Skip to content

वो शाम कुछ अजीब थी

दिवसभराच्या कामाचा कोटा संपवून, आभाळाच्या रखरखीत पांढुरक्या रंगावर, स्वतःच्या अस्तित्वाच्या सोनेरी, नारिंगी खुणा ठेवून सूर्यनारायण  क्षितीजाच्या आड जातात. रिकाम्या झालेल्या आकाशात पक्ष्यांचे थवे, घराची वाट धरतात. जणू या क्षणाची वाट बघत असल्यासारखे वारे वाहू लागतात. आकाशाच्या पटलावर एक छोटीशी चांदणी लुकलुकते. तिच्या हाकेला ओ देत, सारे आभाळच चांदण्यांनी भरून जाते आणि संध्याकाळ हलक्या पावलांनी अवतरते.
दिवस संपला आहे, आता आराम करा हे सांगायला निसर्गाने सांजेची निर्मिती केली असावी.

संध्याकाळच्या खूप आठवणी आहेत माझ्या. दिवेलागणीला आरतीची तयारी सुरु व्हायची.  देवघरात तुपाच्या निरंजनाचा गंध पसरायचा. त्या प्रकाशात आतल्या पितळेच्या मूर्ती  अजूनच तेजस्वी दिसायच्या. एक छोटासा दिवा गॅलरीतल्या तुळशीकडे लागायचा. श्लोक म्हणून झाले की आम्ही पाढे आणि कविता म्हणायचो. हसत खेळत, आपोआप पाठांतर होऊन जायचे.
वयात आलो आणि सांज खाजगी झाली. संध्याकाळी खिडकीकडे बसून, कॉफीबरोबर दिवसात घडलेल्या घटनांची, उजळणी करणे हा नवीन  छंद जडला. त्या एकांतात मन कुठे कुठे बागडून येऊ लागले. कॉलेजच्या गप्पा, गॉसिप, मैत्रिणीला सांगितलेली गुपिते याची साक्षीदार होती ही सायंकाळ.
सांजेला स्वतःचा रंग नसतो. ती दिवसाचे रंग ल्याते. कधी हुरहूर लावते, कधी मोहरून येते. कधी हसवते तर कधी उदासीच्या काळ्या रंगात हरवून जाते.
सांजेचे हे असंख्य पैलू अनेक गीतांना जन्म देतात. ही गीते लोकप्रिय होतात कारण त्यातील स्वरांना अनुभवाची माधुरी असते.

वो शाम कुछ अजीब थी
———————–

सातवी आठवीत असेन. आई -वडिलांबरोबर मुनारला आले होते. इथे येण्याआधी अर्धे केरळ चार दिवसांत चार चाकांवर पालथे घातले असल्याने, सर्वच जण थकून हॉटेलमध्ये गप्पा मारत बसले होते. पाय मोकळे करण्यासाठी मी एकटीच बाहेर पडले.  हिलस्टेशनचे एक बरे असते. कोणत्याही दिशेने गेले तरी निसर्ग हात पसरून तुमचे स्वागत करतो. ऑफ सिझन होता त्यामुळे फार वर्दळ नव्हती. परिसरच पूर्ण निर्जन. सभोवताली हिरवेगार उंचच उंच डोंगर, झोंबणारा वारा आणि त्यातच पावसाची रिपरिप. वातावरणात चहाचा सुगंध पसरला होता.
माथ्यावर एक दगडी चर्च होते. त्यातली मायलेकाची मूर्ती सुद्धा आज एकटी होती. बाहेरील एका मोठ्या दगडाच्या आडोशाला टेकले.  हळूहळू प्रकाशाची सत्ता संपायला सुरुवात झाली. उन्हातील ठाशीव दृश्यांची जागा आता सावलीने घेतली. सत्य आणि स्वप्नाच्या मधली ही वेळ. आभासाच्या हिंदोळ्यावर झुलणारी, मनाला हुरहूर लावणारी वेळ. 
एवढ्यात वाऱ्यावरून तरंगत स्वर आले, ” रैना बीती जाये, श्याम न आये “
माझ्यासारखाच भटका प्रवासी होता तो. रेडिओवर गाणे ऐकत, सूर्यास्त पाहण्यात दंगून गेला होता.
शाम को भुला, श्याम का वादा
संग दिये के जागी राधा
निंदिया न आये, रैना बीती जाये. 

रैना बीती जाये, शाम न आये
(सिनेमा -अमरप्रेम, संगीतकार-आर डी बर्मन, गीतकार -आनंद बक्षी, गायिका -लता मंगेशकर)

आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली, अमरप्रेम या सिनेमातील  “रैना बीती जाये ” ही विरहिणी आहे. ही राधेची तक्रार आहे. संध्याकाळी येण्याचे वचन दिले होते तिच्या श्यामने. आता तर रात्रीचा प्रहर उलटून गेला आहे पण कृष्णाच्या  पावलांचे तिला दर्शन काही झालेले नाही. वाट पाहून पाहून तिचे डोळे सुद्धा आता थकून गेले आहेत. थोडी काळजी, थोडी असूया, विरहाचे दुःख आणि कोणा सवतीचा मत्सर सुद्धा. ह्या साऱ्या भावभावनांचे दर्शन घडवणाऱ्या राग तोडी आणि खमाजच्या स्वरांनी या गाण्याला एक वेगळीच उंची दिली आहे. 

संध्याकाळच्या वेळेला कातरवेळ म्हणतात. विरहाची तीव्रता अंधूक प्रकाशाच्या साक्षीने अजूनच असह्य होते. त्यात तो विरह संपणार याची खात्री असेल तर सख्याची येणारी आठवण मनावर मोरपीस फिरवणारी; मात्र जर हा विरह न संपणारा असेल तर! तर मात्र येणारी सायंकाळ नाकारल्याचे दुःख बाळगून येते. आपण कोणाला नको आहोत याची जाणीव करून देते. रैना बिती जाये ची संध्याकाळ वाट पाहण्यात संपते खरी पण श्याम येणार याची खात्री आहे.
आर डी बर्मन यांनीच संगीतबद्ध केलेले इजाजत या सिनेमातले एका अधुऱ्या राहणाऱ्या सांजेचे गाणे आहे.

“खाली हाथ शाम आयी है”
(सिनेमा-इजाजत, संगीतकार-आर डी बर्मन, गीतकार -गुलजार, गायिका -आशा भोसले)

इजाजत सिनेमात प्रेमाचा त्रिकोण आहे. सुधा आणि महेंद्र पतिपत्नी आहेत तर माया ही महेंद्रची एकेकाळची प्रेयसी आहे. 
मायाने आत्महत्याचा असफल प्रयत्न केलेला आहे. ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिच्या सोबतीला थांबला आहे तो महेंद्र.
घरी त्याची पत्नी, सुधा, त्याची वाट पाहत आहे. तिची प्रत्येक संध्याकाळ अशीच आशा निराशेचा खेळ खेळून जाणारी. 

खाली हाथ शाम आयी है, खाली हाथ जायेगी
आज भी न आया कोई, खाली लौट जायेगी

येणारी सांज रिकामी  आहे. एकटी आहे. तिच्या साथीने येणारे कोणीही नाही ही जाणीवच मन रितं करणारी. खाली या शब्दावर हलकासा जोर देऊन त्यातले रितेपण आशाबाईंनी सहज अधोरेखित केले आहे. ही लादलेल्या एकटेपणाची जाणीवच एवढी सुन्न करून गेलेली आहे की अश्रूने सुद्धा काढता पाय घेतला आहे.

या दोन्ही गीतातली सांज, उदासीचा रंग ल्यालेली असली तरी संध्याकाळ नेहेमीच कातर करत नाही. संध्येचा रंग हा प्रत्येक वयासाठी  वेगळा असतो. पिवळीधमक सांज पाहीली ती बालपणात. शाळा पाच वाचता सुटायची . मग मैदानावर उनाडक्या करायचो, खेळून दमलो की उतरत गेलेल्या सूर्याच्या साक्षीने सुरांची मैफिल रंगायची. 
मोठे झाल्यावर खेळ संपला. पार्कवर  मारलेल्या फेऱ्यांत आणि गप्पांत पिवळीधमक सांज आता गुलाबी झाली.

ये शाम मस्तानी, मदहोश किये जाए, मुझे डोर कोई खींचे, तेरी ओर लिए जाए
(सिनेमा – कटी पतंग, संगीतकार-आर डी बर्मन, गीतकार -आनंद बक्षी, गायक-किशोर कुमार)

राजेश खन्ना, किशोर कुमार आणि आर  बर्मनने ही संध्याकाळ खरंच “मस्तानी” केली. गाण्याच्या सुरुवातीला व्हायोलिनची धून, नंतर गिटार आणि मग नायकाची शीळ. नायिकेचा सुरवातीचा उदास मूड बदलून जातो. 

नायिकेला विधवा म्हणून जगावे लागत आहे. ह्या मागे एक गूढ आहे. दिलेल्या वचनामुळे तिला ते सांगता येत नाही आणि
तिचा स्वतःचा भूतकाळ सुद्धा कुणाला सांगावा एवढा सरळ नाही.
अजाणतेपणी केलेल्या चुकीचे ओझे आता तिला सोबत ठेवावे लागत आहे पण दुसरीकडे प्रेमाची साद. त्याला कसे नाकारायचे ! 

दूर रहती है तू , मेरे पास आती नाही
होठो पे तेरे कभी प्यास आती नही
ऐसा लगे जैसे के तू, हंस के जहर कोई पिये  जाए

“मेरे पास आती नाही ” ही थोडीशी तक्रारच. त्याला साद देणारे व्हायोलिनचे  हलके सूर आणि नंतर “ऐसा लगे जैसे के तू ,हंस के जहर कोई पिये  जाए ” चा समजूतदारपणा. आता किशोरचा आवाज थोडासा हळुवार त्यामुळे जास्तच जादुई .
संध्याकाळचे सप्तरंग आता तिच्या मनाला मोहवतात. स्वरातली ओढ, त्यांच्यातले अंतर कमी करते. 
दिवस आणि रात्रीचे मिलन होते ती वेळ, खरंच अनेक प्रेमकथांना जन्म देते.

कटीपतंगच्या नायिकेने प्रेम करणेच हा गुन्हा पण अलबेला मधील नायिका धीट आहे. स्वतःच्या भावना लपवण्याची तिला धास्ती नाही.  अर्थात समाजाला हे एवढ्यात समजू नये याचीही खबरदारी घेण्याएवढी ती हुशार आहे.
नायकाचे लक्ष आहे नायिकेच्या घराच्या खिडकीवर. हा १९५१ चा सिनेमा. तेव्हा काही भेटणे सहज शक्य नव्हतेच. कधीतरी तिचे दर्शन होईल या आशेवर तग धरून असलेला नायक तिला शीळ घालतो.
तिलाही त्याची आठवण येत आहेच पण बाहेर असलेल्या लोकांना समजू नये म्हणून ती सांगते,
“शाम ढले, खिडकीतले, तुम सीटी बजाना छोड दो “
(सिनेमा -अलबेला, संगीतकार सी रामचंद्र, गीतकार, राजेंद्र कृष्ण  गायिका -लता मंगेशकर)

तिचा हा लाडिक बहाणा पुरेपूर ओळखून असल्याने तोसुद्धा तिला इशारा देतो
,”घड़ी-घड़ी खिड़की में खड़ी तुम तीर चलाना छोड़ दो.”

काही गाणी एवढी कालातीत असतात की काळात पडलेले अंतर पुसून टाकतात. १९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या अलबेला या  सिनेमातील हे गीत. सी रामचंद्रांचे संगीत असणारा हा चित्रपट यातील गाण्यांच्या ताकदीवर आणि भगवान, गीताबालीच्या सहज सुंदर अभिनयाने तरुन गेला. कधीही हे गाणे लावा, मरगळलेली सायंकाळसुद्धा ताजीतवानी होते. .
असेच एक तरुण सांजेचे गीत बाल सुब्रह्मण्यम आणि लताजींच्या आवाजात आहे. ह्यातल्या नायिकेला समाजाची धास्ती नाही. शेवटी हा १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा आहे.
“मैने प्यार किया” असे खणखणीत नाव असणाऱ्या सिनेमातला नायक साद घालतो,
“आजा शाम होने आई, मौसम ने ली अंगडाई,
तो किस बात की है लड़ाई”
(सिनेमा -मैने प्यार किया, संगीतकार -राम लक्ष्मण, गीतकार- देव कोहली,  गायक -बालसुब्रह्यमण्यं, लता मंगेशकर)

या नायकाच्या सादेला बिनधास्त प्रतिसाद देताना ती सांगते,  
तू चल, मै आयी “

संध्याकाळला  शब्दांत बांधता येत नाही. तिची रूपे अगणित.
कधी प्रफुल्लित, कधी उदास, कधी गूढ, कधी तटस्थ, कधी हळवी तर कधी गुलाबी.रंगात न्हाहून निघालेली.
तरीही तिचा मुख्य रंग विरहाचाच. सायंकाळचा अस्ताला जाणारा सूर्य पाहिला की तलतची आठवण दाटून येते.
त्याचा मखमली आवाज काळजाला घरे पाडतो.
केवळ त्या आवाजाने “फिर वोही शाम, वोही गम” या गाण्याला न्याय दिला.

फिर तसव्वुर तेरे पहलु मे बिठा जायेगा
फिर गया वक़्त घडी भर को पलट आयेगा
दिल बहल जायेगा आखीर को तो सौदाई है
फिर वोही शाम वोही गम.
नायिकेच्या बाहुपाशाची, नायक फक्त कल्पनाच करतो आहे. भूतकाळातील एकत्र घालवलेले सुंदर क्षण परत येतील याची खात्री नाही पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आशेची झुळूक आहे. त्या कल्पनेनेच मनाचे समाधान करून घेतो आहे तो. 

फिर वोही शाम वोही गम.
(सिनेमा-जहाँआरा, संगीतकार- मदन मोहन, गीतकार -,राजेंद्र कृष्ण,  गायक -तलत महमूद)

दिवस आणि रात्रीला दूर ठेवणारी म्हणून की काय विरहाचे दुखः सायंकाळच्या सोनेरी प्रकाशात प्रकर्षाने जाणवते.
कदाचित त्याला काळ्या रंगाची कड असते म्हणून असेल ते खोल झिरपत जाते.
“जहाँआरा”सिनेमातले हे गीत. ती मुघल घराण्यातील पडदाशीन राजकन्या. तो साधा कवी. त्यांचे मिलन असंभव. त्याची आणि तिची वाट कधी एकत्र येणारच नव्हती.  एकटेपणा आता कायमचा कोरला गेला आहे कपाळावर.
संध्याकाळच्या गीतांचा अल्बम निघणार असेल तर तलतचे, फुटपाथ सिनेमातील, अजून एक गीत पहिल्या पाचात येईल.

दिलं परेशान है , रात वीरान है ,देख जा किस तरह आज तनहा है हम 
शाम ए गम की कसम
( सिनेमा -फूटपाथ , संगीतकार -खय्याम, गीतकार -मजरूह सुलतानपुरी,  गायक -तलत महमूद)

