Skip to content

जनतेचा कवी –शैलेंद्र 

रिश्ता दिल से दिल के ऐतबार का
ज़िन्दा है हमीं से नाम प्यार का
के मर के भी किसी को याद आयेंगे
किसी के आँसुओं में मुस्कुराएँगे
कहेगा फूल हर कली से बार-बार
जीना इसी का नाम है…

“के मर के भी किसी को याद आयेंगे” ह्या शब्दांहून माणसाच्या आयुष्यात आणि काय महत्वाचे असू शकेल! गीतकार शैलेंद्र यांनी आपल्या गीतांच्या रूपाने रसिकांसाठी जो वारसा ठेवला आहे तो अमर आहे. त्यांच्या गाण्यांनी सामान्य लोकांच्या इच्छांना, स्वप्नांना, आकांक्षांना शब्द दिले. अव्यक्त भावना सहज सोप्या गीतांत गुंफून त्या बोलून दाखवण्याचे धाडस दिले.
केवळ हिंदी सिनेमांतच नाही, तर लोकांच्या हृदयावर त्यांच्या गीतांनी राज्य केले.
His songs showed us what it means to be human.
“के मर के भी किसी को याद आयेंगे” yes, he will be lovingly remembered.

२३ ऑगस्ट १९२३ मध्ये पाकिस्तानातील रावळपिंडी या जिल्ह्यात शंकरदास केसरीलाल यांचा जन्म झाला. मथुरेला त्यांचे शिक्षण झाले. काव्य लेखनाची सुरुवात सुद्धा इथेच झाली. नंतर कामाच्या शोधात मुंबईला आल्यावर भारतीय रेल्वे मध्ये वेल्डिंग तंत्रज्ञ म्हणून ते काम करू लागले. समाजवादाने भारून गेलेले असंख्य कलाकार त्यावेळी IPTA साठी काम करत होते. इथेच एका कवी संवेलनात फाळणीच्या वेदनांवर आधारभूत असलेली “जलता हुआ पंजाब” ही प्रसिद्ध कविता सादर करताना, सिनेनिर्मितीत नुकतेच पदार्पण करणारे राजकपूर यांच्या नजरेला हा हिरा पडला आणि शंकरदास केसरीलालचा,  गीतकार  शेलेंद्र होण्याकडे प्रवास सुरु होण्याची सुरुवात झाली.

सुरुवातीला, माझी कविता बिकावू नाही म्हणून राज कपूर यांची ऑफर शैलेंद्र यांनी धुडकावली खरी पण नियतीला हे मंजूर नसावे. आर्थिक अडचणीत सापडल्याने, त्यांनी राज कपूर यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी बरसात सिनेमाची जुळवाजुळव सुरु होती. हसरत जयपुरी  हे गीतकार होते तरीही शैलेंद्र यांना  दोन गाणी लिहिण्याची संधी मिळाली. “बरसात में हमसे मिले तुम सजन” आणि “पतली कमर है” ही दोन गाणी आणि सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले. त्या नंतर जवळजवळ दोन दशके शैलेंद्र यांनी हिंदी सिनेसृष्टीसाठी अप्रतिम गीते लिहिली.
आठशेहून जास्त गीते, तीन फिल्मफेअर पारितोषिके आणि असंख्य अवॉर्ड्स यात आपल्याला आवडलेली गीते शोधणे कठीण. हा छोटासा प्रयत्न.

१) हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें, हम दर्द के सुर में गाते हैं
( सिनेमा -पतिता, संगीतकार – शंकर -जयकिशन, गायक -तलत महमूद,  नायक -देव आनंद)

मानवी जीवनात दुःखाचे महत्व असाधारण आहे. तुला काय हवे या प्रश्नाला जेव्हा “मला दुःख हवे” हे जे कुंतीचे उत्तर येते त्यातच दुःखाची अपरिहार्यता सामावली गेली आहे. आशा-अपेक्षा यांनी भरलेल्या या जगात सुख आणि दुःख एकमेकांचा हात धरून येतात.. इंद्रियसुख भोगवादाला जन्म देते आणि त्यातून निर्माण झालेली असंतुष्टता आणि अपेक्षा दुःखाची जाणीव करून देतात. दुःख जमिनीवर आणते. स्वतःपलीकडे जे जग आहे त्याची जाणीव करून देते.

मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल 

अशी हाक देणार्‍या ग्रेस यांच्या कवितांचा स्थायी भाव दुःख किवा शोक हाच आहे.

हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें
हम दर्द के सुर में गाते हैं
जब हद से गुज़र जाती है खुशी
आँसू भी छलकते आते हैं

पतिता या सिनेमातील शैलेंद्रच्या, “हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें”या गीतावर, “अवर स्विटेस्ट सॉंग्स आर दोज दॅट टेल ऑफ सॅडेस्ट थॉट्स” या शेलीच्या काव्याचा प्रभाव आहे. शेली म्हंटतो, उदास आशय असणारी  गीते मधुर असतात. शैलेंद्र म्हणतो, मधुर गीते दर्दभऱ्या स्वरात गायली जातात. मधुरतेचा आणि  शोकात्मकतेचा सूर असणाऱ्या, तलत महमूद यांच्या आवाजाला मिळालेली ही पावती आहे.

काँटों में खिले हैं फूल हमारे
रंग भरे अरमानों के
नादान हैं जो इन काँटों से
दामन को बचाये जाते हैं

जन्म मिळतोच रुदनातून. दुःख हा जीवनाचा न चुकवता येणारा भाग आहे. चिखलातून कमळ जन्म घेते, काट्यांच्या पहाऱ्यात सुद्धा फुल उमलते. आयुष्य म्हटले तर, सुख-दुःख, यश-अपयश, आनंद आणि आक्रोश यांचा कोलाज असते.
डोळ्यातून येणारे अश्रू केवळ दुःखाचे नसतात, तर अनेकदा आनंदाच्या अतिरेकाने सुद्धा डोळे भरून वाहू लागतात. मग भावनांचा निचरा करणाऱ्या या अश्रुंचे स्वागत सुद्धा का करू नये! 

“पतिता” ही  एका बलात्कारित मुलीची, राधेची  गोष्ट. धनदांडग्यांच्या जगात गरीब मुलीच्या अब्रूला मान नसतो. घराचे भाडे देता येत नाही म्हणून पैसे मागायला गेलेल्या राधेवर बलात्कार होतो. त्यातून ती गरोदर राहते. तिला मूल होते. आपल्या मुलाला कष्ट करून वाढवत असतानाच, या मुलीची भेट  निर्मल नावाच्या सुशिक्षित, कनवाळू तरुणाशी होते.  झालेल्या दुर्दैवी घटनेत तिची काहीही चूक नाही हे  जाणून निर्मल तिला लग्नाची मागणी घालतो. आपण जरी स्विकार केला तरी आपली कर्मठ आई याला सहजी  होकार देणार नाही हे ठाऊक असल्याने, काही काळासाठी हे मूल स्वतःपासून दूर ठेवण्याची विनंती तो राधेला करतो.
आईचे हृदय, ते बाळासाठी व्याकुळ होणारच!  एकीकडे बाळाचा विरह, दुसरीकडे निर्मलच्या आईला समजेल ही टांगती तलवार या कात्रीत सापडलेल्या राधेची समजूत काढणारे हे गीत आहे.

जब ग़म का अन्धेरा घिर आये
समझो के सवेरा दूर नहीं
हर रात का है पैगाम यही
तारे भी यही दोहराते हैं

पहाट होण्याच्या आधीचे रात्रीचे प्रहार सर्वात काळेकुट्ट असतात असे म्हणतात पण त्या अंधारातच तर लुकलुकणारे तारे आपले अस्तित्व दाखवू शकतात. जो पर्यंत हृदयाची धडधड चालू असते तोपर्यंत आशेला जागा असते. आपली स्वप्ने मुठीत घट्ट पकडून ठेवली  पाहिजेत, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे कारण जोपर्यंत डोळ्यात ती जागी  आहेत तोपर्यंत आयुष्याला संधी आहे.

२) प्यार हुआ इक़रार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल”
( सिनेमा – श्री ४२०, संगीतकार -शंकर जयकिशन, गायक -मुकेश -लता मंगेशकर, कलाकार -राज कपूर -नर्गिस)


रोमान्सची व्याख्या नक्की काय करावी ? मेणबत्तीच्या मंद प्रकाशात, संथ सुरावटीच्या साथीने केलेले जेवण, संध्याकाळी कलत्या उन्हात, अस्ताला  जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने  रंगवलेली सुखद आयुष्याची स्वप्ने, एकमेकांना दिलेली गुलाबाची फुले, चोकोलेट्स .बदलत्या काळानुसार आता रोमान्स सुद्धा आधुनिक होतो आहे.
तरीही  सगळ्यात रोमांचक आहे तो एकमेकांच्या सोबतीने केलेला प्रवास.  जर हवा असणारा हात हातात असेल तर साधा डांबरी रस्ता सुद्धा फुलांच्या पायघड्या पांघरून येतो.

गाभुळलेली रात्र, सुस्तावलेला रस्ता, ओथंबलेले ढग, एक छत्री आणि तिच्या विश्वासावर एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले ते दोघे.
हृदयात दाटून आलेले प्रेम व्यक्त करताना एक अजरामर गीत जन्माला येते. सिनेसंगीताच्या इतिहासात, चित्रीकरण, अभिनय, गीताचे शब्द, संगीत या सर्वांचा मिलाप झालेले हे रोमँटिक गीत आहे, श्री ४२० या  सिनेमातील “प्यार हुआ इक़रार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल”

अनाथालयात वाढलेला, सुशिक्षित पण नोकरीच्या शोधात, महानगरात पोचलेला, दरिद्री पण जिद्दी तरुण, राजू आणि गरिबीतही स्वाभिमान,  मूल्ये जपणारी तरुणी, विद्या यांची ही प्रेमकहाणी.
आपण कमावतो हे दाखवण्यासाठी राजू, विद्याला चहाचे आमंत्रण देतो. पावसाचे दिवस, काळेकुट्ट ढग दाटून आले आहेत पण एकमेकांत हरवलेल्या जीवांना त्याचे भान नाही. रस्त्याच्या कडेला एक चहाची टपरी आहे. चहा उकळायला सुरुवात होते आणि त्याचवेळी पाऊस हजेरी लावतो. राज छत्री उघडून विद्याला देतो पण त्याचे भिजणे पाहून विद्या तीच छत्री त्याच्या डोक्यावर धरते. आता जर भिजायचे नसेल तर एकमेकांच्या जवळ येण्यावाचून पर्याय नाही.
मग मदतीला येतो तो हा खट्याळ पाऊस. तोच हे गोठलेले शब्द वितळवून ओठावर आणतो.       

प्यार हुआ इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यों डरता है दिल
कहता है दिल, रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल

प्रेमाचा रस्ता तसा वळणावळणाचा. “राजा राणी राजी तो क्या करेगा काजी “ असे म्हणतात खरे पण हा समाज, आर्थिक परिस्थिती, रीती रिवाज रुपी काजीला धूप न घालता, प्रेमाच्या वाटेवर चालणे हे दमछाक करणारे असते. शंका-कुशंका पावलांना बांधून ठेवतात. हृदय धडधडते. हवी असलेली मंजिल मिळण्याच्या आत हा रस्ता संपणार नाही नं ही धास्ती, प्रेमाच्या धुंदीत सुद्धा पोटात गोळा आणते.  

कहो की अपनी प्रीत का
मीत ना बदलेगा कभी
तुम भी कहो इस राह का
मीत न बदलेगा कभी

मनातली साशंकता आता बोलून दाखवण्याचा मोकळेपणा दोघात आला आहे. तो माझाच असणार आहे का या प्रश्नाचे उत्तर सुद्धा एकमेकांना गवसले आहे. आकाशात हसणाऱ्या चंद्राला सुद्धा दोघांच्या गुपितात सामील करून, कधीही विलग न होण्याचे वचन एकमेकांना देताना दोघे सांगतात,

प्यार जो टूटा, साथ जो छूटा, चाँद न चमकेगा कभी
प्यार हुआ इकरार हुआ…

नर्गिसच्या चेहेऱ्यावर लज्जा, संकोच आणि प्रेमपूर्तीचे समाधान  या भावना एकापाठोपाठ तरळून जातात तर राजचा चेहेरा आनंदाने फुलून येतो. पावसात चिंब भिजलेला आसमंत या प्रेमी जिवांच्यावर आशीर्वादाची बरसात करत असतो.
राज कपूरला संगीताची उत्तम समज होती.  शंकर जयकिशन यांनी  आर के  प्रॉडक्शनच्या चित्रपटासाठी दिलेले संगीत हे लोकप्रिय तर  झालेच पण  त्याचा दर्जाही फार  वरचा होता. राज आणि शैलेंद्रच्या सुद्धा मनाच्या तारा जुळल्या होत्या. सामान्य माणसाला सुद्धा आपल्याला काय म्हणायचे आहे ते चित्रपट आणि गीत यांच्या माध्यमातून जाणता यायला हवे ही दोघांचीही तळमळ होती आणि म्हणूनच लोकांच्या हृदयाला स्पर्श करतील अशी गाणी निर्माण झाली.
सोपी, सरळ भाषा, भावांची उत्कटता या गीतात आहेच पण रोमँटिक असूनही त्यात सवंगपणा नाही.

रातें दसों दिशाओं से कहेंगी अपनी कहानियाँ,
प्रीत हमारे प्यार के दोहराएंगी जवानियाँ

प्रेम हे चिरंजीवी असते, म्हणून वैश्विक असते. प्रेमी संपतात, त्यांची जागा घेणारे दुसरे येतात. गाणी एका पिढीकडून, दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. ते शब्द, ते सूर दुसऱ्या गळ्यातून गायले जातात. प्रेमाबरोबर ही गीते ही अमर होतात.

३) कैसे दिन बीते, कैसे बीती रतियाँ, पिया जाने ना
( सिनेमा -अनुराधा, संगीतकार – रवी शंकर, गायिका -लता मंगेशकर – नायिका -लीला नायडू ) 

काही पुरुषांना स्त्रियांचे हृदय जाणता येते. त्यांच्या आशा,आकांक्षा, अपेक्षा, वेदना ज्या अनेकवेळा त्यांनाही माहित नसतात किंवा असूनही बोलून दाखवण्याचे धैर्य नसते. अशा अव्यक्त भावनांना शैलेंद्र यांनी आपल्या गीतांतून बोलके केले. आयुष्यभराची खंत केवळ मोजक्या शब्दांत एवढ्या परिणामकारक रित्या मांडणे नाहीतर कसे शक्य आहे!
अनुराधा हा  आज पंचावन्न वर्षानंतर सुद्धा खरा ठरणारा  सिनेमा आहे.  लग्नानंतर मुलगी जेव्हा कुणाची तरी पत्नी होते तेव्हा तिचे आडनावच  बदलत नाही तर तिची ओळख पुसली जाते. संसार रथाची दोन चाके जरी म्हंटले तरी नवऱ्याचे चाक फिरते राहण्यासाठी अनेकवेळा तिला तिची गती थांबवावी लागते.
एक यशस्वी गायिका असलेली सुंदर अनुराधा कीर्तीच्या शिखरावर असतानाच निर्मलच्या , एका सेवाभावी डॉक्टरच्या प्रेमात पडते आणि आपल्या करियरला तिलांजली देऊन एका गावात त्याच्याबरोबर संसार थाटते. 
अशा अनेकजणी असतात ज्या लग्नाआधी अनेक काही करतात, खूप काही करण्याची कर्तबगारीही  असते आणि संसारात पडल्यावर स्वतःचे सगळे बाजूला ठेवून पतीच्या यशात समाधान मानतात. प्रेम का करिअर हा प्रश्न पुरुषांना पडत नाही. असे नाही की दोन्हीना न्याय देणे त्यांना जमते पण स्त्रीला हा पर्याय नसतो. अनेकवेळा पतीच्या  प्रेमापायी , संसाराविषयी असलेल्या कर्तव्यापायी ती हा पर्याय स्वतःच नाकारते आणि जेव्हा हातातून सगळेच निसटते तेव्हा हळहळ करूनही काही पदरात पडत नाही.

नेहा लगा के मैं पछताई
सारी सारी रैना, निंदिया ना आई
जान के देखो, मेरे जी की बतियाँ
पिया जाने ना

अनुराधाचे तेच होते. नवरा त्याच्या पेशंट मध्ये व्यस्त. बायकोच्या निस्तेज डोळ्यातील सुकलेली स्वप्ने त्याला दिसत नाहीत. तिच्या त्यागाची सोडाच , तिच्या अस्तित्वालासुद्धा त्याने गृहीत धरलेले आहे. दहा वर्षानंतर, उत्साहाने रसरसलेल्या एका कलाकार स्त्रीचे रूपांतर एका एकाकी पडलेल्या, शब्द आणि सूर हरवलेल्या गृहिणीत होते.
शैलेंद्र लिहितात, 

रुत मतवाली आ के चली जाए
मन में ही मेरे मन की रही जाए
खिलने को तरसे, नन्ही नन्ही कलियाँ
पिया जाने ना…

केवढे वसंत आले नी गेले पण आता मात्र आयुष्यात शिशिर वस्तीला आला आहे. जो माणूस तिच्या संगीताने वेडावला होता, जो तिच्या साड्यांची निवड करत होता, ज्याच्या नजरेत फक्त तिच्याबद्दल प्रेम होते , आज त्याला त्याच्या कामापुढे बाकी सगळे शून्य आहे.
माणसे आतून मरत जातात ते सुद्धा कुणाला समजत नाही ..
पिया जाने ना …
लता चा स्वर आणि शब्द त्यातील निर्रथकता दाखवतात.

४)अब के बरस भेज
(सिनेमा -बंदिनी, संगीतकार -एस डी बर्मन – गायिका –आशा  भोसले , नायिका –)

एका स्त्रीचा खून केल्यामुळे नायिकेला शिक्षा झाली आहे. परीस्थितीच्या चटक्यांनी नायिका आपले शब्द कधीची हरवून बसली आहे. जगण्यासाठी काही उरलेच नाही तर बोलायचेच कशाला. हे गीत त्यामुळे कल्याणीच्या (नूतन) तोंडी दिलेले नाही. शक्यही नाही. तिचे माहेर सुद्धा  शिल्लक नाही. ना भावना , ना आशा. आठवणींच्या सावल्यानी वर्तमानकाळ अजूनच काळवंडून आला आहे. भविष्याची किरणे ही त्या अंधाऱ्या कोठडीत येण्याची शक्यता नाही. हे दुःख सुद्धा जाणवत नाही याच्या पलीकडे गेलेला कल्याणीच्या चेहेरा.
तिच्यासारखीच बंदिवान स्त्री दळण दळते आहे. जात्यावर बसले की ओव्या येतातच. दुःखाची तीव्रता सुरांनी कमी होत असावी म्हणून त्या आसुसून गायल्या जातात.

अब के बरस भेज भैया को बाबुल
सावन ने लीजो बुलाय रे
लौटेंगी जब मेरे बचपन की सखियाँ
दीजो संदेसा भिजाय रे

ह्या स्त्रियांना भविष्यकाळ नाही, त्यांची चौकशी करणारे कुणी नाही, सुटल्या तरी घर असेलच असे नाही तरीही जिथे जन्म घेतला  त्या घराचा विसर पडत नाही आणि आशाही सुटत नाही. फिरणारे जाते जणू स्त्री जन्माचे प्रतीकच .
यंत्रवत जाते फिरवताना त्या स्त्रीला आपले गाव आठवते.

अम्बुवा तले फिर से झूले पड़ेंगे
रिमझिम पड़ेंगी फुहारें
लौटेंगी फिर तेरे आँगन में बाबुल
सावन की ठण्डी बहारें
छलके नयन मोरा, कसके रे जियरा
बचपन की जब याद आए रे
अब के बरस भेज…

आलेला श्रावण, आंब्याच्या झाडावर बांधलेले झोपाळे, त्यावर मैत्रिणींच्या बरोबर गायलेली गाणी, पावसाच्या सरी आणि बहरलेला निसर्ग
आयुष्याच्या वणव्यात सुद्धा त्याची आठवण मात्र जिवंत आहे ..त्यांच्या अंधारलेल्या  आयुष्यात या आठवणीच आशेचा किरण आहे.
,
५) ना मैं धन चाहूँ ना रतन चाहूँ
( सिनेमा- काला बाझार , संगीतकार — , गायिका -गीता दत्त , सुद्धा मल्होत्रा , नायिका -नंदा , लीला चिटणीस)

नेहेमीच सज्जन नायक या सिनेमात नाही. या पात्राला ग्रे शेड्स आहेत. नोकरी नसलेला रघुवीर (देव आनंद) कुटूंबाचा खर्च चालवण्यासाठी सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या टोळीत सामील होतो.सहज पैसे मिळू लागले की बुद्धी फिरते. पैशाची हाव संपत नाही. एका साध्या  सुध्या घरात एकदा वाढलेल्या रघुवीरला श्रीमंतीची स्वप्ने पडू लागतात. आपण पापाच्या राशीत बुडत जातो आहे ह्याचेही भान राहत नाही. एके दिवशी जमवलेली लूट घरात आणताना त्याच्या कानावर भजनाचे सूर पडतात.
त्याची आई आणि बहीण गात असतात. सोबतीला असते ती एकतारी, ढोलक आणि एस डी बर्मन यांची ट्रेड मार्क बासुरी.

ना मैं धन चाहूँ ना रतन चाहूँ
तेरे चरणों की धुल मिल जाए
तो मैं तर जाऊँ शाम तर जाऊ
हे राम तर जाऊ

रघुवीरच्या हातातून त्याने आणलेली लूट सांडते. जसे काही ही पहिली धोक्याची सूचनाच मिळते.
हे भजन ऐकले की शैलेंद्र किती उच्च दर्जाचे कवी आणि माणूस  असतील याची कल्पना येते. भजनात देवाची स्तुती असते. तो किती मोठा आहे, पराक्रमी आहे, शक्तिशाली आहे याचे गोडवे गायलेले असतात. आपल्या दुःखाचे रडगाणे असते, ते दूर करण्याची विनंती असते , किंवा काही मिळण्याची अभिलाषा असते.
ह्या भजनात, आपल्याला मोह पडेल याची भीती आहे. मोहापासून दूर ठेव ही विनंती आहे. स्वतः मधील कमतरतेची जाणीव आहे . ही कमतरता कसली तर चारित्र्याची .

मोह मन मोहे लोभ ललचाये
कैसे कैसे ये नाग लहराये
इससे पहले की मन उधर जाए
मैं तो मर जाऊं यु तो मर जाऊ
ना मैं धन चाहूँ ना रतन चाहूँ

रघुवीरने आणलेली माळ एका लाकडाच्या फळीला अडकून हलत असते. त्याचे मन सुद्धा पाप आणि पुण्याच्या उंबरठ्यावर हिंदकळत असते. मोहात अडकणे म्हणजे विषाचा दंश होणे. त्याच्या वेदनेत आयुष्य जाण्यापेक्षा मृत्यू स्विकारणे योग्य.
नंदा आणि लीला चिटणीस यांच्या चेहेऱ्यावर एक तृप्ती आहे. देव मात्र अस्वस्थ आहे.
त्याला मार्ग दाखवताना पुढचे शब्द येतात ,

लाए क्या थे, जो ले के जाना है
नेक दिल ही तेरा ख़ज़ाना है
साँझ होते ही पंछी आ जाए
अब तो घर जाऊँ, अपने घर जाऊँ
तेरे चरणों की धूल…

हे गाणे आपल्याला आठवण करून देते , की या जगात येताना आपण काहीही आणलेले नाही आणि जाताना सुद्धा आपण काहीही घेऊन जाणार नाही . गीतेचे तत्वज्ञान सोपे करून देताना शैलेंद्र सांगतात, संध्याकाळ झाली की पक्षी आपल्या घरी परततात. आपल्या वाईट कर्माची जाणीव झाल्यावर त्या मार्गावर परत जाऊ नये.
आयुष्य नदीसारखे प्रवाही असावे. नाहीतर त्याचे डबके होते.
गाण्याचे दिग्दर्शन कसे करावे ह्याचे सुद्धा हे उत्तम उदाहरण आहे. विजय आनंद ची सर्वच गाणी फार सुंदर चित्रित झाली आहेत.

६) रात के हम सफर, थक के घर को चले 
( सिनेमा – An evening in Paris, संगीतकार- एस डी बर्मन, गायक -मोहम्मद रफी, आशा भोसले, कलाकार -शम्मी -शर्मिला) 

अर्नेस्ट हेमिंग्वेने म्हंटले आहे, जर तुमचे तारुण्य पॅरिस या शहरात गेले असेल, तर पुढील आयुष्यात तुम्ही कुठेही जा, हे शहर तुमची सोबत करते.
जगातील सर्वात सुंदर शहर, निर्मनुष्य रस्ते, त्या एकांताचा भंग न करणारी, हलक्या पावलांनी येणारी रात्र आणि त्यात एकमेकांची ओळख नव्याने करून घेणारे दोन जीव.
क्या वादे हुए , किस ने खाई कसम 
इस नई राह पर , हम ने रखे कदम
छूप सका प्यार कब , हम छूपाये तो क्या ? 
सब समझ पा रही है , ये सुबह प्यार की

या अनोख्या वाटेवरचे हे पहिले पाऊल , आज तरी शपथा आणि वचनांना जागा नाही.  प्रेमाला जाणून घेण्यासाठी तर आलेलो आहोत मग लपवायची तरी काय गरज ? आणि शब्द ओठातून आले नाही तरीही प्रेम लपले जाऊ शकते का ?  रात्रीच्या गर्भातून जन्म घेणारी उद्याची पहाट या दोन जीवांना एकत्र आणणार आहे.

शंकर जयकिशन यांचे संगीत आणि आशाताई आणि रफीजींचा आवाज असलेले हे गीत
अतिशय मधुर आहे. याचे चित्रीकरण सुद्धा देखणे.
रात्रीच्या अंधारात, ताऱ्यांच्या प्रकाशात, हातात हात घालून फिरणारे दोन प्रेमी. रात्र अशी भुरळ पाडते.

जीवनाच्या व्याख्या रचणारी असंख्य गाणी आहेत.. कुणाच्या वाट्याला नियती जे काही देते त्यावरून तो आयुष्याचा अंदाज लावतो. ते कसे जाईल हे भल्या भल्याना सांगता येत नाही. जगावे लागणारे आयुष्य संपते हेच फक्त  निश्चित असते.
जन्मल्यापासून संपेपर्यंत माणूस जे जगतो, त्यातून जे शिकतो,  ते सुद्धा पणाला लागावे अशा अनेक गोष्टी घडतात.
आणि जगण्यावरचाच विश्वास उडतो.

७) ज़िन्दगी ख्वाब है
(सिनेमा -जागते रहो, संगीतकार -सलील चौधरी, गायक -मुकेश , कलाकार – मोतीलाल)

ज़िन्दगी ख्वाब है
ख्वाब में झूठ क्या
और भला सच है क्या
सब सच है

राजकपूरचा सिनेमा असून आणि मुकेश ने हे गीत गायले असूनही, हे  गीत मोतीलालच्या तोंडी आहे.
एक दारुडा माणूस, मौजमजा करून घरी परतत आहे. अंगात दारू एवढी भिनली आहे की गाण्यात सुद्धा दारूचे महत्व आहे.
जगणेच एक भ्रम आहे , स्वप्न आहे ही थीम अनेक कवीच्या कवितेत आली आहे.
ते खरे आहे का माया आहे , ते सत्य आहे का असत्य आहे , आपण खरंच जिवंत आहोत का फक्त जगतो आहोत ..
तसेही कुणाला ह्याचे सोयर सुतक आहे!
गाण्याचे किती पैलू आहेत बघा. गाणे एका भोगी माणसाने गायले  आहे. गाण्याचा मूड उत्साही आहे. तरीही गाणे उपहासात्मक आहे आणि तत्वज्ञानात्मक सुद्धा आहे. हसत हसत, चिमटा काढत, सत्याची जाणीव करून देणारे हे गीत आहे.
सुरुवातीला कबीराच्या दोह्याचा उपयोग केला आहे.

रंगी को नारंगी कहें
बने दूध को खोया
चलती को गाड़ी कहें
देख कबीर रोया 

माणसांच्या बोलण्यात आणि कृतीत अनेकवेळा ताळमेळ नसतो. अनेकवेळा ते उथळ बोलतात, दिखाऊ वागतात.
द्रव्य दुधापासून घनरूपात खवा बनवल्यावर त्याला खोया म्हणतात (खोया -lost) , संत्र्याचा रंग सुंदर केशरी असूनही त्याला ना -रंगी (colourless)म्हणतात,  जे चालते त्याला गाडी म्हणतात (गाडी–गाडलेले )
ह्याच दोह्यांचा आधार घेऊन शैलेंद्र म्हणतात , नवल नाही जे दिसते तसे नसते . जगणेच स्वप्नवत असेल तर काय खरे आणि काय खोटे !
जे दिसते तेच सत्य मानणे हातात असते.
जागते राहो ही एका रात्रीची गोष्ट आहे.  जगाला तत्वाच्या गोष्टी शिकवणारे, रात्रीच्या अंधारात मात्र जे करायचे नाही ते करून जातात. जागते रहो ही  आपल्या सद्विवेकबुद्धीला आणि सामाजिक जाणिवेला दिलेली हाक आहे.

एक प्याली भर के मैंने
गम के मारे दिल को दी
ज़हर ने मारा ज़हर को
मुर्दे में फिर जान आ गयी
ज़िन्दगी ख्वाब है

इथेही जगण्यातला विरोधाभास आहे. आयुष्यात एवढे दुःख आहे की ते विसरायला हा एकच पेला घेणे आवश्यक आहे. दारू विष आहे मान्यच पण हृदयातल्या विषाला मारणे फक्त दुसऱ्या विषालाच शक्य आहे. त्यामुळे हे विष जरी असले तरी जगण्याच्या शर्यतीत खचलेल्या लोकांना जिवंत करणारे हे अमृत आहे.
अर्थात हे गाणे दारूच्या पल्याड आहे.
जगणे क्षणभंगुर आहे तर प्रत्येक क्षण जगून घ्या. आयुष्य जे दान देते ते आनंदाने स्विकारा. ते कसेही असो, त्याला अंत आहे हे सुद्धा इथे कवी  सांगून जातो.

शैलेंद्र काही मूठभर, निवडक लोकांसाठी लिहिणारे कवी नव्हते. आपण कवी आहोत या पेक्षा आपण सामान्य माणूस आहोत याची जाणीव कवीने ठेवावी असे ते म्हणत. जर तसे केलं नाही तर त्याला सामान्य माणसांची दुःखे समजणार नाहीत आणि त्यांच्या भावना सुद्धा त्याला व्यक्त करता येणार नाहीत असे त्यांना वाटे. म्हणून असेल, त्यांची गीतरचना रेखीव पण साधी, सहज होती. त्यांचे लिहिणे हृदयातून येई. संगीताची जाण असल्याने आधी केलेल्या चालींना न्याय देणारे शब्द ते लिहू शकले. त्यांच्या गीतांनी सामान्य जनतेच्या मनातील भावनांना शब्दरूप दिले. त्यांना मिळालेल्या यशाचे हे प्रमुख कारण आहे. 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

14 thoughts on “जनतेचा कवी –शैलेंद्र ”

  1. अहाहा नितांतसुंदर लेख!! खरोखरच जनतेचा कवी.
    अम्बुवा तले फिर से झूले पड़ेंगे
    रिमझिम पड़ेंगी फुहारें
    लौटेंगी फिर तेरे आँगन में बाबुल
    सावन की ठण्डी बहारें
    छलके नयन मोरा, कसके रे जियरा
    बचपन की जब याद आए रे
    अब के बरस भेज…या ओळी म्हणजे स्त्रीमनाचा किती सुंदर भावाविष्कार! एका पुरुषाने लिहावे हे किती मनोज्ञ!
    फार फार सुंदर झालाय लेख!! 👌👌❤

    1. खरच खुप सुंदर आणी कधीच न ऐकलेली माहिती.
      अशा अजून गीत कारंच्या माहिती वाचायला आवडेल 🙏

    2. प्रिया
      खरी जवहिर आहेस तू..इतक्या गाण्यातून जी गाणी तू निवडली ती प्रत्येक गाणे वेगळे आहे भाव वेगळे सांगते..
      फार सुंदर..
      खूप अभ्यास आहे तुझा ह्या मागे

    3. Thank you Kamini .
      सुरेश भट यांना हे जमायचे …
      फार कमी पुरुष एवढे संवेदनशील असतात आणि परकाया प्रवेश त्यांना जमतो

  2. गीतकार शैलेन्द्र च्या गीतांनी काळजावर कब्जा कधी केला आहे लक्षात आलेच नाही जेव्हा लक्षात आले तेव्हा समजले आपले आप्पा सुद्धा त्याच्या प्रेमात आहेत त्यानंतर माझा मुलगा सारंग ला त्याची भुरळ पडली व त्यानंतर त्याचा मुलगा माझा नातू सृजन हा कधी हुरळून गेला हे कळलेच नाही ..आमच्या चारही पिढ्या शैलेंद्रने जणू काही त्याच्या शब्दांच्या कोशात गुरफटून ठेवल्या आहेत . शैलेंद्र हा काळजात आहे साहिर हा डोक्यात आहे
    . प्रियाचे लिखाण नेहमीच माझ्या मनावर गारुड घालत आले आहे .खूप छान लिहिते .गाण्यावरील तिचे पुस्तक माझ्यासंग्रही आहे तो जणू काय गाणी आपला जीवन प्रवासाच असतो
    . अशीच लिहीती रहा व छान छान लेख वाचायला मिळोत हीच प्रिया साठी सदिच्छा 🌹❤🌹

    1. Thank you Suresh.
      खरे आहे तुमचे , त्यांचे शब्द एवढे मृदू आणि सच्चे आहेत , तसाच तो माणूस सुद्धा .
      म्हणून भावला
      शैलेंद्र हा काळजात आहे साहिर हा डोक्यात आहे..काय सुंदर वाक्य आहे …अगदी परफेक्ट विश्लेषण.

  3. खरच खुप सुंदर आणी कधीच न ऐकलेली माहिती.
    अशा अजून गीत कारंच्या माहिती वाचायला आवडेल 🙏

  4. वाह! स्वत:ची गळाभेट करून देणारी गाणी!
    ‘खुद दिल से दिल.की बात कही और रो लिये’ चा अनुभव देणारी…

    1. Thank you Hemant.
      खरंच स्वतःचे प्रतिबिंब बघता येईल अशी
      त्याची गाणी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *