भाग १
३ डिसेम्बर १९८४ रोजी मध्य प्रदेश येथील भोपाळ शहरात, युनिअन कार्बाइड या कंपनीच्या, जमिनीखालील टॅंकमधून अत्यंत विषारी अशा पेस्टिसाईड मिथाईल आयसोसायनाईट वायूची गळती झाली. वीस एक हजार माणसे यात मृत्युमुखी पडली आणि पाच लाखाहून जास्त माणसे जखमी किंवा अपंग झाली.या दुर्दैवी घटनेमुळे, हे शहर लोकांच्या लक्षात राहिले.
काही दिवसांपूर्वी भोपाळला जाताना ही घटना आठवत होती. आज चाळीस वर्षांनी मात्र शहराने कात टाकली आहे. मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळ हे भारतातील सर्वात हिरवे शहर म्हणून ओळखले जाते.
अकराव्या शतकात धारचा परमारवंशीय राजा भोज याने या प्रदेशात एक किल्ला बांधला. या परिसरातील सरोवरांचे पाणी टिकून राहावे म्हणून एक बांध घातला. त्याला भोजपाल असे म्हणत. पुढे या सरोवराभोवती शहर वसवले गेले आणि ते भोपाळ या नावाने ओळखले गेले. भोज राजानंतर अनेक परमारवंशीय राजांनी या प्रदेशावर राज्य केले. परमार वंशाच्या पतनानंतर, दिल्लीच्या तख्तावरील मुसलमान सत्तांनी माळव्यावर आपला अंमल बसविला. भोपाळपासून ४८ किमी.वरील रायसेन येथील किल्ल्यातून मोगलांनी भोपाळवर आपले प्रशासन जारी ठेवले होते.
ब्रिटिश अंमलात हे दुसऱ्या क्रमांकाचे मुसलमानी मांडलिक राज्य होते. शहरात मुस्लिम स्थापत्याच्या खुणा जागोजागी दिसतात. तलावांचे शहर या बरोबर भोपाळ हे बेगमांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. १८१९ ते १९२६ पर्यंत इथे शंभर एक वर्ष बेगमांचे राज्य होते. राज्यकारभारात त्यांचे वर्चस्व होते. काही महाल, उद्याने यात त्या काळाच्या खुणा दिसतात.
भोपाळला प्रशस्त तलाव आहे आणि अतिशय मोकळी जागा आहे. मोठी उद्याने आहेत, जपलेली आणि वाढवलेली वने आहेत. तलावाच्या एका बाजूला जुन्या खुणा दिसतात , तिथे मोठ्या मशिदी आहेत, हवेल्या आहेत, छोट्या गल्ल्या आहेत, जास्तीत जास्त तीन माजली घरे आहेत, बाजार आहेत आणि गजबजलेले चौक आहेत.
मोठ्या तलावाच्या दुसऱ्या बाजूला नवीन भोपाळ आहे. इथले रस्ते प्रशस्त आहेत, इमारती उंच आहेत , आधुनिक आहेत, शहरातील नामवंत शाळा आणि कॉलेज या भागात आहेत. मॉल्स आहेत. दोन वेगळ्या जगाचे दर्शन होत असेल तरीही हे दोन भाग एकमेकांच्यात मिसळून गेले आहेत. हे एकमेव शहर असावे जिथे तलावाच्या एका बाजूला वाघाची डरकाळी ऐकू येते आणि दुसऱ्या बाजूला एकविसाव्या शतकाच्या सर्व आधुनिक खुणा दिसतात. 
नोव्हेंबर असल्याने असेल, दुपारी ऊन होते पण उन्हाचा तडखा नव्हता. दुपारी सुद्धा गार वारे वाहत होते आणि संध्याकाळ अत्यंत आल्हाददायक होती. विकासाची गती, रस्ते,मल्टिनॅशनल कंपनीची आधुनिक कार्यालये यामुळे जाणवत असली तरी इतर मेट्रो शहरांच्या मानाने शहर संथ आहे. दुपारी बारा वाजता दुकाने उघडतात ती रात्री आठ पर्यंत उघडी असतात. शहराच्या आतल्या भागात माणसांची जाग होती पण आम्ही सकाळीं नऊ वाजता जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा रस्त्यावर वाहने होती पण एकही माणूस पायी चालताना दिसला नाही त्याची मजा वाटली.
भर बाजारात सुद्धा दुकानदार आपल्या तंद्रीत होते. आपला माल खपवण्याची ईर्ष्या कुणाच्याच मनात नसल्याने माझा खिसा काही फार रिकामा झाला नाही याचे समाधान आता वाटते. मला बाजारातसुद्धा खरेदीला आलेल्या स्त्रिया दिसल्या नाहीत. अपवाद साड्यांची दुकाने. तिथं मात्र स्त्री विक्रेत्या आहेत. भोपाळ मध्यप्रदेशची राजधानी. महेश्वर साड्या जगप्रसिद्ध असताना ही इथल्या दुकानात त्यांना खास जागा नाही हे अजून एक नवल.
एकूणच शहरासारखी इथली माणसे सुद्धा निवांत आहेत. शहर स्वच्छ आहे अगदीं हमरस्ते च नाहीत तर गल्ल्या सुद्धा. रस्त्यावर जिथं खायच्या टपऱ्या आहेत, त्याच्या बाजूला सुद्धा कचरा कुंडी आहे.
मुंबईत आयुष्य गेल्यामुळे असेल, इथला ट्रॅफिक धडकी भरवणारा. सिग्नल हा प्रकार नाहीच. मोठ्या चौकात सुद्धा गाड्या चालू आणि त्यात आरामात क्रॉस करणारी माणसे .रस्त्याच्या एका बाजूला राहून ट्रॅफिक थांबेल याची वाट बघत असताना येथील एका स्थानिक माणसाला विचारलें, सिग्नल नाही का. .. त्यानी चक्क असाच क्रॉस करा असे सांगितले. दुसऱ्या बाजूला गजकचे मोठे दुकान असल्याने भीतीवर मोहाने मात केली.
भोपाळची खाद्य संस्कृती काही नजरेस पडली नाही. बापू की कुटीया म्हणून इति हॉटेलची चेन आहे. तिथे शाकाहारी जेवण खूप चांगले असते असे सांगितल्याने आम्ही गेलो खरे पण आवर्जून जावे असे काही खास नाही.
मध्य म्हणजे मिडीयम असा जर अर्थ धरला तर भोपाळ सगळ्याच बाबतीत मधेच कुठेतरी दिसते. खरेदी म्हणा , जेवण किंवा शहर, असोशीने काही बघावे किंवा खरेदी करावे असे इथलंच असे काही नाही. काही काळासाठी इंदोर ही मध्य प्रदेशाची राजधानी होती. तिला तिचा स्वतःचा आकार आहे , रूप आहे, संस्कृती आहे तसे भोपाळ बाबत सांगता येत नाही पण मला इथला संथपणा आवडला.
भोपाळ शहरात “ ताज अल मशीद” ही भारतातील सर्वात मोठी मशीद आहे. त्याशिवाय नबाबी सत्तेच्या खुणा दाखवणारे महाल. ह्यांची देखभाल काही व्यवस्थित होत आहे असे दिसले नाही. त्यातल्या त्यात चांगल्या स्थितीत गौहर महाल आहे. इमारत प्रशस्त आहे पण जवळ जवळ दोनशे वर्षाचा कालखंड अंगावर वावरत असल्याने तेवढीच कळकट आहे. आतल्या आवारात मृगनयनी स्टेट हॅन्डलूम एम्पोरियम आहे, ते तीनदा या महालाच्या बाजूने गेलं तरी बंद होते.
महाल ४. ६५ एकर जमिनीवर वसला आहे आणि एका बाजूला बडा तलाव असल्याने बाहेरचा नजारा मात्र देखणा आहे.
असे म्हणतात, या महालात एक गुप्त गुंफा आहे जी ४५ किलोमीटर आहे.
आता इथे हस्तकला प्रदर्शने भरतात.
गौहर उर्फ कुदसिया बेगम ही भोपाळ ची पहिली महिला शासक होती. नजर मुहम्मद खान या नबाबाशी तिचे लग्न झाले. १८१९ मध्ये शिकारीला गेला असताना एका विचित्र अपघातात त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर, जरी त्याच्या पुतण्याला वारसदार ठरवलं गेले तरी राज्यकारभार मात्र गौहर बेगमच्या हातात राहिला. त्या नंतर चार महिला शासकांनी भोपाळचा कारभार पाहिला हे खास आहे.
भाग २
मध्ये कोलकाताला गेले तेव्हा मुंबई आठवत होती. आता भोपाळला बडोद्याची आठवण झाली. संस्थानिकांचे शहर अजूनही तो आब टिकवून आहे. तरीही भोपाळ आणि बडोद्यात एक महत्वाचा फरक आहे. बडोदा गुजरात मध्ये असल्याने उद्यमशील लोकांचे गाव आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या वर्षातून तीन तरी फेऱ्या बडोद्याला व्हायच्या. रावपुरा मधील एका दुकानातून खरेदी होत असल्याने तो विक्रेता चांगला ओळखीचा. गेल्या वर्षी जवळ जवळ सात वर्षांनी गेले. त्यांनी नावानिशी ओळखले. एवढी वर्षे का आल्या नाहीत त्याची चौकशी केली आणि वरती आपले कार्ड देऊन , आम्ही ऑनलाईन सुद्धा पाठवतो हे सांगायला विसरला नाही.
इथे न्यू मार्केट मध्ये प्रसिद्ध साड्यांच्या दुकानात गेल्यावर माहेश्वरी आहेत का किंवा कतान चंदेरी सिल्क आहे का म्हंटल्यावर सरळ नाही असे सांगून मोकळा. आता गिर्हाईक निदान सात आठ हजार देणार एका साडीला एवढा तरी अंदाज घेऊन , दुसऱ्या साड्या दाखवायच्या ..तर तेही नाही. मुळात एम पी ची खासियत असणाऱ्या साड्या प्रसिद्ध दुकानात नाहीत ते नवल ..त्यांचा भर बहुतेक लोकल मार्केट वर असावा. इथे जयपूर गोटा वर्क केलेल्या झगमगीत साड्या किंवा बनारसी.
मला दुर्लभ साडी सेंटर मध्ये कोस सिल्क मनासारखी मिळाली . हे दुकान अपवाद . मृगनयनी स्टेट एम्पोरियम लुटते.
विकास असाच होत नाही ..माणसे तशी असावी लागतात.
एक मात्र चांगली गोष्ट दिसली. शहरातील भिंतीवर फार सुंदर चित्रे आहेत. सगळ्या भिंती रंगलेल्या. बरे , कुणीतरी आणून मारा रंग असा उद्योग नाही ..अत्यंत चांगल्या चित्रकारांकडून चित्रे काढून घेतली असावीत . वॉल आर्ट किंवा ग्राफिटी ..सगळ्या देशाने घेण्यासारखे , त्यामुळे पान खाऊ शहर असूनही त्याच्या खुणा नाहीत . लोकांच्या तोंडापर्यंत तो रंग मर्यादित आहे. हा स्वच्छ अभियानाचा एक भाग आहे.
राज्य संग्रहालय भोपाळ
————————————
भोपाळ शहराचे खरे वैभव आहे ती इथली प्रशस्त वास्तू संग्रहालये. एका दिवसात पाहून होणाऱ्या या वास्तू नाहीत. एखाद्या धनाढ्य रसिकाने जगभर फिरून जमवलेल्या वस्तूंचे हे संग्रहालय नाही तर मध्य प्रदेशचा इतिहास, कला आणि संस्कृती चे दर्शन घडवणारी ही संग्रहालये आहेत. तुम्ही इतिहासाचे अभ्यासक असाल, कलेचा आस्वाद घेणारे रसिक असाल किंवा मध्य प्रदेशाला भेट देणारे सामान्य प्रवासी या सर्वांना इथे आल्यावर समाधान वाटेल, त्यांच्या आकलनात भर पडेल अशा या वास्तू आहेत. इथे जागा हा प्रश्न नाहीच. दालने भव्य आहेत. प्रत्येक कलाकृतीची माहिती दिलेली आहे. शिवाय ऑडियो गाईड सुद्धा उपलब्ध आहे.
इथे हजारो वर्षापूर्वीची भित्तीचित्रे आहेत, उत्खननात सापडलेल्या वस्तू आहेत, जीवाश्म, खनिजे, राज्याच्या भुगर्भाची माहिती देणारे दालन आहे. काही शेकडो वर्षापूर्वी घडवलेल्या मुर्त्या आहेत, राजे महाराजांची नाणी आहेत, काही मोठया नेत्यांची स्व हस्ताक्षरातील पत्रे आहेत, स्वाक्षऱ्या आहेत, प्राचीन ते अर्वाचीन वाद्ये, ज्यात सूर बहार, चंद्र सारंगी, हंस बेला या वाद्यांचा समावेश आहे., इथे बनणारी वस्त्रे आहेत, शस्त्रे आहेत. ब्रिटनचां पहिला पोस्टल स्टॅम्प आहे, प्रत्येक गॅलरी ची स्वतंत्र कथा आहे. इथे भूतकाळ ते वर्तमान मधे घडलेला बदल पाहणे म्हणजे टाईम मशीन मधून केलेल्या प्रवासाची अनुभूती घेणे. As if every room calls you , “Come, be a part of this timeless journey.”
इथे हजारो वर्षापूर्वीची भित्तीचित्रे आहेत, उत्खननात सापडलेल्या वस्तू आहेत, जीवाश्म, खनिजे, राज्याच्या भुगर्भाची माहिती देणारे दालन आहे. काही शेकडो वर्षापूर्वी घडवलेल्या मुर्त्या आहेत, 
राजे महाराजांची नाणी आहेत, काही मोठया नेत्यांची स्व हस्ताक्षरातील पत्रे आहेत, स्वाक्षऱ्या आहेत, प्राचीन ते अर्वाचीन वाद्ये, ज्यात सूर बहार, चंद्र सारंगी, हंस बेला या वाद्यांचा समावेश आहे., इथे बनणारी वस्त्रे आहेत, शस्त्रे आहेत. ब्रिटनचां पहिला पोस्टल स्टॅम्प आहे, प्रत्येक गॅलरी ची स्वतंत्र कथा आहे. इथे भूतकाळ ते वर्तमान मधे घडलेला बदल पाहणे म्हणजे टाईम मशीन मधून केलेल्या प्रवासाची अनुभूती घेणे. As if every room calls you , “Come, be a part of this timeless journey.”
१९०९ मधे याची स्थापना झाली तेव्हा एडवर्ड म्युझिअम म्हणून ओळखले जाणारे हे संग्रहालय २००५ मधे मोठ्या वास्तूत हलवले गेले. अत्यंत स्वच्छ , एक कागदाचा कपटा नाही , ना आत , ना बाहेर .
एवढी झाडे असून , एक पान पडलेले मिळणार नाही. अर्थात इथेही कॅन्टीन बारा वाजेपर्यंत उघडले नव्हते.
दरवाजा काचेचा , उघड असेल म्हणून मी हॅण्डल ला हात घातला तर पाठून आवाज, अहो आत्ता उघडतोय .
कर्मचारी आणि आम्ही काही प्रवासी एकत्र आत शिरलो . चहा आणि बिस्किटे खाऊन पुढचा प्रवास ..
आदिवासीं वास्तू संग्रहालय
————————
ह्याच्या शेजारीच आदिवासींचे जीवन दर्शन घडवणारे ट्रायबल वास्तू संग्रहालय आहे.गोंड, भिल. कोकरू, बैगा अशा काही वन्य जमातींच्या रीती परंपरा, घरे, सण , त्यांची लग्ने , त्यांचे जन्म संस्कार , अंत्य संस्कार , त्या मागच्या समजुती इथे पाहायला मिळतात. एकाच मोठी इमारत पण त्याची उंची जवळजवळ तीन मजले तरी असेल , त्यामळे फार आकर्षक पद्धतीने गॅलरी ची रचना केली आहे.
त्यांची घरे ही निसर्गात सहज मिळणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून बनवलेली असतात. इथली लाईफ साईझ मॉडेल्स बनवताना सुद्धा माती, बांबू , गवत , शेण यांचा उपयोग केला आहे. आतमध्ये त्यांची मातीची भांडी आहेत , त्यांची जेवण करण्याची जागा , शय्या गृह, वर्हांडा, त्यांची हत्यारे या सर्व गोष्टी व्यवस्थित दाखवल्या आहेत. 
दुसऱ्या गॅलरीत त्यांच्या सणाची आणि लग्न समारंभाची माहिती मिळते. जंगल, इथली फुले, झाडे , पाने शेते आणि त्यात काम करणारी माणसे एवढी हुबेहूब बनवली आहेत की आपण त्या गोष्टी निर्जीव आहेत हे विसरतो. डोळ्यासमोर एखादा चलत चित्रपट चालू आहे असे फीलिंग हे पाहताना येते. इथला लग्न मंडप, विवाहात असलेले ढोलक आणि डमरू या वाद्यांचे महत्व, लग्न विधीच्या मागची कथा , आख्यायिका हे सर्वच फार आकर्षक रित्या बनवले आहे. 
एका गॅलरीत त्यांचे देव आहेत. पर्वत, नद्या, पृथ्वी यांच्या असलेलं त्यांचे नाते हे भक्तीचे . त्या मागच्या गोष्टी इथे दिसतात. त्यांचे खेळ, टेराकोटाच्या देवाला वाहिलेल्या वस्तू , त्यांच्या प्रार्थना, त्यांचे पूजाघर , मोठा रथ हे सगळे एवढे भव्य आहे की प्रत्यक्ष त्यांच्या भागात आपण आहोत असे वाटते. रंगाचा आणि प्रकाशाचा एवढा सुंदर उपयोग केला आहे की ही पूर्ण इमारत जादूई अनुभव देते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना खिळवून ठेवणारी ही वास्तू.
हे फक्त संग्रहालय नाही. हे नाटक आहे , हे जादूचे प्रयोग आहेत, हा एखाद्या भव्य चित्रपटाचा सेट आहे, अभ्यासू माणसासाठी हा डॉक्टरेट चा विषय आहे.माझे शब्द किंवा फोटो याला पकडू शकत नाहीत.. अनुभवावी अशी ही वास्तू.Don’t miss.
अत्यंत देखणी दालने आहेत.
याशिवाय इंदिरा गांधी मानव म्युझियम आहे. 
मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे इथे पाहायला मिळतात. दोनशे एकर एवढ्या अवाढव्यजागेत हे वसले आहे . पूर्ण भागच संग्रहालय..
मग त्यात झाडे आहेत , घरांची मॉडेल्स आहेत,
वसलेली गावांची मॉडेल्स आहेत .हे काही शक्य झाले नाही आतून पाहणे. गाडीतून जेवढे पाहता आले तेवढे पाहीले.
नॅशनल पार्क
————
ह्याच्या जवळच नॅशनल पार्क आहे. प्राणी ठेवण्याच्या जागा एवढ्या प्रचंड आहेत , त्याचा स्पॅन मोठा आहे , त्यामुळे आपण पिंजऱ्यातल्या वाघांना, सिंहांना पाहतो आहोत असे वाटत नाही . त्या प्राण्यांनाही तसे वाटत नसावे एवढी मोकळी जागा त्यांना फिरायला मिळालेली आहे. वाघाला जिथं ठेवलं आहे ती जागा आणि प्रवासी. यात दहा फुटांचा खंदक आहे. तिथपर्यंत हे महाशय फेऱ्या मारत होते. उडी मारायची तसदी घेणार नाही याची खात्री असल्याने त्याला हॅलो केलं. त्यालाही कळले मग त्यानें सरळ पाठ फिरवली..
पूर्ण पार्क च्या भोवती तलावाचा वेढा आहे. त्यामुळे हवा अतिशय शुद्ध आणि थंड. केवळ या कारणासाठी इथे वेळ घालवावा आणि जमेल तेवढी हवा छातीत भरून घ्यावी. इथे सर्प वन आहे, मगर सुसर आणि कासवांसाठी पाण्याची छोटी छोटी तळी आहेत. पक्ष्यांच्या असंख्य जाती आहेत. फुलपाखरांची बाग आहे. वन विहार सर्वात छोटे नॅशनल पार्क असेल पण वन्य प्राण्यांसाठी ते वरदान आहे. इथे ब्रीडिंग सेंटर आहे, प्राण्यांवर इलाज होण्याची सोय आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही इथल्या प्राण्यांना दत्तक घेऊन त्यांच्यासाठी मदत करू शकतात.
भर शहरातअसे काही असणे म्हणजे तुमची फुफ्फुसे चांगलीं राहण्याची मोफत आरोग्यसेवा.
