Skip to content

भोपाळ –तलावांचे शहर 

  • by

भाग ३ 

भीमबेटका

मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या प्रथम कालखंडास प्रागैतिहास अशी संज्ञा दिली जाते. याचे नमुने पाषाण चित्रे, गुंफांच्या भिंती, प्राण्यांच्या मातीच्या मूर्ती, त्यांच्या हाडांवर किंवा शिंगावर केलेली कलाकुसर यात सापडतात. भोपाळपासून ४३ किलोमीटर असलेल्या भीमबेटका गुंफा  या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. घनदाट जंगलात, विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिण भागात, तब्बल १० किमी लांब आणि ३ किमी रुंद अशा या गुंफांच्या समूहांमध्ये तब्बल ४०० चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत.  या गुंफा, प्राचीन काळाच्या इतिहासातील एक महत्वाची कडी आहे. यांचा काळ वेगवेगळा आहे. काही तर जवळ जवळ तीस हजार वर्षे जुनी आहेत. त्या काळातील माणसाचा दिनक्रम, शेतीच्या, शिकारीच्या पद्धती,त्याचे बदलत गेलेले राहणीमान, त्याच्या श्रद्धा, भावना, मानसिकता, जगण्याच्या कल्पना , त्याची मूल्ये समजण्याचा म्हणजेच एका अर्थाने मानवाची उत्क्रांती समजण्याचा हा महत्वाचा ऐवज आहे. इथल्या चारशे एक गुहांपैकी केवळ बारा गुहा पर्यटकांना खुल्या आहेत. भर दुपारी आम्ही इथे प्रवेश केला.

बाहेरचे रखरखित ऊन या प्रदेशात आल्यावर गायब झाले. सारा परिसर शांत. त्या शांततेची मोहिनी इथे येणाऱ्यांवर पडत असावी कारण जे काही नजरेला पडते ते एवढे अद्भुत आहे की साठवून घ्यायला डोळे अपुरे पडतात. हे जगच वेगळे. रस्त्याच्या कडेला गुढघाभर गवत, त्याला आपल्या सावलीत आश्रय देणारी सरळसोट उंच झाडे आणि मोठ्या मोठ्या दगडांच्या शिळा.  असे वाटते की आकाशात कुणीतरी खेळता खेळता पृथ्वीवर चुकून पडल्या असाव्यात आणि जिथे पडल्या तिथे, त्याच पोझिशन मध्ये  त्यांना स्टॅच्यू करून ठेवले असावे. लगोरी खेळताना एकावर एक आपण दगड रचतो तसे रचलेले दगड. त्यांना काहीही आधार नाही. वर्षानुवर्षे ऊन वारा पाऊस सोसूनही ते तसूभर सुद्धा हलले नाही .. निसर्गाचा चमत्कार आहे हा.
बाह्य जग या गुंफेच्या प्रवेशद्वाराकडे थांबते. २०२३ मागे टाकून आम्ही ३०००० वर्ष आधीच्या काळात प्रवेश केला होता.
आता दिसत असलेले दगड हे हजारो वर्षांपूर्वी केवळ दगड नव्हते. आम्ही आदी मानवाच्या घरात प्रवेश केला होता. जंगली प्राणी, ऊन, वारा , पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी माणसांनी इथे आश्रय घेतला होता. किती तरी हजार वर्ष त्यांचा इथे निवास होता आणि त्याच्या खुणा चित्रांच्या रूपाने या गुहेत आहेत. त्याच्या जीवनाचा दस्तावेज आहे हा. 

त्यांच्या तत्कालीन जीवनशैलीचे इथे दर्शन घडते.
अगदी सुरुवातीची चित्रं त्यांच्या जेवण बनवण्याची, शिकारीची , प्राण्यांबरोबर केलेल्या लढाईची , मग त्यात शस्त्रे आली. हळूहळू माणूस शेती करू लागला , मग एकत्र राहू लागला , सहजीवन सुरु झाले आणि मग मनोरंजनासाठी नृत्य , सहली, नंतर मूल्ये , त्यातून निर्माण झालेलय देव धर्माविषयीच्या कल्पना ,  हे सर्व अशा तर्हेने रेखाटले आहे की प्रगत जीवनाकडे होणार माणसाचा प्रवास इथे बघता येतो

इथे जास्त प्राण्यांची चित्रे आहेत. माकडे, कोल्हे, मगरी , त्रास , हरणे , रानगवा हत्ती या सर्वांचे अगदी बारकाईने केलेले रेखाटन दिसते. छोट्या प्राण्यांमध्ये ससे, साळींदर, जळू, खारी, कासव, मधमाशी इत्यादी दिसतात. गरुड, गिधाडे, करकोचे, पाणकोंबड्या इत्यादी पक्ष्यांची चित्रणेदेखील आढळतात. ही चित्रभाषा , सुरुवातीच्या काळात त्यांची बोलीभाषा असावी. इथले दगड हे रंग शोषून घेणारे असल्याने एवढ्या वर्षात ही चित्रे टिकून राहिली आहेत. ही केवळ चित्रे नाहीत तर काळाच्या पटलावर उमटवलेला ठसा आहे.
भीम बेटका  म्हणजे भीमाची बैठक. पांडव वनवासात असताना येथील उंच शिळेवर बसून पहारा द्यायचा अशी श्रद्धा आहे.  अभिमानाची गोष्ट आहे की या गुहांचा शोध डॉ व्ही.एस.वाकणकर या मराठी इतिहासकाराने १९५७ मध्ये लावला.
रेल्वे प्रवासात दूरवर दिसणाऱ्या डोंगरकडा पाहून त्यांना असे वाटले की या भागात काहीतरी इतिहासकालीन आहे. ध्यास घेऊन हा परिसर त्यांनी पिंजून काढला आणि हे गुप्तधन जगाच्या समोर आले.  या परिसरात एक गूढ शांतता आहे. ही चित्रे , ह्या गुहा , इथली उंच झाडे, मोठ्या मोठ्या स्थिर शिळा तुमच्याशी हितगुज करतात. त्यांना शब्द लागत नाही.  आपल्याला सुचत नाहीत. 

भोजपूर मंदिर
—————


भोपाळकडून इथे येताना सुरुवातीला लागते ते भोजपुर मंदिर. हे शिवाचे मंदिर आहे. असे म्हणतात, राजा भोज यांनी अकराव्या शतकात याची निर्मिती केली. एका दिवसात हे मंदिर पूर्ण व्हावे अशी योजना होती पण तसे झाले नाही. छत पूर्ण होण्याआधीच सूर्योदय झाला आणि मंदिराचे काम थांबले.

इतिहासकार असे समजतात की कदाचित युद्ध सुरु झाले असेल, काही नैसर्गिक आपत्ती आली असेल किंवा राजघराण्यातील मोठ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल म्हणून याचे काम थांबवले गेले असावे. अपूर्ण असूनही हे एवढे विशाल आहे की याला पूर्वेचे सोमनाथ असेही म्हंटले जाते.
काहीजण असे समजतात की पांडवांनी आपल्या आईसाठी हे मंदिर एका रात्रीत बनवले जेणेकरून तिला भगवान शिवाची आराधना करता येईल. आपल्या देशातील हे सर्वात मोठे शिवलिंग आहे. याची उंची साडेसात फूट आहे तर परीघ १७. फूट आणि हे साडे एकवीस फूट उंच प्लॅटफॉर्म वर आहे. शिवलिंगाकडे पोचायला लोखंडाचा जिना आहे. लिंगाच्या पायथ्याशी जाऊन त्याची पूजा करायला परवानगी आहे.

हे भव्य शिवलिंग चुनखडीच्या दगडापासून बनवलेले आहे. देवळाचा भार चार भव्य खांबावर आहे. बाह्य भिंतीवर अत्यंत सुंदर मूर्तिकाम आहे. सुरुवातीला हे देऊळ एका मोठ्या जलाशयाच्या किनाऱ्यावर होते. राजा भोज च्या काळात तीन दगडी धरणांमधून या जलाशयाचे पाणी वाहत होते. पंधरा शतकापर्यंत हे बांध शाबूत होते. पुढे होशांग शहा याने आक्रमण केले आणि दोन धरणे फोडली.
या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे अपंगांना जाता यावे म्हणून मंदिराच्या बाजूने नवीन रस्ता तयार केला आहे. व्हीलचेअर वरून मंदिरापर्यंत आता सहज जाता येते .

सांची स्तूप

प्राचीन जगातील, प्रार्थना  स्थळे उंचावर बांधली आहेत. स्वर्गस्थ ईश्वराकडे जाण्याचा तो अभिनव मार्ग होता. सांची त्याला अपवाद नाही. रायसेन जिल्ह्यातील विध्याचंल टेकडीचे ९१ मी अंतर चढून जेव्हा तुम्ही माथ्यावरून खालच्या विस्तीर्ण भूभागाकडे पाहता, तेव्हा असे वाटतं की  विश्वाच्या कडेला उभे राहून तुम्ही अनंताचे दर्शन घेत आहात. सांचीच्या या वास्तूत ईश्वराची शांतता , पवित्रता आणि गूढता भरून राहिली आहे.

स्तूपाचा उल्लेख मृतावर रचलेला  मातीचा ढिगारा या स्वरूपात ऋग्वेदात आढळतो तरीही स्तूप ही मुख्यत्वेकरून बौद्ध धर्मीयांची वास्तुरचना आहे. प्रत्यक्ष बुद्धांनी आपल्या देहाचे अवशेष जपण्यासाठी स्तूप बांधावा अशी इच्छा प्रदर्शित केली असे महापरिनिब्बान सुत्त सांगते. तथागताच्या मृत्यूनंतर बुद्धिजम ही केवळ माणसाच्या ज्ञानप्राप्तीची आणि मोक्षाची चळवळ राहिली नाही तर त्याला धर्माचे रूप मिळाले. त्यांच्या अस्थी जपून ठेवलेल्या स्तूपांची मंदिरे झाली. काही काळानंतर  स्तूप हे फक्त बुद्धांच्या अवशेषांपुरते मर्यादित राहिले नाहीत तर तथागतांच्या शिष्यांच्या अस्थींना सुद्धा स्तूपाचा मान मिळाला. सांची येथील स्तूप नं ३ मध्ये गौतम बुद्धांचे समकालीन शिष्य सारीपुत्र आणि मौद्गल्यायन यांच्या अस्थी आहेत. 

कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्ध धर्माचा रस्ता पकडला. त्याच्याच काळात सांची येथे स्तूपाची बांधणी झाली. नंतर ही हे काम चालू राहिले. सांची आणि तेथील परिसर हा पंधराशे वर्षाच्या कामाचे फलित आहे. अकराव्या शतकानंतर मात्र ही जागा दुर्लक्षित राहिली. हा परिसर ओसाड झाला. अठराव्या शतकात ब्रिटिश ऑफिसर हेन्री टेलरला या परिसरात काही शिलालेख मिळाले. ती भाषा अपरिचित. त्याचा अभ्यास करताना ह्या जागेचा शोध लागला आणि ही जागा जगाच्या पटलावर आली.
स्तूप नं २ आणि ३ चे उत्खनन सुरु झाले. आत मध्ये एक लाकडी संदूक मिळाली. त्यात अस्थी होत्या. संदुकांवर सारीपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे नाव होते. या अस्थी इंग्लंडला पाठवल्या. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी या अस्थी देशात परत आणल्या. या अस्थी ठेवण्यासाठी एक नवीन प्रार्थना मंदिर( विहार) बांधण्यात आले.  नोव्हेंबर मध्ये  तळघरात असलेल्या या अस्थी दर्शना साठी बाहेर काढल्या जातात. स्तूप नं २ पठारावर नसून , आतल्या रस्त्यावर आहे. स्तूप २ आणि ३ ची रचना सारखी आहे फक्त इथे तोरण द्वार बांधलेले नाही. या स्तूपात दहा बुद्ध शिक्षकांच्या अस्थी आहेत.
दोनशे रुपयाच्या नोटवर ज्या स्तूपाला स्थान मिळाले आहे तो आहे स्तूप नं १. ज्यात  तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी आहेत.
हा इथूनचा भव्य आणि महत्वाचा स्तूप . या शिवाय लहान मोठे असे ९३ स्तूप आहेत.
महा स्तुपास चार दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. त्यास तोरणे म्हणतात. यावर अत्यंत सुंदर कलाकुसर आहे.  दक्षिणेकडील तोरण सर्वांत प्राचीन असून ते सातवाहन राजा सातकर्णी याच्या पदरी असणाऱ्या आनंदनामक कलाकाराने दान दिल्याचा कोरीव लेखात उल्लेख आहे.
येथील मूर्तिकामात बुद्घाची मूर्ती कुठेच आढळत नाही मात्र त्यांचे अस्तित्व धर्मचक्र, रिकामे सिंहासन, पादुका इ. सांकेतिक प्रतीकांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न कलाकाराने केला आहे. याशिवाय बोधिवृक्षाखाली अशोक, त्याची राणी, राजपुत्र इ. मंडळी तथागताची  पूजा करीत असतानाचे दृष्य आहे. त्याच ठिकाणी बुद्घाचे महानिर्वाण, कश्यप ऋषींची कथा इ. शिल्पाकृती आढळतात. इथे गजलक्ष्मी ची मूर्ती आहे. दक्षिण तोरणावर कमलवनातील लक्ष्मी, अशोकाची रामग्रामाची यात्रा, छदंत जातका तील कथाविषय इ. दृष्ये खोदली आहेत. शहरी जीवन तेथील इमारती , स्त्रियांचे दैनंदिन कार्यक्रम , लोकांचे व्यवसाय, जातक कथा या सर्वाना येथील कोरीव कामात बंदिस्त केले आहे. प्राणी , पक्षी , वनस्पती आणि मानव या साऱ्यांच्या मुर्त्या येथे आहेत. त्यांना सामान महत्व आहे. शेवटी मुंगी ते हत्ती असा अनेक जन्मांचा प्रवास बोधिकथेत आहेच. विश्वबंधुत्वाची जाणीव करून देणारी ही कलाकृती म्हणून वंदनीय आहे.
येथील भग्न अवशेषांच्या संभारात एक अशोकस्तंभ असून त्यावरील ब्राह्मी लिपीत कोरलेल्या लेखात ‘लोकांनी आपापसांत भेदभाव वाढवू नये’ अशी आज्ञा आहे. इथे काही मंदिरे आहेत ज्यांचे छप्पर सपाट आहे . यात कोणतीही मूर्ती नाही . गुप्त काळात तिचे बांधकाम झाले आहे. मंदिराच्या बांधकामाचा हा सुरुवातीचा काळ असावा. शिवाय ग्रीक प्रार्थना मंदिरा सदृश्य पार्थेनॉन सारखी वास्तू ही येथे आहे. समूहाने प्रार्थना करण्याचे हे ठिकाण होते.
स्तूपाच्या भिंतीवर देणगीदारांची नावे कोरलेली आहेत. ते काही मोठे राजे सरदार नव्हते. सर्वसामान्य नागरिकांच्या देणगीतून हे उभे राहिलेले प्रार्थना स्थळ आहे. म्हणून इथे भपका नाही. मी बांधले या अहंकारापासून दूर  अशी ही वास्तू. .
शहराच्या धावपळीपासून बांधलेले हे स्तूप केवळ भिक्षुंसाठी नसावेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी , मनाची हरवलेली शांती शोधण्यासाठी, इथे सामान्य लोक सुद्धा येत असतील. ही त्यांच्या विसाव्याची ठिकाणे असतील.

भीम बेटका काय किंवा सांची, इथे सहल हा हेतू घेऊन लोक आले तरी अपार शांतता घेऊन परत जातात.
इथे आणि भीम बेटक येथे गाईड घेणे आवश्यक. नाहीतर माणूस हरवून जातो. अगदी पुस्तके वाचून , माहिती घेऊन गेलात तरी त्याचा अर्थ समजणे सोपे नाही.

संध्याकाळी संचाचे दर्शन इथे लाईट आणि साऊंड च्या माध्यमातून घडवले जाते. तर खालील उद्यानात तथागतांचे आयुष्य दर्शन घडवणारा लेझर शो आहे.
आता अंधार लवकर होतो . साडे सहा वाजता सुरु होणाऱ्या या शो ला आम्ही केवळ सहा लोक होतो. घनदाट झाडीने वेढलेले उद्यान, मंद प्रकाशात उजळून निघालेली येथिल कॉटेज आणि निरव शांतता.
मनातला गोंधळ संपून मन कोरे होणे या दुर्मिळ अनुभूतीची प्रतीची देणारी ही  भेट होती.

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *