नजर पोचू शकत नाही असा पसरलेला अथांग सागर. किनाऱ्यावर आपटणाऱ्या मोठ्या लाटांकडे टक लावून बघत असलेला एक बारा वर्षाचा पाठमोरा मुलगा प्रेक्षकांना दिसतो.
पडद्यावर आवाज सुरु होतो.
“ मायकेल सलीवन बद्दल अनेक कथा जनमानसात प्रसिद्ध आहेत. काही म्हणतात, तो अतिशय सभ्य गृहस्थ होता. काहींना त्याच्यात कोणताच चांगला गुण नसल्याची खात्री आहे. मी १९३१ च्या हिवाळ्यात त्याच्याबरोबर सहा आठवडे प्रवास केला आहे.”
हळूहळू समुद्राचे नयनरम्य दृश्य पुसट होत जाते.
आता पडद्यावर काळोखाचे राज्य पसरते. हा भाग असतो अमेरिकेतील इलिनॉय राज्यामधील रॉक आयलंड.
पडद्यावर परत आवाज येतो, “ही आमची कथा आहे”
रोड टू पर्डिशन (Road to perdition)
————————————–
वेस्टर्न सिनेमा प्रमाणेच, फ्रांसिस फोर्ड कोपोलाची गॉड फादर सिरीज, गुडफेलाज, कॅसिनो, द डिपार्टेड या सारखे संघटित गुन्हेगारीवरील सिनेमा हॉलिवूड मध्ये लोकप्रिय आहेत. समाज जीवन सुरळीत चालण्यासाठी कायद्याची आवश्यकता असते तर ह्या सिनेमांचे नायक कायद्याला न जुमानता आपले साम्राज्य स्थापन करतात. त्यांचे नियम एवढे वेगळे असतात की ते राज्याच्या विरुद्ध असतील तरी, नागरिकांच्या बाजूने आहेत असा आभास निर्माण होतो. ते साहसी असतात, त्यांचे आयुष्य रोमांचकारी घटनांनी भरलेले असते आणि अनेकदा नीतिमत्तेच्या कल्पना, त्यांच्या वर्तनाला जी पार्श्वभूमी असते, ती पाहिली, तर फोल ठरतात. मग ह्या खल नायकांना, नायकाचा दर्जा मिळतो. त्यांच्या अंताला सुद्धा गौरवले जाते.
“ रोड टू पर्डिशन” हा एका गँगस्टरच्या आयुष्यावरील सिनेमा आहे.
ह्याचे एक वैशिष्ट आहे ते म्हणजे चपखल संवादा बरोबरच, कथेला आणि त्यातील काळाला अनुसरून केलेली वातावरण निर्मिती. शंभर वर्षांपूर्वीचे शिकागो शहर, त्या अनुषंगाने असलेली वेशभूषा, गाड्या, इमारती आणि सेट.
ह्या काळात अमेरिका जागतिक मंदीतून जात होती. लोकांकडे काम नव्हते. अशावेळी आयरिश माफिया आणि इटालियन माफिया यांच्या संघटनेत काम करणे हे लोकांसाठी उत्पन्नाचे साधन बनले. श्रीमंतांना लुटून गरिबांना द्यायचे आणि त्या मोबदल्यात आपली संघटना बळकट करणे हा रॉबिनहुड नजरिया लोकांना भावतो. सगळे सुरळीत आहे आणि योग्य आहे असा आभास निर्माण करतो.
Road of perdition मात्र याहून थोडा वेगळा आहे. ही चाकोरीतील कथा नाही. संघटनेच्या सदस्यांचा वर्चस्वासाठी लढा हे ह्याचे सार नाही. एक बेकायदेशीर व्यवसाय करणारं माणूस, एकपेडी नसतो . तो त्याचा व्यवसाय असला तरीही तो कुटूंब वत्सल असू शकतो . अनेकवेळा कुटूंब चालवणे महत्वाचे की कुटुंब घडवणे महत्वाचे हा प्रश्न त्याला मार्गावरून घसरत नेवू शकतो किंवा त्याला निती मार्गावर आणू शकतो. “Road to perdition” मधला perdition या शब्दाचा अर्थ अधोगती, विनाश, नरक. हा रस्ता नायकाला चुकवता येतो का ? स्वतःचे पतन टाळता आले नाही तरी निदान मुलाला तो परावृत्त करू शकतो का ?
“रोड टू पर्डीशन” या प्रश्नाला हात घालतो.
आता कथेकडे वळूया.
१९३१ च्या जागतिक आर्थिक मंदीचा काळ.
मायकल सलिवन, त्याची पत्नी आणि शाळेत जाणारे दोन मुलगे असे मायकेल सलीवनचे छोटेसे मध्यमवर्गीय कुटुंब आहे. मायकल एका गुन्हेगारी सिंडिकेट मध्ये काम करतो. या सिंडिकेटच्या बॉसचा तो उजवा हात आहे. मायकलचे बालपण अत्यंत गरिबीत गेले होते. अशावेळी सिंडिकेटचा प्रमुख जॉन रुनी त्याला आधार देतो. त्याला बापाचे प्रेम देतो.
त्याच्या संघटनेत काम करणे ह्यात मायकेलच्या आवडीपेक्षा, कृतज्ञतेचा भाग जास्त आहे.
व्यावसायिक मारेकरी असलेल्या मायकलचे घरातले रूप मात्र फार वेगळे आहे. काहीसा अबोल, तुटक असा स्वभाव आणि बहुतांश वेळ घराबाहेर जात असल्याने मोठ्या मुलाला, मायकेल ज्युनिअरला तर त्याचा बराचसा धाक आहे.
आपले वडील नक्की काय करतात याचे त्याला कुतूहल सुद्धा आहे. याच उत्सुकतेपोटी जे पाहायचे नाही ते दृश्य त्याच्या नजरेला पडते.
सिंडिकेटच्या कामासाठी, एका व्यक्तीला जाब विचारायला गेले असताना, कॉनेर रुनीच्या (जो, जॉन रुनीचा मुलगा आहे) हातून एक खून होतो. त्याच्याबरोबर मायकेल सुद्धा असतो. त्यांच्याबरोबर, त्यांच्या नकळत प्रवास करणारा मायकेल ज्युनिअर हे पाहून हादरतो. त्याच्या मनात असणाऱ्या वडिलांच्या प्रतिमेला मोठा तडा जातो.
हा छोटा मुलगा काही गप्प राहणार नाही. ही गोष्ट तो बाहेर बोलेल या शंकेने कॉनेर रुनी त्याला मारायचे ठरवतो. त्यासाठी तो मायकेलचा काटा काढायची योजना आखतो. याला अजून एक मोठे कारण असते. कॉनेर रुनी, अतिशय हेकेखोर, संशयी, व्यसनी, लोभी असतो . संघटना चोरांची असली तरीही त्यांचे काही नियम असतात, त्यांचीही काही मूल्ये असतात पण याला कसलाच विधिनिषेध नसतो. त्याच्या ह्या अपरीपक्व वागण्यामुळे वडिलांशी सतत खटके उडत असतात पण त्याच वेळी वडील, मायकेलला महत्व देतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात याचाही त्याला द्वेष आणि मत्सर वाटत असतो.
मायकेलला मारण्याची योजना असफल होते. मायकेल निसटतो पण घरी आल्यावर त्याला समजते की कॉनेरने त्याचे विश्व उध्वस्त केले आहे. त्याची पत्नी आणि लहान मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. मायकेल ज्युनिअर मात्र घरी नसल्याने वाचतो.
आता इथे राहणे धोक्याचे आहे हे ओळखून मायकेल आपल्या मुलाला घेऊन तिथून पळ काढतो.
शिकागोला येऊन, दुसऱ्या संघटनेच्या प्रमुखाकडे, फ्रॅंक निट्टीकडे मदत मागतो पण फ्रॅंक मदत नाकारतो.
तो म्हंटतो,
“All these years you’ve been living under the protection of people who care about you, and those same people are protecting you now, including me. So, if you go ahead with this, if you open that door, you’re walking through it alone, and all that loyalty, and all that trust will no longer exist for you. And Mike, you won’t make it. Not on your own, and not with a little boy.”
“कॉनेर ला मारण्याचा विचार सोडून दे. तुला भरपूर पैसे देतो, ते घेऊन तुझ्या मुलाबरोबर तू एक चांगले आयुष्य सुरु कर” हा फ्रॅंकचा प्रस्ताव मायकेल नाकारतो.
मुलाला, आपल्या बायकोच्या बहिणीकडे सुरक्षित ठेवायचे आणि नंतर कॉनेरचा खून करायचा ही त्याची योजना मात्र बारगळते.
जॉन रुनीचे, मायकेल वर प्रेम असतेच पण कॉनेर कितीही वाईट असला तरी तो त्याच्या मुलगा असतो. इथे रक्ताचे पारडे जड ठरते. मायकेलला मारण्यासाठी जॉन, व्यावसायिक मारेकऱ्याला पाठवतो आणि एका जीवघेण्या, रक्तरंजित पाठलागाची सुरुवात होते.
कथेतील महत्वाची पात्रे:
मायकेल सलिवन ज्युनिअर (टायलर Hoechlin)
——————————————————
मुलाचे गुन्हेगारी विश्वाकडे जाणारे पाऊल अडवणे हा सिनेमाचा मुख्य विषय असल्याने सिनेमा ह्या छोट्या मुलाभोवती फिरतो. आई आणि भावाच्या मृत्यूनंतर छोट्या मायकेलचे आयुष्य बदलते. घराच्या चार भिंती सुरक्षित नसल्याची जाणीव होते. उघड्या रस्त्यावर आश्रयाच्या शोधात भटकत असताना , पडलेले पाऊल कुठल्या दिशेने घेऊन जातेय याचे भान सतत ठेवावे लागते. त्याच्या शोधात फिरणारी एक गोळी, एका चुकीच्या प्रतीक्षेत असते.
जेमतेम बारा वर्षाचा असलेला मायकेल, आता वडिलांना साथ देण्याएवढा प्रगल्भ होतो. त्याचे कोवळेपण संपून जाते.
आता आता पर्यंत सायकलवर बसून शाळेत जाणारा मायकेल, गाडीचे स्टिअरिंग आपल्या हातात घेतो. कॉनेर विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी मायकेलला गुन्हेगारी कामाचीच मदत घ्यावी लागते आणि मनात नसूनही त्याला आपल्या मुलाला हाताशी धरावे लागते.
मायकेल ज्युनिअरला आपल्या मार्गावरून लांब ठेवणे ही खरेतर मायकेलची आत्यंतिक इच्छा असते. मुलाच्या आयुष्याला वळण देण्यासाठी बापाचा जन्म असतो पण बापाचेच आयुष्य जेव्हा घसरलेले असते तेव्हा मुलाची घसरण अटळ असते.
मायकेल सलिवन ( टॉम हँक्स)
———————————
सिनेमाच्या सुरुवातीचा मायकेल अबोल आहे, तुटक आहे, मारेकरी असल्याने निर्दयी आहे. जेव्हा कुणालाही थंड डोक्याने मारणारा मायकेल, आपल्या पत्नीला आणि मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहतो, तेव्हा त्याच्यातला निष्ठूर मारेकरी हादरतो. आपल्या आयुष्यात खरेतर एवढे रक्त पाहिले असते की त्याने! त्त्याला कारणीभूत सुद्धा तोच असतो पण ह्या प्रसंगाने आपण चालत आहोत तो मार्ग विनाशाकडे जाणारा आहे याची त्याला पहिल्यांदा जाणीव होते. हताश होऊन भिंतीला टेकून, तो ढसाढसा रडतो.
त्याला वडील नसतात. वडिलांची जागा जॉन रुनीने घेतलेली असते त्याची त्याला जाणीव असते. ह्या माणसावर त्याचे खरेच प्रेम असते. त्याच्यासाठी काहीही करायची तयारी असते.
आपले वडीलच आपल्या जीवावर उठले आहेत हे मात्र जेव्हा त्याला समजते तेव्हा रक्ताच्या नात्याच्या बंधाची त्याला नव्याने जाणीव होते. त्याचा जॉनवर राग नसतो पण आपल्या मुलाच्या सुरक्षिततेची त्याला काळजी वाटू लागते.
आता त्याच्यातील वडील जिवंत होतो.
जॉन रुनी ( पॉल न्यूमन )
——————————–
सिनेमातले सर्वात महत्वाचे आणि गुंतागुंतीचे पात्र.
तो एका सिंडिकेटचा प्रमुख आहे. गुन्हेगारी विश्वाचा राजा. खुनाची सुपारी देणे, खंडणी मागणे, वैश्यागृहे, कॅसिनो यांना संरक्षण देणे हा त्यांच्या कामाचा एक भाग आहे. कुणाला त्रास द्यायचा, कुणाकडे कानाडोळा करायचा याबाबतीत त्याचे काही नियम आहेत. तो सांगतो,
“What men do after work is what made us rich. No need to screw them at work as well.”
सलिवनच्या मुलांसाठी तो एक प्रेमळ आजोबा आहे. मायकेल सलिवनचा तो केवळ आश्रयदाता नाही तर त्याने मायकेलला मुलासारखे वाढवले आहे. मुलाच्या बाबतीत मात्र त्याचा धृतराष्ट्र होतो. मायकेलच्या कुटुंबाचा खून केल्यावर सुद्धा तो आपल्या मुलाला क्षमा करतो. मायकेलच्या खुनाची सुपारी देतो.
“ कॉनेरने तुलाही फसवले आहे, तुझ्याशी बेईमानी केली आहे” मायकेल त्याला पुराव्यानिशी शाबीत करतो.
तो खुनी आहे असे कळवळून सांगतो.
या प्रसंगी जॉन जे बोलतो ते मात्र मायकेल साठी डोळे उघडणारे असते.
सगळ्यांना आरसा बघता येत नाही. मनाच्या आरश्यात डोकावणे शक्य होत नाही. अनेक वेळा मुखवट्याखाली दडलेला आपलाच चेहेरा भेसूर असतो त्याची जाणीव मायकेलला होते.
जॉन म्हणतो ,
“There are only murderers in this room! Michael! Open your eyes! This is the life we chose, the life we lead. And there is only one guarantee: none of us will see heaven.”
सिनेमाच्या अखेरीस मात्र त्याच्या लक्षात येते की कॉनेरला वाचवणे अशक्य आहे. मनाला कळत असते की मायकेलची बाजू बरोबर आहे. आपला मुलगा एवढा अपरिपक्व आणि दुष्ट आहे की कुणाच्या न कुणाच्या हातून त्याचा मृत्यू अटळ आहे. शेवटी भर पावसात मायकेल जेव्हा त्याच्यावर शस्त्र रोखून उभा राहतो, तेव्हा एका हताश, हरलेल्या बापाच्या तोंडून शब्द येतात.
“I’m glad it’s you.”
खुनशी, संवेदनशील, प्रेमळ, कर्तव्यनिष्ठ, थंड डोक्याने विचार करणारा, हळवा, हताश ..किती छटा आहेत या व्यक्तिरेखेत.
पॉल न्यूमनचा हा शेवटचा सिनेमा होता.
कॉनेर रूनी -(डॅनिअल क्रेग)
————————————–
सिनेमाचा खलनायक.
कॉनेर मध्ये एकही चांगला गुण नाही. त्याच्या वडिलांनाही यांची जाणीव आहे.
“Sons are put on this earth to trouble their fathers”हे जॉनसाठी वास्तव आहे.
खुनशी, स्वार्थी, गर्विष्ठ, हिंस्त्र, मत्सरी, माणसांचा उपयोग करून घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडणारा कृतघ्न, भित्रा .. असा कोणताही दुर्गुण नाही जो त्याच्या अंगी नाही.
प्रतिकाराची कोणतीही संधी न देता, सलिवन जेव्हा त्याला मारतो, तेव्हा असे वाटते, की नरकात गेलेले त्याचे वडील सुद्धा सुटकेचा निःश्वास टाकतील.
या सिनेमातील वडील मुलाचे नाते थोडे वेगळे आहे.
मायकेल आणि जॉनचे रक्ताचे नाते नाही पण त्यांच्यात प्रेमाचा अकृत्रिम बंध आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतून मायकेलचे कुटूंब जात असताना जॉनने त्यांना आधार दिला होता त्याची मायकेलला जाणीव आहे. मायकेलचे जॉन वर नुसते प्रेम नाही, त्याच्या उपकाराखाली तो दबला गेला आहे. आपण जे करतो ते योग्य नाही ह्याची जाण असूनही तो ह्या कामाला नकार देवू शकत नाही.
आपल्या सख्या मुलांशी असलेले त्यांचे नाते मात्र गुंतागुंतीचे आहे. मायकेल आपल्या मुलाशी जवळीक साधताना दिसत नाही. तो कोणते काम करतो हे सुद्धा त्यानी मुलापासून लपवले आहे. याचे कारण सिनेमाच्या शेवटी समजते.
आपल्या मुलाने आपल्यासारखे होऊ नये, या पापाच्या रस्त्यावर चालू नये ही मायकेलची इच्छा असते. स्वतःपासून मुलांना लांब ठेवले तर हे साध्य होईल, आपल्या जीवनाची सावली त्यांच्या आयुष्यावर पडली तर कदाचित ते संकटात पडतील या विचारांमुळे त्याने अंतर ठेवले आहे.
जॉन निष्ठूर आहे, गुन्हेगार आहे पण त्याचीही काही मूल्ये आहेत. गरज नसताना कुणाला मारणे त्याला आवडत नाही. सिंडिकेटच्या माणसांच्या कुटुंबियांची जबाबदारी त्याने स्वतः उचलली आहे. कॉनेरचे व्यक्तिमत्व, त्याला आणि सिंडिकेटला धोक्यात आणणार याची जॉनला जाणीव आहे. हे साम्राज्य सांभाळण्यासाठी आवश्यक असलेले गुण त्याच्या अंगी नाही याचीही त्याला कल्पना आहे. स्वार्थी, लबाड, लोभी असूनही मात्र जेव्हा त्याच्या आयुष्याचा प्रश्न येतो तेव्हा या सर्व दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून जॉन त्याची बाजू घेतो.
या आंधळ्या पुत्रप्रेमाचा शेवट, कॉनेर आणि पर्यायाने सिंडिकेटच्या विनाशात होणार असतो.
माणसाचा अहं महत्वाचा असतो की त्याचा आत्मा?
जे घडले त्यावर दिलेली प्रतिक्रिया आपला अहं ठरवतो मात्र हातून घडलेल्या पापाचे समर्थन कधीही होऊ शकत नाही.
हृदय भावनिक होऊन निर्णय घेते. अंतरात्मा मात्र काय बरोबर, काय चूक ते जाणून असतो.
सिनेमात एक महत्वाचा सीन आहे.
गुंडापासून वाचवण्यासाठी मायकेल, आपल्या मुलाला त्याच्या मावशीकडे सोडणार असतो. योगायोगाने या भागाचे नाव असते Perdition. समुद्राजवळ असलेले हे ठिकाण अत्यंत निसर्गरम्य असते.
आपले आयुष्य नव्याने सुरु करण्याचे ते साधनही असते. माफिया पासून स्वतःला मोकळे करून घ्यायचे आणि आतापर्यंत जो अन्याय आपल्या हातून घडला, एक गुन्हेगार म्हणून आणि पिता म्हणून, त्याचे प्रायश्चित घ्यायचे, या दुहेरी हेतूने मायकेल इथे येतो. याचवेळी त्याच्या शोधात, त्याचा मारेकरी सुद्धा आलेला असतो.
मायकेल प्राणांतिक जखमी झालेला असताना, त्याचा मुलगा, वडिलांना वाचवायला, या मारेकऱ्यावर पिस्तूल रोखतो.
सुटलेली एक गोळी, मुलाच्या नरकाकडे होणाऱ्या प्रवासाची नांदी ठरणार असते. याचवेळी जिवाच्या आकांताने , मायकेल गोळी झाडतो आणि मारेकऱ्याची हत्या करतो.
हत्या करणे हा हेतू नसतो तर आपल्या मुलाला हत्येपासून रोखणे हा त्याचा खरा हेतू असतो.
चर्च मध्ये जाऊन किंवा वाईट माणसांना मारून आपले पाप नष्ट करता येणे शक्य नाही हे मायकेलला माहिती असते.
जॉनने म्हंटल्याप्रमाणे, आपण सर्वच खुनी आहोत आणि आता या मार्गावरून कितीही परतायचे म्हंटले तरी ते अशक्य आहे हेही त्याला आतून कळून चुकलेले असते.
मुलाला मात्र हिंसाचार आणि मृत्यूपासून वाचवणे हे वडील म्हणून त्याचे कर्तव्य असते. त्याचा निरागसपणा कायम ठेवण्यासाठी स्वतःचा मृत्यू सुद्धा त्याला मान्य असतो .
“ मी प्रयत्न करून सुद्धा गोळी मारू शकलो नाही “मुलाचे हे उद्गार, समाधानाने ऐकून तो आपले प्राण सोडतो.
मायकेल खरंच स्वर्गात जाईल का नरकात ह्या प्रश्नाला काही महत्व नाही. त्याची कर्मे त्याचा हिशोब करणार आहेत.
सिनेमाचा विषयही हा नाही.
आपल्या मुलाला योग्य मार्गावर आणणे आणि त्याचे नैतिक अधःपतन थांबवून त्याच्यासाठी चांगला रस्ता आखणे हे वडिलांचे कर्तव्य पार पाडून, मुलाची स्वर्गाची वाट तो निश्चित करतो.
न चुकवावा असा सिनेमा.
(डिस्ने हॉटस्टार वर पाहता येईल)

प्रिया,
तुझ्या मुळे इंग्लिश आणि इतर भारतीय भाषांतील चित्रपट माहिती होतात .
सुंदर लिहिलंस असं म्हणणं ही द्विरुक्ती च ना!!
And please do watch this Vidula . You will really like it
फारच वेगळ्या पद्धतीने आणि अप्रतिम ह्या वेळी लिहिलंय….हे नावीन्य आवडलं. बघायलाच हवा असा चित्रपट.
Thank you Uday.
Please do watch .
Its on Disney hotstar