Skip to content

द टॉवरिंग टायटन — अमिताभ बच्चन 

 १९७८/७९ साल असेल. शोले लागून चार वर्षे झाली होती. सिनेमा खूप गाजला होता. कधी नव्हे ते बाबा तिकिट्स घेऊन आले. “मारामारी खूप आहे असे ऐकले आहे. मला नाही पाहायचा”
तोपर्यंत सिनेमा पाहायची फारशी आवडही नव्हती.
मिनर्व्हाचा ७० एम एम चा पडदा आणि त्यातून जिवंत होणारी पात्रे; गब्बर, जय, वीरू, बसंती, ठाकूर, न बोलणारी त्याची सून; पहिल्या दहा मिनिटातच हिंदी सिनेमाशी जे नाते जमले ते जमलेच.
सिनेमाचा शेवट  माहित नव्हता ते चांगलेच झाले. जय मरतो हे आधी समजले असते तर मी शोले, पूर्ण न पाहताच  निघून गेले असते.
त्या आधी कधीतरी संत ज्ञानेश्वर पहिला होता ज्याच्यात ज्ञानेश्वर समाधी घेतात हे दृश्य पाहून खूप रडले होते.
“ अग, हे सगळे खोटे असते ग “ हे आजीने सांगितल्यावर सिनेमातल्या कोणत्याही ट्रॅजेडीने कधीच रडवले नव्हते ते जयने रडवले. मृत्यू एवढा अस्वस्थ करतो! हा पहिला अनुभव होता. तो इतका सुंदर असतो हे समजण्याचा सुद्धा हा पहिला अनुभव. आयुष्यात पहिल्यांदाच कोणी दुसरे मरायला हवे होते असे वाटले खरे. नंतर अनेकवेळा शोले पाहिला पण त्याचा शेवट नाही. प्रत्येकवेळी पाहताना हेच मनात आले, की रमेश सिप्पीचे काय घोडे मारले होते जयने!
त्या न कळत्या वयात “जय”च्या प्रेमात पडले आणि काहीही कानावर येवो, दिल तो है, दिल का ऐतबार क्या की जे अशी स्थिती आहे.
अमिताभला प्रत्यक्ष पाहीले ते फिल्मफेअरच्या पार्टीत. तेव्हा षण्मुखानंद हॉल मध्ये हा कार्यक्रम असायचा. बाबांना पासेस मिळायचे. डॉन या सिनेमासाठी त्याला उत्कृष्ट सिनेमाचा अवॉर्ड मिळाला होता. या सिनेमाचे निर्माता नरिमन इराणी यांचे निधन सिनेमाच्या अगोदर झाले. अमिताभने हा पुरस्कार त्यांच्या पत्नीच्या हातून स्विकारला. त्यावेळेला अस्खलित इंग्रजी मधून केलेले छोटेसे भाषण आणि त्यांच्या पत्नीकडून पुरस्कार स्विकारण्याचे दाखवलेले औचित्य ह्यामुळे तो अजूनच  आवडला.
नंतर व्हिडिओच्या जमान्यात अमिताभचे सर्व चित्रपट पाहीले. जे नवीन  थिएटरमध्ये पाहता आले नव्हते ते घरी आणून पाहिले. देश प्रेमी, महान, बेशरम हे त्याला नाही, पण स्वतःलाच शिव्या देत संपूर्ण पाहिले; हा रेकॉर्ड मला दुसरा कोणत्याही नटाच्या बाबतीत जमला नाही. बेकारातला बेकार सिनेमा त्याच्यामुळे सुसह्य झाला.
सलग सात चित्रपटात अपयशी ठरलेल्या नायकाचा जंजीर आला आणि अपयशाची बेडी सुटली. दिवार, कस्मे वादे, अभिमान, शोले, त्रिशूल, जंजीर, काला पथ्थर. एकाहून एक सरस चित्रपट आणि त्यात खुलत गेलेला त्याचा अभिनय.
त्याकाळात मीडियाने त्याच्याकडे पाठ फिरवली आणि एवढ्या सिनेमात, इतक्या उच्च दर्जाचा अभिनय करूनही फिल्म फेअरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. उत्कृष्ट सिने मासिकाला अमिताभ पुरस्कार द्यावा एवढे डोंगराएवढे काम हा माणूस या सिनेमात करून गेला आहे. अमर अकबर अँथोनीच्या पुरस्काराने खरेतर फिल्म फेअरची लाज राखली. नंतरचा जीवघेणा अपघात, मायस्थेनिस ग्रेव्हीसचा आजार, बोफोर्सची चिखलफेक, राजकारणातले अपयश आणि कळस म्हणजे ABCLचे दिवाळे  या सगळ्यातून तो तरला,  स्वकर्तृत्वावर उजळून बाहेर पडला ह्याचा नुसता लांबून जरी अभ्यास केला तरी नैराश्य हा शब्द बाद होईल.
अमिताभवर पोस्ट नाही तर पुस्तक लिहावे लागेल एवढे काम त्या माणसाने करून ठेवले आहे आणि आताही करत आहे. ज्या माणसाच्या आगमनाने हिंदी सिनेमाची मेलडी संपली असा आरोप त्याच्या इमेजमुळे केला जातो, त्याची गीते निवडणे त्यापेक्षा सोपे आहे.
ही माझ्या आवडीची त्याची गाणी.

अभिमान —
( अमिताभ -जया )

प्रत्येक भारतीयांच्या मनातल्या अँग्री यंग मॅनला जिवंत करणाऱ्या अमिताभला “अभिमान” या सिनेमात गायकाचा  रोल साकार करायला मिळणे ही त्याच्या करिअरच्या नजरेतून घेतलेली जोखीमच होती. त्यात त्याला फुकाच्या अहंकाराची काळी कड होती. नवरा बायकोच्या नात्यात, नवऱ्याला वाटणाऱ्या न्यूनगंडामुळे दुरावा येणे ही गोष्ट भारतीय प्रेक्षकाला आवडेल का हा विचार ऋषीकेश मुखर्जी यांनी केला नसावा किंवा असा कठीण रोल आपला हिरो उत्कृष्ट करेल यांवर त्यांचा विश्वास असावा.
यशस्वी गायक असलेला सुबीर कुमार उमाच्या आवाजावर भाळून तिच्याशी लग्न करतो. तिला गाण्यासाठी उत्तेजन देतो.
सुरुवातीला केवळ सुबीर बरोबरच गाण्याचा आग्रह धरणारी उमा, हळूहळू नवऱ्याच्या संमतीने स्वतंत्र गायिका म्हणून उदयाला येते. शास्त्रोक्त संगीताची बैठक असल्याने आणि अत्यंत मधुर आवाजाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान प्रस्थापित करते. तिचे यश, त्याला स्वतःच्या  गायक म्हणून असलेल्या मर्यादांची जाणीव करून देते. आधी मनात आणि मग संसारात दरी निर्माण होते.  सूर, बेसूर होण्याची सुरुवात असते ती.
नायक, हा सहज, खल नायक वाटू शकेल एवढी कठीण भूमिका असूनही, त्याचे बेअरिंग अमिताभने पेलले आहे. त्याचा राग येत असूनही, त्याची कीवही येते. पुरुषाच्या मनातला अहंकार, त्याचे प्रेम असूनही, संसाराला मारक ठरू शकतो याचे परिणामकारक दर्शन अमिताभने या सिनेमात दाखवले आहे.

तेरे मेरे मिलन की ये रैना 
नया कोई गुल खिलाएगी
तभी तो चंचल है तेरे नैना देखो ना देखो ना. 

एकमेकांच्या प्रेमात आकंठ डुबलेले ते सुरेल जोडपे. त्या संसारवेलीवर आता फुल येण्याची वेळ आली आहे हे किती सूचक पणे  सांगितले आहे. सिनेमात हे गीत दोनदा येते. एकदा, जेव्हा ती दोघे एकमेकांत रमलेली असतात. पियानोवर तो गीताची  धून तयार करत असतो. शब्द गुणगुणत असतो .. हे गीत त्यांच्या प्रेमाचे प्रतीक बनणार असते.
नंतर त्यांच्या संसाराला त्यांचीच नजर लागते. घरटे मोडून जाते. त्या वादळाने ती मिटून जाते. स्वतःला हरवून बसते. तो आता मात्र भानावर येतो. तिच्या मनाचा थांग त्याला लागत नसतो. त्याच्या मदतीला हे गीत येते.

तुझे थामे कई हाथों से, मिलूंगा मदभरी रातों से
जगा के अनसुनी सी धड़कन, बलमवा भर दूंगी तेरा मन
नई अदा से सतायेगी
तभी तो चंचल हैं तेरे नैना
एकमेकांच्या सहवासात घालवलेल्या त्या मधाळ रात्री, ज्यांच्या खुणा अत्यंत दुःखदायक आहेत. त्याला माहित आहे की तो अपराधी आहे. तिचा, त्यांच्या न जन्मलेल्या मुलाचा, त्याहीपेक्षा त्या दोघांना जवळ आणणाऱ्या संगीताचा.
आपल्या स्वरांनी तो क्षमा  मागतो आहे. 
पती पत्नीच्या मनोज्ञ नात्यावर जे काही मोजके चित्रपट आहेत त्यातला हा एक.
मारलेली  मिठी हा फक्त प्रेमाचा अविष्कार नाही तर तो भक्कम आधार आहे. प्रेमाचे बंधन आहे. हे फक्त शब्दातून नाहीतर नजरेतून व्यक्त केले आहे अमिताभने.
या जोडीचा अजून एक गाजलेला सिनेमा होता
मिली
(अमिताभ -जया)

कॅन्सरची रुग्ण आणि एकाकी माणसाची प्रेमकहाणी. आयुष्य गुंतागुंतीचे जरी असले तरीही हास्याची एक लकेर ते सुसह्य करू शकते हा संदेश घेऊन मिली, शेखरच्या आयुष्यात प्रवेश करते. त्याचा भूतकाळ काळा. त्याची काळोखी अजूनही त्याचा पिच्छा सोडत नाही. लोकांच्या संशयाने भरलेल्या नजरा आणि  स्वतःचा लाजिरवाणा भूतकाळ यात जगणे हरवून बसलेला आहे तो. तिचे निखळ हसू आणि पुढे केलेला मैत्रीचा हात मात्र तो नाकारू शकत नाही. त्या निरागस मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आणि त्याचा जगण्यावर विश्वास बसतो.
तो टिकेल का? तिच्या आयुष्याचे तर मोजके क्षण शिल्लक आहेत आता. या सत्याचा आणि त्यातून परत येणाऱ्या एकाकीपणाचा सामना करणे कसे शक्य आहे ? त्याच्या  ती रोमारोमांत आहे. मनाच्या अशा कोपऱ्यात रुतून बसली आहे की तिचे नसणे म्हणजे त्याचे अस्तित्व संपणे.  तिच्या आठवणी त्याच्या हृदयाच्या ठोक्याशी संलग्न असताना ती त्याला सोडून जाऊच कशी शकते!

आए तुम याद मुझे, गाने लगी हर धड़कन
खुशबू लाई पवन, महका चन्दन 

आतापर्यंत एकाकी आयुष्य जगायची सवय झालेली असताना, मनाची तयारी सुद्धा असताना ती त्याचा सारा विऱोध मोडून आत शिरली आहे. उध्वस्त मनाने परत एकदा स्वप्ने रंगवायची सुरुवातही केली आहे. त्याच्या नजरेसमोर ती येते ती नववधू बनून. पण मेहंदी रेखलेल्या हातावरील रेषा काही वेगळेच सांगत आहेत!

जिस पल नैनों में सपना तेरा आए
उस पल मौसम पे मेंहंदी रच जाए
और तू बन जाये जैसे दुल्हन
आए तुम याद मुझे …
कारकिर्दीच्या सुरुवातीला अपयशी ठरलेल्या अमिताभची साथ दिली ती जयाने. ती तेव्हा यशस्वी नायिका होती. सिनेमात तिच्या भूमिकांना प्राधान्य  दिले जायचे. अमिताभ यशस्वी नायक बनल्यानंतर अमिताभच्या सिनेमात सशक्त भूमिका करायचा वाव, फार कमी नायिकांना मिळाला. अभिमान आणि मिली हा अपवाद ठरावा असे सिनेमा नंतर अमिताभने केले. ज्यांनी त्याला अपार लोकप्रियता मिळवून दिली. अँग्री यंगच्या अवताराने हळव्या प्रेमिकाला मागे टाकले.

अमर अकबर ऍंथोनी
(अमिताभ -परवीन बाबी)

अमर, अकबर अँथोनी या सिनेमाने आतापर्यन्त हुकलेले फिल्म फेअर मिळवून दिले आणि वन मॅन इंडस्ट्री चा जन्म झाला.  त्याने या सिनेमात काय केले नाही ! तो नाचला, गायला, लढला, हरला, आरशासमोर उभा राहून स्वतःशीच बोलला आणि परवीन बाबीला पटवण्यासाठी प्रेमाचा जुगार खेळला.
हा सिनेमा म्हणजे रोलर कोस्टर राईड होती. त्याच्या जागी कोणताही दुसरा नट असता तर हे मनोरंजन , मूर्खपणा दिसला असता . केवळ अमिताभ म्हणून त्याने हा सिनेमा आपल्या करिष्म्यावर तारून नेला. मनमोहन देसाईच्या  ब्रँडने  चित्रपट सृष्टीत आपले पाय रोवले.
इस्टरची पार्टी. आवडती मुलगी तिच्या बॉडीगार्ड बरोबर आहे आणि नायकाला  तिला इंप्रेस करायचे कठीण काम दिलेले आहे. अशावेळी गीताचे सुंदर शब्द आणि चाल नायकाच्या मदतीला येतात पण इथे तेही नाही .
“ My name is Anthony Gonsalvis” असे  धेड गुजरी शब्द घेऊन अमिताभ इस्टरच्या अंड्यातून बाहेर पडतो आणि सारा सीन नायिकेसकट खिशात टाकतो.

अभी-अभी इसी जगह पे इक लड़की देखि है 
जो मुझे इशारे करती है पर किसी से शायद डरती है 
प्यार करेगी क्या डराने वाली 
मेरी बनेगी कोई हिम्मत वाली 
जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए
रूपनगर प्रेमगली खोली नम्बर चार सौ बीस.

पत्ता चार सौ बीस पण माणूस मात्र शंभर नंबरी सोने निघाला.

मुंबईत दहीहंडीची मजा असायची ती गिरगावात. केवळ दहीहंडीच नाही तर चित्ररथ सुद्धा रस्त्यारस्त्यावरून जायचे. मुंबईत आणि कुठे मी हे पाहिले नाहीत. वेगवेगळे देखावे असत नी वाडीवाडीत कुणाचा देखावा सुंदर ह्यात चुरस असे. ते गेले की दहीहंड्या फोडायला गोविंदा जमायचे. चित्तथरारक असे ते दृश्य पण त्यात शिस्त होती . चार किंवा पाचच  थर  असायचे.  बक्षीस सुद्धा माफक. कुणाचा जीव जाईल एवढी जीवघेणी स्पर्धा तेव्हा नव्हती.
या कृष्णांना पाहायला जमणाऱ्या गोपिका तेव्हाही होत्या. बाल्कनीतून न्ह्याहाळत असताना नजर चुकवून पाण्याने भरलेल्या फुग्यांनी लक्ष वेधून घेण्याचा खेळ हा तर कॉमन होता. दही हंडीचा हा सारा जल्लोष नी उत्साह मनमोहन देसाई यांनी “ गोविंदा आला रे आला “ या गीतात प्रथम आणला आणि नंतर हा ट्रेंड झाला. धर्म, उत्साह, रोमान्स, रोमांचक असा सगळा मसाला ठासून भरलेला हा सण सिनेमात फिट्ट बसला.

खुद्दार
(अमिताभ -परवीन)
मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे
आया बिरज का बाँका, संभाल तेरी गगरी रे
अरे मच गया शोर..


शम्मी पेक्षा सुद्धा मला अमिताभ आवडतो. कृष्णाचा खट्याळपणा शम्मीत असेल पण अन्यायाचे निर्मूलन करणारा कृष्ण, अमिताभच्या सर्व सिनेमात आढळतो.

देखो अरे देखो कहीं ऐसा न हो जाए
चोरी करे माखन तेरा जिया भी चुराए
कोणताही प्रसंग असो, कसलीही वेशभूषा असो, नृत्याच्या कोणत्याही स्टेप्स असो, अमिताभने हृदय जिंकले आहे.
काहीही असो, मला अमिताभ -परवीन आणि अमिताभ – झीनत ह्या जोड्या आवडतात. अभिनयात राहूदे, तसेही त्याच्या सिनेमात तोच सबकुछ होता. (बाई असणे फक्त त्याच्या हातात नव्हते त्याची कमीही लावारीस मध्ये पूर्ण केलीच.) पण दिसण्यात ह्या दोघीही अमिताभला तोडिस तोड होत्या. सणसणीत उंची आणि सोफिस्टिकेशन. ड्रेस सेन्स उत्तम. त्यांना काहीही शोभायचे.
अमिताभ सुटात शोभलाच  पण तोंडात विडी आणि बटन्स सोडलेला शर्ट मधला  त्याचा अवतारही लोकांना आवडला. पात्राशी एकरूप होणे त्याच्याइतके कोणालाच जमले नाही. चेहरा रूढार्थाने देखणा नसणे  ही देणगीच म्हणावी लागेल. जुर्मानात बड्या बापाचा रईस बेटा या भूमिकेमध्ये  तो सहज वावरला. तेवढाच सौदागर मध्ये गूळ विक्या म्हणून ही शोभला.
परवीन सारखीच झीनतची पडद्यावरची इमेज काहीही असो, प्रत्यक्ष आयुष्यात त्या काळी  तिच्याएवढी आर्टिक्युलेट बाई नव्हती. कपड्यांची उत्तम समज आणि इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व या गुणांचे हिंदी सिनेसृष्टीत काही मोल नव्हते. पण काही कार्यक्रमांचे तिने केलेले नियोजन मात्र त्याकाळी अतिशय गाजले होते. जिथे तिची वेस्टर्न इमेज दिग्दर्शकानी वापरली, तिथे मात्र ही जोडी खूप गाजली.

द ग्रेट गॅम्बलर
(अमिताभ -झीनत अमान)
द ग्रेट गॅम्बलर हा सिनेमा हा सिनेमा फार गाजला नाही पण “ दो लफ़्ज़ों की है, दिल की कहानी, या है मोहब्बत, या है जवानी” हे गीत मात्र लोकप्रिय आहे. सस्पेन्स कॅटेगरी मधल्या या चित्रपटाचे चित्रण कैरो, लिस्बन, रोम आणि व्हेनिस ला झाले. नायकावर पहारा ठेवणे हे नायिकेचे काम आहे . त्याला मात्र तिची खरी ओळख नाही . प्रेम का अंतस्थ हेतूची पूर्तता या चक्रात आहे ती . उद्या नक्की काय होईल ते माहित नाही . माहित असेल तरी थांबवणे हातात नाही. 

दिल की बातों का, मतलब न पूछो,
कुछ और हमसे, बस अब न पूछो
जिसके लिये है, दुनिया दीवानी
या है मोहब्बत, या है जवानी
मुखवटा तर फाटला जाणार आहे, त्याची खंत आहेच तरीही प्रेम असेल किंवा तारुण्यातील वेड ..जे काय आहे ते उपभोगू का नये असे विचार करून केलेले वेडे साहस .
व्हेनिस ला येणारे भारतीय एकदा तरी ही सैर करतात ती ही  जोडी आठवून. सुरुवातीला इटालियन शब्द आहेत. अर्थ तोच , स्वर तेच आणि प्रेमाची परि-भाषा सुद्धा तीच.

दोस्ताना
((अमिताभ -झीनत अमान )
अमिताभ आणि झीनतच्या दोस्ताना सिनेमात एक प्रसंग आहे. तोकडे कपडे घातलेली झीनत, पोलीस  चौकीत  येऊन  कुणीतरी  शिटी वाजवली म्हणून तक्रार करते आणि तिच्या उघड्या असणाऱ्या  देहाचा कसलाही  परिणाम स्वतःवर होऊन न देता तो तितक्याच सहजतेने आणि काहीशा  तुच्छतेने म्हणतो ., हे असले कपडे पाहून, लोक शिट्टी नाहीतर काय देवळातील घंटा वाजवतील! 
त्याच्याशिवाय  हा सीन  कुणालाही  शोभणार  नाही कारण बच्चनच्या अंगात ही गुर्मी  आहे आणि त्याचा स्वतःतील नरावर  पूर्ण ताबा आहे.
या सिनेमात केवळ त्याला आवडते म्हणून झीनत पूर्ण साडीत आहे. अमिताभ , अमिताभ का आहे ते इथे समजते. माणसे त्याला male chauvinist म्हणतील …म्हणो  ..he is worth chasing.


दो दिलों के मेल में, इसनज़र के खेल में
ऐसे दिल धड़क गया, शोर दूर तक गया
क्या ये खून माफ़ है, ये कोई इन्साफ है
आँखों का था कसूर, छुरी दिल पे चल गयी
तेरी मेरी दोस्ती, प्यार में बदल गयी
दोस्ताना सिनेमात झीनत पूर्ण वेळ अत्यंत सुंदर प्युअर सिल्क ,आणि सॅटिन सिल्क साडीत आहे आणि ही किमया केवळ आणि केवळ त्याच्या मुळे घडली आहे. 
पाऊस आला की रिमझिम गिरे सावन मनात गुंजू लागते. मुंबई, पाऊस, अमिताभ, किशोर, लता आणि मौशमीने मुंबईच्या पावसाला रोमँटिक बनवले आहे. हे गाणे अनेक पिढ्यांचे आवडीचे गाणे आहे. त्यांच्यासाठी ते पावसात भिजण्याचं गाणे आहे. 

मंझिल
(अमिताभ-मौशमी)
“रिमझिम गिरे सावन”  हे गीत मंझिल सिनेमात  दोनदा येते. मला किशोरच्या आवाजात जास्त  आवडते. पाऊस खट्याळ नसतो त्यात. किशोरचा धीरगंभीर भारदस्त आवाज एक वेगळीच खोली देतो या गाण्याला. जर खट्याळ पाऊस शोधायचा असेल न तर लताजींच्या आवाजातील हे गीत नुसते ऐकायचे नाही तर पाहायचे  सुद्धा .
पावसाने चकाचक झालेली बॉम्बे दिसते यात.
हो तेव्हा ती  “बॉम्बेच”  होती .
मरीन लाईन्सचा समुद्र  किती वेगळाच दिसतो इथे. तेव्हा ” बॉम्बे” मध्ये फार गर्दी नव्हती. माणसांची आणि गाड्यांचीही . १९७९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आहे. त्यामुळे आता अस्तंगत होत चाललेली पिवळी -काळी परिचयाची फियाट टॅक्सी सुद्धा भुरकन नजरेसमोरून जाते. किती तरी  भिजलेले दिवस क्षणार्धात नजरेसमोर जातात . हे गीत पाहणे म्हणजे भूतकाळातल्या सगळ्या स्मृतींना उजाळा देणे .

गीताच्या मध्यावर रस्त्याच्या मधून पाणी उडवत जाणारी लाल बेस्ट ” बस ” आणि ते पाणी चुकवत आपली वाट धरणारे, चिंब  भिजलेले अमिताभ आणि मौसमी. त्याचे लांब ढेंगा टाकत  स्वतःच्या चालीने पुढे जाणे  आणि  तिचे त्याच्या मागे  खेचले जाणे सुद्धा सहज; पण तिचा हात आहे त्याच्या हातात. अगदी घट्ट. 

पहले भी युं तो बरसे थे बादल
पहले भी युं तो भीगा था आंचल
अबके बरस क्यो सजन , सुलग सुलग जाये मन?

आता तिला या प्रश्नाचे उत्तर माहित  आहे तरीही पावसासारखाच  खट्याळ प्रश्न  येतोच  तिच्या मनात. 
ऑफिसची वेळ असावी . त्यामुळे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ च्या रुटीन मध्ये बांधल्या गेलेल्या असंख्य  छत्र्या दिसतात  आणि प्रेमात असल्यामुळे वेळेचे भान नसलेले ते दोघे मात्र असतात छत्रीशिवाय. अंगावर पाऊस  झेलत एकमेकांशी बोलणे, एकमेकांना काहीतरी नवीन दाखवणे, उगाच हसणे, पाणी उडवणे आणि दमल्यावर एकमेकांच्या कुशीत ओलेत्या बाकड्यावर बसणे हे सुद्धा अगदी सहज घडते. 
अमिताभने चक्क  सूट  घातला आहे या पावसाळी ओलेत्या गीतात. मौशमी अंगाला चिकटून बसलेल्या साध्या साडीतसुद्धा गोड दिसते. पाऊस  फक्त नायिकेला सेक्सी दाखवण्यापुरता नव्हता तेव्हा .
वयाने वाढलेली पण मनाने लहानच, फक्त पावसाचा आनंद घेणारी  अशी दिसतात ती दोघे. 

अमिताभ — जया –परवीन –झीनत या प्रमाणेच आणि एक जोडी गाजली ती अमिताभ आणि हेमाची. तेव्हा हेमा आणि धर्मेंद्र यांचे नातेही ठरल्यात जमा होते म्हणून ही जोडी विवादास्पद सुद्धा झाली नाही. आताही अमिताभ जेव्हा चरित्र भूमिकेत शिरला आहे तेव्हा त्याच्याबरोबर वीर-झारा ,बागबान आणि बाबूल या सिनेमात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत हेमा फिट्ट बसली. दोघांनाही वार्ध्यक्याने स्पर्श केलेला नाही. अभिनय आणि हेमा या बाबतीत वाद असू शकतील पण she has aged gracefully. So as Amitabh.

सत्ते पे सत्ता
(अमिताभ -हेमा मालिनी)
सत्ते पे सत्ता या सिनेमात एक गीत आहे “दिलबर मेरे कब तक मुझे, ऐसे ही तड़पाओगे, मैं आग दिल में लगा दूँगा वो, के पल में पिघल जाओगे”
सात भावांपैकी रवी सर्वात मोठा . जबाबदार पण सर्व कुटुंबच जंगली. शहरी रीती रिवाज सोडाच, स्वच्छता , शिस्त या बेसिक गोष्टींचा सुद्धा अभाव असलेले त्यांचे घर. नियती त्याच्या आयुष्यात इंदूला घेऊन येते आणि प्रेम हसते. 
“एक दिन आएगा, प्यार हो जाएगा” हा जबरदस्त आशावाद आहे. तिला जिंकण्याचा. 
प्रेमात स्वतःला पूर्ण बदलवून  तो तिच्याकडे तिचा हात मागतो. अहं, ही याचना नाही. सहा फूट देहाला शोभेल असेच हिम्मतवान मन ही आहे त्याच्याकडे.

दिल से मिलेगा जो दिल तो महकने लगोगे
तुम मेरी बाहों में आ के बहकने लगोगे
होश खो जाएगा, प्यार हो जाएगा

दिलबर मेरे..The best proposal indeed.

दहा ऑक्टोबर नंतर अकरा येतो.  तारखेने  त्या दोघांची गाठ एका दिवसाने चुकली आहे.
मुकद्दर का सिकंदर
(अमिताभ-रेखा) 


सलामे इश्क़ मेरी जा ज़रा क़ुबूल कर लो
तुम हम से प्यार करने की ज़रा सी भूल कर लो
मेरा दिल बेचैन मेरा दिल बेचैन है हमसफ़र के लिए

हिंदी सिनेमात प्रेमासाठी कुर्बानी देण्याची प्रथा चंद्रमुखी ने सुरु केली. जोहरा बेगम या भूमिकेत रेखाने चार चांद लावले.
“ भूल कर लो” ही वॉर्निंग मनावर घेतली मात्र अमिताभने.
नको तिथे जीव जडव ही चुकी कितीही सुंदर जादुगरणीने केली तरी चूक ती चूकच.
पडद्यामागे कितीही हृदये जळो, निदान त्याचा धूर बाहेर आला नाही. त्याने  काही कबुली दिली नाही .

इसके आगे की अब दास्तां  मुझसे सुन
सुनके तेरी नज़र डबडबा  जाएगी
बात दिल की जो अब तक तेरे दिल में थी
मेरा दावा है होठों पे आ जाएगी
ह्या सिनेमात तरी त्याच्या हृदयावर फक्त राखीचा हक्क होता.
मला स्वतःला राखी आणि अमिताभ यांची जोडी अफाट आवडते. कभी कभी , बेमिसाल , बरसात की एक रात, जुर्माना ,कस्मे वादे या सिनेमात प्रियकर प्रेयसी म्हणून ती वावरली. कभी कभी आणि बेमिसाल यात ते प्रेम अयशस्वी झाले.   एक प्रगल्भ नाते.
कभी कभी
(अमिताभ – राखी)


कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिये 
तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं
तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिये

प्रेम, विरह, वेगळ्या झालेल्या वाटा आपापल्या जोडीदाराबरोबर समजुतीने केलेला संसार आणि  ती तडजोड छान अंगवळणी पडलेली असताना नियतीने परत  खेळलेली चाल …
संयमाची परीक्षा आहे ही!
सिनेमाच्या सुरुवातीला एक  कवी गातो  हे गीत . एका प्रेमिकाचे हळवे गीत. 


कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के ये बदन, ये निगाहें मेरी अमानत हैं
ये गेसुओं की घनी छाँव है मेरी ख़ातिर
ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं
कभी कभी मेरे दिल में..

बर्फाची थंड चादर  बसलेले ते दोघे आपल्या संसाराची  स्वप्ने रंगवीत आहेत. निष्पर्ण वृक्षांची सावली कशी मिळणार ! मनातले मनातच राहते आणि कोणा दुसऱ्याच्या शेजेवर हेच गीत म्हणणे तिच्या नशिबी येते.

कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के जैसे तू मुझे चाहेगी उम्र भर यूँ ही
उठेगी मेरी तरफ़ प्यार की नज़र यूँ ही
मैं जानता हूँ , के तू ग़ैर है, मगर यूँ ही
कभी कभी मेरे दिल में…

हे गीत म्हणणारा तो आता मात्र हळवा राहीलेला नाही.
If only हे छोटेसेच दोन शब्द … आयुष्य बदलवून टाकतात.
अभिमान , सौदागर आणि  कभी कभी चा नायक. नायिकेच्या तुलनेत  मूल्यांत थोडासा हिणकस असलेला रोल आहे हा. पण अमिताभने  जी उंची दाखवली आहे ती  पारंपरिक नायकाला जमणे कठीण.
रोमँटिक हिरो म्हणून अमिताभ बच्चन ओळखले जात नाहीत .
त्यांच्या आयुष्याचा कॅनव्हास खूप मोठा आहे. झेप सुद्धा मोठी आहे. त्यांच्या स्वप्नाचे आकाश एवढे विस्तारले आहे की फक्त गुलाबी रंगाचा शिडकावा त्याला पुरणार नाही.त्यांच्या सिनेमात गाण्याच्या सुरांना आणि शब्दांनाही महत्व नसले तरी आपल्या अभिनयाने त्यांनी या  कमतरतेवर नक्कीच मात केली आहे. त्यांचे  संवाद गाजले आहेत. एकही शब्द न बोलताही ,त्यांच्या डोळ्यांची  भाषा प्रेक्षकांनी जाणली आहे. त्यांच्या संतापाला सुद्धा प्रेक्षकांची दाद भरभरून मिळालेली आहे .
.नाट्यक्षेत्रातील नवरसाला त्यांनी  जिवंत केले आहे …आणि या रसातील एक रस प्रेमरस आहे .
नऊ रसात विभागलेल्या प्रेमरसाएवढीच त्यांच्या सिनेमात नायिकेची जागा आहे त्यामुळे बच्चनच्या नायिका शोधणे, त्याचा काउंटर पार्ट शोधणे फार कठीण आहे . 

पडद्यावरील आईला बच्चनच्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे. दिवारपासून हा सिलसिला सुरु झाला, यातील नायिका पटकन लक्षात येत नाही पण निरुपा रॉय च्या मांडीवर प्राण सोडणार विजय विसरणे अशक्य आहे. मजबूरमध्ये त्याचे आयुष्य त्यांनी बहिणीच्या उपचारासाठी पणाला लावले आहे. खलनायक, तो कुटुंबाला बरबाद करणारा असो , किंवा समाजाला , किंवा देशाला, त्याला मारणे, त्याच्या आयुष्याचे ध्येय आहे. अगदी आलापसारख्या सिनेमात गाण्यासाठी त्यांनी सर्वस्व दिलय तर सिलसिला या सिनेमात मित्राला दिलेल्या वचनासाठी प्रेमाचा बळी दिलाय.
जवळजवळ सत्तर टक्के किंवा जास्तही असेल, फुटेज खाल्यानंतर उरलेल्या भागात त्याचे मनोरंजन करणे आणि प्रेक्षकांना नयनसुख देणे, फक्त याकरिता निर्मात्यांनी नायिकांना वापरले आहे. 

त्यांच्या पडद्यामागच्या आयुष्यात सुद्धा त्यांची महत्वाकांक्षा , सतत कामात गर्क असणे, नवीन आव्हाने स्विकारणे , यशाचे मापदंड वाढवणे याला फार महत्व आहे….त्यांच्या बरोबर कारकिर्दीची सुरुवात  करणारे आज जवळजवळ निवृत्त आयुष्य जगात  असताना, मोठी नातवंडे असणारे आजोबा बच्चन , कोणत्याही महत्वाच्या पुरस्कारासाठी , कुणालाही टक्कर देऊ शकतात हे प्रेरणादायक आहेच आणि या एकूणच या माणसाचा  जीवनाचा आलेख स्तिमित करणारा आहे.
तो आणि  ती एवढेच त्याच्या आयुष्यात महत्वाचे  नाही .त्याचे कुटुंब, त्याची प्रतिष्ठा , त्याच्या  असलेले वलय, त्याचे आईवडील , मुले आणि त्याचे  नाव  हे सारे सारे  तिच्यापेक्षाही त्याला महत्वाचे आहे …
पडद्यावर आणि पडद्यामागे सुद्धा. म्हणून कोणीही जीव ओवाळून टाकावा असे हे व्यक्तिमत्व असेल तरी हे जीव लावणे सोपे नाही. अशा स्वयंप्रकाशी अफाट हुशार पुरुषात विरघळून जाणे  सोपे असते. स्वतंत्र ओळख नसेल तर नक्कीच ..
परवीन, हेमा  काय किंवा झीनत, कितीही यशस्वी नायिका असल्या तरी नायकाच्या छायेतील बाहुली हीच त्यांची ओळख राहिली. त्याचे  त्यांना फार वाईट सुद्धा  वाटले  नाही…त्यांची कुवत सुद्धा नव्हती.
मात्र जर स्वत:ची स्वतंत्र ओळख असेल तर कितीही प्रेम असेल तरी निव्वळ सावली बनणे फार कठीण होते ..
हा माणूस एकदा आयुष्यात आला की ना दुसरीकडे पाहता येत ना दुय्यम स्थान घेऊन राहता येत..
He ruined you for anyone else ..
मग शोकांतिका अटळ असते .

ह्याला अपवाद काही रोल  आहेत…
मुकद्दर का सिकंदर, बेमिसाल आणि कभीकभी या सिनेमात त्यानी नायिकेवर जीव ओवाळून टाकला आहे. He worshiped  her, indeed a pleasant change … 
तिन्ही  सिनेमाची  नायिका, त्याच्या  हृदयाची  स्वामिनी, राखी आहे. सिनेमात तिच्या  रोलची लांबी  कितीही  असेल, तिला ठोस  रोल  आहे .. 
मला ही  जोडी अत्यंत आवडते .
बच्चनच्या चित्रपटातील त्याच्या पात्राच्या हृदयाचे बरेच कप्पे असतात. त्यात  एक  असतो तो  “तिचा”   ..
तिच्या  हृदयात तो शंभर टक्के असेल म्हणून तो काही  तिला  आपले हृदय शंभर टक्के देणार नाही ..His personality  has many facets .. जर ते  मान्य  असेल  तर  तिला  तिचीही स्वतंत्र ओळख  असणे आवश्यक आहे मग रोल च्या लांबीला महत्व नाही .
प्रवाशाच्या आयुष्यात एक  विसाव्याचे स्थान  असावे आणि बच्चनला  विसावा देणारे असेल तर त्याची उंची गाण्या नाचण्या पुरती मर्यादित नसावी . .कालपथ्थर चा  रोल  पहा .. 

कालपथ्थर
(अमिताभ- राखी)


विजय ( अमिताभ ) आणि सुधा ( राखी ) यांची ओळख तर आहे, ती डॉक्टर आहे त्या छोट्याश्या गावात तर तो खाणीत काम करणारा एक मजूर. जगण्याची इच्छाच नसलेला, मृत्यूशी भांडण करणारा. हाताला जखम झाली तरी त्याच्या डोळ्यात टिपूस नाही .. फक्त कळत न कळत वेदनेने एखादी रेषा  उमटते . त्याला पाहिल्यावर ती प्रेमात नाही पडलेली .. एक डॉक्टर म्हणून त्याच्या सहनशक्तीचे तिला कुतूहल आहेच  पण फाजील उत्सुकता नाही.
“तू मला माझ्यापेक्षाही ओळखतेस” असे बोलून जातो तो पण त्या पलीकडे मात्र एक शब्दही बोलत नाही . 
तिला तो आवडायला लागला आहे पण हे तिला त्याला सांगायचे नाही . त्याच्या मनाची तिला ओळख पटत नाही . त्याने जेवढा हात दिला आहे तेवढाच ती स्विकारते . निरपेक्ष मैत्री . एका रात्री विजय तिला बोलवायला येतो. एका रुग्णाच्या घरी जायचं असते. काळोखी रात्र, पाऊस मी म्हणतोय. एक छत्री आणि आपल्या विचारात गर्क असलेले ते दोघे.  अचानक सुधाचा तोल जातो. विजयाचा हात तिला आधार देण्यासाठी पुढे येत असतानाच मधले अंतर कापले गेले आहे  याची जाणीव होते त्या दोघांना. मनातील अंतर सुद्धा तेव्हा नाहीसे झालेले असते . अंगाला घट्ट चिकटलेली साडी पण त्याचे लक्ष तिथे नाहीच. मान समोर तरीही तिच्या श्वासाबरोबरच त्याच्या श्वासाची लय जुळली आहे. कोणी न सांगता, बोलता पाऊस सांगतो त्यांना , ते प्रेमात पडले आहेत.
दुनिया दी इस भीड़ दे अंदर, जे कोई अपणा पाइये
अपणे नूँ खुशकिस्मत कहिये, ते रब दा शुकर मनाइये
दिल बदले दिल मिलें ते यारा, सौदा झट चुकाइये
अम्बर ते जो स्वर्ग बसे, ओ धरती ते लै आइये
जग्गेया जग्गेया जग्गेया,
कदे इश्क़ छुपण नयो लगेया

स्वतःच्या अंतर्मनाला दिलेला आवाज आहे हा. जगाच्या गर्दीत तुमच्यासाठी बनवलेला मिळणे हे फक्त भाग्यवंताच्या नशिबी असते. अशावेळी मनातल्या शंका कुशंका बाजूला ठेवून देवाचे आभार माना आणि प्रेमाला शरण द्या. 
अतिशय  matuard नाते ..More than chemistry, a great  understanding ..
हिंदी  सिनेमात  हे  अतिशय  रेअर आहे .. 

बच्चन एक्याऐंशी वर्षात पदार्पण करत आहेत. सहस्त्रचंद्र सोहळा साजरे करणारे अनेक आहेत पण धरतीवरील या तारकांच्या समूहात झळझळणारा चंद्र एखादाच.
श्री. अमिताभ बच्चन यांस वाढदिवसाच्या  शुभेच्छा. 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

10 thoughts on “द टॉवरिंग टायटन — अमिताभ बच्चन ”

  1. एक ही एक…
    असा अमिताभ
    आपला अमिताभ
    81 वर्षाचा असला तरी तो आपला आहे. तो पहिल्यापासून आवडत होता.
    वय वाढत गेलं तसा तो जास्त आवडायला लागला.
    आज सगळीकडे त्याच्यावर लेख आहेत.
    पण तुझा लेख नेहमीसारखाच हटके..
    कुठली गाणी निवडायची हा प्रश्नच असणार.
    अप्रतिम लेख… ❤️❤️❤️

  2. उदय शेवडे

    वा वा……अतिशय हृद्य लेख.
    अमिताभने मेलडी युग घालवले असं का म्हणतात ? नायिका, सहनायक, हास्य अभिनेता, खलनायक या सगळ्यांना या आपल्या अभियन्याच्या जोरावर निष्प्रभ केले.

    सर्व गाण्याची निवड उत्तम ….दुसरा भाग येणार की नाही ते माहिती नाही पण नमक हलाल मधलं आज रपट जैय्यो तो….हे गाणं असावं अशी अपेक्षा.

    काल खुद्दार बघताना मनात आलं की अमिताभने आज तो सिनेमा बघितला तर त्याला काय वाटेल ?

    अमिताभची दुसरी इनिंग जास्त प्रभावी, प्रगल्भ, वैविध्यपूर्ण होती असं वाटतं.

    1. खुद्दार ही काळाची भेट होती Uday.
      तेव्हा सिनेमा असेच होते . प्रेक्षकांचे आकलन आवड सुद्धा तशीच.
      नंतरची इंनिग सुद्धा ओल्ड angry मॅन . काही सिनेमा मात्र अपवाद.
      पिकू , पिंक , मेजरसाब , आणि काही
      will surely write on his scenes , dialogues …and of course on his later career

  3. आजपर्यंत वाचलेला बच्चन बाबतचा सर्वात भारी लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *