भाग 3 -१९७१ ते १९८०
१)दिलबर दिल से प्यारे , दिल की सुनता जा रे–अरुणा इराणी
(सिनेमा-कारवाँ, संगीतकार-आर डी बर्मन, साल १९७१)
अभिरुची आणि गरज यात फरक आहे. गरज कशानेही भागू शकते. दात घासायाचेच असेल तर तंबाखू ही चालतो पण कोलगेटचा मिंटच हवा असेल तर कोणत्याच बेस्ट पेक्षा बेस्ट टूथपेस्टनेही समाधान नाही होणार.सगळ्याच गोष्टीत आपण चुझी नसतो. पर्याय ठेवतो की, पण काही गोष्टीसाठी मात्र पर्याय नसतोच.
“सारी दुनिया हारी हमसे, हम तुमपे दिल हारे “
प्रेमासाठी मरणसुद्धा कवटाळणे या जिद्दीतून येते. तूच हवास हा हट्ट आहे, अहंकार आहे,
हार न स्विकारण्याची जिद्द आहे. तुझे असणे हे माझ्या अस्तित्वाहून सुद्धा महत्वाचे असेल तर शरीरांच्या गरजेवर, मनाचा हट्ट सहज मात करू शकतो. ओढ जितकी जास्त तेवढे नसण्याची तीव्रता जास्त असते. तडजोड न करणारेच आयुष्याची होळी करतात.
दुधाची तहान ताकावर भागवणारे आयुष्य रेटतात.
व पु म्हणतात ते खरंच.
“प्रत्येक इच्छेला पर्याय नसावेत. काही इच्छा अपर्यायी असाव्यात, नाहीतर कोंडी होत नाही.गुदमरल्याशिवाय श्वासाचं महत्व कळत नाही..”
ओ तक-तक रहूँ चुनरी हरी-हरी
ओ दिखलाऊँ बैईयाँ भरी-भरी
ओ मोहे छू ले सजना, गुस्सा है क्यों इतना
जो मर रही उसको क्यों मारे
दिलबर दिल से प्यारे ..
मी हे सुद्धा गाऊ शकते, मला पर्यायच नाही हे दाखवायला लताजीने हे गायले असावे का? अर्थात भन्नाट गायले आहे. तेवढी जिद्द बाईंमधे होती म्हणून तर त्यांचे स्थान अबाधित आहे.
यात आशा पारेख नायिका असली तरी अरुणा इराणीचा रोल महत्वाचा आहे. नायिकेचा आवाज आशा भोसले असला तरी सिनेमातली दोन अत्यंत महत्वाची गीते लता मंगेशकर यांच्या आवाजात आहे. आर डी बर्मन यांनी खास आशाच्या आवाजासाठी बनवलेली गाणी, लता बाईना नक्की का दिली असावीत असे विचारावेसे वाटते. आर डी आणि लता बाई दोन्ही नाहीत आणि आशा ताई सांगणार नाहीत.
मला या गीताचे चित्रीकरण अफाट आवडते. लताबाईंच्या आवाजात जेवढी कशिश आहे तेवढ्याच जिद्दीला पटलेली अरुणा इराणी, तिच्यामागे काठी घेऊन पळणारा आणि कशाचाच उपयोग नाही म्हंटल्यावर स्वतःच्याच कपाळावर हात मारून घेणारा जितेंद्र आणि हा तमाशा अवाक होऊन पाहणारी आशा पारेख.
प्रेम हा वेड्या माणसांना लागलेला जीवघेणा रोग आहे.
हे पाहिल्यावर एक प्रश्न मात्र पडतो की पर्याय नसण्यासारखा जिंतेंद्रचा पर्याय आहे का?
२)इन्ही लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा–मीना कुमारी
(सिनेमा पाकिजा, संगीतकार-गुलाम महमंद, साल १९७२)
“पाकीजा “ ही तवायफच्या दोन पिढ्यांची ही कहाणी.
नरगिस ही गाजलेली नृत्यांगना. तिचे गाणे ऐकायला प्रतिष्टीत घराण्यातील शहाबुद्दीन कोठयावर पाऊल ठेवतो आणि आपले हृदय गमावून बसतो. कोठ्याचे सर्व नियम धुडकावून नरगिस आपल्या प्रियकराचा हात धरून प्रतिष्ठित जगात पाऊल ठेवते पण हे जग मात्र तिला स्विकारायला नकार देते. गरोदर असलेली नरगिस परत कोठयाकडे वळून पाहत नाही.
बदनाम का असेना, सुरक्षित असलेला कोठा सोडून, नरगिस एका कबरीस्थानात आश्रय घेते. जन्म आणि मृत्यू मधील उंबरठा असलेल्या या जागेत, तिच्या मुलीचा जन्म होतो.
तिचे नाव असते “साहेबजान”
साहेबजानच्या मावशीला, नवाबजानला आपल्या बहिणीची परवड थांबवता येत नाही पण भाचीची वणवण तरी थांबावी म्हणून ती साहेबजानला घेऊन जाते. सतरा वर्षांनी नावाबजानच्या कोठयाला परत उर्जितावस्था येते. तरुण साहेबजानची सुंदरता, आवाजातील माधुर्य, पदलालित्य रसिकांना आकर्षून घेऊ लागते.
या सिनेमातले संगीत हे गुलाम महंमद यांनी चित्रपट सृष्टीला दिलेली देणगी आहे. चित्रीकरण चालू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने नौशाद यांनी या सिनेमाचे पार्श्वसंगीत दिले.
या चित्रपटानंतर मीना कुमारीची दैपिप्यमान कारकीर्द अस्ताला गेली पण याच चित्रपटातील भूमिकेने ट्रॅजेडी क्वीन ला जनमानसात अमर केले.
इन्ही लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा
रंगलेला शीशमहाल, जमलेले रसिक आणि त्यांच्या समोर बसलेले लावण्य.
तिची रोखलेली नजर आणि तिच्या आवाजाच्या प्रतीक्षेत असलेली निःस्तब्ध शांतता.
यमनच्या सुरावटीने मुजऱ्याला सुरुवात होते. रोखलेल्या नजरेनेच हृदय घायाळ होत असताना ती सांगते,
तुम्हाला सत्य ऐकायचे आहे का ?
इथे जमलेल्या साऱ्या सभ्य श्रीमंत लोकांनीच तर मला या बाजारात उभे केले आहे.
भर बाजारात माझा दुपट्टाच नाही तर माझी इज्जत, लाज, शरीर आणि आत्मा विकला गेला आहे.
हमरी न मानो सिपहिया से पूछो
जिसने बजरिया में छीना दुपट्टा मेरा
गाण्याची चाल जेवढी अवखळ तेवढेच त्याचे शब्द बोचरे आहेत समाजाचा मुखवटा उघडा पाडणारे आहेत.
३) बाहों में चले आओ–जया भादुरी
(सिनेमा-अनामिका, संगीतकार-आर डी बर्मन, साल-१९७३)
हे केवळ गीत नाही, हा नजरेचा, हृदयाचा संवाद आहे. ओठ फक्त निमित्तमात्र.
” आओ , हमसे सनम क्या परदा “हे खुले निमंत्रण आहे. ही मोकळेपणाने केलेली मागणी आहे . डोळ्यातला खट्याळपणा नायकाचा पुरुषत्वाला साद घालणारा आणि तरीही त्याची परीक्षा पाहणारा. यातल्या नायिकेची स्मृती गेलेली आहे. तिला एवढेच आठवत आहे की ती नायकाची पत्नी आहे. हे खरे नाही हा नायकाचा दावा. प्रेक्षक मात्र संभ्रमात.
आता जया भादुरीची एक प्रतिमा होती. ती कसे काय खोटे बोलेल !
कभी कभी कुछ तो , कहो पिया हमसे ,
कम से कम आज तो खुलके मिलो जरा हमसे
त्याच्या खोलीवरच नाही तर त्याच्या पलंगावर तिने ताबा केलेला आहे. परीधान केलेला कुर्तासुद्धा त्याचाच गंध ल्यायलेला. ज्या स्पर्शाची आस आहे तो स्पर्श पांघरलेले काहीही स्वतःच्या अंगाभोवती लपेटणे यापेक्षा जगात रोमँटिक काय शकते!
इथे कुर्ताच ढगळ नाही तर पूर्ण हालचालीत मुद्दाम आणलेला “सैलपणा ”
परीक्षा तरी किती पाहायची !
डोळ्यातली निरागसतासुद्धा आव्हान देऊ शकते याचे कदाचित एकमेव उदाहरण.
ही निरागसताच त्याला थांबवते . Actually, when woman go wrong , men go right after them पण धरलेला हात निकराने सोडवून घेऊन, बंद खोलीतील एकांत सोडून, मोकळ्या हवेत रोखलेला श्वास सोडणारा संजीव कुमार पाहणे हा एक अनुभव . जया आणि लता या दोन्हींना या भूमिकेत पाहणे आणि ऐकणे हा सर्वांसाठीच हा सुखद अनुभव आहे.
४) रोज शाम आती थी, मगर ऐसी न थी-तनुजा
(सिनेमा-इम्तिहान, संगीतकार-लक्ष्मीकांत-प्यारेलाल, साल १९७४ )
काही दिवसापूर्वी आरे कॉलनीत भटकत असताना एक झाड दिसले . सगळा आसमंत वर्षाऋतूच्या आगमनाने बहरलेला. हिरवी पालवी आणि त्यावर नुसती रंगाची उधळण आणि या कशाचीच जाणीव नसलेले ते झाड, अकाली वठलेले, एकटेच पडले होते .माहीत नाही त्याच्या पायाच्या मातीत कसले विष कालवले होते!
मूळे तर खोल गेली होती पाण्याच्या शोधात? कदाचित कोरड्या पडलेल्या त्यांच्यात शक्तीही नसावी ते शोषून घेण्याची . कुठेही हिरव्या रंगाचा आभास ही नाही पण जिवंत होते. जसे काही कशाचे तरी ऋण फेडत होते.
माणसे सुद्धा हरवतात. अपरिपूर्ण राहतात, भटकतात, स्वतःला बाजूला ठेवून विझलेले जीवन जगत राहतात आणि कोणीतरी येते. .रखरखलेल्या उन्हात अचानक आलेल्या वार्याच्या झुळकीसारखीच आणि तेव्हा जाणीव होते, अरे, आयुष्य अजून संपले नाही. आहे की धग थोडीशी. जिच्यासाठी जगावे असे वाटणारी ती व्यक्ती आणि त्याचा अहसास होणारी ती वेळ .
इम्तिहान सिनेमात, मधूचे (तनुजा) आयुष्य सुद्धा असेच निरस असते. ज्याच्याशी लग्न ठरलेले असते त्याचा अपघातात मृत्यू होतो. त्या धक्याने एका अपघातात सापडून ती पांगळी होते. नकोश्या झालेल्या आयुष्यात प्रोफेसर प्रमोद शर्माचे ( विनोद खन्ना ) आगमन होते आणि परत एकदा वठलेल्या झाडावर पालवी फुटते. आयुष्य जर असेच पाचोळ्यासारखे संपून जाणार असेल तर त्या हिरवळीच्या स्पर्शाची तरी चाहूल घेवू दे. संपूर्ण आयुष्य दोर तुटलेल्या पतंगासारखे हेलकावे खात गेल्यावर जर थोडा वेळ का होईना कोणीतरी दिलेला दोर धरावासा वाटला तर गैर आहे ?
हौले-हौले, धीरे-धीरे कोई गीत मुझको सुनाए
प्रीत मन में जगाए, खुली आँख सपने दिखाए
ये आज मेरी ज़िन्दगी में कौन आ गया ———
लता चा आवाज जेव्हा उंच पट्टीत जातो तेव्हा इराणी संतूर आणि फ्रेंच हॉर्न शी झालेले synchronisation ऐका. अप्रतिम orchestra आहे.
५)दो नैनो में आँसू भरे हैं -हेमा मालिनी
(सिनेमा-खुशबू, संगीतकार-आर डी बर्मन, साल १९७५)
प्रेमासाठी अनेक यातना सहन करणारी स्त्री, हिंदी सिनेमाला नवीन नाही. खुशबू या सिनेमातली कुसुम, लहानपणी ठरवलेल्या आपल्या पतीची वाट पाहत आपले आयुष्य घालवते आहे. या सिनेमात वेगळेपणा हा आहे की जरी तिचे आपल्या प्रियकरावर प्रेम आहे तरीही आपला स्वाभिमान, आपली प्रतिष्ठा ती गमावू इच्छित नाही.
आपल्या पतीने, आपल्याला पुऱ्या मान सन्मानाने तिच्या घरी न्यावे ही तिची अपेक्षा आहे.
ज्याला मनोमन पती मानले आहे, त्याला सोडून दुसऱ्याशी लग्न करायला तिची तयारी नाही पण त्याने आपल्याला मागणी घालावी ही तिची इच्छा आहे.
“मी काही रस्त्यावर सोडलेली बाई आहे का, की कुणीही नाही म्हणावे आणि मी त्याच्या पायाकडे जावे अशी अपेक्षा ठेवावी ?” ती मैत्रिणीला सांगते.
अर्थात हे रूप जगासाठी. रात्रीच्या अंधारात बाहेरील प्रतिमा धूसर होत असताना, आतील दुःख हळूच बाहेर येते. त्यावेळी मान अपमान काही मनात राहत नाही. डोळे काठोकाठ भरून वाहू लागतात.
अशावेळी निद्रादेवी कुठून प्रसंन्न होणार !
झूठे तेरे वादों पे बरस बिताए
ज़िंदगी तो काटी ये रात कट जाए
कैसे नैनों में निंदिया समाए…
दो आँसू में त… आँसू भरे हैं
निंदिया कैसे समाए
या सिनेमातली दोन्ही प्रसिद्ध गाणी, “घर जायेगी, बेचारा दिल क्या करे”आशा भोसले यांच्या आवाजात असताना, हे गाणे लताच्या आवाजात रेकॉर्ड करण्यासाठी आर डी चे आभार मानावे तेवढे थोडे आहे. राग बागेश्री आणि शिवरंजनी मध्ये हे गीत बांधले आहे. मुरकी आणि आलापाच्या साहाय्याने लता जेव्हा बीताये, साये, जाये.. गाते , तेव्हा हेमाच्या आयुष्यातील दुःख प्रेक्षकांच्या सुद्धा आत पोचते. या गीतात अगदी किमान orchestra आहे.
न सांगता येणारे दुःख तसेही वाजत गाजत येत नाही ना !
६) न जाने क्यों , होता है ये जिंदगी के साथ -विद्या सिन्हा
(सिनेमा-छोटी सी बात, संगीतकार-सलील चौधरी, साल १९७६)
मनातल्या भावना सांगणे सर्वांना जमत नाही. प्रेमाचा इजहार एका स्त्री साठी तर फार अवघड गोष्ट आहे.
छोटीसी बात हा सिनेमा १९७६ मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमांतील नायक सुद्धा मुखदुर्बल आहे तिथे नायिकेचे काय घेऊन बसणार !
कुणीतरी आयुष्यात येते. माणूस आवडतो. भेटी होतात. तो उमजतो. हळूहळू तो आपल्यासाठीच बनवला असावा अशी खात्री पटते पण ते सांगायचा धीर काही होत नाही.
पहले आप पहले आप करण्यात बस निघून जाईल अशी भीती वाटत राहते. छोटी सी बातचा नायक, नायिकेच्या प्रेमात आहे पण प्रेम व्यक्त करायचे धैर्य त्याच्या अंगी नाही. त्यात त्याचा प्रतिस्पर्धी स्मार्ट आहे. त्याच्याहून हिकमती आहे. नायिकेला प्रेमात पाडणे आणि प्रतिस्पर्ध्याला हरवणे या दोन्ही गोष्टी जमवण्यासाठी नायक, एकाची मदत घ्यायचे ठरवतो आणि नायिकेला न सांगताच खंडाळ्याला निघून जातो.
वो अंजान पल
ढल गये कल, आज वो
रंग बदल बदल, मन को मचल मचल, रहें, न चल न जाने क्यूँ,
वो अंजान पल
तेरे बिना मेरे नैनों मे, टूटे रे हाय रे सपनों के महल
न जाने क्यूँ, होता है ये ज़िंदगी के साथ
माणूस डोळ्यासमोर जेव्हा दिसत नाही , तेव्हा त्याचे न दिसलेले गुण आठवायला लागतात. घडलेल्या घटना गृहीत धरलेल्या असतात त्यामुळे त्यांचे महत्व वाटत नाही. काळ जातो , माणूस जातो मग आठवणी छळतात तेव्हा गेलेल्या काळाला पकडून का ठेवले नाही त्याची खंत वाटायला लागते.
बासू चॅटर्जी यांच्या रजनी गंधा , छोटीसी बात या सिनेमाने मध्यमवर्गीय सामान्य माणसाला नायक बनवले. त्याच्या इच्छा, आकांक्षा, त्याच्या पुढील आव्हाने, त्याने दिलेला लढा ह्याच्याशी समरस झाल्यामुळे असेल हे सिनेमा अजूनही रिफ्रेश करतात.
७) पलभर में ये क्या हो गया -शबाना आझमी
(सिनेमा -स्वामी, संगीतकार-राजेश रोशन, साल १९७७)
वसंत ऋतूचे कोणी कितीही गोडवे गावो, निदान इथे तरी वर्षा हाच प्रेमाचा ऋतू आहे. घनगर्द मेघ, भरून आलेले आभाळ , हिरवाकंच परिसर नी ओलावलेली धरणी म्हणजे सृजनाचा सोहळाच. माणसे प्रेमाने झपाटतात ती याच काळात. ज्यावर सर्वस्व ओवाळून टाकावे असे कुणीतरी भेटावे असे आवर्जून वाटते.
काठोकाठ भरलेल्या मनात आणि आभाळात साम्य आहे.
सोसाट्याचा वारा सुटतो. पालापाचोळा गिरक्या घेत दूरवर भिरकावला जातो. आकाशात काळे करडे ढग जमा होतात. विजेच्या लखलखाटात नी ढगांच्या गडगडाटात आभाळ मोकळे होऊ लागते. माती आणि आकाशाचे मिलन होते हे पाहून गहिरेपणाच्या संवेदनांनी मने देखील भरून येतात.
कृष्णाची बासुरी मनात पिंगा घालते . त्यात लताचा आवाज मिसळतो ..
पल भर में ये क्या हो गया, वो मैं गयी, वो मन गया
चुनरी कहे, सुन री पवन, सावन लाया अब के सजन
सारी एका भारलेल्या क्षणाची किमया …
प्रेम आणि पाऊस दोन्ही कोसळत येतात.
आशा की छोटीसी नैय्या , ले के चली पुरवैय्या
डोले डोले झुमका बोले , चुपके से ये भेद खोले
आ जायेगा आ जायेगा , प्यार से तुम बुलाना
गीताच्या पूर्ण चित्रीकरणात पावसाचे दर्शन होत नाही पण आसमंतात तो भरून आहे. तो आहेच वाऱ्याने हलणाऱ्या पानांत, फुलांनी बहरलेल्या झाडांत, प्रेमाच्या चाहुलीने फुलून आलेल्या तिच्या चेहेऱ्यात, थिरकणाऱ्या पावलांत.
शेवटच्या दृश्यात ओली झालेली जमीन दिसते, पाण्याने डवरलेली शेते दिसतात, वाऱ्याने थरथरणारी छत्री दिसते ..
“सावन लाया अब के सजन”, जेव्हा लता गाते, तेव्हा सौदामिनीच्याच नाही तर ते ऐकणाऱ्या मनामनांत पावसाचे गाणे वाजू लागते …
अशारीरिक प्रेमाचे उदाहरण म्हणून राधा आणि कृष्णाचे उदाहरण दिले जाते तरीही राधा कृष्णाच्या प्रेमाला अमर करण्यात ज्याचा महत्वाचा वाटा आहे त्या जयदेव लिखित गीत गोविंद काव्यात मात्र या प्रेमाच्या अनेक मानवी छटा दिसतात. मत्सर ,खेळकरपणा, उत्कटता नी कामुकता सुद्धा.
या काव्याचा जनमानसावर एवढा परिणाम आहे की कामुकतेचे दर्शन घडवण्यासाठी राधा कृष्ण या प्रतीकांचा वापर मुक्त हस्तांनी साहित्यात , संगीतात , काव्यात आणि नाटक सिनेमात केला गेला आहे .
सत्यम शिवमं सुन्दरम ची प्रेरणा राधा कृष्ण यांचे अशारीरक प्रेम ही असली तरी नायिकेची निवड चुकीची केल्याने, हेतू साध्य झाला नाही. झीनत अमानला, चित्रपटाने नाही पण लता च्या गाण्याने अमरत्व मिळवून दिले.
८) भोर भये पनघट पे,मोहे नटखट श्याम सताए–झीनत अमान
(सिनेमा – सत्यम शिवम सुन्दरम, संगीतकार-लक्ष्मीकांत प्यारेलाल, साल १९७८)
कोई सखी सहेली नाहीं, संग मैं अकेली,
कोई देखे तो ये जाने,
पनियाँ भरने के बहाने, गगरी उठाये,
राधा श्याम से,हाय हाय श्याम से, मिलने जाये हाय,
ह्याचे चित्रण जंगलात झाले आहे. सिनेमाची नायिका आदिवासी आहे.
शास्त्रोक्त संगीतावर आधारित रागदारी ती गाईल का असे प्रश्न विचारायचे नाहीत पण केवळ गाण्याचा विचार केला तर अतिशय सुंदर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले आहे. पहाटेची वेळ, आकाश लालभडक झाले आहे. जंगलावर पसरलेल्या अंधारात प्रकाशाची एक तिरीप नुकतीच प्रवेश करत आहे . आजुबाजुला कुणाचीही चाहूल नाहीं. व्हायोलिन वाजते. त्याच्या साथीला पक्ष्यांची किलबिल, आणि लताच्या आलापाने गीताची सुरुवात होते. झीनतचे टाचक्या कपड्यातले दर्शन डोळ्यांना दुखवत असतानाच कान मात्र तृप्त होतात. ढोलक आणि घुंगरू चे सिन्क्रोनायझेशन एवढे सुंदर आहे या गीतात.
९)आज कल पाँव जमीं पर नहीं पडते मेरे–रेखा
(सिनेमा-घर, संगीतकार-आर डी बर्मन –साल १९७८)
अभिनेत्री म्हणून गाजलेला हा पहिला चित्रपट होता रेखाचा. एका सर्वसामान्य आणि समाधानी असलेल्या जोडप्याची ही गोष्ट. तिच्यासाठी तो वडिलांची श्रीमंती सोडतो. मोठा व्यवसाय सोडून एका कंपनीत नोकरी पत्करतो. दोघे मिळून आपले घरकुल उभारतात.
रेखा डोळ्याने जास्त बोलते या सिनेमात. त्याला अबोल साथ देणारे विनोद मेहराचे स्मित .
प्रेमाचे अगदी साधे प्रसंग आहे यात , सहज उमलणारे नाते आहे हे !
तिचा प्रश्नही तसाच , ” बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए ?”
मिस्कील, खट्याळ आणि त्यात एक कबुली दिली आहे. ती सुखात आहे, आनंदी आहे आणि त्याचे कारण ” तो ” आहे . जवळजवळ सर्व गीतच स्लो मोशन मध्ये आहे . The song expresses the immense joy of love .
जब भी थामा है तेरा हाथ तो देखा है
लोग कहते है कि बस हाथ की रेखा है
हमने देखा है दो तकदिरोंको जुडते हुए
तुझा हातच आता माझ्या हातात नाही तर तुझ्या भविष्याबरोबरच माझे नशीब जोडले गेले आहे.
१०) रिमझिम गिरे सावन-मौशमी चॅटर्जी
(सिनेमा-मंजिल, संगीतकार आर डी बर्मन, साल १९७९)
सिनेमाच्या सुरुवातीला येणाऱ्या, किशोरने गायलेल्या ” रिमझिम गिरे सावन ” या गाण्यात कुठेच पाऊस नाही पण तिच्या मनात मात्र बरसतो आणि पावसाबरोबर तो सुद्धा अलगद उतरतो . जेष्ठाचा पहिला पाऊस असाच पहिल्या प्रेमासारखा लाजरा असतो. धरतीच्या मनाचा कानोसा घेणारा, हो की नाही अशा संभ्रमात पडलेला, हलक्या पायाने येणारा हा जेष्ठातला पाऊस, आषाढात मात्र सर्व अंगाने बहरतो. वाजत गाजत, गर्जना करत येतो. हिरवा शालू देवून धरतीला आपली करतो. या हिरव्या रंगात नटलेल्या नववधूचे भरदिवसा न लाजता चुंबन घेणारा हा मिश्किल पाऊस त्याचा होतो आणि मग त्याच्याबरोबर तिचा सुद्धा. हा असा न लाजणारा, न घाबरणारा बेधुंद पाऊस “मंझील “मधील लताच्या आवाजात असणाऱ्या “रिमझिम गिरे सावन” या गाण्यात दिसतो .
पहले भी युं तो बरसे थे बादल
पहले भी युं तो भीगा था आंचल
अबके बरस क्यो सजन, सुलग सुलग जाये मन?
पावसाने चकाचक झालेली बॉम्बे दिसते यात; हो तेव्हा ती “बॉम्बेच” होती .
मरीन लाईन्सचा समुद्र किती वेगळाच दिसतो इथे . तेव्हा “बॉम्बे” मध्ये फार गर्दी नव्हती. माणसांची आणि गाड्यांचीही. १९७९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आहे. त्यामुळे आता अस्तंगत झालेली पिवळी -काळी परिचयाची फियाट टॅक्सी सुद्धा भुरकन नजरेसमोरून जाते, तेव्हा किती तरी भिजलेले दिवस क्षणार्धात नजरेसमोर जातात. हे गीत पाहणे म्हणजे भूतकाळातल्या सगळ्या स्मृतींना उजाळा देणे. गीताच्या मध्यावर रस्त्याच्या मधून पाणी उडवत जाणारी लाल बेस्ट आणि ते पाणी चुकवत आपली वाट धरणारे, चिंब भिजलेले अमिताभ आणि मौसमी.
११) सावन के झुले पडे -राखी गुलज़ार
(सिनेमा -जुर्माना, संगीतकार- आर डी बर्मन, साल १९७९)
कोणतीही स्त्री पैशाच्या जोरावर वश होऊ शकते असे समजणारा रईसजादा आणि पैशापेक्षा प्रेमावर विश्वास असलेली स्त्री यांची ही छोटीशी प्रेमकथा. Mills and B च्या परिकथेवर बेतलेली प्रेमकहाणी. स्त्री ला गृहीत धरून दोन मित्रांमधे पैज लागते. यात नायिका मात्र होरपळते.
सिनेमात हे गीत दोनदा येते.
नायिकेला पहिल्या प्रेमाची चाहूल लागली आहे. सर्वसामान्य आयुष्य जगताना अचानक आलेला राजकुमार. श्रावण तर प्रेमिकांचा महिना. तिला गाणे गायला सांगतो तो. आपल्या मनाच्या भावना त्याला सांगणे यासारखा सोपा, प्रेमाचा इजहार दुसरा कुठला असणार! ही नायिका गाते सुंदर पण तिने काही शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेतलेले नाही. या गीतात मुरक्या, मिंड, आलाप नाहीत. ..प्रेमिकेने सहज गुणगुणावे तसे लता बाईंनी हे गीत गायले आहे.
आँचल ना छोड़े मेरा, पागल हुई है पवन
अब क्या करूँ मैं जतन,
धड़के जिया जैसे पंछी उड़े दिल ने पुकार…
दुसऱ्या वेळेस हे गीत रेडिओ वर गायले गेले आहे. नायिकेला आलेला पुरुषाचा अनुभव, त्याचा तिच्या व्यक्तिमत्वावर झालेला प्रभाव आता दिसतो. नायिका आता पूर्वीसारखी निरागस, अबोध राहिलेली नाही. तिच्या चेहर्यावरील हसू मिटून गेले आहे. खंबीर असल्याने पाय रोवून जगायला हवे ह्याची तिला जाणीव झाली आहे. आता गाणे हे आनंदाचे नाही तर जगण्याचे साधन आहे.
शब्द तेच, टोन बदलला आहे. रेडिओ वर गाणाऱ्या या नायिकेला आता शास्त्रोक्त संगीताची दीक्षा मिळाली आहे.
गाण्यात आता हरकती आहेत, मुरकी आहेत..छोटे आलाप आहेत. लय बदलली आहे .
गायक आणि संगीतकार कथेच्या अनुषंगाने काम करायचे ते अशा उदाहरणातून दिसते.

वा!! खूप अप्रतिम लिहिलाय लेख!!
Thank you Mallika 🙂
प्रिया,
महासागरातून मोती शोधण्यासारखं च काम परत तू केलं आहेस.
*लता*
काय बोलणार…
❤️❤️❤️❤️❤️❤️
Vidula , Thank you 🙂
तुझा प्रत्येक लेख किती अभ्यासपूर्ण असतो… हाही लेख तसाच, खूप छान आहे. आवडलाय खूप
Thank you so much Savita .
वाह प्रियादी!
आज पोस्ट लताबहार !!
काय एक सो एक गाणी, काय सुंदर विवेचन, काय शब्दांचा ओघवतेपणा!!
वाह संग्रही ठेवावा असाच!
आज लतादीदीने हे वाचले असते तर खास कौतुकाची थाप दिलीच असती..
How I wish Kamini! This was my earnest wish .
खूप छान सिलेक्टिव लिस्ट 👌👌लिहिलंय ही सुंदर 👍👍
Thank you Jitendraji.