Skip to content

कौन सा रंग देखोगे! 

बहुरंगी आशा
भाग २

प्रेमाचे अनेक रंग असतात. वात्सल्य , शृंगार , कोवळीक , निरपेक्ष , निर्वाज्य , लाजरे.
आशा ताईंच्या गळ्यानी हे आव्हान तर पेललेच, त्यांची असंख्य अप्रतिम दर्जेदार प्रेमगीते आहेत पण वासनेला सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या रंगाने नटवले. हेलन , बिंदू , पद्मा खन्ना ची गाणी ऐका . ती जरी क्लब सॉंग्स असतील तरी त्याला कथा आहे आणि ती एकमेकांपासून वेगळी आहे.
ह्या गीतात मोह आहे, पराकोटीची आसक्ती आहे, सूड आहे , फसवणे आहे , मुखवटा आहे ..कधीतरी स्पष्ट दिसणारी वासना आहे आणि एवढे असूनही ती विलक्षण आकर्षक आहे.
नाट्यगीते ते डिस्को हा प्रवास लीलया करणारा गळा फक्त परमेश्वराने बनवला नाही, त्याच्यामागे प्रचंड बुद्धिमत्ता आहे ,
मेहेनत आहे आणि जिद्द आहे.

८) गूढ ( haunting )
——————————–
लता मंगेशकर यांचे कोणते गाणे तुम्हाला गायला कठीण वाटते या प्रश्नाचे उत्तर आशा ताईंनी ” आजा रे मै तो कबसे “ हे गीत सांगितले होते. त्या गीतातील  गूढता प्रयत्न करूनही आणता आली नाही याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती.
Ghostly melodies या गायला कठीणच. या दुनियेत नसलेल्या लोकांचा आवाज कुणालाही कसा काढता येईल! त्या आवाजात तेवढा वेगळेपणा , आकर्षून घेण्याची शक्ती हवी.
आशा ताईंनी आपलेच  हे गीत ऐकले नसावे का!

ये ही वो जगह है, यही वो फ़िज़ा है
( सिनेमा -ये रात फिर न आयेगी , संगीतकार- ओपी नय्यर, गीतकार एस एच बिहारी)

हिंदी सिनेमातील भूतकथेत एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे अकाली निधन पावलेल्या नायिका परत जन्म न घेता, इथेच अडकून राहतात आणि आपल्या प्रियकराला झपाटतात. इथेही तीच कथा आहे. शर्मिला आपल्या प्रियकराला त्याच्या भूतकाळात घेऊन जाण्याचा प्रयत्न करते.
त्यांनी भेट दिलेल्या जागा , दिलेली वचने यांची आठवण करून देते.

यहीं पर मेरा हाथ, हाथों में लेकर
कभी ना बिछड़ने का, वादा किया था
सदा के लिये हो गए हम तुम्हारे
गले से लगा कर हमें ये कहा था
कभी कम ना होंगी हमारी वफ़ाएं
यहीं पर कभी आप हमसे मिले थे
यहि वो जगह है …
अर्थात तो माणूस असल्याने दिलेली वचने  विसरून गेला आहे. 
भूतकथेला स्मरून चित्रीकरणात धुके आहे, त्याला matching असा तिचा सफेद पोशाख आहे, आणि देखणे भूत आहे.
या गीतात सर्वात सुंदर आहे तो आशाचा आवाज. काहीसा आर्त पण गूढ, खेचून घेणारा, पारलौकिक आवाज.

९) आश्वासक
————————
सुख और दुख के रास्ते
(सिनेमा -हम दोनो, संगीतकार -जयदेव , गीतकार – साहिर लुधियानवी)

या व्यावहारिक जगात निरपेक्ष प्रेम हा शब्द शब्दकोशातच अस्तित्वात असावा. हिंदी सिनेमाच्या आभासी जगात सुद्धा फार कमी गाणी या प्रेमावर लिहिली गेली आहेत.
“हम दोनो” या सिनेमातील नायक नायिकेचे एकमेकांवर प्रेम तर आहे, एकमेकांवर विश्वास सुद्धा आहे पण दोघांच्या परिस्थितीत तफावत आहे. ती श्रीमंत, त्याचे अजूनही बस्तान बसलेले नाही, अशावेळी ती आपल्याबरोबर राहू शकेल का, समाजाने उभारलेल्या भिंती तिला तोडता येतील का या शंकेने तो ग्रासला  आहे .
काही काळापूर्वीच त्याने तिला विचारले होते,

कि ज़िंदगी की राह में, जवाँ दिलों की चाह में
कई मुक़ाम आएंगे जो हम को आज़माएंगे
बुरा न मानो बात का ये प्यार है गिला नहीं

ही तक्रार नव्हती. त्याचा स्वतःवरील विश्वास डळमळीत झालेला होता. आता काळाने तिच्यापुढे हे आव्हान उभे केलं होते.
आपले प्रेम, आपला विश्वास, आपली सोबत देऊन ती त्याला सांगते,

ख़ुशी मिले हमें कि ग़म, जो होगा बाँट लेंगे हम
मुझे तुम आज़माओ तो, ज़रा नज़र मिलाओ तो…
ये जिस्म दो सही मगर, दिलों में फ़ासला नहीं
जहाँ में ऐसा कौन है, कि जिस को ग़म मिला नहीं

“अभि न जाओ छोडकर” हे हसरे गीत गाजले आणि हे मात्र मागे पडले. जहाँ में ऐसा कौन है, कि जिस को ग़म मिला नहीं
या शब्दांनी  “बुद्धाच्या दुःख नसलेल्या घरातून मीठ आण” या कथेला सूर दिले आहेत.

१०) मिस्कील
————————
“निगाहें मिलाने को जी चाहता है “
(सिनेमा – संगीतकार -रोशन , गीतकार- साहिर लुधियानवी)

नजरेचा कटाक्ष काय करतो हे अनुभवायची गोष्ट आहे.
आणि हा कटाक्ष एकाचवेळी खट्याळ होतो आणि दुसऱ्याच क्षणाला मोहक. नजरबंदी होणार नाही तर काय !
हृदयाचे पाणी पाणी होत असताना ती त्याला सांगते .

निगाहें मिलाने को जी चाहता है
सिनेमातील खलनायकासमोर नायकाला गुपित सांगणे की कुणीतरी माझ्या हृदयात वस्तीला आले आहे आणि खलनायकाचा संभ्रम नायकाबरोबर एन्जॉय करणे याला खट्याळपणा म्हणायचं की  दुष्टपणा !
पण तिच्या डोळ्यात चमक आहे , ओठावर हास्य आणि पुढे होणाऱ्या गोंधळाची ती नांदी आहे .
प्रेमाच्या या उघड कबुलीमुळे एका माणसाचा जीव फुलून आला आहे पण तिच्या मनात तो नाही हे तिला आणि तिच्या प्रियकराला माहिती आहे . तरीही उगाच गैरसमज होऊ नये म्हणून आपला पडदा बाजूला करून ती खुल्या मैदानात उतरून प्रेमाची कबुली देते ,

जिस घड़ी मेरी निगाहों को तेरी दीद हुई
वो घड़ी मेरे लिए ऐश की तमहीद हुई
जब कभी मैंने तेरा चाँद सा चेहरा देखा
ईद हो या कि न हो, मेरे लिए ईद हुई

शेवटची सरगम खरेतर शास्त्रोक्त पण इथेही नूतनच्या चेहेऱ्यावरील  खट्याळ भावाशी आशाचे सूर स्पर्धा करतात.
“जब कभी मैंने तेरा चाँद सा चेहरा देखा”  ओळीत चांद हे राज कपूरला उद्धेशून म्हंटले आहे. चंद्राची उपमा बहुधा स्त्री ला देतात. इथे आपल्या पुरुषी प्रियकराला चंद्राची उपमा देताना नूतनच्या स्टेप्स थोड्या धीट होतात आणि तोच थोडासा पुरुषी बाज आशाच्या स्वरात येतो ..मुद्दाम हे गाणे ऐका . चित्रपटातील एका पात्राला जेव्हा सूर दिला जातो तेव्हा अभिनय तुमच्या डोक्यात आणि गळ्यात असणे आवश्यक असते.

वो तोहमत जिसे इश्क़ कहती है दुनिया
वो तोहमत उठाने को जी चाहता है

प्रेम करणे हा जगासाठी गुन्हा आहे पण हे लांच्छन सुद्धा स्विकारणे प्रेमीला मंजूर आहे. दुसऱ्या वेळी, ही ओळ गाताना प्रत्येक शब्दांवर आशा ताईंनी जोर दिलेला आहे ..प्रत्येक शब्दाला त्यामुळे वजन आलेले आहे.
गाणे समजून घेऊन ते सादर करणे कसे त्याचा नमुना आहे हे गीत . 

पावलो कोएल्हो चे एक वाक्य  आहे, 
“I am two women: one wants to have all the joy, passion and adventure that life can give me. The other wants to be a slave to routine, to family life, to the things that can be planned and achieved. I’m a housewife and a prostitute, both of us living in the same body and fighting with each other.” 

लता बाईंनी  आवाज  दिलेली  नायिका  ही पन्नाशीच्या  दशकातील. देश नुकताच  स्वतंत्र  झालेला, देशाच्या बांधणीत कुटुंबाची बाजू धरून देणारी नायिका . त्यात स्वतंत्र  विचाराची, स्वतःच्या गरजांचा अंदाज असणारी, त्या स्पष्ट  बोलण्याचे धाडस असणारी  विरळाच . 
तिला आवाज देण्याचे  धाडस आशा ताईंनी केले. त्याची  सुरवात ओपीं च्या संगीत  दिग्दर्शनाखाली  झाली. भारतीय नायिका (मी खलनायिका म्हणत नाही  आहे) बोल्ड व्हायला सुरुवात झाली . 
११) )मोहकता
————
आईये मेहरबां
सिनेमा-हावडा ब्रिज, संगीतकार -ओपी नय्यर, गीतकार कमर जलालाबादी)

बोल्ड मुलगी ,म्हणजे चाकोरीत न बसणाऱ्या मुलीचे आकर्षण अनेकांना असते. मोकळी असणे म्हणजे सहज मिळू शकते असा एक समज आहे. समाजाची पर्वा न करणारी, नावीन्याचे आकर्षण असणारी,  स्वतःच्या मर्जीने  निर्णय घेऊ शकणारी मुलगी रूढी आणि नियम यात बांधलेल्या पुरुषाला भुरळ पाडते . तिच्याबरोबर कोणतीही फँटसी , नुसती फँटसी राहत नाही.  बंधनातच अडकून राहण्याची इच्छा नसल्याने, बेबंद आणि बेधुंद जीवन जगण्यासाठी त्यांची तयारी असते. Men feel more alive with them .
महल सिनेमात मधुबाला खूप लहान आहे.कोवळी मुलगी.
हावरा ब्रिज मध्ये तरुण स्त्री आहे. नाईट क्लब सिंगर.
इथे येणाऱ्या लोकांनां आपल्या सुंदरतेची भुरळ घालून पैसे कमावणे हा तिचा व्यवसाय आहे.  आशाचा आवाजही तसाच.
खट्याळ, मोहक आणि आकर्षून घेणारा..

कैसे हो तुम नौजवाँ, इतने हसीं मेहमान
कैसे करूँ मैं बयाँ, दिल की नहीं है ज़ुबाँ
आइये मेहरबाँ, बैठिये जाने-जाँ
शौक़ से लीजिये जी, इश्क के इम्तहाँ

स्त्रियांच्या आतापर्यंत न बोलल्या गेलेल्या, दबलेल्या इच्छांना आवाज देण्याचे काम आशाच्या आवाजाने केले. A woman expressing her own sexuality. आईए मेहरबां हे उघड निमंत्रण आहे. “आईए “ या शब्दावर जो दाब दिला आहे त्यात she invites you to share that freedom , to be completely yourself , to relax without worrying about the formality.
एडना( मधुबाला) ला आपल्या सौन्दर्याची जाणीव आहे. पुरुषांवर काय परिणाम होतो याचीही कल्पना आहे. एक गायिका असल्याने जमलेल्या सर्वच लोकांसाठी जरी ती गात असली तरी त्या गाण्याचे शब्द मात्र प्रेमकुमार (किशोर कुमार) साठी आहेत,
“आईए”
“शौक़ से लीजिये जी. इश्क के इम्तहाँ. “ जे आमंत्रण आहे आणि आव्हान सुद्धा.

देखा मचल के जिधर,बिजली गिरा दी उधर.
किसका जला आशियाँ. बिजली को ये क्या खबर.
जितकी मधुबाला आपल्या सौन्दर्याच्या परिणामांबाबत बेफिकीर आहे , तोच परिणाम आशाच्या सुद्धा मोकळ्या आवाजात आहे.

१२)मादक
———-
हिंदी सिनेमातील नायिका  सुरुवातीला सोज्वळ, सरळ मार्गी, चारित्र्यवान, देवी सदृश्य होती. आशा ताईंच्या नायिकेचे भावबंध गुंतागुंतीचे,समाजाच्या अपेक्षांच्या बाहेर जाणारे आहेत. She is a  complex women. सदोष, मादक आणि मानवी. त्यांच्या गाण्यांनी स्त्रियांच्या भावनांना व्यक्त व्हायला जागा दिली. ह्या भावना केवळ मानसिक राहिल्या नाहीत तर अश्लील न होता सुद्धा  शारीरिक झाल्या. 
सत्तरीच्या दशकात नायिका जास्त आधुनिक झाली. केवळ वेशभूषाच नाही तर मानसिकता बदलली . She became vocal about her needs.  या काळात परवीन बाबी , झीनत अमान या नायिकांचा उदय झाला. हे रूप अत्यंत आधुनिक. आधुनिक कपडे, आणि आधुनिक भाषा .
गाण्याचा बाज बदलला .पाश्चात्य  सुरावली बरोबर शब्द धीट झाले.

जवान जान-ए-मन हसीन दिलरुबा
(सिनेमा- नमक हलाल , संगीतकार- बप्पी लाहिरी, गीतकार- अंजान)

शशी कपूरला फसवायला परवीन बाबी ची निवड झाली आहे. It’s a trap. पार्टी मध्ये गेले जाणारे गाणे असेल तरी ते एका व्यक्तीसाठी आहे.
शिकार खुद यहाँ शिकार हो गया ..ह्यात धमकी अध्याहृत असेल तरीही शिकार कुणाची ह्याचे उत्तर फक्त नियतीला माहिती आहे.
थोडे flirting , थोडी बतावणी पण ह्यात तिचा सहभाग तिच्या मर्जीने नाही. ती एक कळसूत्री बाहुली आहे आणि त्यामुळेच या राजबिंड्या पुरुषाला आपण फसवतो  आहे ह्या बद्दल तिला दुःख आहे. त्याच्या रूपाचा , त्याच्या अदबीने वागण्याचा प्रभाव सुद्धा तिच्यावर पडला आहे .
तीच तर शिकार होत नाही ना इथे ! प्रेमाचा खेळ अद्भुत असतो तो असा .

आई दूर से देखो दिलरुबा ऐसी
तिरू-तिरू-तिरू
खाई बेज़ुबाँ दिल ने चोट ये कैसी
अरे वो आ आ मिली नज़र
अरे ये आ आ हुआ असर
नज़र-नज़र में ये समाँ बदल गया
चलाया तीर जो मुझी पे चल गया
ग़ज़ब हुआ ये क्या हुआ ये कब हुआ
न जानूँ मैं न जाने वो
दीर्घ श्वास, थोडीशी धाप, उसासा, दबक्या आवाजात हसणे, आशाने गीतात पेरले आहे जे अजिबात विसंगत वाटत नाही.
प्रत्येक अंतरा तिला त्याच्या जवळ नेतो आहे आणि म्हणूनच सुरुवातीचे फ्लर्टींग जाऊन आता तिच्या आवाजात हलकीशी भीती आहे. हे केवळ गाणे नाही ..हा सुरेल संवाद आहे.

१३)कामुक
———
अब जो मिले हैं तो
(सिनेमा-कारवाँ , संगीतकार-आर डी बर्मन, गीतकार-मजरुह सुलतानपुरी)

१९७१ मध्ये प्रदर्शित झालेला कारवाँ हा सिनेमा त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. पाठलागाचा थरार असे दोनच  शब्दात वर्णन करता येईल एवढीच पटकथा पण उत्तम संगीत आणि आशा पारेख, अरुणा इराणींचा उत्कृष्ट अभिनय यामुळे ह्या सिनेमाने तुफान गल्ला जमवला. एक श्रीमंत मुलगी , तिच्या जीवावर उठलेल्या माणसांपासून पळून जाते आणि एका भटक्या लोकांच्या तांड्यात आश्रय घेते. परकी माणसे जवळची होतात, मने जुळतात आणि तुफान संगीत आणि नृत्याचा  अविष्कार 
प्रेक्षकांना सुद्धा खिळवून ठेवतो. 

  अब जो मिले हैं तो
बाहों को बाहों में रहने दे ए साजना
सच्चे कि झूठे हैं
होंठों को होंठों से कहने दे ए साजना
जितेंद्र -आशा पारेखच्या या प्रेमात अजून एक वाटेकरी व्हायला बघत आहे. अरुण इराणी या तांड्यांची सर्वेसर्वा आहे, ती देखणी आहे, धीट आहे आणि तिचे सुद्धा नायकावर प्रेम आहे. एकतर्फी प्रेमाने स्वतःशीच झुरत राहणारी ही सहनायिका नाही. प्रेम सहज मिळत नसेल तर हिसकावून घ्यायचे या नायिकेला माहिती आहे.सहज हार मानायची तिची तयारी नाही.
आतून धुमसत असलेली अरुण इराणी वरून शांत दिसत असली तरी तिच्या नृत्यात आणि गाण्यात ती जिद्द उफाळून आली आहे.

यूँ ही नशा चढ़ता रहे, के तेरा प्यार बढ़ता रहे
ये झूमता साया तेरा, तन पे मेरे पड़ता रहे
तू आ गया जो होश में, क्या होगा फिर, ये भूल जा
अब जो मिले हैं…

कामुकता ही नैसर्गिक भावना आहे आणि तेवढ्याच सहजतेने आशाने ती गाण्यात आणली आहे.
ती व्यक्त करण्यास आशाचे सूर कचरत नाहीत . त्यात आत्मविश्वास आहे, सर्वार्थाने केलेलं समर्पण आहे, आपल्याला आवडणाऱ्या  पुरुषाबद्दल वाटणारी असोशी आहे आणि त्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी आहे.
आसक्तीचे केवढे वेगवेगळे सूर आहेत हे.

ह्या गीतासारखेच “मेरे जीवनसाथी” या सिनेमाचे कॅब्रे सॉंग अत्यंत प्रसिद्ध आहे.
१४)आसक्ती
———–
आओ ना गले लगा ओ ना
(सिनेमा-मेरे जीवनसाथी , संगीतकार -आर डी बर्मन , गीतकार -मजरूह सुल्तानपुरी). 

मेरे जीवनसाथीची सर्वच गाणी सुंदर आहेत. त्यातले हे seduction गीत , हेलनच्या अत्युकृष्ट गाण्यात पहिले असावे. 
गाण्याच्या सुरुवातीलाच आशा तिच्या भुरळ पाडणाऱ्या आवाजात कुजबुजते ..
आओ ना, गले लगाओ न
लगी बुझा दो न ..ओ जाने जां

हे गीत जे स्त्री गाते आहे, तिला आपल्याला जे हवे ते, प्रेमाने किंवा जबरदस्तीने मिळवण्याची सवय आहे. तिला हवा असणारा पुरुष आता तिच्या ताब्यात आहे पण माणूस मिळवता आला तरी त्याचे प्रेम मिळवता येत नाही. भावनेला तुम्ही अधिकाराने जिंकू शकत नाही .
“आओ ना, गले लगाओ न “ मध्ये जिंकल्याचा अहंकार नाही, ही विनवणी आहे. जिच्या दयेवर तो अवलंबून आहे तीच आता याचक झाली आहे.

बहकी, मैं बहकी, मैं बहकी
साजन कस लो इन बाँहों का घेरा
मन ही ना तरसे मिलन के
दिलबर प्यासा-प्यासा तन भी मेरा
मुझको इन बाँहों में ले लो ना सनम
आओ ना…
तिच्या कैदेत तो आहे, असहाय्य आहे पण तरीही तिला हवे ते ती घेवू शकत नाही.
आशाच्या आवाजात प्रेमाच्या नशेने आलेली उब आहे, त्याला मिळवण्याची असोशी आहे आणि त्याला आपण जिंकू शकत नाही या जाणिवेने आलेली याचनाही आहे.

१५))आशा
————
कतरा-कतरा मिलती है
(सिनेमा- इजाजत, संगीतकार-आर डी बर्मन, गीतकार-गुलजार) 

मोहिंदरचे मायावर प्रेम आहे. सुधा  त्याची बालमैत्रीण आहे. आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोहिंदर सुधाशी लग्न करतो. सुधा हे जाणून आहे तरीही ती होकार देते कारण तिचे मोहिंदरवर प्रेम आहे. तो संपूर्ण आपला होऊ शकणार नाही, त्याच्या हृदयातला एक कोपरा मायासाठी असणार हे जाणूनही ती लग्न करते कारण आता, या क्षणाला मोहिंदर तिचा आहे. भूतकाळ किंवा भविष्यकाळाचा विचार करून वर्तमानाकडे पाठ फिरवणे सुधाच्या स्वभावात नाही. आलेल्या क्षणाचा आनंद घेणाऱ्या सुधाचे हे गीत आहे आणि आयुष्यात आलेल्या प्रत्येक आघाताला तोंड देऊन वर्तमानाचे तेवढ्याच जोमाने स्वागत करणाऱ्या आशाताईंचे सुद्धा हे गीत आहे.

इजाजत मधील सुधा ही प्रगल्भ आहे. जे घडणार आहे ते विचार करून स्विकारावे आणि स्विकारलेल्या नात्याला पूर्णार्थाने निभावावे हे ती जाणून आहे. आपण स्वतःवर, स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवू शकतो, त्याला अनुसरून निर्णय घेऊ शकतो परंतु दुसऱ्यांच्या भावभावना आपल्या कक्षेच्या बाहेर असतात मग त्यांना बदलण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा आपल्या हातात जे आहे त्याचा आनंद का घेऊ नये असा विचार या गीतामागे आहे.

कतरा-कतरा मिलती है, कतरा-कतरा जीने दो
जिंदगी है, बहने दो प्यासी हूं मैं, प्यासी रहने दो
रहने दो, ना
कतरा म्हणजे थेंब पण इथे गुलझार काळाची गोष्ट करत आहेत . त्या संदर्भात पाहायला गेले तर कतरा म्हणजे एक क्षण.
मोहिंदर च्या मनात जरी माया असली तरी त्याचे सुधावरही प्रेम आहे आणि तिच्या  वाट्याला आलेल्या त्या प्रेमाच्या क्षणांवर सुधा समाधानी आहे.
आयुष्य म्हणजे वाट्याला आलेल्या क्षणांची बेरीज. अनेक वेळा आपण आपल्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करतो, मोठ्या ध्येयाचा पाठलाग करतो पण त्या वाटेवर असलेल्या छोट्या छोट्या आनंदाचा उपभोग घेणे मात्र विसरून जातो आणि जर मनासारखे दान पडले नाहीच तर निराश होतो.
खरेतर जगणे म्हणजे प्रवास. प्रवासाचे गंतव्य गाठत असताना प्रवासाचा आनंद घेणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.
भले तिच्या वाट्याला आलेल्या  त्या क्षणांनी सुधाची तहान भागत नसेल पण म्हणून काय झाले , ती तृषाच तिचे जगण्याचे कारण आहे.

गेल्या महिन्यात आशाची जेवढी गाणी मी ऐकली त्याच्या कितीतरी पट वैविध्यपूर्ण गाणी आशाने गायली  आहेत. त्या कारकिर्दीचा काळ सुद्धा प्रदीर्घ आहे. एस डी बर्मन -आर डी बर्मन, रोशन-राजेश रोशन, चित्रगुप्त- आनंद मिलिंद अशा संगीतकारांच्या , किशोरकुमार- अमितकुमार, मुकेश -नितीन मुकेश अशा गायकांच्या, तनुजा-काजोल या अभिनेत्रींच्या  दोन दोन पिढ्यांबरोबरआशाने मुख्य गायिका म्हणून काम केले आहे.  संगीतात काळानुसार पडलेला फरक आणि तरीही आशाचे तेवढ्याच ताकदीचे योगदान पाहिले तर गायिका म्हणून तिचा किती उच्च दर्जा असेल याची आपण केवळ कल्पना करू शकतो. अभिनेत्रींच्या बाबतीत सांगायचे झाले तर जेव्हा तिने गाण्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केली तेव्हा तर अनेकांचा जन्म झाला नसेल .
काळानुसार कथा वेगळ्या झाल्या, संवाद बदलले, गीतांनी कात टाकली , संगीताचा बाज बदलला,  पण आशाने या साऱ्या बदलाला समर्थपणे पेलले. कधीही तिचा आवाज विसंगत वाटत नाही पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती ही की तिने काळानुसार स्वतःला बदलवले. कुणीही न तुडवलेल्या वाटा निवडल्या आणि त्यावर आपला ठसा उमटवला.
खडतर मार्ग चालताना आलेल्या प्रत्येक अवघड वळणावर, कोणत्या उर्मीने तिने परत रस्ता बदलला असेल हा विचार करताना माझ्या मनात आले, no matter what , she dared.
आणि तेच तर तिच्या आयुष्याचे ब्रीद वाक्य आहे.

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.






4 thoughts on “कौन सा रंग देखोगे! ”

  1. भारावून टाकते सौ, ओघवती भाषा शैली आणि खिळवून ठेवते तू

  2. Vidula Sahasrabudhe

    प्रिया,
    किती गाणी ऐकलीस?
    एका महासागरातून शोधणं हे खूप मोठं दिव्य च.

    छान निवडली आहेस.
    तुझी एक खास शैली आहे.
    त्याला साजेसा लेख.❤️❤️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *