Skip to content

अनेक नायिका,  एक आवाज – लता मंगेशकर

भाग २ -१९६१ ते १९७०
लता बाईंच्या आवाजातला शृंगार सुद्धा सात्विक आहे. सोज्वळ आहे. ही आवाजाची मर्यादा धरायची का शक्ती हे ज्यांच्या त्यांच्या नजरेने ठरवावे . त्या काळातली नायिका ही शालीन, कोणत्याही रूपात पूजनीय असणे ही त्या काळाची गरज होती . म्हणून असेल , नायिकेने आपला आवाज लताबाईंचाच असावा असा आग्रह धरला . त्यांचे मूळचे सोज्वळ रूप त्या आवाजाने अजूनच निरखून आले.

१)ढूंढो ढूंढो रे साजना ढूंढो रे साजना मोरे कान का बाला–वैजयंती माला 
(सिनेमा-गंगा जमूना, संगीत-नौशाद,साल १९६१)

१९६१ मध्ये प्रदर्शित झालेला गंगा जमुना हा सिनेमा पटकथा लेखकांसाठी महत्वाचा सिनेमा होता. ह्यात काय नव्हते !
नाट्य, प्रेम,, विषमता, हरवलेली भावंडे, रक्तातील नात्याचा संघर्ष. येणाऱ्या अनेक चित्रपटांसाठी हा सिनेमा मैलाचा दगड ठरला. दिलीपकुमारने ह्या सिनेमाची निर्मिती केली. सिनेमा घडतो तो उत्तर प्रदेशात. ही भाषा भोजपुरी.
गाण्याचे शब्द आणि सुरांसाठी ही परीक्षाच.
नेहेमी फारसी आणि उर्दूत लिहिणाऱ्या शकील बदायुनी यांनी भोजपुरी लहेज्यात ह्यातली गाणी लिहिली आहेत. नौशाद यांचेही संगीत लोककलेच्या बाजाने जाणारे आहे.
गाणे थोडेसे डबल मीनिंगचे आहे. भोजपुरी गाण्याची ती खासियत आहे. अर्थात गाणे उत्कट आहे, कामुक आहे पण अश्लील नाही. बदायुनी साहेबांच्या लेखणीला खरंच सलाम.
नायिका, आपल्या प्रियकराला आपल्या कानातली बाली शोधायला सांगते. प्रसंग अगदी साधाच. ती बाहेरच्या वर्ह्यांड्यात झोपलेली असताना. एका ठगाने दरोडा घातला. झोप तर मोडलीच माझी पण त्या झटापटीत माझी बिंदिया पडली, माझी बाली सुद्धा हरवली.
किती सुंदर होती ती! त्याला मोत्यांची झालर होती. ती शोधून दे ना ! आता हा ठग कोण ते तिला माहिती आहे, त्यालाही माहित आहे. त्यांच्या शृंगाराच्या खुणा तिच्या अंगोपांगावर आहेच. 

मैं सोई थी, अपनी अटरिया
ठगवा ने डाका डाला
लुट गई निन्दिया, गिर गई बिंदिया
कानों से खुल गया बाला, बलम
मोरा बाला चन्दा का जैसे हाला रे
जामें लाले लाले हाँ,जामें लाले लाले मोतियन की लटके माला
ढूंढो ढूंढो रे साजना ढूंढो रे साजना
मोरे कान का बाला

त्या दोघांची सुहागरात कालच झाली आहे. त्याची साक्ष, त्याच्या कुर्त्याला अडकून राहिलेला तो दागिना आहे. तिचा फक्त दागिना हरवला नाही तर कौमार्य सुद्धा त्या रात्रीबरोबर संपून गेले आहे. किती गोड़ आहे हे गीत !
वैजयंतीमाला च्या उत्कृष्ट सिनेमांपैकी एक असा हा सिनेमा. 

२)तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर–साधना 
( सिनेमा-असली नकली, संगीतकार-शंकर जयकिशन, साल १९६२)

तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर
मेरे जीवन साथी बता, दिल क्यों धड़के रह-रह कर
चित्रपटात गीत हे संवाद साधते . सोप्या , सरळ भाषेत जर गीताची घडण झाली तर ती अभिव्यक्ती उत्कट ठरते . प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती असतीलही , पण डोळ्याला डोळे भिडवून म्हटलेले ” माझे प्रेम आहे तुझ्यावर ” ह्या इतके परिणामकारक दुसरे काहीही नसेल . जेवढे सोपे शब्द तेवढी सोपी आणि खरी अभिव्यक्ती.
इथे स्वर, शब्द आणि सेटिंग सगळेच साधे. कौलारू घर, त्यावर झेपावणाऱ्या नारळाच्या झावळ्या, त्यातून डोकावणारा पूर्ण चंद्र आणि त्याच्याशी स्पर्धा करणारी साधना . जणू रविवर्माच्या चित्रांची नायिका. नायक आणि नायिका एका फ्रेम मध्ये नाहीत पण प्रेमाचे प्रतिबिंब त्याच्याही चेहेऱ्यावर उमटलेले दिसतंय.
प्रेम होणे आणि ते  सफल होणे यात महदंतर आहे हे जाणून आहे ती. भीती वाटणे  स्वाभाविक.

कह रहा है मेरा दिल, अब ये रात न ढले
खुशियों का ये सिलसिला, ऐसे ही चला रहे
तुझको देखूँ देखूँ जिधर, फिर क्यों मुझको लगता है डर

प्रेमाच्या पूर्ततेचे  समाधान ल्यायलेली ती, रात्रीला विनवते. उघड्या डोळ्यांना स्वप्नाची गोडी समजली असली तरीही आपल्या सुखाला कोणी नजर तर लावणार नाही न याची आशंका तिच्या मनात आहे पण ती त्याच्याबद्दल नाही. तो  तिच्याच बरोबर आहे याची खात्री आहे तिला . 

३) मोरा गोरा रंग दै दे–नूतन
(सिनेमा -बंदिनी, संगीतकार-एस डी बर्मन, साल १९६३)

पांढरे, धवल, शुभ्र म्हणजे पवित्र असे आपल्याकडे समीकरण आहे आणि पवित्र म्हणजे सुंदर. गोरेपणासाठी मुली जीव टाकतात . एक गोरी हजार गुण चोरी असे उगाच म्हणत नाहीत . मुलीचा रंग गोरा असेल तर पत्रिकेतील छत्तीस गुणांपैकी अठरा तरी आधीच जुळतात .गोरेपण देणाऱ्या क्रीमचा ज्या देशात सर्वाधिक खप होतो त्या देशात राहूनही, ही नायिका मात्र विनवते,
 मोर गोरा रंग लैले, मोहे शाम रंग दैदे 

प्रेमात, साऱ्या जगाला चोरून, ती आपल्या प्रियकराला भेटायला चालली आहे. स्त्रिया खरतर सौंदर्याच्या भोक्त्या पण इश्क माणसाला काहीही करायला भाग पडू शकते हे खरे. ही नायिका म्हणजे संध्याकाळच्या कळत्या उन्हात, सावल्या गढद होताना प्रियकराला संकेतस्थळी भेटण्यास जाणारी धिटुकली युवती. सामाजिक बंधने तिच्यावर आहेत तरीही ती तोडून चौकटीतल्या प्रणयाची सीमा ओलांडणारी तरुणी आहे ही. जगापासून लपण्यासाठी ती म्हणते “मला शाम रंग दे कारण रात्र तिच्या अंधारात मला लपवू शकेल.” 

इक लाज रोके पैया 
इक मोह खीचे बैया

लताच्या आवाजात संकोच आहे, दुविधा आहे. एकीकडे लज्जा तर दुसरीकडे आतुरता. आता मनाचा कौल ही घेणे कठीण, पुढचे पाऊल मागे आणणे ही कठीण. ही धीट आहे, रसिक आहे. भावनांना बंध घालणे तिला मान्य नाही. तिच्या सोबतीला आहेत फक्त लुकलुकणारे तारे , सळसळणारे वारे, अंधार किर्र्र पण त्याला भेटण्याच्या उत्कंठेने भितीवरही मात केली आहे.

बदरी हटा के चंदा , चूप के से झाँके चंदा 
तोहे राहू लागे बैरी , मुस्काये जी जलाये के

जेव्हा मन अशांत असते तेव्हा चंद्र सुद्धा नकोस होतो आणि मग संतापाने ती म्हणते माझी मस्करी करतोस ?? थांब तुला राहूचे ग्रहण लागू दे 🙂
मला आवडते ते शेवटचे कडवे, 

कूछ खो दिया है पायके 
कूछ पा लिया गवाय के 
शेवटी प्रेम म्हणजे तरी काय ? सर्व नात्यात असणारी देवाण घेवाणच न ?काहीतरी गमवायचे आणि त्या बदल्यात बरेच काही मिळवायचे ही. हरवून बसल्यावर मन कुठे भरकटतेय त्याची तरी कशाला चिंता करायची ?
गुलझार यांचे शब्द, सचिन देव यांचे सूर ,लता बाईंचाआवाजातील गोडवा आणि मनाला भावणारा नुतनाचा निरागसपणा , आतुरता यांचा मनोवेधक संगम म्हणजे हे गीत.

४) वो चूप रहे तो मेरे दिल के  दाग जलते हैं
( सिनेमा-जहाँ आरा, संगीतकार -मदन मोहन, साल १९६४)


Silence is not always eloquent…Someone has said ,” Silence was not the absence of sound but was
itself a sound that could be loud or soft, soothing or disturbing, complex or simple.”
वो चूप रहे तो मेरे दिल के दाग जलते है 
वो बात करले तो , बुझते चिराग जलते है ….

जेव्हा दोघांचे डोळेच बोलतात आणि स्पर्श सांगायचे काम करतो, तेव्हा शब्दावाचून कळले सारे, शब्दाच्या पलीकडले अशी परिस्थिती असते. हा एकांत खूप बोलका आणि हवाहवासा; पण कधी कधी शब्दच आटून जातात . बोलण्यासारखे विषयच राहत नाही. फक्त नको वाटणारे अस्तित्व जाणवत राहते … हा एकांत मात्र बोचरा …. 

ती मुघल खानदानात जन्म घेतलेली राजकन्या आहे. लग्न न करण्याचा अभिशाप घेऊन जन्माला आलेली राजकन्या. तख्तासाठी असलेली स्पर्धा जीवघेणी. एक तर सिंहासन किंवा कबर हाच पर्याय. स्पर्धा टाळण्यासाठी राजकन्यांना कुमारी ठेवत पण प्रेम नियम पळत नाही. अशावेळी जग जरी बाजूला असेल तरी  तिच्या वाचून जग म्हणजे नियतीने कपाळावर कोरलेला एकांतच.
ये खोई खोई नजर 
कभी तो होगी इधर , या सदा रहेगी उधर 
उधर तो एक सुलगता हुआ है विराना , मगर इधर तो बहारो में बाग जलते हैं 

त्याच्या आयुष्यातील अंधार दूर करायला तयार आहेत अनेक दिवे आजूबाजूला आहेत पण ते अंधाराला समजायला हवे न !
मिनू मुंमताज नायिका नाही पण हे गीत द्यायचा मोह मला टाळता येत नाही.

५)  पिया तोसे नैना लागे रे-वहिदा रहमान 
(सिनेमा-गाईड, संगीतकार-एस डी बर्मन, साल १९६५)

नायिका रोझी ही देवदासीची मुलगी. आपले आयुष्य आपल्या मुलीच्या वाट्याला येवू नये म्हणून तिची आई, तिचे लग्न ती एका इज्जतदार माणसाशी लावून देते पण आयुष्यात प्रत्येक गोष्टीला किंमत मोजावी लागते. चांगल्या घरातील मुली  कला क्षेत्रात जात नसत  असा काळ होता तो. तिला नृत्य सोडून द्यावे लागते.
कलासक्त, तरुण  पत्नी आणि शुष्क ,अरसिक नवरा यातला विरोधाभास ही रोझीच्या आयुष्यातील कोंडी आहे . या तुरुंगातून  तिला मुक्ती हवी आहे . आपल्यात असलेल्या  कलेची तिला जाणीव आहे .सुटका करून घेण्यासाठी राजूची मदत होऊ शकेल हे जेव्हा तिला समजते तेव्हा ती राजू कडे येते . निष्प्रेम लग्नाच्या बेडीत अडकलेली स्त्री, सामाजिक बंधने मोडून , रितीभातीची पर्वा  न करता आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उंबरठा ओलांडते, प्रियकराबरोबर राजरोस राहते, त्याचे खरे स्वरूप उघडकीला आल्यावर त्याच्याही त्याग करते. हे चाकोरी बाहेरील आयुष्य पहिल्यांदा पडद्यावर चित्रित केले गेले.
वहीदाच्या  नृत्य कौशल्याला  स्कोप देणारा हा चित्रपट होता .
सचिनदेव बर्मन यांचे संगीत,  धुंद नाचणाऱ्या वहीदाची   लांबून घेतलेली दृश्ये आणि तिच्या भाव भावनांचे परिणामकारक दर्शन घडवणारे क्लोज अप्स  यामुळे यातील सर्वच नृत्ये अप्रतिम आहेत . त्या सर्व गाण्यात पिया तोसे  नैना लागे रे ला तोड नाही.
आठ मिनिटांचा हा सिक्वेन्स आहे . नृत्याचे वेगवेगळे प्रकार हाताळलेले आहेत. अप्रतिम शब्द, संगीत आणि वेगवेगळ्या ऋतू तसेच सणानुसार तिची वेशभूषा.
This is a musical performance given to express love for her lover .

वयात येत असताना, तसे अबोध असताना , निसर्गनियमानुसार जे व्हायचे ते घडत असताना,  रोमान्स मनात जागतो. , हळूच हलक्या पावलांनी तो आपल्या जगात प्रवेश करतो.
कोणाचेतरी असणे फक्त जाणवते.  त्याच्या चाहुलीने सर्व शरीरालाच डोळे फुटतात
मला आठवते,  हजेरी देताना उंचावलेला हातसुद्धा एवढ्या घोळक्यात ओळखता यायचा . पहिल्यांदाच स्वतःहून कोणालातरी जास्त मार्क्स मिळावे असे मनापासून वाटायचे. स्वतःपेक्षाही कोणालातरी हवे म्हणून पहिले यावे असे त्यालाही वाटायचे . संध्याकाळी पार्कवर मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना सायकलचा ओळखीचा हॉर्न आला की गप्पातले लक्ष उडायचे . सायकलचा वेगही कमीकमी होत एका ठिकाणी स्थिर व्हायचा . एकही शब्द न उच्चारता संभाषण करण्याची कला अवगत होती तेव्हा . तरीही आज लक्षात येते त्या संभाषणावर एक पुस्तक लिहिले गेले असते . मौसम कोणताही असो , त्यावेळी तरी वसंतच फुललेला असायचा मनात
.
६)सुनो सजना पपीहे ने- आशा पारेख  
( सिनेमा-आए दिन बहार के, संगीतकार-लक्ष्मीकांत प्यारेलाल, साल १९६६)


निसर्गाने साजरा केलेला आनंद सोहळा म्हणजे वसंत ऋतू. शिशिराच्या पानगळीनंतर, झाडांना छान पालवी फुटते. आंब्याला मोहोर येतो. उघड्या माळ्यावरील चाफ्याला बहर येतो. हवा आल्हाददायक होते. कोकिळेच्या कुजनाने आसमंत निनादून जातो. सृष्टीला चैतन्य देणारा ऋतु म्हणजे वसंत ऋतू.
प्रेमाचे गीत गाणाऱ्या या ऋतूला प्रेमिकांचा ऋतू असेही म्हणतात.
आशा पारेख कोकिळेचा आधार घेऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करताना म्हणते, 

फूलों की डालियाँ भी यही गीत गा रही हैं
घड़ियाँ पिया मिलन की नज़दीक आ रही हैं
हवाओं ने जो छेड़े हैं, फसाने हैं वो प्यार के.

७) आवारा है मेरे दिल -नर्गिस
(सिनेमा- रात और दिन, संगीतकार -शंकर जयकिशन, साल १९६७)

रात और दिन या सिनेमात नर्गिसचा डबल रोल आहे. यात दोन पात्रे नाहीत. पेगी आणि वरुणा ही एकाच स्त्रीची दोन रूपे आहेत. वरुणाच्या स्थितीत ती अत्यंत साधी सरळ, सोज्वळ तरुणी आहे. रात्र झाली की तिच्यातली वरुणा लुप्त होते आणि त्याची जागा घेते ती एक अत्यंत आधुनिक युवती पेगी.
जे जे वरुणा कधीच करायला धजावणार नाही, किंबहुना तिच्या मनात सुद्धा येणार नाही, ते ते सर्व पेगी करते. ती क्लब मध्ये जाते, दारू पिते, सिगारेट ओढते, नृत्य करते.
सोज्वळ वरुणा ते शराबी पेगी हे रूपांतर पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. ह्या सिनेमासाठी नर्गिसला उत्कृष्ट अभिनेत्रींचे राष्ट्रीय पारितोषिक जाहीर झाले.
नर्गिसने ह्या सिनेमानंतर, निवृत्ती जाहीर केली. This film is a psychological drama about a  woman suffering from multiple personality disorder.

वीरानों में सहराओं में, आते-जाते इन राहों में
तेरे इशारों पर, नाची मैं जीवनभर
आवारा ऐ मेरे दिल, जाने कहाँ है तेरी मंज़िल
आवारा है मेरे दिल
लताचा आवाज विलक्षण भारलेला आहे. तिच्या आवाजातली गूढता,  पेगीच्या रहस्यमय व्यक्तित्वाला उठाव देते. या गीतात मिस्कीलता आहे, उपरोध आहे, चैतन्य आहे, मुक्तता आहे आणि तरीही एक कारुण्य आहे.

८)मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी –माला सिन्हा
(सिनेमा-आँखे, संगीतकार-रवी, साल १९६८)

आतापर्यंत हिंदी सिनेमात हेर या मुख्य व्यक्तिरेखेवर जे जे काही सिनेमा बनले आहेत, त्यात आँखे हा सिनेमा खरंच उजवा आहे. स्वातंत्र्यानंतर आसाम मध्ये अतिरेक्यांच्या हालचाली चालू होतात. आणि त्याचा नायनाट करण्यासाठी , बैरुत येथे आपला हिरो जातो. त्याचेच काही सहकारी तिथे आधी पोचलेले असतात. यात असते ते नायिका.
जपान मध्ये आपला हिरो असताना, ती त्याला आधी भेटलेली असते. तिचे प्रेम जडते त्याच्यावर पण त्याच्याकडून काही हवा तो प्रतिसाद मिळत नाही.
त्याला आकृष्ट करून घेण्यासाठी माला सिन्हा हे गीत गाते. धर्मेंद्रला  असेच आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न मुमताज सुद्धा लोफर या सिनेमात करते. कुणीही करेल एवढा तो हॅन्ड्सम दिसतो. हेर म्हणून सुद्धा शोभतो.

सर्वात टिकणारे प्रेम असेल ते प्रतिसाद न मिळालेले  प्रेम. पूर्णत्व नाही म्हणून  त्याला सीमाच नाही, अंत नाही आणि कदाचित, पूर्ततेनंतर होणारा  भ्रमनिरास सुद्धा नाही. एका बाजूने  हृदयात न मावणारे प्रेम पण ते ज्यासाठी , त्या  माणसाला तुमचे अस्तित्वच जाणवत नाही त्यामुळे ते व्यक्त सुद्धा  करता न येणे  यासारखी शिक्षा नाही. इथे मात्र आपले प्रेम व्यक्त करण्या एवढा नायिकेला आत्मविश्वास आहे.
साहिर लुधियानवी यांचे शब्द पहा, 

शर्मा के मुँह न फेर नज़र के सवाल पर
लाती है ऐसे मोड़ पे क़िस्मत कभी कभी
हे नायिका सांगते. आता नायकाला आवडत नसू  आपण असे कधी बायका मानतील का ! त्यात ती सुद्धा देखणी आहे.
पण म्हणून तू लाजू नको असे ही मॅन ला सांगण्याएवढा अफाट आत्मविश्वास आहे तिच्या कडे नाही ! 

तन्हा न कट सकेंगे जवानी के रास्ते
पेश आएगी किसी की ज़रूरत कभी कभी

त्याचाही काही उपयोग होत नाही, उलट तो अजून वैतागला आहे हे पाहून ती त्याला इशारा देते.
बाबा, तू असशील देखणा पण ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर आहेस , बघ , माझी सुद्धा तुला गरज भासू शकते, शेवटी एकटे राहणे तुझ्यासारख्या मर्दाला जमणार नाही
ब्राव्हो गर्ल !

९) चंदा है तू मेरा सुरज है तू -शर्मिला टागोर
(सिनमा -आराधना, संगीतकार-एस डी बर्मन, साल १९६९)



मानवाला संगीताची ओळखच अंगाई गीतांच्या माध्यमातून होते . शब्दाचा अर्थ जरी त्या वयात समजला नाही तरीही त्यातील प्रेम , लळा , वात्सल्य , देऊ केलेले संरक्षण आणि नात्यातील बांधिलकी मात्र त्या लहानग्या जीवाला निश्चित समजते . एक अतिशय जिव्हाळ्याचा आणि त्याहीपेक्षा विश्वासाचा संवाद साधण्याचे कौशल्य या गीतामध्ये असते. प्रत्येक मुलासाठी त्याच्या आईचाच आवाज मधुर असतो यात काहीच वाद नाही पण हिंदी सिनेमात आईच्या आवाजाशी साधर्म्य असलेला आवाज आहे तो लता बाईंचा . सोज्वळ , शांत आणि दैवी . थकलेल्या मनाला उर्मी देण्याचे सामर्थ्य या आवाजात आहे . पावित्र्याचे अस्तर लेवून आलेला हा आवाज आहे .

चंदा है तू, मेरा सूरज है तू, ओ मेरी आँखों का तारा है तू
जीती हूँ मैं बस तुझे देखकर, इस टूटे दिल का सहारा है तू

आराधना हा सिनेमा, राजेश खन्ना, शर्मिला टागोर, किशोर कुमार या सर्वांसाठी फार महत्वाचा सिनेमा ठरला. या सिनेमाने शर्मिलाला फिल्मफेअर पारितोषिक मिळवून दिले. राजेश आणि किशोर यांचे युग सुरु झाले.
कुमारी मातेच्या संघर्षावर बेतलेला हा सिनेमा संगीतप्रधान सिनेमा होता. देवळात झालेल्या लग्नाला कुणी साक्षीदार नसतो, त्यामुळे ते समाजात ग्राह्य धरले जात नाही. अशावेळी दुर्दैवाने फासे उलटे पडले तर त्याची शिक्षा फार कडक असते.
अरुण (राजेश खन्ना) आणि वंदना (शर्मिला) प्रेमात पडतात. हातून नको ती गोष्ट घडून जाते. वंदनाला दिवस राहतात आणि दुर्दैवाने अरुणचा मृत्यू होतो.

पुरवई वन में उड़े, पंछी चमन में उड़े
राम करे कभी हो के बड़ा
तू बन के बादल गगन में उड़े
जो भी तुझे देखे वो ये कहे
किस माँ का ऐसा दुलारा है तू
चंदा है तू, मेरा सूरज है तू…
कुमारी मातेचा जीवघेणा संघर्ष आता वंदनाच्या वाट्याला येतो. त्या निरास, निष्प्रेम आयुष्यात असलेला एकच विसावा म्हणजे तिचा मुलगा. या भावनांचे प्रतिंबिंब या गीतात उतरले आहे.

चित्रपटाची नायिका पवित्र, सोज्वळ असावी अशी समाजाची मागणी असते खरी पण ती भूमिका एकसुरी वाटते.
खरा रंग भरते ती तवायफ किंवा दुसरी स्त्री. नायिका नायकावर अवलंबून असते.  तिचे संरक्षण करण्यात, जपण्यात  त्याच्या पुरुषत्वाचा कस लागतो तर तवायफ त्याच्या पुरुषत्वाला आव्हान देते. स्त्रीच्या कामुकतेचे दर्शन घडवायला सुद्धा  “तवायफ ” ही व्यक्तिरेखा सोयीस्कर पडत असावी. नृत्यात पारंगत असलेल्या अभिनेत्रीसाठी हा रोल म्हणजे पर्वणीच. . चांगली आणि वाईट या मधली ही भूमिका अभिनयाचा कस लागणारी वाटली तर त्यात नवल नाही.
तवायफ सुद्धा एक स्त्रीचे हृदय घेऊन जन्माला येते. इथे जन्म घेतलेल्या, व्यवसायात मुरलेल्या, सरावलेल्या स्त्रियांना सुद्धा कधीतरी पत्नी, आई, प्रेयसी व्हावेसे वाटत असेल तर फसवून आणलेल्या स्त्रियांचे काय होत असेल ?
या फसवणुकीत पदरात येते ती वंचना आणि समाजाचा तिरस्कार. 
“Like a compass needle that points north, a man’s accusing finger always finds a woman.” खालिद हुसेनीचे हे वाक्य किती समर्पक आहे.
१०) सनम तू बेवफा के नाम से मशहूर हो जाए हमें …मुमताज
(सिनेमा खिलौना , संगीतकार-लक्ष्मीकांत प्यारेलाल, साल १९७०)

गुलशननंदा यांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या सिनेमात मुमताजने एका सज्जन कलावंतिणीचा रोल केला.
एका प्रतिष्टीत कुटुंबातील मुलाला ( संजीव कुमार) प्रेयसीने आत्महत्या केल्याने वेड लागते. स्त्री सहवास आणि प्रेम त्याला मिळाले तर तो सुधारेल या हेतूने त्याचे वडील या कलावंतिणीशी एक करार करतात. त्याची पत्नी बनण्याचे नाटक करून, आपल्या प्रेमाने त्याला माणसात आणायचे असा हा करार असतो.
पण चांगल्या हेतूचे फळ चांगले मिळतेच असे नाही.
अनेक वेळा परिस्थिती पोटी स्त्रीला बाजारात उभे राहावे लागते. अशावेळी सुद्धा तिचे आपले, परके होतात.  जगाचा अनुभव घेवून यांची नजर एवढी सरावलेली असते की नंतर त्यांना कोणी फसवू शकत नाही. निबरपणा अंगात मुरवून घेतलेला असतो त्यांनी .. प्रेमाच्या नावाखाली त्यांचे  लचके तोडलेले असतात म्हणून हा धोक्याचा इशारा खिलौना मध्ये मुमताजने  दिला आहे. 

वफ़ा का वास्ता  दे कर, मोहब्बत आज रोती हैं
ना ऐसे खेल इस दिल से, ये नाज़ूक चीज़ होती हैं
ज़रा सी ठेस लग जाये तो शीशा चूर हो जाये
सनम तू बेवफा के नाम से मशहूर  हो जाये ….

To be continued

10 thoughts on “अनेक नायिका,  एक आवाज – लता मंगेशकर”

  1. उदय शेवडे

    वाह या दुसऱ्या लेखातली गाण्यांची निवड त्याचे विवेचन, चित्रपटाची माहिती.
    फार अप्रतिम झालाय लेख.

    नूतनची दोन गाणी निवडल्याबद्दल धन्यवाद, माझ्या आवडती अभिनेत्री आहे.

    1. Thank you Uday. नूतन वर यात घेतली नाही
      साधना तशीच दिसते ,पण अपुरी ठेवलेली सिरीज घेईन ब्लॉग साठी
      नूतन ची खूप सुरेल आणि सुरेख गाणी आहेत

  2. Suuuuuuperb article. Great tribute to legendary singer.
    ढुंढो ढुंढो रे साजना मेरे कान का बाला.. या गाण्यातील ठगवा ने डाका डाला ही ओळ कमाल आहे…
    काही शब्दांना दीदी असे पेश करतात की तो शब्द साकारतो अगदी नजरेसमोर.
    फार सुंदर लिखाण.
    तुमचा व्यासंग, गाण्यांची आवड, निवड आणि लिखाणासाठी काढलेली सवड सगळंच अफाट आहे प्रियादी 💗💗💗

    1. Thank you Kamini 🙂
      खूप बरे वाटते जेव्हा मी तिच्यावर लिहिते. पूजा केल्यासारखे . धन्य कसे. 💗💗

  3. प्रशांत देशपांडे

    अप्रतिम गाणी आणि गाण्याचे रसग्रहण
    फारच सुंदर 🙏

  4. सगळी गाणी अगदी निवडून निवडून हिऱ्यांसारखी घेतलीयस. एकेक गाणं म्हणजे त्या देवीच्या गळ्यातल्या माळेमधला टपोरा मोती. प्रत्येक गाण्याचा अर्थ, त्यातला भाव अगदी अचूक. अतिशय रसाळ आणि ओघवतं लिखाण. आवडला लेख.

    1. Thank you Shalmali.
      बाईंचा वाढदिवस म्हणजे बाईंनी जगाला दिलेली गिफ्ट,,
      इतरवेळी ऐकतोच आपण पण या दिवशी तिला ऐकणे, साठवणे आणि मग ते उतरवणे याच्यासारखे सुख नाही.

  5. प्रिया,
    लता बाईंच्या गाण्याच्या महासागरातून कडे आणि किती मोती शोधायचे?

    वेगवेगळ्या रसांची ,ही वेगवेगळी गाणी ..
    अप्रतिम….
    ❤️❤️❤️❤️❤️❤️

    1. Vidula , Thank you .
      फेसबुक चे उपकार आहेत आणि तुमच्या सर्वांचे की मी लिहिते झाले. ही गाणी ऐकायची आणि मनन करून त्याच्यावर लिहायचे अर्थात माझ्या कुवतीनुसार हे तिची भक्ती करण्याची संधीच ना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *