Skip to content

जाणत्याचा आवाज -मुकेश चांद माथूर.

पार्ट -१ . 

काळाचा महिमा असतो.
हिंदी सिनेसंगीत ज्या वयात आवडायला लागले त्या वयात मनावर रफीचा पगडा होता. तलत महमूदच्या  मखमली आवाजाची मोहिनी होती आणि किशोरच्या आवाजाने तर तारुण्य लवकर आले. शास्त्रोक्त संगीत शिकत असल्याने मन्ना डेची गाणी ऐकणे मस्ट होते. त्यावेळेस विचारले असते तर आवडत्या गायकांच्या यादीत मुकेश चांद माथूर हे नाव कदाचित तळाला ठेवले असते. त्यांच्या आवाजाची रेंज मर्यादित होती. मन्नाडे सारखे सुरांवर प्रभुत्व नव्हते.
पण तो माझा भ्रम होता.
“Mukesh’s range may have been limited, but within that range, he was superb.”
मुकेश यांच्या  अकाली मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना दिलीप कुमारने हे उद्गार काढले होते. That was the perfect analysis of his career. . कळत्या वयात त्यांची गाणी जेव्हा ऐकली तेव्हा त्यातल्या उणीवांसकट ती मनाला स्पर्शून गेली. ते गळ्यानेच नाही तर हृदयाने गायचे. एवढ्या गायकांच्या गर्दीत आणि स्पर्धेत सुद्धा ते टिकून राहिले  कारण त्यांची गुंतवणूक केवळ सुरांत नव्हती तर त्या गीतातील शब्दांच्या भावनेत सुद्धा होती.
ती एवढी खरी  होती की लोकांच्या हृदयाला स्पर्शून गेली. परिपूर्ण नसेल, पण त्या सच्चेपणाने मुकेश चांद माथूरला श्रेष्ठ आणि लोकप्रिय गायकांच्या यादीत स्थान मिळाले.

“मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते” हे मुकेशच्या बाबतीत खरे ठरले. चित्रपटात काम करण्यासाठी मुकेश मुंबईला आले. तेव्हा नायक बनण्यासाठी गाता गळा असणे आवश्यक असल्याने, त्यांनी पंडित जगन्नाथ प्रसादकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. अनिल विश्वास यांनी संगीत दिलेलं, मोतीलाल वर चित्रित झालेले त्यांचे पहिले गीत होते “दिल जलता है“
सैगल हे आराध्यदैवत असल्याने या गीतावर त्यांच्या शैलीचा पगडा असणे स्वाभाविक. असे म्हणतात, जेव्हा सैगलने हे गीत ऐकले तेव्हा आपण हे गायले कधी हा त्यांना प्रश्न पडला. ह्या गीताने मुकेश या क्षेत्रात स्थिरावले. त्याच वर्षी नौशाद यांनी मेला या सिनेमासाठी मुकेश यांना संधी दिली. अँड रेस्ट इज  हिस्ट्री. 
२२ जुलै २०२३ ला मुकेश यांचा शंभरावा वाढदिवस होता. उण्यापुऱ्या त्रेपन्न वर्षाच्या आयुष्यात आणि अठ्ठावीस वर्षाच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी असंख्य लोकप्रिय गाणी गायली. राजकपूरचा आवाज म्हणून त्यांची ओळख जास्त आहे. आरके साठी त्यांनी गायलेली गाणी केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली. सोविएत युनिअन, तुर्कस्थान या देशात या गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतले. सुरुवातीला माझ्या आवडत्या गायकांच्या लिस्ट मध्ये नसेलही, त्या वयात तो किंचित नाकातून  आलेला सूर फारसा भावला नाही पण आज गाणी लिहिताना लक्षात आले , मला आवडलेली त्यांची असंख्य गीते आहेत.

आँसू भरी है ये जीवन की राहें
(सिनेमा परवरिश, संगीतकार- दत्ताराम, गीतकार-हसरत जयपुरी, नायक- राजकपूर)

हिंदी सिनेमात भंग हृदयाने गायलेली असंख्य गीते आहेत. भंगलेल्या नात्यांची, एकतर्फी प्रेमाची, नाकारले गेल्याची, अपमानाची, अपयशाची ..मृत्यूची.  मात्र या गीतांचे एक वैशिष्ट आहे.  वेदनेच्या सुरात डुबलेल्या या गीतांत दुःखावर फुंकर घालण्याचे कसब आहे.  ही गीते ऐकताना असे वाटते की कुणीतरी आपले दुःख जाणतो आहे. 
पडद्यावर कुणीतरी हे गीत गात असताना आपले दुःख त्याच्या दुःखाशी जोडले जाण्याचे अजब सामर्थ्य या  सुरांत आहे. 

आँसू भरी है ये जीवन की राहें
कोई उनसे कह दे, हमें भूल जाएँ

जन्माच्या वेळेसच हॉस्पिटलला आग लागल्याने एका श्रीमंत माणसाला आपल्या मुलाबरोबर एका दुसऱ्या मुलाची जबाबदारी घ्यावी लागते. त्या गोंधळात आपले मूल  नक्की कोणते हे त्याला ओळखता येत नाही. दुसरे मूल  एका कलावंतिणीचे असते.
त्याचा पालक मिळेपर्यंत ठाकूर जसवंत दोन्ही मुलांना एकत्र वाढवायचे ठरवतात. समाजात त्याची टवाळी उडवली जाते.
काळ उलटतो. मुलं मोठी होतात आणि एकाच मुलीच्या प्रेमात पडतात.
अशावेळी नायकाने स्वार्थत्याग करणे हे स्वाभाविक पण मनाला कितीही योग्य वाटले तरी हृदय आक्रंदायचे काही थांबत नाही.

वादे भुला दे, कसम तोड़ दे वो
हालत पे अपनी, हमें छोड़ दे वो
ऐसे जहां से क्यों हम दिल लगाये
कोई उनसे कह दे हमें भूल जाये.

प्रियकर किंवा प्रेयसीने दगा दिला की माणसे  तुटून जातात , इथे नायकच तिला विसरायला सांगतोय. आपण त्याग करतोय हे जर तिला समजले तर ती दूर जाणार नाही याची त्याला खात्री आहे. आणि जर ती त्याला विसरली नाही , तर त्याच्या मनातून तिचे हलणे अशक्य आहे हे ही तो जाणून आहे. हे तिला सांगणे सुद्धा त्याला जमणार नाही. त्याच्या डोळ्यातील अश्रू तिला सर्व काही सांगून टाकतील आणि जे साधायचे ते साधता येणार नाही.
“कोई उनसे कह दे हमें भूल जाये.” ह्याहून वैफल्य ते आणि कोणते असणार आहे!
Its a no win situation.
ह्या गाण्यात एक विषण्णता आहे. हे नुसते दुःख नाही, ह्यात नैराश्य आहे, उदासी आहे. हे गाणे मुकेशचे सिग्नीचर गीत आहे.
मुकेशचा आवाज अंतऱ्यात चढत जातो पण त्यातली वेदना मात्र आत साकळत जाते. हृदय तोडून आलेले जी काही गाणी आहेत त्यात हे बरेच वरती आहे.

सारंगा तेरी याद में नैन हुए बेचैन
(सिनेमा-सारंगा, संगीतकार-सरदार मलिक, गीतकार-भारत व्यास, नायक- सुदेश कुमार )


हे नितांत सुंदर गीत रफीच्या आवाजात यायला हवे म्हणून चित्रपटाचे निर्माते धीरूभाई देसाई अडून बसले होते. रफीच्या आवाजात रेकॉर्ड झालेला एक अंतरा सुद्धा आहे. संगीतकार सरदार मलिक यांनी मुकेश यांच्या आवाजाचा आग्रह धरला. जवळ जवळ दोन महिने सराव केल्यावर मुकेश यांनी ही बाजी  जिंकली. दोन्ही व्हर्जन्स यु ट्यूब वर आहेत. पूर्ण आदर राखून सांगेन , मुकेशने या गाण्यात सूरच नाही तर जीव ओतला आहे.

सारंगा हा सिनेमा त्यावेळच्या सिनेमा सारखाच तद्दन पोषाखी सिनेमा. एका श्रीमंत माणसाची देखणी मुलगी राजकुमाराच्या प्रेमात पडते. तिच्या सावत्र आईला मात्र तिचे लग्न आपल्या भावाशी लावून द्यायचे आहे. स्त्री हट्टापुढे बाप हार मानतो आणि सारंगा दूर निघून जाते. तिच्या आठवणीत गायलेले हे गीत.
गाणे एकसुरी आहे आणि तीच त्याची ताकद आहे. विरह सहन करणे सर्वासाठी सारखे नसते. माणसाच्या प्रवृत्तीनुसार, परिस्थितीनुसार त्याच्या ही छटा असतात. राग, दुःख, हताशपण, वैफल्य. 

कधीतरी माणूस हतबल होऊन मुकाट गप्प बसतो.खूप वय वाढलेली माणसे, तरुण माणसे डोळ्यादेखत गेल्यावर जशी गप्प होतात तसे दुःखाचे सुद्धा असावे. जेव्हा दुःखावर उपाय नसतो, तेव्हा अश्रू येत नाहीत.. डोळ्यात आठवणीं दाटतात. कुणावर राग नसतो, कसली तक्रार नसते. माणसे, निसटून गेलेला भूतकाळ कोऱ्या नजरेने पाहायचा प्रयत्न करतात.  

वो अम्बुवा का झूलना, वो पीपल की छाँव
घूँघट में जब चाँद था, मेहंदी लगी थी पांव
आज उजड़ के रह गया, वो सपनों का गाँव
सारंगा तेरी याद में…

आधीच्या गाण्यात हतबल होऊन आलेली खंत आहे..इथे तीही नाही. तो फक्त स्वतःला समजावतो आहे. ती कधीच पलीकडे निघून चालली आहे.
पावसाळी दुपारी हातात पुस्तक घेऊन बसले असताना अचानक हे गाणे लागावे. समोरची अक्षरे धूसर होत जाताना, मन:पटलावर इतिहास लिहिला जात असतो असा फील येतो हे ऐकताना.

काही वर्षांपूर्वी नेपाळला भूकंप झाला त्याची क्षणचित्रे दूरदर्शनवर पाहत होते.  पूर्ण गावच उध्वस्त झालेले. रस्ते उखडले होते. झाडे उन्मळून पडली होती. मोठे मोठे बंगले, हवेल्या जमीनदोस्त झाल्या होत्या. लोक रिकाम्या डोळ्यांनी या विध्वंसाकडे पाहत बसली होती, जे कधीतरी नांदते जग होते.
एवढी भीती वाटली. नवऱ्याला म्हंटले , दुर्दैवाने मुंबईत असे झाले तर माझे घर सोडून मी काही जाणार नाही. तुम्ही जीव वाचवा. तसेही मृतवत जगणं मला काही जमणार नाही.
हे कदाचित फार निराशाजनक वाटेल कुणालाही पण मृत्यू पेक्षाही भयंकर असे बरेच काही असते. म्हणून तर लोक आत्महत्या करतात. माणूस असेल, प्रेम असेल, स्वप्ने असतील, पैसे असतील, व्यसने असतील … हो , दारुड्याला दारू मिळाली नाही तर त्याचेही जीवन त्याच्यासाठी नरकप्रदच. 
ये जीना भी कोई जीना है … जगणेच कठीण व्हावे आणि हातात काहीही नसावे असे आयुष्य लोक कसे कंठत असतील! 

ज़िंदा हूँ इस तरह कि ग़म-ए-ज़िन्दगी नहीं
(सिनेमा-आग, संगीतकार- राम गांगुली, गीतकार-बहज़ाद लखनवी, नायक राज कपूर)

ज़िंदा हूँ इस तरह कि ग़म-ए-ज़िन्दगी नहीं
जलता हुआ दीया हूँ मगर रोशनी नहीं
ज़िंदा हूँ इस तरह…
कधीतरी जे मिळत नाही त्याचे महत्व जगण्यापेक्षा सुद्धा मोठे असते. आपण जगतो आहेच कशाला हे वाटण्याएवढे  आयुष्य निरर्थक होऊन जाते. आयुष्य स्वतःच्या हाताने संपवणे सगळ्यांनाच शक्य होत नाही आणि जिथे जीव अडकला आहे तिथून सोडवता सुद्धा येत नाही.

होंठों के पास आए हँसी, क्या मजाल है
दिल का मुआमला है कोई दिल्लगी नहीं
ज़िन्दा हूँ इस तरह…
मुकेश यांना दर्दचा बादशहा म्हंटले जायचे ते का हे जाणून घ्यायचे असेल तर शेवटचे कडवे ऐकावे.  “दिल का मुआमला” है एवढे आतून आलेय की त्या माणसाचे उध्वस्त झालेले मन वाचता येते इथं.  हे फक्त गाणे नाही, this is a cry of a man’s soul.

एकतर्फी प्रेमासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही कारण त्याला अंत नसतो . ज्याची सुरुवातच नाही ते संपणार तरी कसं.
ज्या व्यक्तीवर आपला जीव जडला आहे, त्याच्या खिसगणतीत आपण नाही, किंवा आपल्या भावना तो ओळखू शकत नाही , ओळखल्या तरी त्याला प्रतिसाद  देण्याची त्याची तयारी नाही आणि सर्वात वाईट म्हणजे आपण आपल्या भावना त्याला सांगू शकत नाही . त्याने नाही म्हंटले तर नकार स्विकारायची आपली मानसिक तयारी नाही.
त्यामुळे व्यक्त न झालेले आणि प्रतिसाद न मिळालेले प्रेम कधी संपत नाही. पराभूत होऊन ते खोलवर दडून बसते.  अनेकवेळा ते क्रूर होते किंवा कडवट  
अंदाज मध्ये दिलीप कुमारचे तेच होते.
सिनेमाच्या इतिहासात अंदाज हा पहिला प्रेमाचा त्रिकोण होता.
राज कपूर , नर्गिस आणि दिलीप कुमार ही त्रयी, नौशाद चे संगीत, मेहबूब खान चे दिग्दर्शन या साऱ्याच गोष्टी भव्य .
अंदाज मध्ये मुकेश यांच्या वाट्याला चार सोलो गीते आली जी  दिलीप कुमारवर चित्रित झाली. लता मंगेशकर हिने गायलेले उठाये जा उनके सीतम हे गाणे ऐकून मुकेशना आपली गाणी खूपच सोपी आणि साधी वाटली. तेव्हा नौशाद म्हणाले, गाणी प्रदर्शित होऊ दे , ही गाणी  देशाचा आवाज बनतील”
हे भाकीत खरे ठरले.

झूम झूम के नाचो आज गाओ आज
(सिनेमा -अंदाज, संगीतकार-नौशाद, गीतकार-मजरूह सुलतानपुरी, नायक -दिलीप कुमार )

जिच्यावर प्रेम ती आज दुसऱ्याची होणार आहे. त्या खुशीत सामील होण्यासाठी तो आलेला आहे.
हे कमी म्हणून की काय, ती त्याला गायचा आग्रह करते. त्याचे दुखावलेले हृदय मात्र ओरडून ओरडून सांगत असते, तुला मी दिसतंच नाही का !

झूम झूम के नाचो आज गाओ आज गाओ खुशी के गीत हो गाओ खुशी के गीत
आज किसी की हार हुई है, आज किसी की जीत
गाओ खुशी के गीत .

अति झालं  आणि हसू आलं म्हणतात.
दुःख गिळण्याचा सुसंस्कृत मार्ग आहे हा.
आणि जेव्हा कुणी डोळे पुसणारे नसेल तर स्वतःचे डोळे पुसण्यापलीकडे पर्याय असतोच कुठे!
आनंदाच्या सुरांना असलेली  दुःखाची आणि उपहासाची कड इथे लपत नाही. शेवटी गाणे हा भावनांचा उद्रेक असतो. सूर तिथे दुय्यम असतात. 

काळा आणि पांढरा हे दोन रंग फोटोग्राफीसाठी अत्यंत महत्वाचे रंग मानले जातात. फोटो माणसाच्या स्मृती अमर करतात. आशा आणि निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणारे  मानवी आयुष्य रंगवण्यासाठी याहून दुसरे रंग ते कोणते असणार!
रंगानी शोभा वाढत असेल, रूप अजून देखणे दिसत असेल पण काळ्या-पांढऱ्या आणि ते मिसळून झालेल्या करड्या रंगातले जग वास्तवापलीकडील प्रतिमेला स्पर्श करते.
जुन्या फोटोतील माणसे पहा, चेहेरा सौन्दर्याच्या कक्षेत बसणारा असो व नसो, फार देखणी दिसतात.
मुकेश यांचा आवाज काही  गाण्यात असाच वाटतो … सुरांच्या मर्यादांना, नियमांना ओलांडून गेला असेल, नसेल पण ती गाणी  फक्त त्यांच्याच आवाजात फार भारून टाकतात.

ओह रे ताल मिले नदी के जल में
(सिनेमा-अनोखी रात, संगीतकार-रोशन, गीतकार-इन्दीवर, नायक- संजीव कुमार) 

अनोखी रात, नावाप्रमाणेच, एका अजब रात्रीत घडलेली गोष्ट आहे. एका मोठ्या वाड्याचा लिलाव होणार असतो. त्यात भाग घेणारी आणि काही योगायोगाने तिथे पोचलेली माणसे, त्यांचे आनंद, त्यांची दुःखे, त्यांची भीती, त्यांची लालसा आणि त्यातून उलगडणारे त्यांचे दुभंगी व्यक्तिमत्व यांची ही गोष्ट आहे.
जन्माला येताना माणसाची पाटी कोरी असते. येणाऱ्या अनुभवांची अक्षरे उमटायला लागतात आणि माणसाचे व्यक्तिमत्व घडायला सुरुवात होते.
आपल्याला दिसलेला माणूस एक भास असतो. चेहेऱ्यावरच्या अनेक थरांमधला एक थर. एखाद्या घटनेने तो थर पुसला जातो आणि एक वेगळेच रूप प्रत्ययाला येते.
हे कसे, का याची उत्तरे कदाचित त्या माणसाकडे सुद्धा नसतात. खरेतर जगात आपल्या नजरेपलीकडे कितीतरी गोष्टी घडत असतात. त्यांची उत्तरे नसतात आणि मिळूनही त्याचा उपयोग नसतो.

ओह रे ताल मिले नदी के जल में
नदी मिले सागर में
सागर मिले कौन से जल में
कोई जाने ना

संगीतकार रोशनचा  हा शेवटचा चित्रपट. यातील गाण्यांचे रेकॉर्डिंग बाकी असतानाच हृदयविकाराने त्यांची प्राणज्योत मालवली.  लता मंगेशकर( महलों का राजा मिला) , रफी (मिले न फूल तो काटो से ) यांच्या बरोबर मुकेश यांच्या वाट्याला सुद्धा अप्रतिम गाणे आले. काहीसे तत्वज्ञानात्मक आणि प्रसंगाला अनुसरून पाहिले तर प्रेमगीत असे हे फार सुरेल गीत आहे.
A  tailor-made song for the soulful voice of Mukesh.
तलाव, नदीकडे ओढला जातो, नदी सागराला जाऊन मिळते पण सागराची इतिश्री कशात हे मात्र आपण जाणू शकत नाही. माणसाच्या प्रवासाचे ही तसेच. संपूर्ण आयुष्यात कशाची न कशाची ओढ माणसाला चालते ठेवते. तिच्या शोधात तो जगभर फिरतो. अनेकवेळा ते त्याच्या हाताच्या अंतरावर असते पण स्वतःला काय हवे आहे हेच न उमजल्याने त्याच्या नशिबी येते ती वणवण. सगळे मिळूनही माणसे सागरासारखी तहानलेली राहतात.
क्षणाक्षणाला आयुष्य बदलत असते. कधीतरी निराशेच्या क्षणी कुणीतरी हात पुढे करते आणि आयुष्य उजळून निघते. तो क्षण पकडायला जमले पाहिजे. आणि हे सांगताना गाणे प्रेमरसात भिजते.
नायक एक साधा सरळ माणूस आहे. नुकतेच लग्न झाले आहे आणि आपल्या नवपरिणीत वधूला घेऊन तो आपल्या घरी चालला आहे. आतापर्यंत एकाकी , काहीसे निरस असलेले त्याचे जीवन या एका व्यक्तीच्या आगमनाने बदलून गेले आहे.

अन्जाने होंठों पर ये पहचाने गीत हैं
कल तक जो बेगाने थे जनमों के मीत हैं
ओ मितवा रे…
कल तक जो…
क्या होगा कौन से पल में
कोई जाने ना
“कोई जाने ना “ ही ओळ या गाण्याचे सार आहे ..एक गूढता आहे या गीतात. सुरुवातीला तटस्थ, नंतर आशेचा किरण दाखवणारे आणि त्या आनंदाच्या क्षणाला सुद्धा हळूच दटावून गप्प करणारे.
आयुष्याची क्षणभंगुरता ज्याला समजली असेल त्याला मृत्यूचे काय भय असणार !

आयुष्याच्या संध्याकाळी लिहिलेल्या “मारवा” या कसुमाग्रजांच्या कवितासंग्रहातील , मारवा आणि संध्या या दोन कवितांत उषा आणि संध्या यांच्या देण्याचा निकटन्यास साधून संध्येचे कृतार्थ सौन्दर्य कुसुमाग्रजांनी दाखवले आहे . ते म्हणतात, उषा सुंदर आहेच पण संध्येचे सौन्दर्य वेगळेच. 
संध्याकाळचा सूर्य हा चराचराला प्रकाशाचे दान करून आलेला. कर्तव्याचे पालन करून कृतार्थ झालेला म्हणून जास्त शीतल आणि सुंदर भासतो. माणसाच्या जीवनाचा प्रवास सुद्धा जेव्हा निर्वाणाच्या टोकाला पोचतो, तेव्हा त्याच्या अंताच्या अटळते बरोबर, जगण्यातले गुंते, समस्या, नकोश्या झालेल्या आठवणी, अनुभव यांचीही अटळता समजते. अशावेळी अंतर्मुख होऊन दुरून स्वतःकडे पाहण्याचा प्रवास सुरु होतो.
लक्षात येतेच, आता जगाच्या वेगापुढे आपला वेग कमी पडणार आहे. पुढे जायची वाट आता अरुंद होत जाते आणि दिशा निवडण्याचे आपले स्वातंत्र्य संपते. प्रवास आता अखेरच्या गंतव्याकडे सुरु होतो. आता मागे पुढे कोणी नसते ..जे  हवे ते मिळाले असते आणि नाही त्याची सुद्धा खंत करण्याचे वय सुद्धा निघून गेलेले असते. असे असूनही एखाद्या हळव्या क्षणी  मागून असणाऱ्या  मरणाला स्विकारले असतानाच, काहीतरी हरवलेले आठवते आणि मन कासावीस होते.

कही दूर जब दिन ढल जाये , सांज की दुल्हन बदन चुराये चुपकेसे आये
( सिनेमा -आनंद, संगीतकार -सलील चौधरी, गीतकार-योगेश, नायक- राजेश खन्ना) .


संध्याकाळ होते तेव्हा प्रकाश धूसर होतो. बाह्य जगातील निश्चितता संपते आणि सावल्यांचे, भासांचे जग दिसू लागते.
स्वप्ने आणि सत्य एकमेकांत मिसळून जातात.

मेरे खयालोंके आंगन में कोई सपनोंके दीप जलाये … 
कही दूर जब दिन ढल जाये , सांज की दुल्हन
बदन चुराये चुपकेसे आये

सूर्याच्या प्रखर प्रकाशात जगण्याचे सत्य स्विकारलेले असते पण सूर्यकिरणांच्या अस्ताबरोबर मनाच्या तळाशी दाबून ठेवलेला सगळा हळवेपणा, सगळी संदिग्धता उफाळून येते. निसटत चाललेल्या  क्षणांना पकडून ठेवण्याचा वेडा अट्टाहास थांबवता येत नाही खरं . 

“केव्हातरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो” हे माहित असतेच.
तरीही दबलेल्या इच्छा काही स्वतःला सावरू शकत नाहीत .

कभी यूंही जब हुईं बोझल सांसे , भर आई बैठे बैठे जब हुई आँखे 
कभी मचल के प्यार से चल के , छुए  कोई  पर नजर न आये , नजर न आये

मृत्यूच्या सावलीत असतानाही, जगण्याची नाळ न तोडलेल्या माणसाचे हे गीत. सगळे त्यागून भोगून सुद्धा, बरेचसे निसटून गेलेल्याची पुसटशी खंत या गीतात दिसते. एक तर कधीच आयुष्यातून मागे पडले आहे आणि आता उरलेले आयुष्य सुद्धा संपून जाणार आहे . ..These are two different types of  losses…
कारुण्य, दुःख, नैराश्य या पेक्षाही जो भावुक झालेला क्षण आहे तो मुकेशच्या आवाजात प्रत्ययास येतो. 

कलाकारासाठी सर्वात दुःखदायक गोष्ट कोणती असेल ?
मृत्यू ? नाही .. कोणत्याही संवेदनशील व्यक्तीने हा अपरिहार्य शेवट स्विकारला असतोच. त्याचे , त्याच्या कलेचे विस्मरण होणे ही त्याच्यासाठी मृत्यूहून मोठी शिक्षा असते.
कलाकाराची प्रतिभा, त्याला मिळालेली प्रतिष्ठा, त्याचे झालेले नाव याचे आयुष्य किती असते हा प्रश्न साहिरला पडला आहे इथे. कभी कभी ची सुरुवात नायकाने सादर केलेल्या “मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है” या कवितेने  होते. या गाण्यातील खोल वेदना नायिकेच्या हृदयाला स्पर्शून जाते. दोन हृदये एकत्र येण्याची ती सुरुवात असते पण तितकेच महत्व या गाण्याला नाही.
आपल्या नंतर आपल्या स्मृतीचे काय होईल हे कुतूहल आणि ती कदाचित या विश्वाच्या अनंत पसाऱ्यात विरून जाईल ही भीतीही  या गीताच्या निर्मितीत भाग घेणाऱ्या सर्वांनाच असणार एवढी ती खरी आहे. 

मैं पल दो पल का शायर हूँ
(सिनेमा- कभीकभी, संगीतकार-खय्याम, गीतकार- साहिर लुधियानवी, नायक – अमिताभ बच्चन)

अटळ असलेल्या मृत्यूची तारीख हे केवळ एक ऐतिहासिक सत्य आहे. शरीर जाते पण स्मृती राहतात. त्या व्यक्तीचे नातलग, मित्र, त्याचे चाहते, त्यांच्या कलाकृतीचा, साहित्याचा, कलेचा अभ्यास करणारे वियार्थी, त्या व्यक्तीला जिवंत ठेवतात. मृत्यू म्हणजे शेवट या सत्याला आव्हान देतात. “ our dead are never dead to us, until we have forgotten them”
आणि कलाकारांच्या बाबतीत हे विसरणे तेवढे सोपे नसते. तो असंख्य लोकांच्या मनात, अनेक माध्यमातून जिवंत असतो.
सर्वशक्तिशाली मृत्यू त्याचा शेवट करण्यास असमर्थ ठरतो.
आताच्या तंत्रज्ञानाच्या काळात, त्या व्यक्तीचे असणे किंवा नसणे हे फक्त फॉर्मॅलिटी आहे. कलाकाराला कोणतीही सीमा नसते. आणि नियतीच्या काही लाडक्या लोकांचे स्थान ध्रुवताऱ्यासारखे अमर असते.
साहिर, खय्याम , मुकेश यांच्यासारखे कलाकार  शरीराने जातात पण ते पूर्णतः या दुनियेतून जात नाही, त्यांचा महत्वाचा भाग रसिकांकडे ठेवून जातात. 

माणसाला अमरत्वाचा वर नाही पण कलेला आहे हे जाणणारी माणसे असतात ती .
त्यामुळे  साहिरनेच लिहिलेले हे कडवे त्यांच्या बाबतीत खरे ठरत नाही . 

कल और आएंगे नग़मों की खिलती कलियाँ चुनने वाले
मुझसे बेहतर कहने वाले तुमसे बेहतर सुनने वाले
कल कोई मुझको याद करे
क्यूँ कोई मुझको याद करे
मसरूफ़ ज़माना मेरे लिये
क्यूँ वक़्त अपना बरबाद करे

साहिरचे तत्वज्ञान, खय्याम चे संगीत आणि मुकेशचा एखाद्या योगीसारखा तटस्थ सूर यामुळे हे गाणे अतिशय आवडीचे आहे. ह्या सिनेमाच्या वेळी किशोरची चलती होती. अमिताभने पडदा व्यापला होता आणि किशोर, अमिताभचा आवाज बनला होता .. खय्यामने या गाण्यासाठी मुकेशच्या नावाला पसंती दिली.
गाण्यातली जी नम्रतेची भावना आहे त्यासाठी दुसरा कुणी त्याला न्याय देऊ शकला नसताच. 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner


.. 

22 thoughts on “जाणत्याचा आवाज -मुकेश चांद माथूर.”

  1. उदय शेवडे

    superb दुसरे शब्द नाहीत इतका अप्रतिम लेख झाला आहे.
    उशीर झाला असला तरी काय लिहिलंय तुम्ही जवाब नही.
    सरस्वती चंद्रची गाणी कदाचित पुढच्या भागात येतील.
    एस्जे नंतर कल्याणजी आनंदजी यांनी मुकेशचा उत्तम उपयोग करून घेतला आहे असे माझे मत आहे.

    “सारंगा तेरी याद में….” हे त्यांचं माझं सर्वात आवडतं गाणं….. हे पहिल्यांदा कुठे ऐकलं सांगू……पूर्वी दररोज संध्याकाळी ७ वाजता “जयमाला” नावाचा कार्यक्रम सैनिकांसाठी असायचा त्यात शनिवारी एखादा कलाकार सादर करायचा अमिताभ ने त्याच्या कार्यक्रमांत हे गीत लावले होते.

    1. मी खूप उशिरा ऐकायला लागले मुकेश
      आधी बोअर व्हायचे .. कदाचित तेवढी maturity नव्हती . त्यांची शब्दाची फेक , उच्चार सुद्धा छान आहेत . शब्दात जान ओतणे हे प्रत्येक गाण्यात दिसते .
      सरस्वतीचंद्र आहेच , शिवाय फिर सुबह होगी …त्यातली गाणी तर अफाट आहेत

  2. संदीप पेंढरकर

    उषा आणि संध्या …….
    खूप आवडले.

    1. Thank you Sandeep,
      तो पूर्ण काव्यसंग्रह च फार सुंदर आहे
      मी लायब्ररीतून आणलेला .
      प्रिंट मध्ये मिळत नाही आता

  3. प्रिया , मुकेश च्या आवाजाला तू न्याय दिला आहेस.. महंमद रफी किशोर तलत मन्नाडे यांच्या प्रमाणेच मुकेश ची स्वतःची अशी आयडेंटिटी होती.. ज्याला चॅलेंज नाही.. मी स्वतः त्याच्या वर असलेल्या अनेक गीते ऐकताना अश्रू गाळले आहेत कारण काळजात हात घालणारा मुकेश चा स्वर …
    🙏🌹❤🙏❤🌹

    1. अगदी योग्य शब्द
      काळजाला हात घालणारा स्वर .
      भले त्याच्यावर शास्त्रीय संगीताचे संस्कार नसतील तरी भावनांचा बादशहा होता तो
      आणि सुसंकृत आवाज
      Thank you Suresh Kalekar . 🙂

  4. ANAND SUDHAKAR MAMIDPALLIWAR

    Priya ji, apratim uttam marmik, hyrudysparshi!!! mukesh ha mazha atyant jivhalaycha vishay!!!! jayanti nimitty nuktich serva gani aaikli! ani aaj ha lekh vachnat aala!!!! utkrust shabdankan !! ganayach arth dekhil tumhi ulgadun mandla aahe!!!! kahi wakya khup aawdli” this is cry of soul” 2) our dead are never dead ……until!!!! 3) Its a no win situation!!!!! mala mukesh chya ganayach bhari ved aahe!!! arthatach mazhya diwangat vadilan mule!!!! tum agar muzhko na chaho to koi batt nahi! tum kisi aur ko chahogi to mushkil hogi!!!! he gane mi college orchestra madhe gayle hoto!!! nakiich kunasathi tari hote te!!!!!

    1. Thank you Anandji .
      त्या पिढीचा लाडका होताच मुकेश . ती पिढीचं फार सभ्य आणि सुसंकृत होती ..जसा त्याचा आवाज .
      मला ते गाणे फार आवडते
      …राज ,नूतन आणि मुकेश यांनी कमाल केली आहे

  5. जसे राजकपूर आणि मुकेश एकजीव, तसेच बरेचदा राजेश खन्नाच्या व्यक्तिमत्वात अगदी बेमालूम एकजीव होऊन जातो मुकेशचा आवाज. काय काय वाचावे आणि वेचावे इतका अप्रतिम झालाये हा लेख. आतापर्यंत या ब्लॉग वर वाचलेल्या लेखांमधील सगळ्या उत्तम लेखातील सर्वोत्तम लेख 👌👌👌❤
    प्रियादी you are really versatile genius. Love you so much❤😊

    1. Thank you so much Kamini .
      हो ..खरेतर राजेश आणि किशोर
      तरीही राजेश ला आनंद मध्ये सूट झालाय
      .आणि दिलीपला सुद्धा
      जर मुकेश ने स्वतः सिनेमात काम करण्याचा आग्रह धरला नसता, तर कदाचित त्याने प्ले बॅक केला असता.

  6. विदुला

    प्रिया,

    मुकेश वर खूप उशिरा लिहिलंस खरं.
    पण इतकं अप्रतिम लिहिलं आहेस..
    जाणत्याचा आवाज -मुकेश चांद माथूर

    शीर्षक च पुरेसे आहे.
    अशीच त्यांची इतर गाणी घेऊन पण लेख येऊ देत.

    1. खरेच .. आधी का लिहिले नाही हे मलाही फार नवल वाटते ..
      नाही लिहिले गेलं ..आणि आता एवढी गाणी
      .निदान तीन एक पार्ट होतील
      .Thank you vidula .

      1. अजूनही खूप गाणी राहिली आहेत. त्यावर ही लिहा.
        अप्रतिम लिहलय….

        1. Thank you Mahavir Patil.

          हो नक्की लिहीन ..डुएटस आहेत ..त्याची आनंदी गाणी सुद्धा आहेत
          हा थोडा ब्रेक

  7. संदीप पेंढरकर

    मुकेशची duet गाणी देखील खूप खूप श्रवणीय आहेत …
    * मेरा प्यार भी तू है ये बहार भी तू है
    * किसी राह में किसी मोड पर कही चल ना देना तू छोडकर मेरे हमसफर
    * तेरे होटो के दो फुल प्यारे प्यारे
    * मेहताब तेरा चेहरा …
    * मेहबूब मेरे मेहबूब मेरे
    ……………………………………………..
    काही सोलो सुंदर गाणी …..
    मुबारक हो सबको समा ये सुहाना
    राम करे ऐसा हो जाये ….
    संसार है एक नदिया
    वक्त करता जो वफा आप हमारे होते
    जो प्यार तुमाने मुझको दिया है वो प्यार तेरा मैं लौटा रहा हुं … अशी कित्येक.

    तसेच एक शाम महेंद्र कपूर वर देखील आवडेल… नक्कीच.

    1. Thank you Sandeep da.
      तुम्ही पूर्ण नवीन लिस्ट दिलीत .
      मी लिहिले आहे थोडे …पण आज रफी म्हणून त्यांच्यावर लिहिले ,
      आता यातली काही गाणी नक्की घेईन
      .शिवाय हसरी, आणि आनंदी सुद्धा आहेत .
      तसेही वर्षातून दोन दिवस हक्काचे मिळतात जरी प्रत्येक दिवशी यांची आठवण येते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *