Skip to content

कि जैसे मंदिर में लौ दिए की.

हेमंतकुमार मुखोपाध्याय
———————–
“MRI करून घ्या .कदाचित कॅन्सर असू शकेल .”
डॉक्टरांसाठी एक पेशंट पण त्यावेळी मी फक्त सत्तावीस वर्षाची होते आणि अमरजीत तीन वर्षाचा. कितीही मनाला समजावले तरी आपण निरवानिरव नाही करू शकत त्या वयात.
संध्याकाळची वेळ होती. वेटिंग रूम मधील जवळजवळ सर्वच पेशंट कर्करोगग्रस्त.  आत गेले खरे पण MRI चे मशीन म्हणजे मला माझीच शवपेटी वाटली. एकदम धस्स झाले. तीस एक वर्षांपूर्वी हे नवीन. 
अजिबात हालचाल करायचे नाही असे सांगून आत पाठवले. अंग अवघडल्यासारखे. मी घट्ट डोळे मिटून घेतले. काही मिनिटात दार  उघडले. 
“अहो तुम्ही हलला कशाला ? रीडिंग येत नाही आहे ” पांढरा कोट डाफरला . 
“पट्ट्याने बांधली आहे मला, हलणार कशी ?”
“ मग काय करत होतात ? आवाज ही नाही करायचा”
“ मनातल्या मनात सुद्धा नाही ?” माझा ओशाळलेला प्रश्न . 
“मनावर ताण म्ह्णून थोडी गुणगुणत होते”
  मशीन मध्ये नाही तर बाईच्या डोक्यात बिघाड आहे हे जाणून त्यांनी सुस्कारा सोडला . 
” नाही. अज्जिबात गुणगुण सुद्धा नको.  आत्ता संपेल ” 
वेळ कसा गेला देव जाणे पण जेव्हा दार उघडले तेव्हा तो हसऱ्या  चेहेर्याने म्हणाला “काही वाटत नाही , बाकी डॉक्टर सांगतील ”  थोडे थांबून म्हणाला , “एक विचारू ? एवढे घाबरले असताना कोणते गाणे गुणगुणत होता तुम्ही ?”
मी उत्तर दिले नाही.
खरेतर लता किंवा किशोरीताईंचा आवाज सोबतीला घेवून निरोप घ्यायला  आवडेल मला पण तेव्हा अगदी हताश, निराश अवस्थेत मनात रेंगाळलेले गाणे होते … 

छूपा लो यूँ दिल में प्यार मेरा ,  के जैसे मंदिर में लौ दिए की
त्या  घाबरलेल्या मनस्थितीत अशा एका आवाजाची गरज होती की ज्याच्या सोबतीची खात्री आहे.

हेमंतकुमार मुखोपाध्याय यांच्या आवाजात तो विश्वास आहे. त्या स्वरात ती सच्चाई आहे. काळोख्या बंद पेटीत नजरेसमोर पूर्ण अंधार असताना हे गीत त्यातील विश्वासाची भावना मला आधार देत होती हे निश्चित.
आवडते गायक विचारले तर पहिल्या पाचात मी हेमंत कुमार म्हणेन असे नाही सांगता येत तरीही माझ्या पहिल्या दहा आवडीच्या गाण्यात त्यांची दोन गीते आहेतच .  पुकार लो आणि ये नयन डरे डरे. 

हेमंत कुमार यांचा जन्म १६ जून १९२० मध्ये वाराणशी येथे झाला. त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी कोलकाताकडे प्रयाण केले आणि इथेच संगीताच्या जगाशी त्यांची ओळख झाली. वयाच्या पंधराव्या वर्षी, त्यांना तेव्हाच्या इंडियन ब्रॉडकास्टींग कार्पोरेशन, (आताचा ऑल इंडिया रेडिओ) साठी गायची संधी मिळाली. ते काही काळासाठी सेलेब्रिटी झाले पण संगीतक्षेत्र कारकीर्द म्हणून स्विकारणे काही शक्य नव्हते. इंटरसायन्स नंतर त्यांनी इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला पण नियतीच्या मनात काही वेगळे होते. प्रकृतीच्या कारणासाठी त्यांनी इंजिनीयरिन्ग सोडले आणि ते आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळले.  बंगाली फिल्म इंडस्ट्री मध्ये त्यांचे नाव होत असतानाच , पन्नाशीच्या दशकात आनंदमठ या सिनेमाचे संगीतदिग्दर्शन करायची त्यांना संधी मिळाली. १९५४ मध्ये प्रदर्शित झालेल्या “नागीन”ने संगीतकार म्हणून त्यांना मुंबईत प्रस्थपित केले.

“हेमंत दा की आवाज में शाम की गंगा के लहारोंकी खामोशी है “  हे जे शकीलाचे उद्गार आहेत तो गंगा नदीचा आशीर्वाद असेल.
त्यांच्या आवाजात शांत करण्याचे सामर्थ्य आहे.
प्ले बॅक देणाऱ्या गायकाचा आवाज  आणि माईक यात जवळीक आवश्यक आहे. माईक मधून येणारा आवाज कसलीही भेसळ न होता आहे तसाच ऐकायला येणे सर्व गायकांच्या बाबतीत जमून येत नाही. अशावेळी स्वतःचा नैसर्गिक आवाजच रेकॉर्ड होण्यासाठी माइकपासूनच्या अंतराचा अंदाज असणे आवश्यक असते. माईकशी जुळवून घेणे  सर्व आवाजांच्या बाबतीत शक्य नसते. त्यावेळी तर  रेकॉर्डिंग करण्याचे तंत्रज्ञान पुढारलेले नव्हते. 
हेमंत दा यांच्या आवाजाला माईकने सामावून घेतले. त्यांच्या आवाजात असलेली नैसर्गिक हॉन्टिंग quality, त्यांचे बलस्थान बनली.
हा आवाज संताचा आवाज  आहे असे लता बाई हेमंत कुमार यांच्या आवाजाबद्दल म्हणाल्या होत्या. हा आवाज एका सभ्य आणि सज्जन माणसाचा आवाज आहे. अभिजात, सुसंस्कृत माणसाचा आवाज आहे.
त्यात बंगाल च्या मिठाईची गोडी आहे.
जेव्हा त्यांचे सूर कानी पडतात तेव्हा ते अंगात भिनत जातात. त्यांच्या आवाजात सच्चाई आहेच आणि ती पेलवण्याची शक्ती.त्यांची गाणी गलका करत नाही, गिल्ला करत नाहीत, they have a calming effect .
वेदनेलाही सुखदायक बनवण्याचे सामर्थ्य त्या आवाजात आहे.
त्यांची कारकीर्द संगीतकार आणि गायक म्हणून गाजली. गायक म्हणून अनेक संगीतकारांकडे त्यांनी गाणी गायली. त्यातले अतिशय आवडते गीत,

१) छूपा लो यूँ दिल में प्यार मेरा ,  के जैसे मंदिर में लौ दिए की
( सिनेमा-ममता, संगीतकार-रोशन, गीतकार -मजरूह सुलतानपुरी सह गायिका- लता मंगेशकर)

एका चांगल्या घरातली ती आता कोठ्यावर आली आहे. आता इथून परतणे शक्य नाही. खरेतर आता जगण्यासारखे काही राहिलेच नाही . एक तंतू आहे फक्त, अगदी चिवट, तो म्हणजे तिची मुलगी.
तिच्यात मन गुंतलेले आहे.  तिला विश्वासाने ज्याच्या हातात सोपवली तो एकेकाळी तिचे सर्वस्व होता .  सगळी कडून नागवले जात असताना सुद्धा ज्याच्या हातात तिने आपला काळजाचा तुकडा दिला त्या हातावरील विश्वास केवढा मोठा असेल ?
प्रेमाचा इजहार करणे शक्य नाही.तिच्या आयुष्याची सावलीही त्याच्या प्रतिष्ठेवर पडलेली तिला सहन नाही होणार ! 
हे  प्रेम काहीही मागत नाहीच. मंदिरातल्या दिव्यासारखे जळणे त्याला  मंजूर आहे .
पडद्यावर हे गीत कोणीही गात नाही. ते पार्श्वभूमीला वाजते. मनातल्या भावना आहेत त्या. ओठावर आणणे शक्य नाही.

ये सच है जीना, था पाप तुम बिन
ये पाप मैंने किया है अब तक
मगर थी मन में छबी तुम्हारी
के जैसे मंदिर…

तिच्याशिवाय जगणे हे पाप आहे हे मान्य आहे त्याला. समाजाच्या नजरेतून तीच पाप असेल तरीही. तिच्याबद्दल अनेक गोष्टी कानावर येऊनही, तिचे स्थान कुणालाही त्याच्याकडून दिलेले नाही, आणि आता तिच्या मुलीची घेतलेली जबाबदारी!
प्रेम काहीही मागत नाही. त्याला फक्त  देणे ठाऊक असते.
शरीराची पातळी ओलांडून गेलेले हे प्रेम.
हेमंतकुमार यांच्या आवाजात ह्या प्रेमाची सभ्यता आहे, मृदुता आहे, दैवत्व आहे.
रवींद्र संगीताचे माधुर्य असलेल्या ह्या आवाजात जेव्हा लता बाईंचा आवाज मिसळतो, तेव्हा जो परिणाम असतो तो जादुई असतो.
मला स्वतःला लता -तलत नंतर लता – हेमंत कुमार  यांची गाणी अतिशय आवडतात.  

२) आ नीले गगन तले प्यार हम करें,हिल मिल के प्यार का इक़रार हम करें
( सिनेमा -बादशाह , संगीतकार – शंकर जयकिशन- गीतकार हसरत जयपुरी, सह गायिका- लता मंगेशकर)

प्रेम झपाटते, अगदी नॉर्मल, व्यवहारी माणसे सुद्धा  प्रेमात पडली तर भारली जातात. खुल्लम खुल्ला ची संकल्पना नंतरची. ते जगाला आव्हान आहे.
हे आव्हान नाही कारण जगाचे भानच मुळी त्या दोघांना नाही.

आ नीले गगन तले प्यार हम करें
हिल मिल के प्यार का इक़रार हम करें

गाणे सुरु करते लता. आ या शब्दातली साद किती गोड़ आहे. गावाबाहेरील एकांत, उतरत गेलेली सांज, आकाशाच्या पटलावर गढत होत गेलेला निळा रंग, फुलून आलेला निसर्ग आणि तिने मारलेली हाक “ ये”

नीले आणि करें या शब्दांतील “नी” आणि “रे “ थोडासाच रेंगाळतो पण त्यातली मादकता, सलज्जता सुरात साकाळून येते. हेमंत कुमार दुसऱ्या कडव्यात येतात.

दो जां हैं हम ऐसे मिले एक ही हो जाएं
ढूँढा करे दुनिया हमें हम प्यार में खो जाएं
बेचैन बहारों को गुलज़ार हम करें
लताच्या आवाजातील थरथरणे आणि हेमंत कुमार यांच्या यांच्या आवाजातील स्थिरता अतिशय  पूरक आहे इथे.. या आवाजात संयम आहे, गांभीर्य आहे , one can understand, this is the voice of a no nonsense man.

3) याद किया दिल ने कहाँ हो तुम
( सिनेमा-पतिता, संगीतकार -शंकर जयकिशन–गीतकार- हसरत जयपुरी, सह गायिका- लता मंगेशकर)

“पतिता” ही  एका बलात्कारित मुलीची, राधेची  गोष्ट. धनदांडग्यांच्या जगात गरीब मुलीच्या अब्रूला मान नसतो. घराचे भाडे देता येत नाही म्हणून पैसे मागायला गेलेल्या राधेवर बलात्कार होतो. त्यातून ती गरोदर राहते. तिला मूल होते. आपल्या मुलाला कष्ट करून वाढवत असतानाच, या मुलीची भेट  निर्मल नावाच्या सुशिक्षित, कनवाळू तरुणाशी होते.  झालेल्या दुर्दैवी घटनेत तिची काहीही चूक नाही हे  जाणून निर्मल तिला लग्नाची मागणी घालतो.
लग्न झाल्या नंतरचे हे गीत.

तुम तो मेरे ज़िंदगी के बाग़ हो
तुम तो मेरी राह के चिराग़ हो
मेरे लिये आसमाँ हो तुम
याद किया दिल ने…

गाण्याची सुरुवात होते हेमंतकुमार यांच्या आवाजात. 
गाण्याची पार्श्वभूमी माहित नव्हती  तेव्हा मला  हे चित्रीकरण पाहून मजा वाटायची. दोघेही जेमतेम एक फूट अंतरावर आणि आठवण कसली काढतात!  नाही म्हणजे प्रेम खरंच आंधळे करते की काय !
पण तसे नाही .
एक गैरसमज दोघांना लांब ठेवतो आणि आता हे सगळे मिटले आहे .तिच्या आयुष्यातली रात्र आता संपली आहे. त्याचे सर्व श्रेय त्यालाच. तिच्या मुलासकट त्याने तिचा स्वीकार केला आहे.
त्यातही कुठेही उपकार केल्याचा आव नाही .

तुम तो मेरी ज़िंदगी के बाग़ हो…हे किती सहज म्हंटले आहे.
नवल नाही की प्रेमाने आणि त्याही पेक्षा कृतज्ञतेने, उषा किरण  लताच्या आवाजात म्हणते ,

“मेरे लिये आसमाँ हो तुम”
आभाळाएवढे मन आहेच त्याचे. त्या शुद्ध मनाचे प्रतिबिंब हेमंत कुमार यांच्या आवाजात आहे …
देव साठी इथे, या पात्रासाठी  रफी किंवा किशोर पेक्षाही हा आवाज खरा वाटतो.

देव आनंद आणि हेमंत कुमार हे थोडेसे मिसफिट वाटणारे समीकरण अनेक सिनेमात, त्याने रंगवलेल्या अनेक पात्रांसाठी वापरले गेले .
एस डी बर्मन हे संगीतकार आणि नवकेतनह्या संस्थेचा निर्माता देव आनंद किंवा गुरुदत्त, जो देव चा जिगरी मित्र ह्यांनी आपल्या सिनेमात आणि गीतांत देव आनंद साठी हेमंत कुमार यांच्या आवाजाचा उपयोग करून घेतला आहे.
देवने,  हेमंतदा यांच्या आवाजाला आक्षेप का घेतला नसावा या प्रश्नाचे उत्तर “ये रात ये चान्दनी फिर कहाँ “ या गीतात मिळते.
४ ) ये रात ये चाँदनी फिर कहाँ
(सिनेमा-जाल, संगीतकार-एस डी बर्मन, गीतकार-साहिर लुधियानवी )

दोन देखणी माणसे, निर्मनुष्य किनारा, आसमंतावर पसरलेली काळोखी रात्र, आणि भरून आलेले वादळ. एकमेकांचा निकट सहवास अपुरा  पडेल की काय  असे वाटल्याने देवच्या हातात गिटार दिली. ती त्याने त्याच्याच स्टाईलने वाजवली हे असोच .
तो असताना कोण त्याच्या हातातल्या गिटारकडे तसेही पाहणार आहे!
पण दिग्दर्शकाला काहीतरी भलतंच घडवायचे आहे म्हणून हेमंत कुमार यांनाही बोलावले.
गातो आहे देव पण कॅमेरा गीताबाली च्या चेहेऱ्यावर रेंगाळतो.
तिच्या सद्विवेकबुद्धीशी चाललेला झगडा चेहेराच्या प्रत्येक रेषेत दिसतो.
हे सगळे इथेच विसरून जायचे का ! तो नाही आहे चांगला ,
तिला माहित आहे पण मग हृदयाचे काय ! त्याचा आवाज कसा बंद करायचा !

इस हसीन आग में तू भी जलके देखले
ज़िंदगी के गीत की धुन बदल के देखले
खुलने दे अब धड़कनों की ज़ुबाँ, सुन जा…
तो तर काहीही सोपे करत नाही आहे तिच्यासाठी ,

बाहेरचे वादळ, तिच्या मनातील वादळापेक्षा कमीच असेल.बाहेरील जाईल शमून पण .मनाचे जात नाही , त्यात स्वतःची आहुती द्यावी लागते.
अख्खा पडदा तिच्या भावनिक आंदोलनात चिंब भिजतो.
शरीराची जाणीव होणे, स्त्रीत्वाची जाणीव होणे, कुठेही अश्लील न होता, एवढे देखणे दिसते!
गीताचे सूर सिनेमात ल्या दृश्याना बोलके करतात हे खरेच.
देव चा  टोनी , मारियाला भारून  टाकतोय. 
तिला  माहित  आहे  पण  त्याचा  एकेक स्वर, एकेक शब्द तिच्या आभासी बेड्या तोडून टाकतो आहे. आता थांबेल ती ? इव्ह तरी थांबली होती..Here eroticism is at it’s steamy  best .

बाहेरचे वादळ एका नवीन वादळाला जन्म  देऊन शांत झाले  आहे.
हेमंतदा चा थोडासा  अनुनासिक आवाज , आणि देवचे  काहीसे झाकोळलेले  व्यक्तिमत्व इथे  एवढे फिट्ट झाले की शंकर जयकिशनने नंतर पतिता साठी  हेमंत कुमार यांचा आवाज वापरला. 
आता हा लेख हेमंत–देव असे वळण घेतो आहे पण माझा इलाज नाही. हाऊस नंबर 44 मध्ये अजून एक  अप्रतिम गीत आहे ,

५ ) ‘तेरी दुनिया में जीने से तो बेहतर है कि मर जाएं
(सिनेमा-House no  44, संगीतकार- एस डी, गीतकार – साहिर )

लताचे सुरुवातीचे सूर, नायकाला कवी बनवतात.तसेही प्रेम म्हणजे न आकलणारी कविता असते. आपल्याला  पाहिजे तसा  अर्थ लावून  मोकळे व्हायचे.
शब्द थोडेसे निराशाजनक आहे पण  नायक नाही. मधले पिसेस ऐकले तर लक्षात येते, की निराशा सुद्धा देवने आपल्या अंदाजात पचवली आहे.

अरे ओ आसमाँ वाले बता इसमें बुरा क्या है
खुशी के चार झोंके गर, इधर से भी, गुज़र जाएं
तेरी दुनिया में…

जग असते तसच असते, ते त्यांच्या अंदाजाने बदलते. कधीतरी नआवडणाऱ्या घटना स्विकारणे हाच एक पर्याय असतो.
पॉज म्हणता येईल… क्षणभर विश्रांती आणि नंतर मिळतो सुद्धा मार्ग..
शब्द थोडेसे उपहासात्मक आहेच. साहिर स्पेशल टच पण देव- हेमंत कॉम्बो नी  त्याच्याकडे सुद्धा काहीसे गमतीने पाहीले आहे.. Most of the time, life gets amusing … Isn’t it ?

पुरुषाच्या व्यक्तिमत्वाचा कोणता विशेष स्त्रीला लुभावत असेल ! मला पुरुष हा शब्द आला की लहान बाळाला सहज आपल्या खांद्यावर टाकून जोजवणारा रेमंडच्या जाहिरातीतील मॉडेल आठवतो.
भरभक्कम आधार  आणि  विश्वास .

तुझा हात  माझ्या हातात  असावा ह्या पलीकडे काय हवे असते!  सगळे मिळवण्याची क्षमता तर ती जन्मतः घेऊन येते.
पुरुषी आवाजातील अंगाई ही खूप कठीण आहे .. त्या आवाजात कुठेही मिसळ नको , त्या स्वरात सामर्थ्य हवे , गोडी हवी , आधार हवा आणि विश्वास …
सैगल च्या सोजा राजकुमारी नंतर मला आवडते ते “ चंदन सा पलना “

६) चन्दन का पलना, रेशम की डोरी
सिनेमा-शबाब, संगीतकार-नौशाद, गीतकार-शकील  बदायुनी)

सो जा तू ऐसे मोरी सजनिया
सजिया पे सोये जैसे दुल्हनिया
चन्दा का टीका माथे लगाऊँ
तारों की माला तुझको पिहनाऊँ
तोहे सुलाऊँ गा गा के लोरी

चंद्र ताऱ्यांच्या स्वर्गीय जगात नेणाऱ्या या स्वर्गीय गीताला आवाज सुद्धा  अस्पर्श,  निष्कलंक हवा.
बाबा हा शब्द कोणत्याही नात्यात बाजी मारून  जातो.

हेमंत कुमार गायक तर होतेच पण संगीतकार म्हणून सुद्धा त्यांची कारकीर्द मोलाची आहे. पुढची गाणी त्यांच्या आवाजात तर आहेच पण या गीतांचे संगीत दिग्दर्शन सुद्धा त्यांचेच आहे.

७) न ये चाँद होगा, न तारे रहेंगे (सिनेमा -शर्त, संगीतकार-हेमंत कुमार–गीतकार-एस.एच.बिहारी)

Is there anything permanent or eternal in today’s ever changing world where even relationships come with an expiry date?….
Today’s generation always equates love with attraction,affection ,and crush but  when the beauty,charm, youth fade, love evaporates…….
बॉलीवूड मात्र जन्मो जन्मीच्या प्रेमावर विश्वास ठेवते .मोठी मोठी वचने देणे राजकारण्यांनाच नाही तर नट नट्यांना सुद्धा सहज जमतात .त्याचे प्रतिबिंब गाण्यात ही दिसते .  
They claim that their love is eternal and it spans across many births, not just the present birth. पण इथे तर प्रेमाला जन्माचा सुद्धा अडसर नाही . काळाच्या पलीकडे गेलेले आणि टिकलेले हे वचन . हे गाणे पडद्यावर बघणे म्हणजे डोळ्यावर अत्याचार पण मला ह्याचे शब्द अतिशय आवडतात .

जमाना अगर कुछ कहे भी तो क्या
मगर तुम ना कहना हमें बेवफा
तुम्हारे लिये हैं, तुम्हारे रहेंगे

पी बी शेलीने म्हंटले आहे,”  When soft voices die, vibrates in the memory”
“तुम्हारे रहेंगे “ हा त्याचाच तर प्रतिध्वनी आहे ..

आवाज त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व  सांगतो. सिनेमाच्या बाबतीत  बोलायचे तर, जे पात्र आहे त्याची स्वभाव वैशीष्ठ गीताच्या शब्दात, आणि सुरात यायला हवी. काही मोजके गायक, गायिका आहेत ज्यांनी हे आव्हान पेलले. लता बाई, आशा ताई, एकाच वेळी खलनायिका ,नायिक, मैत्रीण , आई अशा अनेक पात्रांसाठी गायच्या…
त्या वयाच्या , नात्याच्या सर्व भावना त्यांच्या आवाजात आणायच्या.
रफीने शम्मी ते जॉनी वॉकर या सर्वांसाठी गाणी गायली. …
खरेतर काय साम्य आहे दोघांत, त्यांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखेत !
पण ती गाणी फिट्ट बसली.
हेमंत कुमार यांच्या आवाजाला मात्र मर्यादा आहे.
हेमंत कुमार यांच्या आवाजात दुःखात कमालीची साथ करणारा आवाजातील कंप आहे,
विश्वास आहे, समजूतदारपण  आहे,  आश्वासन आहे, प्रगल्भता  आहे आणि क्वचित आढळणारा खट्याळपणा ही. तरीही त्या खट्याळपणात सुद्धा मर्यादा ओलांडली जात नाही .

८) एक बार ज़रा फिर कह दो, मुझे शर्मा के तुम दीवाना
(सिनेमा-बिन बादल बरसात, संगीतकार –हेमंत कुमार, गीतकार –शकील बदायुनी)

विश्वजीत बंगाली.  हेमंत कुमार यांच्या आवाजात बंगाली रसगुल्ल्याचा स्वाद होताच. विश्वजीत साठी जरा जास्तच साखर घालून ते  गायले आहेत.
मुझे शर्मा के तुम दीवाना , म्हणताना आवाज खूप गोड़ अगदी शंका वाटेल एवढा गोड होतो.
त्यातली कुठंही आगाऊ न होणारी, तिला अवघड न करणारी,  खट्याळपणाची झाक केवढी छान  आहे.  छेडछाडीच्या या गीतात सुद्धा आवाज संयमी असणे ह्यासाठी मूलभूत संयम आणि संस्कारित मन  तुमच्यात असावे  लागतो.

ऐसी मीठी-मीठी बाते करके
कहाँ सीखा हैं दिल का लुभाना
ओ जानेजा
एक बार ज़रा फिर कह दो
मुझे शर्माके तुम दीवाना

हे गाणे तसे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात  आहे.. पण “कहाँ सीखा हैं दिल का लुभाना” या प्रश्नाला बगल देऊन, जेव्हा हेमंत दा, ओ  जानेजा , म्हणत प्रश्नांची गाडी भलतीकडे वळवतात ते एवढे मजेशीर आहे.
चांगला, सज्जन पुरुष सुद्धा प्रसंगी कसा डांबिस असतो , होऊ शकतो हे या गीताचे सार.

मला विश्वजीत आवडत नाही  पण  हेमंत कुमार च्या आवाजातली बेकरार कर के हमें यु न जाईये आणि ये नयन डरे डरे पडद्यावर गाताना, मात्र आवडलाय.
अर्थात  क्रेडिट मात्र हेमंतदांनाच.

९) ये नयन डरे डरे
(सिनेमा-कोहरा, संगीतकार-हेमंत कुमार, गीतकार-कैफी आझमी)

हिचकॉकच्या रिबेक्काचा रिमेक “कोहरा ” 
लॉरेन्स ऑलिव्हिअरचा रोल विश्वजितने केला आहे .त्याच्या छोट्या मिशीसकट .
एवढ्या मोठ्या अपराधाला माफी मिळते ती केवळ ये नयन डरे डरे  या गीतामुळे  .
So romantic and gentle .

प्यार में है जीवन की खुशी
देती है खुशी कई गम भी
मै मान भी लूँ कभी हार
तू माने ना

एका साधी, अनाथ मुलगी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या घरी आली आहे . नायक श्रीमंत . त्याची पहिली पत्नी खूप सरस ,हुशार. पण  तिने  दिलेली  जखम खोल आहे . कुठेतरी  स्वतः कमी पडल्याचा अहसास, हिच्यावर नकळत होणाऱ्या अन्यायाला कारणीभूत ठरत आहे. त्यालाही त्याची जाणीव आहे.
तिलाच सांगतो तो ,
मै मान भी लूँ कभी हार
तू माने ना

एकवेळ  मी  मागे येईन, हार मानेन पण  तू  मात्र मानू नकोस ..आता पुरुषी अहंकार सुद्धा, प्रेमात मागे पडू शकतो.
शिक्षण, प्रतिष्ठा सर्वच बाबतीत नायिका खूप कमी आहे पण त्याची असुरक्षितता मात्र तिचा आधार मागते. 
स्वतः एकटे पडणार याची भीती आहे ही. प्रेमाचे हे विश्वासाचे रूप किती आश्वासक आहे …

हेमंत कुमार यांचा आवाज गंभीर, खोल  डोहातून आल्यासारखा भासतो.  विचारशीलता, गांभीर्य आणि बुद्धिमत्ता  त्यात प्रत्ययास येते. एक ग्रेस आहे  त्या आवाजात जी रसिकांना आकर्षित करते, भले त्यांचे उच्चार थोडे सदोष असतील..

१० ) बेक़रार करके हमें यूँ न जाइये
(सिनेमा-बीस साल बाद, संगीतकार-हेमंत कुमार, गीतकार-शकील बदायुनी )

माणसाची तृप्ती होणे कठीण आहे.मग ती खाण्याची असो, वाढले वजन तरी चालेल, पैशाची असो, त्यापायी कुणालाही नागवले तरी चालेल  किंवा सहवासाची असो , इथे तर ती भूत  आहे की माणूस  ते सुद्धा  माहित नाही .
तरीही विश्वजीत गातोच ,

बेक़रार करके हमें यूँ न जाइये
आपको हमारी कसम लौट आइये

One of my  all-time favourites, irrespective of girlish Vishwajeet . हे देव ला  शोभणारे गाणे , ह्यात विनंती असली तरी जास्त मस्करी आहे, वात्रटपणा शब्दात नाही पण  गाण्याच्या शैलीत आहे. बाकी वहिदा कितीही गाववाली दिसली तरी सहजा सहजी बधत नाही, अगदी शपथ बिपथ घातली तरी नाही म्हंटल्यावर गाणे ट्रॅक बदलते.

या रस्त्यात किती धोके आहेत आणि तिला सोबतीची गरज आहे हे पटवून देताना , तिला सुद्धा पटवताना तो सांगतो,
ज़िन्दगी के रास्ते अजीब हैं
इनमें इस तरह चला न कीजिये
खैर है इसी में आपकी हुज़ूर
अपना कोई साथी ढूँढ लीजिये

विश्वजीत, या  रस्त्यावर आपले संरक्षण करेल या कल्पनेनेच ती हसते असे वाटते बघताना पण ते असोच. 
हे  गाणे फक्त आवाजाने तारले.

११) पुकार लो , तुम्हारा इंतजार है.
(सिनेमा-खामोशी, संगीतकार-हेमंत कुमार, गीतकार-गुलजार )

तुम पुकार लो, तुम्हारा इन्तज़ार है
ख़्वाब चुन रही है रात, बेक़रार है
तुम्हारा इन्तज़ार है

खामोशी मधील या गीतात  नायकाचा चेहेरा नीट दिसत नाही ,सिनेमा धर्मेंद्र चा नाहीच पण त्याची भूमिका छोटी असूनही त्याच्या भोवती सिनेमा फिरतो म्हणून महत्वाची .
फक्त पाठमोरा दिसतो  तो.  तरीही त्याच्या देहबोलीवरून जाणवते. तो तिच्या आठवणीत हरवून गेला आहे . नजर तिच्या येण्याकडे लागलेली. ती येईल अशी खात्री तर आहे …

कृष्ण धवल पडदा, नायिकेच्या आयुष्यातला रखरखीत एकटेपणा अधोरेखित करतो.
मोठा दिवाणखाना, लांबलचक वर्हांडा, उंच जिना आणि भरपूर रिकामी जागा.
तिच्या सारखेच रिकामेपण आजूबाजूला  प्रकर्षाने  काळ्या पांढऱ्या रंगात उठून दिसते.
लांबून घेतलेले हे शॉट्स  रेंगाळतात, जास्तच रेंगाळतात .

सारे जगच थांबलंय. काळ हळू सरकतोय.
“ तुम्हारा इंतजार है “ या स्वरातील उत्कंठा आणि चित्रित केलेला भव्य पण एकटा सेट किती मिसळून गेलेयत.
पांढरी भकास इमारत एकाच वेळी कोंडल्याचा फील देते. प्रेयसीच्या  आठवणीत  तो कैद , त्याच्या प्रेमात नायिका आणि या सर्वावर कळस म्हणजे , पुकार लो ची झपाटणारी साद
या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेम मध्ये प्रेक्षक कैद होतात.

ख़्वाब चुन रही है रात, बेक़रार है
ती येईल का नाही या विचारात अस्वस्थ असलेली रात्र स्वप्नांना वेचून स्वतःसाठी जपून ठेवते आहे.

होंठ पे लिये हुए दिल की बात हम
जागते रहेंगे और कितनी रात हम
मुक़्तसर सी बात है तुम से प्यार है

ती येईल अशी खात्री तर आहे पण आधीच्या अनुभवाने मन साशंक . ती अस्वस्थता, ते एकाकीपण , त्याचे स्वतःलाच समजावणे … ती येणार, निश्चित येणार … .
मुख्तसर सी बात है तुमसे प्यार है हे सांगून रिकामा झाला तो ;तुमसे प्यार है हे माहित आहे त्याला . त्याबाबतीत तो द्विग्धा नाहीच . 

तुमचा प्रियकर सांगतो “साधी तर गोष्ट आहे , तुमसे प्यार है ” सहज , कसलाही आडपडदा न ठेवता, तुमच्या उत्तरासाठी सुद्धा न थांबता आणि काय हवे जगायला!

कोहरा मध्ये,  कैफी आझमी बरोबर जुळलेल्या सुरांनी परत एकदा  उत्तमोत्तम गीतांची निर्मिती केली. त्यांचे शब्द आणि हेमंतदा यांचे संगीत यांनी चित्रपटाच्या दर्जात आणि आशयात मोलाची भर घातली.

१२ ) या  दिल की सुनो (सिनेमा-अनुपमा, संगीतकार-हेमंत कुमार, गीतकार –कैफी  आझमी )

अनुपमा ही शब्दच हरवलेल्या मुलीची कहाणी. जन्माच्यावेळी आई गेलेली. वडिलांनी तिलाच दोषी मानल्याने, स्वतःच्याच घरात , कुटुंबात  आक्रसलेली मुलगी म्हणजे उमा.
प्रसंग आहे तिच्या मैत्रिणीच्या,  अनिताच्या वाढदिवसाचा. उमाचाही वाढदिवस आहे पण तिचा जन्मदिवस हा तिच्या आईचा मृत्युदिन म्हणून कधीच साजरा होत नाही.
उलट या दिवशी आपण आपल्या  आईच्या मृत्यूचे कारण ठरलो ही खंत म्हणजे कुरतड्णारी वेदनाच.
अशोक(धर्मेंद्र ) अनिताच्या पार्टीत गात आहे. गाणे अनिताला पण त्याच्या डोळ्यासमोर मात्र उमा आहे.

एक ख़्वाब खुशी का देखा नहीं
देखा जो कभी तो भूल गये
माना हम तुम्हें कुछ दे ना सके
जो तुमने दिया वो सहने दो
या दिल की सुनो…

न केलेल्या अपराधाच्या भावनेने उमा स्वप्नेही पाहायचे विसरून गेली आहे. वडिलांचे सुख आपल्या येण्याने हरवले आहे हे दुःखच एवढे मोठे आहे की ओठ बंद ठेवून सहन करत राहणे हे तिने स्विकारले आहे.
तिच्या वेदनेला वाचा फोडतो तो अशोक.
वेदना सुद्धा किती सुरेल होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे हे गीत.
मर्मभेदक शब्द सुद्धा कुठेही आक्रस्ताळी होत नाहीत हे हेमंत मुखर्जी यांचे संगीतकार म्हणून वैशिष्ठ आहे.

१३ ) साँवले सलोने आये दिन बहार के
(सिनेमा-एक ही रास्ता, संगीतकार– हेमंत कुमार, गीतकार– मजरुह सुलतानपुरी)

पुनर्विवाहावर हा सिनेमा आहे, त्या काळाच्या मानाने बोल्ड.
हे सगळे  सुरळीत असतानाचे गाणे आहे. छोटे आणि सुखी कुटुंब, अगदी आता न दिसणारी डबल बायसिकल..
सुरुवात आणि शेवट माउथ ऑर्गनने केला  आहे…त्यामुळे गाण्याचा  जो उडता , हसरा मूड आहे तो मस्त पकडला आहे.

डोलती घटा के संग डोले जिया
बाग में पपीहा बोले पिया पिया
ऋत रंगीली कहे करके इशारे
छेड़ो फ़साने दिल-ए-बेक़रार के

हेमंत कुमार यांची गाणी ऐकतेय आणि एका मागून एक सुंदर गाणी समोर  येतायत, जी  माहित नव्हती की त्यांची आहेत.
आता हे वरचेच गाणे एका.
बनके पंछी गाये प्यार का तराना हे आमच्या पिढीचे हुकुमी गाणे होते.पिकनिकलाच कशाला, साधी  पन्नास पैसे तासावर सायकल चालवताना, शिवाजीपार्क मध्ये सुद्धा आपण नूतन आहोत  असा फील यायचा.
पण हे गाणे गायले गेले नाही. .
आता  लक्षात  येते, हेमंत कुमार  यांची  गाणी  श्रवणीय  आहेत पण  सोपी  नाहीत. त्यांचा पेस, स्वरांनी शब्दांबरोबर  केलेल्या लडिवाळ कसरती घशातून सहज येत नाहीत. त्यात हे सिनेमा सुद्धा फार  लोकप्रिय  नाहीत.
अर्थात  कमर्शिअल यश काहीही असो,  ताकदीची गाणी  काळाला पुरून उरतात ते गाणी ऐकताना जाणवतेच. 

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.





21 thoughts on “कि जैसे मंदिर में लौ दिए की.”

  1. फार सुंदर गाणी निवडली व विस्तार केला आहे. हेमंतकुमारांची गाणी आमच्या सर्व काकांना फार आवडायची. त्यांचे दिवसभर आवर्तन चालायचे टेपरेकॉर्डरवर. मला त्यांच्या आवाजात विलक्षण स्थैर्य व शांती वाटते.

  2. हेमंत कुमार यांच्या गीता निमित्त किती तरल भावना व्यक्त केल्या आहेत.एक बंगाली भाषिक गायक हिंदी उर्दू गीताला स्वर देतो आणि मराठी कोकणी भाषिक अलवार मराठीत समीक्षा करतात.हीच भारतीय संगीताची महत्ता आहे.फार सुंदर लेख आहे.हार्दिक शुभेच्छा 💐

  3. एकूण तेरा गाणी.
    सारी आधी ऐकलेली.
    आता परत अगदी एकेक असे ऐकावे लागणार.
    कारण,
    त्या प्रत्येकाची नवीन ओळख होणे!

    तसे ते प्रत्येक एका प्रिया प्रभुदेसाई टॅग नंतर होतेच होते.

    हेमंतदा खरे तर कोणत्यातरी एका दुक्का नायकाचा आवाज झाले असते.
    पण तसे झाले नाहीत.
    ते त्यांचे आवाजाचे थोरपण.

    1. Pradip Rasse sir,
      भिकाऱ्यापासून राजा पर्यंत कुणालाही हा आवाज शोभला आणि कुणाचाही असो , त्यातले संतत्व लोपले नाही असा हा आवाज.

  4. मी तिरुपती ला सेवेसाठी 8 दिवसा साठी आलो, रात्र पाळी झाली झोपलो होतो दिवसा. पडल्या पडल्या तुझा लेख समोर आला, चार्जिंग सम्पत आले होते म्हणुन चार्जिंग पॉईंट जवळच लावून वाचत गेलो गेलो गेलोच, पायास कळ लागली समजलंच नाही… लेख पूर्ण करून सोडला, मग समजलं क्रॅम्प आलेत पायास.. अशी मोहिनी आहें तुझ्या लेखात… तुला इतकं काही कसे माहित झाले असेल… ऐक काम कर मला 1947 पासून ची अशी चांगली चांगली चित्रपट कोणती याची यादीच पाठवून तयार करावीस. U ट्यूब वर तुकड्या तुकड्या त का होईना पाहून घेईल…. तुझी कमाल तुझे कोतुक… लिहीत जा… आणि हो मला पण MRI मध्ये घातले होते चार पाच वर्षापूर्वी… मी तीनदा मशीन बंद पाडले… जीव गुदमरून जातो आत… पांढऱ्या कपडायत ला खुप ओरडला तुम्हला भूल देऊन MRI करावं लागेल… जे पळालो ते आज पर्यंत गेलो नाही तिकडे. त्यावेळी साडेतीन हजार फीस होती.. मरू दे म्हटले….. 😜😂🤪

    1. Avinash ,
      MRI मलाही धसका च बसला आहे.
      तपासणी सोडा , आतमध्ये घाबरून जीव जाईल असे वाटते 🙂

  5. Vidula Sahasrabudhe

    प्रिया,
    आज खूप वेळ लिंक ओपन होत नव्हती.
    आता कधी वाचता येईल असं वाट असताना ch link open झाली.
    तुझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून तू लिहायला सुरुवात करतेस.
    अम्माची आठवण,बालपण
    आणि
    आज तर तुझा MRI चा अनुभव.
    ही तुझी खासियत आहे..
    हेमंतदा म्हणजे संत, सज्जन गात आहेत असं वाटतं.
    आवडते गायक.
    कुठली आणि किती गाणी निवडू असं तुला झालं असणार.
    सगळीच गाणी सुंदर.
    त्याला तुझ्या शब्दांच कोंदण..
    💐💐💐💐

  6. मंदार धर्माधिकारी

    नेहमी प्रमाणे अप्रतिम. तुम्हाला ही जुनी गाणी कशी आठवतात आणि त्याचा चपखल संदर्भ कसा आठवतो हे मला नेहमी आश्चर्य वाटते.

  7. तुम बहार हो. इसतरहा पढती जाती हूं की बहार खिलती है मेरी चारों और. तू इसतरहा शामिल हो हमारी जिंदगी से

  8. अप्रतीम लिहिले आहे.
    आवडता गायक, आवडती गाणी आणी आता आवडती लेखिका.
    खुप लिहा, आम्हाला खुप आनंद द्या.

  9. नेहमी प्रमाणे खुप छान लेख….परवा रात्री जुनी गाणी ऐकली त्यातील तीन चार गाणी हेमंतदांची होती…. जरा नजरोसे कह दो जी , या दिल की सुनो दुनियावालो , ना तुम हमे जानो, हो निंद न मुझको आये….. धीर गंभीर आवाजाचा गायक 👌👌👌🙏

    1. Vinayji,
      त्यांची गाणी ऐकली की मन शांत होते
      मी सुद्धा अनेकवेळा रात्री ऐकत बसते

  10. सुरैयाची कमेंट काय चपखल आहे..शाम की गंगा…. खरंच प्रत्येक प्रहरात नदी वेगळी असते….
    For a change, ही सगळी गाणी मी ऐकली आहेत. याद किया… प्रचंड आवडतं आणि ये रात ये चांदनी सुद्धा.
    You surpassed yourself. खरोखरच कमाल लिहिलं आहेस.

    1. Swati, Thank you.
      हेमंत कुमार मला खरंच पहिल्या तीनात आवडत नाहीत .
      रफी , किशोर आणि मन्ना
      पण जेव्हा मी अस्वस्थ असते तेव्हा फक्त हेमंत कुमार
      डिट्टो संजीव कुमार ..
      काही लोक तुमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग असतात फक्त ती जाणवून देत नाहीत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *