आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुखद संवेदना असते. स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं स्थित्यंतर म्हणजे गर्भारपण. काही अपवाद असतीलही पण सर्व सामान्य स्त्रियांसाठी अजूनही मातृत्व म्हणजे परमेश्वराने दिलेले वरदानच आहे. गर्भ धारणेसाठी मनाची तयारी करणे, गर्भ राहणे आणि मग प्रसूती हा आनंदाचा काळ असतो. नऊ महिन्यात शरीरात होणारे बदल, मानसिक आंदोलने, डोहाळे हे कितीही त्रासदायक असले तरीही आपल्या अपत्याला कुशीत घेण्याच्या आत्यंतिक इच्छेपुढे त्यांचे काहीही चालत नाही. मातृत्वाची चाहूल लागताच सुरु होतात ते कौतुकाचे सोहळे. जपून चाल, सांभाळून राहा, तुला काय खायला आवडेल, तुला कुठे जायला आवडेल .. असे अनेक प्रश्न आणि या लाडात
गर्भारशी तेजाने नाहून निघते.
वो मेरा होगा, वो सपना तेरा होगा
मिलजुल के माँगा, वो तेरा मेरा होगा
दोघांच्या प्रेमात आता हवाहवासा वाटेकरी येण्याची ती सुरुवात असते.
रोमन पोलान्स्की दिग्दर्शित “रोझमेरीज बेबी“ या सिनेमात अशी मातृत्वाला आसुसलेली आई आहे. तिच्या इच्छा पुऱ्या करायला धडपडणारे आई वडिलांसारखेच शेजारी आहेत. तिच्या गर्भारपणात तिच्या बाळाची जीवापाड काळजी घेणारा डॉक्टर आहे. तिच्याबरोबर तिच्यावर प्रेम करणारा नवरा आहे. थोडे विचीत्र का असेना, आईला लागलेले डोहाळे आहेत. एक गोष्ट मात्र फार वेगळी आहे. ह्या मुलाचा बाप कोण आहे हे आईला माहित नाही. ती ज्या माणसाला, स्वतःच्या नवऱ्याला ह्या मुलाचा बाप समजते, त्याला मात्र ही गोष्ट माहित आहे. केवळ माहितीच नाही, तर त्याचाही हे कांड घडवण्यात हातभार लागला आहे. मुलाचे पितृत्व अशा माणसाकडे आहे जो या पृथ्वीचा रहिवासी नाही. जे काही घडले आहे ते अतर्क्य आहे, जे काही घडणार आहे, ते अघटित आहे. आई केवळ या पूर्ण घटनेत वापरले जाणारे प्यादे आहे.
कथा घडते १९६५ मध्ये.
गाय वूडहाऊस आणि त्याची पत्नी रोझमेरी न्यूयॉर्क मधल्या ब्रँफोर्ड बिल्डिंगमध्ये राहायला येतात. इथे राहणाऱ्या रहिवाश्यांबद्दल फार काही चांगले बोलले जात नाही. इथे नरमांसभक्षक आहेत अशीही वदंता आहे. त्यांचा मित्र, हच सांगायचा प्रयत्न तर करतो पण रोझमेरी मात्र घराच्या प्रेमात पडलेली असते.
नवरा कामाच्या शोधात, नाटकात पाय रोवू पाहणारा नट तर बायको नवऱ्यावर विश्वास असणारी, जगाचा फार अनुभव नसलेली एक साधी गृहिणी.
गृहप्रवेश काही चांगल्या मुहूर्तावर होत नाही. इथे आल्यावर ज्या मुलीची रोझमेरीची ओळख होते; ही मुलगी आत्महत्या करते. तिला सांभाळणारे जोडपे मात्र याच मुहूर्तावर रोझमेरी आणि गायच्या आयुष्यात प्रवेश करतात. त्यांच्याशी ओळख काय होते आणि गायला एक महत्वाचा रोल मिळतो. एका उभरत्या नटाचा जन्म होतो. कोणतीही चांगली घटना अचानक घडत नाही या युगात. त्याला पूरक अशी एक विचित्र गोष्ट घडते. हा रोल करणारा नट अचानक आंधळा होतो आणि गायच्या अंधारमयी कारकिर्दीला प्रकाश मिळतो.
या सर्वांची किंमत तर चुकवावी लागतेच. किंमत असते रोझमेरीचे शरीर.
या जगात सैतानाच्या मुलाला जन्म देणारे माध्यम.
“I dreamed someone was raping me. I think it was someone inhuman.” रोझमेरी आपल्या नवऱ्याला सांगते. रात्री जे घडते त्याची तिला शुद्ध नसते पण जे घडलेले असते त्याच्या खुणा तिच्या उघड्या शरीरावर असतात.
“Thanks a lot.” गायचे यावर मिस्कील उत्तर. “It was kinda fun in a necrophile sort of way”
Necrophile (प्रेताविषयीचे आकर्षण )हा शब्दच अनेक गोष्टींचा उलगडा करायला सुरुवात करतो.
रात्री काहीतरी विचित्र घडत असते. जे काही घडते ते गुंगीत. सिनेमात हा एकच प्रसंग आहे जो ह्या सिनेमाला हॉररच्या गणतीत नेतो. हा ड्रीम सिक्वेन्स आहे. सैतानाला मानणाऱ्या पंथाची लोक, त्यांचे मंत्र, त्यांची पूजा , सैतानाला केलेले आवाहन आणि त्याला सुपूर्द केलेला स्त्री देह.
हा केवळ आभास आहे का? कल्पना आणि सत्याच्या सीमेवर असलेला हा प्रसंग केवळ रोझमेरीलाच नाही तर पेक्षकांना सुद्धा दुविधेत टाकतो. जे घडतंय ते केवळ रोझमेरीच्या मनाचे खेळ आहेत का हे सत्य आहे !!!
रोझमेरी गरोदर राहते. तिच्या बाळाच्या येण्याची तारीख सुद्धा निश्चित होते. आता तिचा ताबा तिच्या शेजाऱ्यांकडे जातो. ती देतेही. अगदी सहज. डॉक्टर्स बदलले जातात. तिची औषधे सुद्धा तिची शेजारीण निश्चित करते. थोडासा विरोध पण तो अकारणच . कदाचित हे नवीन आईच्या मनाचे खेळ म्हणून दुर्लक्षिले जातात. पोटात होणाऱ्या असह्य वेदना, कमी झालेले वजन, चेहेऱ्यावर आलेली मृतकळा …
सगळ्या गोष्टी गूढ आणि तरीही नॉर्मल भासवल्या जातात.
आता पहा, अगदी वेगळी वस्तू खाण्याचे डोहाळे तसे कॉमनच नाही का ? पण ते यकृत आणि कच्चे मांस?
रोझमेरीच्या मनात संशयाचे वादळ उठते. तिचा मित्र, हच सुद्धा गोंधळतो. नक्कीच काहीतरी विचित्र घडत असते. त्याचा रिसर्च त्याला या साऱ्याच्या मूळाकडे घेऊन जातो खरा पण दुर्दैव इथेही रोझमेरीची पाठ सोडत नाही. त्याचा अपघात होऊन तो कोमात जातो. त्यातच त्याचा मृत्यू होतो. जाण्यापूर्वी जे पुस्तक तो रोझमेरीला देतो त्यातून हा गुंता सुटत जातो. आपले मूल धोक्यात असून, कदाचित त्याचा वापर केला जाईल अशी भीती रोझमेरीला वाटते पण फार उशीर झालेला असतो. 
चित्रपटाचा शेवट खरेतर प्रेक्षकांना समजून आलेला असतो. जे काही चालले आहे तो आभास नाही, कल्पना नाही तर एका अमानवी शक्तीचा खेळ आहे याचीही जाणीव आपल्याला टप्प्या टप्प्याने करून देण्यात पोलन्स्की यशस्वी झालेला आहे तरीही शेवट धक्का देतो. एका व्यक्तीचे समाजासमोर झुकणे, नवऱ्यासमोर दबणे हे दुःखदायक आहेच पण शेवटी मातृत्व, तिच्या इच्छेला, तिच्या बुद्धीला पराभूत करते हे पाहणे मातृत्वाचा आणि स्त्रीत्वाचा अपमान वाटतो.
सैतानाचा जन्म नाही तर रोझमेरीची असहाय्यता मनात भीतीचे वादळ उठवते.
स्त्री च्या अस्तित्वाला केवळ तिच्या गर्भाशयामुळे अर्थ असतो का? हेच तिच्या जगण्याचे प्रयोजन ठरू शकते का? मातृत्व हे ओझे का वरदान ह्या प्रश्नावर हा सिनेमा संपतो.
“ Rock him.” …तिला चुचकारले जाते.
तिच्या मधल्या सुप्त आईला साद घालतात. आतापर्यंत तिच्या शरीराचा ताबा घेतला गेला असतो. आता तिच्या मनावर ताबा मिळवायचे प्रयत्न सुरु होतात.
“तुम्ही मला या बाळाची आई होण्याची जबरदस्ती करत आहात’. जे घडते आहे त्यात निदान आपला हातभार नको असे रोझमेरीला वाटते. नकार देण्याचा तिचा क्षीण प्रयत्न असतोही.
जबरदस्ती? का ? तू त्याची आईच आहेस ना? तिच्या काळजालाच हा प्रश्न! शेवटी नऊ महिने तिच्याच गर्भाशयात तर हे मूल वाढते.
मातृत्व अन्यायापुढे झुकते.
या नंतर तिचे अंगाईगीत बाळाच्या रडण्याला शांत करते.
कोणतेही भयानक प्रसंग या सिनेमात नाहीत. विचित्र माणसे, मुखवटे, आवाज, अंधार, पडकी घरे, जंगल, विरोधात गेलेला निसर्ग; साधारणपणे हॉरर सिनेमात ज्या गोष्टींचा उपयोग केला जातो; ती कोणतीही गोष्ट इथे नाही. शूटिंग शहरात जिथे होते ती मध्यवर्ती जागा, जी माणसे खलनायक म्हणून येतात, ती सामान्य, तुमच्या आमच्यासारखीच. सुशिक्षित, सुसंस्कृत. समाजात मानाचे स्थान असणारी. त्यांचे कपडे, त्यांची भाषा, त्यांचे रीतिरिवाज काही वेगळे नाहीत आणि तरीही ती तुमच्या जगातली माणसे नाहीत कारण त्यांनाच हे जग नष्ट करायचे आहे. तुमचे देव, तुमची मूल्ये, तुमची सृष्टी, जे जे पवित्र ते ते सर्व काही.
रोझमेरीज बेबीचे हे वेगळेपण म्हणून भयावह आहे ..
ह्या सिनेमाबद्दल अनेक दंतकथा आहेत त्यांनी सुद्धा हा सिनेमा चर्चेत राहिला आहे.
“कथा आणि वास्तव एकाच वेळी समांतर रित्या माझ्या आयुष्यात घडत होते. ह्या घटनांतील मी मुख्य पात्र होतो. सगळ्याच चेटकिणींनी त्यांच्या जादू टोण्याला सुरुवात केली होती आणि बळी होण्याची घटना माझ्या घरात माझ्या समोर सत्यात येत होती.”
रोमन पोलान्स्की चे हे उद्गार बरेच काही सांगून जातात. ज्या काही गोष्टी घडल्या, हे चित्रीकरण चालू असताना आणि पूर्ण झाल्यावर, त्यात रोमन पोलान्स्की ह्याचा पत्नीचा खून, दुर्दैवाचा कळस होता. त्या वेळी ती आठ महिन्याची गरोदर होती.
हॉलिवूडच्या हॉरर क्लासिक मध्ये रोझमेरीज बेबी चे स्थान खूप वरती आहे.
Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owners.

Fantastic write up..! Priya.. 🌹
Keep writing, will enjoy these movies once again.!!
Thanks..
Thank you so much Shashi.
Planning to write only on movies and songs here. Occasionally travel. Keep reading and yes suggestions are most welcome .
कमाल परिक्षण लिहिलंय प्रियाजी..! वाचून पुर्ण होई पर्यंत खरोखरीच जगाचा विसर पडला होता. मातृत्वाच्या ओढीपायी कितीतरी अतर्क्य, अमानवीय कृत्ये करणारी मंडळी आजही आपल्या अवतीभवती आहेत. मानवत हत्याकांडासराख्या भयंकर घटनेचे आपण साक्षीदार आहोत. पण या सिनेमातल्या मातृत्वाच्या अभिलाषेची आणि त्यामागील कोणा तिसऱ्याच्याच भयानक हेतूची वेगळीच असणारी वीण, तुम्ही फार सुंदर उलगडलीत..! खूप छान..!
Thank you Madan sir.
हा पूर्ण महिना फक्त मातृत्व हा विषय घेऊन लिहायचा असे ठरवले म्हणून चारही पोस्ट त्याच विषयाला धरून घातल्या तेव्हा अमोल पालेकर चा मानवत वरील सिनेमा डोक्यात होताच.
पण माता न तू वैरिणी या विषयावर लिहीन तेव्हा घालेन.
हा सिनेमा हिचकॉक कुळातला. सुरुवातीला मनोवैज्ञानिक नजरेतून वाटतो, मग उलगडा होत जातो तेव्हा धस्स होते.
जे ग्रुप यात दाखवले आहेत ते USA मध्ये कार्यरत आहेत ..त्यांनीच रोमन पोलान्स्की च्या बायकोचा खून केला असेही म्हंटले जाते ते अजून भयावह
जबरदस्त सिनेमा! अर्थपूर्ण समीक्षा. एरिक फ्रॉम यांच्या ‘Anatomy of Human Destructiveness’ या ग्रंथात या विषयाचा सखोल उहापोह केलेला आहे. चंगीझ खान, हुलागू, तैमूर, हिटलर, स्टालिन, हिमलर, हायड्रिश, माओ, पॉल पॉट, इदी अमीन, खोमेनी इत्यादी मंडळींचं अंतर्याम हे अजूनही न उलगडलेलं कोडंच आहे. त्याचं एक स्पष्टीकरण देण्याचा थरारक प्रयत्न पोलान्स्की यांनी त्यांच्या एकमेवाद्वितीय शैलीत केला आहे. बघणार हा सिनेमा.👍👌
गूढ शक्तींचा शोध घेण्याची प्रेरणा आणि त्याही पेक्षा तिला जागवण्याची प्रेरणा मला वाटते सर्वच धर्मात आहे. आपल्याकडेही तंत्र साधना आहे. जी साधना सुद्धा कदाचित सर्वसामान्य मानवाच्या आकलनाच्या पलीकडे आहे. त्यात कितपत तथ्य आहे कल्पना नाही पण जे दिसत नाही ते घडत नाहीच असे म्हणणे धाडसाचे आहे.
सिनेमा पहा ..कुठेही भयावह दिसत नाही …त्याची अदृश्य सावली मात्र जाणवते.
To reas you more and more.
It started from
“चाफा बोलेना – – -“
Please do keep reading . Thank you .
बघायलाच हवा आहे आता हा सिनेमा…👌👌
It’s must Rujuta. It was earlier available on Amazon Prime . check it out .
बापरे वाचत गेले खूप अतर्क्य. तू खूप छान लिहिलंय
It is . Watch this movie Rashmi . You will love it .
खूप छान लेख
Thank you Manjiri