दोन व्यक्तीमधील संमतीने झालेले शारीरिक संबंध व्यभिचार म्हणून जरी गणले गेले तरीही तो भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा ठरत नाही असा निर्णय आताच दिला गेला. जेव्हा नाते अशा वळणावर येते , तेव्हा अनेक शक्यता असू शकतात. तरीही व्यभिचार हे घटस्फोटाचे वैध कारण आहे, हा विरोधाभास नाही का ? हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक.
विवाहबाह्य संबंधात अडकलेली माणसे, सुखाच्या धुंदीत असताना, आपण कुणाला दुखावतोय हे लक्षात आले तरी भान नसते. जेव्हा लग्न संबंधात अडकलेली माणसे , अशा प्रेमबंधनात अडकतात , तेव्हा त्यांच्याशी जोडले गेले असंख्य जीव दुखावतात. काहींना पर्याय नसतो म्हणून जरी राहिले , तरी त्यांच्या नजरेतून तो अपराधच ठरतो. त्यांची अगतिकता, स्वतःच्या सुखाचा पाया बानू शकतो का !
लग्न बंधनात जखडलेल्या व्यक्तींने केलेला व्यभिचार हा केवळ दोन व्यक्तीचा शरीरसंबंध असूच शकत नाही कारण त्यात बाकीच्या लोकांच्या शारीरिक , मानसिक, आर्थिक हितसंबंधांना हानी पोचू शकते ..
कुटुंब मोडणे हे मुलांसाठीही योग्य नसते. त्यामुळे व्यभिचार हा गुन्हा नसेल पण घटस्फोटाचे कारण निश्चित आहे.
अर्थात ह्यामुळे अशी नाती काही थांबणार नाहीत. जे जे उत्तम , ते ते माझे ..हा हव्यास मानव जातीचा सत्तेचाळिसावे गुणसूत्र आहे, त्याला आवर घालणे सर्वानाच शक्य नाही.
दोन विवाहित व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात हा विषयच गुंतागुंतीचा. त्याचा शेवट ही गुंता वाढवणारा मग निर्णय कोणताही असो आणि कुणाच्याही बाजूने दिलेला असो.
व्यभिचार आणि प्रेम यातली रेषाही खूप पुसट असते. मनाने दिलेला कौल खरा का समाजाने मान्य केलेले नाते ? हा प्रश्न सुद्धा विवाद्य. अनेकवेळा तर जे घडते ते सुद्धा मुद्दाम घडवलेले नसते. दोन अनोळखी जीव एकत्र येतात आणि कोणत्यातरी बाधित क्षणाला एकमेकांकडे आकर्षित होतात. अनेक वेळा हे आकर्षण, विवेकी मनाच्या, बुद्धीच्या मर्यादा ओलांडून प्रेमाच्या निसरड्या वाटेवर प्रवास करायला लागते आणि मग सुरु होतो तो स्वतःच्या मनाशी झगडा.
हा विषय फिल्म निर्मात्यांचा आवडता. जे जे निषिद्ध आहे त्याकडे मन ओढले जाणे सामान्यांसाठी स्वाभाविक. अशी परिस्थिती कितीही हवीहवीशी वाटली तरीही ती झेपवणे अशक्य. मग हे सिनेमा पाहिले जातात. त्यातल्या पात्रांत स्वतःच्या अतृप्त इच्छा, अपुरी स्वप्ने शोधल्या जातात. माहित असते की हे बरोबर नाही पण हृदयाचे स्वतःचे असे स्पष्टीकरण असतेच की जिथे विवेकाचे काहीही चालत नाही.
ब्रिफ एन्काउंटर
———————-
“This can’t last. This misery can’t last. I must remember that and try to control myself. Nothing lasts really. Neither happiness nor despair. Not even life lasts very long.” 
ब्रिफ एन्काउंटर सिनेमाची नायिका, लॉरा, स्वतःला समजावते. डोळ्यातले पाणी मात्र तिच्या निग्रहाला जुमानत नाही. मनाचा एक कोपरा कायमचा रिकामा राहणार आहे हे तिच्याच नाही तर प्रेक्षकांच्याही लक्षात येते. सिनेमाचा मूड आणि शेवट, सिनेमाच्या सुरुवातीलाच स्पष्ट होत जातो.
” ब्रिफ एन्काउंटर “ चित्रपटाची सुरुवात हा कथेचा शेवटचा सीन आहे.
स्थळ –मिलफोर्ड जंक्शन रेल्वे स्टेशनचे कॅन्टीन आणि रेस्ट रूम .
स्टेशन मास्टर अल्बर्ट गॉडबी आणि कॅफेची मॅनेजर यांच्या गप्पा रंगल्या आहेत. थोडेसे गॉसिप , थोडे फ्लर्टींग आणि त्यातच कामे उरकण्याची घाई. त्यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या एका टेबलवर लॉरा आणि डॉ ऍलेक , एक मध्यमवयीन , जोडपे बसले आहे. त्यांच्या समोर असलेली कॉफी थंड झाली आहे. एक विचित्र तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. बरेच काही बोलायचे तर आहे पण शब्द मात्र हरवून गेले आहेत.
नकोशा झालेल्या या शांततेचा भंग करते एक स्त्री. 
लॉराची तिची जुजबी ओळख असावी. तिची टकळी कशी थांबवावी हे त्या दोघांनाही समजत नाही. हताश होऊन एकमेकांकडे पाहत असतानाच , त्याची ट्रेन येते. न बोलताच तो उठतो. तिच्या खांद्यावर केलेला हलकासा स्पर्श आणि पाहता पाहता, तिच्या नजरेसमोर तो समोरील गर्दीत मिसळून जातो. घडू नये अशा प्रेमकथेचा असा अधुरा शेवट झालेला असतो.
डेव्हिड लीन चा “ द ब्रिफ एन्काउंटर “ १९४५ मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हा दुसरे महायुद्ध नुकते संपले होते. दुसऱ्या महा युद्धातुन ब्रिटन नुकते सावरत होते. अशावेळी एकमेकांच्या आधाराची गरज असताना, कुटुंबाचा पाया डळमळीत करणाऱ्या व्यभिचाराच्या थीम वर आधारित असलेला सिनेमा बनवणे ही मोठीच रिस्क होती पण हा सिनेमा गाजला.
लॉरेन्स ऑफ अरेबिया , डॉ झिवागो , द ब्रिज ऑन द रिवर क्वाई’ अशा भव्य सिनेमाची निर्मिती करणाऱ्या डेव्हिड लीन यांचा हा चित्रपट असला तरी चित्रपटाचा कॅनव्हास लहान आहे.
यात मुख्य पात्रे पाच.
नायक, नायिका, तिचा नवरा, स्टेशनमास्तर आणि कॅफे चालवणारी मॅनेजर.
कथा घडते ती रेल्वे स्टेशनवर आणि नायिकेच्या घरात.
सिनेमाची नायिका आहे मध्यमवयीन गृहिणी, लॉरा (सिलिया जॉन्सन).
लॉरा, तिची दोन मुले आणि तिचा नवरा असे चौकोनी सुखी कुटुंब. नवरा सज्जन पण त्याला कसलीच आवड नाही.
ना सिनेमा, ना पुस्तक, ना काव्य, ना कुठे फिरायला जाणे. कामावरुन घरी आल्यावर क्रॉसवर्ड सोडवणे हा त्याचा विरंगुळा आहे. अर्थात लॉराची तक्रार नाही. हे आयुष्य तिच्याही अंगवळणी पडले आहे कारण तिला बाहेरच्या जगाची, माणसांची ओळख नाही.
आठवड्यातून एक दिवस, गुरुवारी, उपनगरातून शहराच्या मुख्य भागात शॉपिंग साठी बाहेर पडणे ही लॉरा साठी बाहेरचे जग पाहायची एक संधी आहे. रेल्वेस्टेशनवरील कॅफेत कॉफी पिणे, एखादा सिनेमा पाहणे, लायब्ररीतून पुस्तक आणणे, थोडे शॉपिंग आणि परत ट्रेन पकडून घरी ही तिच्या मौजेची व्याख्या.
अशाच एका गुरुवारी तिची ओळख डॉ ऍलेकशी होते.
प्लॅटफॉर्मवर वाट पाहत असताना डोळ्यात धुळीचा कण जातो. पाणी मारूनही वेदना काही कमी होत नाही . 
हे पाहून एक अनोळखी गृहस्थ मदतीला येतात. कण निघतो , डोळे स्वच्छ होतात, ओळख सुद्धा होते. ते गृहस्थ डॉक्टर असतात .
ही ओळख तिथेच थांबत नाही. पुढच्या गुरुवारी सुद्धा तेच स्टेशन, तोच कॅफे आणि गप्पा रंगतात.
आठवड्यातला एक दिवस, ते लोकल हॉस्पिटल मध्ये काम करत असतात. प्रेव्हेंटिव्ह मेडिसिन; म्हणजे रोग होऊच नये यासाठी घेण्याची काळजी. आपल्या कामाबद्दल तिला सांगताना ऍलेक थोडासा वाहवत जातो. कुणीतरी इंटरेस्ट घेऊन ऐकतेय हे बोलायला उद्युक्त करतंच.
तिच्या डोळ्यात कुतूहल आहे. एवढा मोठा डॉक्टर आपल्याला हे सांगतोय याचेही कौतुक. त्याला दोन मुले असतात.
त्यांच्याबद्दल बोलताना सुद्धा त्याच्या डोळ्यात अभिमान असतो. 
आतापर्यंतचे लॉराचे आयुष्य एका रुटीन मध्ये जखडले आहे. लग्नामध्ये कर्तव्याला महत्व आहेच कारण जर त्याची जाण नसेल तर दोन माणसे जबाबदारीचे ओझे पेलणे अशक्य पण कर्तव्यात सुद्धा प्रेम असावे आणि नुसते असणे पुरेसे नाही तर ते दिसावे सुद्धा. आयुष्यामधली ही कमतरता आतापर्यंत लॉराने न तक्रार करता स्विकारली आहे. अनेकवेळा माणसे मन मारायला शिकतात पण कुणीतरी आपले मन जाणावे हे त्यांचेही मन सांगत असते. त्यांच्या गप्पांतून तिला ऍलेक दिसतो. गप्पा मारण्याची , कुणीतरी आपल्याला जाणून घेण्याची त्याची तहान दिसते आणि त्याला तिची.
हळूहळू ओळख वाढते. 
ते सिनेमाला जातात; शॉपिंग करतात. त्याचे हळुवार वागणे, त्याचा नर्म विनोद, सिनेमा , पुस्तके यांची जाण, देखणे रूप, आर्जवी बोलणे, हे सगळेच लॉरासाठी नवीन आहे.
या जाणून घेण्याच्या प्रवासात कधीतरी प्रेमाची एन्ट्री होते.
तरीही आपण बरोबर करतो आहे का ही शंका तिला कुरतडते .
“ आपण डॉ ऍलेकना जेवायला बोलावूया का ?” हा प्रश्न नवऱ्याला .
मनातली अपराधीपणाची टोचणी तर आहे पण कशाला असायला हवी हे स्वतःच केलेले समर्थन सुद्धा आहे. 
नवऱ्याला तिच्या मनातल्या वादळाची कल्पना नाही. त्याला फार उत्सुकता सुद्धा नाही.
“बोलावं की” असे तो म्हणून जातो की पण त्यात फारसा उत्साह नाही, कुतुहूल नाही, रागही नाही .
त्याचा निरुत्साह तशा सर्वच गोष्टीत. त्याची सवय आहे तिला.
ऍलेक आणि लॉराच्या दर गुरुवारच्या भेटी वाढत जातात आणि एका नाजूक क्षणाला ऍलेक आपल्या प्रेमाची कबुली देतो.
ऍलेक: माझे प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्या बोलक्या डोळ्यांवर, ओठातून सांडणाऱ्या चांदण्यावर , तुझ्या लाजण्यावर …
प्लीज हे नको बोलूस … तिचे पुटपुटणे
ऍलेक: I love you. I love you. You love me too. ..“ हो , मला ते लपवायचेही नाही “ तिची कबुली .
मनातले प्रेम एकदा ओठावर आले की जगाची पर्वा करत नाही. 
ऍलेक आणि लॉरा उघड भेटतात, सिनेमाला जातात, बोटिंग करतात .गुरुवारचा दिवस त्यांच्यासाठी जगतात. अशाच एका गुरुवारी ऍलेकची ट्रेन चुकते. त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर जाऊया का ? तो लॉराला सुचवतो.
“ No , I have to go “ त्याचा हात सोडून ती प्लॅटफॉर्मकडे धावत सुटते. तिचे घर , तिचा नवरा , तिची मुले आणि एका बाजूला ऍलेक , तिचे सर्वस्व.
गाडी येते ती चढते सुद्धा पण आकर्षणाच्या खोलीचा अंदाज येत नाही. ज्या वेगाने ती ट्रेन मध्ये चढते , त्याच वेगाने उतरून , ती ऍलेककडे धावत सुटते. फ्लॅट च्या एकांतात हे दोघेच. त्याचा निर्णय झाला आहे. 
जर मने एकत्र आली असतील तर शरीराला तरी बंधनात कशाला ठेवायचे ?
तिच्या मनाची तयारी ती करते न करते तोच, बेल वाजण्याचा आवाज आणि त्याच वेळी किल्लीने दार उघडल्याचा आवाज येतो. आपण काय करत आहोत त्याचे भान, शरम , अपराधीपणा या सगळ्याचे ओझे असह्य होऊन ती मागच्या दाराने बाहेर पडते आणि धावत रात्रीच्या अंधारात नाहीशी होते. 
बाहेर ऍलेकचा मित्र असतो.
खोलीत लॉराचा स्टोल राहिलेला असतो, ते पाहून मित्र ऍलेककडे सहेतुक कटाक्ष टाकतो.
ऍलेकला ते सहन होत नाही पण त्याला बोलताही येत नाही.
समाजाचे नियम आणि मनाची ओढ यात काहीही साम्य नसते. जे प्रेम पवित्र आहे असे त्या दोघांनाही वाटत असते ते समाजाच्या नजरेत एक अफेअर असते. लॉराच्या चारित्र्यावर कुणी बोट ठेवावे हे ऍलेकलाही सहन होत नाही आणि या परिस्थितीतून सन्मानाने आणि प्रतिष्ठेने बाहेर पडता येईल असा मार्गही त्याला सुचत नाही .
It’s awfully easy to lie when you know that you’re trusted implicitly. So very easy, and so very degrading. ऍलेकआणि लॉरा यांच्या घरच्या माणसांना याबाबतीत काहीही कल्पना नाही. त्यांचा पूर्ण विश्वास आहे.
आपण सर्वाना फसवतो आहे, अशा लोकांना की ज्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे , हे अपराधीपण, सर्व सामन्यांना अंगावर लेवून वावरणे कठीण. दोघेही परत न भेटण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या स्वतःसाठी , त्यांच्या संसारासाठी.
ऍलेक — I love you. I love you. You love me too. It’s no use pretending it hasn’t happened cause it has.
लॉरा : Yes it has. I don’t want to pretend anything either to you or to anyone else. But from now on, I shall have to. That’s what’s wrong. Don’t you see? That’s what spoils everything. That’s why we must stop, here and now, talking like this. We’re neither of us free to love each other. There’s too much in the way. There’s still time, if we control ourselves and behave like sensible human beings. There’s still time.
एकमेकांच्या संसाराच्या भवितव्यासाठी आपल्याला हे घडलेच नाही असे वागावे लागेल आणि ते तर कठीण आहे. स्वतःवर ताबा ठेवणे ही कठीण आहे. आपण भेटूयात नको आता. जी वेळ गेली तर पुढची घसरण थांबवणे अटळ आहे.
प्रेमाच्या कबुलीनंतर तिने त्याला आणि स्वतःलाही समजवायचा केलेला प्रयत्न असफल होऊन आज परत कधीही भेटायचे नाही या वळणावर येऊन ठेपलेला हा प्रवास म्हणजे “द ब्रीफ एन्काउंटर” हा सिनेमा. 
डेव्हिडलीनचा हा सिनेमा खूप सरळ आहे पण वास्तवाशी प्रामाणिक आहे. यात निवडलेली स्थळे सुद्धा अनाकर्षक. पावसाने भिजलेले रस्ते, जुना पुराणा कॅफे , कळकट स्टेशन , अंधारी भुयारी मार्ग , लांब सावल्या आणि त्यांना एकमेकांपासून दूर करणाऱ्या गाडीचा वातावरणात विरून जाणारा धूर, हे सर्वच एका अधुऱ्या, असफल प्रेमाचे साक्षीदार आहेत.
जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा यावर बरीच टीका झाली. आयर्लंडमध्ये तर यावर बंदी आणली गेली. खरेतर यात एकही सीन आक्षेपार्ह्य नाही पण दोघामधले वाढते शारीरिक आकर्षण आणि त्याचा ताण दोघांच्याही चेहेऱ्यावर स्पष्ट दिसतो , जाणवतो.
जेवढा त्या दोघांच्यात संवाद आहे , त्याहून कितीतरी तरी शब्द तसेच मनात राहिले आहेत. तरीही त्यांच्या मनाचा वेध घेणे प्रेक्षक सहज करू शकतात कारण जॉन्सन आणि हॉवर्ड चा अभिनय. न आवरता येणारे आकर्षण आणि मनाला टोचणी देणारी जबाबदारीची जाणीव यांच्यातील द्वंद्व दोघांनी ही जिवंत केले आहे.
नीतिमत्तेच्या भिंती ओलांडून दोन माणसे एकमेकांच्या जवळ येणे किती स्वाभाविक असू शकते हे हा सिनेमा दाखवतो पण कुणाचीही पर्वा न करता असे एकत्र येणे हा संवेदनशील माणसांसाठी खरंच सुखी होण्याचा मार्ग असू शकतो का हा विचार करायलाही भाग पाडतो.
Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

आजच्या काळात असे सिनेमे पुन्हा यावेत..खूप गरज आहे.
सोशल मिडियाचा धुमाकूळ बघता बहुतांश घराघरात आज नैतिक अधःपतन होतांना दिसतंय…मैत्री _प्रेम _शारीरिक आकर्षण _अशा टप्प्यांवर अनेक जण कृष्ण, सखा बनायला तर अनेक जणी राधा, सखी बनायला तयार आहेत, होतायत..ही धूसर सीमारेषाच लक्ष्मण रेषा म्हणून ओळखता यायला हवी…एलेक आणि लाॅरा यासाठीच उजवे ठरतात..आपल्या मैत्रिणीचा आत्मसन्मान जपणारा एलॅक, आपल्या संसारात पुन्हा परतणारी लाॅरा..दोघेही खरोखरच एका वळणावर अत्यंत प्रगल्भ निर्णय घेत जे वागतात त्यावर एकच ओळ आठवते.
चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो
खूप खूप छान लिहिलंय दी ❤️
नक्कीच बघते. मलाही पूर्वीच्या black and white सिनेमांचं खूप आकर्षण आहे. हे वाचल्यावर तर अजून उत्सुकता वाढलीय.
मस्तच लिहिलय ❤️👌