Skip to content

Goodbye Shree


भौतिक शास्त्रातील “ Light “ या विषयाचे लेक्चर चालू होते.  क्लास मध्ये विषय रटाळ शिकवणारे केवळ हेच एक शिक्षक आणि त्यात शेवटचा तास. सकाळी साडे सहाला क्लास सुरु व्हायचा. बारा पर्यंत चालायचा. आधीच विषय कठीण आणि शिकवणारे दिव्य. कंटाळलो होतो.
आदल्याच दिवशी घरात कॅसेट आणून “नगिना” सिनेमा  पाहीला होता.
श्री च्या निळ्या डोळ्यांचा परिणाम डोक्यावर झाला होताच त्यात तिने धारण केलेले इच्छाधारी रूप तर वेड लावणारे. सहज डोक्यात विचार आला, खिडकीवर लटकली तर सर जीव घेऊन पळत सुटतील न… सुटका तरी होईल. बरे हे स्वतःच्याच डोक्यात ठेवायचे तर नाही! मैत्रिणीच्या कानात कुजबुजले आणि हसत सुटलो. तोंड जरी दाबायचा प्रयत्न केला तरी ते कठीणच कर्म .
Why are you laughing ?
पटेल  सरांचा धीरगंभीर आवाज वर्गात घुमला. हसू तर आवरत नाही आणि सांगता तर येत नाही ही परिस्थिती. शेवटच्या दहा मिनिटांसाठी वर्गाच्या बाहेर काढले. मनातल्या मनात नगीना च्या नागिणीला थँक्स म्हणून सटकलो. इच्छाधारी नागीण आणि जादू, वय वाढलेला ऋषी हे आवडण्याएवढे आम्ही लहान नव्हतो पण परिकथेसारखा असलेला हा खोटा खोटा सिनेमा आवडला तो केवळ श्री मुळे. ती, तिची नृत्ये, तिचा अभिनय सगळंच मनाला आवडून गेले. इच्छाधारी नागीण या विषयावर अनेक सिनेमा आले असतील पण श्री ने जी जान ओतलीय ती दुसऱ्या नागात कधी पाहायला मिळाली नाही.
खरेतर या सिनेमाच्या आधी श्रीदेवी फारशी आवडली नव्हती. तिचे दाक्षिणात्य रूप आणि बांधा, मेकअप, मेलोड्रॅमॅटिक भूमिका आणि जितेंद्रबरोबर जमलेली जोडी हे सगळंच खूप उथळ, दिखाऊ. त्यात समांतर सिनेमाची लाट आल्याने सशक्त कथा, अभिनय यांचा परिचय शबाना, ओम पुरी, स्मिता पाटील यांच्यामुळे झाला होता.
It was unfortunate that Shridevi made her debut in Hindi when the mainstream cinema was at its nadir. हिम्मतवालाने श्री ला सुपर स्टारडम दिले पण “Thunder thighs “ हे विशेषण सुद्धा. तिचे वजन, तिचे उच्चार यावरही बरीच टीका झाली. सुरुवातीला तिच्या चित्रपटाचे डबिंग बेबी नाझ आणि नंतर रेखाने केले. चांदनी चित्रपटापासून मात्र तिने स्वतःचे डबिंग स्वतः करायला सुरुवात केली. नगिना, मि. इंडिया, आर्मी , गुमराह, चांदनी, लम्हे  हे सर्व सिनेमा, हिरो कुणीही असो , श्रीदेवीचे म्हणूनच ओळखले जातात एवढा दबदबा निर्माण झाला होता.
कमल हसन यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले, श्रीचे यश हे नशिबाने दिलेले दान नव्हते. तिचे यश तिने स्वतःच्या मेहनतीने मिळवले होते. कमावले होते” 
ती मेहनती तर होतीच आणि चांगल्या दिग्दर्शकाने तिच्यातील कलाकाराला  पैलू पाडले.
Shekhar Kapoor once said  that Sri  made love to the camera. The shy , soft spoken woman who sat quietly in one corner of the sets, makeup on, waiting for her co-stars to arrive or the shot to be ready, would transform once the director called “ action “
And what that transformation was !
अभिनयाचे किती पैलू एका भूमिकेला असू शकतात हे पाहण्यासाठी मि इंडिया हा एकच सिनेमा पुरे आहे.

तिने स्वतःच्या नावावर थिएटरमध्ये प्रेक्षकांना आणले. तिच्या नावावर सिनेमा विकले गेले. अमिताभ बच्चन याना ही  स्वतःचा पडत्या काळात तिचा आधार घ्यावा लागला. त्यांच्या एवढीच सशक्त भूमिका आणि पैसे या अटीवर तिने खुदा गवाह स्विकारला होता. ती चित्रपटसृष्टीची पहिली महिला सुपरस्टार होती यात दुमत नाही.
पंधरा वर्षाच्या ब्रेकनंतर जेव्हा इंग्लिश विंग्लिश या सिनेमात तिने पुनःपदार्पण केले , तेव्हा ही पंधरा वर्षे सहज पुसली गेली. एक सामान्य गृहिणी , थोडीशी असुरक्षित , थोडीशी खिन्न आणि तरीही निस्वार्थी आणि खंबीर .. घराघरात दिसणाऱ्या आईसारखीच. प्रेमापेक्षाही घराच्या गृहिणीला आदर हवा असतो ही खरेतर छोटीशी इच्छा पण मनात दबलेली. श्री ने ही स्त्री पडद्यावर जिवंत केली.

तिच्या अकाली मृत्यूने सिनेमाच्या इतिहासातील एक पर्व संपले.  पर्व , हे आज कोणाही बद्दल बोलले जाते पण जेव्हा नायिका म्हणजे केवळ नाचणे , रिझवणे , झटका आणि मटका करण्यापुरती उरली , त्या काळात तिने आणि नंतर माधुरी दीक्षितने आपले स्वतःचे स्थान निर्माण केले यात वादच नाही.
१९८० च्या नंतर हिंदी सिनेसंगीताला उतरती कळा लागली. गीतांनी अमर होण्याचे भाग्य काही या काळातील नायक नायिकेंच्या वाट्याला आले नाही  तरीही श्री ची काही गाणी तिने आपल्या अभिनयाने अजरामर केली.
त्यातली काही माझ्या आवडीची.
Innocence personified
सुरमई अँखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे–सदमा
——————————————————-

श्री ने यात एका अशा स्त्रीचा रोल केला आहे की जिचे मानसिक वय एका छोट्याश्या मुलीचे आहे. अपघातात डोक्याला मार बसल्याने या तरुण मुलीची स्मृती जाते. तिचा सांभाळ एक शाळेत शिकवणारा शिक्षक करतो.
यात गुलजार यांनी लिहिलेली “सुरमई अँखियों में ,नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे ” ही एक आगळी उत्कट अंगाई आहे. यातील नायकाचे नायिकेवर प्रेम आहे पण ती नायिका जरी सुस्वरूप तरुणी असेल तरीही तिचे मानसिक वय एका छोट्या मुलीचे आहे. एका अपघातात तिची स्मृती गेली आहे . मनातल्या तारुण्य सुलभ भावना मनाच्याच कोपऱ्यात ढकलून तो तिला हे अंगाईगीत गातो.

सुरमई अंखियो मै नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे
निंदिया के उड़ते पाखी रे, अंखियो में आजा साथी रे

एकाकी असलेल्या त्याच्या आयुष्यात या मुलीचा प्रवेश त्याला सुखावणारा आहे.तिच्या सोबतीची स्वप्न त्याला ही सुखावत आहेत  पण तिचा गैरफायदा घेण्याचा विचार सुद्धा त्याच्या डोळ्यात नाही.येसूदास यांच्या आवाजात ही नाही. श्री ला यात शब्द नाहीत , सूर नाहीत … पण तिचे हावभाव , तिचे डोळे एवढे निष्पाप आहेत की त्या पात्रातली तरुण स्त्री नायकाबरोबरच प्रेक्षकांना सुद्धा जाणवत नाही. 
लक्षात राहतात ते तिचे मासूम डोळे.
मनात करूणा आणि वात्सल्य दाटून यायला गीताबरोबर तिची अदाकारी सुद्धा कारणीभूत आहे.

Sexy siren
नैनो में सपना सपनो में सजना, सजना पे दिल आ गया–हिम्मतवाला
—————————————————————-

श्री च्या निधनाची बातमी कळल्यावर एका मित्राची प्रतिक्रिया होती …” Oh my ! She made our hostel nights at IIT bearable. “ इंजिनिअरिंगचा कठीण अभ्यास , जीवघेणी स्पर्धा , घरापासून लांब असणे , मेस चे मेसी जेवण या सर्वाना पेलले ते श्रीच्या हिम्मतवाला , जस्टीस चौधरी , मवाली या सिनेमांमुळे. God bless her soul “
खूप वर्षानंतर इंग्लिश विंग्लिश मध्ये श्री ला पाहिल्यावर नवऱ्याची प्रतिक्रिया होती; Hey what happened to the thunder thighs ? She is not the same.   
मुमताज , माला सिन्हा , रेखा , आणि श्री … पुरुषांच्या कल्पनाशक्तीची  परिपूर्ती होत्या या नायिका.
हिम्मतवाला हा टिप्पीकल दक्षिणीचा सिनेमा. गुणी नायक , उर्मट नायिका , बिब्बा टाकणारा खलनायक,  आणि प्रेक्षकांना दर्शन सुख देणारी नाच गाणी. नेहेमीच चावून चोथा झालेला रिव्हेंज ड्रामा. १९८३ मध्ये या सिनेमाने ५ करोडचा गल्ला जमवला. Himmatwala was  one of the biggest blockbusters of the 1980s. आणि नैनो में सपना हा सर्वात लोकप्रिय ट्रॅक. 
समुद्राच्या विस्तीर्ण किनाऱ्यावर रचलेली रंगीत मडकी , त्यात खोवलेले पिसांचे झुबके , भपकेदार , दिखाऊ , अंगाला घट्ट बसणाऱ्या पण पारंपारिक पोशाखातील स्त्रिया , आणि ठेक्यावर उड्या मारणारा नायक यात लक्षात राहते ती या सर्व निरर्थक गोष्टींना अर्थ देणारी बोलक्या डोळ्यांची श्री .
श्रीदेवी आणि जोडीला जयाप्रदा यांनी जितेंद्र सारख्या पडत्या कलाकाराच्या कारकिर्दीला जीवदान दिले. तोहफा , मवाली , जस्टीस चौधरी हे सिनेमा चालण्यात या सेक्सी इमेजचा महत्वाचा वाटा होता. या गीताची मोहिनी नक्की कशामुळे हा प्रश्न पडला असेल तर २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या हिम्मतवाला या सिनेमातील हेच गीत पहा …
उत्तर मिळून जाईल . 

Venomous vixen
मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा. मैं नागन तू सपेरा. –नगिना
——————————————————–

१९८६ मध्ये प्रदर्शित झालेला “नगिना” ब्लॉक बस्टर म्हणून गाजेल हे कदाचित या सिनेमाशी संबंधित असणाऱ्या कुणालाही वाटले नसेल. या अगोदर या विषयावर आलेला नागीन हा सिनेमा जरी गाजला होता तरीही ८० च्या दशकात हा विषय खूप जुना झाला होता. याचा दिग्दर्शक सुद्धा फार नावाजलेला नव्हता. अनेक नायिकांनी नाकारलेला हा “स्नेक वूमनचा”  रोल श्री कडे आला तेव्हाच या सिनेमाच्या यशाचा पाया रचला गेला असावा. पहिल्या भागात एका साध्या  खेडवळ मुलीची भूमिका नंतरच्या भागात बदलते. जुनी कात टाकलेल्या नागिणीसारखीच. अमरीश पुरी , ऋषी कपूर सर्वांचीच कामे सुंदर पण सिनेमा  केवळ श्रीदेवी साठीच लक्षात राहतो. शेवटचे गीत “मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा. मैं नागन तू सपेरा. “ हा सिनेमाचा क्लायमॅक्स सीन आहे. तिची खरी ओळख. अमरीश बरोबर तिचा झालेला सामना आणि पांढऱ्या वस्त्रातले सर्प नृत्य.
अभिनय आणि नृत्याचा संगम.

Impish lass
मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियाँ है थोड़ा ठहरो साजन मजबूरियाँ है–चांदनी
——————————————————————————

आताचे लग्न समारंभ चांगले चार चार दिवस चालतात. आमच्यावेळी आधी दोन दिवस मैत्रिणीने लावलेली मेंदी , आदल्या दिवशी देवकार्य आणि घरातच पाच बायकांनी लावलेली हळद सुकली की मुलगी लगेच बोहल्यावर चढायची. क्वचित कुणीतरी पिवळी पिवळी हळद लागली गुणगुणत असेलही पण एकूणच नाच आणि गाणे ऐकलेही नव्हते. यश चोप्रा आणि त्या नंतर आलेल्या  सुरज बडतात्या यांनी साग्र”संगीत” लग्न मराठी मध्यम वर्गीयात आणले. आता तर अगदी हॉल घेऊन संगीत ठेवतात. घरातले सर्व त्यात सामील होतात. त्यासाठी कोरिओग्राफरची मदत सुद्धा घेतली जाते. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चांदनीला तीस वर्ष होतील पण त्यातील “ मेरे हाथों में नौ-नौ चूड़ियाँ है “ हे गीत मात्र संगीत या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग आहे.
एका लग्नात ऋषी ( रोहित ) आणि श्रीदेवी ( चांदनी ) ची ओळख होते. लग्नाच्या आधी असलेल्या संगीत या कार्यक्रमात नाचणाऱ्या श्री ला पाहून ऋषींचे भान हरपते. त्याने काढलेल्या असंख्य फोटोत फक्त आणि फक्त श्री च व्यापून उरते. हे कुठेही खोटे वाटत नाही एवढे सुंदर नृत्य तिने केले आहे.गाण्याच्या स्टेप्स काही फार कठीण नाहीत. अनेक लग्नात त्याची उजळणी झाली आहे. पण जो ठसका आणि चेहेऱ्यावरचा खट्याळ भाग आहे तो फक्त श्रीच आणू शकते.
याच गाण्यातील एक ओळ थोडी वात्रट आहे,
मेरे दर्ज़ी से आज मेरी जंग हो गई
कल चोली सिलाई आज तंग हो गई
तिच्या स्टेप्स , हाताची अदाकारी मनाला गुद्गुल्या  करते पण कुठेही अश्लील वाटत नाही . मुलगी तारुण्यात आली  आहे हे एवढे सुरेख दर्शवले आहे तिने . तिच्या डोळ्यातून , ठसक्यातून.
This “ Chandani “ showed sensuality combined with dignity . She was beautiful , innocent , strong , lovable , sensitive and pure at heart .
ही भूमिका आणि चांदनी चा पांढरा  ड्रेस जो तिच्या व्यक्तिमत्वाचे प्रतीक होता , ज्याने तिची सेक्सी प्रतिमा बदलवली . पांढरा शुभ्र कुडता, चुरीदार आणि लेहेरिया ओढणी हा पोशाख कुणी वापरला नसेल असे मला वाटत नाही. प्रत्येक मुलीच्या मनातल्या चांदणीला प्रत्यक्षात आणण्याचे काम या सिनेमाने आणि या भूमिकेने केले.
Rediff  said “the actress transformed into a mythical goddess in a white number.” खरंच होते ते . यश चोप्रा ने जुही आणि माधुरीला सुद्धा श्री च्या मोल्ड मध्ये बसवायचा प्रयत्न केला पण तिची प्रतिमा त्यांनाही पुसता आली नाही. .

Femme fatale
काटे नहीं कटते ये दिन ये रात, कहनी थी तुमसे जो दिल की बात 
———————————————————–

रोमान्स काही प्रेक्षणीय नसतो . अनुभवायचा असतो .ओल्या शरीराला चिकटलेल्या नजरा म्हणजे थोडाच रोमान्स असतो ? पाऊस अंगावर कोसळला नाही तरी चालेल पण मनात झिरपावा लागतो . शरीर भिजले नाही तरी चालेल पण ओलावा मनात जाणवावा लागतो . मनाबरोबर डोळेही भिजवून टाकणारा पाऊस  मला आवडतो कारण असा चिंब करणारा पाऊस फक्त त्या दोघांसाठी असतो.
आणि इथे तर तो  सुद्धा अदृश्य . मधेच लाल रंगात आपले अस्तित्व दाखवून जाणारा पण तिच्या नसानसात भिनलेला . शरीराच्या अंगोपांगात याच्या खुणा तिला जाणवून देणारा तो आणि त्याच्या केवळ प्रतिमेतच गुंतलेली ती .
शेखर कपूर चे “  काटे नहीं कटते ये दिन ये रात, कहनी थी तुमसे जो दिल की बात “  हे पावसाच्या गाण्यात नक्कीच पहिल्या पाचात येईल.
To dance with an invisible man in the first place and then to emote imagining as if one is being kissed and caressed by that imaginary invisible man .. She was brilliant.
आसमंताला झाकोळून टाकणारा  रात्रीचा काळा रंग , आकाशात जमलेले  ढग , काहीतरी घडणार आहे हे सूचित करणारा  सोसाट्याचा वारा आणि नखशिखांत निळ्या रंगात लपेटलेली अप्सरा … आपण अदृश्य आहोत याचे समाधान कोणत्याही पुरुषाला वाटेल …
“ I love you” हे थिएटरमधील प्रत्येकाच्या तोंडी आले असेल .
तुमने जो ली अंगडाई है
फिर बात वोही याद आई है
लो आज मै कहती हूं
“ आय लव्ह यु “
आणि आतापर्यंत ताब्यात ठेवलेल्या शरीरात उसळलेला लोळ …
पाउस असा अंतर्बाह्य उसवून  ही जातो.
चालबाज या सिनेमातील “ ना जाने कहां से आई है ना जाने कहा को जायेगी.. दीवाना किसे बनाएगी ये लड़की “ या गीतात मात्र पावसात रेन कोट घालून भिजणारी श्री छोटी मुलगी वाटते , खट्याळ , खोडकर … डांब्रट … एका स्त्रीच्या शरीरात अडकलेली छोटीशी लबाड मुलगी.

लम्हे सिनेमाचा उल्लेख केल्याशिवाय तिच्या करिअरचा आढावा घेणे शक्यच नाही. काळाच्या खूप पुढे असलेला हा सिनेमा . प्रेमाला काळाचे , वयाचे , नात्याचे आणि रिवाजांचे कसलेच बंधन अडवू शकत नाही हा संदेश देणारा हा सिनेमा, आपल्याहून वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीवर नायकाचे प्रेम असते. हे प्रेम सफल होत नाही कारण त्या स्त्रीचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम असते. तिचा अपघाती मृत्यू होतो आणि तिच्याच पोटी जन्म घेणारी , तिचेच रूप घेऊन जन्माला आलेली तिची मुलगी , आपल्या आईवर जीव जडावलेल्या , आपल्याहून एक पिढी मोठ्या असणाऱ्या नायकावर जीवापाड प्रेम करते .
आई आणि मुलीची भूमिका श्री ने केली आहे. आधीची राजस्थानी , खानदानी पल्लवी , आपल्या वडिलांना जपणारी , त्यांच्या मृत्यनंतर कोलमडून जाणारी पल्लवी. तिच्या आयुष्यात नायक येतो तो केवळ मित्र म्हणून . तिच्या मुलींसाठी मात्र तो सर्वे सर्वा . तिच्या आयुष्यात त्याच्यावर प्रेम करण्याशिवाय तिने दुसरे काहीही इच्छिले नाही. त्याने वाढदिवसाला लॉकेट दिल्यावर , त्याच्या स्पर्शाने मोहरलेली ती , आपण दिलेला स्वेटर त्यांनी घातल्यावर धीट होऊन आपल्या प्रेमाचा इजहार करणारी ती आणि त्याच्या थप्पड मुळे नाही तर  त्याचे आपल्या आईवर प्रेम होते ही कबुली ऐकल्यावर उन्मळून पडलेली ती … तिच्यावर नजर खिळून राहते एवढी बेफाम सुंदर दिसली आहे ती .

मला आवडतो तो शेवटचा सीन. नायक परत आल्यावर , त्याने आपले प्रेम व्यक्त केल्यावरही स्वतःला रोखणारी , हे तरी खरे असेल का या गुंत्यात अडकलेली , सुखाचा हा स्पर्श आभासी तर नाही न म्हणून धास्तावलेली ती , तिच्या आधीच्या खेळकर प्रतिमेशी विसंगत अशी बनलेली ती …
अप्रतिम शॉट आहे.
गुमराह, खुदा गवाह , आर्मी , जुदाई ,इंग्लिश विंग्लिश हे अजून काही सिनेमा ज्यात तिने भूमिकेचे सोने केले आहे.

फार लवकर एक्झिट घेतली तिने. She has left us too soon.
.माझ्या अभिनयाला वाव मिळेल अशी उत्कृष्ट भूमिका करायची इच्छा तिने बोलून दाखवली होती .
That ‘best’ is now gone forever.

Good bye Shree .
Rest in peace.

Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.

Tags:

2 thoughts on “Goodbye Shree”

  1. प्रिया ,
    खूप आवडती.
    जवळ जवळ सगळे चित्रपट मी बघितले आहेत.अगदी जितेंद्र बरोबरचे सुद्धा.
    त्या काळात, त्या वयात ते पण आवडले होते.

    तू अप्रतिम,सुंदर लिहितेस .

    किती वेळा सांगायचे ग.🩷🩷

  2. श्री हिंदी सिनेसृष्टीला पडलेलं पहाटेचं खूप सुंदर स्वप्न !!
    कोणतीही भूमिका असू देत तिचा presenc त्या भूमिकेची dignity वाढवायचा.
    कमालीची सुंदर, किंचित अप-या नाकाची नटखट श्री बघणं असू देत वा प्रगल्भ स्त्री व्यक्तिरेखेतून भेटणारी श्री असू देत, ते character बघता बघता आपण अनुभवतोय इतके सजीव भासायचे!
    काही कलाकार असतात आणि काही कल्याणार्थ असतात. कल्ला करणाऱ्यांच्या भाऊगर्दीतील ही मनस्वी कलाकार.
    आर्मी फंडींग साठी नेहमीच पुढे असायची पण कधीच त्याची कधी प्रसिद्धी केली नाही.
    खूप लहानपणापासून तिचे सिनेमे बघत बघत मोठे झालेली आमची पिढी खरोखरच भाग्यवान आहे .
    अगदी अप्रतिम लिहिलंय दी!
    देखण्या व्यक्तिमत्त्वाला देखण्या शब्दांचे कोंदण 👌♥️♥️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *