Skip to content

पाश्चात्य सिनेमातील उत्कृष्ट निरोपाचे क्षण.

Goodbye 2023

घेतलेला निरोप हा नात्याचा अंत असतो, कधीतरी प्रेमाचाही अंत असतो. काही निरोप नवीन नात्याला जन्म देतात  तर काही आयुष्याला अनिश्चिततेच्या वळणावर नेवून ठेवतात. निरोपाची वेळ टाळणे, लांबवणे हे साहजिक आहे पण जेव्हा निरोप अटळ असतो तेव्हा तो घेणे ही तुम्ही त्या व्यक्तीला दिलेली सुंदर भेट असते.
पर्यायाच्या जाळ्यातून माणूस बाहेर पडतो. भ्रम संपतो आणि वास्तवाची जाणीव होते. जेव्हा एक रस्ता बंद केला जातो तेव्हाच दुसऱ्या रस्त्याचा शोध घेणे भाग होते. आयुष्याच्या प्रवासात माणसे त्यांच्या वेळेला येतात आणि वेळ झाली की निघून जातात. दिलेला प्रत्येक निरोप, एका नवीन सुरुवातीची दारे किलकिली करतो. आयुष्य चालू राहते.
अर्थात  जे नजरेने प्रेम करतात त्यांच्यासाठी निरोप घेणे शक्य असते पण ज्यांच्या हृदयातच प्रेम वस्तीला असते, त्यांच्यासाठी विरह ही केवळ कल्पना असते. 

द ब्रिफ एन्काउंटर
—————————-

सिनेमाचा सुरुवातीचा सीन.
पावसाने भिजलेले रस्ते, जुना पुराणा कॅफे, कळकट स्टेशन, अंधारी भुयारी मार्ग, लांब सावल्या आणि वातावरणात विरून जाणारा धूर हे सारेच एका अधुऱ्या, असफल प्रेमाचे साक्षीदार आहेत.
दोन माणसे एका अनपेक्षित क्षणी भेटतात. समान आवडीमुळे मैत्री होते, नंतर प्रेमाचा साक्षात्कार होतो. प्रेमाच्या शोधात बाहेर पडलेली माणसे नाही आहेत ही . ही संसारात रमलेली, आपल्या जबाबदारीची जबाबदारी असलेली दोन माणसे आहेत . जे घडते ते नकळत घडते आणि त्या क्षणाला हे ही लक्षात येतं की हे निभावणे कठीण आहे.

समाजाचे नियम आणि मनाची ओढ यात काहीही साम्य नसते. जे प्रेम पवित्र आहे असे त्या दोघांनाही वाटत असते ते समाजाच्या नजरेत एक अफेअर असते. नायिकेच्या (लॉराच्या) चारित्र्यावर कुणी बोट ठेवावे हे नायकाला (ऍलेक) सहन होत नाही आणि या परिस्थितीतून सन्मानाने आणि प्रतिष्ठेने बाहेर पडता येईल असा मार्गही त्याला सुचत नाही .
लॉराची परिस्थिती वेगळी नाही. तिच्या कुटुंबाचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे.
आपण सर्वाना फसवतो आहे, अशा लोकांना की ज्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे, हे अपराधीपण, अंगावर लेवून वावरणे कठीण.
दोघेही परत न भेटण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या स्वतःसाठी आणि त्यांच्या संसारासाठी.
जिथे ही प्रेमकहाणी सुरु झालेली असते तिथेच ती संपून जाते.
“This can’t last. This misery can’t last. I must remember that and try to control myself. Nothing lasts really. Neither happiness nor despair. Not even life lasts very long.” 
द ब्रिफ एन्काउंटर  सिनेमाची नायिका , लॉरा , स्वतःला समजावते. डोळ्यातले पाणी मात्र तिच्या निग्रहाला जुमानत नाही. मनाचा एक कोपरा कायमचा रिकामा राहणार आहे हे तिच्याच नाही तर प्रेक्षकांच्याही लक्षात येते.

प्रीटी वूमन
————

चित्रपटांची शैली किंवा वर्गीकरण कोणतेही असू दे, त्याच्या पात्रांना जोडणारा धागा हा प्रेमाचा असतो. पहिल्या नजरेतील प्रेम किंवा सर्व अडथळ्यांना ओलांडून जिंकलेले प्रेम कोणत्याही वयोगटातील प्रेक्षकाला, अगदी प्रेमावर विश्वास नसलेल्या माणसाला सुद्धा आकर्षित करते. ज्या गोष्टी प्रत्यक्ष घडणे शक्य नाही हे माहित असूनही असे सिनेमा पाहायला लोकं गर्दी करतात. पडद्यावर अशा परीकथा पाहताना, असेही घडू शकते ही कल्पना सुद्धा जगण्याच्या संघर्षात उसनी का होईना स्वप्ने पाहायची शक्ती देते.
रिचर्ड गेअर आणि ज्युलिया रॉबर्ट ची फिल्म “ प्रिटी वूमन” ही सत्यात न येणारी परीकथाच होती. तिचा शेवट ही मूळ पटकथेत सत्याच्या जवळ जाणारा होता.
श्रीमंत, प्रतिष्ठित, प्रसिद्ध आणि देखणा असूनही एडवर्डच्या आयुष्यात प्रेमाला जागा नाही. कोणतेच नाते त्याला सांभाळता येत नाही. अनपेक्षितरित्या त्याच्या आयुष्यात एका देखण्या, मिस्कील, आयुष्याच्या अनुभवांनी शहाणपण आलेल्या पण मनाचा चांगुलपणा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जपणाऱ्या विवियनचा प्रवेश होतो.  गरजेपोटी शरीरविक्रीचा व्यवसाय करणारी विवियन त्याच्या सोफिस्टिकेटेड आयुष्यात काहीशी विसंगत. सुरुवातीला तरी मिळालेल्या पैशाने, विवियन अप्राप्य गोष्टी विकत घेण्याचा सपाटा लावते. कामाचा भाग म्हणून मॅनर्स शिकते, उत्तम अभिरुचीचे कपडे घेते, पोलो मॅचेस आणि ऑपेरा चा आनंद घेते. तिचे बाह्य रूप बदलते तर तिच्या सहवासात तो अंतर्बाह्य बदलतो. एका कठोर, व्यवहारी उद्योगपती मधील माणूस जागा होतो. एकमेकांनां समजून घेताना, नकळत दोघेही बदलतात आणि प्रेमात पडतात.
प्रेम झाले हे स्वतःशी सुद्धा कबुल करणे अवघड असते. एकदा ती कबुली दिली की निभावण्याची जबाबदारी येते आणि तिथे भले भले गड़बड्तात. एका बेसावध क्षणी, विवियन ही एक वैश्या आहे असे आपल्या वकिलाला सांगून तो मोकळा होतो.
त्याला अपराधी वाटते पण खूप उशीर होतो.
कपडे फक्त बाह्य रूप बदलवत नाहीत. त्यांच्यामुळे मिळालेला आदर, प्रतिष्ठा,  विवियन ला बदलवून टाकते.
आता पैसे , कपडे आणि शारीरिक सहवास पुरेसा नसतो, तिला हवे असते ते प्रेम.
एडवर्ड या परीक्षेला तयार नसतो. 

विवियनचे हे उद्गार प्रेम मोठे का आदर ह्याचा विचार करायला भाग पाडतात. 
“Why did you make me get all dressed up?…If you were going to tell everyone that I’m a hooker, why didn’t you just let me wear my own clothes? I mean, in my own clothes, when someone like that guy Stuckey comes up to me, I can handle it! I’m prepared!”

आपको प्यार का दस्तूर निभाना होगा
दिल झुकाया है तो सर को भी झुकाना होगा

विवियनचे  निरोप घेणे हे अपरिहार्य असते.  प्रिटी वूमनचा शेवट कोणताही असो, हा शेवट मला आवडतो. ती तिच्या स्वप्नांकडे जाते तर त्याला आयुष्याचा खरा अर्थ समजतो.

कॅसाब्लँका
——————


अबोध  प्रेम, एकत्र घेतलेल्या आणा शपथा, .चंद्राच्या  साक्षीने एकमेकाना दिलेली वचने, नजरेत नजर घालून घालवलेली सायंकाळ, मधून मधून बोलणे, .मधूनच उगाच हसणे, .दृष्टीही न हलवता एकमेकांकडे पाहणे, सारे जग जणूकाही या एकांताला वाव करून देते किंवा असे म्हणता येईल , त्यांचे स्वतःचे एक जग त्यांच्यासाठी निर्माण होते.
प्रत्येक प्रेमाची पूर्तता विवाहात होतेच असे नाही ना ? कधीतरी पाहिलेले धूसर स्वप्न व्यावहारिक जगात कधीच विरून जाते.. दोघांच्यात केवळ एका  उष्ण श्वासाचे अंतर ठेवणारा असा  शिरशिरी आणणारा स्पर्श परस्परांस व्हावा इतक्या निकट येऊन गेल्यानंतर आयुष्याचे मार्ग वेगळे होतात .तिच्यावर तिच्या पतीचा अधिकार आणि त्याचे आयुष्य त्याच्या कामाशी किंवा पत्नीशी निगडीत. आपापल्या जगात रमलेल्या त्या दोघांची अचानक भेट झाली तर!
कासाब्लांका चित्रपटात जेव्हा रीक  आणि एल्सा  जेव्हा २ वर्षाच्या दुराव्यानंतर भेटतात तेव्हा रीक  च्या तोंडून उद्वेगाने शब्द निघतात ” Of all the gin joints, in all the towns, in all the world, she walks into mine”

नयन वळविता सहज कुठे तरी , एका एकी तूच पुढे …
आज अचानक गाठ पडे …
फ्लॅश बॅक
———–
दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये रीक आणि इल्सा ची भेट होते. ते प्रेमात पडतात. रीक हा तेव्हा नाझी विरोधी चळवळीत सक्रिय असतो. पोलिसांच्या तावडीतून निसटण्यासाठी रीक पॅरिस सोडतो पण शेवटच्या क्षणी  इल्सा यायचे नाकारते.
स्टेशनवर पावसात तिची वाट पाहत असलेला रीक जड पावलांनी ट्रेन मध्ये शिरतो खरा पण एका आनंदी , उत्साही तरुणाचे रूपांतर, जगापासून अलिप्त झालेल्या पुरुषात होते.
दोन वर्षांनी परत इल्साला पाहून “ उघड्या पुन्हा जहल्या, जखमा उरातल्या “ अशी रीक ची अवस्था होते. तो संताप तिच्यावर निघतो. तिच्या न येण्यामागे एक ठोस कारण आहे. तिचे लग्न झालेले आहे. आपला नवरा जिवंत नाही अशी तिची समजूत असते. रीक बरोबर जाण्याच्या आधी तिला समजते की, व्हिक्टर जिवंत आहे.
नवरा का प्रियकर ? 
हा निर्णय तिच्यासाठी सोपा नाही. आपल्या नवऱ्याबद्दल , त्याच्या कामाबद्दल तिला आदर आहे आणि अभिमान सुद्धा.
तेव्हा तो निर्णय घेऊन ती नवऱ्या बरोबर जाते खरी पण आज दोन वर्षांनी दबलेले प्रेम परत उफाळून येते.
आता परत एका निर्णयाच्या उंबरठ्यावर ती उभी आहे.
तटस्थ राहून निर्णय न घेणे हे अशक्य आहे. प्रेम तुम्हाला झुकवते. स्वतःच्या व्यावहारिक पणावर विश्वास असणारा रीक, अखेर आपला कॅफे विकून, स्वातंत्र्ययुद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने लढण्याचा निश्चय करतो . इतकच नाही तर प्राणप्रिय इल्सा ला सुद्धा आपल्यापासून दूर करतो.

प्रेम महत्वाचे का कर्तव्य? या प्रश्नाचे उत्तर रीक देण्यात यशस्वी होतो आणि पर्यायाने त्याचे पात्र एका वेगळ्याच उंचीवर पोचते.
जेव्हा इल्सासाठी  निर्णय घेणे कठीण असते तेव्हा तो अधिकार स्वतःच्या हातात घेऊन तो म्हणतो , “Where I’m going, you can’t follow. What I’ve got to do, you can’t be any part of, Ilsa. I’m no good at being noble, but it doesn’t take much to see that the problems of three little people don’t amount to a hill of beans in this crazy world. Someday you’ll understand  “
हे उद्गार निराशेतून आलेले नाहीत.
देश आणि त्या प्रति असलेले कर्तव्य , व्यक्तिगत सुखाला मागे टाकते ही जाणीव आहे त्या मागे.
चित्रपटाचा हा असा निरोपाचा सीन चित्रपटाला अमर करून जातो.
“ We will always have Paris”  रिक, ईल्साला सांगतो.
पॅरिस हे प्रेमिकांचे शहर आहे. काळ बदलतो, माणसे बदलतात. आठवणी मात्र काळाला पुरून उरतात. प्रेमाच्या त्या सुंदर आठवणी काही प्रेमिकांचा निरोप घेत नाहीत.

मीट जो ब्लॅक
———————-

मीट जो ब्लॅक ही फँटसी होती. मृत्यूला उत्सुकता असते ती जगणे म्हणजे काय ते समजून घेण्याची. रस्ता ओलांडताना अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाचे शरीर उसने घेऊन तो एका उद्योगपतीच्या घरात प्रवेश करतो. हा मरण्याच्या उंबरठ्यावर आहे हे मृत्यूला माहिती असल्याने तो एक सौदा करतो. “ मला जगण्याचे सिक्रेट सांगशील तर तू वाचशील”
जीवन जगण्याच्या या प्रवासात, जो, या उद्योगपतीच्या मुलीच्या ( सुजान) प्रेमात पडतो.
किती विरोधाभास असतो यात. मृत्यू लोकांचे आयुष्य संपवतो तर सुजान एक डॉक्टर असते. तिचे काम असते आयुष्य वाढवणे.
आयुष्याचे इस्पित देण्यात असते,  घेण्यात नाही हे जेव्हा उमजते, तेव्हा सुजानला आपल्या दुनियेत घेऊन जाण्याचा बेत बदलून, ज्या मुलाचे शरीर त्याने घेतले असते, त्याला जिवंत करून सुजानच्या प्रेमाला जिवंत ठेवतो.
सुजान या सर्वच प्रकाराबाबत अनभिज्ञ असते. तो जाणार हे जेव्हा समजते तेव्हा ती त्याच्याबरोबर जायलाही तयार होते.
पण प्रेम म्हणजे फक्त लालसा नाही , मोह ही नाही. अनेकवेळा त्यागात प्रेम जगते.

प्रेम माणसावर, त्याच्या चेहेऱ्यावर  असते का एखाद्या संकल्पनेच्या आपण  प्रेमात असतो!
ज्या मुलाचे शरीर मृत्यूने उसने घेतलेले असते, त्याला सुजान त्याच्या अपघाताच्या अगोदर भेटलेली असते. तिला तो आवडलाही असतो. जेव्हा मृत्यू तिला भेटतो, तेव्हा त्या मुलाच्या मृत्यूची बातमी तिच्यापर्यंत पोचली नसल्याने, ती मृत्यूलाच तो मुलगा समजते.
सुजान आपल्या प्रेमात नाही तर त्या मुलाच्या प्रेमात आहे ही जाणीव मृत्यूला अनपेक्षित असली; त्याला दुःख देणारी असली तरी, आपण आपला मोह बाजूला ठेवून, आपल्या प्रेमाला, तिचे प्रेम देऊ शकतो हे समजणे म्हणजेच तर जीवन जगणे.
जे शिकायला तो पृथ्वीवर आलेला असतो तो हेतू खऱ्या अर्थाने साध्य होतो .

घोस्ट
———-

सॅम आणि मॉली एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात पण या प्रेमाचे आयुष्य छोटे असते. सॅमचा खून होतो. चोरीच्या उद्धेशाने हल्ला चढवला असताना, अपघाताने झालेला मृत्यू अशी नोंद होते खरी, पण हा ठरवून केलेला खून असतो, तोही त्याच्याच मित्राने हे सॅमला समजते. सॅम चे शरीर नष्ट होते खरे पण त्याचा आत्मा काही मुक्त होत नाही. ज्याने आपला खून केला तो पैशासाठी आपल्या पत्नीलाही सोडणार नाही ह्याची जाणीव असल्याने, तो इथेच अडकून राहतो. एका तांत्रिकाच्या मदतीने आपल्या पत्नीला वाचवायचा प्रयत्न करतो.
सिनेमाची कथा चाकोरीतील आहे. जे घडणार आहे तेही आपल्याला लक्षात येते. तरीही घोस्ट चा शेवट फार सुंदर आहे. काम झाल्यावर आपल्याला राहता येणार नाही हे सॅम जाणून आहे. निरोप , मग तो कोणताही असो , तो अटळ असतो. प्रवास मात्र तिथे थांबत नाही. सॅम, या जीवनातून मुक्त होऊन आपल्या दिशेने जातो.
मॉलीसाठी तीचे जीवन सुरक्षित करतो.
शेवटी तिने आपला प्रवास चालू ठेवावा हीच तर त्याची इच्छा असते.
“The love inside, you take it with you”  घोस्ट सिनेमाचा हा शेवटचा संवाद आयुष्याचे सार आहे. आयुष्यात ज्या ज्या गोष्टी आपल्याला मौल्यवान वाटतात, महत्वाच्या वाटतात, ज्याच्यासाठी आपलं आपले आयुष्य देतो, यातले आपण काय नेतो ! घर , पैसे , गाडी , दागदागिने , अगदी प्रतिष्ठा सुद्धा इथेच तर ठेवून जातो.
नेतो काय , तर दिलेले प्रेम आणि त्या बदल्यात मिळालेले प्रेम. वरचा रस्ता असेलच तर ह्याच गोष्टी पूरक ठरतात.
असे म्हणतात, विरहात प्रेमाची परीक्षा होते..
जिवंत असताना मॉलीच्या “ I love you” ला त्याचे उत्तर असते” डिट्टो “ . जे शब्द जिवंतपणी तो बोलू शकत नाही , ते बोलायला तो मृत्यूला सुद्धा थांबवून येतो. 

Where is the spring and the summer
That once was yours and mine?
Where did it go? I just don’t know
But still my love for you will live forever
Hasta mañana ’til we meet again
Don’t know where, don’t know when
Darling, our love was much too strong to die

स्पॅनिश मध्ये “हास्ता मन्याना” म्हणजे “उद्यापर्यंत “ या शब्दात विरह आहे आणि उद्या भेटण्याची आशा सुद्धा. तिचे आणि त्याचे नाते कधीच संपले आहे. निघण्याची तयारी झाली आहे. आपापले सामान आवरले आहे. घरातून बाहेर पडण्याचा फक्त अवकाश आहे. पण मन ? त्याचे काय ! ते काही मानत नाही. प्रेमाला स्वाभिमान समजत नाही आणि शेवट तर मान्यच नाही.
.”ABBA” चे हे प्रसिद्ध गीत ऐकले की गॉन विद द विंड चा  स्कार्लेटने न मानलेला गुडबाय आठवतो.

गॉन विद द विंड
————————-


हॉलिवूडच्या इतिहासात ज्या प्रेम कथा गाजल्या, त्यात गॉन विथ द विंड चा बराच वरचा क्रमांक आहे.  प्रेमकथांच्या इतिहासात मात्र ही एकच प्रेमकथा आहे, त्यातल्या नायिकेला, प्रेमात  असूनही, कथेच्या अंतापर्यंत प्रेमाचे दर्शन झाल्याचे उमजत नाही. स्वतःच्याच प्रेमात असणारी, स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचाही उपयोग करून घेणारी, उत्साहाने सळसळणारी, चंचल, पण अत्यंत आकर्षक असणारी स्कार्लेट ओ हारा  ही सरळसाध्या  प्रेमकथेसाठी बनलेली नायिका नाहीच. तिला स्वतःलाही तसे बनणे जमणार नाही.
सर्वस्व गमावूनही “Tomorrow is another day” म्हणत भविष्यकाळाला धैर्याने सामोरी जाणारी ही नायिका अतिशय आगळी वेगळी आहे.
नायिकेसारखाच, ह्या कादंबरीचा नायक हा साहित्यातील रूढ नायक नाही . जुगारात भरपूर पैसे मिळवणारा,. मजेत राहणारा , घरातून बेदखल केलेला, युद्धातून स्वतःचा स्वार्थ साधून घेणारा , स्त्रियांना मोहात पडणारा ऱ्हेट बटलर ,स्कार्लेटच्या आयुष्यात घुसतोच आणि तिला बदलवतो.. दक्षिणेकडच्या राज्यातील सभ्यतेत  त्याचे वागणे बसत नाही .पण त्याची त्याला पर्वाही नाही. एकूणच येथील दाभिंकता , पोकळ बडेजाव, अहंकार याचा त्याला तिटकारा आहे.
ही दोन्ही पात्रे आत्मविश्वासाने परिपूर्ण आहेत.स्वतःला नक्की काय हवे आहे याची त्यांना जाणीव आहे.त्यासाठी काय वाटेल ते करण्याची तयारी आहे. प्रेमासाठी कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे.टॅरोचा ताबा तुलाच देणार आहे फक्त तू एशलेचा नाद सोड असे जेव्हा तिचे वडील  सांगतात, तेव्हा ती संधी प्रेमापुढे धुडकावून लावण्याची ताकद आणि एकनिष्ठा तिच्यात आहेच. “  I’m not a marrying man.”  असे म्हणणारा ऱ्हेट जेव्हा स्कार्लेटशी विवाह  करतो , तेव्हाही हीच निष्ठा त्याच्याही प्रेमात  दिसतेच.
दोन,  एकमेकांना खऱ्या अर्थाने शोभून असलेली माणसे, हे सत्य ओळखू  शकत नाहीत ही “ गॉन विथ द विंड” ची शोकांतिका आहे. कोणतेही नाते अहंकार, आणि संशय या पायावर उभे राहू शकत नाही.
स्वतःच्या मुलीच्या मृत्यूने खचलेला ऱ्हेट जेव्हा स्कार्लेटला सोडून जातो, ते रागाने नाही. या  नात्यात  राहायची त्याची इच्छा संपून गेली आहे. स्वतःचा पराभव स्विकारण्याची त्याची ताकद संपून गेली आहे. आयुष्यात तसेही काही राहिले नाही.
  Rhett, Rhett! Rhett, Rhett… Rhett, if you go, where shall I go? What shall I do?
प्रेमाचे दर्शन , कड्याच्या टोकावरच का होत असावे ? प्रेमाचे आयुष्यच क्षणभंगुर असते म्हणून? स्वतःच्या मी पणाला गौण करणे कठीण असते म्हणून ?
जे ऐकण्यासाठी एवढी वर्षे ऱ्हेट आसुसलेला असतो, ते उद्गार सुद्धा त्याला हलवू शकत नाही . 
“Frankly, my dear, I don’t give a damn” 

हा नकार अंतिम नाही. कुणापुढेही झुकणे, मग ते नियती पुढे ही का असेना, स्कार्लेटची ही प्रवृत्तीच नाही.
तसेही निरोप हा दोन क्षणांमधील विराम असतो. जाणाऱ्या वाटा नियतीने ठरवलेल्या असतात असे माणसे म्हणतात.
सामान्य माणसे त्या वाटांवरून मुकाट जातात.
काही असामान्य नियतीलाच आव्हान देतात.
“ After all, tomorrow is another day “ हे नियतीने लिहिलेल्या निरोपाला दिलेले आव्हान आहे. . 

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner



13 thoughts on “पाश्चात्य सिनेमातील उत्कृष्ट निरोपाचे क्षण.”

  1. Shraddha Kandalgaonkar

    काय हुशार आहेस तू…खिळवून ठेवते नेहमीच..सुदैवाने जे सगळे सिनेमे मी बघितले आहेत..त्या मुळे लगेच relate झाले.मी.

    1. Thank you Shraddha.
      हे सगळेच सिनेमा खरंच सुंदर आहेत .
      त्यात रोमन हॉलिडे आणि टायटॅनिक राहिलेच .

  2. हे सगळे सिनेमे (गाॅन विथ द विंड वगळता) बघितलेले असल्यामुळे ते ते प्रसंग लगेच आठवले. खूप सुंदर लिहीलयंत.

    ABBA चं ते गाणं आवडतं. पण हास्ता मन्यानाचा स्पॅनिशमधला अर्थ आज समजला.

    1. Thank you Amruta.
      हास्ता मन्याना हे आमच्यावेळी तर फार लोकप्रिय. मराठी माध्यमातून शिक्षण झाल्याने सहज गुणगुणता येईल अशी ABBA ची गाणी फार आवडीची होती ..अर्थात त्यावेळी काही इंटरनेट नसल्याने त्याचे अर्थ वगैरे माहित नव्हतेच 🙂

  3. कमाल कमाल कमाल लिहिलंय❤
    निरोपाच्याही प्रेमात पडावं असे सुरेख लेखन झालेय. मस्त💗💗💗

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *