Skip to content

हिचकॉकला सस्पेन्सचा बादशहा हा ‘किताब मिळवून देणारा -सायको 

एका जुन्या पुराण्या हॉटेलची बाथरूम असते ती.
ती आत येते. हातात चुरगळलेला कागद, चेहेऱ्यावर स्पष्ट दिसणारा ताण. कोपऱ्यात असलेल्या टॉयलेटमध्ये मुठीतला कागद टाकून ती फ्लश ओढते. पाण्याबरोबर तोसुद्धा तळाशी जातो. आता सुटकेचा निःश्वास तिच्या चेहेऱ्यावर प्रतिबिंबित होतोय. ती शॉवर कडे सरकते. बाथरोब काढून टॉयलेटच्या सीटवर ठेवते.पायातल्या स्लीपर्स बाजूला उडवते. हालचालीतला मोकळेपणा आता वाढलाय. कॅमेरा तिच्या उघड्या पायावर स्थिरावतो. बाथटब मध्ये शिरून ती पडदा लावते. आता तिची आकृती धूसर होते. शॉवर सुरु होतो. तिचा चेहेरा पाण्याच्या दिशेकडे वळला आहे. पाण्याचे तुषार तिच्या चेहऱ्यावर उडतात.
तो थंड स्पर्श बरेच काही धुवून टाकणारा.शरीराबरोबर, मनातली धूळ सुद्धा साफ करणारा.  त्याचे पडसाद तिच्या स्मित हास्यातुन जाणवतात.
उजवा हात , डावा खांदा, एक एक अवयव पाण्याच्या वर्षावाखाली चिंब भिजतोय, रंध्रे मोकळी होतायत,  तिचे ओठ विलग झालेले, डोळे मिटलेले, भिजलेले अनावृत्त शरीर प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात यशस्वी होतंय.

त्याचवेळी बाथरूमचा दरवाजा उघडतो, एक अस्पष्ट आकृती हलक्या पण निश्चित पावलांनी शॉवरकडे सरकते. पडदा सरकवला जातो. आता दिसतो एक अनोळखी चेहेरा, उंचावलेला हात, पकडलेली धारदार सूरी,  रोखलेले डोळे आणि आसुरी आनंदाने विचकलेले दात.
शृंगारिक, चेतावणारे दृश्य पाहायला मिळेल या कल्पनेत असणारा प्रेक्षक दचकतो. 

पडद्यावर ती सुद्धा. चेहेऱ्यावरचे हास्य मावळलंय .तोंड उघडच  कोणत्याही क्षणी त्यातून आवाज फुटेल ..
धारदार सुरीने पडदा कापून टाकलाय. तिचा हात सूरी अडवायला पुढे येतो. शेवटची निष्फळ धडपड सुरु होते. अंगावर झालेले वार, हळूहळू  विझत जाणारे  डोळे आणि  निष्प्राण देहाखालून बाथ टबच्या ड्रेनेज मध्ये जाणारे रक्ताचे थारोळे.

थिएटरमध्ये असे एकही कुणी नसेल ज्याचे हृदय त्या पाच मिनिटांत बंद पडण्याच्या जवळ गेले नसेल. संध्याकाळी सात वाजता रिगल थिएटर  मधून बाहेर येताना, कितीतरी वेळा मी पाठी वळून पाहत होते.
१९६० मधे  प्रदर्शित झालेला सायको  हा हिचकॉकचा  सत्तेचाळिसावा चित्रपट पण या  चित्रपटाने त्याला  भूतो न भविष्यती  प्रसिद्धी दिली. सस्पेन्सचा बादशहा हे बिरुद ही दिले .
चित्रपटाची  सुरुवात  होते  ऍरिझोना या  शहरात.
फिनिक्स, ऍरिझोना मधली ती टळटळीत दुपार. कॅमेरा हॉटेलच्या खिडकीमधून दिसणाऱ्या दृश्यावर स्थिर झाला आहे. आतमध्ये एका जोडप्याचा शृंगार रंगात आला आहे. 

पेटलेल्या शरीरांना लग्नाची मान्यता नाही.  सॅम लुईस ( John Gavin)हा घटस्फोटित आहे पण पोटगी साठी लागणारे पैसे त्याच्याकडे नाहीत. त्यामुळे त्याला मेरिअनशी ( Janet Leigh) लग्न करणे शक्य नाही. हा काळ  आहे साठीच्या दशकाचा.
नायिकेला लग्न करायची आत्यंतिक इच्छा असूनही, ते सध्यातरी अशक्य  आहे. प्रेम काहीही घडवून  आणते. ज्या ऑफिसमध्ये मेरिअन काम करते, तिथून  ती चाळीस हजार डॉलर लंपास करते.
सॅम कडे जाऊन ह्या पैशाची विल्हेवाट लावता येईल, आपले लग्न होईल या आशेने ती पलायन करते तर खरे पण रस्ता चुकते. 

पाऊस मी म्हणतोय, मिट्ट काळोख आणि पाठीवर जाणवणारी पोलिसांची सावली मेरिअनला भेडसावत असते. 

कुठेतरी आश्रय घेऊया का असे वाटत असतानाच एक छोटेसे मोटेल तिच्या नजरेला पडते.
ऑफिसमध्ये  कुणीच  नसते पण शेजारच्या  खोलीत एक  म्हातारी असते.
तिचा हॉर्न ऐकून मात्र त्या  पेंगुळलेल्या मोटेलला जाग येते  आणि नॉर्मन  बेटस (Anthony Perkins) नावाचा एक तरुण देखणा माणूस तिला दार उघडतो . एक  खोलीही देऊ करतो. खोली घेताना, मेरिअन खोटे नाव घेते.
नॉर्मन तिला रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण देतो.
आजूबाजूची प्रॉपर्टी पाहताना, मेरिअनच्या कानावर त्या म्हातारीचे शब्द पडतात. ती नॉर्मनची आई असते. “I won’t have you bringing some young girl in for supper! By candlelight, I suppose, in the cheap, erotic fashion of young men with cheap, erotic minds”
चोरीचे ओझे मनावर बाळगत  असलेली  मेरिअन,  नॉर्मनच्या आईच्या  आरोपाने अजूनच खचते.
एकत्र जेवण घेताना, नॉर्मन मेरिअनला स्वतःबद्दल माहिती देतो.  तो taxidermist आहे.

म्हणजे असा  व्यक्ती जो,  मृत प्राण्यांचे मृतदेह टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या कातडीत रासायनिक प्रक्रिया करतो आणि त्यात कृत्रिम सांगाडा व भुसा भरून त्यांना नैसर्गिक आकार देतो.
आईच्या बोलण्याने मेरिअन दुखावली आहे असे जेव्हा त्याला समजते, तेव्हा तो मेरिअनची समजूत काढतो.” आई , मानसिकरीत्या आजारी असल्याने ती असे बोलून गेली, खरेतर ती साध्या माशीला सुद्धा इजा करणार नाही”
आईच्या  वतीने तो क्षमा सुद्धा मागतो. तो तरी काय करणार ! आईला त्याच्याशिवाय कुणाचाच  आधार नाही.
तिची समजूत घालताना तो म्हणतो, “You know what I think? I think that we’re all in our private traps, clamped in them, and none of us can ever get out. We scratch and we claw, but only at the air, only at each other, and for all of it, we never budge an inch.”
आईचा त्याला राग ही येतो आणि आईपासून दूर जाणे त्याला शक्य नाही .कर्तव्य आणि प्रेम यातही  माणसे ट्रॅप होतात.अडकतात.
मेरिअनला सुद्धा हे लागू आहे. तिचे प्रेम , तिला चोरी करायला मजबूर करते. या अपराधीपणाच्या भावनेत ती सुद्धा अडकली आहे. क्षणिक मोहापायी आपण केलेल्या चोरीबद्दल मेरिअन पस्तावते आणि दुसऱ्या दिवशी परत जाऊन पैसे परत करायचे ठरवते. 

या  नंतर  जे घडते  त्याची  प्रेक्षकांनी  निश्चितच  कल्पना  केली नव्हती .  सायको मधले  शॉवरचे  कुप्रसिद्ध दृश्य  इथे  सुरु  होते  आणि  चित्रपटाची मुख्य नायिका,  सिनेमा अर्धा संपतानाच मरण पावते. ह्या  सीन मध्ये कुठेही जखमा नाहीत फक्त ड्रेनेजमध्ये होणारे रक्त आणि पडद्याभर व्यापून राहिलेला निष्प्राण डोळा.
झालेल्या आरड्याओरड्यामुळे नॉर्मन, काय झाले ते पाहायला मेरिअनच्या खोलीत येतो. आतमध्ये असतो तो तिचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, निष्प्राण नग्न देह.
आईने मेरिअनचा  खून  केलेला  आहे हे  नॉर्मनला  समजते पण  ती शेवटी  त्याची आई  असते. तिला वाचवण्यासाठी  तो मेरिअनच्या प्रेताची  विल्हेवाट  लावतो. झालेल्या हल्ल्याच्या सर्व खुणा पुसून काढतो.  मेरिअनचा देह, तिच्या  सर्व सामानासकट, तिच्याच गाडीत ठेवून , ती गाडी तो जवळच्या दलदलीत ढकलतो. 
इथे मेरिअन गायब झाल्याने, तिच्यावर चोरीचा संशय येतो आणि त्या पैशाचा शोध लावण्यासाठी कंपनीचा मालक एका गुप्तहेर, मिल्टनची मदत घेतो. याचवेळी मेरिअनच्या शोधात आलेली तिची बहीण लीला, ती गायब झाल्याची बातमी तिच्या प्रियकराला  देते. मिल्टनची भेट झाल्यावर त्यांना आता मेरिअनची काळजी वाटू लागते आणि हे तिचा शोध घेण्यासाठी  निघतात.

हा गुप्तहेर, मार्गावरील, प्रत्येक हॉटेल आणि मोटेल मध्ये शोध घेत शेवटी नॉर्मनच्या मोटेल मध्ये पोचतो.  बोलण्याच्या ओघात, गेल्या तीन आठवड्यात  इथे कुणीच आले नाही असे नॉर्मन सांगतो खरा पण रजिस्टरमध्ये मारी सॅम्युअल्स हे नाव पाहून मिल्टनला नॉर्मनचा संशय येतो.
नॉर्मनच्या  उडवाउडवीच्या उत्तराने तो त्याच्या आईशी बोलण्याचा आग्रह धरतो पण नॉर्मन नकार देतो.
मिल्टन तिथून निघतो खरा पण परत जायचे पक्के करतो. त्याआधी लीला आणि सॅमला फोन करून जे घडले त्याची माहिती देतो. 
दुसऱ्या दिवशी घरात शिरण्याचा प्रयत्न करत असतानाच एका व्यक्तीकडून त्याचा खून होतो.

इथे त्याची वाट पाहत असलेले लीला आणि सॅम, गुप्तहेर सुद्धा संशयास्पदरित्या गायब झाल्याचे कळल्यावर, येथील शेरीफकडे जाऊन तक्रार करतात. त्याच्याशी झालेल्या बोलण्यात त्यांना समजते की नॉर्मनच्या आईचा तर  दहा वर्षांपूर्वीच मृत्यू झालेला आहे. तिचे एका व्यक्तीबरोबर संबंध असतात पण तो विवाहित आहे हे समजल्यावर ती त्याचा खून करून , आत्महत्या करते.
मग ती स्त्री कोण !!
गुप्तहेराला धोका असल्याचे जाणून ते मोटेलमध्ये शोध घायचे ठरवतात.
सॅम, नॉर्मनला बोलण्यात गुंगवून ठेवतो आणि लीला मोटेलच्या आत शोध घेत असताना, नॉर्मनच्या आईचे प्रेत तिला सांपडते.
त्या मृत शरीरावर रासायनिक प्रक्रिया करून ते जपून ठेवलेले असते.या धक्याने लीला किंचाळते. स्त्री च्या वेशात आलेला नॉर्मन, तिलाही मारायचा प्रयत्न करत असताना , सॅम कडून पकडला जातो आणि एक अनपेक्षित शेवट प्रेक्षकांना स्तिमित करतो. 
 
जर नॉर्मन ची आई मृत आहे तर खून कोण करतो आणि का ?
मानसशास्त्रज्ञ ह्याची उकल करतो.
नॉर्मनची आई ही अत्यंत वर्चस्ववादी स्त्री असते. नॉर्मन तिच्या ताब्यात असतो आणि सवयीने अवलंबून सुद्धा. जेव्हा तिच्या प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत ती पकडली जाते , तेव्हा असूयेने आणि संतापाने नॉर्मन त्या दोघांचा खून करतो. ती अपराधाची भावना एवढी तीव्र असते की त्याचा मेंदू , त्याने केलेली हत्याच नाकारतो. तिचे प्रेत मिळवून तो तळघरात लपवून ठेवतो आणि ती जिवंत आहे असे समजून तिच्याशी संभाषण सुद्धा करतो.

आपण आपल्या आईच्या प्रियकराचा मत्सर केला म्हणून त्याला वाटते की त्याच्या आयुष्यात कुणी आले तर आई सुद्धा तिचा मत्सर करेल आणि खून करेल. याच कल्पनेतून नॉर्मन मेरिअनचा खून करतो आणि तो आईने केला आहे असे मनाला पटवतो.

एड जीन (Ed Gein) नावाच्या, मानसिक रुग्ण असलेल्या खुन्याच्या आयुष्यावर आधारित ही कथा आहे.  एड जीनची आई , अत्यंत कडक आणि वर्चस्व गावणारी होती. तिच्या हयातीत, तिला दबून असणाऱ्या एड जीनने आधीच्या आयुष्यावरील सूड  म्हणून, तिच्या मृत्यूनंतर , दोन स्त्रियांचा खून केला.आणि नंतरचे आयुष्य वेड्यांच्या इस्पितळात घालवले. या खऱ्या घटनेवर आधारित, लेखक रॉबर्ट ब्लॉच लिखित  पुस्तकावर  “सायको” हा सिनेमा आधारित आहे.
कोणताही स्टुडिओ तयार असताना, हिचकॉकने आपल्या अंतःप्रेरणेने, स्वतःचे पैसे टाकून हा सिनेमा बनवला. सुरुवातीला जरी तिकीटबारीवर अयशस्वी ठरला , तरी नंतर प्रेक्षकांनीच या सिनेमाला डोक्यावर घेतले आणि हिचकॉकला “ सस्पेन्सचा बादशहा” हा खिताब मिळाला.

सायको हा केवळ एक रहस्यमय सिनेमा नाही. खरेतर सिनेमाचे रहस्य किंवा त्याची उलगड हा सुद्धा काही मोठा गुंतागुंतीचा प्लॉट नाही . सायको यशस्वी ठरला कारण कुणीही न हाताळलेल्या गोष्टी या सिनेमात प्रथमच प्रेक्षकांनी अनुभवल्या.
अमेरिका ज्या तत्वांचा अभिमान बाळगते, त्या तत्वांना सायको या सिनेमाने नख लावले. समाजाचा मुखवटा ओरबाडण्याचे काम या सिनेमाने केले. 
सिनेमातल्या नायिका म्हणजे संकटात सापडलेली  निरागस तरुणी आणि तिला  संकटातून सोडवणारा नायक ही प्रतिमा या सिनेमाने बदलली.
चित्रपटाची नायिका ही आदर्शवादी नाही. ती एका लग्न झालेल्या पुरुषाशी संबंध ठेवते, त्याला मदत म्हणून चोरी करते, पळून जाताना संकटात सापडते पण तरीही तिला कुणी वाचवायला येत नाही. आपल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून की काय , तिचा मृत्यू होतो. सिनेमात संकटात सापडलेली मुलगी आणि तिला वाचवणारा नायक या प्रतिमा सतत वापरल्या गेल्या आहेत. इथे नायिका निर्दोष नाहीच आणि तिला वाचवणारा नायक सुद्धा नाही.
यातील दुसरे महत्वाचे पात्र म्हणजे नॉर्मन.
त्याचे मोटेल हा तोट्यात गेलेला व्यवसाय आहे. वरवर पाहता उत्तम चालला आहे असे वाटणारा पण आतून कोसळलेला. तसेच त्याचे , त्याच्या आईबरोबर असलेले नाते.
तशीच अमेरिकेची कौटुंबिक व्यवस्था.
बाहेरून आदर्श , आतून तुटलेली. अनैतिक संबंध, घटस्फोटाचे वाढलेले प्रमाण, स्वतःच्या अपेक्षांपायी मुलांचे होणारे शोषण, पालकांच्या वर्चस्वापायी खचलेली दबलेली पुढची पिढी, मानसिक रोगांचे वाढलेले प्रमाण , घरात राहून ही दुरावलेली नाती.
सायको या सिनेमातली सर्वच पात्रे काहीतरी  दडवतात.
सॅम आणि मेरिअन आपले संबंध लपवण्यासाठी हॉटेल्सचा आधार घेतात. मेरिअनची सहकारी , कॅरोलिन, ताणापायी, झोपेच्या गोळ्यांचा वापर करते. लॉवेरी , चोरून दारूचे व्यसन करते, मेरिअन चोरी करते , खोटे बोलते, आणि नॉर्मनचे रक्तरंजित  रहस्य तर सिनेमाचा मुख्य गाभा आहे.
उगाच नाही गुप्तहेर मिल्टन जेव्हा मोटेल ला भेट देतो तेव्हा म्हणतो, ‘This is the first place that looks like it’s hiding from the world”

कृत्रिम रित्या दडपलेली लैंगिगता ही सिनेमाची एक महत्वाची थिम आहे. विवाहबाह्य संबंध समाजात स्विकारले न जाण्याने सॅम आणि मेरिअन खोटेपणाचा आधार घेतात. कडक आईच्या ताब्यात असल्याने नॉर्मनला कुणीही मित्र नाही, मैत्रीण ही नाही. ख्रिस्ती धर्मात सुद्धा निकोप लैगिंगतेला स्थान नाही. कुणाशी बोलायचे , कुणाशी कसले संबंध ठेवायचे का नाही यावर सुद्धा आईचा ताबा असल्याने , नॉर्मन सगळ्याच बाबतीत आईवर अवलंबून आहे. आईच्या प्रियकराचा त्याला द्वेष वाटल्याने तो आईचा खून करतो आणि ती अपराधाची भावना त्याची पाठ सोडत नाही.
त्यातून त्याचे व्यक्तिमत्व दुभंगले जाते. 

आतापर्यँत जेवढे सिनेमा आले होते, त्या सिनेमाची थीम वाईटावर चांगल्याचा विजय अशीच होती. इथे ज्या माणसाचे पैसे मेरिअन  चोरते , तो माणूस खोटारडा आहे , हे पैसेही चांगल्या मार्गाने मिळवलेले नाहीत .भले नायिका  चोर असेल पण तिचा हेतू आपले प्रेम मिळवणे हा आहे.  नंतर तिला या अपराधाची उपरती होते आणि जाऊन पैसे परत करायचे हे ठरवले असतानाच तिचा खून होतो.  हा सायकोला दिलेला एक वेगळाच नजरिया होता.
गाडीत  रात्र  काढणाऱ्या  मेरिअनला  मोटेल  मध्ये  आश्रय  घेण्याचा  सल्ला  , एक  पोलीस  ऑफिसर  देतो आणि  ते घरच  तिचे  भक्षक  बनते . 
मोटेलच्या खोल्या आधुनिक आहेत, चकचकीत, एकसारख्या,  मोठ्या…
विसाव्या शतकातल्या अमेरिकेचे प्रतीक..सेवेसाठी तत्पर पण टेकडीवरचे घर मात्र जुने, अडगळीच्या सामानाने भरलेले, कोंदट,  काळोखी, बरेचकाही दडवलेले..दबा  धरून बसलेल्या भक्ष्यासारखं…

सायकोच्या पात्रात हे निर्जीव पात्र, नॉर्मन चे मोटेल महत्वाची भूमिका बजावते.
पैसे नाहीत म्हणून लग्न नाही, असा विचार केल्याने नायिकेच्या हातून गुन्हा घडतो,  पैसे नसूनही , तिचा प्रियकर तिच्याशी लग्न करण्याचे ठरवतो, पण तोपर्यंत तिचा खून झालेला असतो…
Too little too late 

हिचकॉक समाजाचे  एक वेगळंच चित्र समोर आणतो आणि पाहणारा प्रत्येकजण आपल्या मनाचा तळ शोधण्यास घाबरतो हे सिनेमाचे यश आहे.
आज एवढ्या वर्षांनी परत एकदा सायको बघताना मनात आले, मनासारखे वागायचे स्वातंत्र्य नाही म्हणून या पात्रांच्या हातून चुका घडल्या . दबलेल्या इच्छा, आकांक्षा , वासना यांनी त्यांच्या आयुष्याला घसरणीच्या मार्गावर नेले. त्या पिढीला हे स्वातंत्र्य मिळाले नाही म्हणून त्यांनी पुढच्या पिढीला बंधनात ठेवले नाही . त्यांना पूर्ण मोकळीक दिली.
धर्माच्या अतिरेकाने , काही चुकीच्या अंधश्रद्धांनी नुकसान झाले म्हणून धर्माचा अडसर काढून टाकला आणि आपल्याला हवे तसे जग घडवण्याची मुभा दिली .
आजचे हे जग पहिले तर हिचकॉकच्या सायको मध्ये काय बदल घडतील ?

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.






. 

 



1 thought on “हिचकॉकला सस्पेन्सचा बादशहा हा ‘किताब मिळवून देणारा -सायको ”

  1. सुरुवातीला हा सिनेमा बघतांना गँगस्टर, गुन्हेगारी जगत…यावर बेतलेला वाटतो हा सिनेमा..नंतर जेव्हा मॅरिअनचा खून पडतो तेव्हाच खरा माईंड गेम सुरु होतो…विकृती विकृती म्हणजे तरी किती…..!
    बघणारा प्रेक्षक सुन्न होतो….आणि क्षणभर सायको मनोवस्थेत राहतो…
    जबरदस्त लिहिलंय!
    👌👌💜

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *