Skip to content

Eternally romantic: The Shammi Kapur .

शम्मी कपूरचे सिनेजगतात, पदार्पण झाले तेव्हा राज कपूर, देव आनंद आणि दिलीप कुमार यांच्या नावाची चलती होती. त्यांची स्वतःची स्वतंत्र शैली आणि हक्काचा प्रेक्षकवर्ग होता . अशावेळी स्थिरावण्यासाठी त्यांच्या अभिनयाची कॉपी करणे या शिवाय नवोदितांना पर्याय नव्हता. शम्मीच्या आधीच्या चित्रपटात तेच झाले आणि चित्रपट पडले. तब्बल अठरा सिनेमांच्या अपयशानंतर सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला काय आणि नियती खुद्कन हसली. देव आनंदने नाकारलेल्या “तुमसा  नही देखा” हा सिनेमा शम्मी कपूरकडे चालून आला.
निर्माता शशधर मुखर्जी आणि दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी संधी तर दिली पण हा नायक आधी रंगवलेल्या लाजाळू, शांत काहीश्या शामळू नायकापेक्षा वेगळा होता. या चित्रपटात, शम्मीची मिशी तर उडवलीच पण वरचा मुखवटासुद्धा उतरवला.
हा नायक, क्लीन कट तर होताच, त्या बरोबर, आपल्या भावना स्पष्ट सांगणारा होता. त्याने काही लपून छपून प्रेम पत्रे लिहिली नाहीत की मित्रांना गळ घातली नाही. संगीत आणि नृत्य त्याच्या अंगात मुरले होते. आणि त्याचाच आधार त्यांनी नायिका पटवण्यासाठी केला.
नायिकेला तिने हो म्हणेपर्यंत पिडायचे हे शम्मीने सुरु केले.
सिनेमातील नायकाचा पोशाख बदलला. शम्मीने फॉर्मल कपड्यांऐवजी, जीन्स, टी शर्ट्स, जॅकेट्सना प्राधान्य दिले.
He was the first wild, energetic hero of Bollywood. 
१९५७ मध्ये प्रदर्शित झालेला “ तुमसा नही देखा” प्रचंड गाजला आणि बॉलीवूडला एक रोमँटिक नायक मिळाला.

तुम्हाला माहिती आहे का, शम्मी कपूरने पाच वर्ष शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेतले होते. त्याच्या मोठ्या भावाला, राज कपूरला संगीताची आवड होती. पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे संगीताचे धडे घेत असतानाच, त्याचे सिनेजगतात पदार्पण झाले आणि संगीत मागे पडले. त्यांच्या आईने, शम्मीला त्याच्या जागी पाठवायला सुरुवात केली. नवल नाही की त्याच्या सिनेमात अत्यंत मधुर, रोमँटिक, आनंददायी, ज्याच्यावर पाय सहज थिरकू लागतात असे  संगीत ऐकायला मिळते. 
त्याच्या “Shammi Kapoor Unplugged” सिरीज मध्ये एक मजेदार किस्सा आहे. बरसात सिनेमाच्या सेटवर त्याची नर्गिसशी भेट झाली. राज कपूरच्या पुढील चित्रपटात, आवारा मध्ये भूमिका मिळावी  अशी तिची आत्यंतिक इच्छा होती . “ तू माझ्यासाठी प्रार्थना केलीस ना, तर मी तुला काय हवे ते देईन “ असे तिने शम्मीला वचन दिले आणि शम्मीने ग्रामोफोनची मागणी केली. नर्गिसने त्याला आपल्या गाडीतून, HMV House मध्ये नेले आणि त्याला हवा तो ग्रामोफोन घेऊन दिला. नंतर जवळच्याच रिदम हाऊस मधून त्याच्या आवडीच्या रेकॉर्डस् घेऊन दिल्या. उद्याच्या संगीत स्टारची ही पायाभरणी होती.
संगीत आणि नृत्य त्याच्या अंगात भिनले होते. संगीतकार, चाली बनवताना शम्मी तिथे उपस्थित असायचा. नृत्य कसे असावे , त्याच्या स्टेप्स काय असाव्यात ह्याबाबत त्याची स्वतःची स्टाईल होती. त्याचे पदलालित्य आणि ऊर्जा यामुळे नृत्याला शम्मीचा चेहेरा मिळाला असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. 
 त्याच्या सोलो गीतांची ही पोस्ट.

z१) जवानियाँ ये मस्त मस्त बिन पिए
(सिनेमा-तुमसा नही देखा, संगीतकार- ओपी नय्यर, गीतकार- मजरूह सुलतानपुरी, गायक-रफी, सहनायिका-अमिता )

तारुण्याच्या पदार्पणातील हे गीत. असे वय की की कुणीतरी फक्त आपल्यासाठी आयुष्यात यावे, आपल्यासाठीच जगावे असे वाटते. पुरुष सुद्धा त्याला अपवाद नाहीत.

जवानिया ये मस्त मस्त बिन पिए , जलाती चल रही है, राह मे दिए
ना जाने इन मे किस के वास्ते हू मै, ना जाने इन मे कौन है मेरे लिए

जीव तोडून प्रेम करावे आणि त्या प्रेमालाही तसाच प्रतिसाद मिळावा असे भाग्यवान कमीच. कितीही देखणा आणि तरुण पुरुष असेल तरीही जेव्हा तो खरंच प्रेमाच्या शोधात जातो तेव्हा त्याच्या आशा,आकांक्षा एका स्पेशल व्यक्तीवरच केंद्रित झालेल्या असतात. ती व्यक्ती आपल्याला स्विकारेल का ही धाकधूक त्याच्याही मनात असते. तारुण्याची नशा फक्त त्या खास व्यक्तीच्या आठवणीतून चढते. आजूबाजूला साऱ्या हसिनांच्या ताटव्यात माझ्या वाट्याला कोणते फुल येणार आहे ही आतुरता मनात असतेच.
या सिनेमाच्या गीतांच्या रेकॉर्डिंगला रफी आणि शम्मीची भेट झाली. “सर पे टोपी लाल, हाथ में, रेशम का रुमाल” या गीताचे  चे रेकॉर्डिंग होणार होते. “ मी अशा तर्हेने हे गीत पडद्यावर सादर करणार आहे, तुम्हाला या स्टाईल ने गाता येईल का ?” नवोदिताचा हा प्रश्न म्हणजे धारिष्ट्च. रफींनी मात्र “ बघू, मला कसे जमेल ते “ असे नम्रपणाने सांगितले आणि त्या नंतर या जोडीने काळ गाजवला. 
या लेखातील सर्व गीते रफीची आहेत.

२) हम और तुम और ये समां 
(सिनेमा-दिल देके देखो, संगीतकार- उषा खन्ना, गीतकार-मजरूह सुलतानपुरी, गायक-रफी, सहनायिका-आशा पारेख)

हिंदी प्रेम गीतांत या गाण्याचा नंबर फार वरचा असेल. अतिशय छोटे गीत आहे हे. गाण्यात वाद्यांचा किमान उपयोग आहे फक्त शेवटाला वाद्यांचा कल्लोळ वाढतो जेव्हा तिचा होकार येतो.
समुद्र किनाऱ्यावरील छोटेसे हॉटेल. रात्र कधीच संपून गेली आहे. माणसे निघून गेली आहेत. उरली आहेत फक्त एकमेकांच्या विचारात हरवून गेलेली ती दोघे. प्रेमाचा इजहार काही सोपा नसतो. शब्द ओठावर असले तरी बाहेर यायला बिचकतात. त्याचा मात्र संयम सुटत चालला आहे. 
पहाटेच्या धुक्याच्या पार्श्वभूमीवर, पांढरा शुभ्र पोलो नेक स्वेटर मधला तो विलक्षण देखणा दिसतो. रांगडा पण चेहेऱ्यावर आतुरता. मधात बुडलेला रफीचा आवाज उसना घेऊन तो विनवतो,

हम और तुम , और ये समां
क्या नशा नशा सा है
बोलिये न बोलिये
सच सुना सुना सा है

दोघांच्यात अंतर आहे.  त्याने ते मुद्दाम ठेवले आहे. तिचा होकार, तिच्या चेहेऱ्यावर स्पष्ट उमटलेला असला तरी नजरेत भीती ही आहे. थरथरणारे ओठ, पूर्ण शरीराला सुटलेला कंप आणि चेहेऱ्यावरील गोंधळ त्याला सांगतो आहे की थोडासा धीर धर, थोडा संयम, मग ती तुझीच आहे.
तिला सुरक्षित वाटेल अशा अंतरावर राहून तो सांगतो,

बेकरार से हो क्यूँ, हम को पास आने भी दो
गिर पडा जो हाथ से, वो रुमाल उठाने भी दो
बनते क्यूँ हो , जाने भी दो
थोडीशी उंचावलेली भुवई, कललेली मान, तिरपी नजर आणि आर्जवी भाव…हे गाणे रोमँटिक आहेच पण शम्मीच्या नंतरच्या सिनेमांचा विचार केला  हा रोमान्स निरागसही  आहे. 

पन्नासचे दशक सामाजिक आणि आर्थिक बदलांचे होते ज्याचे प्रतिबिंब सिनेमात दिसले तर साठीचे दशक हे हलक्याफुलक्या रोमॅंटिक सिनेमाने गाजवले. चित्रपटाच्या यशात संगीताचा महत्वाचा वाटा असल्याने,  संगीताला वाव असणाऱ्या कथा लिहिल्या जाऊ लागल्या. अर्थात प्रेमकथांना बहर आला. याच काळात, शिक्षण आणि नोकरीच्या संधी उदयाला येत होत्या. मध्यमवर्गीय सुखवस्तू होण्याची स्वप्ने बघू लागला होता. आदर्शवाद मागे टाकून स्वतःच्या सुखाचा शोध घेणारा नायक या दशकात जन्माला आला. “या हू” म्हणून शम्मीने त्याच्या आगमनाची ग्वाही दिली. 
आदर्शवादी राज , शोकांतिकेचा नायक दिलीप आणि चॉकोलेट हिरो देव पेक्षा शम्मीने आपली वेगळीच इमेज निर्माण केली. 
हा नायक बेफिकीर होता, आक्रमक होता , त्याचा रोमान्स धसमुसळा होता, त्याच्या पदलालित्यात एनर्जी होती, बिनधास्तपणा होता. त्याचे प्रेम उघड होते, मोकळे होते, 
दिल देके देखो, जंगली , काश्मीर की कली, प्रोफेसर, तिसरी मंझिल आणि अशा अनेक सिनेमांनी रोमँटिक हिरोच्या इमेजला मर्दानी रूप दिले.

३) एहसान तेरा होगा मुझ पर
(सिनेमा-जंगली, संगीतकार-शंकर जयकिशन, गीतकार- हसरत जयपुरी, गायक -रफी , सहनायिका-सायरा बानो)
“चाहे कोई मुझे जंगली कहे “ हे  गीत सिनेमाची सिग्निचर ट्यून  आहे

पण शेखरचे खरे रूप एका वेगळ्याच गीतात दिसून येते.
शेखरची आई राजचा अपमान करते. पैशासाठी तिने प्रेमाचे नाटक केलं याचा आरोप करते. दुखावलेली राज तिथून निघून जाते. त्यावेळी राज काही बोलू शकत नाही पण नंतर आपल्या प्रेमाची बाजू घेऊन तो आईला सुनावतो आणि राज कडे येतो.
प्रेमात माफीला जागा नसते असे म्हणतात पण योग्य त्या क्षणाला मागितलेली क्षमा नात्याचे बंध अजून घट्ट करते.

तुमने मुझको हसना सिखाया
रोने कहोगे रो लेंगे अब
आँसू का हमारे गम ना करो
वो बहते है तो बहने दो
मुझे तुमसे मोहब्बत हो गयी है
मुझे पलको की छाँव में रहने दो
एहसान तेरा होगा मुझ पर

“मी तुझ्यावरच  प्रेम करतो “ शेखर सांगतो. तू मला माणसात आणलेस, हसायला शिकवलेस, मग आता डोळ्यात अश्रू आले तरी बेहत्तर. ही सुद्धा तुझी देणगीच आहे .ह्या गाण्याला खूप अर्थ आहे. सुरुवातीला शेखर जंगलीच असतो. भावनापासून अलिप्त, कोरडा.प्रेम त्याला हळवे बनवते, संवेदनशील, न्यायी आणि मानवी.

साठ आणि सातारचे दशक देव आणि शम्मीने गाजवले. दोघेही रोमँटिक हिरो. त्यांच्या प्रेमात मात्र फरक होता. देवच्या समोर कुणीही नायिका असली तरी देव चे स्वतःवरच प्रेम होते. त्यात तो खरंच सभ्य वागायचं , दिसायचा त्यामुळे नायिका त्याच्या वाकड्या दातांत सहज फसायची , शम्मीची गोष्टच वेगळी होती.  He not only wooed her, he pursued till she agreed on his terms. वेगवेगळ्या हिल स्टेशनवर शम्मीने काय केले तर फक्त पाठलाग. त्याचा चेहेरा एखाद्या खोडकर मुलासारखा असला, तरी त्याच्या व्यक्तिमत्वात एक पुरुषी आक्रमकता होती , An animal grace that had women gushed over him.

साठीच्या दशकातील प्रेमात, अगदी शम्मीच्या सुद्धा,  एक संथपणा होता. डोळ्यातून उतरलेले प्रेम , संथपणे तुमच्या धमन्यांतून वाहत राहायचे.

४)ऐ गुलबदन, ऐ गुलबदन
(सिनेमा-प्रोफेसर, संगीतकार- शंकर जयकिशन, गीतकार-हसरत जयपुरी, गायक- रफी, सहनायिका-कल्पना)

“ कही आज किसी से मोहब्बत ना हो जाये” ही ओळ ऐका, शम्मीच्या डोळ्यातील आर्जव पहा म्हणजे लक्षात येईल , मला काय म्हणायचे आहे ते.

ते चॉकोलेट ब्राऊन डोळे, आपल्यावरच रोखलेले पाहून कोण वितळणार नाही !
धसमुसळा, रांगडा आहे शम्मी, असे म्हणणाऱ्यांनी शम्मीचे हे रूप पाहावे.

१९६२ मधला “प्रोफेसर” ही एक धमाल रोमँटिक कॉमेडी आहे. नायकाला आईच्या ऑपरेशनसाठी, पैशाची गरज असल्याने, तो एका श्रीमंत महिलेच्या घरी, तिच्या दोन भाच्यांना शिकवण्याची नोकरी स्विकारतो. मुलींना शिकवायला तरुण शिक्षक नको ही अट असल्याने, तो वृद्धाचा अवतार घेऊन तिच्या घरी जातो पण पोषाखाने अंतरंग थोडेच बदलते !!
देखणी भाची बघून हा प्रोफेसर तिच्या प्रेमात पडतो.

क्या हसीन मोड पर आ गयी जिंदगानी
की हकीकत न बन जाये मेरी कहानी
कल्पना सुद्धा केली नसताना , आयुष्यात प्रेमाचे वळण येते. हा रस्ता अवघड आहे याची नायकाला जाणीव आहे. एक तर परिस्थितीतील अंतर आणि दुसरे केलेली फसवणूक.
हे सत्यात येईल का हा प्रश्न केवळ तिला नाही तर त्याच्या स्वतःच्या मनाला पडलेला प्रश्न आहे. अर्थात शम्मीच्या मनात अस्वस्थता फार काळ टिकून राहणारी नाही.
बाहेरून आलेला निसर्ग , आसमंतात वाहणारे गार वारे त्याच्या मनाची मरगळ झटकून टाकतात.

तुझे देख के कहता है मेरा मन
कही आज किसी से मोहब्बत ना हो जाये”
कबुली आणि संदिग्धताचा किती सुंदर मिलाप आहे हा.

तुमसा नही देखा या सिनेमाने शम्मी सिनेसृष्टीत स्थिरावला असला तरी सिनेरसिकांसाठी त्याची एक ठोस प्रतिमा बनली. थोडासा खोडकर, बराचसा जंगली, आयुष्य मजेत जगणारा, कसलीच फिकीर नसणारा, रोमँटिक, बंडखोर पण मृदू हृदयाचा शम्मी नंतरच्या सिनेमात दिसला. त्याच्या सिनेमाची नावे सुद्धा बघा , जंगली , जानवर, ब्लफ मास्टर .. एकाच साच्यात बनवलेले सिनेमा त्याच्या वाट्याला आले , अपवाद ब्रह्मचारी.
अर्थात कपूर लोकांच्या अंगात नृत्य आणि अभिनय असल्याने इथेही त्याने स्वतःची अशी छाप सोडली की दुसरा शम्मी परत होऊ शकला नाही ..आणि होणारही नाही . 

६१ मध्ये प्रदर्शित झालेल्या “ बॉयफ्रेंड “ या चित्रपटात बाकी असो नसो, चित्रपटसृष्टीतील दोन अत्यंत देखणे कलाकार होते. शम्मी आणि मधुबालाचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट.  हा चित्रपट सुद्धा रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता. यात अभिनय करायला शम्मीला फार त्रास झाला नसेलच कारण त्यानेच एकीकडे म्हंटले आहे की , मधुबालाच्या सुंदरतेने त्याला एवढे झपाटून टाकले होते की सेट वर त्याचे संवाद सुद्धा तो विसरून जात होता. मधुबालासाठी हे नवीन नसणार , त्यामुळे त्याची झालेली फजिती ती सुद्धा एन्जॉय करत होती.
बिछडलेले दोन भाऊ , एक चोर आणि एक पोलीस अशी ही कथा होती.

५) धीरे चल, धीरे चल, ऐ भीगी हवा
(सिनेमा -बॉयफ्रेंड, संगीतकार-शंकर -जयकिशन, गीतकार- हसरत जयपुरी, गायक-रफी, सहनायिका -मधुबाला)

चंद्र प्रकाशात उजळलेली रात्र, हळुवार स्पर्श करणारा वारा, निद्रावस्थेतील मधुबाला आणि तिच्या सौन्दर्यावर लट्टू झालेला, काळ्या पोशाखातील गोरापान शम्मी .. अंगाई सुद्धा अशी सर्वांगाने रोमँटिक असते!

धीरे चल, धीरे चल, ऐ भीगी हवा
के मेरे बुलबुल की है नींद जवाँ
के कहीं लागे ना किसी की उसे बदनज़र
के मीठे सपनों में खो गई है बेख़बर
के धीरे चल, धीरे चल, ऐ भीगी हवा

माझी दिलरुबा आता झोपली असल्याने तू दंगा करून तिची झोप उडवू नकोस असे वाऱ्याला सांगत असला , तरी त्याचा दंगा चालूच आहे. मधुबालाने इथे निद्रेचे ढोंग घेतले आहे ते बरे , नाहीतर एखादी धसक्याने जागी झाली असती अशा त्याच्या नृत्याच्या स्टेप्स आहेत .
मजा म्हणजे हे गाणे सुद्धा फास्ट आहे . आता शम्मी अंगाई गाणार म्हणून असेल , गाण्याचे चित्रीकरण , संगीत आणि त्याची लय unconventional आहे. अर्थात एवढी देखणी जोडी पाहायला मिळाल्याने ये भी मंजूर है.

वडिलांच्या इच्छेविरुद्ध प्रेमात पडणे, हा गेल्या शतकातला प्रेमाच्या रस्त्यातील मोठा अडसर होता. पडद्यावरच कशाला, प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा मियाँ बीबी राजी असले तरी त्यांचे आईवडील मोडता घालण्यात पुढे असायचे.
जानवर ची कथा अशीच आहे.

६) मेरी मुहब्बत जवाँ रहेगी, सदा रही है, सदा रहेगी
(सिनेमा-जानवर, संगीतकार-शंकर जयकिशन,  गीतकार-, हसरत जयपुरी, गायक-रफी, सहनायिका- राजश्री)

सुरुवातीच्या गैरसमजातून बाहेर पडून अखेर नायिका सुद्धा शम्मीच्या प्रेमात पडते, न पडायला काय झाले ! पण ती अनाथ आहे आणि गरीब सुद्धा.  प्रत्यक्ष जीवन म्हणजे काही परीकथा नाही याची जाणीव असल्याने ती नायकापासून दूर जाण्याचा निश्चय करते.
माझे तुझ्यावरील प्रेम कधीही कमी होणार नाही हे नायकाने दिलेले वचन म्हणजे हे गीत.

न तुम सा कोई ज़माने भर में,
तुम्ही को चाहा मेरी नज़र ने
तुम्हें चुना है, तुम्हें चुनेगी
सदा रही है, सदा रहेगी
(संपूर्ण सिनेमात नायकाने वेषांतर केल्याचे अनेक प्रसंग आहेत, काश्मीर मध्ये टूर्नामेंट खेळायला गेलेला असताना हे गाणे येते. अर्थात जेव्हा शूटिंग होते तेव्हा बर्फ नसल्याने, लोळायला त्यांना हिमाचल प्रदेशातील कुफरीला जावे लागले.असेही एक स्थलांतर. )

शम्मीच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत महत्वाचा सिनेमा म्हणजे “ तिसरी मंझील”
शेवटपर्यंत न उलगडणारे गूढ, कथा , पटकथा संवाद , संगीत, दिग्दर्शन आणि अर्थात उत्कृष्ट कास्टिंग .
या सिनेमासाठी नासिर हुसेन यांना देव आनंद हवा होता. कोणत्यातरी कारणामुळे , त्यांच्यात मतभेद झाले आणि अगदी शेवटच्या क्षणी देव बाहेर पडला. शम्मीची वर्णी लागली अँड the rest is history.

तिसरी मंझिलची सर्वच गाणी अप्रतिम.आर डी बर्मन च्या कारकिर्दीला फार उंचावर नेणारा सिनेमा होता हा. यात शम्मीचा रोल एका ड्रमर आणि गायकाचा आहे. He is a rockstar. त्यामुळे सर्वच गाणे द्रुतलयीत आणि वेस्टर्न . त्यात “तुमने मुझे देखा “ हे हटके  गाणे आहे.

७)तुमने मुझे देखा, हो कर मेहरबान
(सिनेमा- तिसरी मंझिल, संगीतकार-आर डी बर्मन-, गीतकार-मजरुह सुलतानपुरी , गायक -रफी , सहनायिका -आशा पारेख)

शम्मी, आशा पारेखला पत्र लिहून त्याची सच्चाई सांगतो. तिच्या बहिणीबरोबर त्याचे काय संबंध होते तेही लिहितो.
त्याला आशा असते की या पत्राने तिचे गैरसमज दूर होतील. जर ती त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली तर तिने त्याला माफ केले असे तो समजेल.

आशा पारेख येते खरी पण तिला पत्र मिळाले नसतेच. आल्यावर तिच्या हातात ते पत्र पडते.
अर्थात हे नायकाला माहित नाही. तिने आपल्याला क्षमा केली हे समजून तो गातो; Thanking his destiny and beloved for giving him second chance.

लेकर ये हसीं जलवे, तुम भी न कहाँ पहुँचे
आखिर को मेरे दिल तक, क़दमों के निशाँ पहुँचे
ख़त्म से हो गए, रास्ते सब यहाँ
जानेमन, जाने जाँ..
तुमने मुझे देखा
या गीताला शम्मीच्या खाजगी  आयुष्यात एक वेगळी पार्श्वभूमी आहे.
शम्मीची पत्नी गीताबाली देवी या रोगाने आजारी होती . शम्मी कामात व्यग्र. तिने फोन करून सुद्धा तो पोचू शकला नाही . गीताचे निधन झाले आणि शम्मी दुःखाने आणि अपराधी भावनेने कोलमडला. कित्येक दिवस तो खोलीच्या बाहेर पडला नाही.
जेव्हा त्याने परत कामाला  सुरुवात केली , तेव्हा हे गीत त्याचा पहिला शॉट होता.

To be continued
( शम्मी कपूर च्या गाण्यांची सिरीज करता येईल एवढी सुंदर गाणी त्याच्या वाट्याला आली. ही गाणी फक्त सोलो प्रेमगीते .
द्वंद्वगीते परत कधीतरी )

Disclaimer:

Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.


















10 thoughts on “Eternally romantic: The Shammi Kapur .”

  1. सुंदर झालाय लेख… प्रत्येक गाणे मी पूर्ण गुणगुणलेय वाचताना….
    रफींची गाणी पाठ असण्याचे व्यसन आहे जनू…. ❤️❤️

  2. Vidula Sahasrabudhe

    प्रिया ,
    नेहेमी प्रमाणे च छान लेख.❤️❤️
    माझा दादा माझ्यापेक्षा ७ वर्षांनीं मोठा.

    ११ वी नंतर प्री डिग्री सायन्स प्रॅक्टिकल ची रिपीट बॅच असायची,ज्यांचे बुडाले आहे त्यांच्या साठी.

    मी कधीच बुडवत नसे.
    मग दादा सांगायचा, हा सिनेमा matini ला बघा.
    मग आम्ही मैत्रिणी सायकल वर जायचो.
    त्यामुळे शम्मी ,देव आनंद यांचे खूप सिनेमे पाहिले.
    नंतर टीव्ही वर सुद्धा.
    अर्थात शम्मी चा प्रत्येक सिनेमा पाहिला आहे.
    तुझ्या लेखामुळे ते दिवस आठवले.

    1. Vidula , मी सुद्धा कॉलेज मध्ये असताना त्याचे सिनेमा पाहिले. खरेतर तो माझ्या बाबाहून मोठा .
      पण काय करिष्मा !

  3. प्रियाजी सुंदर लेख आहे एक चूक आहे शम्मी मधुबालाचा फक्त एकच चित्रपट नव्हता अजून एक चित्रपट मला आठवतो रेल का डिब्बा.

  4. आहा. अप्रतिम लिहिलंस. वाचतच होते आणि मला प्रश्न पडला होता की तुमने मुझे घेतलंयस की नाही. मला प्रचंड आवडणारं हे त्याचं गाणं. गीताबाली गेल्याचं दु:ख, नैराश्य या गाण्याचा मूड अधिकच गहिरं करतं. रणबीर कपूरला बदतमीज दिल नाचताना बघितलं आणि म्हंटलं, आला शम्मी परत. शम्मीचा खूप भास रणबीर मध्ये आहे. आवडला लेख.

    1. Shalmali ,
      कपूर असून तो खूप वेगळा होता .
      गीता वर त्याचे खरे प्रेम होते . नंतर कितीतरी दिवस लागले त्याला सावरायला आणि मग बदलला तो .
      रणवीर मध्ये खरंच भास होतो पण रणवीर ला त्याची सर नाही ,
      तो खूप देखणा आणि तगडा होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *