“चार नोव्हेंबर तारीख मोकळी ठेव. यशवंत देवांवर जे पुस्तक लिहिले जात आहे त्याचा प्रकाशन समारंभ आहे. “
नितीन राणे काही दिवसांपूर्वीच भेटले होते. रवींद्र नाट्यमंदिरला कार्यक्रम होणार होता. तेव्हाच देवांची तब्येत तेवढी बरी नव्हती. “ अरे , मी असेपर्यंत करा रे ‘ हे थट्टेतले बोलणे , असे नकारार्थी खरे होईल , हे “आपुल्या हाती नसते काही, हे समजावे “ या गीताच्या संगीतकाराला समजले असेल का?
जो कार्यक्रम, त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीच्या गौरवाप्रीत्यर्थ होणार होता, त्याला आता श्रद्धांजलीचे रूप आले हे दुःख त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम राहील.
“ संगीत म्हणजे केवळ स्वरांची सरगम नाही. प्रत्येक रागात जे सूर आहेत , त्यांची विशिष्ट संख्या आणि मांडणी आहे, त्या मुळे, अनेक भावांचा अविष्कार झालेला आहे. हे ज्याला समजेल तोच संगीतकार होऊ शकेल “ असे रवींद्रनाथ टागोर यांनी म्हंटले आहे “ हे विधान देवांना लागू पडते. `शब्दांना अर्थाप्रमाणे संगीतबद्ध करणे ही त्यांची खासियत होती.
त्यांच्या पुस्तकात ते सांगतात , “ सुगम संगीतात शब्द हे चैतन्य आहे. ते नसले तर तो तराणा होईल. शब्द नीट उच्चारले गेले नाहीत, तर ते चैतन्यहीन ठरतील. संगीतकार आणि गायक , याला गीताचा आदर करणे आले पाहिजे. “
त्यांच्या सुरांत, गीतातील भावना ओतप्रोत भरून असल्याने देवांची गीते आज पिढ्यांपिढ्या रसिकांच्या हृदयात स्थान पटकावून आहेत.
त्यांच्या मला आवडलेल्या गीतांचा हा छोटासा आढावा.
ताई मला सांग, मला सांग, मला सांग
कोण येणार ग पाहुणे
आताच्या मुलांना ठरवून केलेले लग्न हा कन्सेप्टच मान्य नाही. कांदा पोहे तर कधीच मागे पडले आहेत.पूर्वी मुलगा बघायला येणार, या बातमीनेच, मुलीच्या घरची मंडळी खुश होत असत. चांगल्या घरी आपली मुलगी पडणार या आनंदात, आई वडील लग्नाच्या तयारीला लागत. होणाऱ्या वधूच्या मनावर तर त्याच्या वर्णनानेच मोरपीस फिरत असे. सुखी संसाराची स्वप्ने डोळ्यात वसतीला येत. अशावेळी तिची लहान भावंडे , मैत्रिणी तिला चिडवून नको नको करत .
हे सर्व देवांनी, जयंत मराठे लिखित “ ताई मला सांग , मला सांग , मला सांग , कोण येणार ग पाहुणे “ या गीतात पकडले. झिंगाट वर बेभान होणाऱ्या या नवीन पिढीला ह्या गाण्याची गोडी आणि खोडी समजणार नाही पण मोठ्या बहिणीला चिडवून, चिडवून हसवण्याची किमया या गीतानी पूर्वी केली आहे.
झाली झोकात वेणी फणी .नवीन कोरी साडी नेसूनी
ताई माझी जरी दिसे देखणी
गोरे गोरे पान , तेही आहेत सुंदर म्हणे
वेणी फणीचा झोक चालीत अगदी स्पष्ट उतरला आहे पण जेव्हा आशा ताई “ताई माझी जरी दिसे देखणी “ ह्या ओळीवर येतात तेव्हा मात्र त्यांचा आवाज हळुवार होतो. तो खोडकरपणा आवाजातून जाऊन , ताईचे कौतुक, अभिमान आणि आता ती जाणार त्याचे दुःख , असे सर्व सर्व काही त्याच्यात दाटून येते.
कृष्णा कल्ले यांच्या आवाजात देवांनी संगीत दिलेले एक सुंदर गीत आहे .
मन पिसाट माझे अडले रे ..
थांब जरासा ..
शरीरावर मेंदूचे, पर्यायाने बुद्धीचे नियंत्रण असते पण मनाचे काय !
ते नको तिथे झेपावते. त्याला कुणाचे भय नाही , ना धाक, ना लज्जा. एकदा का शरीराचा ताबा, अशा वाटेल तशा उधळणाऱ्या मनाच्या हातात गेला, की घसरणीला सुरुवात झालीच.
“ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे “ असे जरी म्हंटले, तरी त्या मनाच्या वेगाला, संयमाचा बांध हवाच.
म्हणून तर ना घ देशपांडे यांची नायिका म्हणते “ थांब जरा “ .
अडले रे या शब्दानंतर एक पॉज आहे आणि मग हे शब्द येतात , ते सुद्धा कळत न कळत अशा वजनाने.
“थांब जरा” हे थोडे बजावून सांगावे लागते. नाहीतर अवखळ मनाच्या कानापर्यंत ते पोचणारच नाही.
नुसतेच असे हे फिरणे,नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे
थांब जरासा ….
मनात कितीही विचारांचे काहूर माजले तरीही त्याला शब्दांची वाट दिसतेच असे नाही. मग फक्त गुदमरणे , घुसमटणे हातात उरते. हुरहुरणे नंतर चा जी हतबलता आहे, जो टाहो आहे, तो देवांनी अप्रतिम पकडला आहे.
नवथर प्रेमाचा अनुभव भावगीतात ठायी ठायी प्रत्ययास येतो. समाजिक बंधनांमध्ये गुदमरलेल्या , परंपरेत अवघडलेल्या स्त्री पुरुष प्रेमाच्या भावनांना वाट देण्याचे काम भावगीतांनी केले.
येशील येशील येशील राणी , पहाटे पहाटे येशील
तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन देशिल?
वसंत बापट यांनी लिहिलेले आणि अरुण दाते यांनी गायलेले हे गीत म्हणजे गेयता , शृंगाराची जाणीव , तिची मोकळी अभिव्यक्ती , मीलनाची नव्हाळी याचे अनोखे मिश्रण आहे. पुरुषांनी गायलेले असल्याने त्यात धिटाई आहे . येशील येशील येशील , या शब्दाच्या पुनरोच्चारात अधीरता आहे आणि नको ना रागाने पाहू या शब्दात विनवणी आहे. फास्ट पेस असल्याने, त्यात मिस्किलपणा पुरेपूर भरला आहे. चुंबन या शब्दातील “चुं” वर दिलेला जोर पहिला तर लक्षात येईल ..
चंद्र मावळेल, वाट दाखवेल , शुक्राचा टपोरा तारा
कोवळ्या क्षणाचे , जपून लक्षण , सांगेल कोवळा वारा
भानात नसून , गालात हसून , ललाट चुंबन घेशील
ह्या कडव्यात , स्वरांचा एवढा उत्तर चढाव आहे. आता देशील वरून , घेशील वर गाडी आली आहे म्हणजे भान हरपायला हवेच ना !
ते हरपणे सुरांत उतरले आहे. चंद्र मावळेल , वाट दाखवेल मधील अधीरता, शुक्राचा उल्लेख आला की फार हळवी होते. मन भरून आल्यासारखा तो हळवेपणा , वाऱ्याची साक्ष काढता काढता परत आतुर होऊन, आक्रमक होतो ,
देवांनी ही चाल कमाल बसवली आहे.
अरुण दाते आणि यशवंत देव यांचे गेल्या जन्मीचे भावबंध असावेत. मंगेश पाडगावकर यांच्या रसिक लेखणीच्या साहाय्याने या जोडीने असंख्य भावगीते केली. ती अतिशय गाजली . त्यांचा हात धरून माझ्या पिढीने ही प्रेमाची सफर अलगद पार केली .
“ दिवस तुझे हे फुलायचे , झोपाळ्यावाचून झुलायचे “ इथून सुरवात होते या प्रवासाची .
नवथर स्वप्नाळू वय असते ते. निसर्ग आपले काम करतो आणि तारुण्याची झळाळी चढून एका कोवळ्या मुलीचे तरुणीत रूपांतर होते. आपल्या तालात रमायचे हे वय. ते पाहूनच त्याचा जीव हरखतो .या गीतात हे भारावून जाणे आहे. वेडावून जाणे आहे पण लालसा नाही , अभिलाषा नाही. तिच्या कोवळ्या तारुण्याची प्रभा त्याला दिपवून टाकते.
थरारे कोवळी तार , सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे
“करायचे” याचा स्वर, तार सप्तकात गेला तरी त्यात आर्तता आहे , विनंती आहे .. त्या जखमी होण्यातली धुंदी सुद्धा आहे.
तारुण्याचे वरदान घेऊन आलेले हे दिवसच स्वप्नील. कल्पनेत दंगण्याचे. कुणामध्ये तरी गुंतण्याचे. कुणाचे तरी होण्याचे. अल्लड वेडे मन एवढे नाजूक आहे की सुरांचा भार ही त्याला सोसवत नाही.
म्हणूनच या गीतात आर्जव आहे, मागणी आहे पण ती सुद्धा हळुवार. होकार द्यावीशी वाटणारी.त्याच कैफात तो तिला सांगून जातो
“माझ्या घराच्या पाशी , थांब तू गडे जराशी”
हे “गडे” एवढे लाडिक आहे की त्या कल्पनेनेच तो बहरून उठतो आणि स्वतःलाच समजावतो ,
पापण्या मिटून भुलायचे
हे गीत प्रेमाची कोवळीक घेऊन येते. ही धुंदी काही एकतर्फी नाही. हृदय गमावणे आणि त्याला आपण कारणीभूत असणे ह्याची सुद्धा धुंदीच तर असते आणि जिंकण्याच्या कैफात ती चढते. मग चालण्यात विजेची चपळता येते, मान अलगद वळवून बोलताना , साधे बोलणे सुद्धा खट्याळ होते , डोळे नशिले होतात आणि स्वतःला सावरताना त्याची मात्र पंचाईत होते.
तो विनवतो आणि दटावतो ,
मान वेळावुनी धुंद बोलू नको
चालताना अशी , वीज तोलू नको
तिला आपल्या सुंदरतेची जाणीव आहेच आणि त्याची ही तारांबळ पाहून ती अजूनच तीव्र झाली आहे.
त्याचे “ नको “ ऐकून तर ती आव्हान दिल्यासारखी त्याच्याकडे रोखून बघते.
पाहणे हे तुझे,चांदण्याची सुरी
हाय मी झेलली आज माझ्या उरी
लाट मोठी फुटे, शीड माझे कुठे
ही दिशा कोणती कोण सांगेल गं ?
हा प्रश्न थोडासा तिला आणि थोडासा स्वतःलाच.
भुरळ घालणारा आवाज जेव्हा “ ही दिशा कोणती कोण सांगेल गं ?”अशी विनंती करतो तेव्हा खरेतर त्या दोघांची दिशा आता एकच झालेली असते तरीही देवांचे सूर तिला शपथेने बांधून ठेवताना म्हणतात,
मनातल्या मोर पिसाची शपथ तुला आहे
दिल्या घेतल्या वचनांची, शपथ तुला आहे
जन्मजन्मांतरीची ओळख पटते, आणाशपथा घेतल्या जातात, त्या शपथांची परीक्षा पाहण्याचा निर्णायक क्षण येतो आणि गीताची नायिका त्याला पुरून उरते. वादळरात्र, पावसाने थैमान घातले आहे, मार्ग दाखवणारा , आधार देणारा एकही दिवा नजरेला दिसत नाही तरीही भीतीचा स्पर्श सुद्धा तिच्या मनाला झालेला नाही. रीती रिवाज तिला बांधून ठेवू शकत नाही. कुणाचीही , कसलीही पर्वा न करता नायकाच्या कुशीत विसावलेल्या तिला पाहून कवीला शब्द स्फुरतात,
केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते.
प्रेमाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे. आनंद, सुरक्षितता , त्याग , ताकद. जे प्रेमिक एकमेकांना सहज भेटू शकत नाहीत त्यांच्यासाठी संयम. असंख्य अडचणीतून जेव्हा एकमेकांवर जीव जडवणारे जीवलग भेटतात, तेव्हा ती भेट अविस्मरणीय असते. तुझी माझी ह्यातील” झी “चा सूर हा लांबवलेला आहे. ती असोशी त्या लांबवलेल्या स्वरांनी अधोरेखित होते. पाडगावकरांबद्दल देव सांगतात, त्यांच्या गीतात ना अति स्पष्टपणा असतो, ना अति गूढता. जरासे धुके जाणवायला लागले की लगेच मोकळ्या आकाशाच्या खुणाही दिसू लागतात.
हे गीत धुंधकारलेल्या प्रेमाचे प्रतीक. यातील प्रेयसी साहसी आहे. समाजाच्या खोट्या रूढी –परंपरेला झुगारून नायकावरील प्रीतीसाठी सर्वस्वाचा त्याग करून आली आहे. निसर्गही समाजाच्या बाजूने असावा. वादळाचे थैमान , कडाडणाऱ्या वीजा, मिट्ट काळोख या कशाचीही पर्वा न करता ओढीने त्याला भेटायला येणारी ही नायिका आगळी. ही भेटही आगळी, म्हणूनच अविस्मरणीय.
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नांवगांव टाकुनि आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची
वरील कडव्यात “क्षुद्र”या शब्दातील स्वराला त्या तिरस्काराची डूब आहे. तशी ‘प्रेम’ ही एक तरल भावना त्याला स्वरांच्या कोंदणात गुंफणं कठीण असतं. पण यशवंत देव हे सहज करतात त्यामुळे त्यांचे गीत मराठी जनसामान्यांच्या भावनांचा ठाव घेतं.
या गीतातील “ सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची” यातील भोवळ हा शब्द ऐकला तर , भावगीताला केवढ्या उंचीवर अरुण दाते आणि यशवंत देव यांनी यांनी नेवून ठेवले आहे याचा प्रत्यय येईल.
नजरेच्या खेळापासून सुरु झालेला हा प्रवास “ जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली “ , “ डोळे कशासाठी , तुला साठवून मिटून घेण्यासाठी” , “दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुला आहे” , ते “ डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी “ या समजूतदार वळणावर येऊन थबकतो आणि सुरु होतो शेवटचा टप्पा.
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला , अधुरी एक कहाणी
प्रेमात असणाऱ्यां दोन जीवांसाठी विरहाची वेदना मृत्यूहून सुद्धा असहनीय असते. हा विरह जर थोड्याच काळासाठी असेल तर त्याला परत पाहण्याची खात्री , वेळेवर मात करते . ..But if the cause of separation is death or divorce ,the intense emotional pain that comes along with it is very difficult to overcome…..The poet in Tennyson said ” It was better to have loved and lost, than never to have loved at all” Yet the pangs of separation are more intense than sweetness of love.
विरहाची सारी आर्तता आणि दुःख, देवांच्या “ अर्ध्यावरती डाव मोडला , अधुरी एक कहाणी “ या ओळीत साकाळून आले आहे. हा विरह मृत्यूमुळे आहे का ताटातुटी मुळे ? पाडगावकरांना निश्चित काय अभिप्रेत आहे मला माहित नाही.
भातुकली म्हणजे लुटूपुटूचा संसार. घरसंसाराच्या बांधणीचे शिक्षण लहान मुलांना या खेळातून सहज मिळायचे. घरातील
नाती जपण्याचे ते बाळकडू होते. आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ कशी निभावायची हे हसत खेळात समजवणारा संस्कार होता तो. या गाण्यात भातुकली म्हणजे दोघांचे हसते खेळते सांसारिक आयुष्य. कसल्यातरी आघाताने ते विस्कटून जाते. कदाचित पत्नीचा मृत्यू असेल कदाचित तिचे लग्न कुणा दुसऱ्याबरोबर झाले असेल ? सनईचा वापर करून देवांनी या गीताच्या गाभ्याला स्पर्श केला आहे.
देवांची काही गीते अशी भावनांचा कल्लोळ निर्माण करणारी असली तरी निरोपाच्या अनेक सुंदर गीतांना साजेशा अशा तक्रारीचा सूर “नसणाऱ्या” चाली त्यांनी दिल्या आहेत.
त्यांची काही गाणी ऐका.
अखेरचे येतील माझ्या ..या गीतातली शेवटची ओळ
“ डोळ्यातून माझ्यासाठी लाव दोन ज्योती “ 
या गीतात प्रेमाला पूर्ण शरण जाऊन केलेले समपर्ण आहे. प्रेम असफल झाल्याची वेदना स्वरास्वरातुन डोकावत असली तरीही प्रेमचं आयुष्याला सार्थकता देते हा झालेला समजूतदार साक्षात्कार या गीतात आहेच.
प्रेमाला जशी भरती असते तशी ओहोटी सुद्धा असतेच. अंतराने असेल , मनाच्या दुराव्याने असेल किंवा अतिपरिचयात चा शाप मिळाल्याने असेल , कवी म्हणतो ,
रोखुनी पलकांत पाणी घाव सारे साहिले
अन सुखांच्या आसवांचे मीठ डोळा साचले
या घडीला मोतियांचा घास तू मागू नको
मागू नको यात , जे घडते आहे ते शांतपणे स्वीकारण्यासाठी केलेली कळकळीची विनवणी आहे .
कधीच जवळ न येण्याच्या निर्णयाच्या गोष्टी आता घडून गेल्या आहेत. निरोप घेतलेला आहे. एरवी जे हवेहवेसे वाटते त्याची आठवण येण्यासारखे दुसरे रम्य ते काय असणार ! पण हे नाते स्वप्नातच राहिले आहे . वास्तवात त्याला स्थान नाही. दोन आयुष्ये कायमची आपल्या दिशेने निघाली असताना डोळ्यात पाणी आणून त्याला अडवायचे कशाला ?
प्रेमाचा स्वीकार सहज साधेपणाने करणे ही फार अवघड गोष्ट आहे. प्रेम एकटे येत नाही. आनंदाबरोबर, समस्या, ताण यांचा गुंता घेऊन येतो. त्याला धीराने समोर जावे लागते. अनेकदा एकाच्या मनातील प्रेम आटते. एकाची वाट बदलते. तो वेगळ्या दिशेने फुलत जातो . दुसरा मात्र त्यातच अडकलेला असतो. हात सुटतात पण मनाचा गुंता तसाच उरतो. खालील गीत अशा एकट्या पडलेल्या पण त्या एकाकीपणाचा समजूतदारपणे स्वीकार केलेल्या मनाचे आहे.
डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी
काही नाती रक्ताच्या पलीकडली. चौकटीत न बसणारी. ह्याचा उच्चार सुद्धा कठीण. केवळ जगाची भीती हे कारण नसते. कधीकधी स्वतःच्या मनाला आवर स्वतःसाठी सुद्धा घालणे क्रमप्राप्त असते. अशावेळी ही समजूतदार जाणीव दुसऱ्याला सुद्धा न दुखावता , न रागावता करून द्यावी लागते.
वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी
गाण्याचा उदास मूड “पूर्वा कल्याण”च्या मदतीने अधोरेखित होतो इथे. “सांगू नको कहाणी “हे सूर वरचे . त्यात आर्जव आहे, आर्तता आहे आणि त्या पेक्षाही कळकळीची विनंती आहे.
भावगीत म्हणजे मानवी भावविश्व. मुग्ध, मुक्त , स्पष्ट , संयमी अशा अनेक भावभावनांची सरगम इथे सामावली आहे. शब्द हा भावगीतांचा पाया तर स्वर ही इमारत असते. सुगम संगीत हे अक्षराधिष्टित आणि भावाधिष्टित असल्याने , गायकाची दोस्ती, केवळ अक्षरांशी नको तर भावनांशी सुद्धा असली पाहिजे हा देवांचा आग्रह असायचा . हे प्रतिबिम्ब त्यांच्या सर्व गीतांत दिसते.शास्त्रीय संगीताचा योग्य वापर , गायकाच्या आवाजाचा पोत ओळखून केलेली चाल आणि त्याला पोषक वाद्यवृंद, असलेले माझे अतिशय आवडते गीत आहे,
मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी
आपुलीच साथ कधी करित चाललो
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फ़ुलाफ़ुलात चाललो
संतुष्ट , समृद्ध , सर्वंकष आशयानी शिगोशीग भरलेल्या मनाचे हे गीत आहे.
काव्यात ओतप्रोत भरून राहिलेल्या भावनांचे हुबेहूब चित्र उभे करणारे, नव्या जुन्याचा समन्वय साधणारे , भावदर्शी स्वरांचा योग्य उपयोग करणारे चिंतनशील संगीतकार म्हणून यशवंत देव कायम रसिकांच्या हृदयात राहतील.
Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

संगीतकार यशवंत देव म्हणजे मराठी भावसंगीताच्या नभांगणातील एक तेजस्वी स्वरनक्षत्र! शब्दांना सुरांची आणि भावनांना संगीताची सुंदर किनार देण्याचं अद्भुत सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेत होतं. त्यांच्या चालींनी मराठी गीतांना एक वेगळीच भावगर्भता, नजाकत आणि अर्थपूर्णता दिली. त्यांचं संगीत म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात अलगद झिरपणारा स्वरानुभव, जो काळाच्या ओघातही सदैव ताजा राहील! 🌹