Skip to content

शिशिरानंतर येणार वसंत –Pookalam 

शिवाजी पार्कला जेष्ठ नागरिकांसाठी एक बाग  राखून ठेवली आहे. अनेक जोडपी येथे फिरायला येतात. साधारण सत्तरीच्या जवळपास आलेली, लग्नाला चाळीस हुन जास्त वर्ष झालेली जोडपी. काहींना काठीची गरज लागते तर काहींसाठी एकमेकांची घट्ट पकड , काठीचे काम करते. संध्याकाळी, ज्याचा वाढदिवस असेल, ती व्यक्ती, इतरांसाठी आवर्जून काही खायचे पदार्थ आणते. साधेच , एखादा सामोसा , वडा , बर्फीचा तुकडा. मग हळूच लटका वाद सुरु होतो. ए, साखर वाढली आहे बरे , कमी घे;  किंवा अहो , किती ठसका , हळू घ्या की. टोन कडक असला तर त्यातली काळजी लपत नाही.
निघताना , ज्याला गरज असेल , त्याला दुसरा हात देतो . हे दृश्य पाहताना माझ्या मनात येते, माझाही ,माझ्या जोडीदाराबरोबरचा प्रवास असाच असावा.
वाटताना कितीही सहज सुंदर वाटले तरी कुणाचेही आयुष्य म्हणजे उतार चढावाची वाट असते. किती वेळा चुका होतात, मने दुखावतात, माफी मागितली जाते , दिली जाते तेव्हा कुठे केस पिकले तरी मन मात्र हिरवेगार राहते . प्रसन्न आणि  समाधानी .
गणेश राज दिग्दर्शित, पुकलम (Pookkaalam) हा सिनेमा, अशाच एका जोडप्याची कहाणी आहे; ज्यांनी एकमेकांबरोबर ऐंशी वर्षाहून जास्त काळ एकत्र घालवला आहे. 

या सिनेमाचा नायक आहे इट्टूप (Ittoop)आणि नायिका कोचूथेरेसिया (Kochuthresia). आपण त्यांना आजोबा आणि आजीचं म्हणूया. ह्या सिनेमाची कथा म्हणजे याच आजोबा आणि आजीचा सहप्रवास.
शंभरीला जवळ आलेली ही पिकली पाने. ह्या सहवासाची त्या दोघांना एवढी सवय झालेली आहे की सकाळची उगवणारी पहाट सुद्धा एकट्यासाठी उगवत नाही.

त्यांच्या नातीचा, एल्सीचा  साखरपुडा आहे.

एल्सी म्हणजे आजोबांच्या सर्वात धाकट्या मुलीची, (एल्सम्मा)ची मुलगी. एल्सम्माला अजून एक मुलगा आहे , जो येथील चर्च मध्ये पाद्री  आहे.व्हॅटिकनला जाणे हे त्याचे ध्येय आहे तर एल्सीला फक्त श्रीमंत मुलाशी लग्न करून , चांगला संसार करायची इच्छा आहे. एल्सीच्या बाबांना, वेणूला स्टार्ट अप मध्ये खूप इंटरेस्ट. काहीतरी नवीन करायचे हा छंद. आतासुद्धा तांदळाचे गोड मोमो करायचे मशीन त्यांनी बनवले आहे , भले ते मोमोज काही ठीक बनत नाही पण त्यांचा उत्साह काही कमी होत नाही.
हळूहळू, सगळे कुटुंब आजोबांच्या घरात जमायला सुरुवात झाली आहे. आजोबांची मोठी मुलगी, आलाम्मू, बरोबर राहते. तिला विस्मरणाचा रोग झाला आहे पण आधी ती घरचा  व्यवसाय संभाळण्याएवढी हुशार होती.
त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे  पण ती  आपल्या पायावर उभी आहे.  वडिलांच्या रबर फॅक्टरीचे काम फार हुशारीने सांभाळत आहे. येथे काम करणाऱ्या  प्रौढ बायकांना ती शिकवते.  
तिच्या दोन जुळ्या मुलींने, दोन जुळ्या मुलांशी लग्न केले आहे.तिला नातूही आहे; ज्याचे नाव आहे गिनीस.  

या सर्वानाच आजी आणि आजोबांच्या एकमेकांवरील प्रेमाचे कौतुक आहे आणि का नसावे !  आजीला नवीन साडीत पाहून आजोबांच्या डोळ्यात आताही प्रेम आणि कौतुक दिसत असेल तर ती केवढी मोठी गोष्ट आहे. अजूनही रोमान्स जागा आहे. 

कोणत्याही शुभकार्यात काहीतरी वावगे होतेच तसेच आताही एल्सीचे,  साखरपुड्यासाठी आवश्यक असणारे ऍफिडेव्हिट मिळत नाही. मुहूर्त तर जवळ आला आहे आणि कोणत्याही क्षणी नवरदेव येईल. ही शोधाशोध सुरु होते.
“आताच तर केलेले आहे , माळ्यावर कसे काय असेल?” आजोबा चिडतात आणि बरोबरच आहे ते . शेवटी मेरीच्या फोटोच्या पाठी ते मिळते. घरातील लोक हुश्श करतात पण याच बरोबर अजून एक गोष्ट मिळते. माळ्यावरील वस्तूची उलथापालथ करताना , खूप  वर्षापूर्वीचे जुने पत्र खाली पडते  आणि नेमके ते आजोबांच्या हाताला लागते.
पत्र आजीच्या नावाने असते, लिहिणारा असतो , कोचुजोसेफ.
त्यात लिहिलेले असते,
नक्की कुठून सुरुवात करू ? तुला असे काही जणांनी म्हंटले असेल पण सहज एवढी गोष्ट सांगायला मी काही इतरांसारखा मूर्ख नाही. आपण दोघानी जे अनुभवले आहे ते  मित्रत्वाच्या नात्याच्या पलीकडील आहे . तुझ्या मुलींसकट मला तू हवी आहेस आणि मला माहित आहे की तुझ्या मनात माझ्याबद्दल सुद्धा ह्याच भावना आहेत.
हे काही साधे सुधे नाही तर आजीला, तेही तिच्या लग्नांनंतर आणि मुलींची आई झाल्यानंतर, कुणा एकाने पाठवलेले प्रेमपत्र असते.

साखरपुडा तर होतो पण आजोबा सर्व समारंभात अतिशय अस्वस्थ आणि रागात  असतात.
पण का ? कुणालाच उमजत नाही.
“ उद्या मला तुम्हाला काही सांगायचे आहे , सकाळी , तुमच्या नाही बरे, माझ्या सकाळी तुम्ही डायनींग हॉल मध्ये या “
सर्वच मंडळी विचारात पडतात , आजी तर खडसावून विचारते पण आजोबा काहीही बोलत नाहीत.
सकाळी ते सर्व मंडळींना पत्र दाखवतात.
आजीचे अफेअर ? कसे शक्य आहे ? पन्नास वर्षापूर्वीचे पत्र मग त्याचे आता काय ? सुरुवातीचे कुतूहल मस्करीत बदलते.
बघू तरी कोण ? त्याचे नाव काय ? आजोबा , मग आता तुम्ही काय करणार ? 
हसण्या खिदळण्यात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर “ घटस्फोट “ हे मात्र कुणीही अपेक्षिले नसते.
हसरे खेळते घर गप्प होते. शंभरीच्या उंबरठ्यावर आता कसला घटस्फोट, घराण्याची लाज जाईल, एल्सीचे लग्न मोडेल, आजीचे काय होईल ? अनेक प्रश्न पण “ एवढी वर्षे मी एक खोटा संसार करतोय , माझे काय “ आजोबांचा हा प्रश्न खरंच का बिनमहत्वाचा आहे ?
या सर्वात आजी गप्प आहे. 
“ मुलांच्या आणि नातवंडांच्या समोर  उघडे पाडताना , मला एकदा  तरी विचारावेसे नाही वाटले तुला ? आतापर्यंत मी तुझे सगळे ऐकत आले , आता तुझ्या इच्छेसाठी कोर्टात सुद्धा येईन “ ती एवढेच बोलून गप्प होते.
तिच्या मनातले दुःख एल्सीला समजते. ज्या आजी आजोबांच्या प्रेमाचा तिला अभिमान असतो त्याचीच वाताहत, आजीचे  मूक अश्रू तिला अस्वस्थ करतात पण करणार काय !
त्या छोट्याश्या गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरते.  कुणी आजीला नाव ठेवते, कुणी आजोबांना वेडे म्हणते, एल्सीची सासू लग्न मोडायला निघते, चर्चचा बिशप, आजोबांच्या नातवाला फोन करून , आजोबांना समजावून सांग अशी आज्ञा देतो नाहीतर व्हॅटिकन विसर अशी धमकी देतो , गावातले वकील केस घ्यायला नकार देतात पण आजोबा मात्र ठाम असतात.
अशावेळी त्यांच्या मदतीला येतो ऍडव्होकेट जिक्कुमन.

वकिली चालत नाही म्हणून तो दूध विकण्याचा धंदा करत असतो पण आजोबांची ही केस त्याच्यासाठी प्रसिद्ध आणि यशस्वी होण्याची संधी असते. जिक्कुमनचा युक्तिवाद काही कोर्टात टिकत नाही. केवळ एका पत्राच्या आधारे एका बाईच्या चारित्र्यावर आपण कसे  शिंतोडे उडवू शकतो !
हा कोचुजोसेफ.नक्की कोण आहे , हे शोधल्याशिवाय केस तर पुढे सरकणार नसते.   जिक्कुमन आता त्याच्या पाठी लागतो.
त्याला मदत करते ती एल्सी. आजोबांना खरे कळल्याशिवाय ते मागे येणार नसतात आणि जर ते आलेच नाही तर एल्सीचे लग्न मोडण्याचा धोका असतो.

खरंच दोन व्यक्तींच्या सहजीवनात आलेल्या या वादळामागचे सत्य नेमके काय असते ? 
आपल्या एकुलत्या एक मुलाच्या अकस्मात झालेल्या अपघाती मृत्यूने  इट्टूप सैरभैर होतो. आधीच त्याला मुलींपेक्षा सुद्धा मुलगा प्रिय , आता तर त्याला मुली नकोश्या होतात, तो दारू प्यायला लागतो, कर्जबाजारी होतो. कोचूथेरेसिया बिचारी आपल्या मुलींच्या मदतीने संसार चालवत असते पण नवऱ्याशी असलेले भावनिक बंध तुटलेले असतात.  अशावेळी कोचुजोसेफ, जो शाळेत शिक्षक असतो, तो तिच्या  मुलीच्या शिक्षणासाठी मदत करतो. त्या निराधार , एकाकी अवस्थेत तिचा मानसिक आणि भावनिक आधार बनतो . कुठेतरी त्या दोघांच्या मध्ये विश्वासाचे नाते निर्माण होते. आणि कोचुजोसेफच्या मनात प्रेमाचे अंकुर फुटतात. तो तिला मागणी घालतो पण आपली कौटुंबिक जबाबदारी , नवऱ्यावर असलेले प्रेम आणि कर्तव्याची जाणीव यामुळे कोचूथेरेसिया आपल्या घराचा उंबरठा ओलांडत नाही ,
पदर खोचून ती आपल्या संसारासाठी उभी राहते . नवऱ्याचे व्यसन  सोडवते आणि आपला संसार परत उभा करते.
मग यात तिचा खरंच दोष असतो का ?
चित्रपटाचा शेवट सुखांत आहे पण त्याही पेक्षा महत्वाचे आहे ते आपला अहंकार विसरून इट्टूप ने आपल्या पत्नीचा हात परत पकडणे.

गणेशराज यांच्या सिनेमाचा यूएसपी ( unique selling proposition) आहे तो म्हणजे प्रेक्षकांना आनंद देणे. सिनेमा बघताना सुद्धा रडू आलेच तर ते आनंदाश्रु असतात आणि पूकलम हा सिनेमा त्याला अपवाद नाही.
आयुष्याची संध्याकाळ आलेल्या  या जोडप्याचे सहजीवन आणि कुटुंबातील व्यक्तींचा आपापसातील बंध  छोट्या छोट्या गोष्टीतून दिसतो.
गेली सत्तर वर्षे , बायकोला आवडते म्हणून तांदुळाचे मोमोज दोघांनी अत्यंत आवडीने खाणे, नेहेमीप्रमाणे आजोबानी अलार्म वाजला तरी न उठणे , आजीने बंद करून आजोबांना दटावणे आणि आजोबानी आजीची काहीतरी मजेशीर बोलून समजूत काढणे, आजीने गोळ्या घातल्या का याची खात्री करून घेणे , नातीने आजोबांची दाढी करणे , आजोबानी आपल्या अल्झायमर झालेल्या मुलीचे केस बांधणे , आजोबांच्या निर्णयावर नाराज असले तरी त्यांच्या मताचा मान राखणे , आजीला मानसिक आधार देणे अशा अनेक गोष्टीत कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांप्रती असलेले प्रेम दिसते.
यातील वकील आणि न्यायाधीश यांचा रोल जरी विनोदी असला आणि त्यामुळे या गंभीर सिनेमात हास्याची कारंजी फुटत असली तरी ते दोन्ही रोल अतिशय महत्वाचे आहेत. 

आपण कोणत्याही वयात गैरसमजाने , अहंकाराने आपल्या आयुष्याचा नाश  करून घेऊ शकतो आणि मनात आणले तर सर्वनाश होत  असताना सुद्धा प्रेम, विश्वास आणि एकमेकांना क्षमा करण्याएवढा मनाचा मोठेपणा दाखवून आपले आयुष्य परत सुखमय करू शकतो याचा धडा हा सिनेमा देतो  सिनेमाचा विषय गंभीर असला तरी त्यावर विनोदाची पखरण असल्याने it has become a romantic comedy.  
असे म्हणतात की वयाने शहाणपण येते. अनुभवाने माणूस प्रगल्भ होतो आणि सहवासाने प्रेम वाढते . तीनही गोष्टी आपापल्या नजरेतून बरोबर आहेत पण त्या बरोबर महत्वाचे असते ते दुसऱ्याला समजून  घेण्यासाठी कधीतरी आपण लहान होणे , चुकांचा हिशोब करताना,  स्वतःकडे सुद्धा तटस्थ नजरेने पाहणे आणि वेळ आली तर अहंकार सोडून क्षमा मागणे आणि क्षमा करणे . .पुकमल हे दाखवण्यात यशस्वी झाला आहे.

इट्टूप आणि कोचुथेरेसिया यांचे रोल अत्यंत महत्वाचे आहेत कारण हे दोन्ही रोल फार गंभीर आहेत. विजयराघवन यांना यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालेलं आहे. सत्तरीत असताना हा रोल करणे कठीण . केवळ मेकअपने हे साध्य  होत नाही.
भावनांचा कल्लोळ दाखवताना , मग तो राग असो, प्रेम असो , पश्चाताप असो , हतबलता असो , त्यांच्या चेहेऱ्यावरील रेषा न रेषा हलतात. त्यांच्या हालचालीत वृद्धपणाने आलेला संथपणा आहे आणि वयाला न शोभणारा उतावीळपणा .
“ कधीही सॉरी न म्हणणाऱ्याला सॉरी म्हणणे खूप कठीण असते “ असे जेव्हा ते आपल्या पत्नीला म्हणतात , तेव्हा सारे प्रेक्षक सुद्धा या तिरसट माणसाला क्षमा करतात.

के पी ए सी लीला यांची साथ सुद्धा तेवढीच ताकदीची आहे. सुरुवातीची शांत , नवऱ्याला नेहेमी समजून घेणारी, त्याची मस्करी करणारी , त्याचे ऐकणारी लीला , पतीच्या या मागणीने प्रथम घाबरते , नंतर स्तब्ध होते , मग एका कठोर निश्चयाने, स्वतःची अजाणता झालेली चूक सुद्धा कबुल करते.
“भले मी माझ्या अहंकारामुळे आज जर चूक मानली नाही तर देवाच्या दरबारात माफी मागण्याचा मला अधिकार नाही . कारण काहीही असो , काही काळासाठी का असेना मी मनातून घसरले “
तिच्या या मोठेपणानेच इट्टूप हलतो , आपली चुक त्याला उमजते  आणि तिच्याशिवाय राहता येणार नाही याची जाणीव होऊन तो परत तिला लग्नाची मागणी घालतो . 
A must watch movie for all.

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

,

1 thought on “शिशिरानंतर येणार वसंत –Pookalam ”

  1. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ☘️
    अनुभव, सहवास, भावनिक गुंतवणूक, मानसिक चढउतार, विश्वास आणि तुजविन गमेना ही भावना….संमिश्र भावनांचा संयत, मनोवेधक अनुभव म्हणजे पुकल्लम्!
    काय सुरेख लिहिलंय प्रियादी.
    Really must watch movie. Definitely see it.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *