Skip to content

Happy Valentine . Best scenes .

part 1
“ घायल की गत घायल जाने, और न जाने कोई “ जोगन

१९५० साल. स्वातंत्र्य मिळवून तीनच वर्ष झाली होती. ब्रिटिश- सेन्सॉरच्या कडक नियमांमधून सिनेजगत मुक्त झाले होते. वेगवेगळे विषय घेण्याचे धाडस निर्माते दाखवू लागले होते. त्यावेळचे प्रसिद्ध निर्माता चंदुलाल शहा यांना एका इंग्रजी सिनेमाची कथा आवडली. कथेचा विषय हॉलीवूडसाठी सुद्धा धाडसी होता. एक माणूस एका “नन” च्या प्रेमात पडतो असा या कथेचा विषय होता. दिग्दर्शक किदार शर्मा यांनी हे आव्हान स्विकारले. केवळ एकोणतीस दिवसांत नर्गिस आणि दिलीप कुमार यांच्याबरोबर त्यांनी “जोगन” हा सिनेमा बनवला.
मदर इंडिया, रात और दिन या भूमिकांसाठी नर्गिसला गौरवले गेले. आर के बॅनरचे सिनेमा आणि या भूमिकांच्या चर्चा झाल्या , त्यात जोगन हा सिनेमा मात्र  व्यावसायिक पातळीवर यशस्वी होऊनही दुर्लक्षित राहिला.
तरीही विषय आणि अभिनय यांचा विचार करायचा झाला तर नर्गिसचा हा सर्वोत्तम सिनेमा म्हणता येईल. 

हिंदू, जैन आणि बुद्ध जन्मात वैराग्य आणि सर्वसंगपरित्याग यांना हजारो वर्षाची परंपरा आहे. मध्य भारतात योगिनींना समर्पित मंदिरे आहेत ज्यांचा काळ नवव्या शतकाच्या आधीचा आहे. याशिवाय अनेक लोककथा आणि लोकगीतात स्त्री संतांचा उल्लेख आहे. वेदांनी अथवा धर्मशास्त्राने स्त्रियांना प्रवृज्या स्विकारणे म्हणजे संन्यास घेणे हे योग्य नसल्याचे सांगितले असूनही अनेक स्त्रियांनी स्त्रियांवरची बंधने आणि कुटुंबाप्रती असलेली त्यांची कर्तव्ये धुडकावून घराच्या उंबरठ्याबाहेर पाऊल टाकून, भौतिक सुखांचा त्याग करून आपले आयुष्य परमेश्वराला अर्पित केले आहे.सर्वस्वाचा त्याग केल्याची भावना अंगात बाणविणे हे संन्यासाश्रमाचे प्रमुख तत्व आहे. अहिंसा, सत्य आणि अस्तेय या व्रतांचे संन्याशाने निष्ठेने पालन केले पाहिजे हा धर्म आहे.
नियम पाळायला हवे हे मान्यच पण सगळे पाश मागे सोडून निघून जाणे हे सर्वसामान्य लोकांना सहज शक्य आहे का?
भाैतीक सुखाचा मार्ग हा कधीही न शमणाऱ्या तहानेसारखा असतो. भावनिक बंध असतात, शरीराची नैसर्गिकओढ असते, कुणावर तरी जीव ओवाळून टाकण्याची अंतर्भूत प्रेरणा असतें.आपल्या धर्मात संन्यासाश्रम हा चौथा आश्रम आहे. आपली कर्तव्ये, आपली आसक्ती, आपल्या इच्छा अपेक्षा भागवून घेतलेली निवृत्ती. एकदा संन्यास घेतला की लौकिक भावना, लौकिक जग यांच्याशी तुमचे नाते तुटते. तुमचा मोह संपतो. जगण्याची आसक्ती  संपते. निरपेक्ष दृष्टीने तुम्ही  जगाकडे पाहात परमेश्वर प्राप्तीच्या साधनेत तुम्ही मग्न होतात. दिसतं त्याच्या पलीकडे मोक्षाकडे जाणाऱ्या मार्गाचा संन्यासी वाटसरू होतो.
हा मार्ग खडतर आहे. ही संयमाची परीक्षा आहे. संतांनी सुद्धा चांगलें आचरण ठेवून प्रपंच नेटका करावा असेच सांगितले आहे. कोणत्या न कोणत्या कारणाने संन्याशाला परत यावेसे वाटलें तर! त्याचा निग्रह कोलमडून पडला तर! त्याचे स्खलन झाले तर! 
धर्मात आणि समाजात त्याला परत सामावून घेतले जाईल का या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा धाडसी प्रयत्न आहे.

जोगनची कथा साधी आहे. एक नास्तिक माणूस (विजय) आयुष्य उपभोगण्यात रमलेला असतो. देवावर विश्वास नसल्याने देवळात जाण्याचा प्रश्नच नसतो. आपल्या आत्याला भेटायला आलेला असताना, एक सुरेल भजन त्याच्या कानी पडते.
“ घुंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे”
त्या मधुर आवाजाची आणि घुंगटाच्या आड लपलेल्या  सुंदर चेहेऱ्याची किमया अशी की नास्तिक विजय दर दिवशी त्या आवाजाच्या मालकिणीच्या  आकर्षणाने देवळात जाऊ लागतो.
तिला नाव नसते. जगासाठी ती असते फक्त “देवीजीं”. मंदिराबाहेरील एका छोट्याश्या झोपडीत तीचे वास्तव्य असते. ती कुठून आली, कुठे जाणार हेही कुणाला माहित नसते. तिची तपस्या, भगव्या वस्त्राच्या आड दडलेला तिचा चेहेरा, डोळ्यात भरून राहिलेली अगम्य उदासी आणि चेहेऱ्यावर असलेला निर्विकार भाव भेदून आत जाण्याची कुणाचीच प्राज्ञा नसते.
गूढता जेवढी जास्त, तेवढेच आकर्षण सुद्धा वाढत जाते.
विजयला स्वतःची लाज वाटते. एका संन्यासिनी बद्दल आपण विचार करत आहोत हे रास्त नाही याची त्याला जाणीव तर आहे पण ते टाळणे त्याच्या आवाक्यात राहिलेले नाही.
आकर्षणाला तर्काच्या माध्यमातून रोखता येत नाहीच. तिच्या डोळ्यातील उदासी आणि आवाजातील झपाटलेपण त्याचा पाठलाग करत राहते.
“ घायल की गत घायल जाने, और न जाने कोई “
पहिल्याच नजरेत प्रेम होते ही आख्यायिका वाटावी एवढे चर्वण दुनियेतील प्रेमकथांनी केले आहे. “ती पाहताच बाला कलिजा  खलास झाला” असे सांगायला सुद्धा कुणी संकोचेल. तरीही खरे सांगायचं तर पहिली नजरभेट हा प्रेमाच्या  प्रवासाचा आरंभ बिंदू असतो.
“ जेव्हा तिने माझ्याकडे आपली नजर वळवली, तेव्हाच माझ्या लक्षात आले की एकतर आता माझे मरण निश्चित आहे किंवा माझ्या जगण्याची ही सुरुवात आहे”
विजयला असेच वाटते .
तो तर घायाळ झाला आहेच पण तिचे काय!
त्याला हे माहिती नाही की अज्ञाताच्या शोधात, संसार परित्याग करून निघालेल्या मनात सुद्धा त्याच्या आगमनाने खळबळ माजली आहे.
आपण सर्वच मोहांवर, आसक्तीवर विजय मिळवला आहे ही जी तिची खात्री असते, ती हा नवागत धुळीला मिळवतो. 

जे समोर आहे तेच जग खरं म्हणत अंतर्यामी कायमची अतृप्ती घेऊन आपण जगतो नाही का?
सुखाची उणीव निर्माण झाली की ती पोकळी भरण्यासाठी जीवन ऊर्जेचा प्रचंड व्यय हाेताे. मुळात सुख कोणते आहे हे न समजल्याने माणूस जे नको त्याच्याही मागे जिद्दीने जातो आणि लक्षात येते की निवडलेला मार्गच चुकीचा आहे, अर्थात पुढे येणारे गंतव्य सुद्धा. ऐहिक सुखा  पलीकडे जाणारा एक आत्मोन्नतीचा कठीण पण शाश्वत मार्ग आहे तरिही तो सहसा कुणी धरत नाही. जो भाग्यवान असतो तोच ह्या मार्गाचा पांथस्थ होतो.
केवळ जग नाकारण्यासाठी हातात येणारा  कोणताही मार्ग धरणे हे शेवटी भ्रम निरास करते.

जोगिणीला हे समजत असते पण ते स्विकारायची तिची तयारी नसते. त्या नवगताच्या आगमनाने मनात उठलेले वादळ असह्य असते. “ परपुरुषाशी मी बोलत नाही “ हे सांगून ती त्याला थांबवायचा प्रयत्न करते. “ओम प्रभू शांती “ म्हणत त्याच्या विचारांना हुसकावून लावण्याचा निष्फळ प्रयत्न करते.
तिच्या बोलण्याचा मान तो राखतो. तिच्या उंबरठ्यावर त्याने ठेवलेलं फूल  मात्र तिच्या हृदयाला साद घालते. 

जोगन हा सिनेमा अतिशय बोल्ड होता.
घरातील लोकांनी केलेल्या विश्वासघातामुळे एक मुलगी जगाकडे पाठ फिरवते. संन्यास घेते. आता जगाशी, त्याच्यात राहण्यासाठी आवश्यक असलेया भावभावनांशी तिचे काही नाते नाही .मन मरून गेलेले आणि लागलेली अज्ञात्याची ओढ. त्यावेळी तिच्या आयुष्यात एक युवक येतो. झंजावतच तो. आतापर्यंत तिने केलेल्या तडजोडींना तो उधळवून लावतो. संन्यास घेणे म्हणजे जगणे नाकारणे नव्हे.
जगाशी नाळ तुटणे आणि तोडणे यात फरक आहे ना !
भ्रमात जगणाऱ्या त्या मुलीला आपल्या आतल्या स्त्रीत्वाची  जाणीव होते, मुखवटा गळून पडतो आणि स्वतःच्या मनाशी खोटे बोलतो आहोत हे जाणवून ती हादरते. 

तो तर नास्तिक आहे. जगाने तिच्यावर लादलेल्या बंधनाची त्याला पर्वा नाही. आधी तिच्याबद्दल असलेले अगम्य आकर्षण, मग कुतूहल नंतर ओढ आणि मग त्याचे रूपांतर प्रेमात होते. 
तिच्या कोशातून तिला बाहेर काढण्याची त्याची धडपड आणि आपल्या तटबंदी ढासळून पडत आहे त्याची तिला झालेली जाणीव . …स्व:ताला सावरण्याची धडपड आणि ती विफल होते आहे हे समजल्यावर केलेला स्व:ताच्याच मनाशी झगडा …

मत जा मत जा जोगी, पाँव पडू मैं तोरी
प्रेमभक्तीच्या वेगळ्या मार्गाने जाणार्यांची नियती हीच …

चंदन की मै चिता रचाउ , अपने हाथ जला जा … जोगी ….
“जळून जळून माझी राख झाली तीच आता अंगाला फासून जा”, असे म्हंटले तरी जाणारा जोगी थांबतो का ? त्याला आयुष्यातून जाऊन द्यायची तिच्या मनाची तयारी नाही आणि त्याला तिच्या आयुष्यात स्थान मिळणे समाजाला मान्य नाही .
जोगिणीच्या प्रतिमेत अडकलेल्या स्त्रीची या गुंत्यातून सुटण्याची विफल धडपड आहे ही . किदार शर्मा यांनी हा नाजूक विषय अत्यंत समर्थपणे  हाताळला आहे. शेवट अपेक्षित. दोन आग्रही माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा सत्य असणारे प्रेम सुद्धा कमजोर पडते. मते जिंकतात, प्रेम हरते पण संपत नाही.

१९५० मध्ये प्रदर्शित झालेला “जोगन” हा सिनेमा ही एक गुंतागुंतीची प्रेम कथा आहे. एका नास्तिकाचे, जगाचा, पर्यायाने जगण्याचा त्याग केलेल्या योगिनीत गुंतणे हा कथेचा गाभा आहे. मेलोड्रामा न करता , एकाची जिद्द आणि दुसऱ्याची वचनबद्धता या मधील द्वंद्व मानसिक पातळीवर ठेवणे हे कठीण आव्हान इथे दिग्दर्शकाने पेलले आहे. 
सिनेमाच्या सुरुवातीलाच जेव्हा दिलीप कुमारची संमोहित करणारी नजर नर्गिस वर पडते, तेव्हाच पटकथेचे अर्धे काम होऊन जाते.
या सिनेमात दोघांचे एकत्रित असे अनेक प्रसंग आहेत. मोह आणि प्रेम या दोन्ही संज्ञेचा उहापोह आहे. दोघांच्यात अंतर आहे; चित्रपटात ते एकमेकांकडे बघण्याचे प्रसंग सुद्धा अतिशय कमी आहेत पण म्हणून त्यांच्या आकर्षणाची तीव्रता कमी झालेली दिसत नाही.The screen seethes  with passionate chemistry every time this extremely  handsome pair communicates from a distance.
आज हा सिनेमा कालबाह्य वाटतो का तुम्हाला ? आदर्शाची जपणूक, प्रेम या शब्दामागे असलेले गांभीर्य, नैसर्गिक प्रेरणेवर विजय मिळवण्याची धडपड आणि अपेक्षित असलेला विरह ह्या सर्वच गोष्टी आत्मिक आहेत .
आजच्या काळात हे काल्पनिक वाटू शकतील  पण दिलीप आणि नर्गिसच्या अभिनयाने या सर्वच जाणिवांना विलक्षण आकर्षक बनवले आहे.


ही सिरीज रोमॅंटिक सीन्सची आहे.
रोमान्स हा मनात असतो आणि डोळ्यातून व्यक्त होतो हे सिद्ध करणारा एक अतिशय इंटेन्स सीन यात आहे.
“ माझ्याशी बोलू नकोस आणि भेटायचा प्रयत्न करू नकोस “ असे निक्षून सांगितल्यावर विजय देवळात जात नाही. त्याची ओढ मात्र कमी होत नाही . तिच्या कुटीच्या उंबरठ्यावर ठेवलेले फूल  त्याची साक्ष देते.
जगाला फसवता येते पण स्वतःच्या मनाला नाही. एका संन्यासिनीसाठी तर हे पाप. ह्या खुणा बाळगणे तर अक्षम्य गुन्हा. त्याचे विसर्जन करण्यासाठी ती भल्या पहाटे नदी किनाऱ्यावर जाते.
आपल्या मोहाला तरी हे वाहते पाणी उदरात सामावून घेईल का? ज्या मनःशांतीच्या शोधात तिने मोहाची तिलांजली दिली तोच आता जागा होऊ पाहतेय हे वेदनादायीच.
घनदाट जंगल, निर्जन जागा. एवढ्या अंधारात एक चिटपाखरू सुद्धा तिथे नाही. पहाटेचा सूर्य उगवायला काही पळ बाकी आहेत. मंदिरात यायला बंदी केल्याने विजय तिथे जाऊ शकत नाही पण तिच्या अंगात ताप आहे हे समजल्याने त्याच्या जीवाला थार नाही. नदीकिनारी विमनस्क होऊन बसला असताना, दुरून ती शुभ्रवस्त्रांकित मूर्ती त्याच्या नजरेस पडते.
आता चेहऱ्यावरची उदासी कुठच्या कुठे पळते.
अनिमिष नजरेने बघताना त्याच्या मनात येते , “इन्हे  कैसे पता चला के मै यहाँ हूँ “
“ ज्याची आठवण सुद्धा टाळायला ती आली आहे तोच असा समोर.
“ तुम यहाँ ? इस वक्त “
“ मै हमेशा यहाँ रात को आता हूँ . आपके भजन सुनने के लिये “
त्याला भीती नाही आपल्या भावनांची. शब्द त्याच्या ओठातून नाही तर हृदयातून आलेले आहेत.
प्रेमाला असत्याची गरज भासत नाही.
तिला त्याची भीती नाही. भीती आहे ती मनात उठणाऱ्या भावनांच्या आवर्तनाची.  “ ओम शांती “ हे दोन शब्द तिच्या ओठावर आहेत.
“ मैं इन फुलोंको नदी में बहाने आयी हूँ. तुम नही, लेकिन ये फूल  मेरी शांती भंग करते है “
तो हसतो .
“ इसलिये आप शांती मंत्र का जप करते है ?”
हा प्रश्न नाही , तिच्या मनात काय चालू आहे याची त्याला कल्पना आहे.
“एवढ्या वर्षाच्या तपस्येला जर काही उध्वस्त करत असेल तर शांती मंत्र म्हणणे आवश्यक आहे .. हे स्पष्टीकरण त्याला नाही , ती स्वतःलाच देते आहे.
“ तपस्यासे सब कुछ मिल जाता है ?”
त्याला काय हवे आहे ते त्याच्या डोळ्यात दिसते आहे , त्याच्या आवाजातून तिला समजून चुकले आहे.
स्वतःची हार मानून ती त्याला सांगते, “ आता या वेळेला मी अशी तुझ्याशी बोलत आहे , जर कुणी पहिले तर जग काय म्हणेल !”
त्याला परावृत्त करण्याचा तिचा क्षीण प्रयत्न.
“ तुम्ही लोकांना घाबरता ?”
“ नाही .. तुला “
खरेतर स्वतःला ..

निर्जन जंगल, अंधुक प्रकाश , त्यात उजळून निघालेला त्यांचा चेहेरा. तुटक होत जाणारे त्यांचे संभाषण, अडखळत येणार तिचे शब्द, त्याचे ठाम .
दोन वाक्यांमधली शांतता खरेतर सत्याला जाग आणते , मग ओठ काहीही का बोलेनात. निषिद्ध भावना जाग्या होत आहेत ..तिच्या चेहऱ्यावर दिसतात त्या.
स्वतःला आवरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी थरथरणारी काय , झुकलेली नजर आणि खोल अस्पष्ट आवाज. तिलाच ऐकायचा नाही आहे.
जे मिळणार नाही त्याची आसक्ती आणि दुःख , दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.
अभिनय म्हणजे काय तर जोगन पाहावा .

17 thoughts on “Happy Valentine . Best scenes .”

  1. प्रिया,
    व्हॅलेंटाईन महिन्यात ही वेगळी सिरीज..

    १९५० सालचा ‘ जोगन ‘ निवडलास.
    कमाल आहे.❤️
    एकदम खास होणार आहे ही सिरीज.

  2. किती बारकाईने भावनांची गुंफण दाखवली आहे..
    प्रिया ताई, hi जरी romantic series असली तरी मनापासुन केलेले प्रेम….ह्या हृदयाचे त्या हृदयाला समजलेले शहाणे प्रेम, छचोर नसलेले प्रगल्भ प्रेम, शांतपणे एकेक पायरी चढून वर गेलेले विश्वासू प्रेम..असे अनेक कंगोरे तुम्ही यातुन दाखवाल ह्यात शंकाच नाही..

    Thank you प्रिया जी..

  3. नेहमी प्रमाणेच अत्यंत अतिशय सूक्ष्म गोष्टींचा विचार करून लिहिलेला आहे
    तुमचे लेख एक दृष्टी देतो
    अप्रतिम लिखाण..

  4. उदय शेवडे

    या सिनेमाचे नाव ऐकून होतो पण काहीच माहिती नव्हती. संन्यासी स्त्री आणि नास्तिक नायका यांचे प्रेम हा धाडसी विषय आहे, त्या काळात असा विषय घ्यावा ह्याचे कौतुक आहे आणि त्याचे भावबंध, अनुबंध अप्रतिम उलगडवून दाखवलेत आपण.अप्रतिम लिहिलंय.

    “जेव्हा तिने माझ्याकडे आपली नजर वळवली, तेव्हाच माझ्या लक्षात आले की एकतर आता माझे मरण निश्चित आहे किंवा माझ्या जगण्याची ही सुरुवात आहे”…..काय सुंदर वाक्य आहे.

    1. Uday, विषय खरंच कठीण होता ..जरा तोल ढळला तर तो अश्लील होऊ शकला असता..पण अभिनय आणि पटकथा जबरदस्त आहे.

  5. Shraddha some random thoughts

    अप्रतिम लिहितेस तू.. विषय नेहमीचाच पण तुझी ट्रीटमेंट वेगळीच असते..आणि सिनेमा निवडलास तो ही जोगन..कमाल आहेस तू..

  6. Prashant G Chawandke

    खूपच छान आणि कमाल लिहिले आहे…. विषय पण जबरदस्त आहे….. 👍🙏

  7. अगदी..
    आज फिर जीने की तमन्ना है
    या शैलीत
    आज पुन्हा जोगन पहायला मन करते आहे..
    दिलीप नर्गिस साठी मन भरते आहे..
    @$ सुसोकालेकर

  8. इतक्या सेन्सेटीव्ह विषयाला तितक्याच नजाकतीने पेश केले आहेस कुठेतरी आत गलबलून येते. तू तुझ्या चित्रशैलीने सिनमा त्यातील पात्रे डोळ्या समोर उभी राहतात..
    इतके कॅलसीक लिखाण हृदयाचा ठाव घेते .युट्युब ला पहाते
    थँक्स प्रिया

  9. What a start of valentine month!
    This is going to be the amazing series.
    किती मायक्रो लेव्हल ला जाऊन भावना टीपतेस आणि समर्थपणे त्या शब्दात मांडतेस सुद्धा.
    खूप आधी कधीतरी जोगन पाहिलेला आठवतोय. आता परत बघावा लागेल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *