Goodbye Asha Taai
रविवारच्या आळसावलेल्या दुपारी आशा भोसले यांच्या निधनाची बातमी आली. त्या नव्वदीत होत्या. शरीर थकलेले होते. त्यांचे गाणे मंदावले होते आणि तरीही अचानक काहीही हासभास नसताना ही बातमी आदळणे हा धक्काच होता.
वाटले this world has become bereft of music.
कला ही नेहेमीच कलाकारापेक्षा मोठी असते हे माहित आहे. मला हे ही माहित आहे की अनेक गायक असतील, तयारीने गातील पण काही कलाकार शतकातून एकदाच जन्माला येतात. त्यांच्या कॉपीज बनवता येत नाहीत. त्यांच्या आवाजाचे रसायन एवढे विलक्षण असते की त्याचे पृथ:करण करणे किंवा पुनर्निर्माण ही अशक्य कोटीतील बाब असते.
आशा भोसले ह्या अद्वितीय कलाकार होत्या आणि त्या आता या जगात नाहीत आणि या बरोबरच हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाची शेवटची कडी आता तुटून गेली.आहे.
मृत्यू हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे; हे माहित असूनही जेव्हा तो येतो, कल्पना असो व नसो, काहीतरी गमावल्याची जाणीव तीव्र होते. स्वतःचा मृत्यू सोडला तर मृत्यू हा नको असलेला पाहुणा आहे.
आशा भोसले गेल्या आणि संगीतावर ज्यांचे ज्यांचे प्रेम आहे ते जग दुःखात बुडून गेले. रिकामे झाल्याची जाणीव अनेकांच्या लेखात दिसली, प्रतिक्रियांत दिसली.
Why loss ? यातील बहुसंख्यांनी फक्त हा आवाज ऐकला असेल, त्यांना दूरदर्शनवर पाहिले असेल, यातील अनेकजण त्यांच्या मुलींच्या, अगदी नातवंडाच्या वयाचे असतील तरीही ज्यांनी ज्यांनी हा आवाज ऐकलेला आहे ते काही क्षण का असेना सुन्न झाले.
शब्दच सापडू नयेत अशी अनेकांची अवस्था झाली असणार. काल त्यांची अंत्ययात्रा पाहत असताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. This loss felt so personal. त्यांच्यासाठी माझे अस्तित्व नव्हते पण मला त्या परक्या नव्हत्या. किती वर्षांपासून मी ओळखते त्यांना .. सांगता येणार नाही पण जेव्हापासून संगीत कानावर पडले तेव्हापासून हा आवाज माझ्या परिचयाचा आहे.
माझी आई गायची ती अंगाई “ नीज माझ्या नंदलाला” ही लताबाईनी गायलेली अंगाई. बाई गेल्या तेव्हा आईला परत एकदा गमावले मी पण आशा ताईंचे अजून एक गीत आहे ज्यांनी माझ्या भावाला घडवले.
भाऊ लहानपणी अतिशय मस्तीखोर होता. रंगाने थोडा सावळा आणि वजन जास्त आणि अत्यंत हुशार. अशा मुलांचे ट्रोलिंग खूप होते. त्याला खेळायला एवढे आवडायचे की सगळ्यांचे टॉन्ट झेलून सुद्धा तू खेळायला जायचा आणि आल्यावर ते आठवून हळूच एका कोपऱ्यात बसून रडायचा. जाऊ नको सांगितले तरी खेळणार कुणाबरोबर ! आमच्या दोघांच्या वयात खूपच अंतर आहे. मग आई त्याला जवळ घेऊन बसायची . काही गोष्टी सांगायची आणि त्याची सांगता, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख या गाण्याने व्हायची.
त्यालाही बरीच वर्षे लोटली. आई सुद्धा गेली आणि भाऊ आयुष्यात यशस्वी होत गेला. त्याची पहिली स्कोडा जेव्हा त्यांनी घेतली, तेव्हा मला बरोबर घेऊन राऊंड मारायला गेला आणि स्टिअरिंग वर डोके ठेवून रडताना म्हणाला, “ आईने सांगितले तसा माझा राजहंस झाला न प्रिया !”
काल आशाताईंची बातमी आली तेव्हा हेच गाणे आठवले.
किती जणांना राजहंस बनण्याची प्रेरणा या आवाजाने दिली असेल !
तिच्या बहिणीसारखीच आशा ही साऱ्या देशाची आशा होती. तिला न भेटता, तिच्याशी न बोलता, खरेतर तिला न जाणता सुद्धा ती आपली होती. ते आपलेपण तिच्या गाण्यात होते. आपला आनंद. आपली दुःखे , आपले प्रेम, आपला राग, आपला मत्सर सुद्धा , आठवते का, लगान मधील “राधा कैसे न जले” ;
मनात दडून राहिलेल्या या सर्व भावनांना तिने बोलके केले.
मी तर म्हणेन, ज्या भावना कदाचित व्यक्तच झाल्या नसत्या त्या भावनांना तिने सूर दिला आणि त्या एवढ्या सुरेल बनवल्या
म्हणून त्या व्यक्त करण्याचे धाडस सुद्धा झाले.
कुठल्यातरी मुलाखतीत तिने सांगितले होते की तिच्यासाठी गाणे हे कोणत्याही गायकापेक्षा मोठे आहे. कदाचित हे तिच्या ऐंशी वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीचे गुपित असावे. .
हे काय गाण्याचे वय आहे का! असा सूर अनेकांनी लावला असेलही, पण नव्वद वर्षे पूर्ण झालेली असताना दुबईला तीन तास प्रेक्षकांना, त्यातही नवीन पिढीला खिळवून ठेवणे हे तिच्याशिवाय कुणालाही जमले नसते हे ही तितकेच सत्य आहे.
चाळीसचे दशक ते आतापर्यंत , या आवाजावर अनेक पिढ्या थिरकल्या. एकेकाळी दुय्यम अभिनेत्रींसाठी गाणारा आवाज सत्तरच्या दशकात सर्व प्रमुख नायिकांचा आवाज झाला. शास्त्रोक्त संगीतावर आधारित गीते, भजने , प्रेमगीते, गझल, कॅब्रे, जॅझ.. असा कोणताही प्रांत नाही जो या आवाजाने काबीज केला नाही.
कोणत्याही वयात मी या आवाजाला तारुण्याचाच आवाज म्हणेन कारण या आवाजाची नावीन्याची ओढ कधीही कमी झाली.
आशा छिलो, भालोबासा छिलो
आज आशा नेई, भालोबासा नेई
किशोरकुमारचे हे फार सुंदर गीत आहे , ज्याचा अर्थ आहे , “ जोपर्यंत आशा आहे , तो पर्यंत प्रेम आहे, जेव्हा आशा संपून जाते तेव्हा प्रेम ही विरून जाते”
प्रेमाची ओळख करून देणाऱ्या शेवटच्या गंधर्वाने आता exit घेतली.
मला कल्पना आहे तिने मागे ठेवलेल्या अफाट सांगीतिक वारसा वर्णन करायला कितीही शब्द वापरले तरी ते कमीच आहेत. जे गमावले आहे ती जागा भरून येणे ही अशक्य आहे. आहेत ती मागे राहिलेली तिची गीते. उरलेले आयुष्य सुरेल करण्यासाठी ती पुरेशी आहेत .
