तीर्थक्षेत्राला माणसे अशीच जात नाहीत. वरतून बोलावणे होते. नाहीतर काशीला जायचे का हे नवऱ्यानेच विचारणे खरंच अशक्य होतें. लग्नानंतर मंगेशीला आम्ही जोडीने अभिषेक केला होता. त्यानंतर जगदीपने काही फार उत्सुकता दाखवली नाही की मी आग्रह धरला नाही. आस्तिक असणे आणि नास्तिक असणे हे स्वतःच्या प्रवृत्तीनुसार असावे. ते थोपवता येत नाही. ईश्वर सुद्धा मला माना म्हणून आग्रह धरत नाही. सनातन धर्माचे केंद्र म्हणून ओळखली जाणारी, पावलो पावलो नतमस्तक व्हावे एवढी मंदिरे असणारी काशी, जोडीने पहावी असे ह्यानेंच सुचवणे म्हणजे केलेली हरितालिका आणि सोळा सोमवार फळले असे त्या क्षणाला मनात आले. जन्माला यावे आणि आयुष्यात एकदा तरी काशीला जावे असे म्हणतात. आमचा मुहूर्त उशिरा लागला.
वाराणसीची फ्लाईट पूर्ण भरलेली होती. बहूतेक सर्वच महादेवाचे भक्त. काहीं चुकार परदेशी. एक कुटूंब मुलाच्या लग्नासाठी चालले होते. मूळ लखनौवासी, कर्मभूमी मुम्बई पण गृहस्थाश्रमाची सुरुवात त्यांना शंकर पार्वतीच्या साक्षीने करायची होती. प्राचीन काळापासून काशी हे शिक्षणाचे केंद्र आहे. आधुनिक विज्ञानाचा पाया असलेल्या गणिताची जन्मभूमी काशी असे आईनस्टाईनने लिहून ठेवले आहे. काशीच्या पंडितांचा भारत वर्षात दबदबा होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे विद्यार्थी येत, गुरुगृही राहत आणि आपले शिक्षण पूर्ण करत याचे उल्लेख इतिहासाच्या पानापानांत आढळतात.
काशीच्या जन्माची कथा शोधत काळाचा मागोवा घेतला तर असे म्हणतात, काशी इतिहासाहून प्राचीन आहे. रूढी-परंपरा जेव्हा अस्तित्वात आल्या, त्याच्याही आधीपासून काशीचे अस्तित्व आहे.
काशीचा पहिला उल्लेख अथर्ववेदात आला. या शिवाय शिवपुराण, ब्रम्हपुराण, स्कंद पुराण यातही या नगरीचे उल्लेख आहेत. रामायणातील लक्ष्मण माता, सुमित्रा ही काशीचीच राजकुमारी.
काशीच्या गोष्टी वाचत होते तेंव्हा पुराणातल्या कथेतील एक कथा मला अतिशय आवडली. लग्न झाल्यावर महादेव, पार्वती सहीत हिमालयात राहू लागले. सासरी किती दिवस राहायचे असे महादेवांना वाटले आणि देवी पार्वतीची पाठीशी भुणभुण होतीच. जागेच्या शोधात जगभर भ्रमण करताना उभयतां काशीला आले आणि इथेच स्थिरावले. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम .. आयुष्याचे चारही काळ ज्या शहरात मनुष्याला जगायला आवडतील असे काशी जगातले एकमेव शहर असावे.
२०१५ पासून काशीच्या भाग्योदयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंतप्रधान मोदीजी यांचा हा मतदारसंघ. येथील विमानतळ हा त्याची साक्ष देतो. लहान आहे पण देखणा. स्वच्छ. पुढील काही वर्षात अजून शंभर एकर जमिनीवर हा वाढवण्यात येणार आहे.
काशीच्या दर्शनाला येणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी याची आवश्यकता आहेच. काशीची लोकसंख्या वाहती आहे. रहिवाश्यांपेक्षा जास्त संख्या प्रवाशांची भरेल. एक दिवस येवून दर्शन घेणारे प्रवासी ते इथे येवून महिनोन्महिने मुक्काम ठोकणारे प्रवासी ..मुक्काम कितीही दिवसांचा असो, त्याला मर्यादा आहे ह्याची जाणीव काशीला आल्यावर होते.
विमानतळापासून मुख्य मंदिराकडे जाण्याचा हमरस्ता रुंद आहे. आजूबाजूला बंगले वजा वस्ती. त्या घरांच्या पाठीमागे शेती. G २० नुकतेच झाल्याने येथील काही भागातली घरे एकच रंगाने रंगवली होती. हिरवी किंवा पिवळी. येथील शेतांचा रंग घरात उतरला होता.
गंगेच्या किनाऱ्यावर बांधलेले असंख्य घाट, घाटांवर बांधलेली मंदिरे, मंदिराकडे जाण्यासाठी बांधलेल्या उंच पायऱ्या, इथल्या धनिकांनी आणि राजे राजवाड्यांनी बांधलेले महाल, बांबूच्या छत्रीच्या खाली बसून, मंत्रोच्चराच्या साहाय्याने, भक्त आणि ईश्वर यांच्यात संवाद घडवून आणणारे पुजारी, येथील किनाऱ्यावर हजारो वर्षे जळत असलेल्या चिता, पाहून असे वाटते, भारतीय संस्कृतीच्या या अनादी प्रवाहात काळ जणू थांबला आहे.
ही आहे आमची काशी .
भल्या पहाटे, वाराणसीला जाग येते. सूर्याच्या पहिल्या किरणाच्या साक्षीने गंगा नदीच्या तीरावर, इथले सांस्कृतिक आणि अध्यात्मिक जीवन सुरु होते. जन्मापासून, मृत्यूपर्यंत इथल्या नागरिकांचे जीवन गंगेशी जोडले गेले आहे. तिचे नाव घेता क्षणी, जन्मोजन्मीचे पाप नष्ट होऊन, माणसाला मोक्ष मिळतो अशी त्यांची श्रद्धा आहे.
वाराणसीचे जगप्रसिद्ध घाट
——————————-
हे शहर, गंगा नदीच्या किनाऱ्यावर बांधलेल्या घाटांवर वसले, बहरले, समृद्धीला पोचले.मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासाचे हे घाट साक्षी आहेत. साधू, संत, तत्वज्ञानी, भिकारी, प्रवासी, यात्रेकरू, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना गेली कित्येक शतके काशीने आकर्षित केले आहे. कवी तुलसीदास आणि कबीरांनी इथल्याच पायऱ्यांवर बसून काव्य निर्मिती केली. काशीत ऐंशीहून जास्त घाट आहेत. त्या प्रत्येक घाटाच्या मागे त्याची स्वतःची कथा आहे. मोदी सरकारच्या कालावधीत, काशी विश्वनाथ धाम या प्रोजेक्टने, या घाटांना, पर्यायाने वाराणशीला नवजीवन दिले आहे. 
आमचा मोठा ग्रूप होता. नवऱ्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील मित्र सपत्नीक आले होते. यातलेच काही अयोध्या करून येणार होते. त्यांच्यातील दोघे, हरीश गुत्तीकर आणि कर्नल त्यागी यांचा आयोजन करण्यात मोठा वाटा होता.
केदार घाटावरून गंगारती ज्या घाटावर होते तिथे जाण्यासाठी नाव मिळते. पोचेपर्यंत काळोख व्हायला सुरुवात झाली होती. सूर्यनारायण अस्ताला गेले होतें. घाटावर लावलेल्या दिव्यांचा प्रकाश पाण्यावर पडला होता. गंगारती करण्यासाठी दिवा आणि फुलांनी सजलेले छोटेसे द्रोण विकणार्यांकडे लोकांनी गर्दी केली. पंचेचाळीस लोक मावतील अशी ती छोटीशी नाव होती. सर्व बाजूंनी वजन सारखे राहील जेणेकरून नाव उलटणार नाही हे बघण्याकडे नावाड्यांची नजर होती. आम्ही दोघे टोकाला होतो, आणि आम्हाला मिळेपर्यंत लाईफ जॅकेट्स संपली. आज आयुष्याच्या या पडावावर आहे की स्वतःच्या आयुष्यापेक्षा पार्टनरची काळजी वाटते.
“निदान एक तरी शोधा न, “असे मी काकुळतीने सांगताच नुकत्याच ओळख झालेल्या हर्षी ताईंनी आपले लाईफ जॅकेट्स काढून जगदीपला दिलें. तो नको नको म्हणत असतानाही त्याच्या हातावर थोपटून त्याला अंगात चढवायचा इशारा केला. कृतज्ञतेने वाकलेले असतानाच काशीला जायला वानप्रस्थाश्रम का निवडत असतील याची लख्ख जाणीव झाली.
आता फिकट सोनेरी पाण्यातून आमची नाव हळू हळू दशाश्वमेध घाटाकडे सरकू लागली.
गंगा नदीप्रती कृतज्ञता म्हणून काशीत गंगेची आरती करण्याची प्रथा आहे. आज त्याला सोहळ्याचे स्वरूप आले आहे. सूर्यास्त होण्याच्या आधीपासूनच घाटावर लोकांचे लोंढे येऊ लागतात. जिथे मिळेल तिथे जागा पकडली जाते.
वातावरणातील नकारात्मकता दूर करण्यासाठी शंख फुकला गेला. शंख ध्वनीचा आवाज येता क्षणी लोकांचा कोलाहल थांबला. पुजार्यांनी आरतीला सुरुवात केली. घंटांच्या नादावर, मंत्राच्या जयघोषात, हातात पितळेचे मोठे दिवे घेऊन लयबद्ध हालचालीत होणारे ते नर्तन पाहताना भारावून जायला होते..
भागीरथीतीर सदा पवित्र | जेथें असे तारक ब्रम्हामंत्र |
विश्र्वेश विश्र्वंभर त्रिनेत्रधारी | तुजवीण शंभो मज कोण तारी|
उच्च रवात गायलेले श्लोक आणि घंटाचा वाढत जाणारा नाद, वातावरणात भिनत जाणारा चंदनाच्या अगरबत्तीचा सुगंध
हे सर्वच गुंगवून टाकणारे. नास्तिकाचे सुद्धा हात जोडले जातील.
Varanasi is magical.
.
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।
सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि।।
आरतीची सांगता व्हायला सुरुवात झाली. हातातले दिवे पेटवून लोकांनी गंगेच्या पाण्यात सोडायला सुरुवात केली. संथ वाहणाऱ्या प्रवाहावर आपली दिशा पकडून जाणारे, चमचमणारे दिवे म्हणजे तिला वाहिलेली असंख्य स्वप्नेच. असे म्हणतात, जेवढा दिवा दूर जाईल तेवढी स्वप्नांची पूर्तता होण्याची शक्यता वाढते.
आमच्या नावाड्याने सफाईने आपली बोट इतर नावांच्या गराड्यातून बाहेर काढली. एक फेरी मारून तो परत केदार घाटाकडे येणार होता. नाव थोडी पुढे गेली आणि काहीच अंतरावर मनकर्णिका घाटाची पाटी दिसली.
हा घाट म्हणजे कधीही विश्राम नसणारे स्मशान. तीनशे पासष्ट दिवस , चोवीस तास इथे चिता जळत असतात. असे म्हणतात, जे मृतदेह इथे येतात, त्यांच्या कानात प्रत्यक्ष शिव, तारक मंत्र उच्चारतात आणि आत्म्यासाठी मोक्षाचे दार उघडले जाते. श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष, कुणीही असोत, मोक्षप्राप्ती साठी इथे भेदभाव नाही.
यापासून जेमतेम पाच मिनिटावर असणाऱ्या घाटावर एक चैतन्य होते , आणि इथे मृत्यूची शांतता. अग्नीच्या ज्वालांचे तांडव सुद्धा किती वेगवेगळे असावे!
घाटावर एकाच वेळी पाच सहा चिता जळत असाव्यात. इथली हवा, धुराने गडद झाली होती. बाजूलाच पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले काही देह आपल्या नंबरची वाट पाहत होते. बाजूला कुणीच नाही . इथे रडणे सुद्धा अशुभ समजले जाते. मोक्षाप्रती जाणाऱ्या माणसाला रडून निरोप देऊ नये.
राम नाम सत्य है .. कानावर शब्द पडले.
मृत्यू हे अंतिम सत्य पण हे समजण्यासाठी मरावे लागते. अनेकांसाठी आरती नंतर आलेला हा अनुभव अस्वस्थ करणारा होता. नावाड्याला याची सवय असावी. त्याने न रेंगाळता तिथून नाव वळवली.
“ आपको डर नही लगता ?” मी विचारले .
जेमतेम पंधरा एक वर्ष असेल त्याचे.
“ हम तो बचपनसे ये देखते आ रहे है “ त्याने हसून सांगितले.
जिवा-शिवाची जडली समाधी | विटला प्रपंची तुटली उपाधी |
शुद्धस्वरे गर्जति वेद चारी | तुजवीण शंभो मज कोण तारी!
आतापर्यंत शिवस्तुति फक्त बोलत होते, आता उमजायला सुरुवात झाली.
घाटावर मी तीनदा गेले. सकाळी, दुपारी आणि रात्री. प्रत्येक वेळेची अनुभूती वेगळी. 
दशाश्व मेध आणि मणिकर्णिका घाटावर कायम वर्दळ असते पण बाकीचे घाट शांत असतात. इथे बसून चैतन्यमयी काशीचे दर्शन घेणे हे सुख आहे.
काशी उत्सुकतेने फिरायला येणारे प्रवासी, विश्वनाथाचे भक्त, भगव्या वस्त्रातले संन्यासी, राखेने माखलेले साधू , इथे एकत्र दिसतात. भोगी आणि विरागी दोन्ही आपापल्या जगात रमलेले असतात. कुणीतरी नवशिका कलाकार गंगेकाठी आपली कला सादर करत असतो. हात बघणारे ज्योतिषी आपली पोतडी घेऊन बसलेले असतात.
केदार घाटावरील केदारेश्वर मंदिरात मला दक्षिणी लोक जास्त दिसले. त्यांची लिपी असलेल्या फरशा सुद्धा आहेत इथे. इथल्या गौरी कुंडात विधी चालू होते. एखाद्या बालकाचे जावळ कापसापासून पिंडदानापर्यंत. कुणी स्त्री पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारत होती, कुणी सूर्याला अर्ध्य देत होते, कुणी डोळे मिटून ध्यान करत होते. धर्म आणि कर्मकांड यांचे हसत खेळत होणारे दर्शन म्हणता येईल. इथे येऊन गंगास्नान न करणे संभवत नाहीच. पापक्षालनासाठी गंगेत स्नान करणे हे अनिवार्य आहे. माणसे सोडाच, इथे मैना , कबुतरे अगदी म्हशी सुद्धा डुंबत बसतात. घाट म्हणजे मिनी मॉल्स आहेत. इथे पूजेच्या सामानाची दुकाने आहेत. रुद्राक्षापासून , मूर्तीपर्यंत, पूजेच्या उपकरणापासून , अनेक चित्र विचित्र गूढ पुस्तकापर्यंत इथे सर्व मिळते. ते ऑथेंटिक आहे याची खात्री दुकानदार देतो . विश्वास ठेवणे न ठेवणे तुमच्यावर आहे. मात्र कुणी तुमच्या मागे लागत नाही ..एकतर न आटणारा प्रवाश्यांचा लोंढा आहे आणि या वातावरणाचा प्रभाव असेल, माणसे समाधानी आहेत.
काशी पाहण्यासाठी येऊ नये, अनुभवण्यासाठी यावे इथे. हे शहर, एवढी गर्दी असून सुद्धा संथ आहे. एक ठेहराव आहे इथे. कितीही गतिमान आयुष्य असो, ते एक दिवस स्थिर होणार आहे याची “सुखद “जाणीव करून देते हे शहर. व्यस्त आयुष्यातून काही दिवस इथे राहावे. मन रिक्त होत जाण्याची ही सुरुवात असते.
#काशी_डायरी
भाग २
नास्तिक आणि आस्तिक माणसे एकत्र आली तर त्यांच्यात वाद होत नाहीत? एकाने इनबॉक्स मध्ये विचारले.
“नाही. एकमेकांबद्दल आदर असेल तर सुरक्षित अंतर ठेवून माणसे प्रवास करू शकतात. प्रामाणिक असणे, काम करणे, चांगले जीवन जगणे, शिक्षण घेणे ह्या सर्व माणसाच्या आवाक्यातील गोष्टी आहेत, त्यासाठी देव लागत नाही पण मी आस्तिक म्हणून जगदीपने कधीही नाराजी दाखवली नाही ..अपमान तर दूरच, ना तो नास्तिक म्हणून मी त्याच्यावर जबरदस्ती केली. अगदी सोळा सोमवारचे उपास ठेवले तेव्हा ते निर्जळी असल्याने, संध्याकाळी मुलाला वाढणे, त्याला सांभाळणे तो आणि सासरे करायचे पण पूजेला तो बसला नाही.
घरात उद्यापनाला सोळा जोडपी होती. त्यांचे स्वागत करणे, हवे नको बघणे त्याने आनंदाने केलं. त्याच्यासाठी तो सोहळा, माझ्यासाठी धार्मिक कार्य. यामुळेही असेल, आता काशीला जातोच आहे, गर्दी असेल, त्यात मोठा ग्रुप . प्रत्येकाचे हेतू वेगळे असतात. कुणासाठी खरेदी, कुणासाठी खाणे , त्यात देवदर्शन किंवा स्थळ दर्शन . यात जेवढे दिसेल ते आपले म्हणून घायचे हे ठरवूनच मी निघालेले. भोलानाथाची मात्र वेगळी इच्छा होती .
संध्याकाळी हरीश ने जाहीर केलं, उद्याच्या रुद्राभिषेकाची पावती घेतली आहे. सकाळी आपण तीन तीनाच्या ग्रूप ने करू.
मूळ मंदिरात तीन ते पाच दरम्यान स्पर्श दर्शन होते पण अयोध्येहून आलेले सर्वच दमले होते. आम्ही साडे सात च्या सुमारास देवळात पोचलो. रुद्राभिषेक करायला ही गर्दी. त्यात आपला नंबर कधी येणार, थांबावे लागेल मग बाकीच्या देवळांचे काय .. असे मनात येत असतानाच हरीश गाभार्याच्या जवळ गेला ..आम्ही त्याच्या पाठी. आतमध्ये रुद्र चालू होता. मंत्रोच्चाराचे उच्च स्वरातील पठण, तापत गेलेला आवाज, पिंडीसमोर डोळे बंद करून बसलेले दंपती … बघता बघता डोळे भरून आले. त्या क्षणाला असे खरंच वाटले नाही की आता आपल्याला मिळायला हवेच. माझ्यासाठी अभिषेक झाला होता. तेवढ्यात त्यांचा अभिषेक संपला आणि भटजींनी खूण केली. काही लक्षात येण्याच्या आत आम्ही गाभाऱ्यात होतो. दहा पैकी आम्ही तिघे.
काही वर्षांपूर्वी वाटले असते ..” We are the chosen ones “ यावेळी नाही वाटलें. माझी आई शंकराचे नाव घेत घेत गेली. तिच्यासाठी मंगेश म्हणजे सुरुवात आणि अंत. वडिलांना काही देव वगैरे नव्हतेच आणि तेव्हा काशीला जाणे सोपे नव्हते. पुजाऱ्यांची मनमानी, प्रचंड अस्वछता, तेव्हाच्या राज्यकर्त्यांची अनास्था आणि बजबजपुरी.
मनात आले, आईला इथे असणे किती आवडले असते. प्रार्थना केली. कोणत्याही रूपात, जिथे असशील तिथे, माझ्या डोळ्याने हे तुला बघता येऊ दे. मी आज इथे आहे हे तुझे पुण्य आहे.
पूजा करताना मंदिराचा वाचलेला इतिहास डोळ्यासमोर येत होता. किती लोकांनी आपला देव वाचवण्यासाठी आपले प्राण दिले असतील. असे म्हणतात, आपले देव वाचवण्यासाठी लिंगाला छातीशी धरून येथील पुजाऱ्याने विहिरीत उडी मारली. सर्वस्वाचा त्याग करून त्याने आपला धर्म वाचवला .
धर्म टिकायला चेहेरा लागतो.. रूढी, परंपरा, नियम, ग्रंथ पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या पद्धती तुम्हाला तुमची ओळख देतात. नास्तिक हिंदू म्हणून तुम्ही जिवंत आहात कारण अस्तिकांनी आपले प्राण पणाला लावले आहेत धर्मरक्षणासाठी. त्यांच्यासाठी त्यांचा देव आहे म्हणून ते आहेत आणि ते आहेत म्हणून आपण हिंदू म्हणून ताठ मानेने उभे आहोत.
आता मंदिरात गर्दी वाढू लागली.
सर्व स्तरातील माणसे. भक्तीला जातीचे, वयाचे बंधन नाही. कमरेत वाकलेली एक वृद्ध स्त्री फुलांचे ताट घेवून गाभाऱ्यात आली. ही लोकं बसली आहेत, आपला नंबर नाही. .याचे वैषम्य तिच्या चेहेऱ्यावर नव्हते..तिला आम्ही दिसतच नव्हतो..
ती आणि तो विश्वाचा नाथ एकमेकांशी एकरूप झाले होते. तान्ही मुलं, त्यांना मंदिराच्या पायरीवर ठेवून भोलनाथाचा आशीर्वाद मागणाऱ्या लेकुरवाळ्या, लौकिक जगाचे बंधन तुटलेला साधू, ध्यान लावून बसलेला संन्यासी, मंदिर न्याहळणारे प्रवासी, शांतीच्या शोधात जगभर फिरून इथे विसावलेला एक परदेशी, नवीन लग्न झालेलं जोडपे, आपल्या पत्नीच्या वर्षश्राद्धासाठी प्रत्येक वर्षी , गेली दहा वर्षे येणारे एक पंच्याऐंशी वर्षाचे गृहस्थ. काशीने सर्वांना सामावून घेतले होते.
मन कृतज्ञतेने आणि अभिमानाने भरून येण्याची अनुभूती काशीत अनेकवेळा येते. अहिल्या बाई होळकरांनी बाबा विश्वनाथ यांची स्थापना केली.. मोदीजींनी मंदिराला वैभवाच्या शिखरावर नेले.
काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास अतिशय विध्वंसक आहे. अकराव्या शतकात बांधलेले हे मंदिर ११९४ मध्ये मुहम्मद घोरी ने पाडले. ते परत बांधले. नंतर १४४७ मध्ये जौनपूरच्या सुलतान महमूद शाहने ते पुन्हा एकदा पाडले. १५८५ मध्ये राजा तोडरमलच्या मदतीने पंडित नारायण भट्ट यांनी विश्वनाथ मंदिर पुन्हा एकदा बांधले. यानंतर औरंगजेबाने १८ एप्रिल १६६९ रोजी हे मंदिर पाडले.
नंतर जवळजवळ १२५ वर्षांनी अहिल्या बाई होळकर यांनी आताचे विश्वनाथ मंदिर बांधले. महाराजा रणजित सिंह यांनी १८५३ मध्ये १००० किलो सोने या मंदिराला दान केले. आदि शंकराचार्य, संत एकनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद, गोस्वामी तुलसीदास अशा अनेक विभूतींनी या मंदिराला भेट दिली आहे.
मंदिराचा बाह्य भाग उत्कृष्ट कोरीव कामांनी सुशोभित केलेला आहे, ज्यामध्ये हिंदू पौराणिक कथा, प्राणी आणि गुंतागुंतीच्या फुलांच्या आकृतिबंधांचे चित्रण आहे. कळस सोन्याच्या पत्र्यानी मढलेला आहे.
३५० वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांना अरुंद गल्ल्या आणि रस्त्यातून जावे लागे. तेव्हा तर देवळात कमी जागा होती. मोदीजींच्या काशी कॉरिडॉर बांधकामामुळे दर्शन घेणे अत्यंत सुलभ झाले आहे.
गंगा नदीत स्नान करून भाविक मंदिरात येत. हे जल देवावर अर्पण केले जाई. हा परिसर अत्यंत लहान होता आणि त्यात नवीन बांधकामे होत असल्याने ही परिक्रमा करणे भाविकांसाठी कठीण होते. भक्तांची ही अडचण दूर करण्यासाठी मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडोरला मूर्तरुप दिले.
कॉरिडॉर भव्य आहे. प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या नावाने इमारती आहेत. मोठे रेस्टॉरंट आहे. आतमध्ये भारत मातेचा पुतळा आणि अहिल्या देवी होळकरांचा पुतळा आहे. तुमचे सामान ठेवायला लॉकर्स आहेत. पूजेचे रेट पत्रक मंदिरात लावले आहे. त्यामुळे लुटालूट होण्याचा काही चान्स नाही.
मंदिरातून सरळ बाहेर पडले की घाटावर येता येते.
विश्वनाथाच्या दर्शनाने मन आधीच तुडुंब भरलेले असते, तृप्त असते आणि नंतर गंगेचा संथ वाहणारा प्रवाह मनाला शांत करतो. काशीचे सर्व रस्ते गंगेकडे घेवून जातात. अनंत काळापासून या शहराला कवेत घेत गंगा वहात आहे. प्रवाशांची गजबज, तिच्या किनाऱ्याच्या साक्षीने होणारे विधी, अर्पण केलेल्या आणि आता निर्माल्य झालेल्या अनेक गोष्टींमुळे मलिन झालेले तिचं पात्र, तिच्या नावावर करण्यात येणारे व्यापारीकरण या सर्व गोष्टी बदलायला हव्यात हे मान्य असूनही एक गोष्ट आहे. तिच्या कुशीत मिळालेली शांती आणि ती आपल्या सोबत आहे हा विश्वास. हजारो वर्षात घडलेल्या असंख्य घटनांना ती साक्षी आहे आणि तरीही ती अविरत आपल्या गतीने वाहत आहे. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म कर या पाठाचे जिवंत उदाहरण आहे.
कॉरिडॉर आणि हमरस्त्याच्या काही भागाचे नूतनीकरण झाले असले तरी शहराच्या जुन्या भागात चिंचोळ्या गल्ल्या, अरुंद रस्ते आहेत. ट्रॅफिक जॅम नेहेमीच. जेव्हा पाच दहा मिनिटे रिक्षा अडकून पडते तेव्हा निदान तोंड नाही पण हॉर्न्स वाजतील असे वाटते , पण नाही. ह्या गोष्टी इथल्या रहिवाश्यांच्या सवयीच्या आहेत. ट्राफिक मध्ये वाट काढताना रिक्षावाले सफाईने रिक्षा काढतात पण अनेक वेळा त्या एवढ्या जवळून जातात की हात पाय आत ठेवा असे लहान मुलांना सांगतात तशा आपण नकळत बरोबरच्या मित्रमंडळींना सूचना द्यायला लागतो. गर्दीने भरलेल्या या गल्ल्यांत जिथे मिळेल तिथे जागा पकडून लोक गप्पा मारतात, चाट खातात, कुल्हडमधील चहाचा आस्वाद घेतात. प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेतात. आपण साध्या साध्या गोष्टींनी स्वतःचा तोल गमावतो . जिथे एकही क्षण असा जात नाही की घाटावर चिता जळत नाही, तिथे आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचे महत्व इथल्या लोकांना समजले आहे.
काशी अत्यंत प्राचीन शहर आहे. हजारो वर्षाचा इतिहास जगून, झालेली आक्रमणे सहन करून, मोडून पण परत उभे राहुन आपली संस्कृती आणि परंपरा जपून आहे. उगाच नाही पुराणात काशीला अमरत्व दिले आहे.
बनारसच्या रस्त्यांवर चालणे हा काही फार सुलभ नाही पण सुख देणारा अनुभव आहे. गल्ल्या चिंचोळ्या असतील पण रंगीत आहे. येथील भिंतीवर, घरांच्या दुकानाच्या दारावर फार सुंदर चित्रे आहेत. काही ठिकाणी अस्वच्छ सुद्धा आहेत पण जुने बांधकाम त्यांनी जपून ठेवल्याने असेल, आकर्षक आहेत. संकट मोचन हनुमान, काशीचा राखणदार कालभैरव , दुर्गा मंदिर, तुलसीदास यांचे घर जेथे त्यांनी रामचरित मानस लिहिले अशा जागा माहित जरी असल्या, तरी बरेचसे रस्ते तुम्हाला गोंधळात टाकतात. गल्ल्यांच्या भुलभुलैय्यात तुम्ही सापडला की हासभास नसताना काहीतरी अत्यंत सुंदर नजरेसमोर येते. गंतव्य माहित नाही, रस्ता जिथे नेतो तिथे पाय वळतात हा अनुभव सुद्धा अनोखा.
इथूनचे दगडी रस्ते माणसांबरोबर बाकीही प्राणी वापरतात. इथे चार पाय आणि दोन पाय असा भेदभाव नाही. गायी आणि कुत्रे आपल्या गतीने रमत गमत जात असतात आणि लोकं त्यांना हाडहाड करत नाही तर उलट त्यांच्यात मिसळून जाताना दिसतात. त्यांच्या पाठीवरून हात फिरवतात, त्यांना खायला देतात. यात्रेकरूंची, प्रवाश्यांची सवय असलेले हे शहर. अतिथी देवो भव हे जाणून आहे. त्यांच्या अंगात भिनले आहे. तुम्ही विषय काढा, ते खुलून बोलतात. आपले शहर, आपला देव, आपली मंदिरे, इतिहास, आपल्या रूढी परंपरा , इथले पंडित ..या साऱ्यांचा त्यांना अभिमान आहे.
काशीचे पूर्ण स्वरूप एका भेटीत समजणे कठीण आहे. तुकड्या तुकड्यात ते दिसते आणि एवढे वेगवेगळे असते की अचंबा वाटतो . धर्म, तत्वज्ञान आणि मंदिरे एवढीच काशीची ओळख नाही. इथली खाद्य संस्कृती सुद्धा प्रसिद्ध आहे. काशीच्या समृद्ध वारशाचा, संस्कृतीचा पगडा येथील खाद्यसंस्कृतीवर सुद्धा आहे.
काशीच्या रस्त्यारस्त्यांवर संध्याकाळ झाली की गाड्या लागतात आणि चाट खायला लोकांची , प्रवाश्यांची झुंबड उडते. गोलगप्पे, कचोरी चाट, सामोसा चाट , पालक भजी चाट ..आणि असंख्य प्रकार.
ते रिचवण्यासाठी वरती लस्सी , मलईओ, रबडी, जिलबी .
मला तर इथली डाळ रोटी सुद्धा खूप आवडली. मांसाहारी लोकांसाठी सुद्धा उत्तम सोय असेल पण वाराणसीत असताना ते खायची इच्छा झाली नाही. काशीत माणसे शांती शोधायला येतात, पाप क्षालन करण्यासाठी येतात, वेदना, अस्वस्थता, नैराश्य यापासून मुक्ती मिळवण्यासाठी येतात. This extravagant spread works as comfort food also , I feel.
बनारसी साड्यांची , कपड्यांची दुकाने गल्लोगल्ली आहेत. अगदी ३०० रुपयापासून तीन लाखाच्या साड्या एकाच दुकानात पाहायला मिळणे अगदी सहज शक्य आहे. थोडी माहिती करून गेले आणि मुख्य शहरापासून थोडे लांब जाता आले तर अत्यंत वाजवी किमतीत मिळू शकतात.
आमच्याकडे फार दिवस नव्हते. बनारस युनिव्हर्सिटी , सारनाथ आणि काही महत्वाची मंदिरे या दोन दिवसांत बघता आली.
ती ही स्थळे प्रेक्षणीय आहेत.
“The city that celebrates death” “ मृत्यूचा सोहळा करणारी नगरी”
काशीला लोक आपले अखेरचे दिवस घालवायला येतात. इथे मृत्यू यावा ही आत्यंतिक इच्छा मनात घेऊन इथे मुक्काम ठेवतात. काशीची एवढीच ओळख नाही. भारतीय संस्कृतीचे आगर आहे ही नगरी. इथल्या वास्तू, इथली जीवन शैली, इथली देवळे, इथली घरे, इथले अगत्य ..जणूकाही काळ गोठला आहे इथे.
मृत्यूचा सोहळा करणारी ही नगरी नाही तर मृत्यूचे अंतिमत्व ओळखून आयुष्याचा सोहळा करणारे हे शहर आहे.
समाप्त .

Read your blog on Varanasi
really enjoyed your description and experience
we had been to Varanasi & Prayagraj 2/3 months ago
all the memories got revived
you write well
Thank you so much Vikas ji.