली असशील तर तू आपल्या आवडत्या झाडाकडे दिवा लावून ठेवशील. तो दिसला तर मी परत येईन. आपले आयुष्य नव्याने सुरु करू. तो नसेल तरी मला तुझा राग नाही. तुझे चांगले व्हावे हीच मनापासून इच्छा आहे. मी माझ्या वाटेने निघून जाईन.
तुझाच
उन्निकृष्णन

फ्लॅश बॅक संपतो.
बसमध्ये शांतता असते. केवळ उन्निकृष्णन नाही तर बसमधील सर्व प्रवासी आता खिडकीतून बाहेर पाहू लागतात. सर्वाना प्रतीक्षा असते ती तेवणार्या दिव्याची.

गाव येता येता दिवेलागणीची वेळ होते. बसमध्ये आता शांतता पसरलेली असते. कुणीच बोलत नाही. उन्नीकृष्णन एका पुतळ्यासारखा बसून असतो. त्याच्या डोळ्यापुढे असतो तो बाहेरचा अंधार.
ती वाट पाहत असेल का ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला सुद्धा भीती वाटते.
झाडाकडे येणाऱ्या वळणाकडे बस येते आणि ड्रायव्हर ब्रेक दाबतो.
एक नाही, दोन नाही, शेकडो पणत्यांनी आजूबाजूचा परिसर प्रकाशमान झालेला असतो.
उन्नीकृष्णन उठतो. चेहेऱ्यावर हसू , डोळ्यात पाणी पण आधीच्या जड झालेल्या पावलांनी वेग पकडलेला असतो.
अंधारात उजळून निघालेले ते असंख्य दिवे शोभनाच्या त्याच्यावरील प्रेमाची साक्ष देत असतात. संपूर्ण पडदा आता तेवणाऱ्या असंख्य दिव्यांनी व्यापून जातो. त्या काळोखात दिसतो तो उन्नीकृष्णनचा चेहरा. वाढलेली दाढी, एवढ्या वर्षांच्या यातनांनी थकलेला, वयस्क झालेला चेहेरा आणि त्या काळोखात चमकणारे त्याचे पांढरे शुभ्र दात. डोळ्यात पाणी आहे पण हसू सुद्धा.
त्याच्या समोर असतो तो त्याच्या तुलसीचा चेहेरा .. त्याचेच प्रतिबिंब तिच्या डोळ्यात आहे.
वारा सुटलेला आहे. दिव्यांना मात्र माहिती आहे की आपले अस्तित्व टिकवणे या दोघांसाठी किती महत्वाचे आहे. वाऱ्यालाही न जुमानता ज्योत ताठ ठेवून ते त्या दोन प्रेमिकांना आशीर्वाद देत आहेत.
या सिनेमाला राष्ट्रीय पारितोषकाने गौरवले गेले आहे.




2 thoughts on “Happy Valentine. Best scenes.”

  1. खरा व्हॅलेंटाइन 💜
    उन्नीकृष्णन आणि तुलसी किती मनापासून प्रेम करणारे जीव!
    आजच्या उठवळ आणि उथळपणा अधिक असणाऱ्या प्रेमाच्या झटपट काळात या दोघांचे प्रेम किती अद्भुत वाटावे असे आहे. संयम, विश्वास याची परमावधी. आज तर या दोन गोष्टी मिळणे दुर्मिळच. पॅकेज जमाना असलेल्या काळातील युवक युवतींनी सहजीवनाचा जोडीदार अशा विश्वासाने जोडून ठेवता येतो हे आवर्जून समजून घ्यावे या सिनेमातून.
    Love you di,,thank you for such fabulous writing and sharing. 💜👌🏽👌🏽

  2. प्रिया,

    आहाहा,
    खरा व्हॅलेंटाईन…💜🩷
    नक्की बघते.
    तुझ्या लेखणीने ते दिवे जास्त च तेजाळले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *