भाग २
प्रसिद्ध मल्याळम लेखक, वैकम मुहम्मद बशीर यांच्या “मतिलुकल” या कथेची, उत्कृष्ट प्रेमकथेत गणना होते. ही आत्मकथा आहे. या कथेचा नायक बशीर आणि त्याची प्रेमिका नारायणी एकमेकांना कधीही भेटू शकत नाहीत. एकाच तुरुंगात असले तरी एका अजस्त्र भिंतीमुळे त्यांच्या कोठड्या एकमेकांपासून अलग आहेत. ही भिंत भक्कम आहे आणि उंच आहे. ती ओलांडणे त्यांना शक्य नसल्याने, एकमेकांचे दर्शन होणे अशक्य. त्यांचे प्रेम मात्र उत्कट आहे.
बशीर हा स्वातंत्र्य सैनिक आहे. त्या काळातील असंख्य लोकांसाठी गांधीजी हे देवतुल्य व्यक्तिमत्व. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन बशीरने शाळा सोडून स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आहे. मिठाच्या सत्याग्रहात पोलिसांनी त्याला बेदम मारहाण करून तुरुंगात डांबले तरी स्वातंत्र्यासाठी लढण्याची उर्मी काही कमी झाली नाही. तुरुंगातून सुटल्यावर पोलिसांचा ससेमिरा चुकवत सात वर्षे जातात. घरी परत येताना सुगावा लागल्याने पोलीस त्याला परत अटक करतात. एक वर्ष तर त्याची ट्रायल सुद्धा होत नाही. तो भूक हरताळ करतो. त्यामुळे कोर्टाचे लक्ष वेधले जाते. देशद्रोहाचा आरोप सिद्ध होऊन त्याला अडीच वर्षाची शिक्षा होते. 
बशीर लोकप्रिय लेखक आहे. तो तुरुंगात येण्याआधीच त्याचे नाव परिचित आहे. जे कॉन्स्टेबल त्याला आत नेतात, ते त्याला बिडीचे बंडल, दाढी करायला ब्लेड, आगपेटी बक्षीस देतात. हे बाळगायला बंदी आहे. हेड वॉर्डन आधी ते जप्त करतो पण बशीर खूप लाघवी आहे. बोलका आहे आणि प्रामाणिक असूनही खूप हळवा आहे . कोठडीत जाण्यापूर्वी त्याच्या सर्व वस्तू त्याला परत मिळतात. एवढेच नाही तर वॉर्डन बरोबर त्याची मैत्री जुळते. त्याचा साधेपणा, मिश्किल आणि प्रेमळ स्वभाव सर्वांना त्याच्याकडे आकर्षित करतो. काही तर सराईत गुंड असतात, काही क्रूर आणि कडक पोलीस असतात पण बशीर या सर्वांचा लाडका होतो. लोक त्याच्याकडे आपले मन मोकळे करतात. तुरुंगाच्या खडकाळ जमिनीवर बशीर गुलाबाची बाग फुलवतो.
असिस्टंट जेलर तर खुश होऊन त्याला लिहायचे कागद आणून देतो. सर्व चांगले असेल तरी असतो हा तुरुंगच. मग तो सोन्याचा का असेना.त्यातच बातमी येते, सर्व राजकीय कैद्यांना , सोडण्यात येणार आहे. सर्वांच्या आशा पालवतात पण हाय रे दैवा! बशीरचे नाव त्यात नसते.
आतापर्यंत सर्वांना धीर देणाऱ्या बशीरचा आता संयम सुटतो. तो निराश होतो. एकटेपणा त्याला असह्य होतो. तो झाडांशी बोलतो, खारींशी भांडतो, अगदी पळून जाण्याचा बेत करतो. आणि अचानक त्याच्या कोठडीच्या जवळ असलेल्या भिंतीच्या विरुद्ध बाजूने त्याला एका स्त्री चा आवाज येतो. बशीरचे आयुष्य बदलते.
माणसाचे एकटे असतेने किती असह्य आहे याची जाणीव कुणीतरी दृष्टीपथात आल्यावर होत असावी. त्या क्षणी तरी बशीरला वाटते कुणाशी तरी बोलावे, त्याला स्पर्श करावा .. फक्त हाताने नाही तर हृदयाने.
निर्मनुष्य शांततेला भेदून जाणारा तो अनोळखी आवाज अचानक खूप जवळचा होऊन जातो.
“नारायणी “ ती आपले नाव सांगते.
वय -फक्त बावीस आणि त्या वयाला शोभेसा काहीसा अल्लड, काहीसा अधीर आवाज असतो तो.
एक अनवट नाते त्या दोघांत आकाराला येऊ लागते. तो तिला गुलाबाचे रोप देतो . त्याची एक सुकलेली फांदी ती वेगळी करते. फांदी उंच उडवली याचा अर्थ , ती पलीकडे आली आहे.
बशीरचे डोळे त्या फांदीचा शोध घेतात ..पूर्ण दिवसभर आणि जेव्हा ती दिसते तेव्हा ते चमकतात.
काय नसते त्यात ! आनंद, उत्सुकता , प्रेम , ओढ.
खरेतर ती कशी दिसते, तिचे वय काय हे जाणून घेण्यात बशीरला उत्सुकता नसतेच. तिच्या शब्दांवर तो विश्वास ठेवून एक काल्पनिक जग त्या आवाजाभोवती उभे करतो. तो आणि ती असलेले त्यांचे जग.
अचानक एक दिवस संधी चालून येते. ती कुणासाठी तरी हॉस्पिटलमध्ये जाणार असते. ते भेटायचे ठरवतात.
उद्याचा सूर्य खास असतो.
उद्याचा सूर्य खरंच खास असतो, तो बशीरच्या सुटकेची ऑर्डर घेऊन उगवतो.
तेव्हा बशीरसाठी स्वातंत्र्याचा अर्थ पूर्ण बदललेला असतो. ज्या जगात त्याला जायचे असते; ते बाह्य जग त्याला तुरुंगवत भासू लागते.
सर्वोत्कृष्ट प्रेमकथेत “मतिलुकल” या कथेचा समावेश आहे. कथा बघताना मला असे वाटले की प्रेम म्हणजे सोबत, दिलासा .
एकाकी अवस्थेत कुणीतरी जिव्हाळ्याने पुढे केलेला हात.
बशीरचे व्यक्तिमत्व सकारात्मक आहे. कोणताही प्रसंग असो , त्याच्या चेहेऱ्यावरचे स्मित ढळत नाही. तुरुंगातील एका कैद्याला फाशी होणार असते. त्याला चहा करून देताना तो सांगतो, मृत्यूला सुद्धा हसतमुखाने सामोरे जा .
त्या रात्री तो, स्वतः सुद्धा झोपत नाही . कारण विचारले असता, त्याचे उत्तर असते, “ मी मृत्यूला सोबत करत होतो “
या जगात कितीही सक्षम माणूस असो, जगण्यासाठी माणसाला, माणसाच्या सोबतीची, शब्दांची, सहवासाची गरज आहे हे हा सिनेमा दाखवून देतो.
फेसबुक , इन्स्टा , व्हाट्सऍप येण्याच्या अगोदरचा हा सिनेमा आहे. ह्या सिनेमात दोन जीवांना अलग करणारी दगडांची भिंत आहे. त्याने त्या दोघांनाही फरक पडत नाही ..डिजिटल बॅरिअर आपल्याला सुद्धा संवादापासून कुठे अडवतो !
स्क्रीनच्या पलीकडून अनोळखी लोकांच्यात सुद्धा संभाषण रंगते , आणि ते शब्दांपुरते मर्यादित राहत नाही हा अनुभव अनेकांना येतो म्हणून तर ही माध्यमे लोक सोडून जात नाहीत.
सिनेमाच्या शेवटच्या वीस मिनिटांत बशीर ला त्याची नारायणी भेटते.
विमनस्क अवस्थेत तुरुंगाच्या आवारात येरझारा मारत असलेल्या बशीरला भिंती पलीकडून आवाज येतो,
“ कोण ते शीळ मारत आहे? “
आवाज काहीसा उंच , लाडिक.
“ मी बशीर, लेखक आहे. राज्यद्रोहाच्या आरोपाखाली मला आधीच वर्षाची शिक्षा झाली आहे आणि तू ?”
“ मी नारायणी “
बशीरच्या चेहेऱ्यावरचे हास्य रुंद होते .
आणि वय ?
“ बावीस “
त्याचा चेहेरा फुलून येतो .. अहं , ती तरुण आहे , स्त्री आहे याहीपेक्षा ती त्याच्याशी संभाषण करते आहे याचा आनंद आहे तो.
तिला सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. चौदा वर्षाचा काळ घालवायचा आहे आणि त्यातले फक्त एक वर्ष झाले आहे.
“ मला एक गुलाबाचे रोप देशील का ?” ती विचारते.
“ तुला कसे माहित या रोपांबद्दल? “
“ हा तुरुंग आहे , इथे काहीच गुपित नाही. सगळ्यांना सगळं समजते “
इथे मात्र त्या दोघांचे एक खाजगी जग तयार व्हायला सुरुवात होते , ज्याचा सुगावा तुरुंगात कुणालाही लागू नये यासाठी ते दोघे प्रयत्नशील असतात.
बशीर तिला गुलाबाचे रोप देतो. त्यातलीच एक काटकी ती वेगळी करते
.” मी येईन तेव्हा ही फांदी वर उडवीन , मग तू बोलायला ये “
प्रत्येक दिवशी ते दोघे भेटतात. त्यांच्यातल्या गप्पा आता खाजगी होऊ लागतात. दोन प्रेमिकांचे कूजन असते ते. आजूबाजूला कुणीच नाही , असते ती भिंत .. एकमेकांना स्पर्श करण्याची तळमळ वाढते. रात्री संपता संपत नाहीत. झोप उडून जाते आणि संभाषण मानसिक पातळीवरून अत्यंत उत्कट होत जाते.
कधीही न पाहिलेल्या प्रेमिकेबरोबरचे हे संभाषण खरेतर आयुष्याशी केलेला संवाद आहे. मूर्त, अमूर्त , कामुकतेकडे झुकणारे आणि शेवटी अध्यात्माला स्पर्श करणारे . असे म्हणता येईल, सर्व शारीरिक आणि आत्मिक भावनांना शब्दात पकडण्याचा प्रयत्न पट्कथाकाराने केलेला आहे आणि मामुट्टीने आपल्या अभिनयाने त्यांना जिवंत केले आहे.
हे संभाषण इथे लिहिणे मला शक्य नाही.
..असे म्हणतात, कामुकता हा जन्माचा पाया आहे म्हणून पवित्र आहे ..ते पाहायचे असेल तर मतिलुकल (Mathilukal) हा सिनेमा पहा . युट्युब वर इंग्रजी सबटायटल्स बरोबर पाहता येईल .
Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.
…

बशीरला वाटते कुणाशी तरी बोलावे, त्याला स्पर्श करावा .. फक्त हाताने नाही तर हृदयाने.
कधीही न पाहिलेल्या प्रेमिकेबरोबरचे हे संभाषण खरेतर आयुष्याशी केलेला संवाद आहे. मूर्त, अमूर्त , कामुकतेकडे झुकणारे आणि शेवटी अध्यात्माला स्पर्श करणारे .
मला वाचताना सिनेमा बघितल्या सारखे वाटले. संयत प्रेमकथा. जबाबदारी, कर्तव्य, राष्ट्रप्रेम, झोकून देण्याची वृत्ती आणि एकमेकांविषयी असलेली अशारिरी आस्था, निष्ठा. कमालीचा सिनेमा तितकेच सुंदर रसग्रहण. खूप खूप धन्यवाद दी हे लिहून शेयर केल्याबद्दल.
Thank you so much Kamini . This is on YouTube with English subtitles. Please do watch.
प्रिया,
सुंदर रसग्रहण..❤️💐
तुझ्यामुळे इतर भाषेतले क्लासिक चित्रपट कळतात.आणि नक्की बघितले जातात.
And don’t miss this Vidula 🙂
तुझे शब्द सामर्थ्य अचाट आहे..आणखी काय लिहू.सिनेमा नक्की बघेन
Thank you so much Shraddha 🙂