पूर्ण सिनेमाला संध्येच्या काळ्या रंगाची कड आहे. विषय अत्यंत गंभीर. नायक आणि नायिका एकत्र असलेले काही प्रसंग ओठावर हसू आणतात. अर्थात त्यांनी एकमेकांना भेटणे सुद्धा सोपे नाही. अडथळे आहेतच पण ती येणार याची खात्री सुद्धा आहे. माथ्यावरचे आकाश आता चांदण्यांनी भरून गेले आहे. विरहात पोळून निघालेला तो मात्र अस्वस्थ आहे. चंद्रप्रकाशात न्हाहून निघालेला आसमंत त्याची तहान तृप्त करायला असमर्थ आहे.
ढुंढती है नजर , तू कहां है मगर 
देखते देखते आया आंखो में नम 
शाम ए गम की कसम.
तलतच्या आवाजातील दुःखाने आपलेही डोळे पाणावतात.

विरह थोड्या काळाचा असेल तर ठीक पण कधीकधी विरहाला शेवट नसतो. मनाला समजते पण वळत नाही. मग न राहवून दुःखाला, सुरांच्या माध्यमातून वाचा फुटते.
ऐ शाम की तनहाईया ऐसे में तेरा गम
पत्ते कही खडके हवा आयी तो चुके हम …
(सिनेमा -आह, संगीतकार- शंकर जयकिशन, गीतकार-शैलेंद्र, गायिका -लता मंगेशकर)

बहिणीच्या नावाने, नायिकेने नायकाला पत्रे लिहिलेली असतात. त्यातून त्यांची ओळख होते. मने जुळतात आणि अलगद त्यांच्या भावविश्वात, प्रेमाचा प्रवेश होतो. नंतर पत्रे लिहिणारी ती, “ती ” नाही तर कोणीतरी वेगळीच हे समजल्याने झालेला गैरसमज आणि त्याचे न येणे मनावर खोल जखम करून जाते. हे दुःख ऐकायला सुद्धा कोणी हमदर्द नाही. चंद्र,तारे आणि वाऱ्याच्या झुळकेनी हलणारी पाने फक्त ह्या वेदनेचे साक्षीदार.

सीने से लगा तेरी याद को,
रोती रही मैं रात को,
हालत पे मेरे चाँद तारे ,रो गये शबनम
“आह” या चित्रपटातील कवी शैलेंद्र यांचे हे गीत लताजीनें अप्रतिम गायले आहे. त्याकाळच्या नायिकांच्या अभिनयात दिसणाऱ्या मेलोड्रामाचा लवलेशसुद्धा नर्गिसच्या अभिनयात दिसत नाही.

भर उन्हाळ्यातील सायंकाळ खास असते. सूर्य महाशय डोक्यावर येतात. अंगाची लाहीलाही होते. जीव हैराण होतो. सहनशीलतेची परीक्षा पाहून आता हे महाशय, पश्चिमीकडे झुकतात. आभाळाचा रखरखीत पांढुरका रंग आता निळा होतो. त्या निळेपणाने डोळे निवतात. या निळ्या गर्द कॅनव्हासवर, स्वतःच्या अस्तित्वाच्या सोनेरी, नारिंगी खुणा ठेवून सूर्यनारायण निरोप घेतात. हवेत थोडासा गारवा येतो. अंधाराने गिळून टाकलेल्या आकाशाच्या पटलावर एक छोटीशी चांदणी लुकलुकते आणि तिच्या हाकेला ओ देत, सारे आभाळच चांदण्यांनी भरून जाते.
सुरेल मैफिल जमून यावी तशी एखादी संध्याकाळ जमून येते. 

वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है
वो कल भी पास-पास थी, वो आज भी करीब है

पहिले प्रेम यशस्वी होणे हातात नसते पण ते विसरणेही शक्य नसते. पहिल्या प्रेमाची अनुभूती निरागस, सच्ची असते.
पहिल्या प्रेमात समर्पणाचा अर्थ समजतो आणि जाणवतो. त्यामुळे ते यशस्वी झाले नाही तर त्याच्या जखमा दीर्घकाळ राहतात.
प्रेमभंगाच्या आघाताने आपले मानसिक संतुलन हरवून बसलेला अरुण आणि त्याला  आपल्या सेवेने, प्रेमाने माणसात आणणारी राधा यांची आगळी वेगळी कहाणी “खामोशी”. राधाही प्रेमभंगाच्या दुःखातून सावरते आहे.
पहिल्या प्रेमात दुखावल्या गेलेल्या ह्या  दोन व्यक्ती एकत्र येतात. एकमेकांचा सहवास, मनाला सुखावत असताना सुद्धा, कडवट भूतकाळाची सावली दोघांच्याही मनात आहेच.

झुकी हुई निगाह में कहीं मेरा ख़याल था
दबी-दबी हँसी में इक हसीन सा गुलाल था
मैं सोचता था मेरा नाम गुनगुना रही है वो
न जाने क्यों लगा मुझे, के मुस्कुरा रही है वो

“वो शाम कुछ अजीब थी “हे गाणे हेमंत कुमार यांनी यमन या रागात बांधले आहे.
यमन रागाचा रस, शांत रस आहे.  हा शांत रस, भक्ती, शृंगार आणि यातून मिळणाऱ्या आनंदाचे रूप आहे. संसारात आणि मित्रपरिवारात  रमलेल्या, सुखी, तृप्त गृहस्थाचे रूप म्हणजे यमन. 
यमन या रंगातले अजून एक नितांत सुंदर गीत येसूदास यांच्या आवाजात आहे. उन्हाळी सुट्टी, अनेक वर्ष गावाकडे जायची. खेडेगावचं ते.  करमणुकीची साधने नव्हतीच. सायंकाळी रॉकेलचे दिवे अंगण उजळवायचे. रात्रीच्या काळोखाला जडवलेली सोनेरी कडच ती. अंगणात पुरिया,पिलू किंवा यमन बरोबर सुरांची मैफिल रंगायची. संध्याकाळी उतरत गेलेला सूर्य आणि झिंग आणणारे सूर.

जब दीप जले आना ,जब शाम ढले आना 
संकेत मिलन का भूल न जाना , मेरा प्यार न बिसराना. 
(सिनेमा- चितचोर, संगीतकार – रवींद्र जैन, गीतकार-रवींद्र जैन, गायक -येसूदास, हेमलता)
             
राजश्री प्रोडक्शनचा चितचोर ही साधी कौटुंबिक प्रेमकथा होती.  एका मुलीसाठी वरसंशोधन सुरु असते. गावात एक इंजीनिअर येणार असल्याची बातमी त्यांना समजते. ह्याच घरात तो उतरणार असल्याने , त्याचा विचार का करू नये असे त्या मुलीच्या आईवडिलांना वाटते आणि त्या दृष्टीतून ते प्रयत्न करायला लागतात. मात्र आलेला मुलगा हा त्या इंजिनीअर मुलाच्या हाताखाली काम करणारा एक सामान्य कर्मचारी असतो.
अर्थात गरीब असला तरी तो मानाने खूप चांगला आहे. देखणा आहे आणि गायक सुद्धा . संगीताची आवड असणाऱ्या मुलीचे मन त्याच्याकडे ओढले जाते.
नव्याने जन्म घेणाऱ्या प्रेमाचे हे गीत आहे. 

खरे प्रेम हृदयात जन्म घेते, आत्म्याला स्पर्श करते आणि मनाला शांती देते. यमन सारखा तरल आणि सुरेल दुसरा राग नाही. ह्यात गुंफलेली सायंकाळ हुरहूर लावणारी असेल तरी ती आशादायी आहे. “संकेत मिलनका भूल न जाना ” ही विनवणी नाही. ती नक्कीच येणार याची खात्री रवींद्र जैन यांच्या संगीतात आणि येसूदासजींच्या आवाजात आहे. 
.संध्याकाळच्या असोशीचे वर्णन करणारे, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली, सुरेश वाडकर यांनी ” उत्सव ” सिनेमात गायलेले अजून एक सुंदर गीत आहे, 
” सांज ढले ” .
(सिनेमा-उत्सव, संगीतकार-लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गीतकार-वसंत देव , गायक -सुरेश वाडकर)

चारुदत्त आणि वसंतसेनेची ही पहिली भेट. राजाच्या दुष्ट मेहुण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी वसंतसेना चारुदत्ताच्या आश्रय घेते.घरात पसरलेला मिणमिणता संध्याप्रकाश आणि त्यातून येणारे बासुरीचे स्वर.  चारुदत्त गात असतो.

साँझ ढले गगनतले,  हम कितने एकाकी
छोड़ चले नैनों को किरणों के पाखी
शब्द आणि सुरावर असलेली हुकूमत पाहून वसंतसेनेचे हृदय या कवीकडे ओढले जाते.
हा “एकाकी” शब्द भरल्या मैफिलीत कासावीस करून जातो.
प्रेम भंग सोडाच,ज्या वयात प्रेम सुद्धा किती जीवघेणे आहे ते माहित नव्हते. तरीही हे स्वर जखमी करून गेले.

याच वयात संध्याकाळ हळूच, हलक्या पावलांनी यायला लागली. कोणीही नसायचे तरी मनात कोणाची तरी चाहूल असायची. मदहोश करणारे असे कुणीतरी मनात डोकावायला लागले होते त्यावेळच्या संध्याकाळी. 

रोज़ शाम आती थी, मगर ऐसी न थी 
रोज़ रोज़ घटा छाती थी, मगर ऐसी न थी ,ये आज मेरी जिंदगी में कौन आ गया 
((सिनेमा-इम्तिहान, संगीतकार-लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गीतकार-मजरूह सुलतानपुरी, गायिका-लता मंगेशकर ).

दिवसाची प्रखरता संध्येत नसते आणि रात्रीचा अंधार सुद्धा नसतो . सौम्य,आल्हाददायक सायंकाळ म्हणजे प्रेमीजनांसाठी वरदानच. त्यातल्याच एका सायंकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात.  एक सुंदर सायंकाळ आयुष्यातील पुढील भेटींची नांदी ठरते.
“इम्तिहान “सिनेमातील हे गीत लक्ष्मी प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केले आहे.

यातला नायक हा एक आदर्शवादी प्राध्यापक आहे. त्याचे पूर्ण व्यक्तिमत्वच आशादायी. मुले त्याच्याकडे ओढली जातात. नायिका त्याला अपवाद नाही. एका अपघातात तिचा पाय अधू झाला आहे. तिच्या आयुष्यात घडलेल्या काही दुर्दैवी घटनांनी निराश झाली आहे. नायक तिला आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहायला शिकवतो.

होले होले , धीरे धीरे , कोई गीत मुझको सुनाये 
प्रीत मनमें जगाये , खुली ऑंख सपने दिखाये
ये आज मेरी जिंदगी में कौन आ गया 
नीरस, उदास,एकटी सायंकाळ त्याच्या आगमनाने हवीहवीशी वाटते. तिच्या बेरंग जीवनात सप्तरंगांची उधळण करते.
संध्याकाळच्या या जादुई वातावरणाचे हुबेहूब वर्णन करणारे अजून एक अजरामर गीत “शगून” या सिनेमात आहे. 

पर्बतों के पेड़ों पर शाम का बसेरा है 
सुरमई उजाला है, चम्पई अंधेरा है .
(सिनेमा -शगुन, संगीतकार -,खय्याम,  गीतकार-मजरुह सुलतानपुरी, गायक-मोहम्मद रफी , सुमन कल्याणपूर) 

रात्र आणि दिवस याना वेगळे करणारी नाही तर यांचा संगम घडवून आणणारी वेळ या स्वरूपात कवी साहीर लुधियानवी सांजेला पाहतात.अशी ही मंगलदायक वेळ दोन जीवांना एकत्र आणते या मिलनाला निसर्गातील आभाळ,झरा,वारा या सर्वच घटकांचा भरभरून आशीर्वाद आहे. 

ठहते-ठहरे पानी में गीत सर-सराते हैं
भीगे-भीगे झोंकों में खुशबुओं का डेरा है

या संध्याकाळी आणा भाका,वचने दिली घेतली जातात आणि आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत टिकणाऱ्या प्रवासातील सोबतीची निश्चिती होते.

आयुष्याची सायंकाळ निवडलेल्या जोडीदाराबरोबर घालवता येणे या सारखे सुख नाही पण त्यासाठी नशिबाचे दान आपल्या बाजूने पडायला हवे.
अनेकवेळा चालता चालता, हातातला हात सुटतो आणि एकाकी प्रवास वाट्याला येतो.
कुसुमाग्रज लिहितात,
उगवतीच्या ऊन आता
मावळतीला पोचले आहे
मार्गक्रमण मार्गापेक्षा
स्मरणात अधिक साचले आहे

हवे ते मिळाले असते, न मिळाल्याची खंत करण्याचे वय सुद्धा निघून गेलेले असते. हे समजते तरीही आठवणींना कोण थांबवू शकणार! त्या येतात. हव्याश्या आणि नकोश्या सुद्धा वाटणाऱ्या आठवणी.
गेलेले क्षण परत येणार नाही याची जाणीव होते कारण आयुष्याच्या सायंकाळी राहिलेले क्षण मर्यादित असतात. मग मुकेशच्या गाण्याचा अर्थ समजतो.

कहीं दूर जब दिन ढल जाये , सांझ की दुल्हन बदन चुराये चुपकेसे आये .
मेरे खयालोंके आंगन में कोई सपनोके दीप जलाये .
(सिनेमा – आनंद , संगीतकार- सलील चौधरी,  गीतकार-योगेश , गायक- मुकेश ) 
आनंद वाटणाऱ्या आनंदने आयुष्यात बरेच काही गमावले आहे. त्याची माणसे, त्याचे प्रेम आणि आता असलेले आयुष्य सुद्धा संपत आले आहे. 

दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे
खो गए कैसे मेरे सपने सुनहरे 
ये मेरे सपने यही तो हैं अपने
मुझसे जुदा न होंगे इनके ये साये इनके ये साये

सर्व काही गमावून सुद्धा स्वप्ने विझू न देणाऱ्या माणसाचे हे गीत आहे. संध्याकाळच्या कृतार्थतेचा अर्थ उलगडून सांगणारे हे गीत आहे. 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

10 thoughts on “वो शाम कुछ अजीब थी”

  1. Vidula Sahasrabudhe

    प्रिया,

    कमाल आहे तुझी.
    सायंकाळ,हुरहूर वाटणारी, कातरवेळ

    या संध्याकाळची किती गाणी आहेत.
    शाम ढले पासून आजा शाम होने आयी

    खूप मोठा काळ निवडलास.
    एकेक गाणे म्हणजे एकेक रत्न.

    तुला सादर प्रणाम
    🙏
    🎉💐❤️

  2. वाह वाह, सगळ्याच सुंदर गाण्यांची आठवण एकाच पोस्टमधे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  3. फार सुरेख संध्याकाळ नव्हे वेगवेगळ्या संध्याकाळींचं वर्णन,आणि चपखल,भावणारे सिनेगीतांची गुंफण केवळ आणि केवळ अप्रतिम, प्रिया. आयुष्याच्या संध्या समयी ह्या एकच असुनही ,अनेक भासणाऱ्या संध्याकाळी अनुभवल्या असल्याने मनाला खूप खोलवर भिडतात.

    1. Vandana, मलाही ..या वयात जेवढी संध्याकाळ समजते तेवढी आधी नव्हतीच.
      मग गाण्याचा अर्थ उमजत जातो.

  4. मी गाणी वेडी. न कळत्या वयापासून. आज उतरतीची वाट. तरीही तुझ्या लिखाणात हरवून टाकण्याचं, खिळवून ठेवण्याची हातोटी आहे. बसं लिहीती रहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *