Skip to content

Happy New Year

१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या टायटॅनिक या सिनेमातले शेवटचे दृश्य आठवत असेलच .
बोट बुडणार हे निश्चित आहे. मृत्यू काही पावलांवर उभा आहे. वाचण्याची शक्यता जवळ जवळ शून्य. हा विलासी प्रवास सुरु करताना, आपल्या आयुष्यातला हा शेवटचा प्रवास असेल याची कल्पना तिथे कुणाला असणार!
स्त्रियांना, लहान मुलांना वाचवायचे प्रयत्न सुरु होतात.
सर्व आयुष्य एकमेकांच्या संगतीत सुखाने घालवल्यावर आता हा विरह कसा सोसणार ? हा प्रश्न पुढे ठाकलेल्या मृत्यू एवढाच भयावह.  बोटीतून प्रवास करणारे एक वयस्कर जोडपे, मृत्यूला एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय घेते.  

जीवनाच्या या अंतिम क्षणी,  जलसमाधी मिळत असताना, एकमेकांच्या मिठीत  आधार शोधणाऱ्या, त्या दोघांच्या मनात काय विचार असेल!

लग जा गले के फिर ये, हसीं रात हो ना हो”
——————————————-

( सिनेमा- वो कौन थी? संगीत- मदन मोहन, आवाज- लता मंगेशकर)
जगात सर्वात भीतीदायक असे काय असू शकते?  
अनेकांचे उत्तर, स्वतःचा मृत्यू असे असू शकेल. खरेतर त्याहून भीतीदायक  आहे,  अंतिम क्षणी, कुणाचीही सोबत नसणे. 
सुधीर मोघे लिहून गेले आहेत,
बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का?

राजा मेहंदी अली खान यांनी लिहिलेल्या”शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो ना हो” या ओळीतही, आयुष्याची  क्षणभंगुरता आहेच पण त्याच बरोबर सोबती साठी असलेली असोशी ही दडली आहे.
या जन्मात परत गाठभेट होईल की नाही त्याची खात्री नाही, मग सर्वार्थाने हा क्षण का भोगू नये? असा बेधडक सवाल आहे तिचा.

हम को मिली हैं आज ये घड़ियाँ नसीब से
जी भर के देख लीजिये, हमको करीब से
फिर आप के नसीब में, ये बात हो ना हो

आजूबाजूला निरव शांतता, समुद्राच्या लाटांशिवाय कोणाची सोबत नाही आणि त्या लाटाही किनाऱ्यालाच  मिळायला धडपडत आहेत. वाऱ्याने हलणाऱ्या झावळ्या ही फक्त जिवंतपणाची खूण. सारे वातावरणच भारलेले आणि साथीला फक्त
हाताच्या अंतरावर असलेले धगधगते सौंदर्य. 

आपण जन्माला येण्याचा सोहळा करतो. खरेतर त्याच क्षणापासून नियती श्वास मोजायला सुरुवात करते. जगण्याच्या धुंदीत हे लक्षात येत नाही की याचा अंत  निश्चित आहे आणि तो कधी असणार हे आपल्या हातात नाही. 

आपल्याकडे आहे तो फक्त आपण जगत आहोत तो क्षण.
या क्षणाचे महत्व जाणून आहे ती.
कदाचित पुढे घडणाऱ्या अघटिताची तिला जाणीव आहे.
लग जा गले ही साद तिची आहे का दबा धरून बसलेल्या मृत्यूची?

पास आईये के हम नहीं आयेंगे बार-बार
बाहें गले में डाल के, हम रो लें जार-जार
आँखों से फिर ये प्यार की बरसात हो ना हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो ना हो

प्रवास नक्की कुठे संपणार आहे, कसा संपणार आहे याची प्रत्येकालाच उत्सुकता असते पण आयुष्याची उत्तरे एवढी सोपी नसतात. ह्या प्रवासात वळणे असतात, खाच खळगे असतात. कधी त्यांना चुकवावे लागते, कधी स्वतःला बदलावे लागते.
प्रत्येक क्षण काहीतरी नवीन घेऊन येतो. त्याचा आस्वाद घेणे, त्याला धीराने सामोरे जाणे यातच जीवनाची सार्थकता असते.
निरोपाचा क्षण म्हणजे गेलेल्या  आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण.  तो क्षण आला तरी जवळच्या, आवडत्या व्यक्तीला “ गुडबाय “ करणे हे कुणालाही जड जाते . ती सुद्धा त्याला अपवाद नाही. जगण्याच्या उंबरठ्यावर पाऊल असताना सुद्धा “ एकदाच , शेवटचे का असेना पण एकदा तरी तू माझ्या मिठीत ये “

“लग जा गेले “ या सादेत मिठीची मिठास आहे. भुरळ पाडणारा मोह आहे, अनावर आकर्षण आहे आणि या सर्वाला क्षणभंगुरतेच्या दुःखाची किनार आहे. हे जे काही अमूल्य आहे ते कदाचित येणाऱ्या सूर्योदयाबरोबर लोप पावणार आहे ही भयाची छटा सुद्धा आहे.
हे सर्व जुळून आलेली ही निरोपाची हाक इतक्या वर्षाने रसिकांच्या मनात अजरामर आहे.

सिनेमा संपताना पडद्यावर “द  एन्ड” अशी अक्षरे उमटतात आणि प्रेक्षक निरोपाच्या अनेक शक्यतांबरोबर पात्रांचा निरोप घेतो. अनेकवेळा सुखांत  झाल्याने,  आता ही पात्रे आनंदात नांदतील असा आशेचा सूर असतो तर अनेकदा पात्रांचा नाशच  दिग्दर्शकाने दाखवल्याने प्रेक्षकांनी  घेतलेला निरोप अटळ असतो.
२०२४ ला निरोप देण्याची वेळ आता जवळ येत चालली आहे. त्या निमित्ताने हिंदी सिनेमातील ही निरोपाची गाणी.
भले ही निरोपाची असतील पण गायकांनी आपल्या सुरांनी अजरामर केल्याने निरोपाच्या गाण्यांनाही अमरत्व मिळाले अशी ही भाग्यवान गाणी आहेत.

जन्म घेताना जीव  टाहो फोडतो. हा आयुष्यातील पहिला निरोप असतो. मातेच्या गर्भात असते सुरक्षा, बाह्य जगापासून संरक्षण.
आईचे शरीर आणि तिचे प्रेम कोणाच्याही नजरेपासून बचाव करायला समर्थ असते. त्या उबदार जागेतून बाहेर येतानाच आता पुढे काय वाढलेले असणार याची जाणीव त्या लहानग्याच्या निष्पाप मनाला सुद्धा अजाणता का होईना होत असावी.

पुढे, शाळेच्या प्रांगणात पाऊल ठेवताना हातात घट्ट धरलेला आईचा हात, आईच सोडवून घेते आणि बाह्य जगाचा परिचय होण्याची सुरुवात होते. इथे तो एकटा असतो. आपली ओळख दाखवण्याची जबाबदारी त्या छोट्याश्या खांद्यावर दिलेली असते. घरात सगळ्यांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या त्याला, आता मात्र स्वतःची कर्तबगारी जगाला दाखवण्याची वेळ येते. असंख्य मुलांमध्ये त्याला आपले स्थान पक्के करणे आवश्यक असते. आता सुरु होते ती स्पर्धा. केवळ असणे पुरेसे नसते, टिकण्यासाठी आता कुणालातरी मागे टाकणे आवश्यक बनते .
निरागस , निष्पाप , स्वच्छंदी आयुष्याला “बाय करणे”  आता क्रमप्राप्त ठरते. आता चार पाच वर्षातच मुले जाणती होऊ लागतात.  पुस्तके, परीक्षा आणि चहू बाजूनी होणार माहितीचा मारा त्यांना फार लवकर मोठे करतो.
हिंदी सिनेमात मात्र हे वय सोळा असते.
बालपणाला निरोप देणारे हे गाणे अत्यंत गोड़ आहे.

जा जा जा मेरे बचपन, कही जा के छूप नादां
—————————————————
(सिनेमा- जंगली, संगीतकार- शंकर जयकिशन, आवाज- लता मंगेशकर)

जा जा जा मेरे बचपन कहीं जा के छुप नादाँ
ये सफ़र है अब मुश्किल आने को है तूफ़ाँ
सर्वच चांगल्या गोष्टी सुद्धा संपतात तसेच बालपण सुद्धा निरोप घेते आणि न कळत्या वयात तुम्ही यौवनाच्या उंबरठ्यावर उभे राहतात .
“ आता तुला मोठे व्हायला हवे हं . जबाबदार सुद्धा” असे उपदेशाचे डोस कानावर पडू लागतात. अर्थात जेव्हा स्वतःची मते बनवायची वेळ येते तेव्हा हेच पालक “ तुला काय कळतेय ! अजून लहान आहेस तू “ असे म्हणून मोकळे होतात. पालक आणि मुले दोन्हीसाठी अडचणीत ठरेल असे हे वय. 

मुलांसाठी मात्र एकाच वेळी स्वातंत्र्य मिळण्याचा आनंद आणि ते पेलता येईल का याची भीती वाटणारी ही पायरी असते. एकीकडे नवीन जग खुणावत असते. जिथे पालकांची सावली नसते. निसर्गाची साथ असणारे वय असल्याने,  मनात वसंत फुललेला असतो. आपण जगज्जेता शकतो अशी महत्वाकांक्षा मनात जागवणारे हे वय ! इथे तुम्ही सर्व शक्यता अजमावून बघता. स्वतःची ओळख निर्माण करायला धडपडता, त्याचवेळी कुणाकडे तरी मन ओढ घेते, तिथे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवताना मन डळमळत नाही.
हे असे वय असते जेव्हा भावनांनां पंख फुटतात आणि आपल्याला नक्की काय वाटते आहे ते न समजूनही मन आनंदाने फुलून जाते. 

ज़िंदगी को नये रंग मिलने लगे
एक किरन छू गयी, फूल खिलने लगे 
जा जा जा मेरे बचपन…

बालपणाला दिलेला निरोप असा अस्फुट असतो. कुणालाही सांगता न येणारा आणि देताना आनंद वाटलं तरी हुरहूर लावणारा. याच वयात दिलेला एक निरोप मात्र फार ठळक निरोप असतो. निरोप देण्यातली अटळता आणि समाप्ती याची जाणीव करून देणारा हा निरोप म्हणजे शाळेचा निरोप समारंभ.
डिसेम्बर महिना संपत आला आहे. जानेवारी मध्ये प्रिलिम्सना सुरुवात होईल आणि त्या नंतर होईल तो निरोप समारंभ. हा शब्द किती महत्वाचा आहे ते पहा. निरोप तर घ्यायचा आहे, आणि हा शेवट समारंभपूर्वक असणार आहे. जे घडून गेले त्या बद्दल कृतज्ञता आणि पुढच्या भविष्याकडे आनंदाने होणारी वाटचाल अशा दोन्ही गोष्टी यात समाविष्ट आहेत.
“लेट गो “ हे दोनच छोटे शब्द जीवनाचे सार असतात हे सांगणारा हा निरोप समारंभ. 

शाळा खरेतर मुलांचे दुसरे घर असते. आयुष्यातील महत्वाच्या घटना इथे घडलेल्या असतात. जीवनाचा पाया घडवण्याचे काम या वास्तूत झालेले असते.  आपण इथे घालवलेले क्षण, मिळवलेले यश, पचवलेले अपयश, पुढे येणारी आव्हाने, या साऱ्याचे धावते दर्शन या समारंभात होते.
ज्यांनी आपल्या आयुष्याला वळण दिले त्या गुरूजनां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भले काही काळासाठी विलग होत असतीलही, पण जे मित्र आपल्या बरोबर होते त्यांच्या बरोबरचा बंध घट्ट करण्याचा हा दिवस असतो.  जे काही इथे मिळवले त्या शिदोरीवर आपल्याला आता आभाळाला गवसणी घालायची आहे हे उमजण्याचा हा दिवस असतो.
काही निरोपाचे क्षण बेहद देखणे असतात हे सूर्यास्त पाहून समजते. शालेय जीवनाचा निरोप समारंभ असाच देखणा असतो.
ते आयुष्य काही परत मिळत नाही पण त्या आठवणी मात्र चिरतरुण रहातात.

3)वो दिन भी क्या  दिन थे
————————-

( सिनेमा- छिछोरे  , संगीतकार-प्रीतम , आवाज–तुषार जोशी ,)


यादों के पुराने एल्बम में
छुपा के रखे हैं हमने वो दिन
हम्म….गुल्लक में, पड़ी चवन्नी सी..
बचा के रखे हैं हमने वो दिन
. किसी मंजिल की फिकर थी
ज़िन्दगी जीने की उम्र थी
दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे

मार्क्स, परीक्षा, वर्गात स्वतःला सिद्ध करायची धडपड अशा अनेक गोष्टी असतात , त्या, त्या वयात किचकट, नकोश्या वाटू शकतात पण डोक्यावर छत असते, ताटात अन्न असते, अंगावर कपडे असतात , घरी गेल्यावर दार उघडणारी माणसे असतात , शाळेची फी , पुस्तके, करमणुकीची साधने …सगळे सगळं हातात असते ..
ते मिळवायची जबाबदारी नसते. जेव्हा व्यावहारिक जगाशी सामना होतो, तेव्हा शाळेचे आयुष्य किती सुखावह असते त्याची नव्याने जाणीव होते. घेतलेला हा निरोप मनातून पुसला जात नाही कारण कितीही वाटले तरी मोठेपणाची झूल उतरवून पुढे जगता येत नाही.

आमचा चार पाच मैत्रिणींचा ग्रुप आठवड्यातून एकदा भेटतो. गप्पांचा मस्त फड जमवतो. दोन एक तास हशा आणि टाळ्यांत रात्र कधी विसाव्याला येते ते समजतच नाही. मग जायची लगबग सुरु होते पण जेव्हा उठतो तेव्हा मात्र “”दिल अभी भरा नही “ची अवस्था झालेली असते.
घरच्या जबाबदारीत अडकलेल्या आम्हा चारचौंघींची  जर ही कथा, तर ज्यांचे जगच दोघांचे आहे, त्यांची काय अवस्था होत असेल!  कितीही वेळ गेला तरी जेव्हा निरोपाची वेळ येते, तेव्हा एकमेकांत अडकलेली नजर, हातात गुंफलेले हात, सोडवून घेणे खरंच कठीण होते.  मग विनवण्या सुरु होतात. घालवलेला वेळ, मग कितीही का असेना, प्रेमिकांना नेहेमीच अपुरा वाटतो.

४)अभी ना जाओ छोड़कर
—————————-
(सिनेमा – हम दोनो,संगीतकार- जयदेव, आवाज आशा भोसले)
रातराणीच्या फुलांचा गंध साऱ्या आसमंताला भारून टाकत आहे. त्यातच तिच्या केवळ अस्तित्वाने सारे वातावरणच नशिले झाले आहे. मग तो तरी कसा अलिप्त असणार!
एवढा सुंदर नजारा आहे हा मग  त्याला पोरके करून कशी जाऊ शकतेस तू? असा रोकडा सवाल आहे त्याचा. दोघांच्यातील “तो” आपल्या प्रियेला, थोडा वेळ अजून थांब ना असे विनवताना म्हणतो,


अभी-अभी तो आई हो, बहार बन के छाई हो
हवा ज़रा महक तो ले, नज़र ज़रा बहक तो ले
ये शाम ढल तो ले ज़रा, ये दिल सम्भल तो ले ज़रा
मैं थोड़ी देर जी तो लूँ, नशे के घूँट पी तो लूँ
अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सूना नहीं.

पूर्ण दिवस एकमेकांच्या संगतीत घालवूनही, न जाऊ देण्याचा हा वेडा हट्ट, तिलाही हवाहवासा वाटला तरी आता क्षितिजावर तारे लूकलूकायला लागले आहेत. घरचे लोक वाट पाहत असतील याची तिला  जाणीव आहे. उशिराच्या कारणांची उत्तरे तर तिलाच तयार करायची आहेत. आता जर आपण थांबलो तर आपलाही पाय घसरू शकतो याचीही भीती आहेच तिच्या मनात. संयम तर कुणाचाही सुटू शकतो आणि त्याचे परिणाम निश्चितच चांगले असू शकत नाहीत हे माहित आहे तिला.
स्वतःला थांबवून, त्याला सावरताना ती म्हणते,

सितारे झिलमिला उठे, चराग जगमगा उठे
बस अब ना मुझ को टोकना, न बढ़ के राह रोकना
अगर मैं रुक गयी अभी, तो जा न पाऊँगी कभी

आता जर थांबले तर परत जाण्याची वाट बंद होईल म्हणून मनावर दगड ठेवून पदर सोडवून घेताना तिची घालमेल चेहेऱ्यावर स्पष्ट दिसते तिच्या .
जेव्हा हवेहवेसे  वाटणारे सुख , हाताच्या कवेत असूनही घेता येत नाही , तेव्हा मनातील संघर्षाचे कसे वर्णन करणार!
चाललेली खळबळ, मनातच ठेवून ती त्याला बजावते, 
जो ख़त्म हो किसी जगह, ये ऐसा सिलसिला नहीं
यही कहोगे तुम सदा , के दिल अभी नही भरा.

पन्नास वर्षे रसिकांच्या मनात जागा पटकावून असलेले हे गीत कितीही ऐकले तरी “ दिल अभी भरा नहीं” या ओळीला सार्थ ठरवते.
असेच एक न घेऊ शकणाऱ्या निरोपाचे खेळकर गीत आन मिलो सजना “ या चित्रपटात आहे.

५) “ अच्छा तो हम चलते है “
——————————–
( सिनेमा- आन मिलो सजना, संगीतकार- लक्ष्मीकांतप्यारेलाल, आवाज – )

चित्रपटाचे बलस्थान आहे संवाद. ते चटपटीत असतील तर कथेला वेग येतो. इथे तर प्रेम, वादावादी आणि त्यातून तह होऊन पुढच्या भेटीची  तयारी; असा हा संगीतमय संवाद आहे.
“अभी न जाओ “या गीतात लज्जा आहे , संकोच आहे ..तो गाण्याच्या सांकेतिक भाषेत उतरला आहे , ही भाषा फार डायरेक्ट आहे.  इथे मुलीनेच प्रपोज केले आहे. ती आईवडिलांना चकवून अली आहे. इतकंच नव्हे तर वेळेचे भान राहूच नये म्हणून घड्याळ सुद्धा बंद ठेवले आहे.

तो –किसी ने देखा तो नहीं तुम्हें आते
ती–नहीं मैं आयी हूँ छुपके छुपाके

उशिरा का आलीस याचा जाब विचारताना तो म्हणतो ,
देर कर दी बड़ी

ज़रा देखो तो घड़ी
यावर तिचे उत्तर म्हणजे प्रेमात किती पुढे गेली आहे याचा नमुना आहे .
ती सांगते, 
उफ़्फ़ ओ, मेरी तो घड़ी बन्द है

अर्थात हा निरोपाचा टाटा आणि बाय जेमतेम चोवीस तासांचा आहे. पुढच्या भेटीची वेळ त्यांनी निश्चित केली आहे. 
ह्या गाण्याच्या जन्माची कथा सुद्धा संवादातून फुललेली आहे.
आनंद बक्षी यांनी गाणे लिहून द्यावे म्हणून संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल ताटकळत बसले होते पण गाणे काही केल्या सुचत नव्हते. शेवटी कंटाळून बक्षीने निरोप घेताना म्हंटले , “ अच्छा तो हम चलते है”
आणि पुढची विचारणा झाली , “ फिर कब मिलोगे ?”
युरेका क्षण होता हा …
निरोप असे काही सुचवून गेला की एक अजरामर गीत तयार झाले.

आपल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करणारा व कोणत्याही अडचणींची पर्वा न करता आपले कर्तव्य  चोखपणे बजावणारा देशाचा बहादूर सैनिक हा आपल्या सर्वांच्या आदराचा आणि अभिमानाचा विषय आहे. तो सीमेवर थंडी, ऊन, वारा पाऊस या कशाचीही पर्वा न करता कार्यरत असतो  म्हणून आपण शांतपणे आपले आयुष्य जगू शकतो.
सीमावर्ती भागात सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला तो वेळप्रसंगी स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन करत असतो. आपण सर्वजण घरांमध्ये सुखाने झोपत असतो तेव्हा  हा  सैनिक हाडे गोठवणाऱ्या थंडीमध्ये डोळ्यात तेल घालून सीमेवर खंबीरपणे उभा असतो. भारतीय सेना हे दोन शब्द ऐकता क्षणी मन कृतज्ञतेने नमतं. त्यांचा त्याग , त्यांचा उमदेपणा हा आदराला पात्र असतो. ४७ ला स्वातंत्र्य मिळाले पण त्या नंतरही अनेक आक्रमणं  झाली. देश विघातक शक्ती , दहशतवादी यांनी ही देश पोखरायचा प्रयत्न केला. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनोधैर्य कायम ठेवून मात्र आपल्या सेनेने विजय खेचून आणून नागरिकांचे संरक्षण केलं. केवळ वाऱ्याच्या झोताने आपला तिरंगा फडकत नाही; तो फडकतो कारण त्याच्या मागे त्याचं  संरक्षण करताना असंख्य सैनिकांचा गमावलेला श्वास असतो. तरीही सैनिक एक माणूस असतो.त्याचे गाव असते, घर असते, घरात राहणारे, त्याचे जन्मदाते असतात, त्याच्यावर प्रेम करणारी प्रेयसी असते, पत्नी असते, त्याचीच प्रतिरूप अशी कच्ची बच्ची असतात आणि ही सर्व डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहत असतात.
गेलेला माणूस ज्या रस्त्यावर गेला आहे ती वाट फार कठीण आहे याची जाणीव असते त्यांना. युद्धावर जाताना कदाचित आपण परत येणार नाही ही जाणीव किती हतबल करत असेल ! तरीही हा निरोप घेताना त्यांचे पाय अडखळत नाहीत. डोळे पाणावतात , हात थरथरतात , मन रेंगाळते मात्र पाय आपल्या कर्तव्याच्या दिशेने वाटचाल करतात.
बॉर्डर सिनेमातील निरोपाचे हे गीत ऐकताना मन भरून येते .

६)ऐ जाते हुए लम्हों, ज़रा ठहरो, ज़रा ठहरो
————————————————–

सिनेमा बॉर्डर, संगीतकार- अन्नू मलिक, आवाज- रुपकुमार राठोड)

यातील सैनिकाचे नुकतेच लग्न झालं आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच सीमेवर जायची ऑर्डर येते. नवपरिणीत पत्नीला सोडून जाण्याचे दुःख आणि आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाची जाणीव ह्या कात्रीत सापडलेला तो फक्त एका रात्रीची मुदत मागून घेतो. क्षण तर हातातून निसटून जात आहेत आणि त्याची भरपाई कदाचित परत होणार सुद्धा नाही , अशावेळी हातात असते ते फक्त सहवासाचे सुख गात्रागात्रात  साठवणे. पुढच्या एकांताच्या काळात तेच त्याची सोबत करणार आहेत.

निरोप घेताना पत्नीचे रूप डोळ्यात साठवून तो म्हणतो,

मैं कहीं भी रहूँ ऐ सनम, मुझको है ज़िन्दगी की कसम
फ़ासले आते जाते रहें, प्यार लेकिन नहीं होगा कम
जिन्हे चाहूँ, जिन्हे पूजूँ, उन्हे देखूँ, उन्हें  छू  लूँ 
ज़रा बातें तो कर लूँ, ज़रा बाहों में भर लूँ 
मैं इस चाँद से माथे को चूम लूँ, तो चलूँ ..

आयुष्य वाहते असते आणि त्या बरोबर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या  घटना, येणारी माणसे, आयुष्यातील सुखाचे आणि दुःखाचे क्षण. मग प्रेम तरी अपवाद कसा असणार ! प्रेम ऊर्जा आहे , ती संपत नाही , तिचे रूपांतर वेगळ्या भावनांत होते.
माणसे दार्शनिक प्रेमातून बाहेर पडतात ह्याचे नवल मला वाटत नाही , ती स्वाभाविक घटना आहे पण ती एकमेकांचा तिरस्कार मात्र वर्षानुवर्षे करत राहतात त्याचा मला अचंबा वाटतो.
प्रेमाचा विरुद्धार्थ तिरस्कार नाही.
प्रेम नसले तरी काळजी राहते, माया उरते , जिव्हाळा वाटतो , सवय होते ..माणसे प्रेमातून बाहेर येऊनही एकमेकांच्या सहवासात “आनंदाने “ राहतात हे पाहतोच की आपण . आपण कुणावर तरी प्रेम करणे ही सहज घडणारी प्रक्रिया आहे , तशीच पाहायला हवी , त्यात अहंकार किंवा गरज आली की त्यातली गोडीच संपून जाते. मग उरतो तो तिरस्कार किंवा पश्चाताप.

आँख धोखा है, क्या भरोसा है
दोस्तों शक़ दोस्ती का दुश्मन है
अपने दिल में इसे घर बनाने न दो
कल तड़पना पड़े याद में जिनकी
रोक लो रूठ कर उनको जाने न दो
बाद में प्यार के चाहे भेजो हज़ारों सलाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते

प्रेम कधीही नैसर्गिकरित्या मरत नाही. ते मरते कारण त्याचे बदलते रूप आपण लक्षात घेत नाही. मग आपण चुका करतो. त्या सुधारण्याऐवजी , दुसऱ्याच्या चुका शोधतो. द्वेषाने आंधळे होतो आणि अजून चुका करतो. संशय, अविश्वास , संताप , सुटणारा तोल प्रेमाचे लचके तोडणारी श्वापदे आहेत.
प्रेमालाच निरोप दिला तर आयुष्यात काय राहते हे शिकवणारे गीत आहे ,

ज़िंदगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मक़ाम
वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते
————————————————–
(सिनेमा -आपकी की कसम, संगीतकार -आर डी बर्मन, आवाज -किशोर कुमार) 

काही निरोप घेतले तर जातात पण ते मनातून पुसले जात नाहीत. निरोप घेणे म्हणजे एकत्र घालवलेल्या क्षणाचे अर्ध्य देणे, पूर्णविराम देणे आणि आपला रस्ता शोधणे . मागे फिरणे जिथे शक्य नाही तिथे मागची वाट पुसता यायला हवी.  ते जर जमले नाही तर अस्तित्वात नसलेल्या वाटेवर आपण अडकून राहतो.
अर्थात असे म्हणणे सोपे असते. अनेकांच्या बाबतीत असे जमून जाते. विस्मरण ही खरेतर माणसाला मिळालेली देणगी आहे
..आणि तरीही काही व्यक्ती मनात अशी जागा घेऊन बसतात की ती जागा कुणाला देता येत नाही. काळजाचा तो भाग तसाच जखमी राहतो. गँगरीन जरी असले तरी जर हृदयाला झाले तर  हृदय कापता येत  नाही ना ! माणूस संपेल की !
त्या जखमेबरोबरच उरलेली वाट चालणे हे प्राक्तन असते. हा निरोप कधीच देता येत नाही .

मैं जहाँ रहूँ, मैं कहीं भी हूँ,तेरी याद साथ है

——————————————- 
( सिनेमा -नमस्ते लंडन, संगीतकार – हिमेश रेशमिया ,आवाज – राहत फतेह खान,कृष्णा बेउरा)

किसी से कहूँ, के नहीं कहूँ
ये जो दिल की बात है
कहने को साथ अपने एक दुनिया चलती है
पर छुपके इस दिल में तन्हाई पलती है
बस याद साथ है
तेरी याद साथ है

जगाबरोबर राहत असूनही एकटी असलेली माणसे असतात ही. आनंदी दिसतात, आपले व्यवहार आणि कर्तव्ये निभावतात, सर्वात सहभागी होऊन सुद्धा कशातच नसतात…या नको असलेल्या आठवणी बोलता सुद्धा येत नाहीत..आयुष्याचा पराभव पचवणे आणि विसरणे ह्यात फरक असतो  . त्याचा तोल सांभाळून चालणारी माणसे असतात ही म्हणून कोणत्याही गंतव्याची अपेक्षा न करता वाटचाल करतात. 

कहीं तो दिल में यादों की इक सूली गढ़ जाती है
कहीं हर एक तस्वीर बहुत ही धुंधली पड़ जाती है
कोई नयी दुनिया के नए रंगों में खुश रहता है
कोई सब कुछ पाके भी ये मन ही मन कहता है
कहने को साथ…

आजच्या काळात सहज काहीही  बदलणाऱ्या माणसांना कदाचित हे उमजणार नाही की कितीही नवीन फ्रीज विकत घेता आले तरी पहिल्यांदा घेतलेल्या गोदरेजच्या फ्रीजच्या असंख्य आठवणी असतात. त्याचा टिकाऊपणा हा सहज आलेला नसतो. सतत विकत घेण्याची ऐपत नसल्याने माणसे तो फ्रीज जपून वापरत होती. त्याची साफसफाई वेळेवर होत होती. उगाच वस्तू आत भरून ठेवणे माहीतच नव्हते. अगदी गरजेच्या वस्तू आत ठेवल्या जात होत्या.
तो बंद पडला तर लवकर दुसरा येईल का याची खात्री नसल्याने त्याची जपणूक होत होती. हेच नात्याला लावा ! आता काहीही रिप्लेस होते, अगदी माणूस सुद्धा म्हणून मनात कुणाची छबी राह्ताच नाही. पटकन पुसून त्यावर दुसरे चित्र रंगवले जाते.
याची दुसरी बाजू सुद्धा आहे! कुणीही गेले तरी स्वतःचे आयुष्य त्या क्षणाला संपत नाही. आपल्या वाट्याचे श्वास घ्यावेच लागतात, मग भूतकाळाला हसून निरोप देऊन, स्वच्छ, नितळ मनाने भविष्यकाळाचे हात का हातात घेऊ नये ! 

पहिल्या प्रेमाच्या खुणा माणूस विसरत नाही असे म्हणतात. काही अंशी खरे आहे ते. न कळत्या वयात झालेले प्रेम उत्फुर्त असते. निसर्गाचा अविष्कार म्हणून कदाचित ते तेवढेच निरागस आणि स्पष्ट असते. काही मोजूनमापून , आराखडा ,मांडून  नफा तोट्याचा विचार करून आखलेले आयुष्य नसते ते !
ते टिको व न टिको, परिस्थितीच्या रेट्यापुढे , त्यातला निरागसपणा , खुलेपण टिकत नाही म्हणून पुढे कितीही चांगले आयुष्य वाट्याला आले तरी तो काळ विसरता येत नाही. त्याचे क्षण भंगुरत्व विसरून पण मिळालेले फक्त सुख लक्षात घेऊन , त्याला दिलेल्या निरोपाचे हे गीत मला फार आवडते.

हम रहें या ना रहें कल, कल याद आएँगे ये पल
पल, ये हैं प्यार के पल, चल, आ मेरे संग चल
चल, सोचें क्या, छोटी सी है ज़िंदगी
कल मिल जाए,तो होगी ख़ुशनसीबी
हम रहें या ना रहें
याद आएँगे ये पल

मारवा या कवितासंग्रहातील, मारवा आणि संध्या या दोन कवितांत पहाट आणि संध्याकाळ यांच्या देण्याचा निकटन्यास साधून संध्येचे कृतार्थ सौन्दर्य कुसुमाग्रजांनी दाखवले आहे .
ते म्हणतात,उषा सुंदर होतीच पण अधिक सुंदर आहे ही संध्या.
याला कारण , मावळतीचा सूर्य दिवसभर चराचराला प्रकाशदान करतो, सृष्टीला जीवनदान देतो आणि संध्याकाळी कृतार्थ होऊन अस्ताला जातो. सर्व काही उधळून आपले अस्तित्व मिटवतो.  आयुष्याला अर्थ देतो आणि म्हणून अजूनच सुंदर भासतो.

वर्षाचे काही दिवस उरले आहेत. पुढच्या आठवड्यात २०२४ ची शेवटची रात्र संपेल आणि २०२५ चा सूर्योदय होईल.
पाठी वळून पाहताना वाटते, किती लवकर गेले हे वर्ष! 
काही चांगल्या गोष्टी घडल्या, घडवल्या, काही चुकाही  झाल्या, नवीन माणसे जोडली , जवळची काही गमावली पण जे काही आठवणींचे कोलाज निर्माण झाले; त्याची साथ आता पुढच्या वर्षात उब देणार आहे.
जे घडून गेले त्याला निरोप द्यायची आणि जे घडवायचे आहे त्याचे स्वागत करण्याची आता वेळ आली आहे.
तसे पाहीले तर काळ अनंत असतो.  शेवट आणि आरंभ अशी कोणतीही टोके त्याला नसतात. अनुभवातून आलेले शहाणपण घेऊन आपण फक्त कालनिर्णय बदलायचे नसते तर स्वतःलाही जाणीवपूर्वक बदलायचे असते. तरच ते नवीन वर्ष होते.

Good bye 2024, welcome 2025!”


6 thoughts on “Happy New Year”

  1. अप्रतीम.
    खूप दिवसांनी पोस्ट आली. नेहमीप्रमाणे निवडलेली गाणी, कडवी आणि लिहीलेल्या सार्थ ओळी.

  2. Prashant G Chawandke

    खूपच सुंदर आणि मस्त लिहिलंय….. सरस्वती चा वरदहस्त लाभलेला आहे तुम्हाला….

  3. प्रिया,

    नेहेमीप्रमाणे अप्रतिम लेख.

    वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या भावना दाखवणारी सुंदर गाणी तू निवडलीस..
    ती पण एक से बढकर एक..

    येणारे नवीन वर्ष अशीच सुंदर गाण्यांची गुंफण घेऊन ये.
    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  4. उदय शेवडे

    केवळ अप्रतिम …..वर्ष सरताना छान व्यक्त झालात. गाणी एक से एक निवडलीत.

  5. काय अफाट लिहितेस ग.. एकेक गाणं म्हणजे खजिना आहेच पण तू ते फार सुंदर उतरवतेस मनातलं. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *