पार्ट ४
यावर्षी देशाच्या काय, जगाच्या अनेक भागात तुफान पाऊस पडला. प्रगत देशात सुद्धा विमानतळावर पाणी साचल्याने विमाने रद्द केली गेली. त्याचे काही व्हिडीओ बघत होते. गुढग्यापर्यंत पाणी आणि लोक घाबरून उभे ! एकदा सुबत्ता आली की सारे जग आपल्यासाठीच बनलेले आहे अशा समजुतीत माणसे जगतात आणि मग कधीतरी गृहीत धरलेला निसर्ग जागा होतो तेव्हा विकासाच्या जागी आपण विनाशाला आमंत्रण दिले आहे हे लक्षात येते. अनेकवेळा उशीर झालेला असतो.
पावसाचा गुलाबी आणि हिरवा रंग आपल्या परिचयाचा आहे पण अनेकदा पाऊस सुद्धा माणसासारखा वागतो.
धुमसत राहतो आणि मग संतापून आपला हा मुखवटा फेकून देतो. झोडपून काढतो.
त्याचे झोडपणे मग मर्यादित राहत नाही. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड मध्ये पावसाने रस्ते उखडले, गावे उध्वस्त केली, पर्वत फोडले, माणसांना काय, मोठ्या इमारतींना भिरकावून दिले. कोणत्यातरी सिनेमातले, कॉम्पुटरच्या साहाय्याने बनवलेले खोटे खोटे दृश्य आहे की काय असा समज होईल असे विनाशक दृश्य होते.
चीन, युरोप, कॅनडा मधेही हेच झाले.
ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल हे केवळ शब्द नसतात हे जाणवायला हवे.
पावसाचे हे रूप अगदी नकोनकोसे करून सोडते.
आवारा
————–
कशाचा अंत झाला तर माणूस मरतो? शरीराचा? का आत्म्याचा ?
याचे उत्तर आवारा या सिनेमात मिळते.
जग्गाने गुन्हा केलेलाच नसतो पण त्या न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला तुरुंगात पाठवले जाते. सुटला तरी तुरुंगात गेल्याचा डाग राहतोच आणि चांगले आयुष्य जगण्याचे त्याचे स्वप्न धुळीला मिळते . तो डाकू बनतो.
न्यायाधीश रघुनाथ ( पृथ्वीराज कपूर ) यांच्याकडून एक मोठी चूक घडते . त्याचे पडसाद आयुष्यभर त्याना ऐकावे लागतात.
“आवारा “हा जग्गाने घेतलेल्या सूडाचा प्रवास आहे. आपल्या अन्यायाचा बदल घेण्यासाठी, जग्गा, न्यायाधीश रघुनाथाच्या बायकोला पळवतो . तिच्यावर बलात्कार करण्या आधी त्याला समजते की, ती गरोदर आहे आणि याची तिच्या नवऱ्याला खबर नाही. एक कारस्थान त्याच्या डोक्यात शिजू लागते. अनेक दिवस स्वतः कडे ठेवून तो तिला नवऱ्याकडे परत पाठवतो खरे पण तिच्या शीलाचा संशय येऊन न्यायाधीश तिला घरातून हाकलवून देतात .
निर्मनुष्य, ओला, निसरडा, दगडी रस्ता, पावसाचे धुमशान आणि एक असहाय्य स्त्री .
दिवस भरत आलेले. वेदना असह्य होऊन ती आक्रोश करत आहे पण ऐकायला कोणी नाही. सोबत आहे ती फक्त गदगदून कोसळणाऱ्या ढगांची. मुलाच्या या जगात येण्याची जग्गा वाट पाहत आहे. मुलाच्या रडण्याचा आवाज कानी पडतो. त्याचा केविलवाणा हंबरडा आणि पार्श्वभूमीला पावसाची रुदन पण जग्गाच्या चेहेऱ्यावर एक आसुरी आनंद.
“मुबारक हो जज्ज साब . आपको बेटा हुआ है “
त्याचे राक्षसी हसू आसमंतात घुमते.
येणारा पाऊस मुलाच्या जन्माची बातमी घेऊन येतो खरा पण त्याचवेळी त्याचे अनाथ पण कपाळावर नोंदून ठेवतो.
केलेल्या पापाची भुते राहतात. ती नंतर छळतात . काही वर्षांनी जज्ज साहेबाना समजणार असते , मुले जन्माने चोर नसतात . ज्या परिस्थितीत ती वाढतात ती परिस्थिती त्यांना सज्जन किंवा दुर्जन बनवते.
एका चांगल्या आत्म्याचा हा मृत्यूच तर असतो.
मुंबईचा पाऊस अनेक सिनेमातून चित्रित झाला आहे. “रिमझिम गिरे सावन” ते “गूँजा सा है कोई इकतारा इकतारा” पर्यंत प्रेमाच्या रंगात भिजलेली स्वप्नाळू मुंबई सर्वानाच सुखावते.मुंबईच्या याच पावसाचे क्रूर आणि रौद्र रूप मात्र “अर्जुन” या सिनेमात दिसते.
अर्जुन
——-
मुंबईला स्वप्न नगरी म्हणतात. आकाशाला भिडणाऱ्या इमारतीत राहणाऱ्या मूठभर लोकांसाठी ती हे नाव सार्थ करते. त्याच मुंबईत असंख्य लोकांची आयुष्ये फक्त स्वप्ने रंगविण्यात संपतात. डोळ्याच्या खाचा राहतात पण स्वप्नांना रंग चढत नाही. अर्जुन मालवणकर अशा तरुणाचे प्रतिनिधित्व करतो.
तो आणि त्याचे काही मित्र सुशिक्षित तर आहेत पण त्यांना नोकरी नाही. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या या समाजात त्यांना स्थान नाही. याचा अंत एकच … एकतर स्वतः मिटून जाणे किंवा विद्रोह करणे. अर्जुन दुसरा मार्ग निवडतो. खंडणी मागणाऱ्या गुंडांना तो चोप देतो खरा पण शहराचा मुख्य मंत्री त्याच्या विरोधात जातो.अर्जुन आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या खुनाची सुपारी दिली जाते आणि मग सुरु होतो मृत्यूचा जिवघेणा पाठलाग.
मुंबईतील गजबजलेला रस्ता, भर दिवसा शहराला झोडून काढणारा पाऊस, छत्र्यांची गर्दी. जिथे नजर जाईल तिथे काळ्या छत्र्या, जणू काही मृत्यूची सावलीच. त्यातून जीव घेऊन पळणारे सावज. अर्जुनाचा मित्र मोहन आणि त्याच्या पाठी हातात तलवार घेऊन निघालेले शिकारी. चेहेरा दिसत नाही पण त्यांच्या डोळ्यात खुनाची नशा आहे. पावसात भिजणाऱ्या गर्दीला त्याची जाणीव नाही, असली तरी पर्वा नाही आणि पर्वाही असली तरी अडवायचे सामर्थ्य नाही. गर्दी आहे पण तिला कसलाही रोल नाही.
तसाही समाज नपुंसक असतो म्हणून तर अशा राजकारण्यांचे, गुंडांचे फावते.
मकबूल —
———-
“शक्ती का संतुलन बहुत जरुरी है , आग के लिये पानी का रहना जरुरी है”
विशाल भारद्वाज चा मकबूल हे शेक्सपिअरच्या मॅकबेथ चे भारतीयकरण.
When shall we three meet again?
In thunder, lightning, or in rain?
मॅकबेथ ची सुरुवात ह्या शब्दांनी केली आहे. तीन चेटक्या जेव्हा जेव्हा अवतरतात, तेव्हा तेव्हा वातावरणात बदल होतात. ढगांची गडगड , विजेचा लोळ आणि पुढच्या आक्रिताची कल्पना आल्याने जीव तोडून रडणारा पाऊस.
माणसे स्वतःच्या कृत्यांनी बसलेली घडी विस्कटतात. मग त्याचे परिणाम होणार असतातच . ते टाळता येत नाही.
म्हणून पाऊस रडतो ?
अब्बाजी ज्या मार्गावरून जात असतो त्याचा शेवट त्याला त्याच मार्गावर नेणार असतो. ,निम्मी, मकबूलला, आबाजीला मारायची गळ घालते. तिचे स्थान, तिचा आब ठेवण्यासाठी ते गरजेचे असते.
स्त्री देहाची ताकद आणि सत्तेचा मोह, प्रामाणिकपणाला, विश्वासाला हुसकावून लावतो .
चोरांच्या दुनियेत कायद्याला नाही पण त्यांच्या शब्दाला किंमत असते. हा नियम आज मोडणार असतो. मकबूल जेव्हा आपल्या आश्रयदात्याविरुद्ध हत्यार उचलतो तेव्हा पाऊस सुद्धा आक्रोश करतो.
“ मी गेल्या किती वर्षात असा पाऊस पहिला नाही. देवा तूच सांभाळ” एक वृद्धा न राहवून बोलते कदाचित नियती तिच्या तोंडून तिला जे हवे ते वदवते …
पावसाच्या साक्षीने एका साम्राज्याचा अंत होत असतो.
मदर इंडिया
————
पाऊस नेहेमीच जीवनदायी नसतो. कधीतरी ही दुनियादारी पाहून, त्याचाही तोल जातो मग तुफानाला उधाण येते..
निसर्ग कोपतो तेव्हा त्यात ओल्याबरोबर सुकेही जळते. राधाचा काय दोष असतो ! नवरा पळून गेलेला, तीन मुले पदरात आणि सारे घरच कर्जात फसलेले ! देव, परीक्षा सुद्धा चांगल्या माणसांची पाहतो.
वारा सुटलेला , कसल्यातरी अशुभाची कल्पना देत काळे कुट्ट ढग जमा होतात. राधाची मैत्रीण कमला एका आशंकेने तिला सावध करते. आता पाऊस वाढला तर सगळी पिके नष्ट होतील आणि ही जणू भविष्यवाणी असल्यासारखा तो कोसळतो .
बघता बघता पाणी वाढू लागते. पायाखालची जमीन गिळून टाकते.
दोन असहाय्य, दुर्दैवी बायका स्वतःला आणि मुलांना सांभाळत सुरक्षित जागेकडे येण्याची धडपड करू लागतात.
त्या मृत्यूच्या तांडवात कमला वाहून जाते.
राधा आणि तिची मुले, कशीतरी एका झोपडीत पोचतात. लाकडाच्या मोडलेल्या फळ्यांचा आधार घेऊन जीव जगवण्याची धडपड करत असतानाच, चिखलाचा लोंढा तिथे पोचतो. आईचा अपुरा पदर धरून मुले रडत असतानाच छोट्या मुलाचा बळी घेऊन पाऊस शांत होतो.
पाऊस आणि मृत्यू हे समीकरण नेहेमीच नकोसे नसते. तसेही मृत्यू म्हणजे तरी काय ! एका जीवनाचा अंत होत असतानाच , दुसऱ्या जीवाची बीजे रोवली जाण्याचा क्षण.
थकलेल्या सृष्टीला बरसणारा पाऊस नवजीवन देतो, मृत्यू सुद्धा थकलेल्या शरीराच्या यातना संपवतो.
ज्युरासिक पार्क
———————
उद्योगपती जॉन हॅमंडने कोस्टा रिका या बेटावर क्लोन डायनोसोअर्सचे एक थीम पार्क बनवले आहे. अपघाताने येथील वेलोसिरेप्टरकडून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू होतो. पार्कमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे, त्यांचे वकील सुरक्षा प्रमाणपत्राची मागणी करतात. येथील व्यवस्था बघण्यासाठी काही व्यक्तींना आमंत्रित केले जाते. इथे आल्यावर त्यांना समजते की डायनोसोअर्सचे क्लोनिंग यशस्वी झाले आहे.
ही मंडळी अंड्यामधून व्हेलोसिरॅप्टर जन्म घेताना बघतात. अशा प्राण्यांचे क्लोनिंग करणे हे नैतिक असू शकते का यावर चर्चा करतात. पार्कची सुरक्षितता अपुरी आहे असेही यातले एकाचे म्हणणे असते.
त्याचा प्रत्यय त्यांना लवकरच येतो.
वादळाची चाहूल लागल्याने इथे काम करणारे कर्मचारी मुख्य बेटावर निघून जातात. भेट द्यायला आलेल्या तिघांना रिमोट ने चालू असलेल्या गाड्या दिलेल्या असतात. त्यांच्याबरोबर जॉन ची दोन नातवंडे सुद्धा असतात पण इथे एक कर्मचारी डायनोसोअर्सची अंडी चोरून नेत असताना, पार्कचा कॉम्पुटर प्रोग्रॅम बंद करतो आणि गाडी बंद पडते.
वादळाचा जोर आता वाढलेला असतो.
वातावरणात काळोख दाटून येतो. पडणाऱ्या पावसाशिवाय दुसरा कुठलाही आवाज नाही. गाडीत बसलेली माणसे, खिडकीतुन निरुद्देश बाहेर बघत आहेत. बंद जागेतील ती घुसमट आता प्रेक्षकाला सुद्धा जाणवायला लागते तेवढ्यात त्यांच्यातील छोट्या मुलाचे लक्ष गाडीत ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या पेल्याकडे जाते. पाणी थरथरत असते. त्याचे हिंदकळणे वाढते. शुल्लक घटना एका भयानकाची सूचना देत असते.
अचानक त्यांचे लक्ष गाडीच्या आरशात जाते आणि पावसाने भिजलेल्या गवताच्या पात्यातून आपल्या भल्या मोठ्या टी रेक्स चे दर्शन होते.
द क्रो
———
असे मानतात, माणूस जेव्हा मरतो, तेव्हा त्याच्या आत्म्याला, मृत्युलोकात नेण्याचा मार्ग कावळा दाखवतो. नैसर्गिक रित्या मरण आले तर हे सहज होते पण अपघातांत किंवा क्रूरतेने मारले असेल तर अशा आत्म्याच्या भोवती वेदनेची सावली असते आणि आत्मा सहजासहजी शरीरापासून मुक्त होत नाही. अशावेळी कावळा , त्या आत्म्याला परत याच लोकांत आणतो. जे बिघडले आहे ते दुरुस्त केल्याशिवाय तो जात नाही.
१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या द क्रो ची ही कथा.
रॉक संगीतकार, एरीक ड्रेव्हनची हत्या केली जाते. त्याच्या प्रेयसीवर त्याच्याच डोळ्यासमोर, बलात्कार केला जातो. बरोबर एक वर्षांनी एरिकच्या थडग्यावर एक कावळा टकटक करतो. थडगे उघडते. एरीक, स्वतःच्याच थडग्यातून बाहेर पडतो.
जे घडले होते , त्याच्या आठवणी त्याला चित्ररूपाने दिसतात. त्याला हे ही समजते की मृत्यूनंतर तो बाहेर आल्यामुळे, त्याच्या जखमा लगेच भरुन येतात.
आता जे कार्य अपुरे राहिलेले असते, ते पूर्ण करायला तो बाहेर पडतो. बदला घेण्याच्या त्याच्या मोहिमेत तो एकटा नसतो.
एक कावळा त्याची सोबत करणार असतो.
डेट्रॉईट येथे या सिनेमाचे शूटिंग झाले आहे. सतत पडणारा पाऊस, भरून आलेले आभाळ आणि अंधाराची दाट छाया गूढतेत अजून भर टाकतात. गॉथिक साहित्याचा उपयोग केला इथे. भीतीदायक, वस्तीपासून लांब असलेल्या जागा, गुपिते दडवून असलेली अजस्त्र घरे, कसल्यातरी अशुभ षडयंत्रात सापडलेली नायिका, ज्याच्यावर कसलाही ताबा नाही अशा घटना या सर्वाचा या सिनेमात उपयोग केला आहे. हॅलोविन च्या आधीची रात्र , जी सैतानाची रात्र म्हणून ओळखली जाते त्या दिवशी घडणाऱ्या घटनेनें सिनेमाची सुरुवात होते, जेव्हा धो धो पाऊस पडत असतो.
अनफरगिव्हन (Unforgiven)
—————————–
याची कथा अगदी साधी आहे. एक निवृत्त गुन्हेगार, परत खुनाची सुपारी घेतो, हो, त्याला पैशाची गरज भासते. आणि त्याचा सामना तेवढ्याच खुनशी शेरीफ बरोबर होतो.
हा गुन्हेगार वाईट असतो पण शेरीफ सुद्धा काही चांगला नसतो. चांगल्या आणि वाईट मधला संग्राम नाही आहे हा.
वाईट आणि अजून वाईट असा सामना आहे हा.
बिग व्हिस्की हे या कथेतील मुख्य स्थळ. या जागेचे सर्वच ग्रह, पाप ग्रह आहेत. येथील शेरीफ विकृत मनोरुग्ण आहे, येथील स्त्रिया या वैश्याव्यवसायात आहेत आणि सगळ्यात वाईट म्हणजे या प्रदेशावर पावसाची जरुरीपेक्षा जास्त कृपा आहे.
वेस्टर्न सिनेमा , म्हणजे अमेरिकेच्या पश्चिम भागात घडणाऱ्या कथा. आता या प्रकारच्या सिनेमात सूर्याची झळ जाणवते. रखरखीत निर्जन, ओसाड प्रदेश, नजर जाईल तिथे वाळू आणि छोटी झुडपे किंवा निवडुंगाची झाडे. क्वचित बर्फ सुद्धा पण ढगाळ हवामान या अशा प्रकारच्या सिनेमात आढळत नाही.
इथे मात्र पाऊस आहे ..संपूर्ण सिनेमात; होणाऱ्या हिंसाचाराची नांदी.
सुरवातीचा सीन .
तिन्हीसांज झाली आहे. आकाशाने नारंगी रंगाची झूल पांघरली आहे. लांब, एका कोपऱ्यात, एक माणूस काहीतरी कापत आहे.
स्क्रीन वर अक्षरे उमटतात.
“ ती अतिशय सुंदर मुलगी होती जिला अनेकांनी मागणी घातली होती.. जेव्हा तिने विलिअम मनी सारख्या खुनी आणि गुंड माणसाशी लग्न केलं तेव्हा तिच्या आईला खात्री होती की हा माणूस आपल्या मुलीला मारून टाकेल.
दोन मुलांना जन्म देऊन ती मेली खरी पण त्याचे कारण तिचा नवरा नव्हता. देवी ह्या रोगामुळे तिचा अंत झाला.”
आता पडद्यावर बर्फाच्छादित डोंगर दिसू लागतात. हे स्थळ असते, बिग व्हिस्की. काळ १८८०
आकाशात काळे ढग जमू लागतात. वादळाला सुरुवात होते. कॅमेरा एका वैश्यागृहाचे चित्रण टिपतो. आता मध्ये एक तरुण-तरुणी रती क्रीडेत मग्न असतात आणि अचानक तो तरुण शिव्या द्यायला लागतो. ती वेश्या, त्याच्या शरीरावरुन, चेष्ठा करत असते . तिला शिक्षा म्हणून त्याचा मित्र, तिचा चेहेरा सुरीने विद्रुप करतो.
पाऊस जोरात कोसळायला लागतो.
या गावचा शेरीफ, त्या दोन तरुणांना शिक्षा म्हणून , वेश्यागृहाच्या मालकाला, काही घोडे द्यायला लावतो .
जिचे उदरनिर्वाहाचे माध्यमच नष्ट झाले असते, तिच्या सन्मानाचे/ नुकसानाचे, प्राणाचे कुणालाही पडलेले नसते. संतापाने सर्व वेश्या एकत्र येऊन त्या मुलांच्या डोक्यावर १००० डॉलरचे बक्षीस लावतात.
सिनेमाची सुरुवात अशा धुवांधार पावसाने घातलेल्या धुमाकुळानें होते.
