नवीन संस्कृती, भाषा, नवीन प्रदेश, तेथील माणसे लोकांना आकर्षित करतात. स्वतःच्या शहरातून बाहेर न जाता, एखाद्या शहराचा, तेथील संस्कृतीचा, रूढी परंपरेचा अभ्यास करणे, त्याची माहिती करून घेणे सिनेमामुळे सहजशक्य होते. सिनेमा आणि माहितीपट फरक आहे. सिनेमात माणसे असतात, कथा असते, घटना असते, घटनेचे होणारे पडसाद असतात आणि ते जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले तरी सारखे असतात. माणसांचे चेहेरे, रंग, अंगकाठी वेगळी असेल पण भावना सर्व विश्वाला एका धाग्यात बांधून ठेवतात.
कोको हा सिनेमा पाहिल्यावर मेक्सिको-भारत यातील शेकडो मैलांचे अंतर तुमच्या मनातून पुसले जाईल याची मला खात्री आहे.
आपल्याकडे आता पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. .. हा पंधरवडा पूर्वजांच्या स्मरणार्थ पाळला जातो. अशी मान्यता आहे की या दिवसांत आपले पूर्वज पितृलोकांतून पृथ्वीवर येतात. या काळात श्राद्ध, पिंडदान आणि दानधर्म करून पूर्वजांना आदराने स्मरले जाते आणि त्यांच्या आशीर्वादाची कामना केली जाते.
मातृऋण, पितृऋण, गुरूऋण यासारखेच अनेक संस्कृतीत पितृऋण महत्वाचे समजले जाते. आपले आयुष्य घडवण्यात आपल्या पितरांचा वाटा असतोच. त्यांचा देह जरी नष्ट झाला तरी आपल्या रूपाने त्यांच्या वारसा जिवंत राहतो. त्यांचे स्मरण ठेवणे म्हणजे त्यांच्याशी असलेला बंध कायम ठेवणे.
मेक्सिको मध्ये सुद्धा डे ऑफ द डेड (मृतांचा दिवस) साजरा केला जातो. कोको हा सिनेमा या विषयावर आधारित आहे. आपले पूर्वज आणि आपल्या मधील बंधाची जपणूक करण्याचा संदेश या सिनेमात दिला आहे.
मेक्सिकोच्या सांता सिसिलिया शहरात इमेल्डा नावाची एक स्त्री एका संगीतकाराशी लग्न करते. 
हा संगीतकार, मी परत येईन असे सांगून संगीत क्षेत्रात काहीतरी भव्य कार्य करण्यासाठी निघून जातो. इमेल्डा आणि त्यांची मुलगी कोको त्याची अनेक वर्ष वाट पाहतात पण तो काही परतत नाही.
या दुःखाने इमेल्डा आपल्या जीवनातून संगीताला हद्दपार करते आणि चप्पल बनवण्याच्या व्यवसायाकडे वळते. बरीच वर्षे उलटून जातात तेव्हा लहान मुलगी असलेली कोको आता एक वृद्ध स्त्री झालेली असते. तिला विस्मरणाचा त्रास सुरु होतो.
खूप वर्षांनी याच कुटुंबात जन्माला आलेला मॅगेल, इमेल्डाचा खापर पणतू, मात्र प्रसिद्ध संगीतकार एर्नेस्तो डेला क्रूजचा भक्त असतो. त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्डस् ऐकून गिटार शिकतो.
मृतांच्या दिवशी सारे गाव तयारी करत असताना, मॅगेल कुटुंबाच्या ऑफ्रेन्डामध्ये ( पितरांचे स्वागत करण्याची जागा) जातो. 
अपघाताने त्याच्या हातून एक फोटोफ्रेम पडते. त्यात इमेल्डा आणि कोकोचा फोटो असतो. याच फ्रेम च्या मागे मॅगेलला एक गुप्त कप्पा दिसतो. ज्यात त्याच्या खापर-खापर पणजोबांचा फोटो असतो पण फोटोतील माणसाचे डोके कापले गेलेले असते. त्याच्या हातात मात्र एर्नेस्तो डेची प्रसिद्ध गिटार असते.
मॅगेलची खात्री होते की हा मृत संगीतकारच आपला खापर खापर पणजोबा असणार. आता मात्र मॅगेल संगीतकार बनण्याचा निश्चय करतो.
एर्नेस्तो डे आपला पूर्वज आहे ही कल्पनाच एवढी थरारक असते की न राहवून तो आपल्या कुटुंबियांना आपण संगीतकार बनणार आहे हे जाहीर करतो. त्याच्या मनासारखे तर घडत नाहीच उलट त्याची आजी एलेना त्याचे गिटार मोडून टाकते.
याचा परिणाम एवढाच होतो की मॅगेल घर सोडण्याचा निश्चय करतो.
सांगीतिक स्पर्धेत भाग घेऊन आपले कौशल्य दाखवण्याच्या महत्त्वाकांक्षेने भारलेला मॅगेल, एर्नेस्तोच्या स्मारकात शिरून त्याची गिटार हस्तगत करतो. जेव्हा तो गिटारची तार छेडतो, तेव्हा एक चमत्कार घडतो.
जिवंत माणसांसाठी तो अदृश्य होतो पण तो मृत माणसांशी संवाद करू शकतो. तो दिवस मृतांचा दिवस असल्याने, अनेक पूर्वज, माणसांच्या जगातून , एका दिवसासाठी पृथ्वीवर आलेले असतात. त्यांच्याबरोबर जाताना, मॅगेल मृत माणसांच्या जागेत प्रवेश करतो. 
ते त्याला आपल्या जगात परत जाण्याचा आग्रह करतात. मदतीची तयारी दाखवतात. या सगळ्या गोंधळात अजून एक गोष्ट घडते.
ऑफ्रेन्डामधून इमेल्डाचा फोटो काढल्याने, इमेल्डा आता परत जाऊ शकत नाही तर मृतांची गोष्ट स्वतःकडे ठेवल्याने, पृथ्वीवर परत जाण्यासाठी त्याला सूर्योदयाच्या अगोदर त्याच्या मृत कुटुंबियांच्या परवानगीची गरज असते. तू संगीताकडे परत वळायचे नाहीस या अटीवर इमेल्डा त्याला क्षमा करायची तयारी दाखवते पण मॅगेलची इच्छा वेगळी असते.
एर्नेस्तो आपला पणजोबा आहे अशी मॅगेलची समजूत असल्याने त्याला आपल्या या खापर खापर पणजोबांचे आशीर्वाद हवे असतात, जेणेकरून तो आपल्या जगात परत जाईल आणि एक संगीतकार म्हणून यशस्वी होईल.
मृतांच्या या जगात मॅगेलची भेट हेक्टरशी होते; जो एकेकाळी एर्नेस्तो बरोबर काम करत असतो. 
हेक्टरला सुद्धा आपले अपुरे हिशोब पुरे करण्यासाठी एर्नेस्तोला भेटायचे असते. आता हे दोघे मृतांच्या जगात एर्नेस्तोचा शोध घेतात. 
मॅगेल लपून छपून एर्नेस्तोच्या आलिशान हवेलीत प्रवेश करतो आणि त्याचवेळी हेक्टर सुद्धा तिथे पोचतो. तो एर्नेस्तोवर आपली गाणी चोरल्याचा आरोप करतो. त्या दोघांच्या वादात अजूनपर्यंत दडलेले एक सत्य मॅगेलला समजते.
एर्नेस्तो आणि हेक्टर हे दोघेही मित्र असतात. एकत्र काम करत असतात. घरच्या आठवणींने व्याकुळ झालेला हेक्टर हे क्षेत्र सोडून आपल्या घरी परतायचे ठरवतो पण एर्नेस्तोला त्याच्याशिवाय काम करणे शक्य नसते.
तो हेक्टरला विष देतो, त्याची गाणी चोरतो आणि स्वतः संगीतकार होऊन यश मिळवतो.
या झटापटीत मॅगेलला आपल्या खापर खापर पणजोबांचा शोध लागतो. ज्यांच्यावर आपल्या कुटुंबाला सोडून गेल्याचा आळ आलेला असतो, ते खरेतर निर्दोष असतात. त्यांची हत्या झालेली असते आणि त्याची कल्पना ही कुटुंबाला नसते.
मृतांच्या या जगात इमेल्डा आणि हेक्टर भेटतात. त्यांचे मिलन होते 
आणि मॅगेल आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन आपल्या जगात परततो.
मॅगेल नाहीसा होतो तो दिवस असतो आपल्या कुटुंबातील मृत माणसांची आठवण करण्याचा दिवस. मेक्सिको मध्ये हा मोठा उत्सव असतो. या दिवशी घर सजवले जाते. या जगातून गेलेल्या आपल्या माणसांचे फोटो लावतात. सजवतात. त्यांना आवडणारे पदार्थ करतात. सर्व कुटुंबीय एकत्र येऊन त्यांची आठवण जागवतात. वर्षातले एक दिवस आपले पूर्वज इथे येऊन, आपल्या आतिथ्याने तृप्त होतील आपल्याला आशीर्वाद देतील अशी त्यांची श्रद्धा असते. कर्मकांडापेक्षा सुद्धा महत्वाचे असते ते त्यांची आठवण काढणे. कृतज्ञता दाखवण्याचा हा एक प्रकार. यामागे अजून एक श्रद्धा आहे जर एखाद्या माणसाची आठवण करणारे कुणी नसेल तर त्या माणसाला मृत माणसांत सुद्धा जागा मिळत नाही. तो दिशाहीन होतो. मॅगेलच्या पणजोबांचे तेच होणार असते पण मॅगेल मुळे त्यांच्या गायब होण्यामागचे रहस्य त्यांच्या कुटुंबियांना समजते. 
कोकोला हे रहस्य समजल्यावर तिच्या मनातील खंत, वडील परत न आल्याचा राग निघून जातो आणि तिची आठवण परत येते.
या मोठ्या प्रवासात, मॅगेलला उमजते, आपले कुटुंब आपले जग असते. त्यांना सुखी करणे ह्यातच आयुष्याचे समाधान दडलेले असते.
चित्रपट मॅगेलच्या नजरेतून उलगडतो तरीही चित्रपटाची नायिका आहे, मॅगेलची पणजी, “कोको” कोको आणि तिचे वडील यांच्या दोघातील बंध, त्यांची एकमेकांवर असलेली माया, विश्वास, मृत होऊन सुद्धा एकमेकांच्या मनात जिवंत असलेली स्मृती ह्यावर चित्रपट बेतला आहे.
कोको हा ऍनिमेशन चित्रपट आहे पण हा फक्त मुलांचा सिनेमा नाही. तो खरेतर जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा सिनेमा आहे. माणसाचा मृत्यू हा देहाचा त्याग नाही. जेव्हा आठवणी पुसल्या जातात तेव्हाच माणसाचा मृत्यू होतो. मॅगेल आपल्या पूर्वजांना लक्षात ठेवतो, त्यांच्या वारशाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो.
ऑक्टोबर ३१ ते नोव्हेंबर २ हे तीन दिवस स्पॅनिश संस्कृतीत फार महत्वाचे आहेत. पहिल्या दिवशी स्पॅनिश कुटुंबे आपल्या कुटुंबियांना जिथे पुरले आहेत त्या कबरीस्थानात जातात. त्यांची थडगी साफ करतात, सजवतात. दुसरा दिवस असतो ,
“El Dia de los Inocentes,” म्हणजे मृत पावलेल्या लहान निरागस मुलांचा दिवस.
जे लहान वयातच आपल्याला सोडून गेले आहेत त्यांची आठवण करायचा दिवस.
तिसऱ्या दिवशी सर्व कुटूंबीय मृतांच्या सन्मानार्थ मेजवानी ठेवतात. त्यांच्या आवडीचे पदार्थ करतात आणि त्यांच्या आठवणीत दिवस घालवतात. आपल्या कडे, परंपरा वेगळ्या असतील पण हेतू मात्र हाच आहे की आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे.
आपले पूर्वज कोण होते ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? खरेतर आपण त्यांच्याच रक्ताचा एक भाग असतो.
चित्रपटात रूढी परंपरा यांनाही महत्व दिले आहे.
रूढी परंपरा म्हणजे केवळ कर्मकांडे नाहीत किंवा अंध श्रद्धाही नाहीत. आपल्या भूतकाळाला जोडणारा तो एक धागा आहे. कुटुंबाला, पिढ्यांना जोडणारा, त्यांच्यातील संबंध बळकट करणारा धागा. परंपरा, पदार्थ, कौशल्ये ही वाहती असतात. नावीन्याच्या नावाखाली आपण आपला इतिहासच पर्यायाने आपली ओळख विसरतो आहे का हा विचार करायला हा सिनेमा भाग पाडतो.
“तुमच्या स्वप्नांचा वेध घ्या” हा महत्वाचा संदेश कोको देतोच पण याच्या बरोबर तो अनेक गोष्टी उलगडून सांगतो. यश मिळवण्याचे अनेक फायदे तर माहिती असतातच पण यशाला कुठपर्यंत महत्व द्यायचे ते हा सिनेमा सांगतो.
“ In this world and the next, family is forever” कोको सिनेमाची हे टॅग लाईन आहे. जरी ही कथा मेक्सिको मध्ये घडत असेल तरीही जी जी व्यक्ती आपल्या कुटूंबावर प्रेम करते त्या सर्वांनाच ह्या कथेचा गाभा समजून येईल.
Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.
