Skip to content

चंदन सा बदन, चंचल चितवन,धीरे से तेरा ये मुस्काना.

नूतन 
भाग २
———
घराची व्याख्या नेमकी  काय असावी ?
या काळात म्हणेन एक सुरक्षित जागा जिथे खात्रीची, निश्चित सोबत आहे. अशी जागा जिथे मला सामावून घेणारी आणि माझ्यात सामावून जाणारी माझी माणसे आहेत. भले ती उत्कृष्ट नसतील, ती नातीही परिपूर्ण नसतील पण ती खरी आहेत आणि माझ्याबरोबर आहेत. घर, जिथे प्रेम असते , जिथे आठवणींचा साठा असतो, जे तुमच्या अस्तित्वाची ग्वाही देते. जिथे तुमच्या कहाणीची  सुरुवात होते . घर म्हणजे केवळ स्केअरफूटमध्ये बंदिस्त जमिनीचा तुकडा नसतो.
“Home is the starting place of love, hope and dreams.”
म्हणून तर “तेरे घर के सामने” मधील नायक राकेश, नायिका सुलेखाला सांगतो,
“इतना तो जानती हो की, मै तुम्हारे लिये घर बना रहा हूँ. इतना और भी जान लो की मै तुम्हारे लिये घर बसाना चाहता हूँ”
हे राकेशने, सुलेखाला दिलेले वचन आहे आणि सिनेमाची कथा या घर पाहावे बांधून या प्रवासावर आधारित आहे.

राकेश ( देव आनंद) आणि सुलेखा ( नूतन ) यांच्या एकत्र येण्याचे कारण आहे ते “घर”
राकेश आणि सुलेखा यांचे वडील सख्खे शेजारी आणि सख्खे वैरी आहेत. व्यावसायिक स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेली ईर्षा यामुळे हे वैर संपणे काही शक्य नाही. दोघांच्या जमिनी एकमेकांना लागून आहेत. त्यावर घर बांधणे  हे दोघांचे स्वप्न .
घर बांधण्याचा हेतू तेथे राहण्यापेक्षा , दुसऱ्याला खिजवणे हा जास्त.
दोघांनाही आपले घर प्रशस्त हवे आहे. प्रशस्त आणि सुंदर कुणाचे असावे हेच तर वादाचे मोठे कारण आहे.
दिल्लीत वास्तुविद्याविशारदाची काही कमी आहे का ! नाहीच पण इथे दोघांनाही उत्कृष्ट वास्तुविद्याविशारद हवा असल्याने अर्थात दोघांचाही वास्तुविद्याविशारद एकच आहे. ” आपला नायक “
आणि तो चक्क यांतील एकाचा  मुलगा आहे , त्यात तो जिच्या प्रेमात पडला आहे, ती दुसऱ्याची मुलगी आहे.
A classic recipe for  romantic comedy.
सुरुवातीच्या काही प्रसंगात राकेश हा अगदीच लोफर माणूस आहे हा गैरसमज करून घेतलेली सुलेखा, राकेश हा नामांकित वास्तुविशारद आहे हे समजल्यावर चकित होते. त्याच्याशी गप्पा मारल्यावर तर त्यांची मैत्रीचं होते आणि मैत्री साजरी करण्यासाठी हे दोघे आणि अजून काही जण कुतुबमिनार पाहायला जातात.
अर्थात हिंदी सिनेमाच्या सहली  सारखी ही सहल काही मैत्रिणीच्या घोळक्यात , एकत्र समूह गीत गात काही साजरी होत नाही. शेवटी नायक देव आहे.काहीतरी कारण सांगून आपल्या नायिकेला एकटाच घेऊन जाण्यात यशस्वी होतो.

१३) दिल का भंवर करे पुकार ( तेरे घर के सामने)
———————————————————-

कुतुब मिनारच्या पायऱ्या काही तिच्या आईवडिलांना चढणे शक्य नाही आणि तिला तर कुतुब मिनार आतून पाहायचा आहे, याहून दुसरे चांगले कारण नायकाला काय मिळणार !
मिनारच्या या न संपणाऱ्या गोल गोल पायऱ्या चढून जाताना तो आडवळणाने आपले प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न करतो पण सुलेखा त्याला सांगते, या शांततेचा  आवाज ऐक ना .
खाली उतरताना मात्र तो आपले हृदय उघडे करतो.

फूल तुम गुलाब का, क्या जवाब आपका
जो अदा वो बहार है
आज दिल की बेकली आ गई ज़बान पर
बात ये है तुमसे प्यार है
दिल तुम्हीं को दिया रे, प्यार का राग सुनो रे  
त्याचा प्रभाव तर तिच्यावर आधीपासून आहेच पण आता प्रेम सुद्धा हळूच आडोश्याला राहून तिला पाहत आहे.
नूतनला ह्या गीतात एकही शब्द नाहीत पण तिचे आधीचे खट्याळ डोळे , मिस्कील हसू , ते झुकलेले डोळे आणि लाजरे हसू , प्रेमाचा कापलेला रस्ता सहज दाखवून जातात.
“ दिल का भंवर कारे पुकार “ या गीतात शब्द नसूनही , ते गाणे खऱ्या अर्थाने तिच्या नावावर जमा करायला हरकत नाही .
हे गीत म्हणजे त्यांच्या पुढील प्रवासाची सुरुवात.
तो मस्करी करतो आहे , फारच बडबड करतो आहे हे दिसतंय तिला पण तिला हे ही समजतंय की ते तिला आवडू लागलंय.
तिचे मान डोलावणे , समेवर डोळे मिचकावणे , ओठ घट्ट मिटून गालात हसणे आणि नंतर त्याला खेचून त्याच्या पावलावर पाऊल टाकणे ..
अभिनय शिकायचं असेल तर हे गीत पाहावे .

केवळ प्रेमच दुष्मनीचा अंत करू शकते.
दोन मोठ्या माणसांच्या भांडणात गुदमरून गेलेल्या राकेशला फक्त त्याचा आधार आहे. जळी स्थळी त्याला सुलेखा दिसू लागते. तिला विसरण्यासाठी एकच प्याला घ्यावा तर त्यातूनही ती डोकावते.
पुरुषांच्या स्वप्नांना, आकांक्षांना बळ देताना स्त्री ची नजर त्यातले धोके पक्के हेरते .
तिला माहित आहे, घर बांधणे, अगदी तो  वास्तुशिल्पी असला तरीही , या परिस्थितीत  काही सोपे नाही.

१४ ) इक घर बनाऊंगा तेरे घर के सामने
————————————-

घर का बनाना कोई, आसान काम नहीं
दुनिया बसाना कोई, आसान काम नहीं
पण त्याचा निश्चय पक्का आहे. जर माझे हृदयच तुझ्याशी बांधले गेले आहे तर मला काहीही अशक्य नाही.
आता मात्र तिने त्याच्यापुढे हार मानली  आहे, तो वचनाला पक्का आहे हे जाणून आहे ती .. तरीही एक प्रश्न , एक आव्हान ती ठेवतेच.

कांटों भरे हैं लेकिन, चाहत के रास्ते
तुम क्या करोगे देखें, उल्फत के वास्ते

त्याचे उत्तर इतके गोड़ आणि प्रामाणिक आहे ..
त्याच्या तुटक्या दातातून हसताना तो सांगतो , अगदी खरे सांगतो ..
“प्रेमासाठी लोकांनी राज्ये सोडली आहेत ,  त्याचवेळी  महाल सुद्धा बांधले आहेत की “
मैं भी कुछ बनाऊंगा  तेरे घर के सामने
दुनिया बसाऊंगा, तेरे घर के सामने…

ह्या गाण्यात एक सुंदर शॉट आहे. राकेश ला जरी जिथे तिथे सुलेखा दिसत असली तरी त्याच्या मित्राच्या डोळ्यांसाठी तो फक्त व्हिस्कीचा ग्लास आहे. त्यात तो बर्फाचा खडा टाकतो आणि ग्लासमधली नूतन थंड स्पर्शाने शहारते …
विजय आनंद चे दिग्दर्शन कमालीचे सर्जनशील आहे. 

विजय आनंद दिग्दर्शित “तेरे घर के सामने” हा १९६३ मध्ये प्रदर्शित झाला. बंदिनी ही याच वर्षातला.
दोन वेगळे चित्रपट , दोन वेगळ्या भूमिका .
सुलेखा आणि कल्याणी ..
दोन्ही भूमिकांना नूतनने एवढ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे की तिच्याशिवाय इथे कुणाचाही विचार करता येत नाही.
बंदिनीतील कल्याणी साधी , गावात वाढलेली मुलगी. सुलेखा सधन  कुटुंबातील सुशिक्षित मुलगी आहे.
कल्याणी बिकाशच्या प्रेमात आहे कारण तो एक क्रांतिकारक आहे. त्याची एक स्वतंत्र ओळख आहे. त्याचे एक स्वतंत्र ध्येय आहे. त्याच्या आयुष्य जगण्याच्या, कुणासाठी , कशासाठी जगण्याच्या कल्पनेला एक आकार आहे, ती अशा पुरुषावर प्रेम करते.

सुलेखा आणि राकेश जेव्हा पहिल्यांदा भेटतात तेव्हा ती त्याला लोफर समजते. अर्थात तो तिच्या खिजगणतीत सुद्धा नाही. नंतर  तिला समजते , की तो काही देखणा रिकामटेकडा मवाली नाही. एका नामांकित फार्म मध्ये काम करणारा आर्किटेक्ट आहे . त्याची  काही स्वप्ने आहेत , काही आकांक्षा आहेत, . विचारांनी आधुनिक असूनही, आयुष्य जगण्याची त्याची काही मूल्ये आहेत. जबाबदारीची जाणीव आहे. कुटुंबाच्या आशीर्वादानेच सुलेखाबरोबर आयुष्याची सुरुवात करणे हे त्याचे स्वप्न आहे, जिद्द आहे अन जर ते अशक्य असेल तर सुलेखा बरोबर स्वतःची वाट वेगळी करणे त्याला मंजूर आहे. 
सुलेखाचे भाळणे हे केवळ व्यक्तीवर भाळणे नाही ..हे गुणांवर भाळणे आहे .
एकदा मन जोडले की त्याच्याशी ठाम राहणे हे सुलेखा आणि कल्याणी दोहोंमध्ये आहे.
आधुनिक आणि पारंपरिक हा फक्त वेशभूषेचा फरक आहे … आपल्याला काय हवे या बाबतीत दोन्हींची भूमिका स्पष्ट आहे.
देवला वाव असूनही नूतनने ही भूमिका समरसून निभावली आहे.

या सिनेमातील अजून एका गीतात  त ती नाही पण गीतच तिला उद्देशून आहे.
त्याच्यापासून तिला लांब ठेवण्यासाठी तिचे आई वडील तिला सिमल्याला घेऊन जातात. आपला हिरो या अशा फडतूस अडचणींचा सामना करण्यात तरबेज आहे. शिवाय त्याच्या साथीला त्याची स्कूटर आहे.
दिल्लीहून सिमल्याला तर येतात हे महाशय आणि चक्क पत्ता विसरतात .
ही परिस्थिती एका गाण्याला फिट्ट बसते .

सिमल्याचे धुके, त्यात मिट अंधार आणि नागमोडी वळणाचे रस्ते पण सोबतीला रफीचा उत्साही स्वर असेल तर शोधणे सोपे आहे.
भर रस्त्यात आपल्या प्रेयसीला “ तू कहाँ ये बता इस नाशिली रात में “ म्हणून साकडे घालायचे.
मग  देवी प्रसन्न होते

१५) चांद तारों ने सुना 
इन बहारों ने सुना
दर्द का राग मेरा,  रहगुज़ारों ने सुना
तू भी सुन, जानेमन, आ भी जा  …
त्याच्या आवाजाला प्रत्युत्तर देणारा तिचा मोहक चेहरा खिडकीचे दार उघडतो .
त्याला पाहून सुरुवातीला आश्चर्य नी मग मात्र १००० वॅट्स हास्य .
अंधाराला सुद्धा झाकोळून टाकेल अशा त्या हसण्याने नी चकाकणाऱ्या नजरेने  सिनेमाची स्क्रीन उजळून निघते .

खरोखर देखणा  देव  समोर असूनही अशा साध्या हालचालींतून एकही शब्द न बोलता तिने हा सीन स्वतःचा केला आहे. . 
राज-नर्गिस , दिलीप -मधुबाला,  नूतन-देव या जोड्या पन्नास आणि साठी च्या पूर्वार्धात गाजल्या. त्यात ह्या जोडीचा रोमान्स स्क्रीन पुरता मर्यादित राहिला. पडद्यामागे मात्र ते चांगले मित्र होते.
“ तिच्याबरोबर काम करणे हा  आनंदाचा भाग आहे . केवळ अभिनयच नाही तर अनेक विषयांवर चर्चा करणे तिला जमते, आवडते . तिचे वाचन अफाट आहे आणि विषयाची समज सुद्धा. तिचा सेन्स ऑफ ह्युमर अफलातून आहे” देव ने हे एका मुलाखतीत सांगितले होते .

कुमारसेन आणि शोभना समर्थ या दाम्पत्याची ही मोठी मुलगी.
सिनेमाची समज, अभिनय आणि सौन्दर्याचा वारसा तिला जन्मजात मिळाला.नावाजलेल्या कॉन्व्हेंट शाळेत आणि स्विझर्लंडच्या फिनिशिंग स्कूल मध्ये तिचे शिक्षण झाले . त्यामुळे भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीची ओळख आणि प्रभाव घेऊनच तिने चित्रपट सृष्टीत प्रवेश केला . याचे प्रतिबिंब तिच्या भूमिकांत दिसते.

प्रत्येक संवेदनशील कलाकारांना भावनेची समज असतेच. भावना समजून घेणे हा एक भाग आणि त्याचा उपयोग करणे हा दुसरा महत्वाचा भाग . अनेकजण भावनेत वाहवत जातात किंवा त्याना  वापरून घेतात .
तिने आपल्या इमोशनल इंटेलिजन्स चा उपयोग आपली भूमिका समजून घेण्यासाठी नी डोळसपणे चित्रपट सृष्टीत वावरण्यासाठी केला
या मायावी नगरीत वावरून स्वतःला अस्पर्श ठेवणे सोपे नाही . तिची प्रतिमा नेहमीच वादरहित राहिली. तिच्याबद्दल गॉसिप उठले नाही . तिने ते व्हायला दिले नाही .  लोकांच्या संपर्कात राहूनही , प्रसंगी त्यांना मदत करूनही तिने स्वतःचा आब ठेवला . जिथे पुरुषांचेच वर्चस्व राहीले आहे तिथे तिने स्वतःच्या टर्म्स वर काम केले . स्वतःला हवे त्या लोकांबरोबर काम केले .
अभिनेत्री आणि स्टार व्हॅल्यू जपली .
ज्या तर्हेने तिने आपल्या कारकिर्दीची आखणी केली , अगदी शेवटपर्यंत , ते पहिले तर लक्षात येते त्या सोज्वळ , साध्या  सरळ चेहेऱ्यामागे एक अतिशय मनस्वी , हुशार, चारित्र्यसंपन्न आणि कणखर स्त्री ठाम उभी होती.
गाता गळा होता. तिचे संगीताचे जाहीर कार्यक्रम सुद्धा झाले आहेत . स्वतःच्या पहिल्या चित्रपटात तिने गाणी गायली आहेत . इंग्रजी , हिंदी आणि फ्रेंच भाषेवर तिचे प्रभुत्व होते . संस्कृत मध्ये तिने काही रचना केल्या आहेत.
विचारपूर्वक सिनेमाशी संबधीत नसलेल्या माणसाशी तिने लग्न केले. ते निभावले .
संसाराच्या भिंतींना कुठेही भेग पडू न देता तिने चित्रपट कारकीर्द सुद्धा आपल्या अभिनयाने गाजवली .

बंदिनीची कल्याणी , सुजाता ची सुजाता , सीमा ची गौरी यांचे  अंतरंग नी तेरे घर के सामने ची सुलेखा , दिल्ली का ठग ची आशा हे बाह्य रूप असा अनोखा मिलाप तिच्यात दिसतो . 

Tags:

4 thoughts on “चंदन सा बदन, चंचल चितवन,धीरे से तेरा ये मुस्काना.”

  1. व्वाह!!!
    काय सुरेख लिहिलंय!
    दिल का भंवर करे पुकार या गाण्याचा किस्सा असाही एक माहीत आहे की हसरत जयपुरींनी हे गाणं लिहिलं तेव्हा आज दिल का नासूर…
    वगैरे असे काहीसे शब्द योजले होते आणि ते काही बर्मनसाहेबांच्या पसंतीस उतरत नव्हते. नूतनही तिथे सेटवर होती. आणि आज दिल की बेकली…हे शब्द तिने सुचवलेले..हसरत साहेब आणि बर्मनसाहेब दोन्ही खूप खुश झालेले. अशी प्रचंड बुद्धिमत्ता असलेली नूतन. चंदनाचा सुगंध असलेली नूतन…
    मजा येतेय ही लेखमाला वाचतांना.
    बढिया 👌👌👌♥️♥️♥️

    1. Thank you Kamini .
      हा किस्सा नवीन आहे मला .
      ती बुद्धिमान होतीच . उत्कृष्ट कवयित्री आणि गायिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *