Skip to content

रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन 

८५ / ८६ सालची गोष्ट असावी. जवारच्या जवळ शहरातील लोकांना गावाची ओळख करून देण्यासाठी एक रीसोर्ट सुरु झाले होते. फक्त पडवी आणि झोपायची खोली असलेल्या छोट्याश्या कौलारू कॉटेजीस होत्या. जेवायची व्यवस्था सर्वांसाठी कॉमन. उन्हाळ्याचे दिवस. मे महिन्याचा शेवट असेल. बाहेर झोपाळ्यावर बसून झोके घेत असताना वावटळ सुटली. धुळीचा एक छोटासा डोंगर झपाट्याने आकाशाकडे झेपावला. जमिनीवर आरामात सैलावलेला पालापाचोळा दचकून सैरावैरा उडू लागला. क्षणार्धात प्रकाशाचे साम्राज्य जाऊन अंधाराची सत्ता आली. काळ्याकुट्ट ढगातून थेंबाची शिंपण होऊ लागली. आधी एक एक मोठा टप्पोरा थेंब मग त्याची सलग माळ; नंतर त्याचे सरीत रूपांतर झाले. चिंब भिजवून टाकणारी सर, घुसमटवणारी , गुदमरवणारी, नकोसे करणारी, तरीही हवीहवीशी वाटणारी सर. 
कौलाची तडतड, विजांची कडकड, ढगांची गडगड आणि त्या तालावर सुरु झाले पावसाचे नर्तन. नंतर मात्र तो आवेग थंडावला. आता धारेने एक लय पकडली. धारांच्या कुशीत शिरून मी डोळे घट्ट मिटले. 
आमचेच जग होते आता. दोघेच जण. मी आणि तो. त्याच्या प्रेमात चिंब भिजून घेण्याचा हा अनुभव आगळाच.  मग हळूहळू ती मिठी सैल झाली. त्याची परतायची वेळ झाली होती. ढगांनी, विजांनीसुद्धा काढता पाय घेतला. रोमरोम भिजवून टाकणारा तो आता फक्त माझ्या डोळ्यात जाऊन बसला.  

पावसाची ही असंख्य रूपे प्रथमच पाहीली त्या दिवशी. नंतर जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनुभवली. पाऊसगाण्यांच्या शब्दांनी आणि सुरांनी ती समजली.
पावसाबरोबरील या प्रवासाची ही गाणी.

बालपणीचा पाऊसच आगळा. मला पहिला पाऊस नाही आठवत पण त्याचे गीत मात्र आठवत. “नाच रे मोरा, आंब्याच्या बनात. नाच रे मोरा नाच” शहरात राहत असल्याने मोर पक्षी आणि आमराई या दोहोंचे अप्रूप होते. या गोष्टी मुंबईत नव्हत्या.

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी , वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच

यातील सुरुवातीच्या मुखड्यात जरी पाऊस दिसत नसेल तरी पूर्ण गाण्यात पावसाची अनेक रूपे आहेत. ढग आणि वाऱ्याचे झालेले भांडण, म्हातारीने पिंजून काढलेला कापूस, तो सुद्धा पांढरा नाही तर चक्क काळा, तळ्यात भिजायला येणारे सवंगडी आणि पाऊस पडल्यानंतर आकाशात उमटलेले इंद्रधनुष्य.

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
या ओळींवर नाचत गात आणि छत्री बंद करून भिजत आम्ही घरी यायचो. पावसाचे सारे संदर्भ या गीतात आल्याने ही गीत तसे चालते बोलते चित्रगीतच! .
पाऊस मी कसा पहिल्यांदा ओळखला ते मला आठवत नाही पण माझ्या मुलाने जाणलेला स्पष्ट आठवतो. दीड एक वर्षाचा असेल. बाल्कनीत गजाला धरून तो खाली फिरणाऱ्या माऊला पहात होता आणि अचानक अंगावर थेंबांचा शिडकावा पडल्यावर तो म्हणाला , 

“छी छी , शॉवर फुटला. माझ्या डोक्यावर पडला. पाणी फुकट गेले. चल बघ . ” 
शहरातील मुलांच्या टिपीकल शहरी कल्पना. व्यावहारिक.

” घोड़े जैसी चाल, हाथी जैसी दुम ओ सावन राजा ” या गीतातील पावसामुळे त्याला पाऊस भावला. “दिल तो पागल है” या सिनेमातील हे गीत म्हणजे लहान मुलांसाठी रंगवलेला कल्पनेचा खेळ.  

बादल झुके झुके से है, रस्ते रुके रुके से है
क्या ‘तेरी मर्जी है मेघा, घर हमको जाने न देगा
शाहरुख आणि माधुरी वरती हे गीत चित्रित झाले असले तरी रुपेरी पडद्याला पुरून उरतात ती आनंदाने बेहोष होऊन पावसात सचैल स्नान करणारी मुले.
लहान मुलांच्या स्वप्नांना पंख फुटतात या पावसातच. चार भिंतीच्या बाहेर सुंदर आणि सुगंधी जग आहे याची जाणीव करून देणारा हा पाऊस त्यांचा पहिला शिक्षक. त्याचे बोट धरून मुले जगावर विश्वास ठेवायला शिकतात. त्यांना समजते की सर्वच शिंतोडे काही वाईट नसतात आणि असले तरी, बिनधास्त झेलायचे असतात. छत्री न घेता साचलेल्या थारोळ्यात पाणी उडवत चालायला मला अजूनही आवडते. तसेही बाहेर बंदिस्त तर जगतो आपण. नात्यात, रिवाजात, परंपरेत. निदान वर्षातले हे काही क्षण छत्रीच्या परिघाबाहेर जगू दे असे वाटते खरे. पावसाचा निरागसपणा आणि खेळकरपणा त्या क्षणापुरता तरी माझा असतो. 

बालपण सरते. आता स्वप्ने बदलतात. आज कुणीतरी यावे ही अपेक्षा फक्त पावसासाठी नसते तर पावसाबरोबर येणाऱ्या त्या स्वप्नातील राजकुमारासाठी असते. आतासुद्धा भिजायचे असते पण ते संगतीने. हातात हात घालून.
वैशाखातील दुपार भगभगती, रखरखीत, असहनीय, अंगाची  लाहीलाही करणारी. अचानक आकाशातील पिंजून ठेवलेला पांढरा कापूस आपला रंग बदलतो. आता आता पर्यंत निळेशार असलेले आभाळ, घनगर्द ढगांनी झाकोळून जाते. तुफान वारे, उडणारी धूळ , त्या असीम आवेगाला शरण जाणारे वृक्ष, लखलखणारी वीज त्याच्या आगमनाची सूचना देतात आणि त्यांच्या साक्षीने तो कोसळतो. अगदी धुंवाधार वर्षाव करून तापलेल्या धरतीला शांत करतो. एवढा धसमुसळा असूनही तिची काहीच तक्रार नसते.
एवढ्या महिन्याच्या विरहाने उगवलेला असतो न तो, मग त्याच्यात विरघळून ती स्वतःच पाऊस होते.

आज कुणीतरी यावे , ओळखीचे व्हावे
मुंबईचा जावई या सिनेमातील हे गीत. नायिकेचे लग्न ठरते आहे. पन्नाशीचा काळ. पत्रिका जमली, बोलणी झाली की दोघे बोहल्यावर चढायची. त्या आधीचा काळ म्हणजे स्वप्ने रंगवायचा काळ. 

विचारल्याविण हेतू कळवा
त्याचा माझा स्नेह जुळवा
हाती हात धरावे

किती आशादायी आहे हे! जो कुणी आयुष्यात येणार आहे त्याच्या कडून एकच अपेक्षा आहे की मने जुळावी. एकदा का मनाने हुंकार दिला की सोबतीने जग जिंकता येते. प्रेमाचा किती सोपा अर्थ आहे हा !

माझे अकरावीचे पहिले सत्र होते. मुंबईतील एक संस्था गीत गायन आणि कथाकथन यांच्या स्पर्धा आयोजित करायची. बक्षिस दोघांना मिळून असायचे. शालेय जीवनात मी ढाल मिळवली होती. त्या निकषावर अकरावीत निवड झाली. गीतगायनाच्या स्पर्धेत माझे नाव दिले होते आणि कथा-कथनासाठी एक मुलगा होता.
दोघांना मिळालेली, दुसऱ्या नंबरची मिळालेली ट्रॉफी मी माझ्याच हातात ठेवली होती. परत जात असताना एकदम जोराची सर आली. स्टेशनच्या बाहेरच आमचे कॉलेज होते पण त्या एका सरीने पूर्ण भिजवून टाकले. बघता बघता “अंगे भिजली जलधारांनी” पावसात चिंब भिजायचा अनुभव काही पहिलाच नव्हता पण का कोणास ठावूक अगदी अवघडल्यासारखे झाले. बरोबरच्या मुलाची तशी ओळखही नव्हती. नको ते अवघडलेपण मनात आलेच कसे म्हणून आणखीनच चिडचिड झाली माझी. 
“तूच दे ट्रॉफी”मी उगाच डाफरले आणि तिथून काढता पाय घेतला. त्या दिवशी तो मुलगा आहे याची नाही पण मी मुलगी आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. आज इतक्या वर्षांनी त्याचे नाव, चेहेरा काहीच आठवत नाही पण माझा गुलाबी ड्रेस, नेटेड ओढणी आणि स्वतःला  गुंडाळून पळ काढणे मात्र लख्ख आठवते.

महफिल में कैसे कह दे किसीसे, दिल बंध रहा है , किसी अजनबी से
हाय करे अब क्या जतन, सुलग सुलग जाये मन
भीगे आज इस मौसम में, लगे कैसी ये अगन
रिमझिम गिरे सावन ….

मंझील सिनेमातील मौसमी आणि अमिताभची ही पहिली भेट. जेष्ठ महिन्यात अचानक येणाऱ्या पावसासारखीच. तीव्र उन्हाच्या तडाख्याने जीव हैराण झालेला.असतो. आकाशात मळभ भरून आलेले असतेच पण त्याचा तापलेल्या जमिनीला काही थांगपत्ता नसतो. मग अचानक झाडे शहारतात, वेली थरारतात, फुले मोहरतात, पाने लाजतात. पांढर्या रखरखीत असलेया आकाशात वेगळेच रंग उधळले जातात. वार्याची गार झुळूक तापलेल्या मनावर फुंकर घालू लागते. कोणीतरी निमंत्रण पाठवल्यासारखे काळे ढग जमा होऊ लागतात. लख्ख चमकून गेलेली वीज तारुण्याची जाणीव करून देते. ओथंबून आलेल्या ढगातून हळूहळू पाण्याची बरसात होऊ लागते.
मंजिल या सिनेमात नायक आणि नायिकेची भेट, पावसाच्या नाही पण पावसाच्या गाण्याच्या संगतीने होते.

रिमझिम गिरे सावन,सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन

गाडीचा टायर पंक्चर झाल्याने नायिका, टॅक्सीच्या शोधात निघते. भर  दुपारची वेळ. कार्यक्रमाला उशीर होणार म्हणून तिची तगमग आणि त्यात पाठीमागून पावलांचे आवाज. त्यातली घाई तिला जाणवतेय. रस्ता निर्मनुष्य. आता मात्र ती घाबरते. आपला पाठलाग होतो आहे का? हा चोर असेल का? मनात शंकांचे वारूळ. त्याला मात्र  तिच्या  मनातल्या भीतीची  जाणीव सुद्धा नाही. हळूहळू त्याच्या पावलांना वेग येतो आणि  तिलाही मागे टाकून तो पुढे निघून जातो.
आपल्या वेड्या मनाला ती हसते खरी, पण त्या मनात, त्यानेही हलक्या पावलाने प्रवेश केला असतो.
नशिबात असेल तर योगायोग सुद्धा जुळून येतात. ज्या ठिकाणी तिला पोचायचे असते, तिथेच तो सुद्धा आमंत्रित असतो.
सिनेमाच्या सुरुवातीला येणाऱ्या ” रिमझिम गिरे सावन ” या  गाण्यात कुठेच  पाऊस नाही. तिच्या मनात मात्र बरसतो  आणि पावसाचे गीत सादर करणारा, तोसुद्धा अलगद रुतून बसतो.

जब घुंघरुओं सी बजती हैं बूंदे
अरमाँ हमारे पलके न मूंदे,
पावसाच्या थेंबाचे नर्तन धरतीला भिजवत असतानाच, एका अगम्य भावनेने तिला स्पर्श केला आहे.मनाच्या या अस्वस्थतेत झोप कुठे येणार! मग त्याच्या स्वप्नांना तरी प्रवेश कुठे मिळणार! 

कैसे देखे सपने नयन, सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में…
हे गीत गातो आहे नायक पण या गीताची अनुभूती मात्र तिची. शब्द आणि सूर त्याचेच पण त्याचा अर्थ मात्र तिच्यासाठी जिवंत झाला आहे. 
पहिला पाऊस आणि पहिले प्रेम. दोन्हीत जबरदस्त साम्य आहे. न सांगता, कसलीही पूर्वसूचना न देता दोघेही आयुष्यात येतातच वरती चिंब भिजवतात. 
तारुण्याची नुकती चाहूल लागलेल्या मुलीचा सखा असतो तो हा पाऊसच. सगळे छान तर चालू आहे मग ही हुरहूर कसली हा प्रश्न पडला आहे खरा पण त्याचे उत्तर कोणाला विचारणार?
मग येतो मदतीला तो पाऊसच आणि तो त्या स्वप्नांना नुसता आकार नाही तर चेहेरा देतो. 

तुमको पुकारे मेरे मनका पपीहरा
मिठी मिठी अगनी में जले मोर जियरा 
आणि मग घातलेली आर्त साद “ओ सजना “
प्रेमाच्या या राज्यात आताच प्रवेश झाला आहे त्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या झळांची कल्पना नाही आणि सध्यातरी त्या सुसह्य करायला पाऊस आहेच की सोबतीला.

पावसाची मातीत उठलेली आवर्तने, पानांवरून ओघळणारे जलबिंदू , थरथरणार्या जास्वंदीच्या पाकळ्या, कौलावरून घसरणाऱ्या पागोळ्या, आसमंतात दाटून आलेला काळोख, सलिल चौधरीचे संगीत, झंकारलेली सतार आणि साधनाच्या उत्कटतेला स्वर देणारा लताबाईचा आवाज. साधनाबरोबरच खिडकीच्या गजांमधून बाहेर पडताना मी  असंख्य स्वप्ने पाहीली होती या स्वप्नाळू पावसाच्या संगतीने.

तरुण मुलीच्या भावना तशाही प्रियकराला पाहून उचंबळून येतातच पण भिजवणारा पाऊस त्याची तीव्रता मात्र वाढवतो. “ बरसात में हमसे मिले तुम सजन, तुमसे मिले हम बरसात में”  ह्या गीतात आहे, पावसात झालेली पहिली नजरभेट.
जाणाऱ्या सजणाला अडवण्याचे सामर्थ्य या बरसणाऱ्या धारांत आहे हे जाणून आहे ती. म्हणून तर पाऊस नसतानाही ती पावसाची साक्ष काढते. या ऋतूत हिरवीगार धरती, हिरवा शालू पांघरलेली नववधूच वाटते. नायिकासुद्धा स्वप्ने पहाते ती आपल्या विवाहाची. 

प्रीत ने सिंगार किया, मैं बनी दुल्हन
सपनों की रिमझिम में, (मेरा) नाच उठा मन
आज मैं तुम्हारी हुई, तुम मेरे सनम
बरसात में…

हे गीत आहे हर्षाचे, उल्हासाचे, बेधुंद, मुक्त शृंगाराचे. लज्जेचे आवरण त्यागून ती गाते “उनकी जो मैं, उनसे कैसी शरम, बरसात में..” 
प्रेमाच्या राज्यात हळूहळू टाकलेले पाऊल आता स्थिरावते. ओळख पटते. मने जुळतात. शंका मिटतात. भीती जाते. आता आलेला पाऊस आणखीनच जवळ आणतो त्या दोघांना.  

कहो की अपनी प्रीत का गीत न बदलेगा अभी,
तुम भी कहो इस राह का मित न बदलेगा कभी 

मनातली साशंकता आता बोलून दाखवण्याचा मोकळेपणा दोघात आला आहे. तो माझाच असणार आहे का या प्रश्नाचे उत्तर सुद्धा एकमेकांना गवसले आहे. गाभुळलेली रात्र, सुस्तावलेला रस्ता, ओथंबलेले ढग, एक छत्री आणि तिच्या विश्वासावर एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले ते दोघे भविष्याची रंगवत आहेत. …
रातें दसों दिशाओं से कहेंगी अपनी कहानियाँ, प्रीत हमारे प्यार के दोहराएंगी जवानियाँ
मैं न रहूँगी, तुम न रहोगे, फिर भी रहेंगी निशानियाँ

दोघेही कालौघात नाहीसे झाले तरी त्यांचे प्रेम अमर आहे हा विश्वास देणारा हा पाऊस. एवढ्या पिढ्या गेल्या पण पावसाशी हे गाणे बांधले गेले आहे. पावसात भिजायला खूप जणांना नाही आवडत. ते मनातल्या मनात भिजतात . भिजलो एकदाचे म्हणून निश्वास टाकतात. रेनकोट मध्ये लपेटून पावसाला करतात. खरेतर अशा खट्याळ पावसात लहान होतो आपण. शम्मी सुद्धा होतो.  

.प्यार के अलबेले ये हमसफ़र, चल देंगे ले जाएगा दिल जिधर
राह में खो जाएँगे आज तो, मंज़िल कहाँ है हमें क्या ख़बर
दिल तेरा दीवाना है सनम
ढगांच्या गडगडाटाचा जेवढा उपयोग हिंदी सिनेमात झाला आहे तो ढगाला तरी माहित असेल का ढग जाणे.  नायिका मर्यादा सांभाळून सुरक्षित अंतर ठेवणार तेवढ्यात तो धडकतो आणि ती वळते. भिंगरी सारखी भिरभिरून नायकाच्या कुशीत स्वतःला सावरते. निरागस, खट्याळ,  मस्तीखोर वाटणारा हा पाऊस आता मात्र वात्रट होतो. 
ढगांच्या गडगडाटाचे एक वैशिष्ट्य मात्र आहे. त्याचे टायमिंग परफेक्ट आहे. ज्यावेळी न भिजण्याचा निश्चय करून नायिका स्वतःला पावसापासून आणि नायकापासून लांब ठेवण्याचा निश्चय करते, त्याच वेळी तो धडाडधूम आवाज करत बरसतो आणि नायिकेला नायकाच्या सुपूर्द करतो मग मात्र पावसाबरोबर प्रेमालाही उधाण येते..
जर पावसाला प्रेमाची उपमा दिली तर नायक कोण असेल? याचे उत्तर या गीतात आहे. 

भीगी-भीगी रातों में, मीठी-मीठी बातों में, ऐसी बरसातों में, कैसा लगता है
ऐसा लगता है, तुम बनके बादल, मेरे बदन को भीगो के मुझे
छेड़ रहे हो, छेड़ रहे हो
हा असा न लाजणारा, न घाबरणारा बेधुंद पाऊस “मंझील “मधील लताजींच्या आवाजात असणाऱ्या ” रिमझिम गिरे सावन ” या गाण्यात दिसतो. “रिमझिम गिरे सावन” हे गीत मंझिल सिनेमात दोनदा येते. मला किशोरच्या आवाजात जास्त आवडते. पाऊस खट्याळ नसतो त्यात. किशोरचा धीरगंभीर, भारदस्त आवाज एक वेगळीच खोली देतो या गाण्याला. जर खट्याळ पाऊस शोधायचा असेल न तर लताजींच्या आवाजातील हे गीत नुसते ऐकायचे नाही तर पाहायचे सुद्धा. पावसाने चकाचक झालेली बॉम्बे दिसते यात. हो तेव्हा ती “बॉम्बेच” होती.
मरीन लाईन्सचा समुद्र किती वेगळाच दिसतो इथे. तेव्हा “बॉम्बे” मध्ये फार गर्दी नव्हती. माणसांची आणि गाड्यांचीही. १९७९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आहे. त्यामुळे आता अदृश्य झालेली  पिवळी-काळी परिचयाची फियाट टॅक्सीसुद्धा भुरकन नजरेसमोरून जाते.  

तेव्हा किती तरी भिजलेले दिवस क्षणार्धात नजरेसमोर जातात. हे गीत पाहणे म्हणजे भूतकाळातल्या सगळ्या स्मृतींना उजाळा देणे. गीताच्या मध्यावर रस्त्याच्या मधून पाणी उडवत जाणारी लाल बेस्ट “बस “आणि ते पाणी चुकवत आपली वाट धरणारे, चिंब भिजलेले अमिताभ आणि मौसमी. त्याचे लांब ढेंगा टाकत स्वतःच्या चालीने पुढे जाणे आणि तिचे त्याच्या मागे खेचले जाणे सुद्धा सहज. मात्र तिचा हात आहे त्याच्या हातात. अगदी घट्ट. 

पहले भी युं तो बरसे थे बादल
पहले भी युं तो भीगा था आंचल
अबके बरस क्यो सजन , सुलग सुलग जाये मन?
तिला या प्रश्नाचे उत्तर माहित आहे तरीही पावसासारखाच खट्याळ प्रश्न येतोच तिच्या मनात. 

ऑफिसची वेळ असावी. त्यामुळे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ च्या रुटीन मध्ये बांधल्या गेलेल्या असंख्य छत्र्या दिसतात आणि प्रेमात असल्यामुळे वेळेचे भान नसलेले ते दोघे मात्र असतात छत्रीशिवाय. अंगावर पाऊस झेलत एकमेकांशी बोलणे, एकमेकांना काहीतरी नवीन दाखवणे, उगाच हसणे, पाणी उडवणे आणि दमल्यावर एकमेकांच्या कुशीत ओलेत्या बाकड्यावर बसणे; हे सुद्धा अगदी सहज घडते. वयाने वाढलेली पण मनाने लहानच, फक्त पावसाचा आनंद घेणारी अशी दिसतात ती दोघे.

पावसाचा ओघ संपून गेल्यावर पडत राहणाऱ्या संततधारेचे गाणे मला खूप आवडते.
एका लयीत. शांत. पाऊस तरी द्रुतलयी नंतर विलंबित गातो. संथ आलापी. मन आणि शरीर दोन्ही थकलेले तरीही गात्रागात्रात तृती भरून राहते. पावसात भिजणेच नाही तर अगदी घरात बसून खिडकीशी उभी राहून बाहेरील पाऊस अनुभवणे ह्यातली मजा वेगळीच. खरेतर बाल्कनीत बसून मस्त गरम वाफाळणारी कॉफी घेत नुसते शेजारी बसून रहाण्यातही रोमान्स दडला आहे.
पावसाळ्यातला आषाढ दिवस, हवेच्या झोताबरोबर तरंगून जाणारे ढग, नुकत्याच घेतलेल्या कॉफीची उब, ओले मन आणि ते जिच्यात गुंतले आहे अशी प्रिय व्यक्ती बरोबर. रोमान्स प्रेक्षणीय असण्यापेक्षा अनुभवायचा असतो. ओल्या शरीराला चिकटलेल्या नजरा म्हणजे थोडाच रोमान्स असतो? पाऊस अंगावर कोसळला नाही तरी चालेल पण मनात झिरपावा लागतो. शरीर भिजले नाही तरी चालेल पण ओलावा मनात जाणवावा लागतो. मनाबरोबर डोळेही भिजवून टाकणारा पाऊस मला आवडतो कारण असा चिंब करणारा पाऊस फक्त त्या दोघांसाठी असतो. 

अनुभव सिनेमात गीता दत्त ह्यांच्या आवाजात एक अप्रतिम गीत आहे. ” मुझे जा न कहो मेरी जान ” नायिका म्हणते, “मला आयुष्याची उपमा नको देवूस तू कारण जीवनाला ही अंत आहे”बर्याच दिवसांनी दोघांनी एकत्र जागवलेली रात्र. तनामनावर पसरलेली तृप्तीची धुंदी आणि त्या मिलनाला आशीर्वाद देणारा पाऊस. घराच्या चार भिंतीआड खिडकीकडे एका श्वासाच्या अंतरावर उभी असलेली ती दोघे. इथे सगळ्या संवेदना जागृत असतात . तुमच्या भावना, स्वप्ने न सांगताच चेहेऱ्यावर  दिसत असतात. 

होंठ झुके जब होठोपर,
सांस उलझी है सांसो में
दो जुडवा होठो की बात कहो आखो से

आता ओठातून शब्द कशाला यायला हवे. डोळेच बोलताहेत की.

प्रेमात असताना असा हवाहवासा वाटणारा पाऊस विरहात मात्र अगदी नकोसा होतो. वाऱ्याच्या  झोताने झाडेच नाही तर तुमचे मनही घुसळून निघते. तापलेल्या धरतीलाच नवजीवन मिळत नाही तर कुठेतरी लपून बसलेल्या त्या आठवणीना जाग येते. 

घर आजा घिर आये, बदरा साँवरीया
मोरा जिया धक धक रे, चमके बिजुरिया

“छोटे नबाब “या सिनेमातील हे गीत. राहूल देव बर्मन यांनी या गीताबरोबर चित्रपटक्षेत्रात संगीत- दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. वेस्टर्न धूनचा बादशहा ही त्यांची ओळख होण्यापूर्वीची ही धून. बागेश्री आणि रागेश्री यांचे मिश्रण असलेल्या राग मालगुंजीवर आधारीत हे गीत आहे. हे गीत मुजऱ्यासाठी जरी वापरले गेले तरी मुजऱ्याचा बाजारूपणा या गीतात नाही. हे गीत कोठ्यावर गाणारी स्त्री गात असली तरीही त्यात पत्नीची मनस्थिती वर्णिलेली आहे. ओठ आहेत कलावंतीणीचे तर कैफियत मात्र नायकाच्या पत्नीची. 

सूना सूना घर मोहें डसने को आये रे,
खिडकी पे बैठी बैठी सारी रैन जाये रे

परदेशी असलेल्या नायकाच्या भेटीकडे डोळे लावून बसलेली त्याची पत्नी त्याच्या काळजीने व्याकुळ झाली आहे.  तो कुठे गेला आहे याची खबर तिला नाही. रात्र तर त्याची वाट पाहण्यातच संपून गेली आहे. त्यात हा धुंवाधार पाऊस, विजेचा कल्लोळ, गरजणारे ढग तिच्या मनाचा थरकाप उडून देत आहेत. आर डी बर्मन यांचे हे पहिले गीत पण अत्यंत ताकदीचे सूर त्यांनी लताजींच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोचवले.

विरह तीव्र करणारा हा पाऊस सुमन कल्याणपूर यांच्या एका सुरेल गीतांत दिसतो .

रिमझीम झरती श्रावण धारा
धरतीच्या कलशात
प्रिया वीण उदास वाटे रात

परदेशात गेलेल्या तिच्या सजणाची येण्याची वेळ झालेली आहे. बाहेर पडणाऱ्या पाऊस धारा, मिट्ट काळोख, सजलेला महाल, मिळालेला एकांत या साऱ्याला फक्त त्याची आस आहे.

बरस बरस तू मेघ रिमझीम
आज यायचे माझे प्रियतम
आतुरलेले लोचन माझे
बघती अंधारात .

कालाबाजार सिनेमातले “रिमझिम के तराने लेके आई बरसात” हे गाणेही अशा नकोशा आठवणींना जागवणारे.  कधीकाळी प्रेमात असलेले पण आता दुरावलेले ते दोघे. पाऊस आताही कोसळतो आहे. बाहेर आणि मनात.  दाबल्या गेलेल्या आठवणी अचानक वरती आल्या आहेत. टॅक्सी न मिळाल्याने एका छत्रीतून जावे लागते खरे पण रस्ते वेगळे आहेत याची तीव्र खंत ठेवून.  

भीगे तन-मन, पड़े रस की फुहार,
प्यार का संदेसा लाई बरखा बहार
मैं ना बोलूँ, आँखें करें अँखियों से बात 

अंतर तर पडले आहे पण कधीतरी खूप जवळ असल्याची आठवण इतकी तीव्र आहे की ते कधीही पुसले जावू शकते पण मान्य कोणी करायचे. अशावेळी हा पाऊस येतो मदतीला. डोळ्यात जमा झालेले पाणी हळूच हलक्या हाताने पुसून टाकून नजर निरभ्र करायला.

जब मिलते हो तुम क्यूँ छिड़ते हैं दिल के तार
मिलने को तुमसे मैं क्यूँ था बेक़रार
पाऊस मनातली गोष्ट ओठावर आणतो आणि त्या प्रेमी जीवांना एकत्र आणतो.

पाऊस चार महिनेच राहतो आणि काही जणांसाठी स्वताची आठवण ठेवून निघूनही जातो. तो जातो पण रिते करूनच आणि ती अपूर्णता घेवून उरलेला प्रवास चालावा लागतो. वरील गाण्यात पावसाच्या साक्षीनेच कबूली दिली जाते “सपनोंका साथी चल रहा है मेरे साथ” पण कधीतरी ते बोलायची संधीही मिळत नाही. निरोप घेणाऱ्या पावसासारखाच तो ही हृदयावर ठसे ठेवून निघून जातो. पाऊस तरी नेमेचि येणारा असतो. इथे राहतात त्या फक्त आठवणी. पापण्यात विसावलेल्या . आयुष्यभर पुरणाऱ्या. आपल्या हातात असते ते फक्त या आठवणी जागवणे. 
कवी नीरज किती सुंदर लिहून गेले आहेत!

पंछी पगले कहा घर तेरा रे , भूल न जइयो अपना बसेरा रे
कोयल भूल गयी जो घर , वो लौट के फिर न आयी रे
ये नीर कहांसे बरसे , है ये बदरी कहांसे आई है .












5 thoughts on “रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन ”

  1. Vidula Sahasrabudhe

    प्रिया,
    बरीचशी काळया पांढऱ्या सिनेमातली गाणी निवडली आहेस.
    सगळीच एकापेक्षा एक सरस.❤️❤️

    नुसत्या पावसावर लिहिलंस तर अगणित गाणी मिळतील.
    गाण्यांच्या वर्षावातून तूला गाणी निवडणं कठीण झालं असणार.

    पावसाळा आत्ता सुरु झाला आहे.
    अजून लिही .सिरीज होऊ दे.
    तुझ्या शैलीत वाचायला मजा येते.

  2. Kamini Sunil Amrutkar

    अत्यंत सुंदर लिहिलंय
    अक्षरांच्या चिंब सरींनी पाऊस मनात रुजला ❤️🔥
    अगदी अगदी माहौल बन गया और हवा का रुख रुमानी हो गया ☘️☘️🌨🌧👌👌

  3. Savita Dhananjay Deshpande

    किती सुंदर ❤️❤️❤️❤️ मला रिमझिम गिरे किशोर च जास्त आवडत. सगळी गाणी आणि त्यावरच लेखन सुरेखच

    1. ऑल टाइम लाडके आहे ते गाणे ..
      मला त्यातली मुंबई फार आवडते .
      Thank you Savita.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *