Skip to content

वो भारत देश है मेरा.

संध्याकाळची वेळ होती. पार्क माणसांनी फुलून गेले होते. समोरच्या रस्त्यावर वाहनांची गर्दी ; एक सेकंद ही न थांबता रहदारी चालू होती. कोणतीतरी सभा असावी. संपल्यावर रिवाजाप्रमाणे “जन गण मन “ राष्ट्रगीताला सुरुवात झाली . स्पीकरवर गीत चालू असल्याने रस्त्यावर सुद्धा ऐकू गेले असणार. एक चमत्कार झाला. भर गर्दीच्या रस्त्यावरील रहदारी थांबली. रस्ता ओलांडणारी माणसे डीव्हायडरवर अटेन्शन मध्ये उभी राहिली. कट्ट्यावर बसलेली जोडपी, गप्पात रंगलेली तरुणाई, निवांत बसलेली म्हातारी माणसे, कुणीही न सुचवता उत्स्फूर्त उभी राहिली. राष्ट्रगीत संपल्यावर परत आपापल्या रस्त्याला लागली. एक दोन मिनिटांच्या या  गीतात असंख्य लोकांना, काही क्षण का असेना, एकत्र आणण्याचे सामर्थ्य होते.
सिनेगृहात सिनेमा सुरु होण्याच्या आधी राष्ट्रगीत असावे की नाही यावर अनेक चर्चा होत होत्या, त्या बद्दल असलेल्या सर्व मतांचा आदर ठेवून सुद्धा मी एक निश्चित म्हणेन , जेव्हा राष्ट्रगीताचे  स्वर छेडले जातात तेव्हा हृदय अभिमानाने भरून येते. आणि आपल्याही कंठातून “ गाये तव जय गाथा “गायली जातेच.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला आलेल्या आमच्या  पिढीने काही पारतंत्र्य पाहिले नाही, भोगले नाही पण स्वातंत्र्याचे महत्व समजण्यात  राष्ट्रभक्ती गीतांचा नी सिनेमांचा महत्वाचा वाटा होता.
लहानपणी शाळेच्या प्रार्थनेत श्लोकांबरोबर  राष्ट्रगीताचा समावेश असायचा. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झेंडावंदन असायचे. त्यादिवशी वीरकथा , वीरगीत यांच्या माध्यमातून देशाचा इतिहास, संस्कृती , यांचा परिचय करून दिला जायचा.  शब्दापेक्षाही सूर निरागस अंतःकरणाला सहज समजतात. स्वतःच्या मातृभूमीची ओळख त्यांना लहान वयातच करून देण्याचे काम हे सच्चे सूर करतात. माझी आई , माझे वडील, भावंडे याच बरोबर हा देशही माझा आहे ही भावना अंगात रुजायला या देशभक्तीपर गीतांचे मोठे योगदान आहे.
स्वतंत्रतेच्या संग्रामातही  वंदे मातरम , मेरा रंग दे बसंती चोला , सारे जहाँ से अच्छा या सारख्या गीतांनी महत्वाची भूमिका बजावली. लोकांना प्रेरणा देण्याचे काम या गीतांनी केले.
चित्रपटातील अशाच काही स्फूर्तिगीतांचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

तीन वर्षांपूर्वी,  १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतीने “हर घर तिरंगा “ अभियान शहराशहरांत राबविण्यात आले होते. आतापर्यंत सरकारी कार्यालयांना तिरंगा लावायची परवानगी होती. राष्ट्रीय सणाला शाळा, कॉलेज मध्ये झेंडावंदन केले जाई. सर्वसामान्य नागरिकाला झेंडा उभारण्याची संधी मिळणे कठीण. या निमित्ताने झेंडा फडकवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला मिळाला. राष्टातील सर्व इमारतींना या दिवशी या निर्णयाने एका स्तरावर आणले.
तिरंगा हा देशाचे स्वातंत्र्य, सन्मान, समृद्ध वारसा नी सार्वभौमत्वाचे  प्रतीक. प्रत्येक भारतीयासाठी राष्ट्रध्वज फडकताना पाहणं  हा अत्यंत अभिमानाचा नी आनंदाचा क्षण होता. 

भारत हमको जान से प्यारा है
सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है
सदियों से भारत भूमि दुनिया की शान है
भारत मां की रक्षा में जीवन क़ुर्बान है

१९९२ साली प्रदर्शित झालेल्या “रोजा” या सिनेमातील हे गीत. ह्यातील नायक ऋषी कुमार( अरविंद स्वामी) हा संशोधक आणि विश्लेषण विभागात संगणक अभियंता आहे. काश्मीर मध्ये त्याची बदली होते. भारतीय सैन्याने पकडलेल्या एका अतिरेक्याला सोडवण्यासाठी ऋषीचे अपहरण केले जाते . त्याला ओलीस ठेवले जाते. त्याचे हाल केले जातात. मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असताना सुद्धा त्याचे धैर्य मात्र ढळत नाही. अतिरेक्याला सोडवण्याची मागणी नाकारली म्हणून अतिरेकी संतापतात नी तिरंगा जाळण्यास प्रवृत्त होतात. निःशस्त्र ऋषी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता जळणाऱ्या ध्वजावर स्वतःला लोटून देतो. ज्वाळा स्वतःच्या अंगावरील कपड्यांनी विझवतो. आगीचे चटके त्याला थांबवू शकत नाहीत. अतिरेक्यांच्या हातातील शस्त्रांनी त्याचा निर्धार डळमळीत होत नाही.
हा काही जवान नाही. सैन्यात मिळणारे लढाऊ शिक्षण काही त्याला मिळाले नाही. स्वतंत्र भारताचा तो एक सामान्य नागरिक आहे पण त्याचे देश प्रेम खरे आहे. आपला तिरंगा  केवळ सैन्याचा नाही त्याचाही मानबिंदू आहे. ए आर रहमान यांनी संगीत दिलेले हे गीत पार्श्वभूमीवर जेव्हा वाजते तेव्हा सिनेगृहात असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाची मूठ आपोआप वळली जाते.

१९४७ साली  दिल्लीच्या लाल किल्ल्यावर, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी तिरंगा फडकवला आणि पारतंत्र्याची दोनशे वर्षाहून मोठी काळरात्र संपली. एका नवीन युगाची सुरुवात झाली. हा प्रवास अत्यंत खडतर होता. सारे राष्ट्रच या वसाहत वादाविरुद्ध एकत्र आले होते. 
भारतीय संगीत नी सहित्य यांनी सुद्धा आपलं  योगदान दिलं. देशभक्ती केंद्रबिंदू असलेल्या कथा, कादंबऱ्यानी, गीतांनी लोकांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. कठीण परिस्थितीत सुद्धा न घाबरता लढण्याचे धैर्य दिलं. सर्वसामान्य माणसं राष्ट्रप्रेमाने पेटून उठली. लाठीमार, तुरुंगवास इतकेच काय तर फाशीला सुद्धा सामोरं  गेली.

आज हिमालय की चोटी से फिर हम ने ललकारा है
दूर हटो ऐ दुनिया वालों  हिन्दुस्तान हमारा है

१९४५ मध्ये प्रदर्शित झालेल्या किस्मत या सिनेमात कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि अनिल विश्वास यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत अतिशय गाजले. पारतंत्र्याच्या काळात असे गीत रचणे हे एक धाडसच. स्वातंत्र्य हा शब्द सुद्धा राज्यकर्त्यांना खटकत होता. अनेक गाण्यांना, कथानकांना  सेन्सॉर बोर्डने नाकारले होते. अशा काळात हे गीत पास व्हावे  हे सुद्धा नवल होते. दुसरे महायुद्ध संपताना हा सिनेमा प्रदर्शित झाला. जपानच्या आक्रमणाविरुद्ध हे गीत आहे असे जरी सांगितले गेले तरी त्याचा हेतू भारतीयांना समजला होताच. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी काढलेल्या मोर्च्यात, मिरवणुकीत या गीताला स्थान मिळाले. हिंदी सिनेमात, परकीयांना “चले जाव”चा नारा देणारे हे पहिले देशभक्तीपर गीत असावे.

स्वातंत्र्यानंतर राष्ट्रनिर्मितीत चित्रपटानेही आपलं  योगदान दिलं. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतीयांनी आपले रक्त दिले आहे; त्यांचं  बलिदान व्यर्थ जाता कामा नये, असा संदेश बहुतांश चित्रपटानी दिला. राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग, योगदान देण्यासाठी हे चित्रपट नव- तरूणांचे प्रेरणास्त्रोत बनले. अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी सोडून आधुनिक विचार रूजवण्यातही चित्रपटांनी आपला वाटा उचलला..
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभक्तीची थीम घेऊन अनेक चित्रपट आले. 

१९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या सिनेमात  एका स्वातंत्र्य सैनिकाची गाथा वर्णिली आहे. या सैनिकाचा संघर्ष केवळ ब्रिटिशांविरुद्ध नव्हता. त्याचे वडीलच त्याच्या विरुद्ध उभे राहिले होते. हा विचारांचा संघर्ष होता, नात्याचा आणि  मूल्यांचा सुद्धा संघर्ष होता. चित्रपटातील काळ होता १९४२ चा. गांधीजींनी छोडो भारत हा नारा दिला होता. करा अथवा मरा या संदेशानी भारलेल्या काही तरुणांनी सशस्त्र लढ्यात भाग घेतला. अनेकांना तुरुंगवास सहन करावा लागला तर अनेक जणांनी मृत्यूला कवटाळले.
गुलाम हैदर यांनी संगीतबद्ध केलेले आणि  मोहम्मद रफी यांनी गायलेले या सिनेमातले अतिशय प्रसिद्ध गीत होते,

शहीद तेरी मौत ही तेरे वतन की ज़िंदगी
तेरे लहू से जाग उठेगी इस चमन में ज़िंदगी
खिलेंगे फूल उस जगह कि तू जहाँ शहीद हो
वतन की राह में वतन के नौजवां शहीद हो
तुझ्या मरणातूनच या देशाला नवीन जीवन मिळेल , तुझ्या रक्ताचा अभिषेकाने येथील धरणी पावन होईल , ती फुलेल, बहरेल. तुझे बलिदान या देशासाठी संजीवनी बनेल.
धर्म, जात, वर्ण, वर्ग या साऱ्याच्या पल्याड जाऊन माणसे एकत्र आली. श्वास न श्वास खर्ची पडला तो देशासाठी. एकच उद्धिष्ट घेऊन जगणाऱ्या वीरांचा एकच मंत्र होता, “वंदे मातरम”, जो कोणत्याही धार्मिक ग्रंथांपेक्षा पवित्र होता. हा मंत्र ओठावर घेऊन अनेक क्रांतिकारी हसत हसत फासावर गेले.
९ ऑगस्ट १९२५ ला देशात  एक ऐतिहासिक घटना घडली. भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी रेल्वेवर हल्ला करून ब्रिटिश सरकारचा खजिना लुटला. ह्यात भाग घेणाऱ्या प्रमुख क्रातींकारी रामप्रसाद बिस्मिल यांच्या लेखणीने एका जबरदस्त गीताला जन्म दिला.  

मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे
मेरा रंग दे बसंती चोला ओये, रंग दे बसंती चोला
माये रंग दे बसंती चोला

राजपूत लढवैय्यात केसरीयाची प्रथा आहे. लढाईत केशरी रंगांचा पोशाख करून जेव्हा राजपूत उतरतो तो मारू आणि मरु या निश्चयानेच. मातृभूमीच्या संरक्षणासाठी हसत हसत प्राणांचे बलिदान करण्याची त्याची तयारी असते.  जणू काही मृत्यूचाही सोहळा साजरा करतो तो .
केशरी हा रंगच त्यागाचा. कवी आपल्या मातृभूमीला प्रार्थना करतो, मला केशरी रंगात भिजव. तुझ्या रक्षणासाठी कसलाही त्याग करण्याचे धैर्य माझ्या अंगी येवो हाच वर मला दे.
या गीताने जनमानसाच्या मनात क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवले. हे गीत भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या त्यागाचे गीत म्हणून इतिहासात  अजरामर झाले. रंग दे बसंती चोला ह्या गीताने स्वातंत्र्याच्या आख्यायिकेला जन्म दिला. असे म्हणतात, हे गीत गाऊन, भगत सिंग, राजगुरू नी सुखदेव हे  तीन वीर फासावर चढले. त्यांच्यासाठी मृत्यू सुद्धा जणू उत्सव बनून  आला होता.  ह्या गीतावरून प्रेरणा घेत प्रेमधवन यांनी शहीद या सिनेमासाठी पुढील  गीत लिहिले.

जिस चोले को पहन शिवाजी, खेले अपनी जान पे
जिसे पहन झाँसी की रानी, मिट गई अपनी आन पे
आज उसी को पहन के निकला, पहन के निकला
हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला…
क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांनी देशाला अजून  एक अजरामर गीत दिले आहे.

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है

देशासाठी कुर्बान व्हायची मनीषा  आमच्या हृदयात आहेच; आता फक्त  आम्हाला आमच्या मारेकऱ्यांची  ताकद जोखायची आहे.
केवढे हे  धैर्य , केवढी ही हिम्मत!
ज्या ज्या वीर आणि वीरांगनांनी देशासाठी प्राण अर्पित केले, आपले सर्वस्व दिले त्यांची आठवण हे गीत करून देणारे हे गीत आहे. लढाईचा नारा देणारे, स्वातंत्र्याची उर्मी जागवणारे हे गीत शहीद भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित, १९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या “शहीद” या सिनेमात वापरले गेले.
मनोज कुमार या कलाकाराने भगत सिंग यांची भूमिका रंगवली होती.

१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सरफरोश या सिनेमात, शायर इसरार अन्सारी, याच गीताच्या ओळीत थोडासा बदल करून लिहितात ,

ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों
खो रहा चैन-ओ-अमन, खो रहा चैन-ओ-अमन
मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारों
ज़िन्दगी मौत ना बन जाए, संभालो यारों

ह्यातला लढा ब्रिटिशांविरुद्ध नाही. स्वातंत्र्य मिळवून अनेक वर्षे झाली आहेत पण म्हणून काही देश सुरक्षित नाही. बाहेरील शक्ती या देशाचा नायनाट करायला कार्यरत आहेच पण त्याहीपेक्षा आपल्याच देशातील आपलेच लोक मूठभर पैशासाठी फितूर झाले आहेत.
या सिनेमात अतिरेकी  नायकाचे वडील आणि भावाची हत्या करतात. या हत्येने तो तरुण मात्र डगमगत नाही. स्पर्धा परीक्षा देऊन तो भारतीय पोलीस सेवेत भरती होतो आणि कायदेशीर मार्गाने या देशविघातक शक्तीशी लढा देतो.
सीमेबाहेरील शत्रू असा उल्लेख न करता पहिल्यांदाच या सिनेमात पाकिस्तानचे नाव घेतले होते.

स्वातंत्र्याचा इतिहास हा केवळ ब्रिटिशांबरोबर केलेला लढा असं म्हणता येणार नाही. परकीय, जुलमी सत्तेविरुद्ध असंख्यांनी बंड केली. उठाव केला. साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा केलेला विचार म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत घेतलेलं  सतीचे वाण. मध्ययुगीन राजवटीत सुलतानाला विरोध म्हणजे प्राणाशी गाठ, परंतु स्वतःच्या पराक्रमाने, धाडसाने, जिद्दीने मूठभर मावळ्यांच्या साथीने, राजांनी या भमीवर भगवा फडकावला.
अनेक शतकांच्या काळरात्रीनंतर स्वराज्याचा उषःकाल येथील रयतेला उघड्या डोळ्यांनी बघता आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं  लोककल्याणकरी रयतेचा राजा या भूमीला मिळाला. शिवकालावर अनेक मराठी सिनेमा आले पण हिंदीमध्ये हे शिवधनुष्य पेलायला २०२० साल उजाडावे लागले.
अजय देवगण यांनी तान्हाजी या चित्रपटाची निर्मिती केली. कोंडाण्याची चढाई ही शिवकाळातील इतिहासाचे एक सोनेरी पान. स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून, तानाजी मालुसरे कोंडाणा जिंकण्याचा विडा उचलतात. साथीला असतात मूठभर मावळे आणि हृदयात असते जिंकण्याची जिद्द. समोर उभा ठाकलेला उदयभानू हा राजपूत सरदार सुद्धा तेवढाच पराक्रमी.
गड तर सर होतो पण स्वराज्याचा सिंह आपल्या प्राणाची आहुती देतो.
.
दिल के पट खोल रे,स्वामी तेरा आया रे
पांव में जुंग लिए, नौटंकी लाया रे
ऊँची ये दीवारें, कूदने को आया रे
शंकरा रे शंकरा रे

युद्धाचा स्वामी महादेव. एवढी मोठी बाजी जिंकायची तर त्याची आराधना महत्वाची आहेच.
मूळ ऐतिहासिक प्रसंग पडद्यावर आणताना , प्रेक्षकांचा विचार करून, कल्पनेचा आधार घेत, काही प्रसंग रंगवणे आवश्यक असते. हा प्रसंग त्या युद्धाच्या धामधुमीत घडणे अशक्यच. तरीही हे गीत मात्र जोशपूर्ण आहे.

१९६२ मध्ये चीनने भारतावर हल्ला केला. हा हल्ला, अकस्मात केलेला हल्ला होता. सीमारेषेवरून दोन्ही राष्ट्रात तणावाचे वातावरण असलं  तरी सीमा प्रश्न हा चर्चेने सोडवण्यास प्राधान्य आहे असं मत दोन्ही राष्ट्रांनी व्यक्त केले होते पण चीनचे बोलणं नी प्रत्यक्ष कारवाई यात कमालीची विसंगती होती.. ऑक्टोबर १९६२ मध्ये चीनने पुराचा लोंढा यावा तसे आपले सैन्य नेफा भागातून घुसवले. चीनवर विश्वास ठेवून भारत सरकारने युद्धसंदर्भात पूर्व तयारी केली नसल्याने भारतीय सैन्याचं  अतिशय नुकसान झालं  पण या संकटाच्या प्रसंगी देश मात्र एकवटला.
१९६२ च्या युद्धाचा नागरिकांवर खोल परिणाम झाला. आता पर्यंत भारताचा शत्रू म्हणजे फक्त इंग्रज अशी भावना भारतीयांत होती. स्वातंत्र्य मिळाले म्हणजे शांतता आणि  समृद्धी नांदणार अशी भाबडी आशाही होती. चीनने केलेल्या आक्रमणाने सीमे पलीकडील शत्रूची प्रथमतः जाणीव झाली. सिनेमात सुद्धा याचा पडसाद उमटला. 

६४ मध्ये प्रदर्शित झालेला “हकीकत” हा हिंदी सिनेइतिहासात पहिला युद्धपट मानला जातो. या सिनेमाचे वैशिष्ट म्हणजे भारतीय सैन्याचा पराभव झाला हे वास्तव तर त्यांनी दाखवलेच पण भारतीय अस्मितेला जागे करण्याचे कामही या सिनेमाने , यातील गीतांनी केले.

सांस थमती गई नब्ज जमती गई,
फिर भी बढ़ते कदम को ना रुकने दिया 
कट गये सर हमारे तो कुछ ग़म नही,
सर हिमालय का हमने न झुकने दिया ।
मरते मरते रहा बाँकपन साथीयों,
अब तुम्हारे हवाले वतन साथियो 

समोरून झालेला अनपेक्षित  हल्ला, कडाक्याची थंडी, शस्त्रास्त्रांचा अभाव, अपुरे अन्न यांचा जो परिणाम होणार होता तो झालाच. मातृभूमीचे रक्षण करताना असंख्यांनी आपल्या प्राणांची कुर्बानी दिली पण मरताना सुद्धा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना प्रेरित केले. हे गीत ऐकताना ज्याचे डोळे पाणावले नसतील असा एकही भारतीय नसावा.
 
हकीकतच्या यशाने प्रेरित होऊन अनेकांनी युद्धपट बनवण्याचा प्रयत्न केला, पण मुळातच हा खर्चिक प्रयोग आहे. यात असंख्य पात्रे असतात. शिवाय इतिहास, सैन्यातील वातावरणाची सूक्ष्म माहिती, त्यांचे परस्पर संबंध, सैन्याचे नियम, त्यांचे कपडे या सर्व गोष्टी बारकाईने, कसलीही चूक न करता दाखवणे ह्याचा अभ्यास असणे आवश्यक असते. त्यात प्रेक्षकांना तो आवडेल की नाही ह्याचाही अंदाज येत नाही. हकीकत नंतर म्हणूनच फार युद्धपट आले नाहीत , आले तरी गाजले नाहीत.
जे पी दत्ता यांचा बॉर्डर ह्याला अपवाद ठरला.
हकीकतला इंडो चायना युद्धाची पार्श्वभूमी होती तर बॉर्डर १९७१ च्या इंडो पाक युद्धावर आधारित होता.

आपल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करणारा व कोणत्याही अडचणींची पर्वा न करता आपले कर्तव्य  चोखपणे बजावणारा देशाचा बहादूर सैनिक हा आपल्या सर्वांच्या आदराचा आणि अभिमानाचा विषय आहे. तो सीमेवर थंडी, ऊन, वारा पाऊस या कशाचीही पर्वा न करता कार्यरत असतो  म्हणून आपण शांतपणे आपले आयुष्य जगू शकतो.
सीमावर्ती भागात सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला तो वेळप्रसंगी स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन करत असतो. आपण सर्वजण घरांमध्ये सुखाने झोपत असतो तेव्हा  हा  सैनिक हाडे गोठवणाऱ्या थंडीमध्ये डोळ्यात तेल घालून सीमेवर खंबीरपणे उभा असतो. तरीही सैनिक एक माणूस असतो.त्याचे गाव असते, घर असते, घरात राहणारे, त्याचे जन्मदाते असतात, त्याच्यावर प्रेम करणारी प्रेयसी असते, पत्नी असते, त्याचीच प्रतिरूप अशी कच्ची बच्ची असतात आणि ही सर्व डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहत असतात.
गेलेला माणूस ज्या रस्त्यावर गेला आहे ती वाट फार कठीण आहे याची जाणीव असते त्यांना. त्याचे कर्तव्य त्याच्या खाजगी जीवनाच्या आड येणार नाही याची दक्षता ते सुद्धा घेतात तरीही त्याला बघण्याची आस त्यांच्या पत्रांतून दिसते.

संदेसे आते है, हमें तड़पाते हैं,
जो चिट्ठी आती है, वो पूछे जाती है,
के घर कब आओगे,
के घर कब आओगे,
लिखो कब आओगे,
के तुम बिन ये घर सूना सूना है.

ह्या गीतात सैनिकांच्या आणि त्याच्या जीवलगांच्या भावना व्यक्त झाल्या आहेत.
बॉर्डर प्रदर्शित झाला नी हे गीत अत्यंत लोकप्रिय झाले.  त्यातली भावना आणि वेदना देशातील प्रत्येक संवेदनशील नागरिकांच्या हृदयाला स्पर्शून गेली. असंख्य कार्यक्रमात हे गायले गेले. एकविसाव्या शतकात प्रवेश करणाऱ्या आपल्या देशाचे ते राष्ट्रगीतच बनले. तेवढे सामर्थ्य त्याच्या शब्दात नी सुरात होते. 

केवळ वाऱ्याच्या झोताने आपला तिरंगा फडकत नाही; तो फडकतो कारण त्याच्या मागे त्याचं  संरक्षण करताना असंख्य सैनिकांचा गमावलेला श्वास असतो याची जाणीव बॉर्डर या सिनेमाने पुन्हा एकदा करून दिली.

शेकडो वर्षांच्या  लढ्यानंतर भारत मुक्त झाला. मनात आशा नी डोळ्यात स्वप्न घेऊन देशाची वाटचाल सुरु झाली. प्रश्न मोठे होते.. रस्ता खडतर होता. स्वातंत्र्याचा अर्थ समजावून घेतानाच प्रगतीच्या व्याख्या ठरवायच्या होत्या. देश हा देव असे माझा ही अद्वैताची जाण जागवायची होती. राष्ट्र नवीन होते पण समस्या जुन्याच. सीमेपलिकडची युद्धे, अंतर्गत असंतोष त्यामुळे केले गेलेले संप , दुष्काळ, कामगार आंदोलने, स्त्री मुक्ती चळवळ अशा अनेक बाबी होत्या. राजकारण बदलते पण सत्तातरांचा खेळ कायम राहतो. पात्रे बदलतात पण सत्तेची लालसा चिरंतर असते ह्याचा प्रत्यय नागरिकांना येत होता.
आपण किती स्वप्नांची पूर्ती केली ? स्वातंत्र्य चळवळ चालू असताना जी उदात्त विचारधारा नेत्यांनी आणि  सामान्य जनतेने अंगिकारली होती , तीचे आज अस्तित्व आहे का ? दुःख, दारिद्र्य, सामाजिक विषमता यावर मात करण्यात आपण किती यशस्वी आहोत ? हे प्रश्न सुजाण नागरिकांना सतावू लागले.
हिंदी सामाजिक सिनेमात त्याचे प्रतिबिंब उमटले.
फिर सुबह होगी या सिनेमात साहिर लुधियानवी यांचे एक अप्रतिम गीत आहे . नैराश्येने ग्रासलेल्या तरुणांचा आवाज आहे हे  गीत .

इन काली सदियो के सर से जब रात का आँचल धलकेगा
जब दुःख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा
जब अम्बर झूम के नाचेगा, जब धरती नग़मे जाएगी
वह सुबह कभी तोह आएगी
रूढार्थाने हे देशभक्तीपर गीत नाही पण ह्यातला सकारात्मक आशावाद संजीवक आहे.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. आपण आपली राज्यघटना तयार केली. भारतात हजारो वर्षांपासून प्रचलित असणारी जातीय व धर्मीय विषमता, उच्च-नीचत्वाची भावना नष्ट व्हावी या हेतूने संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, आणि धर्मनिरपेक्षता या गोष्टींना संविधनाच्या मूलभूत तत्वांचा दर्जा प्रदान केला.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नवीन निर्माण झालेल्या राष्ट्रात सामाजिक सुधारणा घडवून आणणं  कठिण आव्हान होतं . अनेक समाजसुधारकांनी यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले. साक्षरता वाढली
. संविधानात महिलांना सुद्धा समान अधिकार दिल्याने अनेक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला. आज ज्ञान, विज्ञानाच्या अनेक क्षेत्रात आपल्या देशाने अभूतपूर्व वाटचाल केली आहे. कृषी, उद्योग, व्यापार, आरोग्य, संशोधन, संरक्षण अशा  असंख्य क्षेत्रात आपण मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. संपन्न, सुसज्ज नी सुसंकृत देश अशी आपली जगात ओळख आहे. आपला देश बलशाली आहे, आधुनिक आहे नी सर्वात महत्वाचा  म्हणजे प्रजासत्ताक आहे. आपण लोकशाही भारताचे नागरिक आहोत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
गेल्या पंच्याहत्तर वर्षात काय कमावलं  हे लिहिताना खूप काही करायचं आहे याची जाणीव आहेच. काय गमावलं  याचंही स्मरण करणं  आवश्यक आहे.. स्वातंत्र्याचा जमा-खर्च मांडताना नियतीच्या पानावर घाम आणि रक्ताच्या शाईने तो लिहावा लागतो, याचे भान आणि जाण सगळ्यांनीच ठेवली  पाहिजे. शेवटी अपेक्षित आहे ते  राजिंदर कृष्ण  यांच्या गीतातील  भारत अस्तित्वात येणं.

जहाँ डाल डाल पर सोने की ,चिड़िया करती है बसेरा,
वो भारत देश है मेरा,वो भारत देश है मेरा 

20 thoughts on “वो भारत देश है मेरा.”

    1. लेख खूप छान झालाय. स्वातंत्र्यानंतरचा 75 वर्षाचा सुरेख आलेख. देशभक्तीपर गीत, त्यातील भाव छान मांडलाय. सगळीच गाणी सुंदर. माझा विशेष आवडतं, 1962 ची युद्धाच्या पार्श्वभूमीवरील, रफींचं ” कर चले हम जुदा तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो “. हे गाणं ऐकताना आजही अंगावर शहारे येतात.

      1. नीलिमा टिळक

        खूप छान लेख..आणि गाण्यातून त्या प्रसंगाच्या अमोल अशा आठवणी..
        जय भारत..🙏

      2. Thank you Rajeshji,
        हा सगळा इतिहास एवढा दैपिप्यमान आहे की खरंच ही गाणी ऐकली की मन भरून येते , मान ताठ होते.
        .

  1. खूप छान लिहीलं आहे.

    गांवाकडील, पूर्वीच्या काही स्वातंत्र्यसैनिकांचे चेहरे डोळ्यांसमोर येतात, आणि मन भरून येते. पुढच्या पिढीला काहीतरी मिळावे, किंवा मिळेल, त्यांना आपल्यासारखे दुःख भोगावे लागणार नाही, केवळ या आशेवर, ही आमची मागची पिढी आपले आयुष्य नुसते उधळून देते, आसमंतात ! काही उधळले गेलेले दिसतात, तर कित्येक दिसत पण नाहीत. त्यांचे अनामी, अज्ञातपणे उधळले गेलेले आयुष्य, हे लक्षात ठेवायला हवे. बस ! असे काही विचार येत रहातात.

    1. Thank you so much Bhokarikar sir,.
      माझे आजोबा होते. नंतर काँग्रेस मध्ये मोठ्या पोस्टवर होते पण त्यांनी पैसे खाल्ला नाही ..ती ही सेवाच समजून नोकरी केली,
      बाबा आणि त्यांच्यात वाद व्हायचा ..पैसे खाल्ले नाही म्हणून नाही पण काय मिळाले तुम्हाला असे यायचं मनात . ते सांगायचे , तुला समजणार नाही .
      आता नाही आहेत ते बरेच , कदाचित हाय खाल्ली असती त्यांनी .

  2. क्या बात है🇮🇳
    संग्रही ठेवावा आणि नेहमीच अभिमानाने वाचावा असा सर्वांगसुंदर लेख 👌🏼👌🏼🇮🇳

  3. अप्रतीम लेख .देशभक्तीपर गीत ऐकताना खरंच छाती गर्वाने फुगते .राष्ट्रगीत गाताना जय हे म्हणताना सविनय सॅल्यूट केली जाते .वंदेमातरम् चे शब्द तर अप्रतीम आहेत आपोआप आपण नतमस्तक होतो .जयहिंद

    1. अगदी ग रश्मी.
      घरी असले तरीही कानावर राष्ट्र गीत आले की मी उभी राहते
      छाती अभिमानाने भरून येते
      .

  4. अप्रतिम; संग्रही असावा असा लेख 👍👌
    संपूर्ण स्वातंत्र्याच्या 75 वर्षातील घेतलेला आढावा सूक्ष्मनिरीक्षण, बारीक तपशील यांनी परिपूर्ण असा लेख तुम्ही लिहिला आहे.
    नेहमीप्रमाणेच मला खूप आवडला👍
    अलीकडचा आमिर खानच्या रंग दे बसंती या सिनेमाचा पण उल्लेख हवा होता असं उगाचच वाटून गेलं

    1. Thank you Veenaji.
      खरे आहे
      फक्त राजकारणी लोकांवर टीका असे झाले असते .
      Actually हा लेख दिवाळी अंकासाठी होता ,,आणि अनेक वेळा कोण कुठल्या पार्टी बरोबर हे समजत नाही .
      म्हणून टाळला.

  5. खूपच सुंदर…..
    अंगावर रोमांच येतात ही गाणी ऐकताना…
    मस्तच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *