Skip to content

आनंद देणारा देव-देव आनंद 

भाग १
शाळेत असताना आम्ही मुलांशी बोलायचो नाही पण  ज्यांच्याशी बोलावसे वाटायचे, ते खरच स्पेशल होते. तरीही भांडण उकरून काढले मी .कारण होते ” खोया खोया चांद ” आणि त्यातला देव. “आनंद देणारा देव.”.
” हा बघ तुझा वाकडा ” असे म्हणाला तो आणि मला खरच त्याला वाकडे करावसे वाटले अगदी अष्टांगानी, एवढा राग आला होता.
देव असूदे वाकडा. मला आवडतो.  त्याच्या वाकड्या हातासकट, बंद गळ्यासकट, फटी पडलेल्या  दातासकट आणि हो,  त्याच्या मिचमिचणाऱ्या  डोळ्यांसकट. 
एक सांगू का, तो काही स्वप्नात बिप्नात नाही आला. आता देव तो, स्वत:च्याच स्वप्नात जाईल, सुरुवातीच्या काळात गेलाही असेल सुरय्याच्या पण नंतर तरी स्वतःवरच अखंड प्रेम केले याने. 
दूरस्थ वाटतो तो, आवाक्यात न येणारा. यावा असेही नाही वाटत; पण तरीही त्याने तुमच्याकडे पडद्यावरून जरी पाहिले न तर निदान त्या क्षणासाठीच  कुणालाही  वाटते की आपण त्याच्यासाठीच जन्माला आलो आहोत .
आज जर तो असता, तर १०३ वर्षाचा असता आणि तेव्हाही तेवढाच टिपटॉप राहिला असता.
हिंदी सिनेमा वर राज्य करणाऱ्या पहिल्या त्रिमूर्तीत देव, राज आणि दिलीप पेक्षा फारच वेगळा होता. He was the ultimate urbanite and polished man.  पडद्यावर अगदी गबाळ्या अवतारात सुद्धा तो अतिशय सभ्य , सुसंस्कृत, सुशिक्षित दिसायचा.  ते त्याच्या अंगातच होते. अभिनयाच्या क्षेत्रात ती मर्यादा असेलही  पण आकर्षक या विशेषणाला देव आनंदचा चेहेरा  शोभून दिसेल. 

ज्या काळात नायक हा आदर्शाचा पुतळा म्हणून दाखवला जायचा, त्या काळात देवच्या नायकत्वाला करडी छटा होती. त्याने रंगवलेले नायक सदोष होते. काही तर पूर्णतः नकारार्थी भूमिका त्याने रंगवल्या. काही दुबळ्या, काही मोहाला बळी पडलेल्या, पैशाच्या मागे धावणाऱ्या.  गाईड म्हणा, जाल किंवा कालाबाजार. त्या काळात हे धाडस होते. कदाचित त्याचे नायक म्हणूनच आपल्यातले वाटले.
अर्थात मी त्याच्या ब्लॅक अँड व्हाईट च्या काळातील भूमिकांबद्दल बोलते आहे. त्याच्यातील नायक, जेव्हा त्याच्या दिग्दर्शनाखाली पडद्यावर आला तेव्हा त्याची घसरण सुरु झाली आणि तो आलेख कायमच उतरता राहिला.
ही पोस्ट आहे , त्याच्या मला आवडणाऱ्या काळातील गाण्यांची.

जाल

१)ये रात ये चांदनी फिर कहाँ , सून जा दिल की दास्तां
—————————————————-
(सिनेमा-जाल, संगीतकार-एस डी बर्मन, गीतकार-साहिर लुधियानवी, गायक-हेमंत कुमार)

नवकेतन बॅनरचा हा सुरुवातीचा सिनेमा.  गोव्याच्या पार्श्वभूमीवर झालेला जाल हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा होता. यातली टोनी ह्या  नायकाची भूमिका ही सुद्धा खलनायक म्हणून जाईल अशी. स्मगलिंग करताना पोलीस पाठी लागल्याने एक तरुण मुलगी मारिया नावाच्या एका कोळीणीची मदत घेते. तिच्याच घराबाहेरील बागेत माल लपवते. आता टोनी ह्या मालाच्या शोधात असतो , तो मारियाकडे नोकरीला लागतो. त्याच्यावर प्रेम करणारी, त्याची साथीदार असणारी मुलगी हे सत्य मारियाला सांगते पण प्रेमात पडल्यावर डोळे उघडावे असे वाटतच नाही. ह्या तरुण आकर्षक मुलावर भाळलेली मारिया, मनाला न जुमानता , टोनी कडे खेचली जाते.

ये रात ये चांदनी फिर कहाँ ,
सून जा दिल की दास्तां
नायक, नायिका , गिटार , समुद्र आणि हे सुद्धा कमी की काय म्हणून भरून आलेले वादळ. थांबवणे शक्य नाही; फक्त लाटांचे तांडवच नाही तर मनाचा आवेग ही. उंबरठ्याची मर्यादा ओलांडायला भाग पाडणारा हा जीवघेणा मोह.
वाहणारा जोरदार वारा फक्त नारळाच्या झावळ्याच  विसकटत नाही तर तिच्या मनाची घडी ही  विसकटतोय. 

हे संकट आहे हे तिलाही माहिती आहे, आणि हे त्यालाही माहित आहे की ते तिला माहित आहे …तरीही त्याचे खुणावणे …
एक एक शब्द, एक एक स्वर, तिच्या मनातल्या द्वंद्वाला आव्हान देतो आहे. न आवरणारे आदिम आकर्षण आणि तीचा पाय रोखणारी सद्विवेकबुद्धी  यातले द्वंद्व .

इस हसीन आग में तू भी जल के देख ले
जिंदगी के गीत की धून तू बदलके देख ले
त्याच्या हृदयाची धडकन, एक एक ठोका तिची आर्जवे करत असताना थांबेल ती ?तिच्या हृदयातले वादळ बाहेरच्या वादळाला सुद्धा हरवणारे आहे…

एक बार चल दिये गर तुझे पुकारके
लौटके न आयेंगे काफिले बहारके
आज अभी जिंदगी है जवां.
ह्या गीताचं चित्रीकरण, शब्द , हेमंतकुमार यांचा आर्जवी आवाज, देखणा देव आणि चेहेऱ्यावर आकर्षण जिवंत करणारी गीता बाली . सगळेच जुळून आलेले हे गीत .
सिनेमाला मर्यादित यश मिळाले पण देव आनंदने पुढील काळात जे काही हटके रोल केले त्याचा पाया ह्या सिनेमाने घातला.

काला बाजार

जाल मधल्या टोनी सारखेच काला बाजार मधील “रघुवीर” हे पात्र सदोष आहे.  मात्र ह्यात प्रतिकूल परिस्थितीचा हात आहे.
नोकरी नाही आणि पैसेही नाहीत . घराची जबाबदारी पार पाडण्यासाठी रघुवीर चित्रपटांची  तिकिटे ब्लॅक मध्ये विकतो.
एके दिवशी सिनेथिएटरच्या बाहेर एक मुलगी आपल्या मित्राला, सिनेमाची तिकिटे ब्लॅक मध्ये विकत घेतली म्हणून बरेच सुनावते. ह्या सर्वांचा नायकाच्या मनावर परिणाम होऊन तो हा धंदा सोडून देतो. अर्थात गुन्हेगारी जगात फसलेला माणूस सहजासहजी यातून बाहेर पडू शकत नाही. रघुवीरला सुद्धा याची किंमत मोजावी लागते.
उत्तम कथा, संगीत आणि अभिनय यासाठी हा सिनेमा गाजला. 
यातलेच सुरुवातीचे हे गीत.

पहिल्या दर्शनातच रघु , अलकाच्या (वहिदा रहमान) प्रेमात पडतो आणि तिचा पाठलाग करतो. तिच्याशी ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतो. अगदी उटीपर्यंत पोचतो.
दोघेही एकाच ट्रेनने प्रवास करताना, वहिदाचा बर्थ, रघूच्या  वरचा आहे.
आता रघू गायला सुरुवात करतो. 
२) अपनी तो हर आह एक तुफान है, उपरवाला जान कर अंजान है 
(सिनेमा -काला बाजार, संगीतकार-एस डी बर्मन, गीतकार-शैलेंद्र, आवाज -मोहम्मद रफी)

-सर पे मेरे तू जो अपना हाथ ही  रख दे
फिर तो भटके राही को मिल जायेंगे रस्ते
दिल कि बस्ती बिन तेरे विरान है
उपरवाला जान कर अनजान है
अपनी तो हर आह एक तुफान है 

A very melodious bhajan sung by Rafi ji.. …
भक्तीगीत आहे का? मला नाही वाटत. वहिदाला सुद्धा खात्री नाही. संपूर्ण गाणेच द्विअर्थी आहे.

उपरवाला जान कर अनजान है

आता हा उपरवाला कोण असावा! नायक आणि नायिका ट्रेन मध्ये आहेत आणि नायिका वरच्या बर्थ  झोपली आहे.

वहिदा रहमान काहीशी साशंक, बरीचशी हैराण . scandalised  too .
मग लक्षात येते, वरचा बाप्पा असावा.
ती थोडीशी सैलावते . गाणे जस जसे पुढे सरकते , तस तसे मात्र ती गोंधळते.
.Imagine flirting with the girl in front of her parents.

त्याने घेतलेला प्रत्येक श्वास हा एखाद्या वादळासारखा आहे पण त्यात त्याचा तरी काय दोष आहे! ज्याला त्याची स्थिती माहिती आहे ती व्यक्ती तर सर्व जाणून अज्ञानी बनत आहे.

अब तो हंसके अपनी भी किस्मत को चमका दे
कानो में कुछ कह के तो इस दिल को बहला दे
ये भी मुश्किल है तो क्या आसां है

आता हा उपरवाला निदान हसून काही तरी बोलला तर नशीब तरी उजळेल की! तो विनवतो.
आता हे ही कठीण असेल तर जगात याहून सोप्पे काय बरे असावे!
निरागसपणाने देव चे रूप घेतले आहे इथे. 

सोलवा साल

सोलवा साल ही एका रात्रीची गोष्ट आहे. लाज (वहिदा रहमान) ही श्यामच्या प्रेमात आहे. वडिलांनी दुसऱ्या बरोबर लग्न ठरवल्याने ती घरातुन पळून जाते. घराण्याचा महाग असा नेकलेस सुद्धा ती घेऊन जाते. श्यामचा मात्र वेगळाच हेतू आहे. त्याला फक्त नेकलेस घेऊन पळ काढायचा आहे. जेव्हा त्याचे खरे रूप नायिकेला समजते तेव्हा ती काही रडत बिडत नाही.
आता आपला नेकलेस परत मिळवून वडिलांना देणे हे ह्या जिद्दीने खलनायकाच्या पाठलागावर जाते. ह्या सर्व प्रवासात, देव आनंद (कश्यप), जो  एक प्रेस रिपोर्टर आहे , तो तिला मदत करतो आणि या प्रवासात तिच्या प्रेमात सुद्धा पडतो.  

३) है अपना  दिल तो आवारा , न जाने किस पे आयेगा
(सिनेमा- सोलवा साल, संगीत एस डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी,  आवाज-हेमंत कुमार)

दुसऱ्याच्या प्रेमात असलेल्या तरुणीला पटवायचे असेल तर काय करता येईल ! हिंदी सिनेमात तरी नुसते गाणे गायले तरी पुरेसे आहे.
अर्थात देव इथे काही प्रेमात नाही. त्याचे ज्या मुलीवर लक्ष आहे ती कुणा दुसऱ्या बरोबर पळून चालली आहे. प्रेस रिपोर्टर असल्याने देवला इथे एक छान  स्टोरी मिळते आहे म्हणून त्याचे तिच्यावर लक्ष आहे.
त्याच्या मित्राला, फोटोग्राफर गोगीला मात्र आपल्या प्रेमात कुणीही का पडत नाही याची खंत वाटते.
आता कश्यप तर अत्यंत देखणा आहे तरीही तो अजून प्रेमात का बरे नाही !
त्याचेच उत्तर म्हणून हे गीत !

त्याचे हृदय कुठेच स्थिर होत नाही कारण तो स्वतःच भटक्या आहे, सतत फिरणारा , प्रवासी.

हसीनों ने बुलाया गले से भी लगाया
बहुत समझाया यही न समझा
बहुत भोला है बेचारा न जाने किस पे आयेगा.

असे नाही की कुठली सुंदरी त्याच्या प्रेमात पडली नाही ! अनेक आहेत की ज्यांना तो हवा आहे पण हाय रे कर्मा ! माझेच हृदय कुणामध्ये अजून तरी अडकले नाही.
(खरेतर देवची ही स्वतःची फिलॉसॉफी आहे)
त्यात अजून एक गम्मत आहे. जेव्हा मला खरंच कुणाचीतरी ओढ वाटते तेव्हाच आम्हाला जवळ आणणारा पुजारी सुद्धा गायब होतो.

हुआ जो कभी राज़ी तो मिला नहीं काज़ी
जहाँ पे लगी बाज़ी वहीं पे हारा
ज़माने भर का नाकारा न जाने किस पे आयेगा

अर्थात त्याचे दुःख त्याला नाहीच. त्याला हवी आहे ती फक्त त्याच्या मॅगझीनसाठी  एक स्टोरी, जी ट्रेन मधली मुलगी त्याला देणार आहे. अर्थात हे चांगलेच आहे कारण त्याचे जिच्यावर लक्ष आहे तिला स्वतःचा बॉयफ्रेंड आहे.
देव इथे विलक्षण मिस्कील दिसतो.
A real debonair.

हम दोनो 

हम दोनो हा सिनेमा १९६२ च्या बर्लिन येथील फिल्म्स फेस्टिवल मध्ये दाखवला गेला. या सिनेमात देव आनंदचा डबल रोल आहे. मेजर वर्मा आणि कॅप्टन आनंद. 
कॅप्टन आनंदचे मिता (साधना) वर प्रेम असते. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये तफावत असल्याने तिचे वडील लग्नाला नकार देतात. आनंद आर्मीत जातो. इथे त्याची गाठ , त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या मेजर वर्माबरोबर होते. युद्धात मेजर वर्मा बेपत्ता झाल्याने , त्याच्या मृत्यूची खबर देण्याची जबाबदारी आनंदवर येते तर मेजरची पत्नी रुमा (नंदा) त्याला आपला पती समजते.
तिच्यावर आघात होऊ नये म्हणून काही काळाकरता , कॅप्टन आनंद, हे नाटक चालू ठेवतो. 
इथे मिताचा गैरसमज तर होतोच , शिवाय बेपत्ता झालेला मेजर परततो..
आता पुढे काय होणार!

सारखी दिसणारी  पण स्वभावात फरक असणारी ही दोन पात्रे देवने पडद्यावर साकारली.  पुण्यात भेटलेल्या एका कॅप्टनवर मेजर वर्माचे पात्र आधारित होते तर कॅप्टन आनंदचे पात्र अतिशय गुंतागुंतीचे होते.  अंतर्मुख आणि अनेक गुपितांच्या खाली दबून गेलेला आनंद, देव ने उत्तम रंगवला. यातील , “मै जिंदगी का साथ निभाता चला गया “ हे गाणे देव आनंदच्या आयुष्याचे सार आहे.
४) “मै जिंदगी का साथ निभाता चला गया
(सिनेमा-हम दोनो, संगीतकार -जयदेव, गीतकार -साहिर लुधियानवी, आवाज -मोहम्मद रफी)
आयुष्य जसे गेले तसेच त्याची सोबत करत देव जगला. नो रिग्रेट्स ( खंत न करणे ) हे त्याच्या जगण्याचे सूत्र आहे.

दर्द भी हमें कबुल , चैन भी हमें कबूल
हमने हर तरह के फूल   हार में पिरो लिए 🙂
देव आनंदाच्या प्रेमाची व्याख्या थोडी वेगळी आहे. त्याचे प्रेम कधीच मालकी हक्क नसावे . काही वर्षांपूर्वी त्याची मुलाखत पाहिली होती. सुरय्याबद्दल, त्याच्या प्रेयसी बद्दल,  बोलताना त्याच्या चेहेऱ्यावर एवढी warmth होती की ,ते जर सुरय्याने  पाहिले असते  तर तिचाही चेहेरा फुलून आला असता.  

“मै जिंदगी का साथ निभाता चला गया
This  song is quite ” As don’t – care- ish ”  song  असे वाटते खरे पण हे एका बेफिकीर माणसाचे गाणे नाही तर आयुष्य समजून घेऊन , स्विकार करून जगण्याचा हात पकडणाऱ्या माणसाचे गीत आहे. 
त्याचे देस परदेस नंतर आलेले सिनेमे तद्दन भिकार, सगळेच पडले दणदणून. 
but he had no time for regrets .

जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया 
जो  खो गया  में उसको भूलाता चला गया …

आपल्या मर्मबंधात चांगले ते क्षण, न गुंतता जपून ठेवायचे कसब त्याला अवगत होते. . तसेही प्रत्येकाची एक्सपायरी असतेच नाही का ? मग खंत कसली ? आयुष्यात एवढी माणसे  येतात, ती देणे द्यायला आलेली असतात आणि तुम्हीही तुमचे देणेच चुकते करत असतात . 
मग दात्याचा चेहेरा हसरा नको ?  हम दोनोच्या मेजर वर्माचीच ही  फिलोसोफी नाही तर तो स्वतःही असेच आयुष्य जगला. It is his signature song. 

काला पानी 

करणला (नायकाला ) समजते की ज्या वडिलांना तो मृत समजत होता ते जिवंत आहेत आणि तुरुंगात आहेत. अशा खुनासाठी , जो त्यांनी  केलेलाच नाही. केस परत चालवून वडिलांना निर्दोष शाबीत करण्याची त्याची इच्छा आहे  पण हे करावे कसे !
मुळात जे कुणी साक्षीदार आहेत त्यांना एवढ्या वर्षांनी शोधणे कठीण आणि एवढ्या काळानंतर तर पुरावे सुद्धा मिळणे अवघड.
त्या केसचा तपास  करणाऱ्या अधिकाऱ्याकडून त्याला एका कलावंतिणीचा पत्ता मिळतो. तिच्याकडे असे काही पत्र असते , ज्यामुळे त्याला आपल्या वडिलांना निर्दोष दाखवता येईल. ह्या कामात मदत करते ते ती त्याची  प्रेयसी, आशा ( मधुबाला). ती स्वतः पत्रकार असते.
नेहेमीचा  देव आनंद यात नाही. आपल्या कामावर निष्ठा असणारा, वडिलांवर प्रेम करणारा, त्यांचे निर्दोषत्व साबीत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा नायक त्याने उत्तम साकार केला आहे.
यासाठी त्याला त्या कलावंतीणीचा प्रेमात असण्याचे नाटक सुद्धा करावे लागते.
याच वेळी हे गाणे येते.
५) हम बेखुदी में तुमको पुकारे चले गये
(सिनेमा -काला पानी , संगीतकार – एस डी  बर्मन, गीतकार -, गायक -मोहम्मद रफी) 

कोठ्यावरील गीत असले तरी हे वेगळे आहे. वरवर पाहिले तर प्रेमगीत किंवा विरहगीत पण यात एक हतबलता आहे. कोणत्याही थराला जाऊन त्याला आपल्या वडिलांना उपयोगी पडेल असा पुरावा तर शोधायचा आहे , त्यासाठी केलेले हे नाटक. त्याच्या सद्विवेकबुद्धीला हे पटत तर नाही पण त्याचा नाईलाज आहे.
ह्यात वाद्यांचा फार उपयोग नाही . कानावर हळुवार सूर पडतात. जणूकाही आपला खरा हेतू शब्दांनी  आणि सुरांनी लपवला आहे. 
बेखुदी म्हणजे स्वतःला हरवणे. अशा स्वप्नात जाणे की जिथे काळ सुद्धा स्तब्ध आहे.
नायक कशात हरवला आहे !
एकतर जिला उद्धेशून हे गीत म्हणतो आहे तिच्या सौन्दर्यात आणि दुसरी मदिरा.  ह्या दोन गोष्टीच त्याला दुःखद वास्तवापासून दूर नेत आहेत.

देखा किये तुम्हे हम बनके दीवाना 
उतरा जो नशा तो हम ने यह जाना,
सारे वो ज़िन्दगी के सहारे चले गए,
हम बेखुदी में तुम को पुकारे चले गए ,

जेव्हा तुला पाहिले तेव्हाच तुझ्या सुंदरतेने वेडावलो आणि ती नशा उतरली तेव्हा लक्षात आले की तू असणे हा आभास होता.
हे गीतच रफीने एवढे हळुवार गायले आहे की भुरळ पडते त्याची! मग नलिनी जयवंतची काय अवस्था झाली असेल बरे !

ही नशाच तिचा घात  करते. 

तीन देवियाँ

अमरजीतने  या सिनेमाचे दिग्दर्शन केले असे म्हंटले तरी घोस्ट दिग्दर्शक देव आनंद आहे अशी वदंता आहे. ही एका कवीची कहाणी जो तीन सुंदर स्त्रियांकडे ओढला जातो.
देवदत्त , कथेचा नायक हा वाद्यांच्या दुकानात काम करतो. योगायोगाने त्याने लिहिलेल्या कविता त्याच्या मालकाला सापडतात आणि त्याच्या जीवनाला कलाटणी ,मिळते. तो यशस्वी होतो. त्या काळात तीन वेगवेगळ्या स्त्रियांशी त्याचा संबंध येतो.
एक अत्यंत श्रीमंत स्त्री जी त्याच्या कवितांवर भाळते आणि त्याला ऐषोआरामाचे आयुष्य देण्याची संधी देते, दुसरी , यशस्वी सिनेतारका , जिच्याकडे पैसे तर असतात पण आयुष्यात एकटी असते आणि तिसरी , त्याच्यासारखीच साधी सुधी मुलगी.
त्यांच्या नात्याची , बांधिलकीची ही गोष्ट. त्यांतून उमजलेल्या प्रेमाची ही गोष्ट.

६)ऐसे तो न देखो, के हमको नशा हो जाए —
( सिनेमा-तीन देवियाँ, संगीतकार-एस.डी.बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी , आवाज -मोहम्मद रफी  )

फ्लर्टींग स्त्री आणि पुरुष दोघेही करतात तरीही त्यात एक फरक आहे. पुरुष पुढाकार घेतो, स्त्री तिच्या मनात असेल तर त्याला दुजोरा देते. अनेकवेळा पुरुषाच्या चाली सुद्धा वेल प्लँनड असतात. शिस्तीत खेळतो तो , ती अनेकवेळा भावनेत वाहत जाते. आपल्या मनातले त्याने ओळखावे अशी तिची अपेक्षा तर तिने हो की नाही ते एकदाचे सांगावे ही त्याची अधीरता..

ऐसे तो न देखो, के हमको नशा हो जाए 
ख़ूबसूरत सी कोई हमसे ख़ता हो जाए

दोघांना अडवायला आहे ते मधले एक दार . खरेतर पडदाच. त्याचा तुटका  दात , गालात दडलेले हसू आणि तिच्या आत्म्यालाच साद घालणारा मधाळ आवाज. त्याच्या नशेचा अंमल सुरु झालाय हे माहित आहे त्याला पण ते तिला सांगितले तर कदाचित माघार घेईल याची भीती ..म्हणून तोच पुढाकार घेऊन सांगतो ,

तुम हमें रोको फिर भी हम ना रुकें
तुम कहो काफ़िर फिर भी ऐसे झुकें
क़दम-ए-नाज़ पे इक सजदा अदा हो जाये
ऐसे तो न देखो…

पुरुष जेव्हा फ्लर्ट करतो तेव्हा तो नजरेला नजर देतो. त्याचे हसणे , त्याचा विश्वास , तिला पाहताच तिच्यावर स्थिरावलेली त्याची नजर, चमकलेले डोळे … सगळे सगळे तुम्हाला सांगत असते , he is fascinated by you.
हम तो मस्ती में जाने क्या क्या कहें
लब-ए-नाज़ुक से ऐसा न हो तुम्हें
बेक़रारी का गिला हम से सिवा हो जाये

तिचे लाजणे , तिने नजर चुकवणे हा सिग्नल आहे  तरीही पावले सावध टाकली पाहिजे हे माहित आहे त्याला. जर खरंच हातून आगळीक झालीच तर ती तुझ्या सौन्दर्याच्या नशेने हे तो सांगून ठेवतो. ती आगळीक होऊन द्यायची नसेल तर तू अशी पाहूच नकोस ..
किती गोड तक्रार …करणारा खवा देव आनंद
हे गीत मी जेव्हा जेव्हा पहाते तेव्हा नंदा कशाला थांबलीय मला समजत नाही.
Sigh …..

गाईड

आर के नारायण यांच्या कादंबरीवर आधारित गाईड  हा सिनेमा म्हणजे राजू ह्या टुरिस्ट गाईड चा चोराकडून , साधुत्वाकडे झालेला प्रवास. त्याचा लोभ , त्याची असुरक्षितता , त्याचा न्यूनगंड आणि पुरुषी अहंकार त्याला दलदलीत ढकलतात आणि त्याचे केलेले प्रायश्चित त्याला संतत्वाच्या पदावर बसवते. 
जेव्हा राजू , रोझी (वहिदा रहमान) ला भेटतो , तेव्हा ती सगळे असूनही एकटी पडलेली , एका श्रीमंत हुशार माणसाचीत पत्नी असते. त्याची शोभेची बायको. तो सतत कामात आणि ती दुर्लक्षित.
या एकाकीपणाच्या भावनेतून राजू तिला बाहेर काढतो, तिला नृत्य करण्यास उत्तेजन देतो , तिच्या दबलेल्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालतो आणि या स्वप्नांच्या मोहात पडून ती नवऱ्याचा त्याग करून , राजुचा हात धरून निघून जाते.
रोझी अल्पावधीतच मोठी यशस्वी नायिका बनते आणि राजू असुरक्षिततेच्या जंजाळात स्वतःला हरवून बसतो. हळूहळू रोझीपासून लांब होतो आणि चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात जातो. 

नकाराचे दुःख असहनीय कारण आपला अहं दुखावला जातो. स्वतःवरचा आत्मविश्वास डळमळीत होण्याची ती सुरुवात असते. पुरुषांच्या बाबतीत हे पचवणे कठीण असते. आयुष्यात जिंकणे हे फार महत्वाचे आहे ह्याचे संस्कार लहानपणापासूनच झालेले असतात. पुरुष कणखर असतो, रडणारे पुरुष कमकुवत असतात, पुरुषांचे अस्तित्व त्यांच्या “मी “पणात सामावलेले आहे ह्या सर्व गोष्टीने स्वतःची एक भ्रामक कल्पना त्यांच्या मनात आधीपासूनच तयार व्हायला सुरुवात होते. त्यात समाजमान्य गुण त्याच्यात असतील , जसे हुशारी, पैसे, प्रतिष्ठा .. तर या कल्पनेला सत्याचे रूप येते आणि नकाराने त्या सत्याला छेद गेला तर ते सहन करू शकत नाहीत.
तेव्हा हे गीत येते .

क्या से क्या हो गया , बेवफा , तेरे प्यार में
(सिनेमा- गाईड, संगीतकार-एस डी बर्मन, गीतकार-शैलेंद्र -आवाज -मोहम्मद रफी  )
आता इथे बेवफा कोण तर वहिदा रहमान ( रोझी )
फसवले कुणाला …देव आनंद ला
..असे निदान नायक समजतो.  खरेतर तिच्या चेक्स वर खोटी सही करतो. पण तरीही तिचे त्याच्यावर चिडणे , तिचे दुःखी होणे , हे त्याच्यासाठी प्रतारणेत मोडते …
चलो सुहाना भरम तो टूटा,जाना के हुस्न क्या है
कहती है जिसको प्यार दुनिया, क्या चीज़ क्या बला है
दिल ने क्या ना सहा
बेवफ़ा ऽऽ
अर्थात यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात … 

पण असो.
रफीच्या आवाजात व्याकुळता आहे, आपल्या प्रेमापासून विलग झाल्याची वेदना जी त्याच्या डोळ्यात सुद्धा आहे . अर्थात त्याचे कारण सुद्धा त्याची बेवफाई आहे. त्याचा न्यूनगंड आहे पण ते मात्र तो स्विकारत नाही.
प्रेम गमावल्याचा  पश्चाताप, जे गमावले ते परत येणार नाही याचे दुःख आणि हृदयाचे कोलमडणे , देव आनंद ने कमाल  केली आहे या सिनेमात.

पतिता


मानवी जीवनात दुःखाचे महत्व असाधारण आहे. तुला काय हवे या प्रश्नाला जेव्हा “मला दुःख हवे” हे जे कुंतीचे उत्तर येते त्यातच दुःखाची अपरिहार्यता सामावली गेली आहे. आशा-अपेक्षा यांनी भरलेल्या या जगात सुख आणि दुःख एकमेकांचा हात धरून येतात. आपण जेव्हा आनंदी असतो, तेव्हा जग आनंदी भासते. इंद्रियसुख भोगवादाला जन्म देते आणि त्यातून निर्माण झालेली असंतुष्टता आणि अपेक्षा दुःखाची जाणीव करून देतात. दुःख जमिनीवर आणते. स्वतःपलीकडे जे जग आहे त्याची जाणीव करून देते. आयुष्याचा खरा अर्थ काय याचा शोध घ्यायला उद्युक्त करते. सुखाच्या शोधाची ती सुरुवात असते.
मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल 
अशी हाक देणार्‍या ग्रेस यांच्या कवितांचा स्थायी भाव दुःख किवा शोक हाच आहे. लोकप्रिय हिंदीभाषिक कवी विजयकुमार पंत म्हणून गेले आहेत, ”दर्द में कुछ बात है ..दर्द श्वेत है दर्द श्याम है “
याच धर्तीवर पतिता मध्ये शैलेंद्र यांनी लिहिलेले फार सुंदर गीत आहे.
हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें
(सिनेमा -पतिता , संगीतकार -शंकर जयकिशन, गीतकार शैलेंद्र, गायक तलत महमूद)

हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें
हम दर्द के सुर में गाते हैं
जब हद से गुज़र जाती है खुशी
आँसू भी छलकते आते हैं

पतिता या सिनेमातील शैलेंद्रच्या, “हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें”या गीतावर, “अवर स्विटेस्ट सॉंग्स आर दोज दॅट टेल ऑफ सॅडेस्ट थॉट्स” या शेलीच्या काव्याचा प्रभाव आहे. शेली म्हंटतो, उदास आशय असणारी  गीते मधुर असतात. शैलेंद्र म्हणतो, मधुर गीते दर्दभऱ्या स्वरात गायली जातात. मधुरतेचा आणि  शोकात्मकतेचा सूर असणाऱ्या, तलत महमूद यांच्या आवाजाला मिळालेली ही पावती आहे.

काँटों में खिले हैं फूल हमारे
रंग भरे अरमानों के
नादान हैं जो इन काँटों से
दामन को बचाये जाते हैं

जन्म मिळतोच रुदनातून. दुःख हा जीवनाचा न चुकवता येणारा भाग आहे. चिखलातून कमळ जन्म घेते, काट्यांच्या पहाऱ्यात सुद्धा फुल उमलते.
आयुष्य म्हटले तर, सुख-दुःख, यश-अपयश, आनंद आणि आक्रोश यांचा कोलाज असते.
डोळ्यातून येणारे अश्रू केवळ दुःखाचे नसतात, तर अनेकदा आनंदाच्या अतिरेकाने सुद्धा डोळे भरून वाहू लागतात. मग भावनांचा निचरा करणाऱ्या या अश्रुंचे स्वागत सुद्धा का करू नये! 

“पतिता” ही  एका बलात्कारित मुलीची, राधेची  गोष्ट. धनदांडग्यांच्या जगात गरीब मुलीच्या अब्रूला मान नसतो. घराचे भाडे देता येत नाही म्हणून पैसे मागायला गेलेल्या राधेवर बलात्कार होतो. त्यातून ती गरोदर राहते. तिला मूल होते. आपल्या मुलाला कष्ट करून वाढवत असतानाच, या मुलीची भेट  निर्मल नावाच्या सुशिक्षित, कनवाळू तरुणाशी होते.  झालेल्या दुर्दैवी घटनेत तिची काहीही चूक नाही हे  जाणून निर्मल तिला लग्नाची मागणी घालतो. आपण जरी स्विकार केला तरी आपली कर्मठ आई याला सहजी  होकार देणार नाही हे ठाऊक असल्याने, काही काळासाठी हे मूल स्वतःपासून दूर ठेवण्याची विनंती तो राधेला करतो.
आईचे हृदय, ते बाळासाठी व्याकुळ होणारच!  एकीकडे बाळाचा विरह, दुसरीकडे निर्मलच्या आईला समजेल ही टांगती तलवार या कात्रीत सापडलेल्या राधेची समजूत काढणारे हे गीत आहे. 

जब ग़म का अन्धेरा घिर आये
समझो के सवेरा दूर नहीं
हर रात का है पैगाम यही
तारे भी यही दोहराते हैं

पहाट होण्याच्या आधीचे रात्रीचे प्रहार सर्वात काळेकुट्ट असतात असे म्हणतात पण त्या अंधारातच तर लुकलुकणारे तारे आपले अस्तित्व दाखवू शकतात. जो पर्यंत हृदयाची धडधड चालू असते तोपर्यंत आशेला जागा असते. 
आपली स्वप्ने मुठीत घट्ट पकडून ठेवली  पाहिजेत, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे कारण जोपर्यंत डोळ्यात ती जागी  आहेत तोपर्यंत आयुष्याला संधी आहे.

पहलू में पराये दर्द बसा के
हँसना हँसाना सीख ज़रा
तूफ़ान से कह दे घिर के उठे
हम प्यार के दीप जलाते हैं..

सातत्य कोणत्या गोष्टीत असेल तर तो आहे बदल. परिस्थिती कशीही असेल तर ती कायम राहत नाही. काळ बदलतो. त्याबरोबर मौसम सुद्धा बदलतो. ऊन सावलीचा हा खेळ नियती सतत खेळत असते. तरीही आपल्या माणसाचा आश्वासक स्पर्श, प्रोत्साहित करणारे हास्य आयुष्य वाहते ठेवते. हृदयात तेवणारा, आशेचा  मंद दिवा प्रतिकूल परिस्थितीशी लढायला मार्ग दाखवतो. मनाचा निग्रह आणि कणखरपणा शाबूत ठेवून माणसे वादळाला परतून लावण्यात यशस्वी होतात.
निर्मल, राधेला आश्वासन देताना सांगतो, हा प्रवास जरी कठीण असेल  तरीही एकमेकांची साथ, एकमेकांवरील विश्वास यात मोठी शक्ती आहे. केवढेही मोठे संकट आले, तरीही आपले प्रेम त्याला तोंड द्यायला समर्थ आहे.
देव आनंद यांच्या सोलो गीतांतील हे माझे अत्यंत आवडते गीत आहे. 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin. 










10 thoughts on “आनंद देणारा देव-देव आनंद ”

  1. अप्रतिम, सगळे pictures पुन्हा बघणार आहे मी, तुझ्या दृष्टिकोनातून. परत एकदा देवांआनंद च्या प्रेमात पडून.

  2. उदय शेवडे

    सुंदर लेख, गाण्याची निवड त्याचे विवेचन फार सुंदर झाले आहे.
    देवानंद हा त्याच्या दोषांसकट आणि मर्यादांसह अनेकांनी स्वीकारला होता हे त्याचे यश म्हणायला हवे.

    1. देवानंद हा त्याच्या दोषांसकट आणि मर्यादांसह..You said it Uday .
      He was incomparable.

  3. प्रिया,
    देव आनंद माझा खूप आवडता नाही.
    पण..
    आवडायचा सुद्धा.

    तू जी गाणी आणि चित्रपट निवडलेस ते सगळे अप्रतिम.❤️
    बघितलेले.
    गाणी अनेकदा ऐकलेली.
    खूप सुंदर लिहिलं आहेस,नेहेमीप्रमाणेच.

    1. Thank you Vidula.
      खरेतर तो काही उत्कृष्ट अभिनेता नाही. काही उत्तम अभिनय केले आहेत but credit goes to विजय आनंद . तरीही तो लक्षात आहे …अजूनही तेवढाच आवडीचा

  4. “चाॅकलेट हिरो “, हे बिरुद अत्यंत सार्थपणे मिरवणारा देवानंद खरोखरच खूप अफलातून अभिनेता…कुतुबमिनारमध्ये सीन शुट होऊ शकत नाही,हे समजल्यावर महबूब स्टुडिओ मध्ये जसाच्या तसा सेटअप लावून गाणं चित्रित करण्याचा आग्रह धरणारा देवानंद तेव्हा खूप चर्चेत होता, याविषयीचे कितीतरी रंजक किस्से हिंदुस्थान टाईम्स मध्ये छापून आलेले.
    त्याचा मिश्किल ढंग, हळवा प्रेमाविष्कार, हळूच तिरका कटाक्ष टाकत मैत्रिणीची केलेली आर्जवं…एक ना अनेक गोष्टी या लिखाणातून पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आल्यात…गाणी एक से बढकर एक आणि त्यावरचं विवेचन वाचणं पर्वणीच!!
    तुस्सी ग्रेट हो प्रियादी ❤️❤️

    1. Thanks dear Kamini.
      त्या माणसाची ग्रेस आणि स्टाईल कुणालाच नाही .
      अंगभूत सभ्यपणा , मॅनर्स कमावलेले
      आणि रूप दैवजात
      एकही नायिकेची त्याच्या बद्दल तक्रार नाही एवढा चांगला होता तो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *