Skip to content

जाणत्याचा आवाज -मुकेश (द्वंद्व-गीते) 

पार्ट २ 
——
शिवाजी पार्क येथील, लेडी जमशेटजी रोड.
नेहमीचा रस्ता आहे माझा. दुतर्फा झाडी आहेत या रस्त्यावर. कडक उन्हाळ्यात सावली मिळण्याएवढी उंच वाढली आहेत. तरीही मुंबई धुळीने एवढी माखलेली असते की कोणत्याही ऋतूत हिरवेगार, प्रसन्न वगैरे वाटत नाही. आपण  आपल्याच कामात एवढे गर्क असतो की न बोलता मायेची पाखर घालणाऱ्या या झाडांकडे कधी लक्ष सुद्धा जात नाही.
आज गेले कारण या तीन  मजली तरी उंच, भर भक्कम झाडावर एक वेल चढली होती. त्याच्या आधाराने, त्याला धरून आणि  हे करताना तिने ते झाड पूर्ण व्यापून टाकले होते. आता त्याच्यावर सुंदर जांभळी फुले ही आली होती.
त्या झाडाचे अस्तित्व या नाजुकशा वेलीने अधोरेखित केले खरे पण मजा अशी की त्याला त्याचे काही वैषम्य असावे असे वाटत नव्हते. तिला, तिच्या नखऱ्यासकट  अलगद पेलून उभा होता तो.

परस्परांना इजा न करता, एकमेकांच्या सोबतीने, आधाराने बहरलेलं हे वृक्षवल्लीचं सहजीवन, खर्‍या अर्थाने सार्थक ठरले होते.ती त्याच्या जीवनरसावर वाढत होती आणि त्याचवेळी त्याच्या सौन्दर्याला वाढवत होती. अत्यंत गोड नाते  होते ते. नाजूक आणि कणखर अशी ही दोन भिन्न व्यक्तिमत्वे, मायेच्या, विश्वासाच्या पाशात अडकली आहेत तोवर हे नाते टिकणार. फुलणार, बहरणार पण जर या  झाडालाच कीड लागली तर! तर मात्र ही वेल सुद्धा नष्ट होणार.
अनेकदा वेलीचा विळखा सुद्धा एवढा घट्ट बसतो की वृक्षालाही काच सलते. त्याचीही घुसमट होते. एकमेकांच्या वाढीसाठी पूरक ठरणारं, सिम्बायॉसिस् गरजेचं  आहे इथे.
हेच समीकरण पुरुष आणि स्त्री या नात्यात सुद्धा आहे.
संसारात जेव्हा दोन  माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांच्यातील अहंकाराचा संघर्ष, त्यांच्या  स्वभावातील मूलभूत फरक, परिस्थितीला तोंड देण्याच्या भिन्न पद्धती ह्या सर्व गोष्टी असतातच परंतु एकमेकांना समजून  घेण्याची इच्छा, एकमेकांबद्दल विश्वास हा या नात्याचा आधार असतो. जगण्याच्या सगळ्या पातळ्यांवर अनुभव वाटून घेण्याची धडपड त्यांना एकत्र ठेवते.

१) एक प्यार का नगमा है
(सिनेमा -शोर, गीतकार -संतोष आनंद, संगीतकार-लक्ष्मीकांत प्यारेलाल, सहगायिका -लता मंगेशकर,कलाकार-मनोज कुमार -नंदा  )

तूफ़ान तो आना है, आ कर चले जाना है
बादल है ये कुछ पल का, छा कर ढल जाना है
परछाईयाँ रह जाती, रह जाती निशानी हैं
ज़िन्दगी और कुछ भी नही
‘तेरी मेरी कहानी  है 
अडचणी  येतात  आणि  निघूनही  जातात. स्वप्नाच्या मनोऱ्याखाली एक विश्वासाचा पाया असतो. तो असेल तर एका साध्या झोपडीत सुद्धा स्वर्ग निर्माण करता येतो. आयुष्यातील आनंदाला क्षणभंगुरतेचा शाप असतोच म्हणून जगण्यासाठी महत्वाची असते ती कधीही न सुटणारी साथ.

“जिंदगी और कुछ भी नही, तेरी मेरी कहानी है“ हा साक्षात्कार जेवढा लवकर होईल तेवढे आयुष्य सुखात जाते.
प्रेमाचे पैलू अनेक असतात. आकर्षण , वासना, रोमान्स, आणि विश्वास.
प्रेमाचे आयुष्य वाढवायचे असेल तर सर्वात महत्वाचा घटक आहे तो विश्वास … सहवास हा त्या विश्वासाच्या पायावर असतो. 

चित्रपट क्षेत्रात पाय रोवत असतानाच, मुकेश एका गुजराथी ब्राह्मण मुलीच्या प्रेमात पडले. श्रीमंत घरातील ही मुलगी. तिच्या पालकांनी कडाडून विरोध केला.  ना त्यांच्याकडे घर होते, ना नोकरी. त्यात हे क्षेत्र त्याकाळात बदनाम. वडील माणसांच्या अनुपस्थितीत हे लग्न लागलं. कन्यादान अभिनेता मोतीलाल यांनी केलं.

पळून जाऊन केलेले हे लग्न टिकणार नाही हे सर्वांनाच वाटत असतानाही लग्न, मुकेश यांचा दुर्दैवी मृत्यू होईपर्यन्त टिकले.
तीस वर्षांचे हे सहजीवन फुलले, फळले.. 
“मैं तेरा सहारा हूँ” म्हणणाऱ्या मुकेशच्या आवाजात हा विश्वास आहे.

मुकेश यांनी सर्वाधिक द्वंद्वगीते लता मंगेशकर बरोबर गायली आहेत. “ राज -नर्गिस” चे दम भर जो उधर मुँह फेरे हे सर्वोत्तम रोमँटिक गीतामधले एक असेल. अत्यंत उत्कट गाणे आहे. राज नर्गिस चे प्यार हुआ इकरार हुआ है ही तसेच.
राज आणि नर्गिस यांची केमिस्ट्री वेगळीच होती .
त्या खालोखाल मला राज आणि नूतन आवडतात. नूतनच्या संयत अभिनयाची किमया असेल, नेहेमीचे चार्ली चॅप्लिन लुक राजच्या गाण्यात दिसत नाही . अगदी अनारी मधील गाण्यात सुद्धा नाही.
अनारी हा सिनेमा राजकपूरचाच. अर्थात यातील सर्वच गाणी मुकेश यांनी गायली आहेत. संपूर्ण चित्रपट हा त्याच्याभोवती फिरतो. नूतनची भूमिका त्याच्या भूमिकेला पूरक आहे. एका श्रीमंत व्यक्तीची बहीण , जी गरीब राजकुमारच्या ( हे पात्राचे नाव , बाकी राज कुमार शी संबंधित गोष्टींशी त्याचा संबंध नाही ) प्रेमात पडते.

प्रेम व्यक्त करणे हे  सोपे नाही. अबोल आणि लाजऱ्या व्यक्तींसाठी तर नाहीच. मुळात आपल्या भावना प्रत्येकाला शब्दात सांगता येत नाहीत आणि डोळ्यांची भाषा समजायला हृदयाला डोळे फुटवे लागतात ..ती नजरच वेगळी .
त्यात तो गरीब आहे आणि जरी ती सुद्धा गरीब आहे असा त्याचा गैरसमज झाला असेल तरीही बुजरेपण त्याच्या देहबोलीतून लपत नाही. 

२) दिल की नज़र से.
( सिनेमा –अनारी, गीतकार -शेलेंद्र, संगीतकार –शंकर जयकिशन -, सहगायिका-लता मंगेशकर , कलाकार -राजकपूर , नूतन )

हम खो चले, चाँद है या कोई जादूगर है
या मदभरी, ये तुम्हारी नज़र का असर है
सब कुछ हमारा, अब है तुम्हारा, ये बात क्या है, ये राज़ क्या है
कोई हमें बता दे
दिल की नज़र से…

हे गीत एवढे हळुवार गायले आहे! राज च्या डोळ्यात प्रेम आहे , आदर आहे आणि फार क्वचित दिसणारी भक्ती आहे. आणि तेच प्रेम , आदर आणि भक्ती मुकेशच्या आवाजात आहे.
प्रेमात झुकणे , पुरुषांना जमत नाही . समर्पण हा पुरुषांचा प्रांत नाहीच. .त्यासाठी समोर त्याच ताकदीची स्त्री लागते.
नूतनच्या डोळ्यात एवढी आर्तता आहे, चेहऱ्यावर तेज .. आणि हालचालीत शालीनता .
अशावेळी मनातल्या आतुर भावनांना, अभिलाषेला  सुद्धा आवर  घालावा लागतो .
. प्रेमाची जादू म्हणतात … ही ताकद आहे ..
माझ्या प्रेमाचं गीत कसं असावे हा विचार केला तर असं असावं असे मनापासून वाटणारे गीत !
प्रेमाचे आणि एक रूप असते जे अतिशय खेळकर असते.  मुकेश यांची ही स्टाईल नाही तरीही हे गाणे जमून आले आहे.

३) देखो मौसम , क्या बहार है
(सिनेमा -ऑपेरा हाऊस, गीतकार -मजरूह सुलतानपुरी, संगीतकार-चित्रगुप्त,सहगायिका-लता मंगेशकर, कलाकार -अजित -सरोजा  देवी )

ह्या गाण्याच्या अंतरात भारतीय संगीताचा वापर आहे तर मुखडा जिम रीव्हस च्या Bimbo, where you going to go 
ह्या गाण्यावरून उचलला आहे. 

नाते  टिकण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. संवाद, तडजोड आणि नात्यांची बांधिलकी.
असे म्हणतात, “ आकर्षण ही होऊ घातलेल्या नात्याची पहिली पायरी असेल, तर त्याला गंतव्याकडे नेण्यासाठी संवादाची गरज आहे. Putting voice to your soul is important. जर शब्द अपुरे असतील तेव्हा सूर साथ देतात आणि मग आपल्या वाट्याला असा सुरेल संवाद येतो.  

 देखो मौसम , क्या बहार है
सारा आलम, बेक़रार है
ऐसे में क्यूँ हम, दीवाने हो जाएं ना
पण प्रेमात वाहून न जाण्यासाठी शब्दांचा बांध हवाच.
साठीच्या दशकात सुरुवातीला चायनीज स्मगलर खलनायक असणारे अनेक सिनेमा आले होते. ऑपेरा हाऊस हा असाच हाणामारी सिनेमा. यात अजित नायक आहे आणि निदान या गीतात त्याची दक्षिणेची नायिका सरोज देवी बरोबर छान जुळून आलेली केमिस्ट्री आहे.

हा लेख आता मुकेश आणि लता असा होत चालला आहे. हे टाळायचे होते पण तरीही यात अजून एक गाणे घातल्याशिवाय चैन पडणार नाही .
लता आणि मुकेश हे पहिल्यांदा मजबूर(१९४८) या सिनेमात एकत्र आले. लता साठी सुद्धा हा मोठा ब्रेक होता. त्यावेळेस झालेली त्यांची मैत्री पुढे  तीन दशके टिकली. A friendship of love and respect .
के एल सैगल यांचे हे दोघेही भक्त . हे सुद्धा एक कारण होते.
मुकेश यांनी मल्हार या चित्रपटाची निर्मिती केली . अर्थात नायिकेचा आवाज लता मंगेशकर सोडून दुसरा कोण असणार !

४) बड़े अरमानों से रखा है बलम तेरी कसम 
(सिनेमा -मल्हार, संगीतकार -रोशन, गीतकार-इंदीवर-सहगायिका -लता मंगेशकर, कलाकार -अर्जुन बक्षी -शम्मी ) 

आयुष्यात सगळ्यात उत्तेजक गोष्ट म्हणजे नाविन्याचा शोध. रुळलेल्या मार्गाने न जाता वेगळी वाट जोखाळणे  म्हणजे साहसी मोहीमच.  पहिले प्रेम सुद्धा तसेच. फक्त फरक एवढा आहे की एखाद्या मोहिमेवर निघताना तुम्हाला त्याची कल्पना असते. आपण प्रेमाच्या मोहिमेवर निघालो आहोत हे समजेपर्यंत अर्धा रस्ता पार झालेला असतो आणि मागची वाट पुसली  जाते. आपले पहिले पाऊलच असे अर्ध्या वाटेवर पडते .

लताच्या आवाजातली कोवळीक, निर्भर होऊन बोलते,

बड़े अरमानो से रखा है बलम तेरी कसम
प्यार की दुनिया में ये पहला कदम

गाणे फास्ट ट्रॅक आहे. लताच्या तयारीपुढे मुकेश चे स्वर थोडे हलतात पण “तेरे होते हुए क्यो हो मुझे तूफान का ग़म” ह्या 
ओळीत तो आवाज एवढा आश्वासक आणि सच्चा वाटतो की लता, मुकेश बरोबर का गायली असेल ते समजते.
मुकेश आणि आशा चे “फिर ना कीजे मेरी गुस्ताख” हे गीत तर अत्यंत प्रेक्षणीय आहे.
राजकपूर मुलांना गोष्टी सांगत असतो. त्याचे लक्ष चोरणारी लांबून त्याच्याकडे कटाक्ष टाकत आहे.  तो सीन थांबतो आणि गाण्याचे सूर वाजायला लागतात. राजच्या आवाजात मुकेशचा आवाज मिसळतो. 

५) फिर ना कीजै मेरी गुस्ताख़ निगाहों का गिला
(सिनेमा–फिर सुबह कभी तो आयेगी, गीतकार–साहिर, संगीतकार- खय्याम, सहगायिका आशा भोसले, कलाकार राज , माला सिन्हा ) 

फिर ना कीजै मेरी गुस्ताख़ निगाहों का गिला
देखिये आप ने फिर प्यार से देखा मुझको

गढद निळ्या रात्रीच्या प्रकाशात, समुद्राच्या किनारी हे चित्रित झाले आहे. मंद सुटलेला वारा, रात्रीची निरव शांतता, लांबून येणारी समुद्राची गाज आणि मुकेशचा हितगुज करणारा आवाज.
प्रेमाची कबुली सगळ्यांनाच काही स्पष्ट शब्दात देता येत नाही.पण शब्द जरी बुजलेले असले तरी नजर धीट आहे. तिचा अन्दाज त्याला माहित नाही. ती रागावली नसेल याची खात्री तिच्या लाजऱ्या नजरेने दिली असली तरीही खात्री करून घेण्यासाठी तो विचारतो,

एक यूँ ही सी नजर दिल को जो छू लेती है
कितने अरमान जगाती है तुम्हे क्या मालूम
प्रत्येक शब्द अर्थपूर्ण, त्यात पुढची स्वप्ने आहेत…सोबतीची अपेक्षा आहे. जिच्या प्रेमभऱ्या  नजरेने त्याला ती हिम्मत दिली आहे.त्यांची नजर भिडते मग गडबडून दुसरीकडे वळते ..  त्याचा आता धीर वाढतो.

हर नज़र आपकी जज्बात को उकसाती है
मैं अगर हाथ पकड़ लूं तो खफ़ा मत होना
साहिरचे धीट शब्द, मधात बुडून येतात आणि मग मात्र ती स्पष्ट कबुली देऊन टाकते,

मेरी दुनिया-ए-मोहब्बत है तुम्हारे दम से
मेरी दुनिया-ए-मोहब्बत से जुदा मत होना
फार कमी गाण्यात साशंकता,लज्जा, धिटाई आणि समर्पण एकमेकांचे हात धरून आले आहे. राज कपूर आणि माला सिन्हा साठी सुद्धा हे गीत पहा. त्यावेळचा मेलोड्रामा लक्षात आणला तर खूप वेगळे आणि खरे वाटते..

लता मंगेशकर यांच्या आवाजाशी जवळीक साधणारा आवाज होता तो सुमन कल्याणपूर यांचा.
मुकेशबरोबर त्यांचीही खूप सुंदर डुएटस आहेत .
मॉडर्न गर्ल या सिनेमात तास काही अर्थ नव्हता पण संगीतकार रवीने फार सुंदर गाणी दिली आहेत यात. त्यातले एक अत्यंत प्रसिद्ध गीत आहे.

६) ये मौसम रंगीन समा
(सिनेमा -मॉडर्न गर्ल, संगीतकार- रवी, गीतकार- रवींद्र कृष्ण, कलाकार-प्रदीप कुमार -सईदा खान)

मुकेशची हसरी, खेळकर प्रेमगीते अतिशय कमी आहेत. हे गाणे अपवाद .
उडती चाल आहे आणि पेस खूप फास्ट.
“फिर ना कीजै मेरी गुस्ताख़ निगाहों का गिला” या गीतातील शब्द थोडे लाजरे आहेत, साशंक आहेत , तिच्या परवानगी साठी थांबले आहेत . मुकेशच्या आवाजाला हे गाणे सर्वात फिट बसते , त्यामुळे ह्या गीतातील प्रेम भावनेचा उघड अविष्कार जरा नवलाचा.
आजूबाजूचा बाहेरून आलेला मौसम बहुतेक नायकाला धीर देतो आणि कसलेही आढेवेढे न घेता तो गातो,

ये मौसम रंगीन शमा, ठहर ज़रा ओ जान ए जाँ
तेरा मेरा मेरा तेरा प्यार है, तो फिर कैसा शरमाना

आता जर दोन्ही बाजूने हो आले आहेच तर हे लाजणे , थांबणे , अवघडणे कशाला बरे! यातले “तेरा मेरा मेरा तेरा प्यार है” हे शब्द एवढ्या गडबडीत येतात की त्याची अधीरता दिसून येते आणि नंतर “तो फिर कैसा शरमाना” मधील काहीश्या चढ्या आवाजातला उतावीळपणा . 
एकदा होकार मिळाला की त्याचा आवाज आता आतुर होतो. तो सांगतो , 

ये प्यार की लंबी राहें
बाँहों में डाले बाँहें कहीं दूर चले
मुकेश च्या आवाजात “कहीं दूर चले “ आता मात्र आग्रही नाही तर आर्जवी होते.
तिलाही जावेसे वाटतं आहे पण समाजाचे काय ! लोकं काय म्हणतील ही भीती लोकांपेक्षा प्रेमाचा शत्रू आहे.

बैठे हैं घेरा डाले
ये ज़ालिम दुनिया वाले,  हमें देख जले
हात्तिच्या, जळणारे लोक खुशाल जळू देत पण तू मात्र आता लाजणे सोडून दे. 

जलता है तो जले जहाँ, ठहर ज़रा ओ जान ए जाँ
तेरा मेरा मेरा तेरा प्यार है
तो फिर कैसा शरमाना
प्रेम, आग्रह, आर्जव, उतावीळपणा , विनवणी , हट्ट, निडरता ह्या गाण्यातील शब्दांत भावनांची जेवढी विविधता आहे तेवढी मुकेशने आपल्या सुरांतून दाखवली आहे.

७) खयालों में किसी के, इस तरह आया नहीं करते
( सिनेमा-बावरे नैन, संगीतकार-रोशन, गीतकार-किदार शर्मा , सहगायिका – गीता दत्त, कलाकार- राज कपूर-विजयालक्ष्मी)

विचार खरोखर चुकार असतात. इच्छा नसली तरी मनात घोटाळतात. रात्रीच्या वेळी दिवसातील सर्व अप्रिय घटना विसरून निद्रादेवीची आराधना करावी तरी  मनात पिंगा धरतात. “खयालों में किसी के, इस तरह आया नहीं करते” ही विनवणी सुद्धा आणि गर्भित सूचनाही. 

संगीतकार रोशन आणि गीतादत्त यांची मोजकीच गाणी आहेत , बहुतेक पन्नाशीच्या दशकातील आहेत. त्यात या गाण्याचा फार वरचा नंबर आहे. गीताचा आवाज एवढा हळुवार आहे इथे. समजूत काढणारे गीत आहे हे. जिच्यावर चित्रित झाले आहे ती नायकाच्या प्रेमात आहे पण त्याच्या हृदयात कुणा  दुसरीला स्थान आहे . स्वतःचे दुःख लपवून त्याला दाखवलेली सहानुभूती आहे ही .

ख्यालों में किसी के, इस तरह आया नहीं करते
किसी को बेवफ़ा आ, आ के तड़पाया नहीं करते

त्याच्या चेहेऱ्यावरूनच तिच्या लक्षात आले आहे की ह्याचे कुठेतरी बिनसले आहे. तो भले असेल दुसरीच्या चिंतनात, तिच्या मनी ठायी तोच आहे. थोडे दटावणे, थोडंसं विनवणे, थोडेसे रिझवणे करूनही काहीच उपयोग होत नाही पाहिल्यावर ती प्रेमाने आश्वस्त करून त्याला समजावते,

हसीं फूलों की दो दिन, चाँदनी भी चार दिन की है
मिली हो चाँद की सूरत तो इतराया नहीं करते

दुसरीच्या प्रेमात असलेल्या आणि गैरसमज झाल्याने दुखावलेल्या नायकाच्या मनावर काही फुंकर घालायला हे शब्द समर्थ नाही. त्याला ह्या मुलीत काही स्वारस्य नाही पण तिला त्याला दुखवायचे सुद्धा नाही.
तिला दुरस्त ठेवून तो काहीशा अनिच्छेने सांगतो ,

मोहब्बत का सबक सीखो, ये जाकर जलने वालों
के दिल की बात भी लब तक कभी लाया नहीं करते

माझे दुःख मी ओठांवर सुद्धा यायला देत नाही या विषयात टोकाची स्थितप्रज्ञता आहे, जे घडले आहे त्याचा मुकाट स्विकार आहे आणि जवळीकेला दिलेला स्तब्ध नकार सुद्धा .
माझे अत्यंत आवडीचे गाणे आहे हे !

८) तुम मुझे भूल भी जाओ , तो ये हक है तुमको
(सिनेमा -दीदी, संगीतकार- सुधा मल्होत्रा, गीतकार -साहिर लुधियानवी , सह गायिका- सुधा  मल्होत्रा, कलाकार -सुनील दत्त, शुभा खोटे) 

“दीदी” या सिनेमाचे संगीत जरी एन दत्ता यांचे असले तरी या गीताचे संगीत सुधा मल्होत्रा यांनी दिले आहे.
वरील गीतासारखे हे गीत सुद्धा एकतर्फी प्रेमाची वेदना सांगते पण यात फरक आहे.
“ खयालो में किसीके “ या गीतात निराशा आहे, प्रेमाबद्दल आलेली चीड आहे आणि प्रेमिकेबद्दल मनात आलेला दुरावा , प्रेमात फसवले गेल्याची खंत सुद्धा. ती एका पुरुषाची भावना आहे.
तर “ तुम मुझे भूल भी जाओ” हे एका स्त्री चे मनोगत आहे. ह्यात हृदयभंगाचे दुःख आहे पण प्रियकराबद्दल चीड नाही.
त्याचे शुभ चिंतताना , त्याच्या निर्णयाचा स्विकार करण्याचा मोठेपणा तिच्याकडे आहे .  अर्थात बरेच काही गमावून बसल्याची खंत काही लपत नाही .

गाण्याचे गीतकार साहिर लुधियानवी. समजूत आहे की त्यांचे सुधा मल्होत्रा वर प्रेम होते पण तिचा नकार होता. या एकतर्फी नात्याचे प्रतिबिंब या गीतात उमटले आहे.

असे म्हणतात, जेव्हा आपण काहीतरी गमावतो, तेव्हा आपण शोकाच्या पाच पायऱ्यातून जातो.
नाकबूल करणे, संतापणे, विनवणी करणे, नैराश्यात जाणे आणि शेवटी अपरिहार्यतेचा स्विकार करणे.
फक्त या पायऱ्या एकदाच चढल्या जात नाहीत ..हे वर्तुळ सतत चालू राहते.
प्रेमाला जेव्हा प्रतिसाद मिळत नाही तेव्हा त्या “का” ला काहीही उत्तर नसते .असते ती फक्त समजूत.
एक तर प्रेम असते किंवा नसते . समोरून प्रतिसाद यालाही नाही तरी मनातले प्रेम असे सहज संपत नाही . ते काही कुणाच्या सांगण्यावरून झालेले नसते , मग  कुणाच्या सांगण्यावरून ते नष्ट तरी कसे होईल ! ही हतबलता व्यक्त करताना नायिका म्हणते, 

मेरे दिल की मेरे जज़बात की कीमत क्या है
उलझे-उलझे से ख्यालात की कीमत क्या है
मैंने क्यूं प्यार किया तुमने न क्यूं प्यार किया
इन परेशान सवालात कि कीमत क्या है
तुम जो ये भी न बताओ तो ये हक़ है तुमको
मेरी बात और है मैंने तो मुहब्बत की है

ह्याला त्याने दिलेले उत्तर मात्र व्यावहारिक आहे. कदाचित ही त्याची प्रवृत्ती असेल किंवा अपरिहार्यता.
पण जे आहे ते स्पष्ट आहे , निर्णायक आहे.
तो म्हणतो,

ज़िन्दगी सिर्फ़ मुहब्बत नहीं कुछ और भी है
ज़ुल्फ़-ओ-रुख़सार की जन्नत नहीं कुछ और भी है
भूख और प्यास की मारी हुई इस दुनिया में
इश्क़ ही एक हक़ीकत नहीं कुछ और भी है
तुम अगर आँख चुराओ तो ये हक़ है तुमको
मैंने तुमसे ही नहीं सबसे मुहब्बत की है

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.
















Tags:

3 thoughts on “जाणत्याचा आवाज -मुकेश (द्वंद्व-गीते) ”

  1. सुंदर लेख. सुरूवातीचं रूपक तर फार भारी आहे.

    1. Thank you Swati.
      ते दृश्य अजून माझ्या नजरेसमोर आहे. एवढे छान वाटलेले .
      आणि नेमका त्याच दिवशी पुरुष दिन होता , तेव्हा मी हे वापरले होते .
      मग ह्या गाण्याला ते फिट्ट बसले ,
      काल आपण लिमये यांच्या पोस्टवर बोललो, तेव्हा लिहायला बसले आणि खजिना सापडला . तरी लता मुकेश अशी पोस्ट करायला हरकत नाही एवढी गाणी आहेत .

  2. Vidula Sahasrabudhe

    प्रिया,

    मुकेश आवडता गायक.
    त्यांची तुलना रफी, किशोर यांच्या बरोबर कशाला करावी?
    त्यांचा वेगळा च आवाज.
    अनुनासिक पण छान वाटायचा.

    तुझी गाण्यांची निवड नेहेमीच खास असते.

    यावेळी पण आहेच.❤️❤️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *