Skip to content

द ब्रिजिस ऑफ मॅडिसन कौंटी

द ब्रीफ एन्काउंटर पाहून अनेकांना “द ब्रिजिस ऑफ मॅडिसन कौंटी”  आठवला असणार.
या दोन सिनेमांच्या प्रदर्शनात पन्नास वर्षाचे अंतर आहे. म्हणजे दोन पिढ्यांचे अंतर. द ब्रीफ एन्काउंटर १९४५ मध्ये रिलीज झाला . पंचेचाळीसच्या कालखंडात ब्रिटन सुद्धा सोवळे होते. नैतिकता, योनिशुचिता आणि त्याहीपेक्षा संसाराशी असलेली बांधिलकी या गोष्टी वादातीत होत्या. मनाने जवळ येऊनही नायक आणि नायिका शरीराने जवळ न येण्याचे ते एक महत्वाचे कारण होते.
स्त्री मुक्तीच्या कल्पनांशी नायिकेचा  परिचय नाही. प्रतारणा करणे तिच्यासाठी गुन्हा आहे. शरमेची गोष्ट सुद्धा.
शरीराची भूक असते , शारीरिक संबंध ती भूक भागवते असा व्यवहारिक विचार तेव्हा तरी रुजला नव्हता. लग्न , त्याचे पावित्र्य आणि शारीरिक संबंध यांचे घट्ट लागेबांधे असतात ही कल्पना तेव्हा समाजात ठाम रुजली होती. त्याला प्रतिष्ठा होती. त्या काळात तरी लग्नबंधनाशिवाय राहणारी स्त्री म्हणजे रखेल किंवा चरित्रहीन स्त्री. नायिका ही चांगल्या , सुसंकृत घरातील गृहिणी आहे. ही गोष्ट तेव्हा तिला मानवणे  शक्यच नव्हते. या रूढी परंपरा , संस्कार याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची तिची कुवत नाही आणि मानसिक तयारी सुद्धा नाही.
प्रेमाच्या धुंदीत जरी ही गोष्ट घडलेही असती तरीही अपराधीपणा आणि लाज याखाली ती स्वतः दबून गेली असती.
जो निर्णय ती घेते , तो केवळ तिच्या संसारासाठी नाही , तिच्या स्वतःसाठी सुद्धा आहे. तिच्या मर्यादा तिने ओळखून घेतलेला तो निर्णय आहे. 

या नंतर पन्नास वर्षांनी रिलीज झालेल्या “द ब्रिजिस ऑफ मॅडिसन कौंटी” मधली नायिका पंचेचाळीस वर्षाची आहे. स्त्री मुक्ती , तिच्या स्वतंत्र अशा आणि आकांक्षा यांच्याशी परिचित आहे. संसारात आता आपल्याला तसा रस नाही आणि तो का नाही याची तिला  पूर्ण जाणीव आहे.
ती म्हणते ,
“ जेव्हा एक स्त्री लग्न करण्याचा आणि मुलं होऊ देण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळते. नवीन अर्थाने तिचे आयुष्य सुरु होते आणि मुलगी म्हणून असलेला प्रवास थांबतो. तिचे  आयुष्य अनेक भूमिकांत वाटले जाते. ती पत्नी होते , आई होते आणि मग नवरा आणि मुले या भोवती तिचे आयुष्य फिरू लागते. तिच्या प्रत्येक क्षणांत त्यांच्या भूमिका असतात आणि जेव्हा ती त्यांच्या मार्गाने निघून जातात, तेव्हा अचानक त्या जागा मोकळ्या होतात. आता तिचा स्वतंत्र प्रवास तिने करावा असे वाटले तरी तो नक्की कोणत्या दिशेने हे तिला उमजत नाही कारण आतापर्यंत तिची मुले, नवरा हाच तिचा कंपास असतो आणि  एवढ्या वर्षात आपली दिशा कोणती हे ती विसरून गेली असते.

लग्न झाल्यानंतर बाईचे आयुष्य एका चक्रात फिरते. मुले, संसार, नवरा, त्याचे घर, त्याचे नाव आणि त्यामुळे मिळालेली ओळख. त्यात तिलाही आनंद वाटतो , मनापासून स्वतःला बाजूला ठेवून ती त्यांच्या आयुष्याला आकार देते आणि मग मुले पुढे सरकतात. तिच्या आयुष्यातून स्वतःला अलगद बाजूला काढतात आणि नंतर लक्षात येते , आयुष्य रिकामे झालेय. स्वतःची ओळख निर्माण करणे यात राहूनच गेले असते आणि मग अनोळखी आयुष्य जगणे जमत नाही. सवयच नसते . ती हरवून बसते स्वतःला.
आणि यात जर तिला तिचा सूर मिळवून देणारा कुणी भेटला किंवा मी म्हणेन, एखादी नवीन करिअर तर आयुष्याचा केंद्रबिंदू बदलायला वेळ लागत नाही. 

ब्रिफ एन्काऊंटर आणि द ब्रिजिस ऑफ मॅडिसन कौंटी या दोन्ही सिनेमाचे कथा सूत्र तेच. नीरस कंटाळवाण्या आयुष्याच्या मध्यान्हीला दोन अनोळखी  माणसे अपघाताने भेटतात आणि प्रेमात पडतात.

ही कथा आहे फ्रान्सेस्का नावाच्या एका इटालियन स्त्रीची.  दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या शेवटी ती रिचर्ड जॉन्सनला नेपल्स मध्ये भेटते. हा अमेरिकन तरुण एक सैनिक असतो. त्यांचे प्रेम जमते. इटली सोडून ती त्याच्याबरोबर अमेरिकेला जाते. ते लग्न करतात. मॅडिसन कौंटीला स्थायिक होतात. दोन मुले होतात. चारचौघांसारखा रिचर्ड सुद्धा एक कष्टाळू  , प्रामाणिक , जबाबदार पती आणि पिता असतो.
मुले  मोठी होऊन लग्न करून निघून जातात. घरटे रिकामे होते. आई वडील एकत्र राहून त्या फार्मवरच शेवटचा श्वास घेतात. निदान त्यांच्या मुलांना तरी आपल्या आईची हीच ओळख असते. 
मायकेल आणि कॅरोलिन , आपल्या आईच्या, फ्रान्सेस्काच्या मृत्यूनंतर, तिच्या अंत्यविधीसाठी , गावाकडे परततात. तिच्या सामानात त्यांना  तिचे मृत्युपत्र सापडते. आपल्या मृत्यनंतर, आपले दहन केले जावे आणि आपल्या अस्थी रोजमन कव्हर्ड ब्रिज कडे विसर्जित कराव्या अशी तिची  इच्छा असते. 

खरेतर गावाच्या कबरीस्थानात त्यांच्या वडिलांची कबर असते. त्यांच्या शेजारीच आईचे दफन करणे योग्य असे मुलाला वाटल्याने  दहन करण्यास त्याचा विरोध आहे. 
कॅरोलिन आणि मायकल सामानाची आवराआवर करत असताना आईच्या सामानात तिच्या डायऱ्या मिळतात. कॅमेरा , काही फोटो, पत्रे आणि त्यात असणाऱ्या एका बॉक्सची  चावी. फोटोत त्याची आई असते. हसरी , लाजरी . जी पत्रे असतात ती रॉबर्ट किनकेड या माणसाने त्यांच्या आईला लिहिलेली पत्रे असतात.  त्यांना न दिसणारी एक मौल्यवान गोष्ट त्या बॉक्स मध्ये असते.

रॉबर्ट बरोबर घालवलेल्या चार दिवसांच्या आठवणी  फ्रान्सेस्काने जपून ठेवलेल्या असतात.
डायरीमधून सिनेमा भूतकाळात जातो. 
मेरिल स्ट्रीपची फ्रांसेस्का ही कुटुंबाशी एकनिष्ठ असलेली, कुटुंबात रमलेली स्त्री आहे. ती मूळची इटालियन आणि त्यामुळेसुद्धा कुटुंब तिच्यासाठी सर्वस्व आहे. तिची काही स्वप्ने आहेत, काही छोट्याश्या इच्छा पण तिच्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यात हे सर्व मागे पडले आहे. 

मुले आणि नवरा गावाच्या जत्रेत जातात आणि तिला मनातून आनंद होतो की चार दिवस ती एकटीच असणार आहे. थोडे अवघड वाटते पण मनाशी दिलेली कबुली आहे की आता जरा मोकळा वेळ मिळेल.
गावातच पाय मोकळे करून येताना तिची भेट, नॅशनल जिओग्राफिक मासिकासाठी काम करणाऱ्या रॉबर्ट किनकेड नावाच्या फोटोग्राफरशी होते. इथल्या ऐतिहासिक पुलांचे फोटो काढण्यासाठी तो या गावात आलेला असतो. रोजमन कव्हर्ड पुलाचा पत्ता विचारताना त्याची फ्रान्सेस्काशी ओळख होते. 

ती पंचेचाळीस वर्षाची गृहिणी आणि तो, बावन्न वर्षाचा फोटोग्राफर.
त्यांची अचानक झालेली भेट, आकर्षण, प्रेम, त्यातून झालेली शारीरिक जवळीक.
एक आयुष्य पूर्ण जगल्यानंतर आलेली जाग की मी दुसऱ्याचे आयुष्य जगत होते आणि आता जे काही घडते आहे तेच सत्य आहे. रॉबर्टच्या शब्दात सांगायचे तर , “This kind of certainty comes but just once in a lifetime.” 
असेलही पण ही वेळ खूप उशिरा आलेली असते आणि कदाचित म्हणूनच चुकीची असते.

चार दिवसांची ही कथा आहे.
सुरुवातीला भेट झाल्यावर केवळ त्याला मदत करायला म्हणून त्या जागा दाखवायला ती त्याच्याबरोबर जाते.
खरेतर तीही मनाने जिप्सीच. वेगवेगळ्या जागा पाहाव्यात , नवीन अनुभव घ्यावे ही इच्छा कुठेतरी दडलेली , त्याचेच प्रतिबिंब तिला त्याच्या बोलण्यात दिसते.

तिचा खोडकरपणा , मिस्किलपणा , एक लहान मुलासारखी दडलेली उत्सुकता सगळे त्याच्या सहवासात फुलून येते आणि त्याचवेळी एका प्रणयिनीचा जन्म होतो.
त्याच्याबरोबर पार्टीला जायचे म्हणून ती अनेक वर्षांनी एक नवीन ड्रेस घेते. थोडा तोकडा, खोल गळा , स्वतःचे शरीर आरशात निरखते. .खूप दिवसांनी , कदाचित अनेक वर्षांनी.
वयाच्या खुणा दिसणारे तरीही प्रमाणबद्ध शरीर..ती सुखावते.
त्याचेच प्रतिबिंब तिला त्याच्या नजरेत दिसते.

कुणालातरी आपण आवडावे, कुणीतरी आपल्यावर मोहित व्हावे ही स्त्री सुलभ इच्छा पूर्ण होते ती त्याच्या नजरेने. 
..” You look stunning “ त्या शब्दाला सुद्धा मागे टाकेल अशी त्याच्या डोळ्यातली अभिलाषा.
फुलून येणे म्हणजे काय, स्त्री पुरुष नात्याचा हा का अविभाज्य भाग आहे ते त्या क्षणाला समजते. मोहात पाडणारा हा क्षण तिच्या आयुष्यात का येतो त्याचेही उत्तर या प्रसंगात आहे.
अजून एक हळवा क्षण आहे यात.
तिची चौकशी करायला एका मैत्रिणीचा फोन येतो . हे गाव लहान , तो तिच्या घरी राहिला हे समजले तर गदारोळ होणार हे माहित आहे तिला. गावात आलेला नवीन फोटोग्राफर म्हणजे गॉसिपसाठी चांगला विषय. तिची मैत्रीण त्याच्याविषयी बोलते आणि हा तिच्या समोर .

आपल्याला काहीच माहिती नाही हे भासवतानाच तिचा हात त्याच्या कॉलरवर.  ती सरळ करतानाच त्याच्या मानेला केलेला , झालेला स्पर्श आणि ओठावरचे मिस्कील पण लाजरे हसू . 
कळीचे फुल होणे हीच स्त्री जीवनाची इतश्री असते का ? दोन मने एकत्र येतात, परिणती विवाहात होते आणि त्याची सांगता आई होण्यात होते. 
नंतर तिचे आयुष्य पत्नी आणि आई या नात्यात बांधले जाते.  शरीरे एकत्र येणे हे ही नंतर एक गरजेचा भाग होतो . रुटीन होते. ज्याचा उद्देश असतो नाते बांधून ठेवणे . आपापल्या व्यापात पूर्णतः गुंतून गेल्यावर या रुटीनचीही सवय होऊन जाते.
बांधिलकी असते, विश्वास असतो , प्रेमही असते पण रोमान्स हरवतो. जेव्हा तो हरवतो तेव्हा माणसे संभोग करतात, त्याला मिलन म्हणता येत नाही . ती सवयीची कृती होऊन जाते. 
खरच मिलनाचा अर्थ या शारीरिक भुकेतून समजतो तरी का ? बरीच जोडपी याचा विचार करण्याइतपत प्रगल्भ असतात?
विचारात, आचारात कसलेही साम्य नसलेली दोघे एकत्र राहतात. स्वतःच्या आवडी विसरुन, बदलून, प्रसंगी दुसर्यावर लादून, एक दुहेरी आयुष्य जगत, संसार चालू राहतो.
या अपूर्णतेची जाणीव झाली नाही तर समाधानाच्या आभासात आयुष्य सरते आणि झाली तर; समजून उमजून केलेल्या तडजोडीत.
जर ही जाणीव झाली आणि ती करून देणारा तुमचा लग्नाचा जोडीदार नसेल तर हा व्यभिचार असतो की मने जुळलीच नसताना समाजाच्या चौकटीत बसते म्हणून एकत्र राहणे  हा व्यभिचार असतो? 

The bridges of Madison County या प्रश्नांना सामोरे आणतो. 
नंतर त्यांच्यात जे काही घडते ते कदाचित थांबवता येणे अशक्य असते.

चार दिवस कापरासारखे उडून जातात आणि वास्तवाची जाणीव होते.
“हा बदल नैसर्गिक आहे आणि योग्यही . तुझ्या घरच्यांना सुद्धा आधी दुःख होईल पण नंतर सावरतील ते. जे काही आपल्यात आहे ते फार अमूल्य आहे. ते आपण गमावायचे का ? “त्याचा तिला प्रश्न .

“ तू मला घेऊन जायचे ठरवलेस तर मी तुला अडवू शकणार नाही. माझ्यात तुला नाही म्हणायची ताकद नाही. पण जी मी आहे ती तशी राहणार नाही . अपराधीपणाच्या भावनेने मी कोलमडून जाईन. प्रत्येक क्षण आनंदात घालवताना, मी कुणावर तरी अन्याय केलेला आहे ही जाणीव मला तो आनंद उपभोगायला देणार नाही. जे तू चार दिवसात दिलेस, ते मला रिचर्ड कधीच देऊ शकणार नाही. त्याची ती क्षमता नाही पण तो चांगला माणूस आहे. प्रेमळ नवरा, चांगला बाप . त्याची थी थू होईल. लोक बोलतील , तो दुभंगून जाईल या प्रतारणेमुळे . माझी मुलगी, जी आता सोळा वर्षाची आहे, ती कुणाच्यातरी प्रेमात पडेल , संसाराची स्वप्ने पाहिलं …तिला काय वाटेल! प्रेमावरचा विश्वास उडून जाईल तिचा.

रस्म-ए-उल्फ़त को निभाएं तो निभाएं कैसे
हर तरफ़ आग है दामन को बचाएं कैसे
संवेदनाशील आणि समजूतदार माणसांसाठी कोणताही निर्णय घेणे कठीण असते.
त्यामुळे हा शेवट आपल्यासाठी अनपेक्षित नाहीच . द ब्रीफ एन्काउंटर च्या नायिकेसारखी ती साशंक नाही. स्वतःकडून जे घडले त्याबद्दल तिच्या मनात कोणतीही  घृणा नाही पण कर्तव्य आणि प्रेम यात कशाची निवड करावी याचा निर्णय मात्र दोघांचाही सारखाच आहे.
रॉबर्टवर आपले प्रेम बसले आहे हे जरी मान्य केलं तरी तिची बांधिलकी कर्तव्याला असल्याने फ्रांसेस्का त्याच्याबरोबर जात नाही. रॉबर्ट मात्र त्या चार दिवसांच्या तिच्या सहवासात पूर्ण बदलतो. त्याला आयष्याचा खरा अर्थ उमगतो आणि तो कलेकडे वळतो. 

अनेक वर्षांनी फ्रांसेस्काच्या नवऱ्याचा मृत्यू होतो . या आजारपणात फ्रांसेस्का त्याच्याबरोबरच असते , त्याची सेवा करते. त्याचा मृत्यू झाल्यावर ती रॉबर्टचा शोध घेण्याचा प्रयत्न करते पण तिला समजते की त्याचा आधीच मृत्यू झाला आहे. त्याने जपून ठेवलेली तिची पत्रे, फोटो आणि त्याच्या अस्थी तिला मिळतात. रोजमन कव्हर्ड ब्रिज खालील पाण्यात त्याचे विसर्जन व्हावे ही त्याची इच्छा  फ्रांसेस्का पूर्ण करते. 

आपले दहन केले जावे आणि आपल्या अस्थी रोजमन कव्हर्ड ब्रिज कडे विसर्जित कराव्या अशी तिच्या इच्छा असते  कारण रॉबर्टच्या अस्थींचे तिथे विसर्जन केले असते . आपल्या मुलांना ही इच्छा सांगताना ती  लिहिते , 
“I gave my life to my family, I wish to give Robert what is left of me.”

रॉबर्ट हा कलंदर माणूस , ज्याने स्वतःला कुणामध्येही बांधून  घेतलेले नसते , तो फ्रान्सेस्काच्या सहवासात मात्र पूर्ण बदलतो.

“मला तुझी गरज वाटत नाही असे मी दर्शवतो कारण तू माझ्याबरोबर येणार नाही आहेस हे मला माहित आहे”  हे सांगतानाचा त्याचा हताश पण आर्जवी चेहरा एवढा बोलका आहे , की लक्षात येते , माणूस फक्त प्रेमापुढे झुकू शकतो आणि हरला तरीही जिंकू शकतो .
जिथे व्यक्ती स्वातंत्र्याला किंमत आहे त्या हॉलीवूडमध्ये, प्रियकर की नवरा, प्रेम की कर्तव्य , आदर्श की वास्तव्य यात दुसऱ्याच्या सुखाला दिलेले महत्व  नवीन असल्याने प्रेक्षकांना जास्त आवडले आणि हा सिनेमा गाजला.
अनेकवेळा समोर असलेल्या पर्यायांत स्वतःला हवे ते  निवडणे फार कठीण असते. अनेकदा जो निर्णय घेतला जातो तो स्वतःला वजा करून घेतला जातो .
ग दि माडगूळकर लिहून गेले आहेत,

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ
या दोघातील क्षणभंगुरतेचा शाप घेऊन आलेले नाते, ओरडून स्वतःच्या अस्तित्वाची जगाला जाणीव करून देत नाही पण त्यानी सोडलेला हताश निःश्वास प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करतो. 
ही प्रेम कथा नाही , पत्नीने केलेली प्रतारणा ही नाही . संथ चाललेल्या आयुष्यात तो येतो , एका वादळासारखा आणि जाताना तिला आरसा दाखवून जातो.  कर्तव्य , तडजोडीने बांधलेल्या आयुष्यातही कुठल्याही वळणावर प्रेम डोकावू शकते हा आशावाद हा सिनेमा देतो.

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.














2 thoughts on “द ब्रिजिस ऑफ मॅडिसन कौंटी”

  1. सहवासात माणूस बदलतो, हेच खरंय…किती तरल ! किती आतून जपलेलं नातं!
    कर्तव्यपूर्ती आणि बांधिलकी याचा सुंदर मिलाफ!!
    फ्रांसेस्काचं ठाम असणं भावलं!
    एक स्त्रीच इतके नात्यांचे पदर सांभाळू शकते…
    फार संवेदनाशील विषय आणि सिनेमाची हाताळणी सुद्ध.
    खूप छान लिहिलंय प्रियादी!
    अगदी बघितल्यावर पुढे काय घडेल…हे समजण्याइतपत सविस्तर आलंय सगळं…
    अशीच सुंदर सिनेमांची सिरीज होऊ देत. या निमित्तानेच बघून तरी होतील.

    1. Thank you कामिनी,,
      Actually प्रेम आकर्षण कोणत्याही वयात होऊ शकते पण त्यातून कोणता मार्ग काढायचा हे आपल्याला ठरवायचे आहे.
      त्या मुळे हे असे सिनेमा घेतले जे विवेकाला महत्व देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *