नुकताच मृत्यू झालेल्या घरात तुम्ही कधी गेला आहात का? आपल्याला वाटतं की वातावरणात शोक भरून उरला असेल, गांभीर्य असेल , पण वास्तवात अशी घरे फार कमी असतात. गेलेला माणूस निघून जातो, उरलेल्या लोकांना नंतरचे सोपस्कार पार पाडायचे असतात. त्यात घडलेला मृत्यू अकस्मात असेल तर अनेक प्रश्न उभे राहतात ज्यात दुःखाला वाचा फुटायला सुद्धा वेळ वेळ नसतो.
अचानक मृत्यूचे कारण संशयास्पद असेल तर पोस्टमार्टेम, नसेल तरीही अंत्याविधी , तो कुणी करायचा, डेथ सर्टिफिकेट, जागा आणि या सर्वांसाठी लागणारे पैसे, लोकांना बोलावणे, क्रियाकर्म करणारा मनुष्य मिळवणे अशा अनेक गोष्टी, प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या असल्या तरी असतात.
अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीचे तर स्वतःचे असे जग असते. आजच्या धावपळीच्या जगात भेटायला वेळ नसल्याने अनेकजण या निमित्ताने भेटतात. मग गेलेला माणूस मागे पडतो आणि त्याच्या स्वतःच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडणे सुरु होते. कुणाचा मुलगा परदेशी जाणार असतो, कुणाला जावई आलेला असतो, कुणाच्या घरात नवीन गाडी असते, ती सुद्धा या निमित्ताने दाखवणे होते , कुणी प्रमोशनची बातमी सांगते, चेहेऱ्यावर प्रसंगाला विपरीत असे हसू झळकत असतानाच , अचानक कुणीतरी जवळचे आल्याने, कुणाचा तरी बांध फुटतो आणि हसरे चेहेरे गंभीर होतात.
दिग्दर्शक लिजो जोज पेरिसरी, आपल्या “ई मा याउ” ह्या मल्याळी सिनेमात मृत्यूचे हे वेगळे रूप दाखवतो.
कोणत्याही कथेतील मुख्य पात्र हे मानवी असते. “ई मा याउ” या मल्याळम सिनेमाचा नायक मात्र मानवी नाही.
मृत्यूला या सिनेमात नायकाचा रोल दिला आहे.
असे म्हणतात. “ Life is pleasant, death is peaceful. It’s the transition that’s troublesome” पण संक्रमणाचा हा प्रवास, मृत्यू पावणाऱ्या माणसापेक्षा सुद्धा त्याच्या जवळच्या माणसांसाठी फार अवघड असतो.
दिग्दर्शक, लिजो जोस पेल्लीस्सेरी, ह्या सिनेमात, मृत्यूशी निगडित असलेल्या गंभीरतेवरील आवरण काढण्यात आणि संपूर्ण चित्रपटावर मरणाची काळी सावली पडली असताना सुद्धा आपल्या प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी झाला आहे.
लिजो म्हणतो, मृत्यूची केवळ चाहूल, दुःखाला जन्म देते. खरेतर आपल्या जगण्याच्या असंख्य शक्यतेत, केवळ मृत्यू ही एकच शक्यता सत्य ठरणार आहे मग त्याचे स्वागत हास्याने का करू नये!
हा सिनेमा एक ब्लॅक कॉमेडी आहे.
“ई मा याउ” म्हणजे बायबल नुसार मृत्यू झालेल्या माणसाच्या कानात सांगितलेले शब्द “ जिझस, मेरी आणि जोसेफ” अंत्यसंस्काराच्या वेळी केलेली प्रार्थना .
कथा एर्नाकुलम मधील चेल्लनाम या समुद्रकिनाऱ्याजवळील गावात घडते. संध्याकाळची वेळ. सुरुवातीलाच एक शवयात्रा जाताना दिसते. उत्कृष्ट शवपेटी, त्याबरोबर असणारा संगीताचा बँड, फादर आणि काळ्या पोशाखातील अंत्ययात्रेत सामील होणारे नातेवाईक.
हे स्वप्न आहे का सत्य! कदाचित स्वप्नच. बसमध्ये बसलेल्या एका निद्रिस्त माणसाच्या, वावाचनच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव आहेत. तोच हे स्वप्न बघत असावा.
बस चेल्लनाम गावात थांबते.
समुद्र किनाऱ्यावर एका झोपडीवजा जागेत दोन माणसे पत्ते खेळत असतात. त्यांच्या गप्पांत मग्न असतात.
वावाचन हा माणूस, ज्याच्या मृत्यूभोबती ही कथा फिरते, तो बसमधून उतरतो. घराकडे जातानाच गावातील एक माणूस त्याला सांगतो की त्याची मुलगी निसा, कुमारी माता बनणार आहे. चिडलेल्या वावाचनची त्याच्याबरोबर हातपाई होते. त्याला ढकलून देऊन, दारूच्या बाटल्या घेऊन तो घरी येतो.
वावाचनचा पाय कधीच घरात टिकत नसल्याने, त्याची बायको कायमच त्याच्यावर चिडलेली असते. तिला शांत कारण्यासाठी तो पिशवीतून बदक काढतो आणि ते शिजवायला बायकोकडे देतो. खूप दिवसांनी दारू आणि घरात शिजणारे मांस यामुळे खुश झालेला वावाचन घराच्या बाहेर बसून गुणगुणत असतानाच त्याचा मुलगा, ईशी घरी येतो.
बाहेरच आपल्या वडिलांच्या भांडणाची गोष्ट त्याच्या कानावर आलेली असते. वडिलांवर चिडला असला तरी एवढ्या दिवसांनी वावाचनला पाहून त्याचा राग वितळतो. त्यांच्या गप्पा रंगतात. बोलता बोलता, वावाचन त्याला आपल्या वडिलांच्या अंत्ययात्रेविषयी सांगतो. ती एवढी थाटात निघालेली असते की पूर्ण गावात तशी कोणाचीच निघालेली नसते.
वडिलांचा अभिमानाने फुललेला चेहेरा पाहून तो वडिलांना वचन देतो की त्यांचीही अंत्ययात्रा तो शाही थाटात काढेल. उत्तम शवपेटी, गावचा मुख्य पाद्री, चांदीचा क्रॉस, फटाक्यांची आतषबाजी , अशी अंत्ययात्रा अजूनपर्यंत कुणी पाहिलेली नसेल.
इथे बदकाचे कालवण शिजून तयार असते. वावाचनची सून , वावाचनच्या ताटात, काहीतरी औषध घालताना ईशी बघतो आणि तिच्यावर डाफरतो. काही घालायचे नाही असे तिला बजावतो.
अंत्ययात्रेच्या विचारानेच खुश झालेल्या वावाचनवर, दारूचा अंमल चढायला सुरुवात झालेली असते. बाहेर वारा सुटलेला असतो. वादळाची सुरुवात असते. उंबरठ्यावरच झुलत झुलत, स्वतःशीच बोलत, वावाचन आतल्या खोलीत जातो आणि थबकन आवाज येतो. थोड्याच सेकंदात किंकाळीचा , रडण्याचा , ओरडण्याचा आवाज येतो.
ईशी आत जाईपर्यंत सर्व संपलेले असते. वावाचन जमिनीवर पडलेला असतो. त्याच्या डोक्याला जखम झालेली असते आणि त्यातच त्याचा तात्काळ मृत्यू होतो.
मृत्यू हा जर अंतिम अध्याय असेल तर फक्त गेलेल्या माणसाच्या आयुष्याचा असतो. उरलेल्या लोकांना बरेच सोपस्कार पार पडावे लागतात. अंत्यसंस्कार, विधी, त्यासाठी लागणारे पैसे, स्मशानात दफन विधी दाखल करावे लागणारे डॉक्टरांचे सर्टिफिकेट, चर्च मध्ये अंत्यसंस्कार करायचा असेल तर तेथील पाद्रीची परवानगी, मृत्यू अकस्मात असेल तर पोलिसांची परवानगी आणि अर्थात समाजातील लोकं, त्यांची कुजबुज , या सर्वांचा फायदा करून घेणारी माणसे .
वावाचन तर जातो पण ईशीला मात्र आता या सर्वांची जुळवाजुळव करण्यासाठी उभे राहणे भाग असते आणि ही गोष्ट प्रत्येक वळणावर अवघड होत जाते.
समुद्राच्या साक्षीने सगळी कथा घडते. संध्याकाळच्या किनाऱ्याची गळाभेट घेणाऱ्या संथ लाटा एकामागून एक येत जातात. रात्र होते. भरती येते. आता लाटांचा आवेग वाढत जातो , त्याबरोबर आवाज ,मग येणाऱ्या वादळात किनारा झोडपला जातो. तो मात्र अलिप्त आहे. येणाऱ्या लाटेला न थोपवता, स्वतःच्या जागेवर उभा आहे ..त्यालाही माहिती आहे, हे वर्तुळ कधीतरी पूर्ण होऊन परत समुद्र शांत होणार आहे. इथेही वावाचनच्या अकस्मात मृत्यूने संथ आयुष्य जगणाऱ्या त्या गावात खळबळ माजते. लोकं तर्कवितर्क लढवायला लागतात. घराभोवती गर्दी जमते पण त्यात मदत करण्यापेक्षा, जे घडते आहे त्याची मजा घेणारे बघेच जास्त.
मृत्यू, जाणाऱ्या माणसाचे अस्तित्व संपवत असेल पण उरलेल्या गर्दीचा मुखवटा ओढून काढतो.
दिग्दर्शक, लिजो जोज पेरिसरीचा कॅमेरा गर्दीचे हे चेहेरे टिपतो.
धक्याने आणि दुःखाने एकटी पडलेली वावाचनची मुलगी, आपल्या प्रियकराच्या स्पर्शात आधार शोधायला जाते तर तो त्या क्षणाचा फायदा घेऊन जवळीक साधू पाहतो. अशा परिस्थितीत सुद्धा स्वतःच्या वासनेवर ताबा नसणे, केवळ त्या मुलीलाच नाही तर प्रेक्षकांना सुद्धा अस्वस्थ करते.
वावाचनच्या पत्नीसाठी दुःखापेक्षा सुद्धा, समाजाला ते दुःख दाखवणे महत्वाचे आहे, त्यामुळे कुणी भेटायला आले की कोरड्या पडलेल्या डोळ्यातून हुकमी अश्रू वाहायला लागतात, आणि जेव्हा ते सुद्धा हार मानतात, तेव्हा मोठ्याने हंबरडा फोडून ती आपल्या दुःखाचे प्रदर्शन करते.
ईशी साठी वडिलांना दिलेले वचन महत्वाचे आहे. अंत्ययात्रा वैभवशाली निघावी या साठी पैशाची गरज भासते तेव्हा तो आपल्या पत्नीकडे तिच्या गळ्यातील सोन्याच्या चेनची मागणी करतो. नाही दिलीस तर तू माझ्या वडिलांना कसलेतरी औषध देत होतीस हे मी सगळ्यांना सांगीन असे धमकावतो आणि त्याच पैशाने सर्वात महाग शवपेटी विकत घेतो.
“ अरे , ती सुद्धा जमिनीत पुरली जाणार आणि नष्ट होणार, प्रेताला काय फरक पडणार आहे ?” त्याचा मित्र अय्यपन त्याला सांगायचं प्रयत्न करतो. या सर्व गोंधळात हाच एक समजूतदार आणि शहाणा आवाज आहे पण ईशीच्या कानापर्यंत काही तो पोचत नाही. त्याच्या या हळव्या मनस्थितीचा फायदा दुकानदार घेतो आणि सर्वात महागडी शवपेटी त्याच्या गळ्यात बांधतो.
विरोधाभास असा की ही शवपेटी सदोष आहे. खरेतर ईशी हा सुतार आहे. तो त्याचा पारंपरिक व्यवसाय असूनही, त्याला हा दोष समजत नाही आणि एवढे पैसे खर्च करून सुद्धा त्याचा उपयोग होत नाही.
पैसे तर पेटी घेण्यातच संपल्याने, म्युझिक बँड साठी पैसेच उरत नाही आणि जो माणूस विना पैसे तयार होतो, त्याचे वाद्य ऐनवेळी खराब झाल्याने त्यातून निघणारे सूर प्रसंगाच्या गांभीर्यालाच गालबोट लावतात.
गावात एकच डॉक्टर पण पार्टीमध्ये दारू पिल्याने रात्री गाढ झोपेत असतो. सर्टिफिकेट देण्यासाठी जी नर्स येते, ती वावाचनच्या डोक्याला खोक पडलेली बघून सर्टिफिकेट देण्यास नाकारते आणि वावड्यांना उधाण येते.
त्यात दफन विधीसाठी खड्डा खोदणारा माणूस, स्वतःच त्या खड्यात पडून मरतो आणि त्यात खड्यात त्याला पुरले जाते.
गावच्या पाद्रीला गुप्तहेरांच्या कथेत फार रस आहे, त्याला सर्वांचाच संशय येतो.
त्यात नर्स आपलाही हातभार लावते. वावाचनच्या मृत्यूचा संशय आल्याने तो पोलिसांना ईशीच्या पाठी लावतो. खरेतर पाद्रीचे मुख्य कर्तव्य आहे ते मृताच्या अंतिम प्रवासात सहकार्य देणे आणि त्याच्या कुटुंबाला धीर देणे पण या उलट त्याच्या हुद्द्याचा वापर तो आपली सत्ता दाखवणे आणि स्वतःचा अहंकार गोंजारण्यासाठी अडकवणूक करण्यासाठी वापरतो. जो तो या परिस्थितीचा स्वतःच्या आकलनानुसार अर्थ लावायचा प्रयत्न करतो आणि एका सर्वसामान्य माणसाचा अंतिम प्रवास सुद्धा अवघड करून टाकतो.
ह्या सर्व घटना तशा सामान्य आणि नगण्य वाटत असतील तरी एकाचवेळी घडत असतात आणि या दबावाखाली ईशी गुदमरून जातो.
सामान्य माणसाला खरेतर काय हवे असते! मनाला आश्वस्थ करणारी शांतता, आणि थोडीशी सहानुभूती पण ह्या गोंधळात, ती सुद्धा त्याच्या वाट्याला येत नाही. मानापमान, हाव, कर्तव्य, प्रतिष्ठा यात बांधल्या गेलेल्या गर्दीत त्याला समजून घेईल असा एकच माणूस असतो तो म्हणजे त्याचा मित्र “अय्यपन”. कसलीही अपेक्षा न करता, तो शेवटपर्यंत ईशीसाठी उभा असतो.
ह्या सगळ्या कोलाहलात तो त्याला सावरणारा त्याचा आंतरिक आवाज बनतो.
गावात, हे सर्व कमी म्हणून की काय, अंत्ययात्रेला सुरुवात होण्याआधीच वावाचनची दुसरी बायको आणि मुलगा तिथे उपस्थित होतात. त्याचे हे अफेअर, गावातील लोकांना माहिती असेल तरीही उघड नसते. हे गृहच्छिद्र असे शेवटच्या क्षणी उघडे पडल्याने ईशीचा ताबा सुटतो.
वडिलांना दिलेले वचन तर पूर्ण करता येत नाही आणि साधा सन्मान सुद्धा आपण वडिलांना देऊ शकत नाही या दुःखाने आणि अपराधी भावनेने, बिथरलेला ईशी, घराच्या आवारात, स्वतःच थडगे खोदायला घेतो. घाबरलेल्या, थिजलेल्या गर्दीसमोर, तो आपल्या वडिलांचे दफन करतो आणि ओक्सबोक्शी रडत सुटतो.
सिनेमा बघताना माझ्या मनात आले, जात्या आत्म्याला, शवयात्रेच्या वैभवापेक्षा या दुःखाचा अविष्कार मनाला भावला असेल का?
वावाचनचे कुटुंब अगदी सामान्य भारतीय कुटूंबासारखे आहे. त्याच्यात प्रेम आहे पण ते त्यांना बोलून दाखवता येत नाही. त्यात हा माणूस दिवसोंदिवस गायब. त्यामुळे सुद्धा त्यांच्या मध्ये एक अस्पष्ट असे अंतर आहे. अशा वेळी धाय मोकलून रडणाऱ्या आपल्या मुलाला पाहून, त्याचे आपल्यावर असलेले प्रेम जाणून वावाचन बहुधा सुखाने गेला असेल!!
सिनेमाची मुख्य थीम आहे ती मृत्यू.
. सुरुवातीलाच वावाचन ला दिसलेली शवयात्रा. ती कदाचित खरी असेल किंवा त्याला झालेला भास. मृत्यूची चाहूल इथल्या प्रत्येक सीन मध्ये आहे. वावाचनने आणलेले बदक, ज्याचा शेवट चुलीवर होतो. वावाचनच्या मृत्यूच्या वेळीच गावातली लाईट जाते आणि गाव अंधारात बुडते. त्याच्या मुलीचा निरोप घेताना , तिचा प्रियकर म्हणतो. “ जर तू मला भेटलीस नाही तर मी मरून जाईन”, सिनेमाच्या सुरुवातीलाच क्लैरिनेट वाजवणारा मुलगा, ज्याची सुरावट, वावाचनला अंत्ययात्रेची आठवण करून देते, समुद्रातून नष्ट होत असलेले माशांचे अस्तित्व, खड्डा खोदतानाच त्यात पडून मेलेला माणूस आणि त्याच्या मृत्यूने आपलाही जीव सोडणारा त्याचा कुत्रा.
भपका असो किंवा नसो, जाणाऱ्या आत्म्यासाठी, मृत्यू सगळीकडे सारखाच असतो.
वावाचन हा चांगला पिता नाही, पती सुद्धा नाही. गावात सुद्धा त्याचे कुणाशी पटत नाही. पत्नीशी केलेली फसवणूक सुद्धा सिनेमाच्या शेवटी प्रेक्षकांना समजते. हे कारण असावे की मुलाने कितीही प्रयत्न केला तरी त्याला सन्मानाने दफन करणे, त्याला जमत नाही. कबर खोदणारा माणूस तर अत्यंत सामान्य माणूस आहे. त्याला जवळचे असे कुणीही नाही . किनाऱ्यावर वाढलेला कुत्रा हा त्याचा साथीदार पण त्याचे मात्र खरे प्रेम आहे . शेवटपर्यंत तो आपल्या मालकाची साथ सोडत नाही .
अकस्मात मृत्यू झाल्याने त्याला चर्च मधेच दफन केले जाते. त्या दफन विधीला पाद्री उपस्थित असतो. त्याचे हे निरपेक्ष कर्म त्याला शेवटी स्वर्गात जागा देते.
सिनेमाचा शेवटचा सीन हा सिनेमाचे सार आहे.
किनाऱ्यावर माणसे उभी आहे. खरेतर चार मृतात्मे, वावाचन आणि बदक, तसेच कबर खोदणारा माणूस आणि त्याचा कुत्रा.
या जगात तुम्ही कुणीही असा, राजा किंवा रंक, पलीकडच्या जगात इथले काहीही तुम्हाला नेता येत नाही. तुमच्या बरोबर असते ते तुमचे कर्म. आणि त्या नुसार तुमच्या प्रवासाचे अंतिम स्थानक तुम्हाला प्राप्त होते. वावाचनच्या शेजारी एक काळ्या पोशाखातील माणूस उभा आहे. तो कदाचित सैतान असावा, आणि त्या अनामिक माणसाच्या शेजारी पांढऱ्या पोशाखातील देवदूत. समोरून दोन होड्या त्यांना नेण्यासाठी येत आहेत.
मृत्यू वर एवढे सुंदर भाष्य फार क्वचित पाहायला मिळते. सिनेमा यू ट्यूब वर पाहायला मिळेल.
Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

हे फारच सुंदर लिहिलंय !
मी आत्तापर्यंत तुमचं जे सिनेमावरचं लिखाण वाचत आले आहे त्यापैकी सर्वात सुंदर आणि मनाच्या हळव्या कोपऱ्याला स्पर्श करणारी पोस्ट म्हणजे हे मृत्यूनंतर च्या वेगवेगळ्या मानवी भावनाविष्काराला रेखाटणारं लिखाण आहे !
निसर्गातील प्रत्येकच गोष्टीला हे विसर्जनाचे भोग भोगावेच लागतात. अर्थात त्या विसर्जनामध्येच सर्जन अंतर्भूत असतंच.
हे एक चक्रच आहे.
भरती आणि ओहोटी सारखंच…. सर्जन आणि विसर्जन.
भरती… ओहोटी दरम्यानच्या काळाला ‘सम’ म्हणतात.
आपलं काही दशकांचं आयुष्य म्हणजे सुद्धा त्या सर्जन आणि विसर्जनाच्या दरम्यानची एक ‘सम’ … एवढाच अर्थ आहे.
इक हवा का झोंका आया
टूटा डाली से फुल
ना पवन की, ना चमन की
किसकी है ये भुल
खो गयी खुशबू हवा मे
कुछ ना रह गया
मेरा जीवन कोरा काग़ज
कोरा ही रह गया….
वावाचन कोरा राहिला असेल की मुग्धमृत्यू अवस्था त्याला प्राप्त झाली असेल…? लेकाचं त्याच्यावरचं प्रेम त्याला आनंदात पुढच्या प्रवासाला घेऊन गेलं असेल काय….?
खूप खूप सुंदर लिहिलंय….
Thank you Kamini.
हा सिनेमा प्रत्येकाला काहीतरी वेगळे देतो. लहान वयात कदाचित मला वेगळा अर्थ मिळाला असता पण आता या वळणावर जे जाणवले ते लिहिले मी ..वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तू हा सिनेमा पाहू शकतेस ..
प्रिया,
तुझ्या लेखांमुळे प्रादेशिक भाषांमधले चित्रपट कळतात.आणि पाहिले जातात.
विलक्षण आहे..
सुधा मूर्तींच्या
शोकविरहित मरण
या कथेची आठवण आली.
Please do watch this movie . Its on youtube with subtitles . Vidula.
खूप सुंदर लिहिलं तुम्ही आणि त्यामुळे हा सिनेमा पहावाच लागेल खूप खूप धन्यवाद 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you so much Rajendraji.
फार सुरेख लिहीले आहे प्रिया तुम्हीं. मृत्यूबाबत सलगी सतत ठेवावी हे मला काही अनुभव व वाचनातून जाणवतं. जगण्यावर प्रचंड श्रद्धा असणे याकरता आवश्यक हे देखील कळालं. तुम्ही जसं मृत्यूचे विश्लेषण लिहीले त्यात केवळ चित्रपट नाही तर दिग्दर्शक, लेखक, कलाकार यांना काय सांगायचे आहे हे देखील फार तटस्थ पणे तुम्ही सांगतात. ❤️❤️❤️
Thank you so much Rahul.
आयुष्याच्या कोणत्यातरी वळणावर आले की हा सिनेमा स्पष्ट कळतो. मला जास्त आवडले ते दिग्दर्शकाने जे काय म्हणायचे आहे ते प्रेक्षकांना भरवले नाही ..प्रत्येकाला काही तरी वेगळे उमजेल असा अनेक दिशांनी जाणारा हा सिनेमा आहे.