Skip to content

भावनिक आंदोलने आणि  पारलौकिक गूढता यांच्या हिंदोळ्यावर झुलणारा “हेरेडिटरी”

घरातील व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा आपण समजतो की त्या व्यक्तीच्या आयुष्याचा अंत झाला. जी व्यक्ती मृत होते, तिचे अस्तित्वच पुसले जाते. तिच्या नसण्याचा तोटा तिला कसा काय होणार! जाणारा माणूस निघून जातो, उरलेल्या लोकांना ती व्यक्ती नसण्याची सवय करून जगण्याची कसरत करावी लागते. जेव्हा व्यक्ती तुमच्याबरोबर अनेक वर्षे असते, तेव्हा तुमच्या आयुष्याशी  तिच्या असंख्य आठवणी निगडित असतात.  त्या घरात तिने स्विकारलेल्या काही जबाबदाऱ्या असतात. घरातील प्रत्येक व्यक्तीशी तिचे नाते असते. त्याला अनुसरून तिचे वर्तन असते आणि त्या सर्वांचा एक खोल ठसा आपोआपच मनावर उमटलेला असतो आणि अशा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा अचानक आयुष्यातील एक जागा रिकामी होते. त्यात ती व्यक्ती प्रभावशाली असेल, कळत नकळत तुम्ही तिच्यावर अवलंबून असाल तर ती पोकळी भरून काढणे सोपे नसते. त्याचे खोलवर परिणाम होतात. काहीवेळा हा आघात एवढा प्रचंड असतो की तो सहन करता न आल्याने माणसे स्वतःला हरवून बसतात.
कुटुंबातील ताणतणाव अनेकवेळा सांगता येत नाहीत. माणूस त्या वजनाखाली खचून जातो आणि नैराश्येचा हा झटका एवढा भयानक असतो की माणूस पूर्णतः बदलून जातो.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला “हेरेडिटरी” या सिनेमात काहीसे असेच घडते.

वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका व्यक्तीच्या मृत्युलेखाने या सिनेमाची सुरुवात होते.  एलेन ले, जी सिनेमाची नायिका ऍनी ग्रॅहमची आई आहे तिचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे. 

तिच्या अंत्ययात्रेला तिची मुलगी ऍनी, तिचा नवरा आणि दोन मुले उपस्थित आहेत.
अंत्ययात्रेत बरेच अनोळखी चेहेरे ऍनीला दिसतात. तिला नवल वाटते. आईला ओळखणारे एवढे अपरिचित चेहेरे ! एलेन ले चे व्यक्तिमत्व अतिशय गुंतागुंतीचे होते. जगापासून लपलेले आणि स्वतःच्या कोशात बंद असलेले. तिच्या अनेक गोष्टी ऍनीला सुद्धा माहिती नसतात. 
हे लोक कोण असावेत? हा प्रश्न तिला पडतो. मजा अशी की  एक अनोळखी व्यक्ती, ऍनी च्या मुलीशी, चार्लीशी  हसते आणि एरवी आपल्या कोशात गुंग असणारी चार्ली त्याला प्रतिसाद देते.
अंत्य यात्रेनंतर आपल्याला ग्रॅहम कुटुंबाची ओळख होते.
ऍनी ही एक मिनिएचर घर बनवणारी कलाकार आहे. तिच्या घरात ठिकठिकाणी तिने बनवलेल्या छोट्या घरांची मॉडेल्स आहेत. त्या घरांवर ऍनीच्या घराचा छाप आहे.

तिचा नवरा स्टीव्ह हा मानसोपचारतज्ञ आहे. तिला दोन मुले आहेत. पीटर आणि  चार्ली.

तेरा वर्षाची मुलगी चार्ली ही विचित्र वागते. भर थंडीत उघड्यावर झोपणे, भावरहीत नजरेने रोखून बघत राहणे, स्वतःशी पुटपुटणे ..एवढे काय तर फक्त तेरा वर्षाच्या या मुलीचे शरीर मात्र एखाद्या तरुणी सारखे आहे.

पीटर व्यसनाच्या आहारी गेला आहे. नैराश्याचा शिकार झाला आहे.

आजी गेल्यावर चार्ली आईला विचारते, “ आता माझी काळजी कोण घेणार ?”
“अर्थात मी . मी तुझी आई आहे.” ऍनी सांगते .
“ आणि तू गेल्यावर ?”
हा प्रश्न ऐकून दचकलेली ऍनी स्वतःला सावरून उत्तर देते ,” तुझा भाऊ पीटर . तो तुझी काळजी घेईल.”

वरवर पाहत ऍनी सहज वावरत असली तरी तिला नैराश्येने ग्रासले आहे. एक अनामिक भीती तिला कुरतडते. स्वतःला सावरण्यासाठी ती कौन्सिलिंग साठी जाते. शोकात असलेले अनेक लोक तिथे जमतात, चर्चा करतात, ज्यांच्या बरोबर बोलून मन सावरायला मदत होते.

आपले आणि आईचे संबंध चांगले नव्हते आणि तरीही माझ्या मुलाला मात्र आईने वाढवले, त्याच्या आयुष्यावर तिचा प्रभाव आहे ह्याची ती कबुली देते. याचवेळी तिच्या नवऱ्याला स्मशातून एक फोन येतो. एलेनचे थडगे कुणीतरी फोडून टाकलेले असते. त्यातले शव नाहीसे झालेले असते. ही बातमी तो  ऍनीला देत नाही.
याचवेळी पीटरला एका पार्टीचे आमंत्रण येते. चार्ली सुद्धा पीटर बरोबर या पार्टीला जाते. चार्लीला अक्रोडची ऍलर्जी असते पण अनावधानाने ती अक्रोडमिश्रित केक खाते आणि तिला ऍलर्जीचा अटॅक येतो. पीटर तिला घेऊन हॉस्पिटलला जात असतानाच ताजी हवा घेण्यासाठी गाडीची काच उघडून आपले डोके बाहेर काढते

आणि अपघात होतो. टेलिफोनच्या पोल वर आदळून तिचे डोकेच उडते. पीटर घाबरतो. राहिलेले धड घेऊन तो घरी येतो. दुसऱ्या दिवशी चार्लीचे प्रेत पाहून  ऍनीला धक्का बसतो.
चार्लीच्या या अशा धक्कादायक मृत्यूने घरावर अवकळा येते. पीटर नैराश्येत जातो. ऍनी ह्या घटनेसाठी पीटरला जबाबदार धरते. या सर्वात स्टीव्ह हा एकच असतो जो सर्वांना सांभाळायचा प्रयत्न करतो.

दुःखाने व्याकुळ झालेल्या ऍनीला एक व्यक्ती , चार्लीच्या आत्म्याशी बोलण्याचा सल्ला देते.

यावर अजिबात विश्वास नसणारा स्टीव्ह आणि पीटर सुद्धा ऍनीला नकार देऊ शकत नाहीत. त्या रात्री प्लँचेट करत असताना वस्तू आपोआप हलायला लागतात आणि ऍनी अचानक चार्लीच्या आवाजात बोलू लागते. तिला शुद्धीत आणण्यासाठी, स्टिव्ह तिच्यावर पाणी शिंपडतो. मात्र आता ऍनीची खात्री होते की चार्ली आपला बदला घेण्यासाठी परत आली आहे.
घडणाऱ्या घटनांची सुरुवात ऍनीच्या आईच्या मृत्यूने झालेली असते. ह्याला जबाबदार आपली आईच तर नाही असा विचार करून ऍनी, आपल्या आईच्या खोलीत जाते. तिच्या सामानाची उलथापालथ करत असताना , तिच्या हाताला एक जुना फोटो अल्बम लागतो आणि समजते , की ऍनीची आई सैतानाची पूजा करणाऱ्या  पंथाची मुख्य असते. सैतानाला पृथ्वीवर परत येण्यासाठी एका तरुण मुलाचे शरीर हवे असते , ज्यासाठी ती आपल्या नातवाला, पीटरला तयार करत असते.
तिचा अंश चार्लीत सुद्धा असल्याने ती सुद्धा ह्यात सामील असते. चार्लीच्या पुस्तकात ह्या सर्व विधींची रेखाचित्रे रेखाटलेली असतात. तिच्या कडे ह्या गोष्टी आल्या कशा ह्याचा मात्र  ऍनीला उलगडा होत नाही. 

हे उघड झाल्यावर मात्र घटना वेगात घडायला लागतात. घडणाऱ्या अघटिताचे  मूळ ह्या चार्लीच्या पुस्तकात आहे हे सांगून ऍनी , स्टीव्हला ते पुस्तक जाळायला सांगते पण दुर्दैवाने पुस्तकाऐवजी , स्टिव्ह अग्निज्वालेत सापडतो आणि त्यात त्याचा मृत्यू होतो.

हा एकच दुवा असतो जो अघटितांकडे मानवी नजरेने पाहत असतो , त्याची उकल सोडवायचा प्रयत्न करत असतो. तो संपल्यावर शहाणीव लयाला जाते  कुटूंब पूर्णतः दुःखाला शरण जाते. मोडून पडते.  सैतानाचा विजय होतो आणि पंथाच्या प्रमुखाची माळ पीटर च्या गळ्यात पडते. पुढच्या पिढीच्या वंशविच्छेदाची तयारी सुरु होते.

“हेरेडिटरी हा भयावह “कौटुंबिक” सिनेमा आहे . सिनेमाचा आत्मा आहे कुटुंब, त्यातील घटकांचे एकमेकांशी असलेले नाते, नात्यातील तणाव आणि एका व्यक्तीच्या मृत्यूने आलेले नैराश्य.  हॉरर या या कथेचा एक भाग आहे. त्यामुळे असेल “हेरेडिटरी” बघताना अनाकलनीय वाटत नाही. मानसिक तणाव आणि त्यातून निर्माण झालेले रोग ही मुख्य थीम असल्याने, आता पुढे काय होणार हे जेवढे भीतीदायक वाटते तेवढेच दुर्दैवी सुद्धा आहे. चित्रपटाच्या शेवटी पीटर सैतानाची जागा घेतो. जसे जीन्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमीत होताच तसेच सैतानी अस्तित्व संक्रमित होते हे  “हेरेडिटरी” च्या शेवटी समजते.
हे सैतानी अस्तित्व म्हणजे काय ? खोलवर विचार केला तर सैतान हे अनेक नकारार्थी गोष्टीसाठी  रूपक म्हणून आलेले आहे. 

उदा. दारू पिणाऱ्या माणसाची मुले अनेकदा व्यसनी होतात. कधी नैराश्येने तर कधी सवयीने. तसेच नैराश्य, काळजी करणे, आत्महत्या, हेकेखोरपणा, शोषण करणे, प्रचंड राग येणे ह्या सर्व गोष्टी सुद्धा अनेक वेळा अनुवांशिक असतात आणि निरागस, लहान मुले त्याला बळी पडतात कारण त्यांना जन्म देणारे पालक स्वतःच्या मध्ये बदल घडवण्यास उत्सुक नसतात , त्यांना आपल्यातल्या कमतरेची जाणीव सुद्धा नसते.
उदा. ऍनीला आपल्या आईबद्दल , तिच्या दुहेरी जगण्याबद्दल चीड आहे. चार्लीच्या मृत्यूनंतर अतीव संतापाने ती पीटरला सांगते, “मला तुझी आई व्हायचे नव्हतेच “ एका मुलासाठी असे नाकारले जाणे हे केवढे दुःखद असेल. आई बद्दल वाटणारा तिरस्कार हा नकळत एका पिढीकडून, दुसऱ्या पिढीत उतरला आहे.
ऍनी, आपल्या आईबद्दल जेव्हा कौन्सिलिंग करणाऱ्या ग्रुपमध्ये बोलते तेव्हा ती कबुल करते की तिची आई अत्यंत आत्मकेंद्रित व्यक्ती होती. स्वतःवरच प्रम करणारी , दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्याचा सोस असणारी व्यक्ती. तिचा भाऊ सिझॉफ्रनिक होता नी या सगळ्याचा परिणाम तिचे व्यक्तिमत्व दुभंग होण्यात झाला.. तिला भीती वाटते की हा रोग तिच्यात सुद्धा उतरेल जे दुर्दैवाने खरे ठरते.

“हेरेडिटरी हा केवळ अतींद्रिय शक्तीवर आधारित भयपट नाही. मनाची भावनिक अस्थिरता नि पारलौकिक गूढता या दोन्हींचा वापर करून विणलेली अद्भुत रचना आहे. 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.



2 thoughts on “भावनिक आंदोलने आणि  पारलौकिक गूढता यांच्या हिंदोळ्यावर झुलणारा “हेरेडिटरी””

  1. फार संयमित लिहिलंय..
    या लिखाणाचं अजून एक पैलू भावला की तुम्ही सर्व व्यक्तिरेखा असोत की सिनेमाचा प्लाॅट यावर तुमचं मत लिहितांना ती एकच एक बाजू आहे सिनेमाची असं लिहिलं नाहीय.. तर वाचकांवर सोपवलं तुमच्या नजरेतून बघा..
    नक्कीच बघणार 💯👏👏👏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *