Skip to content

काळ आणि तर्काच्या पलीकडील कथा -अबोहोमान – (अनंत)

विक्षिप्त, विलक्षण, विचित्र, बहुरंगी छटा असणारी पात्रे सिनेमाला आकर्षक बनवतात. लेखक, पटकथालेखक, निर्माते, दिग्दर्शक अशा पात्रांच्या शोधात असतात. अनेकवेळा  ही पात्रं  त्यांच्या आयुष्यात आलेली खरीखुरी माणसे असतात  आणि कधीतरी ती त्यांच्या सिनेमा विश्वाचाच  भाग असतात.
सिनेमाचे जग निर्दयी आहे. इथली स्पर्धा प्रचंड आहे. प्रत्येक आठवड्याच्या उत्पन्नावरून इथे माणसांची भाग्ये उजळतात तर काही निराशेच्या गर्तेत सापडून संपून जातात. पैसे, प्रसिद्धी आणि त्यामुळे मिळणारी प्रतिष्ठा माणसाला इथे ओढून आणते आणि बंदिस्त करून ठेवते.
हे जग सर्जनशील लोकांचे जग आहे. हुशारीला व्यावहारिकतेची जोड असेल तर यश तुमच्याकडे चालून येते. अशी यशस्वी माणसे आपोआप  निर्मितीचा विषय होतात. त्यांचे पडद्यावरील कर्तृत्व तर उल्लेखनीय असतेच , त्यांचे खाजगी आयुष्य सुद्धा फार रंगीत असते. त्याला चितारण्याचा मोह भल्या भल्यांना टाळता येत नाही. हुशार माणसांच्या कारकिर्दीचा वेध घेताना त्यांच्या अंतरंगाचा वेध घ्यावासा  वाटणे स्वाभाविक आहे.
हे वाटणारा माणूस मात्र ऋतुपर्ण घोष असेल तर तो सिनेमा गॉसिपच्या पलीकडे जातो.  “अबोहोमन” हा सिनेमा सत्यजित रे यांच्या आयुष्यावर आधारित आहे असे मानलं जाते. स्वतः दिग्दर्शकाने याला कधीही उघड दुजोरा दिला नसला तरीही ऋतुपर्ण घोष यांच्या सिनेमावर रे यांचा प्रभाव आहेच.   रे यांच्या देवी सिनेमामधील सरंजामशाहीचे दर्शन घोषच्या अंतरमहल मध्ये दिसते.  शाखा प्रोशाखा चा प्रभाव उत्सब वर आहे. सत्यजित रे यांच्या आयुष्यातील “ माधबी मुखर्जी”  या महत्वाच्या  अध्यायावर “ अबोहोमान” आधारित आहे.
सिनेमा नक्की कसा बनतो ? ह्या प्रश्नाने अबोहोमान ची सुरवात होते.

जे घडले  ते दाखवले जाते? का जे घडते ते दिग्दर्शकाच्या नजरेतून प्रेक्षकांना सांगितले जाते? घटना घडतात आणि दिग्दर्शक, त्याला हव्या  त्या क्रमाने प्रेक्षकांसमोर मांडतो. एक विश्वसनीय असे जग उभे करतो. कितीही सत्याचा आधार घेऊन बनवण्याचा प्रयत्न केला तरी मानवी मन एवढे गुंतागुंतीचे असते की ते संपूर्णतः आहे तसे दाखवता येत नाही. खरे सांगायचे तर त्या माणसाला सुद्धा स्वतःला जाणणे सहज शक्य होत नाही.

 एक निवृत्त दिग्दर्शक आणि उदयोन्मुख सीने कथालेखक या मधील हा संवाद. त्यांच्यात पिता पुत्राचे नातेही आहे. दिग्दर्शक म्हणून मुलाच्या नजरेत आदर आहे मात्र मुलगा म्हणून पाहायला गेलं तर एक अवघडलेपण सुद्धा आहे. 

अबोहोमान म्हणजे जे शाश्वत राहील ते. अनंत. 

सिनेमाचा नायक आहे अनिकेत ( दीपंकर डे) , एक आर्ट सिनेमाचा  नामवंत दिग्दर्शक. त्याची पत्नी , मुलगा आणि त्याच्या सिनेमात काम करणारी त्याची नायिका ही सिनेमाची मुख्य पात्रे आहेत. त्यांचे या सर्वांशी असलेलं नाते हा कथेचा गाभा. भूतकाळ आणि वर्तमान यांचा विणलेला गोफ ऋतुपर्ण घोष यांच्या सिनेमात असतो , तो इथेही आहे.

वर्तमान –सिनेमाच्या सुरुवातीला अनिकेत आणि त्याच्या मुलाचा संवाद आहे. त्या नंतर काही काळातच त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्याच्या घरी , घराबाहेर चाहत्यांची गर्दी झाली आहे. घरात त्याची पत्नी, दीप्ती (ममता शंकर), त्याचा मुलगा अप्रतिम( जिषु सेनगुप्ता) आणि त्याची पत्नी (रिया सेन) आहेत , नातेवाईकांची गर्दी आहे.
अशावेळी त्याची एकेकाळची नायिका , श्रीमती सरकार ( अनन्या चटर्जी ) त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी येते.
अनिकेतच्या “आमार कथा” या सिनेमा हा तिचा पहिला सिनेमा. एका पैलू न पाडलेल्या हिऱ्याला पैलू पाडण्याचे श्रेय अनिकेतलाच आहे याची तिला जाणीव आहे. सिनेमाचे चित्रीकरण चालू असताना त्यांचे प्रेमसंबंध जुळल्याची चर्चा सिनेविश्वात खळबळ माजवून गेली होती. आता तिला पाहिल्यावर , या साऱ्या गोष्टी , अफवा लोकांना आठवणार हे स्वाभाविक आहे.
त्यांच्या चेहेऱ्यावर ते अवघडलेपण दिसल्याने, श्रीमती अजूनच अस्वस्थ आहे.  

भूतकाळ – सिनेमात आमार कथा च्या निर्मितीची दृश्ये आहेत. १९ व्य शतकात होऊन गेलेल्या बिनोदिनी हा नटीच्या आत्म- चरित्रावर हा सिनेमा आधारित आहे. बिनोदिनी आणि तिचे गुरु गिरीश चंद्र घोष यांच्या नात्याचा , त्याच्यातील गुंतागुंतीचा वेध घेणारा हा सिनेमा.  एका नटीचे आयुष्य , आणि तिच्यातील स्त्री चे आयुष्य समांतर असते. कधीतरी ते रस्ते एकत्र येतात. एकमेकांच्यात मिसळतात पण समाज आणि समाजात असलेली तिची प्रतिमा , त्या रस्त्यांना एकत्र राहू देत नाही. कोणता तरी एक रस्ता धरून चालणे हे प्राक्तन अनेकांच्या वाट्याला येते.
शिखा उर्फ श्रीमतीला सुद्धा हे टाळणे शक्य होत नाही. 
सुरुवातीला अनिकेतला ही मुलगी आपल्या भूमिकेला न्याय देईल याची खात्री नसते.  “बिनोदिनी”ला पडद्यावर आणणे हे त्याचे स्वप्न असते. आपल्या पत्नीनेच ही भूमिका करावी अशीही त्याची इच्छा असते. दीप्ती ही नावाजलेली अभिनेत्री असूनही लग्नानंतर आपला संसार आणि मुलगा यात रमते. हे स्वप्न मागे पडते.
अनेक वर्षांनी, जेव्हा या सिनेमाचा परत विचार सुरु होतो , तेव्हा नवीन नायिकेचा शोध सुरु होतो. त्याची पत्नी दीप्तीला मात्र शिखामधील सुप्त अभिनयाचे गुण, तिची उत्स्फूर्तता , तिचे भूमिकेत समरसून जाणे , काहीतरी करून दाखवण्याची जिद्द जाणवते. दीप्ती, शिखाला तयार करायची जबाबदारी घेते.  तिचे श्रीमती असे नामकरण करते. भूमिकेला आवश्यक असलेले नृत्य शिकवते. हा निर्णय तिच्या संसारावर उठेल याची मात्र तिला कल्पना नसते. आपला मुलाच्या वयाच्या नायिकेत, अनिकेत गुंतत जातो.  शूटिंग संपल्यावर , त्याचा मुक्काम , शिखाच्या घरात असतो हे लपून राहत नाही. वावड्या उठतात. दीप्ती दुखावते.  अनिकेत काही प्रेमाची कबुली देत नाही तरीही दिप्तीला खात्री असते.
आपले वाढलेले वय , सिनेदृष्टीपासून लांब असणे , संसारात गुंतून पडणे ह्यामुळे तो आकर्षित झाला हे वाटून , तिला श्रीमतीचा हेवा वाटू लागतो. एका घरात राहूनही, अनिकेतबरोबरचे संबंध तुटतात. त्यांच्यातील संवाद संपतो.

अप्रतिम,  आपल्या वडिलांविषयी एका फिल्म मॅगझीन मध्ये लेख लिहितो, ज्याच्यात वडिलांवर टीका केलेली असते.
त्या मॅगझीनची संपादिका , या बाबतीत अनिकेतला सांगते आणि लेख छापावा का नाही याही बाबत विचारणा करते, तेव्हा अनिकेत मात्र मुलाच्या बाजूने उभा राहतो. तो सांगतो, “A son has written what he thinks of his father. why should we censor it”.
अनिकेतला आपल्या मुलाच्या मनातील वादळाची कल्पना असते. त्याच्या मनात आपल्याविषयी राग आहे हे माहित असूनही, तो आपली बाजू मांडत नाही.  सिनेमात याची कारणे नाहीत.
मला ऋतुपर्ण चे सिनेमा यासाठी आवडतात, की जे घडते, त्याचे स्पष्टीकरण देण्याचा तो प्रयत्न करत नाही. माणसाचे मन फार गुंतागुंतीचे असते. महत्वाच्या निर्णयात, माणूस, मनात नसूनही , स्वतःचे सुख पाहतो. 
आपल्या मुलाच्या प्रगतीत किंवा निर्णयात अनिकेत आड येत नाही. आपल्या मुलाने आपल्याही पुढे जावे ही त्याचीही इच्छा असते. मार्ग कुठलाही असो. कदाचित हातून जे घडले आहे त्याचीही खंत असावी , अर्थात सिनेमात , निदान संवादात ती दिसत नाही.
या सर्वात, कुटुंबाच्या बाहेर असलेली शिखा मात्र बाहेर फेकली जाते. आमार कथा मधली बिनोदिनी होताना, तिचेही आयुष्य त्याच वळणावर येऊन थांबते. अनिकेतचा मोह असतो, आकर्षण असते, तिच्या प्रेमासाठी ती पुरेसे नसते. काम झाल्यावर, अनिकेत , तिच्या आयुष्यातून बाहेर जातो.
यातले काही दृश्ये लक्षात राहण्यासारखी.
वडीलांचे आपल्या मुलाच्या पाठीशी उभी राहणे. अप्रतिमचे उद्धट वागणे  सुद्धा तो नजरेआड करतो. एकतर मुलाचे मन समजून घेण्याची त्याची ताकद आहे आणि कदाचित एक पती म्हणून तो कमी पडला याची जाणीव.
शिखाशी असलेले नाते , हे फक्त शारीरिक आकर्षण नाही ..कदाचित ह्यात शरीराचा संबंध आलेला आहे असेही नाही , अशी दृश्ये सिनेमात नाहीत .. सूचकता सुद्धा नाही .  त्यामुळे त्याचा मुलगा वडिलांच्या आयुष्यावर सिनेमा बनवायचा ठरवतो तेव्हा हा सिनेमा बघून प्रेक्षकांना हे फक्त स्कँडल नाही याची जाणीव होईल ह्याची त्याला खात्री असते.
हे एका दिग्दर्शकाचे आपल्या नायिकेविषयी असलेले आकर्षण असेल , निर्मिती साठी ते त्याच्या नजरेतून आवश्यक असेल , त्या काळापुरती ती त्याची बिनोदिनी असेल .. काहीही असेल,  आपली बाजू जेव्हा तो दीप्ती ला सांगण्याचा प्रयत्न करतो , तेव्हा तो तिला एक प्रश्न विचारतो .
“ एका माणसाच्या आयुष्यात दोन स्त्रियांना स्थान असू शकत नाही ?”

जर हा सिनेमा सत्यजित रे सारख्या अत्यंत संवेदनशील आणि बुद्धिमान माणसाच्या आयुष्यावर  असेल तर त्यातील सत्यता , न्यायाला धरून नसली तरी असमर्थनीय वाटत नाही , दुसरीकडे दीप्तीची बाजू सुद्धा योग्यच असते.
सर्वांचीच कामे अतिशय सुरेख आहेत पण दीप्तीच्या भूमिकेतील ममता शंकर यांनी बाजी मारली आहे. पतीकडून दुखावली गेलेली तरीही आपली कर्तव्ये निभावणारी पत्नी , आई , सून , शीखाबद्दल सुरुवातीला प्रेम , नंतर असूया , मग संताप वाटणारी  स्त्री , स्वतःच्या अधुऱ्या राहिलेल्या कारकिर्दीबद्दल वाटणारी खंत , एवढे करूनही हाताला काय लागले तर प्रतारणा याचे दुःख,  अनिकेत बद्दल वाटलेली घृणा , घरातील वातावरण बिघडू नये, घरातील इतर लोकांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून दाबलेला संताप, घर सोडून जाण्याची आत्यंतिक इच्छा आणि स्वतःचा संसार मोडलाय हे मान्यही न करण्याचा तिचा अहंकार ,हे सारे तिने आपल्या अभिनयातून जिवंत केले आहे.
एका उत्स्फूर्त पण अभिनयाचे शिक्षण न मिळालेली , काहीशी  खेडवळ नायिका , पुढे अनिकेत आणि दीप्तीच्या मार्गदर्शनाखाली बनलेली एक समर्थ अभिनेत्री , पुरुषांचा एकाच प्रकारचा अनुभव आल्याने काहीशी बनेल बनलेली कलावंतीण  , ते अनिकेतच्या प्रेमात पडलेली प्रणयिनी आणि शेवटी विश्वासघाताने उन्मळून पडलेली विरहिणी या सर्व छटा अनन्या चॅटर्जीने आपल्या अभिनयातून दाखवल्या आहेत. या सिनेमासाठी तिला नॅशनल ऍवार्ड मिळाले आहे. 

अनेकवेळा माणूस आपला भावनांचा गुलाम असतो ते इथे दिसते.  माणसाचे चारित्र्य, त्याच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींनी , त्यांनी दिलेल्या अनुभवातून घडत जाते. एक सिनेमात, एका पुस्तकात, खरेतर एका जन्मात माणूस सर्वांना न्याय देऊ शकत नाही. सिनेमाची ही मुख्य थीम आहे.
कितीही तिरस्कार करायचा ठरवलं तरी दिप्तीला ते साध्य होत नाही. अनिकेत आणि तिचे नातं केवळ पतिपत्नी चे नाही. ती त्याची नायिका आहे. तिच्या अभिनयावर, हुशारीवर भाळूनच त्याने तिला मागणी घातली होती. ती त्याची प्रेरणा होती. शिखा आणि तिच्यात असलेले साम्य , जे दिप्तीला सुद्धा जाणवले आहे , कदाचित तेही कारण असू शकेल ह्याची दिप्तीला जाणीव होते.  अनिकेत मृत्युशय्येवर असताना तिला विचारतो , माझ्याबरोबर काम करताना तुला कसे वाटले ?” कदाचित तेव्हा एका कलाकाराच्या नजरेतून त्याच्याकडे पाहताना पत्नीचे दुःख मागे पडते . ती उत्तर देते , “ अप्रतिम “
ती हाच प्रश्न त्याला विचारते आणि त्याचे उत्तर असते “ अप्रतिम “

सिनेमा पाहताना आपली अवस्था सुद्धा वेगळी नसते. 

14 thoughts on “काळ आणि तर्काच्या पलीकडील कथा -अबोहोमान – (अनंत)”

  1. अप्रतिम.

    ❤️❤️
    प्रिया, तुझ्या मुळे प्रादेशिक सिनेमा बघितला जातो.
    हा सुद्धा बघणार.

  2. अप्रतिम लेखन 👍👌
    संपूर्ण सिनेमा उलगडतो तुमच्यामुळे 🙏🏻
    मानवी मनाच्या भावनांची गुंतागुंत किती सुंदर पद्धतीने मांडली आहे, ग्रेट🌹

      1. कला आणि कलाकृती उलगडण्याची तुमची हातोटी काही औरच आहे!!
        असली नाती तकलादू वाटतात वा राहतात.. हा सिनेमा संथ गतीने आहे म्हणून तो अधिक भिडतो. रंजकपणाच्या वेगात कदाचित तितकी पकड घेऊ शकला नसता. वाचून इतका भिडलाय, बघणं मस्टच्चै ❤
        प्रियादी तुम्ही अशा विविध सिनेमांवर लिहिल्यामुळे खूप सिनेमे बघून झाले 👌👌❤

        1. अरे पाहिलास का Kamini, ..मस्त
          संथ आहेच कारण काही भाष्य नाही . जे घडते ते दाखवले आहे
          …म्हणून खरा वाटतो तो . नात्यांचा प्रवास

  3. उदय शेवडे

    अप्रतिम लिहिलंय. नातेसंबंधाची उकल फार छान केली आहे.

  4. फारच सुंदर…
    छानच लिहलय..
    अंतर्मुख करणारं लेखन..
    धन्यवाद..

  5. प्रदीप रस्से

    चित्रपट बघावा लागणार,
    त्याशिवाय काय लिहिता येणार?
    बघून तरी काय लिहिणार,जे यात इतके सुसंगत आले आहे?

    असेच होतेय माझे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *