Skip to content

कौन सा रंग देखोगे!

भाग १ 

बहुरंगी आशा 
————–
आशा भोसले यांनी जेव्हा पदार्पण केलं तेव्हा लता मंगेशकर पडदा व्यापून राहिल्या होत्या. नामांकित नायिका त्यांच्या आवाजात गात होत्या. त्यांच्या आवाजाने सिनेमाचे कमर्शिअल मूल्य सुद्धा वाढत असल्याने अनेक संगीतकारांचा तो प्रथम पर्याय होता. आशाताईंची  सुरवात दुय्यम नायिकेला दिलेल्या गाण्यांनी झाली.
हा काळ कठीण होता. लता मंगेशकरच्या आवाजाशी तुलना हे कारण होतेच पण संगीतकार आणि निर्मात्यांनी त्यांच्या आवाजाची सांगड चौकटीबाहेरील स्त्रियांशी घालून दिली होती. कोठेवाली, कॅब्रे डान्सर, खलनायिका यांचा हा आवाज झाला खरे पण त्या आवाजानी त्या पात्रांना त्यांची स्वतःची ओळख दिली. मादकतेला  लोकप्रिय बनवण्याचे श्रेय आशा ताईंना जाते. 

खलनायिकेला दिला जाणारा आवाज, मुख्य नायिकेचा आवाज बनला तो “नया दौर” या सिनेमात. ओपी नय्यरने या आवाजाला पैलू पाडले, स्वतःची ओळख दिली आणि नंतर या आवाजाने स्वतःचीच चौकट मोडली. जवळ जवळ पंच्याहत्तर वर्षाच्या कारकिर्दीत अंगाईगीते, बालगीते, भजने, प्रेमगीते, कॅब्रे, मुजरा, गज़ल, डिस्को या सर्वांवर आपली मोहर उमटवली.
आशा भोसले म्हणजे आनंद, विजिगीषु वृत्ती आणि लवचिकता यांचे प्रतीक. स्वतःचे आयुष्य, कसलीही खंत न करता, स्वतःला हवे तसे जगणे, ह्या साठी जो खंबीरपणा लागतो तो त्यांच्यात होता. व्यावसायिक आणि खाजगी जिवनात सुद्धा जो संघर्ष त्यांच्या वाट्याला आला, त्यांनी त्यांना अधिकच महत्वाकांक्षी  बनवले.
जसे जीवन वाट्याला आले, ते स्वीकारून त्या स्वतःला घडवत राहिल्या, बदलत राहिल्या आणि चालत राहिल्या.
त्यांच्या व्यावसायिक जीवनात सुद्धा ह्याचे प्रतिबिंब दिसते.
ही पोस्ट आहे ती अनेक भावनांचे दर्शन असलेल्या त्यांच्या गीतांची.

१) वात्सल्य
————
चंदा रे छुपे रहेना.
(सिनेमा -लाजवंती, संगीतकार – एस डी बर्मन, गीतकार मजरुह सुलतानपुरी)

सिनेसृष्टीने आशा भोसले यांना अष्टपैलू गायिका म्हणून गौरवले पण वर्षा भोसले यांनी आपल्या आईवरील लेखात असे म्हंटले होते की त्यांच्या घटस्फोटानंतर इंडस्ट्रीने आशा ताईंना सन्मानाने वागवले नाही. त्यांच्या वाट्याला सुशील, सुसंस्कृत नायिकेची गाणी आली नाहीत. मुजरा, कॅब्रे या गीतांसाठी आशा ताईंचा उपयोग केला गेला. नंतर त्यांनी आर डी बर्मन यांच्याशी लग्न केले आणि त्या अष्टपैलू आहेत याचा इंडस्टीला अचानक साक्षात्कार झाला. अर्थात आशा ताईंचे पहिले लग्न हे दुःखद स्वप्नच होते. त्या अनुभवातून आपण कुणावरही अवलंबून राहायचे नाही ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. आपल्या मुलांना सुद्धा त्यांनी स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आणि निर्णय चुकला तेव्हा त्या, त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.
“छुपे रहना, सोये मेरी मैना, लेके मेरी निंदिया रे, चन्दा रे चन्दा रे” ह्या अंगाईत त्यांच्याच मनाचे प्रतिबिंब उमटले आहे. 

“लाजवंती” ही अशा स्त्रीची गोष्ट आहे जिचा नवरा आपल्या कामात व्यस्त आहे. आपल्या तरुण पत्नीच्या एकाकीपणाची त्याला जाणीव सुद्धा नाही. अर्थात त्या बद्दल तक्रार असली तरी तिचे आपल्या नवऱ्यावर आणि छोट्या मुलीवर प्रेम आहे.
ही अंगाई अतिशय गोड़ आहे. आपल्या मुलीची झोप मोडू नये म्हणून ती चंद्राला ढगाच्या मागे दडायला सांगते, मोगऱ्याच्या फुलाला उमलू नको अशी विनंती करते. 

हाथ कहीं है पाँव कहीं लागे प्यारी प्यारी
ममता गाए पवन झुलाए झूले राज कुमारी
लेके मेरी निंदिया रेचन्दा रे चन्दा रे

माझ्या डोळ्यातली झोप तुला देते पण माझ्या मुलीला निर्धास्त झोपू दे ..मन आश्वस्त  करणारी ही अंगाई आहे.

२)खेळकर
————
चंदा मामा दूर के, पुए पकाये बूर के
( सिनेमा -वचन, संगीतकार, गीतकार – रवी )

चंद्राला बाळाच्या छोट्याश्या विश्वात महत्वाचे स्थान आहे. तो त्याचा मामा आहे.
चंद्र मामाच का, काका का नाही याचं उत्तर बाळाच्या लहानपणात दडलेलं असावं. पूर्वीच्या काळी  माहेरी सतत जाणं शक्य नव्हतं.. वर्षाकाठी काहीच दिवस मुली माहेरी जात असत. कौतुकाने, प्रेमाने त्यांचे लाड पुरवले जात. अशावेळी कौतुक करण्याची जबाबदारी मामा आपल्या खांद्यावर घेई. अपूर्वाईची बहीण आणि भाचरं..
कधीकाळी भेटणारा, लाड करणारा, जवळचा आणि आवडता नातलग म्हणजे मामा. म्हणूनही चंद्राला मामाची उपमा दिली असावी.  मुलांसाठी मामा म्हणजे खाऊ, खेळणी आणणारा देवदूतच.
माझ्या लहानपणी “निंबोणीच्या झाडामागे”  या गीता सारखंच  अजून एक बालगीत प्रसिद्ध होतं. चित्रपट होता “वचन”
लहानपणी दूध प्यायला कंटाळा केला की आई हे गाणं गायची. 

चंदा मामा दूर के, पुए पकाये बूर के
आप खाए थाली में, मुन्ने को दे प्याली में

बाळाचं कल्पनाविश्व फार मजेशीर असतं. निसर्गात असणाऱ्या, त्याला दिसणाऱ्या सर्वच गोष्टी त्याच्या मित्रमंडळीत सामील असतात. निळ्या निळ्या आकाशातील आकार बदलणारा चंद्र तर त्याचा सर्वात आवडीचा.
मुलानं दूध पिऊन टाकावं म्हणून आई त्याला सांगते, लांब राहणारा चंदा मामा, तुझ्यासाठी मिठाई आणणार आहे. पुवा ही रवा आणि साखरेच्या पाकापासून बनवलेली एक गोड मिठाई.
पुवा आहे तरी कुठं, असं जेव्हा तो छोटा मुलगा विचारतो, तेव्हा आई सांगते, भांडं फुटलं आणि पुवा सांडून फुकट गेला.

उड़नखटोले बैठ के मुन्ना चंदा के घर जाएगा
तारों के संग आँख मिचौली खेल के दिल बहलाएगा
खेल कूद से जब मेरे मुन्ने का दिल भर जाएगा
ठुमक ठुमक मेरा मुन्ना वापस घर को आएगा,

आई सांगते, हरकत नाही. तू आता दूध घे,  मग चंदा मामा आपल्या चमचमत्या रथात बसवून तुला त्याच्या घरी घेऊन जाईल.
छान छान गोष्टी सांगून मुलाला भरवायच्या कलेत आई लोकं पारंगत असतातच. सहज गाता येणारी चाल आणि मनाला भावणारे सोपे शब्द आणि आशा ताईच्या आवाजातील खेळकर भाव यामुळे हे गाणे फार लोकप्रिय झाले. संगीतकार रवी यांचा हा पहिलाच चित्रपट होता. 

३) कोवळीक
——————–
बाग में कली खिली, बगीया  महकी
( सिनेमा- चांद और सुरज, संगीतकार -,सलील चौधरी,  गीतकार -शैलेंद्र )

नक्की कोणत्या वयात प्रेमाची जाणीव होते हे सांगता  येत  नाही . पूर्वी  वयात येण्याच्या अगोदरच मुलींची लग्ने होत असत. वयात आले की त्या सासरी जात. यालाच  प्रेम समजले जाई . नंतर ही प्रथा  बंद झाली पण वयात येणे हा निसर्गाचा नियम आहे. तो केवळ शरीराला लागू नाही तर मनाला सुद्धा आहे .
काहीही केले तरी कळीचे फुल होण्याची प्रक्रिया काही थांबू शकत शकत नाही . कथा ,कादंबऱ्या वाचून , सिनेमा पाहून मनात प्रेमाचे धुमारे फुटायला सुरुवात होतेच आणि कल्पनेतल्या राजकुमाराचा  शोध सुरु होतो. ही भावना अलगद उमललेली .
केवळ कल्पना. कोणीतरी हवासा वाटतो. तो जो कोणी असतो त्याच्याशिवाय आयुष्य अधुरे वाटते हे खरे . मनात नव्याने उमललेल्या भावनेचे शब्दचित्र आहे हे गीत.
तारुण्यात पदार्पण करणारी ही मुलगी, कळीचे फुल करणाऱ्या भुंग्याला साद घालताना म्हणते, 

सपने जो आये तड़पाके जाये
दिल की लगी को दहकाके जाये
मुश्किल से हम ने हर दिन बिताया
बाग़ में कली खिली बगिया महकी पर हाय रे
अभी इधर भँवरा नहीं आया
त्या काळात पोहण्याचा ड्रेस घालून प्रियकराला उघड साद देणारी नायिका थोडी बोल्डच. त्यातली अजूनही थोडीशी शिल्लक असलेली निरागसता, ओढ, थोडीशी उत्सुकता आणि आनंद या सगळ्याच भावना आपल्या सुरांमधून व्यक्त केल्याने तनुजाचे काम खरंच सोपे झाले आहे.  

४) आतुरता
—————————–
काली घटा छाये मोरा जिया तरसाये
सिनेमा -सुजाता, संगीतकार एस डी बर्मन, गीतकार मजरुह सुलतानपुरी) 
 

बिमल रॉय यांच्या सिनेमाची एक खासियत होती .
त्यांच्या सिनेमातील पात्रे, खऱ्या आयुष्यातील माणसांसारखे वागायची. अगदी तुमच्या माझ्या सारखी . ना नायक ना खलनायक, सर्वसामान्य माणसे .
त्यांचे स्वतःचे असलेले पूर्वग्रह , गृहीते कदाचित काही समजुती त्यांना नकारात्मक बनवत  असतील पण ती दुष्ट नाहीत.

“सुजाता” या सिनेमात कुणी खलनायक नाही .
सुजाता ही एक हरिजन मुलगी. अस्पृश्य आणि अनाथ .
काही दिवसांसाठी म्हणून एका उच्चवर्णीय इंजिनीअर च्या घरी येते आणि त्या घरचीच होते, तिला घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न होतात खरे पण तिचे भाग्य त्या घराशी बांधले गेले असते.
उपेंद्र बाबूना तिचा लळा आहे, या घराची मुलगी रमा  तिच्यावर प्रेम करते. प्रेम असूनही अंतर ठेवते ती चारू. रमाची आई.   तिचे अस्पृश्य असणे हा तिचा गुन्हा नाही हे चारुला मान्य आहे पण तरीही ती मुलीसारखी आहे, मुलगी नाही .
लहानपणी हट्ट करणारी सुजाता, मोठेपणी मात्र अबोल होते. आपल्या तथाकथित कमीपणाची तिला जाणीव आहे , या घराबद्दल कृतज्ञता आहे आणि तरीही ती आतून दुःखी आहे .
एकत्र असूनही आपण वेगळे आहोत ही जाणीव तिला अस्वस्थ करते आणि अशावेळी अधीर तिच्या आयुष्यात येतो. उच्चवर्णीय , सुशिक्षित सुसंकृत अधीर, ज्याला तिचा इतिहास माहित असूनही काही फरक पडत नाही .
कुणीतरी आपल्यावर प्रेम करत आहे  ही अनुभूती आगळी , ही भावना अनोळखी ..
नूतनच्या चेहेऱ्यावर ऊन पावसाचा एवढा सुंदर मेळ आहे. लज्जा , साशंकता थोडीशी भीती , बराचसा अविश्वास आणि या साऱ्यावर मात करणारा आनंद. हा आनंदच तिला स्वप्ने पाहण्याचे बळ देतो ..

काली घटा छाये मोरा जिया तरसाये
ऐसे में कही कोई मिल जाये
बोलो किसी का क्या जाए रे,

माझ्या आनंदांत या जगाचा काय वाटा आहे. असे जग की ज्याने माझ्या दुःखाचा कधी विचारच नाही केला ..
अबोल ,एकाकी , दबलेली ही मुलगी प्रेमाच्या या अचानक झालेल्या दर्शनाने खळखळून हसते. तिचे डोळे चमकून उठतात , पाय थिरकतात. स्वतः अभिनय न करता सुद्धा आशाच्या आवाजात या सर्व भावना आलेल्या आहेत. तीच कोवळीक आणि तीच अधीरता.
पावसाच्या साक्षीने एका प्रेमकहाणीची सुरुवात होते ..

५) ओढ –आर्तता
——————-
मै जब भी अकेली होती हूँ
(सिनेमा- धर्मपुत्र, संगीतकार- एन दत्ता, गीतकार-साहिर लुधियानवी)

ह्या सिनेमातील कथेचा काळ १९२५ मधला आहे जेव्हा कुमारी माता म्हणून जगणे सुद्धा अशक्य होते.
नायिकेचे आपल्या शिक्षकावर प्रेम असते. गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव असल्याने त्याची मागणी नाकारली जाते.
नायिका गरोदर असते पण जेव्हा तिच्या भावाला पश्चाताप होतो तेव्हा वेळ उलटून गेलेली असते.
तिचा प्रियकर परांगदा होतो .
मनाने खचलेली नायिका घराच्या आत स्वतःला कोंडून घेते .
हे गीत नायिकेच्या तोंडी नाही. रेकॉर्डेड गीत आहे, ज्यातील  भावना, नायिकेच्या भावनांशी जुळतात.

मैं जब भी अकेली होती हूँ तुम चुपके से आ जाते हो 
और झाँक के मेरी आँखों में बीते दिन याद दिलाते हो
हृदयाचे आक्रन्दन आहे हे. Nostalgia too .
आशाचा आवाज इथे अतिशय हळुवार होतो. स्वतःच्या मनाची समजूत घालण्याएवढा समजूतदार.

रस्ते में तुम्हारा मुड़ मुड़ कर तकना वो मुझे जाते जाते 
और मेरा ठिठक कर रुक जाना चिलमन के क़रीब आते आते 
नज़रों का तरस कर रह जाना इक और झलक पाते पाते

साहिरचे शब्द भूतकाळात घेऊन जातात. तिला पाहिल्यावर त्याचे वळून तिच्याकडे पाहणे, त्याला पाहताच तिची पावले थबकणे आणि परत तो दिसावा म्हणून डोळ्याने तरसणे .. आता तर त्याचे दिसणे सुद्धा दुर्लभ असणार आहे याची झालेली जाणीव.
आशाच्या उत्कृष्ट गीतांत ह्याचा समावेश आहे.

6)चेष्ठा करणे, चिडवणे
———————–
भंवरा बडा नादान है
(सिनेमा -साहब, बीबी और  गुलाम, संगीतकार-हेमंत कुमार, गीतकार-शकील बदायुनी)

ह्या सिनेमाच्या सुरुवातीला गीतादत्त आणि गुरुदत्त यांच्यामधील संबंध बिघडायला लागले होते. गीतादत्तने वहिदा रहमान साठी गेला नकार दिल्याने , ही गाणी आशा भोसले यांनी गायली. सिनेमाच्या नावात सह नायिकेला घेतले नसले तरी साहेब बीबी और गुलाम मध्ये वहिदाला सुद्धा महत्वपूर्ण अशी भूमिका आहे.
जबा( वहिदा) वर ब्राह्मो समाजाचे संस्कार असल्याने ती पुरोगामी आहे. तिला स्वतःचे  विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. आई वेगळ्या या मुलीकडे घराची जबाबदारी लहान वयात आल्याने ती जबाबदार आहे आणि काहीशी फटकळ सुद्धा.
सुरुवातीला भूतनाथ ( गुरुदत्त ) चे त्यांच्याकडे राहणे तिला पटत नाही. काहीसा गावंढळ आणि मुखदुर्बळ असलेल्या भुतनाथाशी ती फटकून वागते. नंतर मात्र त्याच्याबद्दल तिला सुप्त आकर्षण वाटू लागते. त्याला उद्देशून कविता लिहीत असतानाच भूतनाथ येतो.
“भंवरा बडा नादान है” ह्या गीताची ही पार्श्वभूमी आहे.
अर्थात स्वतःला भुंग्याची उपमा दिल्याने तो रागावतो आणि तो रागावल्यावर ती त्याला अजून चिडवते.

कभी उड़ जाये कभी मंडराये ,भेद जिया के खोले न
सामने आये नैन मिलाये ,मुख देखे कुछ बोले न,  
भंवरा बडा नादान है
वहिदाच्या चेहेऱ्यावर उमटणाऱ्या भावाची रेंज पाहा. चिडवणे, फ्लर्ट करणे, त्याला अजून कसे समजते नाही म्हणून वैतागणे, त्याची मस्करी करणे आणि हे सगळे भाव आशा ताईंनी आपल्या गीतात आणले आहेत. 

७) रोमँटिक
————
आज कोई प्यार से दिल की बातें कह गया, हाए
( सिनेमा -सावन की  घटा, संगीतकार-ओपी नय्यर, गीतकार एस एच बिहारी)

चित्रपटांसाठी गायला लागल्यावर, लता मंगेशकरपेक्षा पेक्षा वेगळे गाऊन आपण यशस्वी होऊ शकतो याची कल्पना सुद्धा तेव्हा आशा बाईंनी केली नव्हती पण ओपी नय्यर ह्या जादूगाराचा परीसस्पर्श झाला आणि आशा भोसले यांनी हिंदी चित्रपट संगीतात भरारी घेतली.
माझ्या गाण्यासाठी आवश्यक असलेला भरीव आवाज लता बाईंकडे नाही. तो पातळ आवाज माझ्या नायिकेला, पर्यायाने माझ्या पंजाबी स्टाईल ला शोभणारा नाही हे ओपींनी सांगितले आहे. माझ्या गाण्याची प्रेरणा स्त्रियांकडून मिळते हे ही त्यांनी सांगितले आहे. त्यांना अपेक्षित असलेली स्त्री, मुक्त, धीट , स्वतःला व्यक्त करणारी आणि जगाची पर्वा न करता स्वतःच्या हृदयाचे खरे करणारी होती. त्यांचे संगीतही तसेच होते .

माणसे,  प्रेमात पडली की  बदलतात. एका क्षणात काय घडते ते सांगता येत नाही पण बरेच काही जे आत दडलेले असते, अनेक वेळा काही असेल याचीही कल्पना नसते, तेही  बाहेर येते. प्रेमाची झळाळी  वेगळीच. प्रेम आणि विश्वास हे रसायन अजब आहे. माणसे आपल्या कक्षेतून बाहेर पडतात. ओपी आणि आशा यांच्या असंख्य गीतांत “आज कोई प्यार से दिल की बातें कह गया, हाए” हे गीत मला अतिशय आवडते. 

आज कोई प्यार से दिल की बातें कह गया, हाए
मैं तो आगे बढ़ गयी, पीछे ज़माना रह गया, हाए राम
या  गीतातली “हाय राम “ ही फेक जेवढी सहज, तेवढ्याच सहजतेने या दोघांचे भावविश्व फुलले. १९५९ च्या सुमारास कधीतरी आशा आणि ओपीच्या नात्याने नवीन वळण घेतले. ओपी आपल्या कुटुंबापासून अलग झाले.
हे अलग होणे फिल्म इंडस्ट्री पासून लपले नव्हतेच. आणि जी काही कुजबुज झाली असेल त्याची पर्वा काही ओपी-आशा नी केली नाही.

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin. 





8 thoughts on “कौन सा रंग देखोगे!”

  1. वाह वाह या निमित्ताने माहिती नसलेली गाणीही माहिती होतील.चंदामामावालं गाणं ऐकायला हवंच आता.

    गाण्यांची निवड, लिखाण नेहमीप्रमाणे उत्तम

    1. Thank you Heramb Joshi.
      ते गाणे माझ्या लहानपणी बरेच गाजलेले . आशाची मराठी बालगीते जास्त ऐकली जातात पण हिंदी सुद्धा आहेत काही

  2. Chandrashekhar Pachpande

    लिखाण नेहमी प्रमाणे उत्तम. गाणी आता शोधून ऐकली जातील.

  3. प्रिया,

    आशाबाईंना जाऊन महिना झाला.
    तुझी लेखमाला अपेक्षित होती च.

    वेगळ्या ढंगाची गाणी.
    जशी आशाबाई गायल्या,त्याच प्रमाणे तू निवडली आहेस.❤️❤️
    पुढच्या भागांची आतुरतेने वाट पाहते आहे.

    1. Thank you Vidula.

      कमी गाणी माहिती होती असे लक्षात आले माझ्या
      जुनी तर नाहीच ..
      मग जरा वेळ घेतला ..आणि काय सुंदर वेळ होता तो

  4. अगदी क्लासिक झालाय पहिलाच भाग. खूप छान लिहिलंय. एकेक गाणं अगदी उत्तम निवडलंय तितकेच सुंदर विवेचन.
    आशाताईंनी संघर्षाचा काळ जितका तीव्र अनुभवला तितकाच तीव्र, मनापासून जीव त्यांनी गाण्यात ओतला.
    परिस्थितीने तावूनसुलाखून निघालेल्या त्यांच्या जीवाने गाण्यावर तितकेच जीव ओतून प्रेम केले

    1. Thank you Kamini.
      खरंच
      जरा विसावू या वळणावर तिचेच गाणे आहे …प्रत्येक खतरनाक वळणावर ज्या तर्हेने त्यांनी नवीन इंनिंग सुरु केली त्याला केवळ सलाम .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *