Skip to content

प्रेमाच्या स्विकाराची अनोखी कहाणी –मासूम 

लग्नानंतरचे दिवस म्हणजे स्वप्नझुल्यावरील हिंदोळा.  परंपरेचा पगडा एवढा आहे की ठरवून केलेले लग्न असो किंवा प्रेम विवाह, अगदी अनोळखी व्यक्ती  असेल तरीही तो आता जन्माचा सोबती हे केवळ सात पावलांच्या सोबतीतच मन मानू लागते.  जसजसे दिवस सरतात, केवळ शरीर नाही, मन गुंतत जाते.  वर्षे उलटतात, चार हाताचे सहा होतात. लग्न मानवते. निदान असे भासते. कधीतरी काहीतरी खटकते. संशयाचा जंतू वळवळतो. छे, शक्यच नाही. आपण उडवून लावतो. शरीराला आणि मनाला स्थिरतेची सवय झाली असते. तरीही मनावर आलेली काळोखी जाता जात नाही. शेवटी धाडस करून, तळ दिसू नये असे मनातून वाटत असतानाही आपण तो गाठायचा प्रयत्न करतो आणि नको ते नजरेसमोर येते. प्रथम अविश्वास वाटावे असे ते जेव्हा सत्याचे रूप घेऊन समोर उभे राहते, तेव्हा मात्र आतून पोखरून गेलेल्या खांबागत अवस्था होते.
For those of us who have experienced situations like this, know that betrayal runs deep and can be shattering . आयुष्य नजरेसमोर उलटे पालटे होते. ती पडझड कशी थांबवायची याचा अनुभव नसतो, त्यासाठी अनेकवेळा सक्षम नसतो. मानसिक, शारीरिक, आर्थिक अवलंबत्व मनाला अजूनच दुर्बल बनवते.
अनेकवेळा गोष्टी समोर स्पष्ट दिसत असूनही मन मानायला नकार देते. एकदा परिस्थितीचा स्वीकार केला की पावले उचलावी लागतात. ते जमतच असे नाही .  कधीतरी त्याचा विभित्सपणा अचानक नजरेसमोर येतो.  That  leaves you shell shocked and devastated.

लग्नानंतरची प्रतारणा हा नविन विषय नाही..  हिंदी सिनेमात तर फार विनोदी पद्धतीने हा विषय हाताळला गेला आहे. पती पत्नी और वो, बीबी नं १ किंवा घरवाली बाहेरवाली हे असे सिनेमा आहेत की पुरुषांचा आयुष्यातील स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन किती उथळ आहे, किती स्वार्थी आहे, किती असभ्य आहे हे लक्षात येते. भारतीय संस्कृती,  निरपेक्ष प्रेम, विश्वास, प्रामाणिकता , एकनिष्ठता अशा आभासी  मूल्यांवर जोर देते. त्यामळे व्यभिचार किंवा infidelity हा दुर्दैवाने सामान्यांच्या सुद्धा कक्षेत आलेला विषय असूनही त्यांच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न होत नाही ; त्याहीपेक्षा त्याच्या परिणामांकडे दुर्लक्ष केले जाते. क्षणिक सुख जे काही असेल ते सोडले तर दुभंगलेली घरे, मुले आणि त्याहीपेक्षा दोन्हीमध्ये मोस्टली दोन्ही स्त्रियांचे शोषण पाहायला मिळते. अनेक सिनेमा तर पहिली पत्नी क्षमा करून पुरुषाला घरी घेते आणि दुसरी पत्नी (!) सिंदूर वगैरे भांगात घालून आत्महत्या करते असे एकूणच पुरुषांची सर्वच बोटे घी मध्ये अशा तर्हेने चित्रित झाले असल्याने, बाबासाहेब आंबेडकरांनी एकच लग्न अनिवार्य केले हा अन्याय आहे अशा भावनेने आणि अत्यंत तिडीकीने बाहेरख्यालीपणाचे समर्थन करतात.
  Very few  captured the essence of “illicit” relationships with the depth and sensitivity it deserves.
ऐंशीच्या दशकात “ प्रतारणा “ या विषयाला गंभीरपणाने पाहायचे धाडस, (मी धाडस म्हणते कारण बॉलीवूड च्या नामवंत निर्माता, दिग्दर्शक यांचे खाजगी आयुष्य सुद्धा अनेक रंगीबेरंगी प्रकरणांनी सजलेले असताना, स्त्रियांच्या नजरेतून हे सिनेमा लिहिणे हे धाडसच होते) काही मोजक्या पुरुष दिग्दर्शकांनी केले. अर्थ या सिनेमा प्रमाणेच मासूम हा सिनेमा फार वेगळा आणि संवेदनशील होता. अफेअर किंवा व्यभिचार करणारे सज्ञान असतील आणि त्यांना त्यांच्या जीवनाचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले तरी यात होरपळणारे अत्यंत निष्पाप जीव असतात. हे या प्रकरणांचा side effects म्हणून पाहिले जाते.
त्यांना त्यांच्या जीवाचा निर्णय घेण्याचा अधिकार नसतो , खरेतर या प्रकरणात त्यांचा कसलाही हातभार नसून होरपळण्याची शिक्षा मात्र त्यांच्या वाट्याला येते. शेखर कपूरचा मासूम हा  सिनेमा समाजाने “अनौरस” असा शिक्का मारलेल्या  मुलांवर भाष्य करतो . 

मासूम
———-

हॉस्पिटलच्या दृश्याने सिनेमाची सुरुवात होते. एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे.  मृत्युपत्रानुसार तिचा लहान मुलगा तिच्या मालमत्तेचा वारस आहे. तिच्या सोबत असलेल्या एका माणसाकडे त्या मुलाची जबाबदारी आहे.
“या मुलाला वडील नाहीत ?” वकील बुचकळ्यात पडतो. “कुठे घेऊन जाणार तू या मुलाला ? “
नैनिताल .
पण मुलाच्या वडिलांबाबत विचारलेला प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतो. 

आता सिनेमा दिल्लीतील एका घरात प्रेक्षकांना घेऊन जातो. सुखवस्तू चौकोनी कुटुंब. सुशिक्षित, सुसंस्कृत.  डी के ( नसरुद्दीन शाह ) हा आर्किटेक्ट असून, एका मोठ्या कंपनीत पार्टनर आहे. तो घरे बनवतो. त्याचे घरही सुबक , रेखीव . घरचं नाही तर घरातील माणसे सुद्धा.

  दोन गुणी मुली, सुशिक्षित, सुसंस्कृत पत्नी इंदू आणि एक कुत्र्याचे गोंडस पिल्लू घराची चौकट पूर्ण करतात.

कुटुंबाच्या जवळची काही मित्रमंडळी आहेत. श्री आणि श्रीमती सूरी, घटस्फोटित असलेली , एकटी आपले आयुष्य जगणारी चंदा आणि इंदू ची जवळची मैत्रीण रत्ना.
एक सकाळ फार वाईट बातमी घेऊन उगवते. नवऱ्याच्या अफेयरमुळे हताश होऊन  रत्ना आत्महत्या करायचा प्रयत्न करते.
ही बातमी समजल्यावर डी के बोलून जातो , “ जबाबदारी घेता येत नसेल तर लग्नच का करावे ? “
हा प्रश्न नियती त्यालाही विचारणार असते. 

यशस्वीतेच्या , सुबत्तेच्या सोपानावर असलेल्या या घरात एक पत्र येते आणि स्वप्नाचा इमला कोसळायला सुरुवात होते.
हे पत्र असते डीकेच्या शाळेच्या हेडमास्तरांचे. पत्रात एका महत्वाच्या कामासाठी त्याला नैनितालला बोलावले असते. हे कारण काय असावे याचा विचार करत असतानाच, एका ट्रँक कॉलने डीकेचे  सारे जगच कोसळून जाते. 
त्याच्या मुलाला त्याच्याकडे सोपवण्यासाठी त्याला नैनितालला बोलावले जाते.
“ मुलगा ? कोणाचा मुलगा ? डी के ला धक्काच बसतो. 
“ भावनाचा मृत्यू झालेला आहे आणि तिच्या मुलाची जबाबदारी हेडमास्टर कडे आहे “ नंतर फोन कट होतो आणि डी के आतापर्यंत विसरून गेलेल्या भूतकाळात जातो.

शाळेच्या रियूनिअनमध्ये डीके, भावनाला भेटतो. ती एकटी असते. थोडीशी हळवी. एका क्षणी मनावरचा ताबा सुटतो. कारण काहीही असेल, मिळालेला एकांत, गत  जीवनाशी अचानक पडलेली गाठ , मजा म्हणून घेतलेल्या एका पेगने केलेला परिणाम, काहीही असेल , त्या रात्री डी के आणि भावना एकत्र येतात.
रात्र संपते आणि त्यातील घटना मनावेगळ्या करून डी के आपल्या पूर्वायुष्यात परत येतो. या प्रसंगानंतर, भावना कधीही त्याला  संपर्क करत नाही. तिला दिवस जातात, मुलगा होतो पण मुलाची बातमी सुद्धा ती कळवत  नाही. तिचे निधन झाल्याने मात्र सत्य असे उघडे पडते.
कात्रीत सापडलेला डीके इंदूला ही बातमी देतो. असे सत्य जे दहा वर्षांपासून लपवलेले असते. 
अनेक वेळा दुसऱ्यांच्या आयुष्यातले वादळ आपण पचवतो. त्याची झळ लागत नसल्याने, माफी द्यावी , घर सोडावे असे काहीही सल्ले देणे सोपे जाते. Infidelity, affairs, these happened to” other people” , certainly not to us पण जेव्हा याच गोष्टीचा सामना करायची वेळ येते तेव्हा परिस्थिती हाताळणे कठीण जाते. इंदूची अवस्था वेगळी नाही. दहा वर्षाचा हसरा खेळता संसार भातुकलीच्या संसारासारखा खोटा ठरतो. डी के ला मुलगा किती हवाहवासा आहे हे तिला ठाऊक असते. तिला तर दोन मुली आणि भावनाला मुलगा ?
मुलाची आणि डीके ची जवळीक तिला नकोशी वाटते. स्वतःला मुलगा नाही हे शल्य आता जास्त जाणवायला लागते.
“ मी या मुलाचा स्वीकार करणार नाही “ ती ठणकावून सांगते पण तोपर्यंत मुलगा त्यांच्याकडे येणार आहे अशी तार येते.
“मलाही कल्पना नाही याची . मी त्याची दुसरीकडे व्यवस्था करेन पण थोडे दिवस तू सांभाळून घे “ डी के विनवतो.
मुलींना काय सांगायचे आणि लोक काय म्हणतील या कात्रीत सापडलेली इंदू त्या मुलाला काही दिवस ठेवून घ्यायला तयार होते. 

दुसऱ्या दिवशी डी के आणि त्याच्या मुलाची , राहुलची भेट होते. वेगवेगळ्या गोष्टी दाखवून तो संवाद साधण्याचा प्रयत्न करतो पण मुलगा त्याच्या कोशात आहे. “तुम्हाला माझे वडील माहित आहेत का “ हा एकच प्रश्न त्याच्यासाठी महत्वाचा आहे आणि ह्याचे उत्तर माहिती असूनही ते देणे डी के साठी अवघड आहे.
आईच्या मृत्यूने अनाथ झालेला राहुल याही घरात एकाकी आहे. घरातील छोट्या मिनीला तो आवडतो पण त्याच्या येण्याने घरातील बाकीची माणसे अस्वस्थ आहेत. आपल्या विश्वात याला सामावून घ्यायची त्यांची तयारी नाही.
राहुल आपला मुलगा आहे हे जगासमोर मान्य करणे अशक्य असले तरी डी के नकळत मुलावर प्रेम करायला लागतो.

मुली सुद्धा त्याला सामावून घेतात. पण इंदूला तो डोळ्यासमोर नकोसा होतो.

“तुमसे नाराज नही जिंदगी, हैरान हूं मैं “
त्या निरागस जीवाचा यात काहीही दोष नाही हे जाणून आहे इंदू …
“तुझसे नाराज नही जिंदगी” हे त्याला उद्देशून नाहीच . तिच्या आयुष्याला आहे. सरळ रस्तावर चालताना आलेले हे वळण . वळायचे का ? हा प्रश्न तितका साधा नाही . त्याने आयुष्यात जे बदल घडणार आहेत त्याला तोंड द्यायची तिची तयारी नाही

जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे
मुस्कुराये तो, मुस्कुराने के, क़र्ज़ उतारने होंगे
मुस्कुराऊं कभी तो लगता है, जैसे होंठो पे क़र्ज़ रखा है

स्वतःची वेदना लपवून, अपमान पचवून  माणसे जगतात. अगदी स्वतःपासून सुद्धा,  ती लपवावीच लागतात तरच आयुष्य सुसह्य होते. कोणत्याही गोष्टीची, अगदी ओठावरल्या  हास्याची किंमत सुद्धा  आयुष्य वसूल करते.
हसण्याचीही  किंमत चुकवावी लागत असेल तर गोतावळ्यात असूनही माणूस एकाकी पडतो.
मुलाचा दोष नाही हे कळण्याइतपत ती संवेदनशील आहे. तो मुलगाही विलक्षण गोड आहे.  पण त्याच्यात तिला त्याच्या आईचा चेहेरा दिसतो आणि मग नवऱ्याचा व्यभिचार, स्वतःची हार, विश्वासाची हार, ज्याच्यामुळे झाली तो  चोवीस तास नजरेसमोर दिसणे सहन करता येत नाही.
मुली लहान, अबोध आहेत आणि ती एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्त्री , त्यामुळे घर सोडणे शक्य नाही. हा सर्व वांझोटा राग नवऱ्यावर आणि पर्यायाने त्या मुलावर निघतो.
Betrayal is a trauma which blows out our cosy life and dreamy assumptions about how we view people around us. When it shatters , we feel victimised and life seems to be out of control.

मासूम या सिनेमाचा शेवट मात्र सुखांत आहे.
काही सिनेमा रीड बिटवीन द लाईन्स असतात. अनेक गोष्टी न ऐकता, पाहता समजावून घ्याव्या लागतात.
इंदू केवळ नवऱ्यासाठी त्या मुलाला सामावून घेत नाही. हा निर्णय तिच्यातील फक्त आईही घेत नाही. इथे एक
स्त्री, दुसऱ्या स्त्री ला समजून घेते.

या सिनेमातील दुसऱ्या स्त्रीला फारसे काम नाही पण तिची व्यक्तिरेखा , नेहेमीच्या “ Other woman “ पेक्षा वेगळी आहे.  मुळात जे दोघांच्यात घडले आहे ते ठरवून घडलेले नाही. अजाणता घडलेली ती “चूक” आहे. त्याची जाणीव तिला आहे. परत कधीही ती डीके ला  भेटत नाही. अगदी गरोदर राहिल्यावर सुद्धा नाही. खरेतर ते एक लहान गाव , त्यात ती कुमारी माता, त्रास झाला असणारच.  अगदी मरणासन्न असतानाही डीके ला हे समजू नये, आपल्या मुळे  त्याच्या सुखी संसारात वादळ येऊ नये ही  तिची मनापासून इच्छा आहे. त्या छोट्या बाळाला जगात एकटे सोडून जावे लागणार ह्याची किती  खंत असेल त्या जात्या जीवाला! भीती सुद्धा . तरीही ती स्वतःच्या चुकीची शिक्षा स्वतः झेलते. हे मोठेपण विरळा. जरी हे सिनेमात दाखवले नाही तरी एक स्त्री हे जाणू शकते . कदाचित हे इंदूला जाणवले असेल.
मुलाची बातमी समजल्यावर इंदू पहिला प्रश्न विचारते , “ तिला आता काय हवे आहे ?” त्यात भीती आहे , असुरक्षितता आहे. पण त्याचे उत्तर देताना डीके म्हणतो “ काहीही नाही , She is dead.” हे मोठेपण तिलाही , तिच्या स्त्रीत्वाला कुठेतरी उमजले  असेल.
ह्यातल्या दोन्ही स्त्रिया फार उंचीला नेल्या आहेत शेखर कपूरने.
“ हे सगळे कधी घडले ? “ हा प्रश्न विचारताना तिच्या लक्षात येते की पहिल्या मुलीच्या वेळी ती गरोदर असताना हे घडले आहे.
“मी गरोदर असताना तू,,….शी “… ह्या वाक्यात काय नाही! घृणा , संताप …
पण भावना सुद्धा गरोदर असताना पूर्ण एकटी आहे …त्या पुरुषाची तिला साथ नाही.
या सर्व सिनेमात डीके मधील पुरुष मात्र ठळक दिसतो. जे घडते ते न समजण्याएवढा डीके लहान नाही. तरीही परत आल्यावर तो भावनाची साधी चौकशीही करत नाही. ते पत्र मिळेपर्यंत ती त्याच्या खिसगणतीत नाही. नंतरही ती गेल्याच्या बातमीने तो दुख्खी होण्यापेक्षाही , आपल्याला मुलगा आहे या बातमीने  हादरतो. आता मी काय सांगू हा एकच प्रश्न त्याला अस्वस्थ करतो.

अनेक वेळा प्रत्यक्ष जीवनात हे पाहायला मिळते. प्रेमाच्या नावाखाली असे संबंध ठेवणारे, अंगाशी आले  की झटकून टाकतात. They don’t own up to their mistake or  love. अगदी समाजाने त्या स्त्रीला कुलटा  ठरवली तरी “My lips are sealed” हा अप्रोच असतो.
 अर्थात With due credit to डिके  , , he is not a skirt chaser .
जे घडले ती चूक आहे ह्याची त्याला जाणीव होते. परत परत ती चूक करण्याचा हलकटपणा त्याच्या अंगी नाही. इंदू चा आपण अपराधी आहोत  याचीही जाणीव त्याला आहे. मी पुरुष आहे , तू माझ्यावर अवलंबून आहेस , गप गुमान रहा हा माजोरीपणा ही त्याच्याकडे नाही.
मुलावर त्याचे प्रेम आहे. घरात शांतता राहावी म्हणून मुलाला बोर्डिंग मध्ये ठेवण्याचा निर्णय त्याने घेतला असेल तरी त्याच्यातील बाप तुटून गेला आहे.

नासिरुद्दीन शहाने हा रोल एवढा सुंदर केला आहे की एका चुकीसाठी एवढी मोठी किंमत चुकवणाऱ्या डी के बद्दल सुद्धा सहानुभूती वाटते. तो चुकला आहेच पण आपल्या चुकीचे परिमार्जन करण्याची त्याची मनापासून इच्छा आहे. त्यामुळे सुद्धा हा सिनेमा पटतो ..आवडतो ..अर्थात असे पुरुष विरळा.

जुगल हंसराज ने लहान वयातच अतिशय सुंदर काम केले आहे. आई गेल्याचे दुःख, वडील कधी ना कधी आपल्याला भेटतील ही आशा, इंदू च्या वागण्यामुळे त्याचे दुखावले जाणे, आपल्या बहिणींवर असलेले त्याचे प्रेम ह्या सर्वच गोष्टी त्याने जिवंत केल्या आहेत.

कथेचा विषय  राहुल आणि त्याचा वडिलांशी असलेला बंध हा असला तरी कथेचा गाभा इंदू आहे. अशी नायिका की जी नवऱ्याच्या प्रतारणेमुळे उध्वस्त झाली आहे, जो मुलगा या प्रतारणेचा चालता बोलता साक्षीदार आहे त्याला तिने स्विकारावे अशी जगाची अपेक्षा आहे.

एकीकडे अनाथ राहुल आहे, जो खरंच लाघवी  आहे. तिच्यातील मातृत्वाला त्याची ओढही आहे. पण त्याला जवळ करणे म्हणजे नवऱ्याच्या तिने न पाहिलेल्या दुसऱ्या स्त्री ला घरात स्थान देणे; जे तिला अशक्य आहे. या दुविधेत सापडल्याने तिचे नवऱ्याबरोबरचे नाते, मुलींशी असलेले नाते यातही दुरावा आला आहे. राहुलशी तिचे फटकून वागणे खटकते पण त्याबाबत इंदू ला दोष देता येतो का ?
सिनेमाच्या शेवटी इंदू , डी के आणि मुले यांचे आयुष्य एका सरळ रेषेत येते.

अर्थात कोणताही पर्याय त्यांनी स्विकारला असता तरी तो चुकीचा ठरला नसता तरीही एकमेकांना सांभाळून घेण्याचा मोठेपणा ते सर्वच दाखवतात हे या सिनेमाचे वेगळेपण आहे

मुळात प्रतारणा हा विनोदी विषय नाही, त्याचे परिणाम फार गंभीर होऊ शकतात , मुलांच्या मनावर तर न पुसले जाणारे ओरखडे पडू शकतात त्याची जाणीव करून  देणारा हा सिनेमा आहे.

Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin. 

21 thoughts on “प्रेमाच्या स्विकाराची अनोखी कहाणी –मासूम ”

  1. प्रिया ,
    खूप आवडता सिनेमा.
    अप्रतिम परीक्षण .
    Love it.

    तू लिहिल्याप्रमाणे यात डिके चा राग येत नाही.
    इंदूचा ही नाही.
    जुगल हंसराज ने काम अफाट केलं आहे.
    गोंडस ,गोजिरवाणा .
    त्याला बघताना कळवळतो जीव.
    शबाना, दोन्ही मुली सगळ्यांनी अप्रतिम काम केलं आहे.
    तू म्हटल्याप्रमाणे एकमेकांना स्वीकारण्याचा मोठेपणा ते दाखवतात हे या सिनेमाचे वेगळेपण आहे.

    1. सुरेख लिहिलंय. अतिशय परिपक्वपणे हाताळलेला हा सिनेमा खूप आवडता आहे.

    2. कदाचित शबाना जो निर्णय घेते तो अनेकांना चुकीचा वाटेल . कारण तिची काहीही चूक नसताना तिला ही माघार घ्यावी लागली आहे पण हा निर्णय तिच्यातील आई घेते.
      बाप नसलेली मुलं कशी सैरभैर होतात हे बघते की ती .
      अशावेळी मुलींचे सौख्य ती स्वतःच्या हाताने नष्ट कशी करणार !
      मुलाला स्वीकारले नसते तर तो विषय एक दरी म्हणून उरला असता आणि त्यात सर्वच होरपळून निघाली असती .
      पराशर मुनींसारखा , सूर्याने स्वीकार केला असता तर हे भोग त्याच्या वाट्याला आले नसते , कदाचित महाभारत घडले नसते. मुले केवळ स्वतःची नसतात , ते समाजाचे देणे असते. त्यांना योग्य दिशा देणे हा गृहस्थाश्रमाचा एक संस्कार आणि तो पालकांशिवाय होऊ शकत नाही ..Masoom has the best end according to me Vidula.

  2. सुरेख लिहिलंय. अतिशय परिपक्वपणे हाताळलेला हा सिनेमा खूप आवडता आहे.

  3. हा विषय खूप मोठा, संवेदनशील आहे. जबाबदारीची जाणीव आणि ती पार पाडण्याचे सामर्थ्य व हिंमत असेल, तर त्या अजाण बालकावर, फार असा फरक पडत नाही; मात्र ते जर पालकांमधे, प्रामुख्याने वडिलांमधे नसेल, तर त्या दुर्दैवी मातेची व त्या बालकाची पार फरफट होते.

    हा चित्रपट मी बघीतला आहे, महाविद्यालयांत असतांना. त्यावेळी जीवनाचा अनुभव कमी असतो, तरी सहृदयतेचा कल होता, त्या निष्पाप जीवाकडेच, की जो कसल्याही गोष्टीला जबाबदार नसतांना, परिणाम भोगतोय.

    मग आठवले, ते महाभारत आणि नम्र झालो, तो भगवान व्यासांच्या प्रतिभेपुढे. कर्णाची प्रतिमा रेखाटतांना त्यांच्या प्रतिभेचे अलौकिकत्व बघायचे असेल, तर मूळ महाभारत वाचावे; अर्थात त्यावरील पुस्तके यासाठी मदत करतातच. याबद्दल सर्वात आवडलेले पुस्तक म्हणजे, दाजीशास्त्री पणशीकर यांचे, ‘कर्ण खरा कोण होता?’

    अजून खूप काही मनात आले, हे वाचल्यावर. मस्त लिहीलंय.

    1. Thank you Sir.
      कदाचित शबाना जो निर्णय घेते तो अनेकांना चुकीचा वाटेल . कारण तिची काहीही चूक नसताना तिला ही माघार घ्यावी लागली आहे पण हा निर्णय तिच्यातील आई घेते.
      बाप नसलेली मुलं कशी सैरभैर होतात हे बघते की ती .
      अशावेळी मुलींचे सौख्य ती स्वतःच्या हाताने नष्ट कशी करणार !
      मुलाला स्वीकारले नसते तर तो विषय एक दरी म्हणून उरला असता आणि त्यात सर्वच होरपळून निघाली असती .
      दुसरे , तुम्ही कर्णाचे उदाहरण दिलेत. पराशर मुनींसारखा , सूर्याने स्वीकार केला असता तर हे भोग त्याच्या वाट्याला आले नसते , कदाचित महाभारत घडले नसते. मुले केवळ स्वतःची नसतात , ते समाजाचे देणे असते. त्यांना योग्य दिशा देणे हा गृहस्थाश्रमाचा एक संस्कार आणि तो पालकांशिवाय होऊ शकत नाही

  4. लेखाचा विषय असलेला मूळ सिनेमा सविस्तर समजाऊन घेत,त्यास त्याहून अधिक समजावून सांगणे ही अद्भुत कला आहे.त्यात आणखीन एक तुमची खास नाममुद्रा असलेली आजूबाजूचे सांगण्याची ढब.

    हे असले documentation फार अत्यल्प वाचायला मिळते.तसे ते मिळते,हे भाग्य वगैरे म्हणता येईल,इतपत खरे.

    आता आणखीन दोन वाक्ये.
    एक – कितीदाही पाहिला असेल तर लेख वाचून त्या धुनीत परत तोच चित्रपट बघायचे mandatory असते.
    दोन – प्रत्येक अशा लेखानंतर असे वाटत आले आहे की तुम्ही बोलत आहात आणि मी ऐकतो आहे.येस..ऐकू येते सारे..

    1. Thank you Rasse Sir.
      मला आतून वाटल्याशिवाय लिहिता येत नाही . त्यात कुठेतरी रिलेट व्हायला हवे. मासूम हा अनेक पातळ्यांवर , वेगवेगळ्या वयात समजला.
      अशी मुले पाहण्यात आहेत . एकल पालकत्व असणारी सुद्धा.
      अनेकवेळा ती खचतात किंवा जगावर सूड उगवतात.
      हा सिनेमा , नात्यांवरील सिनेमा नाही .. त्याचा शेवट कदाचित वेगळा असता . हा सिनेमा त्या मुलाला घर मिळवून देण्याचा आहे ..तरच या बापाचे प्रायश्चित होणार आहे

  5. अतिशय आवडता सिनेमा ❤️. अतिशय सुंदर लेख 👍

    1. छान लिहिले आहेत. खूपच सुंदर सिनेमा आणि कथा खोलातून उलगडणारी गाणी.. मित्र सूरी शेवटी स्वीकाराच्या मुद्द्यावर नेमकेपणाने बोट ठेवतात, तिथे सिनेमाने गाठलेली उंची.. यातील सगळी माणसं खूप खरी आहेत, त्यांच्या भावनिक आंदोलनांसकट ती खूप reliable वाटतात.

      1. Thank you Meghana .
        हो. मुळात माणसे ग्रे आहेत. चांगले आणि वाईट असे दोन्हीचे मिश्रण असलेली माणसे.
        सूरी चे व्यक्तिमत्व , समाजमन दाखवते पण एक ठोस निर्णय घेण्यास सुद्धा कारणीभूत होते

  6. अतिशय सुंदर लिहिलंय! एक स्वीकार किती जीवनांना निराशेच्या नकारातून बाहेर काढतो हे सांगणारा नितांतसुंदर सिनेमा !!
    बाईपण ते आईपण हा प्रवास शबानाच्या प्रगल्भ अभिनयाने उजळून निघालाय…
    प्रियादी for this write up you deserve great salute 🫡 ♥️♥️♥️♥️♥️♥️

    1. खरं आहे Kamini . तीन आयुष्य मार्गी लागतात.
      बाकी क्षमा माणसाला मुक्त करते. Aparadh करणारा त्यातून काय घेतो ते त्यावर. .पण करणारा सुटतो या बंधनातून.
      मलाही म्हणून आवडला ..बाईपण te आईपण. वाह. सार सांगितलेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *