नूतन
पार्ट १
तुरुंगाचे काही नियम असतात.
काही अघटित घडणार असेल किंवा काही वेगळे होणार असेल तर तुरुंगात घंटा वाजते.
शोधाशोध सुरु होते. झडती घेतली जाते. काही वावगे नसेल तर तुरुंगातील भिंतीवरून पहारेकरी हाळी देतो, “ सब ठीक है” त्याला दुसरा पहारेकरी प्रतिसाद देतो”सब ठीक है”
आपोआप सगळे व्यवस्थित आहे याची जाणीव वातावरणात पसरते ..
आज बंदिनी पाहत होते.
नूतनने अभिनयाची कमाल केली आहे असे अनेक प्रसंग या चित्रपटात ठायी ठायी आहेत पण हे वाक्य आणि हा प्रसंग लक्षात राहिला त्याला वेगळे कारण आहे.
अनेक वेळा कलाकाराच्या भूमिकेत, गाण्यात, लिखाणात त्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसते. कुठे ना कुठे चेहेर्यावरील मुखवटा काढला जातो. त्याचे पडसाद समाजात उमटतात.
नूतन त्याला अपवाद आहे. एक अभिनेत्री म्हणून गाजत असताना, समाजात वावरत असताना, खाजगी आयुष्य नाहीच असे वाटावे एवढे तिने ते पडद्याआड ठेवले.
काही गोष्टी उडत कानावर आलेल्या. सख्ख्या आईवर भरलेला खटला . पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप .
तिने खटला भरला असेलही पण त्याला बाजारी स्वरूप आणले नाही. कोर्टापुरताच तो खटला राहिला .तसेच तिचे वैयक्तिक आयुष्य . नवरा हा नेव्हीतील अधिकारी . कलेच्या प्रांताशी त्याचा तसा संबंध नाही . ती मोठी अभिनेत्री आहे हे सुद्धा त्याला डेटिंग करताना माहित नव्हते . त्यांच्या सांपत्तिक स्थिती मध्ये सुद्धा फरक होता पण त्याचा गवगवा झाला नाही .
पडद्यावर प्रेमप्रसंग रंगवले असतील पण पडद्याबाहेर चघळायला तिने काहीही विषय दिला नाही.
तिच्या आजाराची बातमी सुद्धा फारशी पसरली नाही . अगदी तिच्या मुलालाही त्याचा गंभीरपणा माहित नव्हता .शेवटच्या काळात उपासनेच्याच्या सहाय्याने तिने स्वत:ला काबूत ठेवले होते.
मरतानाही प्रचंड वेदना सहन करूनही तिचे मन शांत होते.
मला वाटते एवढे चढ उतार झेलून कदाचित तिचे ब्रीदवाक्य असेल ” “ सब ठीक है” ”
आज जेव्हा चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्री कोण म्हणून विचारले जाते तेव्हा डोळ्यासमोर ती उभी राहते …
तिच्या सर्व भूमिका अजरामर आहेत. नावावर सहा फिल्मफ़ेअर्स आहेत. पण त्या आहेत सर्व भूमिका. त्यात “ती” कुठेच नाही. व्यक्ती आणि नटी या दोघांना तिने एकमेकांपासून लांब ठेवले.
प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा एवढा उत्कृष्ट अभिनय करणारी ती एकटीच अभिनेत्री असेल. या कारणासाठी सुद्धा तिला मानाचा मुजरा .
“नूतन” हिंदी सिनेअभिनेत्रींत उत्कृष्ट म्हणून जिची नोंद होईल अशी अभिनेत्री.
जिच्या केवळ दर्शनाने पडदा जिवंत होत असेल अशा अभिनेत्रींचे शब्दात वर्णन कसे करायचे! जी पात्रे तिने रंगवली, ती पाहताना लक्षात येते की आपण नूतन पाहत नाही, त्या पात्रांनी तिच्या शरीराचा ताबा घेतलेला असतो. कल्याणी (बंदिनी), गौरी( सीमा ), शांती( पेइंग गेस्ट), सुजाता(सुजाता), सुलेखा ( तेरे घर के सामने) अशी अनेक, जी पाहताना नूतन कुठेच दिसत नाही एवढी ती त्या भूमिकांशी एकरूप होते.
अनेक वेळा तिची शांतता बोलकी असते. चेहेऱ्यावर उमटलेल्या भावना तिच्यासाठी शब्दांचे काम करतात.
प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष म्हणाले होते,
“ नूतन एवढी सुंदर आहे की ती कोणत्याही कोनातून टिपली तरी तेवढीच आकर्षक दिसते”
ह्याच नूतनला लहानपणी “ that skinny ugly duckling” म्हणून नाकारले होते.
हमारी बेटी या तिचा पहिला चित्रपट अयशस्वी ठरल्यावर तिची रवानगी स्विझर्लंड येथील फिनिशिंग स्कूल मध्ये झाली आणि या कुरुप बदकाच्या पिल्लाचे एका डौलदार हंसीत रूपांतर झाले.
१९५५ मध्ये अमिया चक्रवर्तीच्या सीमा या चित्रपटामुळे सिनेजगतात एका दर्जेदार अभिनेत्रींचे पदार्पण झाले and Nutan never looked back.
ही पोस्ट तिच्या गाजलेल्या गाण्यांची आणि चित्रपटांची. मला आवडणारी नूतनची सर्व गाणी केवळ तिच्या अभिनयाच्या अनुषंगाने दिलेली आहेत …
१) मन मोहना बडे झुटे (सीमा )
—————————————-
अमिया चक्रवर्ती यांच्या सीमा या सिनेमाने नूतनच्या अभिनय कौशल्याची नोंद सिने जगताने घेतली.
सीमा ही एक अनाथ मुलगी. हसतमुख, कठीण आयुष्य असूनही प्रामाणिकपणे आयुष्याला सामोरी जाणारी. तिचे काका काकी तिला मोलकरीणीची वागणूक देतात. घरात राबत असतानाही तिच्या चेहऱ्यावरचे हसू मात्र मावळत नाही पण तिच्यावर चोरीचा आरोप येतो, तिला हाकलून लावण्यात येते. चोरीचा शिक्का लागल्याने तिला कुणी कामही देत नाही आणि एकेकाळची हसरी, आनंदी, प्रेमळ गौरी पूर्णतः बदलून जाते..
ज्यावेळी ती सुधारगृहात येते तेव्हा तिचा साऱ्या जगावरचा विश्वास उडालेला असतो .हतबलता आणि संताप तिला कोणाचीही मदत स्विकारायला देत नाही. संताप आणि त्यातून केलेले बंड हे काही चांगुलपणाचे लक्षण मानले जात नाही. हिंदी सिनेमातील सोशिक नायिकेच्या संदर्भात तर नक्कीच नाही; पण अन्यायाविरुद्ध राग येणे नैसर्गिक आहे. शरीरात जर बिघाड झाला तर ताप येतो न ! क्रियेची प्रतिक्रिया असते ती.
गौरीचा संताप सुद्धा अन्यायाविरुद्ध उमटलेली प्रतिक्रिया आहे.
या सुधारगृहाचे संचालक काही सहजी हार मानत नाही. वरच्या कठोर आवरणाखाली एक सोज्वळ, गुणी मुलगी दडलेली आहे हे ते जाणून असतात. रागाची वाफ बाहेर पडली नाही तर विध्वंस अटळ.
त्या संतापाला, घुसमटीला वाट मिळावी म्हणून तिला गाणे म्हणायला सांगितले जाते. .
मन मोहना बडे झुटे
हार के हार नही माने
लता बाईंनी जयजयवंती रागात बांधलेल्या या गीताचे सोने केले आहे. यातल्या विजेसारख्या खणखणीत ताना, अभिनयातून पोचवणे, स्वतः संगीताचे ज्ञान असल्याशिवाय शक्य नाही आणि चेहेरा कुठेही विद्रुप न करण , जे भल्या भल्या गायकांना जमत नाही, ते नूतनने सहज साध्य केले आहे.
जयजयवंती रागातील या खणखणीत ताना, त्या संतापाला मोकळीक करून देतात .त्या असहाय्यतेला एक वाट देतात .
ह्या गाण्याच्या आधीचा सीन बघा. संतापाने तिचे डोळे आग ओकत आहेत. तिचा रुसलेला चेहेरा बघा जेव्हा तिच्या लक्षात येते की आपल्याला कुणी ओरडत नाही तर लहान मुलासारखी समजूत घालत आहेत , ज्याची तिला सवयच नाही कारण तिच्या वाट्याला प्रेम कधी आलेलेच नाही. आणि हे गीत गाताना तिचे भाव बघा. पूर्ण भक्तीने ती हे गीत गात आहे.
2) छोड दो आंचल जमाना क्या कहेंगा ? (पेइंग गेस्ट )
————————————————————
इथे पेइंग गेस्ट आहे “ देव आनंद” पण सिनेमात लक्षात राहते “ नूतन “
हा सिनेमा खरेतर निव्वळ फिल्मी प्रेमकथा . नुकतीच प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आहे असा धडपड्या वकील आणि तो जिथे राहतो त्या मालकाची मुलगी यांची ही हसरी खेळती प्रेमकथा. सुरुवातीला तिला जिंकून घेण्यासाठी केलेली धडपड, मग झालेला गैरसमज , हे कमी म्हणून की काय, तिच्यावर आलेला आरोप आणि त्यातून तिला वाचवून तिचे हृदय जिंकणे अशी वळणा वळणाने फुलत जाते ही कथा.
पैशापेक्षा प्रेमाला महत्व देणाऱ्या शांतीचा रोल नूतनने सहज वठवला आहे. या सिनेमाच्या वेळी देव आनंद चौतीस वर्षाचा होता. जवळजवळ चाळीस सिनेमांचा अनुभव. नूतन जेमतेम एकवीस, गाठीला अनुभव होता “ सीमा “ चा . अर्थात त्या सिनेमासाठी तिला फिल्म फेअर पारितोषिकाने गौरवले होते,
छोड़ दो आँचल ज़माना क्या कहेगा
इन अदाओं का ज़माना भी है दीवाना दीवाना क्या कहेगा
छोड़ दो आँचल…
प्रेमात पडलेल्या दोघांसाठी, दोघांपुरतेच जग सीमित असते पण प्रेमात पडलेल्या त्या दोंघांवर मात्र जगाचे लक्ष केंद्रित होते.
का बरे असे !
प्रेम ही एवढी अपूर्वाईची गोष्ट आहे न की कुणी प्रेमात पडलेले दिसले की जगाचा जळफळाट होतो ..
तिला माहित आहे हे ..
पोटात भीती आणि चेहेऱ्यावर न लपवला जाणारा आनंद ..
दुविधेत पडलेली ती त्यालाच प्रश्न टाकते
“ छोड़ दो आँचल ज़माना क्या कहेगा? “
लोक काय म्हणतील ? ह्या प्रश्नाने लोक बरबाद झाली आहेत; त्याला माहित आहे हे !
अगं वेडे, ज्या गोष्टीचे जगाला वेड आहे तीच तर आपण करत आहोत …लोक काय म्हणणार ?
त्याचा उलट प्रश्न.
आणि who cares ? असा फक्त प्रेमात पडलेल्या प्रेमिकाचा attitude सुद्धा.
देव आणि नूतन, माझी सगळ्यात आवडती जोडी आहे. ही दोघेही controversy मध्ये अडकले नाहीत .कामाशी मतलब.
त्यामुळे असेल त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री गाजली. नूतनने स्वतःचे आयुष्य पब्लिक केले नाहीच. त्यामुळे अगदी अवखळपणे विचारलेला प्रश्न ” जमाना क्या कहेगा ? ” तिला फिट्ट बसतो आणि देव ने जमान्याची कधी पर्वाच केली नाही त्यामुळे
यही दिन हैं मस्ती के सिन हैं
किसको ये होश है अपना बेगाना क्या कहेगा…
हा नजरिया त्याला शोभतो.
एक सोफीस्टकेटेड जोडी. ग्रामीण लूक देवला कधी ही शोभला नाही .
नूतन सौदागर म्हणा , सुजाता म्हणा; एक फार न शिकलेली मुलगी म्हणूनही शोभली, भावली पण तिचे मुळचे upbringing अशा सिनेमात दिसते .यातलच अजून एक अतिशय सुंदर गीत आहे.
३) ओह निगाहें मस्ताना
—————————
प्रेमाचे अनेक रंग असतात ..
“माना जनाब ने पुकारा नाही” मधला पाठलाग, “छोड दो आंचल” मधला अवखळपणा, हे सगळंच मागे पडले आहे.
आता वेळ आली आहे ते मान्य करण्याची. तो आकंठ डुबला आहे तिच्या प्रेमात. .
तिच्या मोठ्या, टपोऱ्या ,पाणीदार डोळ्यात हरवून गेला आहे .
गाण्याचे एकही शब्द वाट्याला न आलेली नूतन इथे फक्त गुणगुणते.
नुसता हुंकार .पण तो किती सुरेल!
तो सूर त्याची प्रेरणा बनतो आणि शब्द उमटतात , .
कोई देखे नशीले आँखें मल मल के,दिल कैसे बने न दीवाना
शम्मा करे है इशारे जब जल जल के,कहो क्या करे परवाना
ओ हो
ओ निगाहें मस्ताना …
या दोघांचे अजून एक फार सुरेल गीत आहे.
सिनेमा तेवढा गाजला नाही पण हे गीत मात्र अतिशय गोड़ आहे.
४) फिर वही चांद वही हम वही तनहाई है( बारिश)
——————————————————–
बारिश हा गुन्हेगारी जगतावर आधारित एक सिनेमा होता. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नायक आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बाहेर पडतो आणि खलनायकाच्या हाती सापडतो. सिनेमातील नूतन ची भूमिका आधी एका नटखट मुलीची आणि नंतर एका जबाबदार पत्नीची. सिनेमा काही खास नव्हता पण ह्यातले हे गीत मला अतिशय आवडते.
फिर वही चांद वही हम वही तनहाई है
आज फिर दिल ने मोहब्बत की क़सम खाई है
उजेड असतो तेव्हा आजूबाजूच्या कोलाहलाची सोबत असते. सूर्यास्तानंतर जग काळोखाच्या स्वाधीन होते. ओळखीच्या आश्वासक खुणा हरवू लागतात आणि मन मावळते. वातावरणातील निरव शांतता जीवघेणी. रात्रीचा मिट्ट काळा रंग नायकाच्या मनातही उतरत असताना, ती येते.
काळया पटलावर रेखलेल्या सफेद रांगोळीसारखीच. आतापर्यंत ढगाआड दडलेला पूर्ण चंद्र, या धरतीवरील चांदणीला पाहायला हळूच बाहेर येतो. प्रेमाची शपथ घ्यायला याहून चांगला मुहूर्त कोणता असणार!
लताबाईंचा आवाज वातावरणात हळूहळू पसरत असतानाच, दीड अंतरा झाल्यावर सी रामचंद्र यांचा आवाज; त्या आवाजात मिसळतो. दुधात मिसळलेल्या साखरेप्रमाणे विरघळतो. भीतीच्या वावटळीचे, अनिश्चिततेचे आनंद लहरीत परिवर्तन होते.
दूर दुनिया से कही भीगी हुई रातो मे..
दो मोहब्बत भरे दिल गुम है हसी बातो मे..
दिल मे जो बात है आंखो मे चली आई है
तिचा सुरच आश्वासक. मायेच्या कुशीत घेणारा. धीर देणारा.
देव जेव्हा तिच्या स्वरात आपला सूर मिसळतो, तेव्हा लक्षात येते की तिच्या सुरातली शक्ती त्याला धीर देते आहे. त्याच्या मनातील शंका कुशंका निपटून टाकत आहे.
हे गाणे अजून अशासाठी खास आहे की याला सी रामचंद्र यांनी स्वर दिला आहे.
लताच्या गळ्यात एक एक सूर असा बसलाय की असे वाटावे हा गळा आणि हे सूर एकत्रच जन्माला आले असावे.
५) काली घटा छाये मोरा जिया तरसाये (सुजाता)
———————————————–
बिमल रॉय यांच्या सिनेमाची एक खासियत होती .
त्यांच्या सिनेमातील पात्रे , खऱ्या आयुष्यातील माणसांसारखे वागायची. अगदी तुमच्या माझ्या सारखी . ना संत , ना पापी , ना नायक ना खलनायक, सर्व सामान्य माणसे .
त्यांचे स्वतःचे असलेले पूर्वग्रह , गृहीते कदाचित काही समजुती त्यांना नकारात्मक बनवत असतील पण ती दुष्ट नाहीत.
“सुजाता” या सिनेमात कुणी खलनायक नाही .
सुजाता ही एक हरिजन मुलगी .. अस्पृश्य आणि अनाथ .
काही दिवसांसाठी म्हणून एका उच्चवर्णीय इंजिनीअर च्या घरी येते आणि त्या घरचीच होते, तिला घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न होतात खरे पण तिचे भाग्य त्या घराशी बांधले गेले असते.
उपेंद्र बाबू ना तिचा लळा आहे, या घराची मुलगी रमा तिच्यावर प्रेम करते. प्रेम असूनही अंतर ठेवते ती चारू . तिचे अस्पृश्य असणे हा तिचा गुन्हा नाही हे चारुला मान्य आहे पण तरीही ती मुलीसारखी आहे , मुलगी नाही .
लहानपणी हट्ट करणारी सुजाता, मोठेपणी मात्र अबोल होते. आपल्या तथाकथित कमीपणाची तिला जाणीव आहे , या घराबद्दल कृतज्ञता आहे आणि तरीही ती आतून दुःखी आहे .
एकत्र असूनही आपण वेगळे आहोत ही जाणीव तिला अस्वस्थ करते आणि अशावेळी अधीर तिच्या आयुष्यात येतो. उच्चवर्णीय , सुशिक्षित सुसंकृत अधीर , ज्याला तिचा इतिहास माहित असूनही काही फरक पडत नाही .
कुणीतरी आपल्यावर प्रेम करत आहे ही अनुभूती आगळी , ही भावना अनोळखी ..
नूतनच्या चेहेऱ्यावर ऊन पावसाचा एवढा सुंदर मेळ आहे .. लज्जा , साशंकता थोडीशी भीती , बराचसा अविश्वास आणि या साऱ्या वर मात करणारा आनंद . हा आनंदच तिला स्वप्ने पाहण्याचे बळ देतो ..
काली घटा छाये मोरा जिया तरसाये
ऐसे में कही कोई मिल जाये
बोलो किसी का क्या जाए रे,
माझ्या आनंदांत या जगाचा काय वाटा आहे. असे जग की ज्याने माझ्या दुःखाचा कधी विचारच नाही केला ..
अबोल ,एकाकी , दबलेली ही मुलगी प्रेमाच्या या अचानक झालेल्या दर्शनाने खळखळून हसते. तिचे डोळे चमकून उठतात , पाय थिरकतात. पावसाच्या साक्षीने एका प्रेमकहाणीची सुरुवात होते ..
सुजाता आणि नूतन हे समीकरण तिच्या अभिनयाने अमर केले आहे .
६) बनके पंछी गाये प्यार का तराना(अनाडी)
————————————————-
अनाडी ह्या सिनेमाचा नायक राज कपूर. ही नायकाची कथा आहे. भोळा भाबडा नायक आणि श्रीमंतांचे क्रूर जग यातील संघर्ष या कथेचा गाभा. राजकुमार( राज कपूर) हा प्रामाणिक पण गरीब मुलगा आहे. तर कथेची नायिका आरती (नूतन) ही श्रीमंत कारखानदाराची एकुलती एक वारस आहे.
आरतीचे काका तिला रीतिरिवाज शिकवण्याच्या क्लास मध्ये घालतात. त्या क्लास मध्ये जाताना हे गीत येते. सायकलवर जाणाऱ्या मुलींचा घोळका गाणे म्हणत , हसत खेळत निघालेल्या आहेत.
बनके पंछी गाये प्यार का तराना
मिल जाये अगर कोई साथी मस्ताना
तारुण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या या युवती. कुणीतरी भेटावे आणि आपण त्याचे व्हावे ही मनीषा या वयात असणारच.
आयुष्याचा सोहळा करणारे हे गीत. त्यांचे चेहेरे आनंदाने एवढे फुलले आहेत की ते पाहून आपल्याही चेहेऱ्यावर तो उमटतो.
या घोळक्याचे नेतृत्व करणारी आहे ती हसरी आनंदी, उत्साहाने बहरलेली नूतन .
त्या काळात सायकल म्हणजे स्वातंत्र्याचे प्रतीकच होते. पहिल्यांदाच घराबाहेर पडलेले पाऊल, खुणावणारी स्वप्ने आणि त्याच्याकडे होणार तो दोन चाकांवरील प्रवास .
मंझिल पे आये कोई, नैना मिलाये कोई
भर दे ये उल्फत की झोलीयां
पण त्याला शोधायचे कसे ! तर जो कुणी फुलांसारखा रंगीत रुमाल देईल तोच.
आम्ही सातवी आठवीत असणार.
शाळेला सुट्टी पडली की बाबू सायकलवाल्याकडून भाड्याने सायकल घ्यायची आणि शिवाजी पार्क च्या प्रदक्षिणा करायच्या हा आवडीचा उद्योग होता.
नुकते वयात आलेलो. बाहेरचे जग आता काळे पांढरे नसून, गुलाबी होण्याची सुरुवात होती. सायकल वर बसून हॅण्डल धरले की जग मुठीत आले आणि पायात बळ आले असा उगाच आत्मविश्वास वाटायला लागला होता. तीन चार जण एकत्र फिरायचो ; त्यामुळे जरा जास्तच धिटाई अंगात आलेली. गरागरा पेडल मारताना ओठावर गाणे असायचे,
आई हसीनों की टोलियां
. बोले पिया मिलन की बोलियाँ
मंज़िल पे आये कोई नैना मिलाये कोई. भर दे ये उल्फत की झोलियाँ.
बनके पंछी गाये प्यार का तराना
खरंतर वयात येणाच्या उंबरठ्यावर होतो आम्ही . निरागस बालपण तसे चिकटलेले होतच. हे आमच्या तारुण्याचे गीत नव्हते. एवढे मोकळे ढाकळं आयुष्य होते, आमच्या सर्वाचेच बालपण खरंच आनंदी होते. चांगले पालक , सुखवस्तू घर आणि सुरक्षित आयुष्य होते म्हणून असेल , This was like celebrating such life.
माझ्या आधीच्या पिढीची नूतन , आम्ही खरेतर मै चली मै चली म्हणणाऱ्या सायरा बानूची नक्कल करायला हवी होती पण नाही झाले तसे .
अजूनही सायकल गीत म्हंटले की मला आनंदी, उत्साहाने मुसमुसलेली, हसरी नूतन आठवते .
७) जगाचा कुठलाच वाईट अनुभव नसलेल्या , दुःखाचा आणि गरिबीचा स्पर्शही न झालेल्या या मुलीचा परिचय राज कुमारशी होतो आणि त्याच्या प्रामाणिक पणाने ती त्याच्याकडे आकर्षित होते. आधी चेष्ठा म्हणून आपण गरीब असल्याची बतावणी तिने केल्याने , तो तिच्या प्रेमात पडतो. ती साधी असते, सुंदर असते आणि गरीब ..त्याच्यासारखीच आणि ओळखीचा हा प्रवास प्रेमाच्या दिशेने जातो . तेव्हा हे गीत येते. 
दिल की नज़र से.
———————-
प्रेम व्यक्त करणे हे सोपे नाही. अबोल आणि लाजऱ्या व्यक्तींसाठी तर नाहीच. मुळात आपल्या भावना प्रत्येकाला शब्दात सांगता येत नाहीत आणि डोळ्यांची भाषा समजायला हृदयाला डोळे फुटावे लागतात ..ती नजरच वेगळी .
क्यों बेखबर, यूँ खिंची सी चली जा रही मैं
ये कौन से बन्धनों में बंधी जा रही मैं
कुछ खो रहा है, कुछ मिल रहा है
ये बात क्या है, ये राज़ क्या है, कोई हमें बता देदिल की नज़र से.
हे गीत एवढे हळुवार गायले आहे! राज च्या डोळ्यात प्रेम आहे , आदर आहे आणि फार क्वचित दिसणारी भक्ती आहे.
प्रेमात झुकणे , पुरुषांना जमत नाही . समर्पण हा पुरुषांचा प्रांत नाहीच. .त्यासाठी समोर त्याच ताकदीची स्त्री लागते.
माझ्या प्रेमाचं गीत कसं असावे हा विचार केला तर असं असावं असे मनापासून वाटणारे गीत !
अभिनयाला फार वाव नसूनही ती काही सिनेमात विलक्षण गोड़ दिसली ..
त्यातला एक म्हणजे , “ दिल्ली का ठग “
८) ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा
————————————————
वाल्ट्झ च्या तालावर याची सुरवात बेतली आहे पण बॉलरूम नाही , गच्ची आहे. किशोरचे माकडचाळे तिला सहन होत नसतीलही पण एका क्षणाला तिला समजते की तो वरवरचा मुखवटा …त्याच्या आत एक उत्कट प्रेमळ माणूस दडला आहे आणि मग तिचे गुणगुणणे त्याच्या स्वरात मिसळून जाते .
मनातले गुपित सांगणे सोपे नसते.समोरच्या व्यक्तीचा अंदाज असला तरी खात्री नसते.मग सुरुवात करायला भलत्याच गोष्टी बोलल्या जातात.
इथे किशोर हवापाण्याच्या गप्पा मारायला सुरुवात करतो. ती आणि तो घराच्या गच्चीवर उभे आहेत. दाटून आलेला काळोख आणि अस्वस्थ करणारा एकांत .
नूतन , किशोरला घरी जायला सांगते. हीच तर वेळ आहे मनातले सर्वच सांगण्याची. ही संधी गमावायची नाहीच. तिच्या खोट्या रागाकडे लक्ष न देता , आपले हात फैलावून तो म्हणतो .
“ ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा”
Talking about irrelevant things is important. हवा , पाणी , ऋतु , अगदीच हुशार असेल तर साहित्य , संगीत .. तुमची स्वप्ने … आपल्याला कुणीतरी याच्या योग्य समजतंय किंवा एवढा विश्वास टाकतंय ह्याने समोरचे अंतर पटकन कापले जाते. रागाची जागा , आता खोडकर हास्य घेते . हा किशोरचा आवाज, का वातावरणातला गारवा ? कदाचित दोन्ही. तिचा हा नवीन पवित्रा त्यालाही नवीन.
त्याला आश्वस्त करताना, हळूच त्याच्या सुरांना जोडून तिचे स्वर येतात.
“ कहा दो दिलों ने, कि मिलकर कभी हम, ना होंगे जुदा”
That smile of hers is reliable, caressing and lovely ..कोणत्याही प्रेमिकाला आश्वस्त करणारे स्मित .
९) जोगी जबसे तू आया मेरे द्वारे (बंदिनी)
——————————————-
जेव्हा दोन व्यक्तींचे भेटणे वरूनच निश्चित होतं तेव्हा पृथ्वीवरील कोणीही ते थांबवू शकत नाही. हा स्वर्गीय अपघात असतो.
एका लहान गावात राहणारी, सज्जन पोस्टमास्टरची, सुसंस्कृत मुलगी कल्याणी. तिला आई नाही. बाप-लेक आपल्या छोट्याश्या जगात खुश आहेत. अशावेळी, तिच्या साध्या, संथ आयुष्यात बिकाशचा, एका क्रांतिकारकाचा प्रवेश होतो आणि कल्याणीचे साधे, सरळ जगच रंगीत होऊन जाते. 
जोगी जबसे तू आया मेरे द्वारे
मेरे रँग गए सांझ सकारे
तू तो अँखियों में जाने जी की बतियाँ
तुझसे मिलना ही ज़ुल्म भया रे
स्वातंत्र्यापूर्वीची ही कहाणी “ बंदिनी “
नायक आहे एक स्वातंत्र्यसैनिक. त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्याच्यावर सरकारची सक्त नजर आहे. कल्याणीच्या वडीलाना त्याच्याबद्दल, त्याच्या कार्याबद्दल आदर आहे आणि ते सरकारी नोकरीत असल्याने बिकाशचे त्यांच्याकडे येणे जाणे आहे. एक महत्वाचा निरोप पोहोचवण्याची जबाबदारी कल्याणी वर सोपविली जाते.
बिकाशचे निवासस्थान काटेरी तारांनी वेढलेले. खिडकीच्या गजांच्या साक्षीने त्यांची पहिली नजरभेट होते.
प्रीतीचा हा मार्ग काट्यांनी भरलेला आहे हे जणू नियती सूचित करते.
नियतीच्या जेव्हा मनात येते, तेव्हा, स्वतःलाही काय होते हे समजत नसताना, अल्लड वय प्रेमाला साद घालते. धोक्याचे संदेश चारी बाजूनी ऐकू येत असतात पण तरुण वय ते मानत नाहीत. आयुष्य एका वेगळ्या दिशेला जाते आणि कितीही प्रयत्न केला तरी ते बदलणे कोणी थांबवू शकत नाही.
कवी शैलेंद्र यांनी “जोगी“ हा शब्द हेतुपरस्पर वापरला आहे. संन्यासाची आयुष्य समाजासाठी समर्पित असते.अशा जोगींच्या वर जीव ओवाळून टाकणे म्हणजे सुखाच्या पांघरुणाखाली दडलेल्या दुःखाला कवटाळणे.
“तू तर माझ्या नजरेची भाषा सुद्धा जाणतोस. तुला भेटणे हा तर गुन्हाच घडला की “
तिच्यासाठी ही गोड़ तक्रार पण निरासक्त जोगीला प्रेमात अडकवणे हा अपराधच नाही का !
तरुण स्त्री आणि संन्यासी यांचा बंध अनेकवेळा साहित्यात दिसतो.
सतीच्या मृत्यनंतर, कर्पूरगौर शंकर, सर्वांगाला राख फासून स्मशानात जातो. या रूपावर भाळून हिमालय कन्या उमा त्याला परत संसारात आणते ती तपस्विनी बनून. केवळ या प्रेमाच्या शक्तीमुळेच भौतिक सुखांचा त्याग करणे तिला सहज शक्य होते
स्थैर्याचा मोह बाजूला सारणे ही तपस्याच आहे. उमेसारखीच, विरक्तीची आसक्ती राधेने निभावली. कृष्णासारख्या कर्मयोगीची प्रेयसी होऊन तिने विरहाशीच प्रेमाचे नाते जोडले.
कल्याणीचे पाऊल सुद्धा याच वाटेवर पडले आहे.
कल्याणीचे वडील वैष्णव कवितांचे अभ्यासक . यामुळे या गीतांवर वैष्णव कवितांचा , प्रतिमांचा प्रभाव आहे.
याच सिनेमात गुलजार यांचे पहिले गीत आहे .
१०) “ मोरा गोरा रंग लैले “
————————-
पांढरा म्हणजे पवित्रता असे समीकरण आहे आणि पवित्र म्हणजे सुंदर. गोरेपणासाठी मुली जीव टाकतात …
मुलीचा रंग गोरा असेल तर पत्रिकेतील छत्तीस गुणांपैकी अठरा तरी आधीच जुळतात …
गोरेपण देणाऱ्या क्रीमचा ज्या देशात सर्वाधिक खप होतो त्या देशात राहूनही कल्याणी विनविते,
मोरा गोरा रंग लैले, मोहे शाम रंग दैदे
आता हा सावळा रंग का ?
प्रेमात पडले म्हणून काही प्रियकराला भेटणे सोपे आहे का ?
जगापासून लपण्यासाठी ती म्हणते “मला शाम रंग दे कारण रात्र तिच्या अंधारात मला लपवू शकेल …”
एक लाज रोके पैयाँ
एक मोह खींचे बैयाँ
तिच्या आवाजात संकोच आहे , दुविधा आहे. लाजेने पाऊल अडखळत आहे आणि त्याला भेटायची ओढ तर तिला थांबू देत नाही. A classic dilemma …
जेव्हा मन अशांत असते तेव्हा सुखावणारा चंद्र सुद्धा नकोसा होतो आणि मग ती लटक्या संतापाने म्हणते, “ माझी मस्करी करतोस ?? थांब तुला राहूचे ग्रहण लागू दे 🙂
मला यात आवडते ते शेवटचे कडवे.
कूछ खो दिया है पायके ,कूछ पा लिया गवाय के
शेवटी प्रेम म्हणजे तरी काय! काहीतरी गमवायचे आणि त्या बदल्यात बरेच काही मिळवायचे ही.
कल्याणीला मात्र जबरी किंमत द्यावी लागते. बिकाशला गाव सोडून जाणे भाग पडते. गावात कल्याणी आणि बिकाशच्या प्रेमप्रकरणाचा बोभाटा झालेला असतो. अफवांना ऊत येतो आणि याला कंटाळून कल्याणी गाव सोडून जाते. नर्सचे काम धरते. एका श्रीमंत पण विचित्र हेकेखोर स्वभावाच्या बाईची नोकरी करत असताना, तिला समजते की ती स्त्री बिकाशची पत्नी आहे. कल्याणीच्या शोधात आलेल्या तिच्या वडिलांचा मृत्यू होतो. नैराश्येत वेढले गेल्याने कल्याणीचा तोल जातो आणि तिच्या हातून या बाईचा खून होतो ..
सिनेमाच्या या भागातली कल्याणी पूर्णतः बदलते.
.निरागस , भाबडी, हसरी , लाजरी कल्याणी हीचा मागमूस सुद्धा आता नाही. व्यवहार, फायदा तोटा हे शब्दही जिच्या कोशात नाही ती कल्याणी आपल्या सुखासाठी धडपडणाऱ्या, तिच्या तब्बेतीची काळजी घेणाऱ्या डॉक्टरवर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही .
माझ्यावर उपकार करून तुमचा काय फायदा होणार आहे हा प्रश्न तिच्या मनात येतो.
तुरुंगात गेलेली कल्याणी फार वेगळी आहे. अबोल, कामात मग्न आणि जगापासून दूर. एकटी.
तुरुंगात आहेत त्या दगडी भिंती. त्यांना इथल्या रहिवाश्यांच्या सुख दुःखाचे सोयरसुतक नाही.
येथे राहणारी माणसेही तशीच. निर्विकार , कोंडलेली शरीरच नाही तर कोंडलेली मने घेऊन जगणारी. ,,
११ ) अब के बरस भेज भैया को बाबुल सावन ने लीजो बुलाय रे
लौटेंगी जब मेरे बचपन की सखियाँ दीजो सदेशा भियाय रे
——————————————————-
हे गीत नूतनच्या तोंडी दिलेले नाही. शक्यही नाही. तिचे माहेर तर शिल्लकच नाही. ना भावना , ना आशा.
आठवणींच्या सावल्यानी वर्तमानकाळ अजूनच काळवंडून आला आहे. भविष्याची किरणे ही त्या अंधाऱ्या कोठडीत येण्याची शक्यता नाही.
हे दुःख सुद्धा जाणवत नाही याच्या पलीकडे गेलेला कल्याणीच्या चेहेरा.
बंदिनीच्या नक्की कोणत्या दृश्याला अवॉर्ड द्यायचे हा प्रश्न जज्ज ना पडला असेल एवढा हा सिनेमा देखणा आहे.
कल्याणीची कथा समजल्याने जेलरला सहानुभूती वाटते. तिची शिक्षाही कमी होते.
डॉक्टरच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी ते कल्याणीचे मन वळवतात,
प्रेमाचा स्विकार सहज करता येणे शक्य नसते. ते यशस्वी होईल का, त्याला मान्यता असेल का, ते निभावले जाईल का, अशा अनेक प्रश्नांचा गुंता होतो मनात. प्रितीचा हा अनोळखी आनंद, अनेक शक्यतांचे दुःख घेऊनच जन्माला येतो. ती साशंक आहे, गोंधळली आहे यात नवल नाही. तरीही तिच्यासाठी दुसरे जग नाहीच. ह्या जगात तिचे म्हणण्यासारखे कुणीही नाही ..
पुढे आलेल्या उज्वल भविष्याकडे तिचे पाय वळतात आणि बिकाशच्या रूपाने पुन्हा एकदा तिचा भूतकाळ तिची परीक्षा बघतो .
१२ ) मो रे साजन है उसपार
—————————–
माणसाला पर्याय घेता येतो? शक्य असेल तरी जमते? देवेन आणि बिकाश …
एकीकडे संपन्न आयुष्य आणि दुसरीकडे अनिश्चितता …
एका बाजूला तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा , एकनिष्ठ प्रियकर …दुसर्या बाजूला ज्याच्यामुळे पूर्ण आयुष्यच अंधाराच्या गर्तेत चिरडले गेले असा प्रियकरच …
प्रेम का कर्तव्य हा झगडा नाहीच आहे इथे …
सुखी , समृद्ध आयुष्य का प्रेम असा विषम सवाल … हृदय आणि मेंदू चा न संपणारा वाद .
एस डी बर्मन चा आवाज ,ज्याच्या आवाजातील खोली मोजता येत नाही , अंधारातून कदाचित प्रकाशाकडे जाणाऱ्या एकाकी स्टीमर ची काळीज हलवणारी शिटी , आणि मनाची होणारी तगमग ….
Her emotion is so deep, something elementary, basic touches me at different levels of my existence, when I watch this scene.
तिथेच जे “Good luck tea center” आहे ते पाहून असे वाटत्ते , आता तरी हे शब्द खरे ठरुदे.
चित्रपटाच्या शेवटी सुस्थिर, सुखी जीवनाचा त्याग करून, कल्याणी जेव्हा आपल्या पहिल्या प्रेमाची साथ करते तेव्हा समजते, वैराग्याला मिठीत घेणे ही सोपी गोष्ट नाही. ह्या करीता, जगण्यासाठी, आवश्यक असलेल्या व्यवहाराशीच, नाते तोडावे लागते.
एका जोगीवर प्रेम करणारी, कल्याणी शेवटी बैरागन बनून भोवतीच्या वास्तवाची हद्द सहज ओलांडून जाते.
बिमल रॉय यांच्या नायिका , मग ती सुजाता असो किंवा कल्याणी, परिस्थितीच्या घेऱ्यात सापडलेल्या आहेत पण त्यांना त्यांचा आवाज आहे. एक आत्मिक बळ आहे. या स्थितीत सुद्धा त्या उभ्या राहतात. कुणाच्या साहाय्याची अपेक्षा न करता उभे राहण्याची त्यांची क्षमता त्यांनी टिकवली आहे.
भौतिक गोष्टीपासून दोघेही पुढे निघून आलेल्या आहेत. समर्पणाची भावना त्यांच्या अंगात भिनलेली असताना सुद्धा त्या वाहवत जात नाहीत. मनाची खात्री होईपर्यंत थांबण्याचा त्यांच्यात संयम आहे आणि एकदा ती झाली की कुणालाही न जुमानता स्वतःला झोकून देण्याचे धैर्य ही त्यांच्या अंगी आहे.
बिकाशने जे केले ते देशासाठी. ज्यात त्याचा स्वतःचा स्वार्थ नव्हता. एकप्रकारे त्याचेही जीवन होरपळून गेले आहे हे जेव्हा कल्याणीला समजते तेव्हा एक सुखी वैवाहिक जीवनाचे दान नाकारून ती आजारी बिकाशचा हात धरते.
परंपरेचा त्याग करणारी कल्याणी प्रेमाच्या बंधनात अडकते.
नूतनला या भूमिकेसाठी फिल्म फेअर अवॉर्ड ने गौरवले गेले तेव्हा खरेतर हा त्या पारितोषिकाचे सन्मान होता.
To be continued
Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

प्रिया
नूतन खूप आवडती.
आज तिचा वाढदिवस.
६ फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारी.
व्यक्ती आणि नटी तिने लांब ठेवली.
👌👌👌
खूप खूप सुंदर लिहिलं आहेस.
Vidula, Thank you:)
नेहमी सारखे अप्रतीम. प्रत्येक गाण्याचे वर्णन, मूड फारच छान.
Mandar ji , Thank you.
नेहमी प्रमाणे च अभ्यास पूर्ण लेख!!!नूतन च्या कारकीर्द च अभिनय च वेगवेगळ्या भुमीका च अगदी यथोचित गोषवारा तुम्ही लेखात मांडला आहे!!!!! त्यांच अभिनय चे बारकावे कंगोरे अगदी व्यवस्थित तुम्ही नेमके समोर आणले आहेत!!!!!!गाण्याची निवड अर्थातच साजेशी च आहे!!!!!!!छान लेख!!!!!!!!!!!!
Thank you so much Anand ji.
दुर्गा खोटे, मिनाक्षी शिरोडकर, शांता जोग, शोभना समर्थ या अभिनेत्रींनी हिंदी मराठी चित्रपट सृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं या मांदियाळीत एक घरंदाजपणा होता. त्याच पंक्तीत आपला खानदानीबाज जपत अभिनय साकारणाऱ्या नूतनची बातच और. सहजसुंदर वावर, तितकाच सहज- नैसर्गिक अभिनय , डोळ्यांची अदाकारी आणि कुठलाही अतिरिक्त अभिनिवेश नसणारी सोज्वळ नूतन.
एक से बढकर एक गाणी निवडलीत प्रिया दी आजच्या या लिखाणाने नूतन नव्यानेच कळली. किती सुंदर छटा वर्णन केल्यात तुम्ही.!
फार फार सुरेख लिहिलंय 👌👌💕♥️💕
Thank you so much .
मराठी अभिनेत्री ने आपला आब जपला अन अभिनय क्षेत्र गाजवले