Skip to content

चांदनी रात में एक बार तुझे देखा है

काल खूप दिवसांनी समुद्रावर फेरी मारली. नारळी बाग नेहेमीप्रमाणे तुडुंब भरलेली होती. मधल्या रस्त्याच्या कडेला मोठाले दिवे आहेत.  बाकड्यांवर बसलेल्या लोकांच्या चेहेऱ्यावर त्याचा प्रकाश पडला होता. चेहेरा लपवण्याची ज्यांची गरज होती ते अंधाराच्या दिशेने तोंड करून बसले होते. मांजर कशी डोळे मिटून दूध पिते तसेच मनाचे समाधान करून घेत असावे.
बाजूच्या गर्दीचे त्यांना भान नव्हते असे नाही; पर्वा नव्हती. आता अवघडल्यासारखे नाही होत. डोळ्यांनाही सवय झाली आहे पण ओरबाडून घेणाऱ्या या पिढीला निसटत्या स्पर्शाचे सुख कधीच कळणार नाही याची खंत मात्र वाटते.

हातात हात सुद्धा न घेता, संध्याकाळच्या सोनेरी रंगात न्हात, सरकत्या वाळूत कधी चालला आहात? 
हळूहळू तळपणारा सूर्य शांत होत, पश्चिमेकडे कलतो आणि पुढल्या सानिध्याच्या केवळ कल्पनेनेच मावळती लाजून लालभडक होते.

चांदनी रात में एक बार तुझे देखा है
______________________
ख़ुद पे इतराते हुए, ख़ुद से शर्माते हुए
चांदनी रात में एक बार तुझे देखा है

पंचवीस एक वर्षाची असताना एका काव्य संमेलनात साहिर आणि अमृताची ओळख झाली. अमृता याबद्दल लिहिते,
” माहित नाही, काळजाला हात घालणारे त्याचे शब्द होते की नजर पण मी बंदी झाली खरी “
एखाद्या आगंतुक  चुकार क्षणालाच प्रेमाचा साक्षात्कार  होत असावा.  
हा कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत चालला. पावसाची रिपरिप रात्रभर होती. सकाळी बस स्टॅन्ड कडे जायचा रस्ता ओलाचिंब आणि निसरडा . सावधगिरीने त्याच्या पावलामागे पावले टाकताना कधीतरी प्रेमाचे हे बीज रोवले गेले. 

नीले अम्बर पे कहीँ झूले में
सात रँगों के हसीन झूले में
नाज़-ओ-अंदाज़ से लहराते हुए
ख़ुद पे इतराते हुए, ख़ुद से शर्माते हुए
चांदनी रात में इक बार तुझे देखा है …
दिवसाच्या रखरखीत प्रकाशात न दिसलेल्या अनेक गोष्टी रात्री जाणवतात. बाजूचे जग अंधारात बुडून जाते आणि जे पाहायचे आहे त्यावर नजर स्थिरावते.स्पर्शाची संवेदना तीक्ष्ण होते. दिवसा जगाचे बोचरे पहारे असतात, रात्री त्यांची कवाडे बंद झाल्याने असेल, मनाचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. ही वेळच भारलेली, तेव्हा काहीही जमू शकते. Anything seems possible at night when the whole world has gone to sleep. हो, अगदी प्रेमाचा स्विकार सुद्धा.

तूने चहरे पे झुकाया चहरा
मैंने हाथों से छुपाया चहरा
लाज से शर्म से घबराते हुए
फूल बरसाते हुए, प्यार छलकाते हुए
चांदनी रात में इक बार तुझे देखा है …

आभाळ आता अजून गढद होते. प्रेमिकांवर अंधाराचे पांघरुण टाकून त्यांना निर्धास्त करते. ही अशी वेळ असते की जिथे स्वप्न आणि सत्य एकमेकांना मिठीत घेतात आणि सारे शरीरच फुलत्या कळ्यांचा सुगंध लेवून मोहरते. नात्यात सहजपण आणणे कठीण आहे पण तो खरे तर नात्याचा पाया आहे. मन जुळले असेल तर विरहाच्या शांततेत सुद्धा ते झंकारून उठते. अनेक वेळा अनुभव येतो न, कितीही अंतर पडूदे ; किती ही काळ लांबू दे, जेव्हा साद घातली जाते तेव्हा कुठेही न अडखळता प्रतिसाद मिळतो. थांबलेल्या क्षणापासून बोलणे सुरू होते.. त्याच लयीत…..

जागती थी लेके साहिल पे कहीं
लेके हाथों में कोई साज़-ए-हसीं
एक रँगीं ग़ज़ल गाते हुए
फूल बरसाते हुए, प्यार छलकाते हुए
एक बार तुझे देखा है …

“स्मशानात जळणाऱ्या चितेला अंगार म्हणणे हा त्या शब्दाचाच अपमान आहे. अंगाराची तीव्रता जाणून घ्यायची असेल तर सोहनी, हीर, ज्युलिएट च्या हृदयात डोकावून पहावे “
अमृता प्रीतमने हे कोणत्यातरी हळव्या क्षणी लिहिले असावे.
त्यांची पहिली भेट मुशायरा मध्ये झाली. लोकांमध्ये असताना कधीतरी झालेली नजरबंदी आणि अमृताने साहिर ला आपल्या हृदयात बंद केले. ती पूर्ण रात्र ते एकत्र होते. आजूबाजूला सगळे असताना , साहिर शिवाय कुणीही न दिसणे ही त्या रात्रीची भूल असावी.

अब सुबह न आ पाये, आओ ये दुआ माँगें
इस रात के हर पल से, रातें ही उभर जाये 

सिमटी हुई ये घड़ियाँ
_______________
त्याच्या पाठून चालत असताना तिच्या लक्षात आले, त्याच्या सावलीने तिला वेधून टाकलंय. त्याच्या पुढचे आयुष्य, साहिरच्या प्रेमाच्या सावलीत हरवेल हे कदाचित तिच्या लक्षात आले नसावे. या भेटीनंतर मुशाहिरांच्या निमित्ताने भेटी झाल्या. सुरुवातीच्या ओळखीचे रूपांतर, आदरात, मग गाढ स्नेहात झाले. विलक्षण अबोल नाते होते ते.शब्दांच्या जादूगारांना, एकमेकांच्या सानिध्यात शब्दांचीच उणीव भासावी हा कुठला योग!
अमृता विवाहित होती. तेव्हाच्या जगाचा विचार केला तर साहिरसाठी अस्पर्श. कदाचित शब्दानी संयमाची भिंत तुटेल ही भीती दोघांच्याही मनात असावी.
आपल्या आत्मचरित्रात अमृताने लिहिले आहे,
“लाहोर मध्ये असताना साहिर मला भेटायला यायचा. खोलीच्या दोन कोपऱ्यात बसलेले आम्ही दोन प्रेमी . आमच्यातले हे अंतर शांततेने भरून जायचे आणि खोली त्याच्या अर्धवट जळलेल्या सिगारेटच्या गंधानी . अर्धवट जळलेली ती थोटके मी जपून ठेवायचे . कोणी नसताना , त्याची आठवण आली की मी ती पेटवायची . त्या सिगारेटचा स्पर्श मला त्याच्या हाताची आठवण करून द्यायचा”
या मुलाखतीविषयी ती म्हणते,
अनेक काळानंतर अचानक भेटलेले ते दोघे . खूप बोलायचे तर आहे पण शब्दच सापडत नाहीत … एक विचित्र घुसमट . पूर्ण रात्र त्या अबोल शांततेत ताणली गेलेली.
कविता जन्माला येत होती पण दोन वेगळ्या ठिकाणी ..This romance was very fierce , intense … potent …
दोन्ही बाजूने जळणारी ज्योत शेवटी सगळंच जाळून टाकते तसा रोमान्स.

सिमटी हुई ये घडियाँ फिरसे ना बिखर जाये
इस रात में जी ले हम , इस रात में मर जाये

तिच्या कवितेत तो ठायीठायी होता. साहिरना ते माहित होते.  पण त्या नात्याला नाव नव्हते  आणि शाश्वताचा वरही नव्हता.
ते दडपण त्यांना  एकत्र येऊ देत नव्हते. एकमेकांपासून शरीराने लांब पण कवितेने बांधली गेलेली ती दोघे , या अशा संपूच नये असे वाटणाऱ्या रात्रीत पूर्ण आयुष्य जगून गेली .

अब सुबह ना आ पाये ,आओ ये दुवा माँगे
इस रात के हर पल से , राते ही उभर जाये

या नात्याचा शेवट जाणून होते ते दोघे. एकाच दिशेने जायचे  आहे हे ठरवल्यानंतरही पावले मात्र दोन दिशांना वळली जाणे  ही सर्वात मोठी शिक्षा आहे.  

दुनिया की निगाहें अब हम तक न पहुँच पायेँ
तारों में बसें चलकर धरती पे उतर जायेँ ।

दिवसाच्या प्रकाशात भान येते . भावनांच्या उद्रेकाला मर्यादा येतात. लोकांच्या नजरेला जीभा फुटतात. त्यापेक्षा या रात्रीतून दुसऱ्या रात्रीचाच उदय झाला तर! रात्रीच्या  उदयातून केवळ रात्रच उदयाला येऊदे  हे मागणे म्हणजे सुद्धा न पुरी होणारी स्वप्ने पाहत तीळ तीळ मरणे. 

हालात के तीरों से छलनी हैं बदन अपने
पास आओ के सीनों के कुछ जख्म तो भर जाये

अमृताचे सांसारिक आयुष्य तुटायला आले होते. साहिरचे बालपणच अनिश्चितेने भरलेले . व्यसनी , बाहेरख्याली वडिलांपासून दूर ठेवण्यासाठी आईने बऱ्याच खस्ता झेलल्या होत्या . त्याचाही परिणाम त्याच्या आयुष्यावर झालेला . दोन माणसे एकटेपणाच्या तीव्रतेमूळे एकमेकांकडे खेचली गेलेली . जो भोगतो त्याला त्याची धग जाणवते . दुसर्यांना कदाचित कल्पना सुद्धा येत नाही.

आगे भी अंधेरा है , पीछे भी अंधेरा है
अपनी हैं वहीं साँसे , जो साथ गुजर जाये

त्या रात्रीतील एकत्र घालवलेले उत्कट क्षण त्यांनी जगलेले श्वास असतील. सगळेच श्वास फक्त जगवत नाहीत काही जगण्याचे निमित्त बनतात. दोन वेगळ्या धर्माची, बंधनात जखडलेली माणसे एकत्र येणे नियतीला मंजूर नसतेच. शब्दातून, काव्यातून, कथांमधून त्यांचे मिलन झाले. जिथे संवाद सुद्धा शब्दाविण होत होता तिथे स्पर्शाला कुठे प्रवेश असणार!

बिछड़ी हुई रूहों का ये मेल सुहाना है
इस मेल का कुछ अहसास जिस्मों पे भी कर जायेँ

शब्द आणि सूर यात सरस कोण यात मतभेद आहेच . पण इथे खय्यामजींच्या संगीताने बाजी मारली आहे. अखंड, पाझरते , समंजस सूर. साहिर अमृता यांच्या प्रेमासारखेच .

माझी अमृता प्रीतमची ओळख झाली “पिंजर ” पाहिल्यावर .फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा सिनेमा .पण सूडकथा नाही..पंजाबीत पिंजर म्हणजे सापळा ..इथे पिंजर म्हणजे पिंजरा .
बदला घेण्यासाठी नायिकेचे एका मुसलमानाकडून अपहरण केले जाते . ती त्याच्या तावडीतून सुटून आपल्या घरी जाते खरी, पण तिला तिच्याच घराची दारे बंद  होतात . कसलाही मार्ग न राहिल्याने ती स्वतःच्या पावलांनी आपल्या अपहरणकर्त्याकडे परत जाते , मनाविरुद्ध संसार करते. जगण्यात कसलाही राम नसताना प्रियकराची आठवण तिची साथ करते .
मनात कुठेतरी संतापाची धग तिला पोळत असतेच. जो आपल्यावर प्रसंग आला तोच आपल्या वहीनीवर आलेला  पाहून कळवळते ,  स्वतःचा जीव धोक्यात घालून तिची मदत करते.  या कार्यात तिला साथ करतो तो तिचा नवरा . तिच्यावर त्याने केलेला अन्याय त्यालाही बोचत असतोच  पण काळाची चाके परत तर फिरवता येत नाहीत !
फाळणीच्या काळात पळवलेल्या मुलींची सुटका करायला सैन्य पथक येते, तेव्हा  मात्र  तिच्या प्रियकराबरोबर परत जायला तो अडवत नाही . त्याचे प्रेम बसले असते तिच्यावर पण तिचे सुख कशात आहे हे जाणून असतो तो .तिला सोडून एका झाडाखाली टेकलेला तो ! आयुष्यात आता काहीच घडणार नाही याची जाणीव आहे त्याला . तरीही  प्रियकर न्यायला आलेला असतानाही, प्रेम असतानाही नायिका आपले अपहरण करणाऱ्या माणसाबरोबर जायचे ठरवते. .आपली गाठ त्याच्या आयुष्याशी जोडते…
त्या माणसाचे प्रेमच एवढे अफाट असते .की त्याला तिचा त्यागही तिच्या सुखासाठी मंजूर होतो. हे त्याचे जगावेगळे प्रेमच तिचा पिंजरा बनते.

हा सिनेमा बघताना अमृता आणि इमरोज यांच्या आयुष्याचे चित्र यात कुठेतरी जाणवले  .चाळीस वर्षाच्या,  लग्न झालेल्या , मुले असलेल्या अमृताच्या प्रेमात इमरोज पडला आणि स्वतःचा राहिलाच नाही .त्याच्याच शब्दात सांगायचे झाले तर
“I was seven years younger and met Amrita in connection with illustrating a book cover. We liked each other instantly, and became lovers,”..
आणि प्रेम थोडेच rational असते? एक स्वप्न उभे केले त्यांनी आपल्या दोघात आणि ते स्वप्न दोघेही जगले. थोडी थोडकी नाही, तर तब्बल ४० वर्षे ..
तेही लौकिक लग्न बंधन नसताना.
ही एक जगावेगळी प्रेमकहाणी आहे.अमृताच्या आयुष्यात साहिरजींचे स्थान अबाधित होते. त्यांच्या मृत्यूनंतर  तिने लिहिले
“There was a grief I smoked
in silence, like a cigarette
only a few poems fell,out of the ash I flicked from it.
आणि हे इमरोज ने अगदी मनापासून स्विकारले. 
यांच्याच शब्दात सांगायचे तर —-
” A very creative woman was  drawn towards another very talented man “

नऊशे मैलांचे अंतर असलेल्या दोन शहरात राहणारी, साहिर – अमृता. काव्यगायनाला एकत्र येत नंतर आपापल्या दिशेने जात. स्वतःच्या कामात साहिर गुंतून जाई .अमृताकडे रहात  त्या फक्त त्याच्या आठवणी पण आयुष्य म्हणजे फक्त कविता नसते. कोणत्याही  एका स्त्री बरोबर बांधिलकी ठेवणे हे साहिरला जमले नाही हे खरंच .
A distance of nine hundred miles can be bridged
here may have been other distances that weren’t bridged
with times , her poems got her fame
And his songs earned him a reputation
But both couldn’t reach each other
had they done so , their lives
would have resembled a beautiful poem.

ती परत साहिर कडे गेली असती तर असे जेव्हा त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, ” मी अडवले नसते. ते तिचे सुख होते” 
इमरोज ने अमृताला साहिरसकट स्विकारले.

तुम अपना रंज-ओ-ग़म अपनी परेशानी मुझे दे दो
———————————————–
तुम्हें ग़म की क़सम इस दिल की वीरानी मुझे दे दो
तुम अपना रंज-ओ-ग़म अपनी परेशानी मुझे दे दो
तुझी सर्व दुःखे , कटूता, तुझ्या अडचणी माझ्यावर सोपवून तू निर्धास्त हो . तुझ्या दुःखाची मला कल्पना आहे.
त्याचीच  शपथ आहे तुला; तुझा एकटेपणा दूर करण्याची मला संधी तरी दे.
इमरोजच्या आयुष्यात अमृता आली  तेव्हा ती नवऱ्यापासून विभक्त झाली होती. आकाशवाणीत  काम करत होती. तिला पोचवण्याची जबाबदारी इमरोजने स्वतःच्या खांद्यावर घेतली. स्कुटरवर इमरोजबरोबर बसूंन जाताना त्याच्या पाठीवर ती अक्षरे गिरवायची .
बऱ्याच काळाने इमरोजच्या लक्षात आले की त्या अक्षरांवर साहिरचे नाव होते.
या शब्दांचे ओझे त्यांनी कसे पेलले असेल ह्याचा विचार करणे सुद्धा कठीण.
याबाबत जेव्हा त्यांना विचारले , तुम्हाला याचा त्रास नाही झाला?
He said, ‘Sahir was hers and my back too. Why would I have any objection?’”

ये माना मैं किसी क़ाबिल नहीं हूं इन निगाहों में
बुरा क्या है अगर ये दुख ये हैरानी मुझे दे दो.

साहिर तोपर्यंत नामवंत शायर होता आणि अमृताचे नाव सुद्धा आदराने घेतले जाऊ लागले . इमरोजच्या सुरुवातीचा हा काळ. कलाकार म्हणून तो नुकता उदयाला येत होता. 
प्यासा सिनेमाची पोस्टर्स करण्याची जबाबदारी इमरोजवर होती . या सिनेमाच्या प्रिमिअरची दोन तिकिटे जेव्हा इमरोजला मिळाली तेव्हा त्याने अमृताला त्याच्याबरोबर येण्यासाठी विचारले पण तिने आधीच साहिरबरोबर जायचे कबूल केले होते .
अमृताला लिहिलेल्या आणि न पाठवलेल्या पत्रात पत्रात इमरोजने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“तिच्यावरील माझे प्रेम बरेच काही माझ्यापासून हिरावून घेईल याची मला कल्पनाही नव्हती. माझे अस्तित्व, माझे पौरुषत्व,  मनाची शांतता, माझी जीवनाबद्दलची आसक्ती … सगळे सगळे मी गमावले; पण मी धीर सोडणार नाही. गप्प सुद्धा राहणार नाही. माझ्या  धीराची ही कसोटी आहे. ती माझ्या कल्पनेची परिसीमा आहे पण मी तिला जिंकेन, प्रेमाने जिंकेन.

मैं देखूं तो सही ये दुनिया तुम्हें कैसे सताती है
कोई दिन के लिये अपनी निगहबानी मुझे दे दो

माझ्यावर विश्वास ठेव . या जगाने  तुझ्यावर केलेला अन्याय तुझ्यापर्यंत पोचूच देणार नाही मी .
कोणत्याही लौकिक, कायदेशीर बंधनात बांधून न घेताही केवळ प्रेमाच्या आणि विश्वासाच्या जोरावर अमृता आणि इमरोज  चाळीस वर्षे एकत्र राहिली. तिच्या शेवटच्या दिवसात बरगडी तुटल्यामुळे अमृता पलंगाला खिळून होती . या काळात तिचा सोबती होता तो इमरोज  आणि त्याचे प्रेम .कदाचित हे तिच्यात त्याचे सामावले जाणे भावले असेल अमृताला …
नंतरच्या तिच्या कवितेत , लेखनात आणि त्यांच्या चित्रात त्या सहजीवनाचे प्रतिबिंब दिसते. तिच्याच शब्दात सांगायचे झाले तर, 
“Like an offering at the altar of the spirit
Our names, slipping out of our lips,
Became a sacred hymn .
ते पावित्र्य समाजाला जाणवले म्हणून ते स्विकारले गेले. काव्य आणि चित्राचा संगम होता तो. 

(लेखातील कविता अमृता प्रीतम च्या असून अक्षय मनवानी यांच्या पुस्तकात त्यांनी भाषांतरित केल्या आहेत.) 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

18 thoughts on “चांदनी रात में एक बार तुझे देखा है”

  1. कसलं अफाट लिहिलंय!! मधे घातलेली गाण्यांची कडवी त्यांची कथा उलगडते जणू ❤️❤️

  2. अप्रतिम लिखाण
    खरंच लिखाणातून तू एक एक पदर ऊलगडत जातेस ना त्यामुळेच आपण त्या गाण्यात आरपार घुसतो तुम अपना रंजो गम ….खूप आवडते

  3. प्रिया,
    ❤️❤️❤️

    अफाट लिहिलं आहेस.
    अमृता, इमरोज साहिर
    सगळं विलक्षण आहे.
    सामान्य माणसाच्या समजण्या पलीकडले.

    “अर्चना” च आज वाढदिवस.
    तू लिहिलं आहेस
    ती,अश्विनी, विनया या तिघी
    इमरोज की चंद कविताए असा सुंदर कार्यक्रम करतात.
    तुला संधी मिळाली तर नक्की पहा.
    .

    1. मी येईन .
      खरंच ठरवला पाहिजे तिने . मला ऐकायचा आहे.
      Thank you Vidula .

  4. काय सुंदर लिहिलंय. तुमच्या लिखाणातून अमृता, इमरोज, साहिर याची विलक्षण कहाणी उलगडते. ‘तुम अपना गम….’ अगदी हृदयाजवळचं गाणं!!

  5. Great writeup! Great lytics n great music!

    ये हसीं रात ये महकी हुई पुर-नूर फ़ज़ा
    हो इजाज़त तो ये दिल इश्क़ का इज़हार करे
    इश्क़ इंसान को इंसान बना देता है
    किस की हिम्मत है मोहब्बत से जो इंकार करे

    – साहिर

    1. वाह .
      साहिर लुधियानवी एक अजब चीज आहे.
      कॉम्प्लिकेटेड ..तरीही खूप खरी
      आणि ही माणसे सुद्धा … कदाचित पटतील न पटतील .. माझी स्वतःची मते वेगळी असून सुद्धा इथे हरतात हे ही खरे आहे .
      Thank you Hemant .

  6. अफाट अफाट!!
    अगदी कमाल लिहिलंय ❤💕❤
    हालात के तीरों से छलनी हैं बदन अपने
    पास आओ के सीनों के कुछ जख्म तो भर जाये
    या ओळी काय काय सांगून जातात!!
    तुम्ही एकेक पैलू असा उलगडला आहे की कितीही वेळा वाचले तरी नव्याने नजरीया मिळतो बघण्याचा ऐकण्याचा वाचण्याचा!
    फार फार सुरेख👌👌

    1. Thank you Kamini ,
      गाणी सुद्धा किती अप्रतिम ना
      लिहिताना एक वेगळीच अनुभूती .. मला फार आवडतात ही गाणी , त्यांची चाल आणि म्हणून ह्यात ही गोष्ट बसवली …म्हणजे ती बसलीच
      .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *